श्री निसर्गदत्त महाराज या औलीयाची तुम्हाला ओळख व्हावी म्हणून हा लेख.
एक अत्यंत सामान्य माणूस सुद्धा सिद्ध होऊ शकतो याचा दाखला म्हणजे महाराज. आपल्याला त्यांच्या जीवनात डोकावण्याच कारण नाही. ते सामन्याहून सामान्य होते, त्यांची शैक्षणिक, आर्थिक किंवा कौटुंबिक स्थिती फारशी आशादायक नव्हती इतकी माहिती पुरेशी आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते मराठी होते. त्यांनी स्वतः तपासलेलं आणि त्यांच्या सिद्धत्वाची अपूर्व झलक दाखवणारं एकमेव पुस्तक म्हणजे 'सुखसंवाद'. साधकांच्या विविध प्रश्नांना समोरासमोर दिलेल्या उत्तरांच ते संकलन आहे.
महाराज कोणत्या साधनेनं सिद्धत्वाला पोहोचले हे जाणणं उपयोगी आहे. शांत बसून 'मी आहे' या जाणिवेवर स्थिर राहणं ही एकमेव साधना त्यांना बोधाप्रत घेऊन गेली.
त्यांच्या शब्दात :'मी आहे' या शुद्ध असण्यावर मन एकाग्र करणे आणि त्यातच राहाणे ही गुरूंची सूचना मी पाळली. केवळ 'मी आहे' ही जाणिव मनात धरून मी तासंतास बसत असे. लवकरच शांती, आनंद आणि सखोल सर्वव्यापी प्रेम ही माझी सहजस्थिती बनली. त्या स्थितीत मी, माझे गुरू, माझे रोजचे जीवन आणि सभोवतालचे जग सारे अदृश्य झाले. केवळ शांती आणि अथांग मौन उरले.(सुखसंवाद - ५१)
'जागणे, झोपणे आणि परत जागणे सतत चालू असते पण हा अवस्था पालट मला घडत नाही. त्या अवस्था फक्त घडतात एवढेच. मला केव्हाच काही घडत नाही. काहीतरी अपरिवर्तनीय, गतिहीन, स्थिर, सुमेरूवत, खडकासारखे अभेद्य आहे. घनदाट सच्चिदानंद स्वरूप आहे. मी त्या वेगळा कधीच नसतो. कोणताही छळ किंवा आपत्ती मला स्वरूपापासून विचलित करू शकणार नाही. ही अवस्था संपूर्ण स्थिर आणि कायमची आहे. मी काही केले तरी ती सुमेरूवत स्थिर असते. एकदा तुम्हाला सत्यस्वरूपाची प्रचिती आली की तुम्ही त्यात स्थिर होता'. (सुखसंवाद -४२)
या गृहस्थाचा आत्मविश्वास कमाल आहे आणि त्यांचे शब्द प्रत्येक साधकाला अपरिमित दिलासा आहेत.
ते म्हणतात : 'मी आहे' हा साधा भाव सर्वात उत्तम. त्यावर धीमेपणानं स्थिर राहा. येथे धीमेपणा हा सुज्ञपणा आहे. अपयशाचा विचार करू नका. या कार्यात अपयश येऊच शकत नाही'. (सुखसंवाद - ५१)
'मी तुम्हाला परत सांगतो, तुम्ही सर्वव्यापी, सर्वातीत, सदवस्तू आहात - त्याप्रमाणे वागा. विचार, भावना, कृती ऐक्याने होऊ द्या. मग मी जे म्हणतो त्याचा प्रत्यक्ष अनुभव तुम्हाला येईल. प्रयत्नाची गरज नाही. विश्वास ठेवा आणि त्याप्रमाणे वागा'. (सुखसंवाद - ५१)
'मी सध्या चौऱ्याहत्तर वर्षांचा आहे तरी मी चौऱ्याहत्तर वर्षांपूर्वीचे अर्भक आहे. मला स्पष्ट जाणवते की सर्व बदल होऊनही मी ते मूल आहे. माझ्या गुरूंनी मला सांगितले, "आत्ता देखील जे मूल तू आहेस तेच तुझे स्वरूप आहे.
'मी हे आहे' किंवा 'मी ते आहे' अशा कल्पनेमुळे बिघडण्यापूर्वी 'मी आहे' हे जेथे अजून शुद्ध आहे, अशा शुद्ध असण्याच्या स्थितीत मागे जा". तुमचे ओझे तुमच्या खोट्या तद्रूपतेमुळे आहे. त्याचा त्याग करा'. (सुखसंवाद - ५१)
_______________________________
रोजच्या जगण्यातल्या प्रश्नांची उत्तरं सिद्ध कशी देतो, तो कसं जगतो हे सुखसंवादाच्या निमित्तानं आपल्याला कळू शकतं. आगदी आपल्यातलामाणूस आपल्याला सांगतोय असे हे संवाद आहेत.
कोणताही सिद्ध तीन गोष्टी साधत असतो : एक, तुम्हीच सत्य आहात हे तुम्हाला सांगणं; दोन, आपण सत्य नाही असं वाटण्याला तुमच्या ज्या धारणा कारणीभूत आहेत त्या दूर करणं आणि तीन, सत्य आणि आपण यांची स्वतःच्या प्रतिभेनं सांगड घालून देणं!
सत्य जरी एक असलं आणि अनेकांनी ते अनेक प्रकारे सांगितलं असलं तरी ज्या सिद्धाशी आपलं ट्युनिंग जमतं तो आपल्याला भावतो.
'स्व'चा गौरव महाराज कसा करतात ते पाहा :
प्रथमच तुम्ही जाणले पाहिजे की प्रत्येक गोष्टीचा, तुमचा स्वतःचा देखील पुरावा तुम्हीच आहात. तुमचे अस्तित्व कोणी सिद्ध करू शकत नाही कारण त्याच्या अस्तित्वाला प्रथम तुम्हीच बळकटी आणली पाहिजे. तुमच्या असण्याबद्दल आणि जाणण्याबद्दल तुम्ही कोणाचे देणे लागत नाही. तुमच्या लक्षात असू द्या की तुम्ही संपूर्णपणे स्वयंसिद्ध आहात. तुम्ही कोठून येत नाही किंवा कोठे जात नाही. तुम्ही कालातीत असणे आहात, जाणिव आहात. (सुखसंवाद - ३७)
सिद्धत्वाच्या स्थितीचं ते किती साधेपणानं वर्णन करतात ते पाहण्यासारखं आहे :
'मी जगाशी एकरूप आहे तरीही त्यापलिकडे आहे असे जाणल्यामुळे मी सर्व भीती आणि इच्छा यापासून मोकळा झालो. मोकळा व्हावे असे मी बुद्धिने ठरवले नाही. मला असे अढळले की मी अनपेक्षितपणे, विनासायास मोकळा आहे. तेंव्हापासूनच इच्छा आणि भिती यांचापासूनची ही मोकळीक टिकून आहे.
आणखी मला असे अढळले की मी प्रयत्न करण्याची जरूरी नाही. विचारामागोमाग घटना विनाविलंब आणि अविरोधपणे घडते. विचार स्वयंपूर्ण होतात. सर्व गोष्टी योग्य रितीने आणि सहजपणे जमून जातात.
मुख्य बदल मनात झाला. मन गतिहीन, मौन झाले. ते जलद प्रतिसाद देते पण प्रतिसादाला चिरस्थायी करू पाहात नाही. स्वयंस्फूर्ती हीच जीवनपद्धती झाली. खरे नैसर्गिक झाले आणि नैसर्गिक खरे झाले.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे अपरंपार स्नेह, दुर्बोध आणि शांत सर्वप्रकाश, सर्वव्यापी प्रेम, स्वयंसिद्ध झाले आणि त्यामुळे सर्व चित्तवेधक, सुंदर, अर्थपूर्ण आणि प्रेम करण्याजोगे बनले. (सुखसंवाद - ५७)
_______________________________
अहंकार या सर्वात मोठ्या गैरसमजाबद्दल महाराज काय सांगतात ते अफलातून आहे :
'अमकातमका मी ही कल्पनाच फोल असल्यामुळे ती सातत्य चाहते. आपले नित्यस्वरूप मात्र असतेच त्याला सातत्याची गरज नाही. पण ' मी अमकातमका ' असे मानल्यामुळे ती भावना घट्ट टिकवून ठेवण्यासाठी आपण ती वागवेल तसे वागतो. तिच्या मर्जीशिवाय कुठलाही व्यवहार तिला कबूल नसतो. क्षणोक्षणी ती वेगळे रूप घेते आणि आपला व्यवहार नित्य, अखंडीतपणे चालूच ठेवते. ही अनर्थकारी परंपरा कायमची थांबवण्यासाठी मी अमकातमका ही कल्पना एकदाच कायमची सोडणे हाच एक रामबाण उपाय आहे.
देह आणि देहाचे नांव याचा अंगीकार केला नाही, ती कल्पना सांडली तर स्वच्छ आपण, केवळ ज्ञान तेच शिल्लक राहते. अमूकतमूक म्हणून जाण नव्हे तर केवळ ज्ञान.' (सुखसंवाद - ६३)
_________________________________
मला वाटतं, न्यूनगंड हा अहंकाराचा सर्वात गहन पैलू आहे. मानवी अस्वास्थ्याचं ते मूळ कारण आहे. महाराज किती सहजपणे त्याचं निराकरण करतात ते पाहण्यासारखं आहे :
साधकानं विचारलंय ' मी काय शिकावे बरे? '
महाराज उत्तरतात : ' निश्चिंतपणे जगणे. ह्यासाठी तुम्ही जाणले पाहिजे की तुमचे स्वरूप अजिंक्य, निर्भय आणि सदाविजयी आहे. एकदा तुम्ही निश्चितपणे जाणले की आपल्या कल्पनेखेरिज कोणीच आपल्याला त्रास देऊ शकत नाही, मग तुम्ही आपल्या इच्छा, भिती, पूर्वधारणा याकडे दुर्लक्ष करता आणि केवळ सत्याने जीवन जगता' (सुखसंवाद - २९)
_____________________
कुणालाही स्वत:प्रत आणतील अशी त्यांची ही वक्तव्यं अफलातून आहेत :
'शाश्वताला जाणणे म्हणजे शाश्वत होणे, संपूर्ण होणे, विश्वातील सर्वासहित विश्वरूप होणे. प्रत्येक घटना ही संपूर्णाचा परिणाम आणि व्यक्तता असते आणि संपूर्णाशी तिचा मूलभूत मेळ असतो. संपूर्णाचा सर्व प्रतिसाद योग्य, प्रयत्नरहित आणि तात्कालिक असतो. ' (सुखसंवाद - १७)
'आपल्या असण्याबद्दल पूर्णपणे जागृत राहा म्हणजे तुम्ही जाणिवपूर्वक आनंदात राहाल. तुम्ही आपले मन जे तुम्ही जे नाही त्याकडे लावता त्यामुळे तुम्ही सुस्थितीची, खुशालीची जाणिव गमावून बसता.' (सुखसंवाद - २५)
' स्वतःला जाणायचे आहे असे तुम्ही म्हणता. तुम्ही स्वतःच आहात, तुम्ही जे आहात त्या वेगळे तुम्ही असूच शकत नाही. जाणणे असण्याहून वेगळे असते काय? स्वतःची व्याख्या आणि स्वतःचे वर्णन करण्याचा प्रयत्न केल्याखेरीज तुम्ही स्वतःच्या असण्यानेच स्वतःला जाणू शकता. (सुखसंवाद - ९९)
____________________________________
साधकाला निश्चित दिशा देणारं त्यांचं हे उत्तर उद्धृत करून लेख संपन्न करतो.
एका साधकानं विचारलंय : 'अध्यात्मिक प्रगतीची लक्षणं कोणती? '
आणि महाराज अत्यंत सहजपणे सांगतात : ' निश्चिंतपणा, आराम, आनंदाची जाणिव, अंतर्यामी सखोल शांती आणि बाहेर भरपूर उत्साह!' (सुखसंवाद - ८९)
(लेख मनोगतवर पूर्वप्रकाशित)
प्रतिक्रिया
1 May 2013 - 1:37 pm | संजय क्षीरसागर
फक्त त्याला वाटतंय की तो काही तरी (मनासारखं) घडण्यावर आहे, काही तरी मिळण्यावर आहे. मग ते काहीही असो; हवी तशी प्रेमिका, नुसत्या व्याजावर गुजराण होईल इतकी संपत्ती, नोकरी सोडून स्वतःचा व्यावसाय, सध्याची बदलून दुसरी पत्नी (किंवा पती), आहे त्या पेक्षा प्रशस्त जागा, किंवा तत्सम काहीही.
मनासारखं घडल्यावर आनंद होतोच. पण काही वेळ जरा बरं वाटलं की लगेच नवा उपक्रम खुणावायला लागतो. मग आपल्याला वाटतं की आयुष्य असंच आहे. एकानंतर एक गोष्ट साधत आनंद मिळवायचा आहे.
एक गोष्ट आपल्याला कधीही लक्षात येत नाही की आनंद म्हणजे खुद्द आपणच आहोत. आपल्या आनंदाला मनाजोगती घडलेली घटना कारण नव्हती. काही काळ जाणिव फिरून स्वतःप्रत आली होती आणि आपण स्वतःशी एकरूप झालो होतो. प्रेमिकेच्या सहवासात जगाचा विसर पडला याचा अर्थ ते नाहीसं झालं नव्हतं, जाणिवेच्या क्षेत्रात काहीही राहिलं नव्हतं. प्रेमिका सुद्धा नव्हती. आपण (काही काळ) स्वरूपात स्थिर झालो, निराकार झालो. आपल्या शून्य स्थितीशी कनेक्ट झालो.
पुलंनी म्हटलंय : जन्म आणि मरणाच्या चिमटीत सापडलेल्या या आयुष्यात दोन घटका हसण्याशिवाय आपल्या हातात दुसरं आहे तरी काय ? (हसवणूक).
पुलं स्वतःशी कनेक्ट व्हायला विनोदाचा आधार घेतात. स्वतः आनंदी होतात आणि इतरांना आनंदी करतात. सिद्ध कोणत्याही आधाराशिवाय स्वतःशी एकरूप झालेला असतो. त्याचा मूड कायम लाईट असतो. सभोवतालची परिस्थिती काहीही असो, घटना मनाजोगत्या घडो, न घडो.
1 May 2013 - 11:53 pm | मोदक
प्रतिसाद पटला!
धन्यवाद.
2 May 2013 - 12:18 am | अर्धवटराव
>>प्रेमिकेच्या सहवासात जगाचा विसर पडला याचा अर्थ ते नाहीसं झालं नव्हतं, जाणिवेच्या क्षेत्रात काहीही राहिलं नव्हतं.
-- म्हणजे काय? प्रेमिकेच्या सहवासात उर्वरीत जग नव्हतं, पण प्रेमिका तर होतीच. प्रेमिकेत उर्वरीत जग डिसॉल्व्ह झालं, असं काहिसं होतय का?
आपण म्हणजे जीवन. जाणीव म्हणजे चेंडु. मन म्हणजे अनेक भोकं असलेलं छत.
आपण चेंडु वर फेकतो. काहि वेळेला तो छताच्या भोकातुन आरपार निघुन जातो. जिथे भोक नाहि तिथुन, छताला लागुन आपल्याकडे परत येतो.
वर मांडलेल्या मॉडेल सारखं काहि म्हणताय का तुम्ही?
अर्धवटराव
2 May 2013 - 8:35 am | संजय क्षीरसागर
ती उपस्थिती एकल आहे. तिला शुद्ध जाणिव म्हटलंय. शुद्धचा अर्थ जाणिव आहे पण जाणिवेत काहीही नाही.
आपल्याला नेहमी कशाची तरी जाणिव होते. जोपर्यंत प्रियकराला प्रेमिकेची जाणिव आहे आणि प्रेमिकेला प्रियकराची आहे तोपर्यंत जाणिव ओरियंटेड आहे. खरं तर प्रेमिका आहे म्हणून प्रियकर आहे. शुद्ध जाणिवेत कुणीही नाही. दोघंही एक झालेत.
जगतांना आपल्याला द्वैतात जगावं लागतं, जाणिव सतत कशाकडे तरी वेधलेली असते. आणि मेंदूनं आपण जाणिवेचं डिकोडींग करत जगत असतो. ते अनिवार्य आहे. पण त्यामुळे स्वतःची जाणिव होत नाही. जाणिव स्वतःकडे परत येत नाही.
एखाद्या निवांत क्षणी महाराजांची वक्तव्य, तुमच्या सर्व धारणा बाजूला ठेवून वाचा. मग त्यांच्या या वक्तव्याची तुम्हाला प्रचिती येईलः
एकदा तुम्हाला जाणिवेचं शुद्ध स्वरूप कळलं की स्व गवसला.
2 May 2013 - 8:18 pm | प्यारे१
>>>>आपल्याला नेहमी कशाची तरी जाणिव होते. जोपर्यंत प्रियकराला प्रेमिकेची जाणिव आहे आणि प्रेमिकेला प्रियकराची आहे तोपर्यंत जाणिव ओरियंटेड आहे. खरं तर प्रेमिका आहे म्हणून प्रियकर आहे. शुद्ध जाणिवेत कुणीही नाही. दोघंही एक झालेत.
अरे तो कबीरदासजींचा दोहा कुणाला माहिती आहे का?
प्रेमगली इतनी सांकरी ....
>>>>केवळ शांती आणि अथांग मौन उरले.
का होत नाहीये अजून????
18 Jun 2013 - 4:21 pm | कवितानागेश
या धाग्यावर आता केवळ मौन आणि शांती हेच उरणार आहेत बरं! ;)
14 May 2013 - 12:54 am | मोदक
पुढील भागाच्या प्रतिक्षेत!
14 May 2013 - 2:02 am | आजानुकर्ण
पुढे काय होणार याची प्रतीक्षा कशाला? शून्य स्थितीशी कनेक्ट व्हा. हा लेख हाच एक आनंद आहे. मग पुढच्या लेखात आणखी आनंद मिळेल याची अपेक्षा ठेवून आताचा आनंद कशासाठी घालवायचा. मुळात शांतता हे सत्य आहे, त्यामुळे न लिहिता राहिलेली शांतता चांगली नाही का?
14 Jun 2013 - 4:34 pm | Dhananjay Borgaonkar
मला अनुवाद करायचा कंटाळा आला आहे, म्हणुन च्योपी पेस्त करत आहे.
OSHO says:
There was a man in Bombay, Nisargadatta Maharaj. Nobody knew this big name; he was known to the masses as "Beedie Baba" because he was continuously smoking beedies. You can find in every village such kinds of beedie babas. I think India has seven hundred thousand villages and each village must have at least one; more is possible. And Amrito wrote a few days ago to me, because another young Dutchman became very much involved with Beedie Baba... The man seems to be very sincere, but the trouble is that the people who come from the West have a very childlike heart, very trusting, and they are unaware that in India spirituality is just a routine. Everybody talks about great things and their lives are as ugly as possible. When Beedie Baba said that he would speak only to this young Dutchman, naturally his ego must have felt tremendously vast. The crowd that surrounded Beedie Baba was also of the same quality... rickshaw wallahs waiting for their passengers, sitting by the side of Beedie Baba. And when he said he would not speak to anybody unless it was this Dutchman... So he spoke to the Dutchman, who has now compiled books on Beedie Baba. Now in India it is almost parrot-like, but to the Westerner it seems to be a tremendous revelation -- when Beedie Baba said, "Aham brahmasmi; I am God, I am that" the young Dutchman immediately wrote a book: I AM THAT! Because for the West, spirituality is a foreign affair, just as for the East, science is a foreign affair.
Even the poorest beggar knows more about metaphysics, about great ideologies... And when the Western man comes -- he may be well educated but his education is of science, his education is of logic, his education makes him a great intellectual. But in the heart he remains very naive. Then any Beedie Baba, any idiot can make a great impact on him. This Dutch man lived for months together with Beedie Baba. He does not mention his well-known name, Beedie Baba; he mentions only his legal name, Nisargadatta Maharaj. He has written many books on Nisargadatta Maharaj; he has made Nisargadatta famous all over the world. I have looked through those books -- sheer nonsense.
Ref: http://nisargadatta.org/pages/ridiculous_comment_by_osho.html
14 Jun 2013 - 11:43 pm | संजय क्षीरसागर
सिद्ध, साधक आणि अध्यात्मविहीन. अर्थात, सर्वांना अध्यात्मात रस असण्याची गरज नाही.
आता मजा अशी आहे, सिद्धाला त्याच्याविषयी कुणीही काहीही म्हटलं तरी फरक पडत नाही. थोडक्यात ओशो काय म्हणाले यानं महाराजांना फरक पडत नाही (किंवा द अदर वे); ...ते दोघंही सिद्धच राहतात. आणि आता तर ते दोघंही नाहीत त्यामुळे प्रश्नच मिटला.
साधक नेहमी सिद्ध काय सांगतोय आणि आपल्याला ते सत्याप्रती कसं नेईल हे बघतो. त्याची नजर स्वत:च्या जीवनात पडणार्या फरकावर असते.
अध्यात्मविहीन लोकांचं एकच ठळक वैशिष्ठ्य असतं, त्यांना फक्त गॉसिपमधे इंटरेस्ट असतो, ‘कोण कुणाविषयी काय म्हणाला’. यामुळे होतं असं की सिद्ध तर सिद्ध असतातच, साधक सत्याप्रत पोहोचण्याची संभावना निर्माण होते, पण हे लोक लटकत राहतात; धड इकडे ना तिकडे. कारण त्यांना अध्यात्मात रसच नसतो, त्यांचा इंटरेस्ट असतो फक्त गॉसिपमधे .
18 Jun 2013 - 4:19 pm | मोदक
अध्यात्मविहीन लोकांचं एकच ठळक वैशिष्ठ्य असतं, त्यांना फक्त गॉसिपमधे इंटरेस्ट असतो,
हा साक्षात्कार पण बाभळीच्या झाडाखालीच झाला काय..??
18 Jun 2013 - 4:11 pm | मूकवाचक
ओशो उवाचः
मुंबापुरीत एक इसम होता - निसर्गदत्त महाराज. हे जडजंबाल नाव कुणालाही माहित नव्हतं; याला सतत बिडी ओढण्याची सवय असल्याने आम जनतेत याची ओळख 'बिडी बाबा' नावानेच होती. या पठडीतले बिडी बाबा तुम्हाला प्रत्येक खेड्यात सापडतील. मला वाटतं भारतात सातशे हजार खेडी आहेत आणि प्रत्येक खेड्यात किमान एक तरी बिडी बाबा असतोच असतो, जास्त असणंही शक्य आहे. आणि अमृतोनी मला काही दिवसापूर्वी मला हे पत्राने कळवलं, कारण आणखी कुणीतरी डच युवक या बिडी बाबांमधे आकंठ बुडालेला होता... हा युवक खूपच प्रामाणिक वाटतो, पण झंझट असं आहे की पाश्चिमात्य जगातून येणार्या या लोकांकडे अत्यंत निर्व्याज बाळबोध हृदय असतं, अत्यंत श्रद्धाळू, आणि बिचार्यांच्या हे गावीच नसतं की अध्यात्मिकता ही भारतात एक नित्याचीच बाब आहे. जो तो उच्च उदात्त गोष्टींबद्दल बडबड करत असतो आणि त्यांचं आयुष्य मात्र शक्य तितकं ओंगळ आणि गलिच्छ असतं.
जेव्हा बिडी बाबांनी जाहीर केलं की ते फक्त या डच युवकाशीच बोलतील, तेव्हा साहजिकच आहे की त्याच्या अहंतेला ती गगनाला भिडली आहे असं वाटलं असेल. या बिडी बाबाभोवती जमा झालेली प्रभावळही त्याच्या दर्जाला साजेशीच असायची ... गिर्हाइकाची वाट पाहणारे रिक्षावाले, बसलेत आपले बिडी बाबाच्या मांडीला मांडी लाउन. आणि जेव्हा त्याने घोषणा केली, की तो इतर कुणाशीही बोलणार नाही, अपवाद फक्त या डच युवकाचा ... तेव्हा त्यांनी या डच युवकाशी संवाद साधला, ज्याने आता बिडी बाबांवरच्या पुस्तकांचं संपादन केलेलं आहे. आता भारतात म्हणाल तर ही निव्वळ पोपटपंची आहे, पण एखाद्या पाश्चात्याला मात्र ते फार मोठं दार्शनिक, रहस्यदर्शी वचन वाटतं -- जेव्हा बिडी बाबा म्हणतात, "अहं ब्रह्मास्मी, मी ईश्वर आहे, मीच ते परतत्व आहे". त्या डच युवकानी लगेच पुस्तक लिहीलं: आय अॅम दॅट! कारण इतकंच की पाश्चात्य जगतासाठी अध्यात्मिकता एक विदेशी भानगड आहे, जशी विज्ञान ही पौर्वात्य जगतासाठी एक विदेशी भानगडच आहे.
इथल्या त्यातल्या त्यात दरिद्री भिकार्यालाही मोठमोठ्या आदर्शवादांबद्दल, परतत्वशास्त्राबद्दल जास्त माहिती असते ... आणि जेव्हा एखादी पाश्चात्य व्यक्ती येते -- ती भलेही सुशिक्षीत असेल पण ते शिक्षण विज्ञानाचं असतं, तिचं शिक्षण तर्कशास्त्राचं असतं, ते शिक्षण त्याला महान विचारवंत बनवतं. पण अंतर्यामी मात्र अशी व्यक्ती अत्यंत भोळसटच राहते. मग कुठलाही बिडी बाबा, कुठलाही महामूर्ख अशा व्यक्तीवर जोरदार प्रभाव टाकू शकतो. हा डच युवक कित्येक महिने बिडी बाबाच्या सान्निध्यात राहिला. तो चुकुनही त्याच्या बिडी बाबा या सर्वपरिचीत नावाचा उल्लेख करत नाही, उल्लेख करतो तो फक्त निसर्गदत्त महाराज या कायदेशीर मान्यताप्राप्त टोपणनावाचा. त्याने निसर्गदत्त महाराजांवर कित्येक पुस्तकं लिहीली आहेत, त्यांना जगभर प्रसिद्धी मिळवून दिलेली आहे. मी ती सगळी पुस्तकं वाचलेली आहेत -- त्यात आहे तो फक्त आणि फक्त तद्दन बाष्कळपणा.
21 Feb 2017 - 7:40 pm | गामा पैलवान
संजय क्षीरसागर,
लेखाबद्दल धन्यवाद. इथून आलो हा लेख वाचायला.
च्यायला, ओशोंनी हे निसर्गदत्त महाराजांबद्दल खरंच असे उद्गार काढले असतील असं वाटंत नाही! आणि काढले असतील तर नेमके हेच उद्गार ओशोंना स्वत:ला लागू पडतात. फक्त बिडीच्या जागी संभोगातून समाधी टाका.
आ.न.,
-गा.पै.
22 Feb 2017 - 1:06 am | संजय क्षीरसागर
निसर्गदत्त १९८१ मधे निवर्तले आणि ओशो १९९० मधे. ते दोघंही सिद्ध होते पण ओशोंनी महाराजांचं सुखसंवाद वाचलं नाही कारण त्यांना मराठी येत नव्हतं आणि महाराजांनी ओशोंचं एकही पुस्तक वाचलं नाही कारण त्यांना इंग्रजी येत नव्हतं आणि त्यांचं हिंदीही कामचलाऊ होतं. ते दोघंही एकमेकांना कधी प्रत्यक्ष भेटले नाहीत. जसा ओशोंनी महाराजांना न उमजता त्यांचा उपमर्द केला तद्वत महाराजांनी फक्त एका वाक्यात ओशोंच्या सगळ्या अध्यात्मिक प्रणालीचा धुव्वा उडवला. जेव्हा एका साधकानं महाराजांना विचारलं की आपल्याकडे साधकांना वेषपरिधानाचं बंधन नाही का ? (त्याचा रोख ओशोंच्या रोब कंपल्शनकडे होता) त्यावर महाराज म्हणाले `आत्म्याला गणवेष नाही !'
मी अध्यात्मिक साधना १९९२ च्या सुमारास सुरु केली. हे दोघेही दिग्गज मला गुरुस्थानी आहेत. ओशोंची सहाशे प्लस टायटल्स आणि महाराजांचं फक्त एक सुखसंवाद अध्यात्मिक तुलनेत एकसामान आहेत.
ओशो महाराजांविषयी काय बोलले आणि महाराज ओशोंविषयी काय बोलले यापेक्षा ते दोघं सत्याविषयी काय बोलले याचा सूज्ञ विचार करतो. आणि त्यांच्या वक्तव्यांचा आपलं जीवन बदलायला काय उपयोग होईल ते पाहातो. त्याला अशा गॉसिपमधे काहीही रस नसतो.
22 Feb 2017 - 1:55 am | पिलीयन रायडर
आवडलं हे वाक्य!
23 Feb 2017 - 11:18 pm | सतिश गावडे
सिद्ध लोकही अज्ञानातून का होईना पण इतरांचा उपमर्द करतात तर :)
23 Feb 2017 - 8:15 pm | गामा पैलवान
संजय क्षीरसागर,
वाक्य पटलं. पण तरीही बुद्धीला एक चाळा म्हणून असत्यातही सुसंगती शोधावीशी वाटते. तुम्हाला वाटलीच पाहिजे असा अट्टाहास नाही.
आ.न.,
-गा.पै.