पी आय ए- पी के ३२६ अपहरण

लाल टोपी's picture
लाल टोपी in जनातलं, मनातलं
4 Apr 2013 - 3:29 pm

मार्च १९८१ मध्ये पाकिस्तानात कार्यरत असणारी एक दहशतवादी संघटना अल झुल्पिकारने पाकिस्तान विमान कंपनीचे विमान अपहरण केले. या दहशतवादी गटाचा नेता होता पाकिस्तानचे माजी अध्यक्ष झुल्फिकार अली भुत्तो यांचा मुलगा मुर्तजा भुत्तो . हे अपहरण नाट्य तब्बल १३ दिवस चालले होते त्यावेळी हे सर्वात जास्त काळ चाललेले अपहरण नाट्य होते.
पी आय ए चे विमान उड्डाण क्र. पी.के. ३२६ नियमित देशांतर्गत वाहतुकीसाठी दिनांक २ मार्च, १९८१ रोजी कराचीहून पेशावरच्या दिशेने झेपावले. या विमानात एकुण १३५ प्रवासी आणि ९ कर्मचारी मिळून १४४ जण होते. सदर विमानाचे उड्डाण होतांच तीन शस्त्रसज्ज अतिरेक्यांनी अपहरण करून हे विमान अफगाणिस्तानच्या काबूल विमानतळाकडे वळवण्यात भाग पाडले.
पाकिस्तानच्या विविध कारागृहात कैद असणा-या ९२ राजकीय कैद्याची सुटका करण्यात यावी अशी मागणी या अपहरणकर्त्यांनी केली. हे सर्व कैदी प्रामुख्याने पाकिस्तान पीपल्स पार्टी (सध्याचा सत्तारूढ पक्ष) आणि इतर काही डाव्या विचारधारेच्या पक्षाचे होते. मात्र कराचीमध्ये तुरुंगात असलेल्या पक्षाच्या सहाध्यक्ष बेनझीर भुत्तो यांनी या अपहरणाचा विरोध केला होता.
या घटनेच्या पांचव्या दिवशी दिनांक ७ मार्च, १९८१ रोजी स्त्रीया, लहान मुले, आजारी व्यक्ती अशा २९ जणांची सुटका काबूल विमानतळावर उभ्या असलेल्या विमानातून करण्यात आली. हे विमान आठवडाभर तेथेच उभे होते. तत्कालीन पाकिस्तानी अध्यक्ष जनरल झिया उल हक यांनीअपहरणकर्त्यांची मागणी स्पष्ट शब्दात फेटाळल्या नंतर सर्व प्रवाश्याच्या समोर पाकिस्तानी परराष्ट्र सेवेतील अधिकारी असणारे प्रवासी तारीक रहीम यांची हत्या करून त्यांचा मृतदेह हवाईपट्टीवर फेकून दिला. तारीक रहीमला अपहरणकर्ते लष्करी कायद्याचे तत्कालीन प्रशासक जनरल राहिमुद्दिन खान यांचा मुलगा समजले होते. मात्र रहीम त्यांचा मुलगा नव्हता.

त्यानंतर अचानक ९ मार्चला हे विमान १०० पेक्षा जास्त प्रवाशांसह उड्डाण करून सीरियाच्या दमास्कस विमानतळावर उतरले. येथे उतरताच अपहरणकर्त्यांनी सर्व प्रवाशांसह विमान उडवून देण्याची धमकी दिली मात्र त्याचवेळी विमानतळवरील नियंत्रण कक्षातून सिरीयन अधिकारी पाकिस्तानी अधिका-यांच्या संपर्कात होते. या अधिका-यांनी अपहरणकर्त्यांना सबुरीचा सल्ला दिला. चर्चेचे सत्र संपत नाही हे पाहून अपहरणकर्त्यांनी निर्वाणीचा संदेश सिरीयन अधिका-यांपर्यंत पोहोचवला ९२ ऐवजी ५५ कैदी सोडवले तरी चालेल मात्र ठराविक वेळेत जर ही मागणी मान्य झाली नाही तर विमातील तीन अमेरीकन नागरीकांची हत्या करण्यात येईल, त्यांचे मृतदेह स्वीकारण्याची तयारी करा. ही मात्रा बरोबर लागू पडली आणि अपहरणकर्त्यांनी दिलेली वेळ संपण्याच्या २० मिनिटे आधी अध्यक्ष झिया उल हक यांनी ५५ कैद्यांना मुक्त करून सिरीयात आश्रय घेण्यासाठी खास विमानातून सोडण्याचा आदेश दिला. या आदेशानंतर चर्चेत सहभागी पाकिस्तानी अधिकारी सर्फराज खान यांचे उद्गार होते, "संपले एकदाचे हे प्रकरण"

परंतु प्रकरण संपले नव्हते कारण यादीतील ५५ कैद्यांपैकी एकाचा ठावठिकाणा लागत नव्हता तर काही कैद्यांनी पाकिस्तान सोडून जाण्यास साफ नकार दिला होता. या सर्व भानगडी निस्तरून खास बोईंग ७०७ लिबियाच्या त्रिपोली विमानतळाच्या दिशेने झेपावले आणि इकडे सीरियाने आपला निर्णय फिरवला त्यांनी अपहरणकर्त्यांना आणि त्यांच्या मित्राना राजकीय आश्रय देण्यास नकार दिला. पुन्हा एकदा ओलीस प्रवाशांचे जीव धोक्यात आले होतेच त्याबरोबरच सक्तीने मुक्त करण्यात आलेल्या कैद्यांना घेऊन उड्डाण केलेल्या विमानाचे भवितव्य देखील अधांतरी झाले होते. एक नवाच पेच निर्माण झाला होता.
शेवटी सिरीयाने अपहरणकर्त्यांना राजकीय आश्रय देण्याचे मान्य केले आणि अपहरणकर्त्यांनी शस्त्रे खाली टाकली. विमानाचा कप्तान सर्वात शेवटी बाहेर आला एक फारच लांबलेला प्रवास संपला होता.
सुटका झालेले जवळ्पास सर्व कैदी मध्यम वर्गीय कुटुंबातील तरुण होते त्यांनी सुटके नंतर अल झुल्पिकार संघट्नेचे सदस्यत्व घेतले या संघटनेचा मुख्य उद्देश माजी अध्यक्ष झुल्फिकार अली भुत्तो यांच्या हत्येचा बदला घेणे हे होते.
या अपहरणाचा नेता सालामुल्ला टिपूची काबुलच्या कारगृहात रवानगी करण्यात आली १९८४ मध्ये एका अफगाणी नागरिकाची हत्या केल्या प्रकरणी त्याला फाशी देण्यात आले त्याचा मृतदेह मात्र परत आला नाही. असे मानले जाते की त्याचे काबूल जवळच अज्ञात ठिकाणी दफन करण्यात आले.

मुर्तझा भुत्तो या प्रकरणानंतर अफगाणिस्तान मध्ये निघून गेला. त्यावेळच्या पाकिस्तानी लष्करी प्रशासनाने खटला भरला आणि त्याच्या गैरहजेरीत त्याला मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. त्यानंतर १९९३ मध्ये त्याची बहिण बेनझीर भुत्तो पंतप्रधान असतांना पाकिस्तानात परतला. मात्र दहशतवादी कृत्ये करण्याचा आरोप ठेवून त्याला खुद्द बेनझीर भुत्तोंच्याच आदेशावरून अटक करण्यात आली. जामिनावर सुटून त्याने सिंध प्रांतातील विधानसभेची निवडणूक जिंकली आणि बेनझीरचे पती आणि सध्याचे राष्ट्रपती असिफ अली झरदारी यांचा कट्टर विरोधक बनला हे मतभेद टोकाला गेल्यानंतर सप्टेंबर १९९६ मध्ये पोलीस कारवाईत त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणावरून बेनझीरचे सरकार पदच्युत करण्यात आले आणि झरदारी यांची रवानगी जेलमध्ये करण्यात आली.

गेल्या काही दिवसांत मिपा वर भारताच्या १९९९ च्या विमान अपहरणा संबंधी लिहून येत आहे अशाच अपहरण करण-यांच्या दृष्टीने यशस्वी ठरलेल्या अपहरणाची ही एक कहाणी सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

समाजमाहिती

प्रतिक्रिया

तर्री's picture

4 Apr 2013 - 3:49 pm | तर्री

जीवावर उदार होवून करू घातलेले कृत्य (विमान अपहरण ) कोणत्याही तर्काने सोडवता येत नाही.

लाल टोपी's picture

6 Apr 2013 - 1:34 am | लाल टोपी

धन्यवाद

मृत्युन्जय's picture

4 Apr 2013 - 3:57 pm | मृत्युन्जय

नविनच माहिती. छान लेख.

लाल टोपी's picture

6 Apr 2013 - 1:34 am | लाल टोपी

.

मैत्र's picture

4 Apr 2013 - 4:03 pm | मैत्र

एकमेकांत गुंतलेले राजकारण. या पूर्वेतिहासाबद्दल माहिती नव्हती..
चांगला लेख..

लेखन आवडले. मोदकाला कांपिटीसन आली. ;) (हलके घ्या.)

लाल टोपी's picture

5 Apr 2013 - 12:35 pm | लाल टोपी

नाही हो रेवतीताई, मी स्वतः मोदक यांच्या लिखाणाचा चाहता आहे मी लिहिलेल्या लेखाची तुलना त्यांच्याशी झाली यातचं आनंद आहे. आपल्या प्रतिक्रियेबद्द्ल मनापासून धन्यवाद..

श्रीरंग_जोशी's picture

4 Apr 2013 - 11:23 pm | श्रीरंग_जोशी

लष्करी राजवट असतानाही तत्कालिन पाकिस्तान सरकारला (लष्कराला) अतिरेक्यांबरोबर तडजोड करावी लागलीच.

त्यावेळी भुट्टो कुटूंबाविषयी पाकिस्तानी जनतेत असलेली सहानभुती हाही तत्कालिन राजवटीच्या या (तडजोडीच्या) निर्णयामागे एक घटक असावा.

अपहरण न होऊ देण्यासाठी हवाई सुरक्षेवर जो अफाट खर्च केला जातो तो या प्रकारच्या सर्व घटनांचा परिणाम आहे.

# लाल टोपी - या प्रकारचे अधिक लेखन वाचायला आवडेल.

या प्रकारचे अधिक लेखन वाचायला आवडेल

हेच बोल्तो!!!

लाल टोपी's picture

5 Apr 2013 - 12:32 pm | लाल टोपी

आपण दिलेले प्रोत्साहन मोलाचे आहे. जरुर प्रयत्न करीन

तुषार काळभोर's picture

5 Apr 2013 - 10:17 am | तुषार काळभोर

हे पाकिस्तानी प्रकरण असो वा भारताचे कंदाहार प्रकरण. विमानाने प्रवास करणार्‍या व्यक्ती या जनरली उच्च्मध्यमवर्गीय/नवश्रीमंत/अतिश्रीमंत/उद्योजक अशा असतात. तर रेल्वेच्या प्रवाश्यांमध्ये मध्यमवर्ग/निम्न मध्यमवर्ग/गरीब लोक यांचे प्रमाण जास्त असते.
अशा सामाजिक/आर्थिक दर्जातील फरकामुळे अशा प्रकरणातील निर्णयप्रक्रियेवर काही फरक पडत असावा काय?
हायपोथेटिकल प्रश्नः कंदाहार प्रकरणात (जागा अफगाणिस्तानात होती, हे तुर्त बाजूला ठेवून विचार केला तर) विमानाऐवजी तितक्याच प्रवाश्यांसह रेल्वे हायजॅक केली असती तर निर्णय प्रक्रियेवर काही परिणाम झाला असता काय? किंवा.. २००-३०० प्रवासी असलेले विमान आणि तितकेच प्रवासी असलेली रेल्वे हायजॅक झाली तर इतर परिस्थिती समान असताना, निर्णय प्रक्रियेवर परिणाम होईल काय?

लाल टोपी's picture

5 Apr 2013 - 12:30 pm | लाल टोपी

आपण म्हणता त्याप्रमाणे काही प्रमाणात फरक पड्त असावा. या अपहरणाच्या घटेनेत देखील सुरुवातीला अपहरणकर्त्यंअच्या मागण्या धुड्कावणारे जनरल झिया अमेरिकी प्रवाशांच्या हत्येच्या धमकी नंतर लगोलग शरण आले.
परंतु रेल्वे किंवा इतर ठिकाणी कारवाई करणे आणि हवाई अपहरणात कारवाई करणे यात अनेक बाबींचा फरक आहे उदा. अपहरण केलेले विमान कोठे आहे, त्या देशाशी संबंध कसे आहेत? ई.ई.

तुषार काळभोर's picture

5 Apr 2013 - 1:17 pm | तुषार काळभोर

परंतु रेल्वे किंवा इतर ठिकाणी कारवाई करणे आणि हवाई अपहरणात कारवाई करणे यात अनेक बाबींचा फरक आहे उदा. अपहरण केलेले विमान कोठे आहे, त्या देशाशी संबंध कसे आहेत? ई.ई.
--म्हणूनच मी शेवटच्या वाक्यात असं म्हणालो की, "इतर परिस्थिती समान असताना" निर्णयप्रक्रियेत फरक पडेल काय?
उदा. २०० निम्नमध्यमवर्गीय भारतीय प्रवासी असणारी रेल्वे हायजॅक करून भारतातच एका शहरात नेऊन ठेवली आणि २०० उच्चवर्गीय भारतीय प्रवासी असणारे विमान हायजॅक करून त्याच शहरात नेले, तर किती तडजोड करावी, हायजॅकर्स च्या समोर कितपत झुकावे, यावर काही फरक पडू शकतो का? (विमानतळ व रेल्वे-स्टेशन असे फरक दुर्लक्षित करू ).
केवळ प्रवाशांच्या आर्थिक / सामाजिक स्तरामुळे काही फरक पडू शकतो का?

अमोल केळकर's picture

5 Apr 2013 - 3:12 pm | अमोल केळकर

नवीन माहिती मिळाली.

अमोल केळकर

लाल टोपी's picture

5 Apr 2013 - 3:15 pm | लाल टोपी

अशा प्रकारच्या दोन घटना नेदरलंड मध्ये १९७५ आणि १९७७ मध्ये घडल्या असून त्यावेळी ५० आणि ३० प्रवाशी ओलिस ठेवले होते. पहिल्या घटनेत बारा दिवसांनंतर तर दुस-या घटेनेत २० दिवसांनंतर कारवाई केली गेली या अपहरण कर्त्यंना ठार करण्यात आले दोन्ही घटनेत अनेक वेळा चर्चा झाल्याचा दाखला आहे.
प्रवाशांची सामजिक परिस्थिती बरोबरच संख्या देखिल दबाव आणण्या साठी महत्वाची ठरत असावी.

लाल टोपी's picture

5 Apr 2013 - 3:19 pm | लाल टोपी

म्हणजे रेल्वे अपहरणाच्या घटना असे म्हणायचे आहे. पैलवान यांच्या प्रतिसादाला उत्तर आहे

पैसा's picture

6 Apr 2013 - 10:02 am | पैसा

भुत्तो यांच्या दोन मुलांमधील हेवेदावे असे स्वरूप या घटनेला नंतर आलेले दिसते.

लाल टोपी's picture

6 Apr 2013 - 3:11 pm | लाल टोपी

हे एकचं कारण कदाचित नसावे त्या दोघांच्याही राजकीय महत्वाकांक्षा त्यांच्यात वितुष्ट यायला कारणीभूत ठरल्या असाव्यात. १९९३ विजनवासातून परतल्यावर बेनझीर भुत्तोंच्या पक्षाने त्याला निवड्णुकीचे तिकीट नाकारले; त्याने वेगळा पक्ष स्थापन केला, आणि सर्वात मोठे कारण वर लिहल्याप्रमाणे बेनझीर भुट्टोच्या पतीशी टोकाचे मतभेद या सर्वच बाबी त्यांच्यात वितुष्ट येण्यास जबाबदार असाव्यात.