आलेल्या नवीन वर्षापासून माझे ग्रह तरी १८० अंशात फिरले असावेत किंवा तारे तरी ! कारण भर दिवसा डोळ्यासमोर तारे चमकण्याचे प्रसंग नवीन वर्षात वरचेवर यायला लागलेत हो ! एक निस्तरते तोवर दुसरंच काही तरी समोर उभं ठाकलंय, असंच सारखं होऊ लागलंय. काय विचारू नका ससेहोलपट, …पायाखाली फटाक्यांची माळ लावावी तसं. अगदी खुळ्याची चावडी अन मीराबाईची मशीद अशी गत झालीये बघा !
आता तुम्ही म्हणाल असं काय बॉ आभाळ कोसळलंय तुमच्यावर ? अहो, आभाळ कोसळलं तर पाण्यात तरी उडी मारता येते. इथे आम्ही ना तळ्यात ना मळ्यात अशी बिकट अवस्था झालीय.
सुरुवात झाली ती नवीन वर्षाच्या प्रथम चरणात, म्हणजे पहिल्याच सप्ताहात. दिवसा ढवळ्या हापिसातून, लॉक केलेल्या कपाटातून, पर्समधले दोन हजार रु. की हो गेले ! अन तेही माझे नव्हे, ऑफिसचे ! माझे पाचशे जागच्या जागी ! सांगायचीही चोरी ! (हो, ‘फक्त ऑफिसचेच कसे काय चोरीला गेले ?’ ‘ चोर ऑफीशियल आहे वाटतं ?’ इ. कुत्सित शेरे ऐकावे लागले असते ना.) करते काय ? मुकाट्यानं पदरचे दोन हजार काढले ये.टी.येमातनं अन भरले हापिसात. ( वैताग वैताग....१)
जानेवारीच्या अखेरीला दुसरा झटका बसला. रोजचा ३० किमी जाता अन ३० किमी येता असा प्रवास हापिसचा. तोपण मायबाप सरकारी यष्टीनं. घरातून निघून टू-व्हीलर ष्ट्यांडावर पार्किंगमध्ये लावायची अन यष्टीत उडी मारायची. ही प्रथा. त्या दिवशी पार्किंगवाला कुठं मरायला चहा प्यायला गेला होता, कोण जाणे. गाडी चुकेल म्हणून टू-व्हीलर पे-पार्कऐवजी जनरल पार्किंगमध्ये लावली. संध्याकाळी परत आल्यावर बघते तर तिचा उजवा हात कुणीतरी इतक्या प्रेमानं पिरगाळलेला की तो लाजून जमिनीकडे झुकलेला. ढकलत तिला घरी नेली. तिच्या डाकदर ला बोलावणे धाडले.
‘दोन्ही ह्यांडल बदलावी लागतील.’ त्याने झटक्यात निदान केले. ‘४५० रु. फक्त.’
शस्त्रक्रिया केली ! न करून सांगताय कुणाला ? (.....वैताग, वैताग...२.)
डिसेंबरच्या अखेरीपासून सर्दीने पिच्छा पुरवलेला. रोजच्या प्रवासामुळे की काय, कोण जाणे, तीनदा औषध अन दोनदा डॉक्टर बदलला, तरी ती बरी व्हायचं लक्षण नाही. दुखणे पार सायनसपर्यंत गेले. नाकाचा टोमॅटो अन हजारेक रुपयांचा खुर्दा झालेला. डॉक्टर म्हणतात प्रवास टाळा, विश्रांती घ्या. बॉस म्हणतो मार्च आला, विश्रांती टाळा..! उन्हाळा तेजीत आलेला, घरी सगळे माठातले पाणी, कोल्ड्रिंक्स अन आईस्क्रीम खाताहेत अन मी गरम पाणी अन सितोपलादी चूर्ण ! (.......वैताग, वैताग ..३)
मार्चच्या पहिल्या आठवड्यात हापिसाची टूर होती मुंबईला. एक दिवसाचे काम अन दोन दिवस प्रवास. सोमवार प्रवास, मंगळावर काम अन बुधवार परत. जाण्यापूर्वी सहज भावाला फोन केला. अहो भाग्यम, तो मंगळवारीच पहाटे कार घेऊन मुंबईला जाणार होता. चला, सोमवारचा एक दिवस आयती सुट्टी मिळाली ! सोमवार हलगु-मलगु करत घालवला अन संध्याकाळी भावाकडे गेले. म्हटलं काय नियोजन उद्याचं ? तर पठ्ठ्या म्हणे, अगं ताई, माझी मुंबई ट्रीप पोस्टपोन झालीये उद्याची !
मी उडालेच ! ‘अरे, मग आधी सांगायचं नाहीस का ?’
देवा रे, आता रात्रीच्या travel चं बुकिंग शोधायला पाहिजे !
‘विसरलो गं !’ भावानं खजिलपणे travel वाल्याला फोनाफोनी केली.
मला काही सुचेना. जागेपणीच स्वप्न दिसू लागले... मी मिटिंगमध्ये लेट पोचले आहे,.. बॉसची क्रुद्ध मुद्रा माझ्या डोळ्यासमोर त्याच्या टकलापेक्षा तेजस्वीपणे चकाकू लागली. हे राम , धाव धाव ! (............वै वै.....४)
मी आठवतील त्या सगळ्या देवांचा आळीपाळीने धावा सुरु केला. नक्की कोणत्या देवाला करंट बसला, देवच जाणे, पण अर्ध्या एक तासानं वरच्या ऑफिसमधल्या सहकारिणीचा फोन आला. ‘अगं, मिटिंगमध्ये फक्त डिविजनल हेडनाच आत घेणारेत. तू सावकाश आलीस तरी चालेल..’
हुश्श झाले. सुखेनैव पहाटे उठून निघाले अन दुपारी एकला पोचले. मिटिंग सुरळीत झाली. मंगळवारी रात्री पुण्यात येऊन थांबले. बुधवारी सक्काळी सक्काळी शिवनेरी गाठली. गावात आले. आणि उतरताना घात झाला ! मागच्या प्रवाशानं स्वत:चं लँडिग करण्यापूर्वी आपल्या बॅगेचं अॅडव्हान्स लँडिग केले ते थेट शेवटची पायरी उतरत असलेल्या माझ्या उजव्या पायावरच ! परिणामस्वरूप माझ्या पार्श्वभागाचे इमर्जन्सी लँडिग बसच्या शेवटच्या पायरीवर होऊन तो भाग चांगला झेन्जारून निघाला ! त्यानंतर दोन दिवस, उठता-बसताना होणाऱ्या यातनांचे दु;ख अधिक की दोन दिवस सुट्टी मिळाल्याचा आनंद अधिक , हा प्रश्न मला सतावत राहिला. (,,,,,,,,,,,,,,वै वै........५)
तर मंडळी, गेल्या दोन महिन्यातले असे किती प्रसंग सांगू ? अहो, साध्या साध्या किरकोळ बाबीसुद्धा दमवू लागल्याहेत. आम्हाला लेट झाला की बसेस अगदी टायमात अन आम्ही लवकर गेलो की बस ब्रेकडाउन ! घरी लवकर जायचं असेल त्या दिवशी नेमकी मिटिंग लांबणार नाहीतर बॉस ठिय्या मारून बसणार. रविवार साधून घरी साफसफाई मोहीम काढली की कामवालीची दांडी पडणार, हे तर आता आम्हाला नाष्ट्याच्या पोहे-उप्पिटाइतकं अंगवळणी पडलंय !
आता तुम्ही म्हणाल हे तर आमच्या आयुष्यात पण घडते. त्यात नवे काय ? पण तुमच्या आयुष्यात असे आमच्यासारखे दोन-तीन महिन्यात लागोपाठ बडगे हाणल्यासारखे रट्टे बसलेयत का कधी ? आं, आं.. ? बोला ना आता, बोला ?
तेव्हा या सगळ्या पिडेतून सुखरूप पार पडण्यासाठी म्हसोबाला नारळ फोडायचा का पिराला कोंबडी कापायची अशा दुविधेत मी पडलेली असताना काल अगदी कळस झाला.
दोन महिन्यापासून चप्पल फाटायला आलेली. यष्टीप्रवासात कितीकांचे पदाघात झेलून झेलून बिचारी अगदी जीर्ण झालेली. मला काही मनासारखे पादत्राण-शॉपिंग करायला पुरेशी सवड मिळेना. हो, पादत्राणांच्या बाबतीत मी बै अगदी चोखंदळ आहे, हां ! ‘पाया’ सुरक्षित अन मजबूत तर इमारत सलामत !
प्रवास-समर-प्रसंगात आघात-प्रतिघातासाठी विशेष उपयुक्त म्हणून शूज बरे, असे ठरवले. एका शुभ-शनिवारी (रविवारी आमच्या गावी दुकाने बंद असतात.) मी शूज-खरेदी मोहीम काढली. चांगली आठ-दहा दुकाने पालथी घातली तरी दणकट खासे सुबक मुलायम असे शूज मिळेनात. मेले एकजात नाजूकच सगळे ! यष्टी-प्रवासी-पदाघात-भार सोसण्याची क्षमता एकातही दिसेना. मग स्पोर्ट्स ट्राय करून पाहिले. ते घालून दुकानात चालून पाहिल्यावर ‘अय्या, डोनाल्ड डक !’ असे एक कॉलेजकन्यका हळूच खिदळली. ती शब्दत्रयी कानी पडल्यावर स्पोर्ट्स शूज बाजूला सारले अन शब्दच स्पोर्टीव्हली घेतले अन बाहेर पडले.
अखेर एका सु-दुकानी, माझ्या स्वप्नकल्पनेतल्या शूजशी बऱ्यापैकी तादात्म्य असणारे शूज दिसले. किंमत रु. ५५० फक्त. बापरे, शूजच्या किमती इतक्या वाढल्यात हे माझ्या ध्यानी आले नव्हते ! दोनशे फार तर तीनशे. त्यापेक्षा जास्त रक्कम पादत्राणासाठी घालवणे म्हणजे माझ्या लेखी पैशाचा अपव्यय ! पण इलाज नव्हता. तेच एकमेव शूज माझ्या ‘मापात’ बसत होते किंवा मी त्याच्या मापात बसत होते !
बारकाईने पाहिल्यावर त्याचा तळ अंमळ पातळ असल्याचे माझ्या लक्षात आले. आमच्या गल्लीतल्या रस्त्यावरच्या धारदार बाणेदार दगड-धोंड्यांनी त्या तळाला भीक न घालता माझ्या सुकुमार तळपायाशी नक्की लाडीगोडी केली असती. तथापि आणखी दुकाने गावात शिल्लक नसल्याने मी तडजोड केली. त्याला जाड सोल लावून देण्याचे दुकानदाराकडून कबूल करवून घेतले. त्याबद्दल त्याने मोठ्या उदारपणे फक्त शंभर रु. जादा आकारले.
सहाशेपन्नास रुपयांचे शूज घेऊन मी जड अंत:करणाने अन हलक्या पर्सने घरी आले. दुसऱ्या दिवशी नवीन शूज घालून गेल्यावर ते पायाला इथे तिथे नक्की चावणार, हे गृहीत धरले. पण अहो आश्चर्यम, ते गुणी शूज इतके मऊ की चार दिवस झाले तरी कुठेही चावले नाहीत. ‘चला, सहाशेपन्नास सार्थकी लागले,..’. मी मनातल्या मनात स्वत:ला पैशाच्या अपव्ययाबद्दल माफ केले.
असे हे गुणी शूज बाहेर दारात रॅकवर ठेवून चौथ्या रात्री झोपले होते अन उठल्यावर पाहते तर सिंड्रेलाच्या बुटासारखा एकच बूट विरही प्रियकराप्रमाणे रॅकवर पहुडलेला ! माझ्या काळजात धस्स का काय म्हणतात ते झाले. तातडीने बुटाच्या जोडीदाराचा शोध घेतला. बागेत, गाडीखाली, झाडामागे, सगळीकडे शोधले. घराभोवती गेटच्या आतून अन कंपाउंडच्या बाहेरून दोन चकरा मारल्या. छे, नाही मिळाला ! रात्री गेटवर उडी मारून कुत्रं आलं असावं बहुधा अन त्यानं घात केला. सहाशेपन्नास रुपयांची वाट लावली ! (..................वै वै........६)
हाय हाय. आता मात्र कहर झाला ! डोस्क्याचा गोइंदा झाला. झालं. दुसऱ्या दिवशी पुन्हा जुनेच शूज घालून पाय फरफटवत हापिसला गेले. आता शनिवारी पुन्हा दुकाने धुंडाळणे आले. पुन्हा सहाशेपन्नास ! हर हर !
संध्याकाळी घरी आले. नवीनच लागलेल्या कामवालीला ओढलेल्या सुरात विचारले,
‘येत-जाताना कुठं बूट दिसला का गं माझा, शीला, तुला ?’
‘आई, शीला कोण ? ‘शीला की जवानी’तली का ?’ चिरंजीवाचा कान नको तिथे तिखट !
‘अरे गप’ मी त्याच्या आवाजावर वरकडी करून ओरडले. ‘ती नवीन कामवाली मावशी आहे ना, तिचं नाव शीला.’
‘अव्वा, तुमचं बूट ग्येलं काय वयनी ?’ शीलानं माझ्या आवाजावर वरकडी केली..
‘अवो, बरं झालं बगा ! पिडा गेली !’
‘अगं ? सहाशेपन्नास रुपयांचे बूट गेले अन तू म्हणतेस बरं झालं ?’ बूट गेले तरी सहाशेपन्नास रु. काही माझ्या मनातून जाईनात.
‘अवो, आमच्या गावाकडं, का नै, लै चांगलं म्हंतात बगा चप्पल गेल्यावर. आपली पिडा चप्पल-चोराकडं जाती म्हनं ! आता तुमची पिडा संपली आन त्या कुत्र्याला लागली बगा ! ‘
‘काय म्हणतेस काय ? म्हणजे माझी दोन महिन्यापासूनची इडा पिडा आता संपणार ? खरंच ?’
‘आयच्यान, हो वयनी !’
‘जीव भरला, भरला, भरला, खरं वाटंना, वाटंना, वाटंना,.’ .अशी माझी अवस्था झाली. मी सहाशेपन्नास रुपये क्षणार्धात विसरले.
.....आता मी नारळ-कोंबडी यांचा नाद सोडून दिला आहे अन पिडा जाण्याची उत्सुकतेने वाट पाहते आहे. अजून थोडीफार जायची शिल्लक असली तर आणखी सहाशेपन्नास रुपयांचा एक बूटजोड खरेदी करून पुन्हा श्वान-शर्विलकाला आमंत्रण देण्याचीसुद्धा मी तयारी केली आहे. कसं ?.
प्रतिक्रिया
7 Apr 2013 - 6:22 am | धमाल मुलगा
जबरा एकदम!
साधं-सोपं-सरळ आणि एकदम मस्त लिहिलंय हो. एकदम आवडला लेख! :)
8 Apr 2013 - 6:25 pm | पैसा
खुसखुशीत! आधी वाचताना मनोबाच्या लेखाचा पुढचा भाग आहे का काय अशी शंका चाटून गेली, पण मग त्या बिचार्या कुत्र्याची दया आली! बादवे, तुमच्याकडे "शीला आहे" हे वाचून हेवा वाटला आहे. मला नवीच काय जुनी कामवाली मिळाली तरी चालेल म्हणते मी!
15 Apr 2015 - 6:34 am | रुपी
वाचून मजा आली.
15 Apr 2015 - 11:55 am | कविता१९७८
अतिशय सुंदर लेखनशैली, स्वतःची पिडा इतक्य गमतीशीर पणे मांडलीयेस की वाचकाला दाद दिल्याशिवाय राहवत नाही.
15 Apr 2015 - 12:10 pm | चिनार
मस्त लिहिलंय ! मजा आली ..
२-३ महिन्यापूर्वी माझ्यासोबाताही अश्याच गोष्टी घडत होत्या. तेंव्हा मी गमतीने लिहिले होते
"अरे देवा, एका महिन्यात किती परीक्षा पाहणार. आधी डेंग्यू झाला , दवाखान्यात भरती झालो, सुया टोचून घेतल्या, पपईचा कडू रस पिला , त्यातून बरे होतो न होतो तर लगेच बायकोला भरती करावं लागलं...पण आता मात्र कहर झाला. दवाखान्यात गेल्यावर बाहेरून कोणीतरी माझी चप्पल चोरून नेली !! अरे ..कुठ नेउन ठेवलीये चप्पल माझी !! "