साक्षात्कार

सस्नेह's picture
सस्नेह in जनातलं, मनातलं
16 Mar 2013 - 3:22 pm

डिस्क्लेमर : साक्षात्कार या शब्दातून कोणताही दैवी अगर परमेश्वरी साक्षात्कार या लेखात अभिप्रेत नाही.

a
समोर आणि मागे ...वर आणि खाली ..या बाजूला अन त्या बाजूला एक लांबलचक अंधारा बोगदा..
बोगद्यात प्रवेश करताना वाटत होतं, हां हां म्हणता संपेल तो. पण जसजसं आत जाऊ तसं अंधार दाटतच चाललाय ...अंतराचा ठाव लागेना झालाय...
मी जात आहे..की येत आहे ?
...आता संपेल , मग संपेल असे वाटणारा हा बोगदा संपत तर नाहीच..पण आणखी आणखी अरुंद होत चाललाय. धारेला लागल्यावर किनारा दूर जावा, तसे, आतापर्यंत जगण्याचे संदर्भकक्ष असलेले सगळे आधार हातातून निसटून चालले आहेत. कुठेही प्रकाशाचा एखादा किरण दिसत नाही. डोळे उघडले काय अन मिटले काय, सारखेच..! वाटचाल अवघड म्हणता म्हणता अशक्य होत चाललीय...
मघापर्यंत पाउल तरी पुढे (की मागे ?) पडत होतं ! पण आता तर बोटही हलवणं अशक्य झालंय...
ओह. काय करू ?
किंबहुना काही करण्याचा ऑप्शन मला आहे का ?
..आतापर्यंत तरी जे केलं ते ‘मी’च केलं का ? मला काही पर्याय होता का ?
…चारी बाजूनी कुणीतरी पाश आवळत चाललं आहे..अन कोळ्याच्या जाळ्यातल्या माशीसारखी माझी अवस्था झाली आहे. जितकी धडपड सुटकेसाठी करावी तितका गुंता अधिकच वाढत आहे...
माझी वाट चुकली आहे का ?
.. आणि पुन्हा तीच वळणं आली तर दुसरी वाट निवडण्याचं स्वातंत्र्य तरी मला आहे का ?
किती काळ गेला समजत नाही. काळ ही संकल्पनाच या बोगद्यात अर्थशून्य ठरली आहे...
....अं ? हा आवाज कसला ? खरंच आवाज येतो आहे की चाहुलीला आसावलेल्या माझ्या कानांना भास होतो आहे ?
कोण ते हसतंय ? हे सुपरिचित असे मंद शांत सूर कुठून ऐकू येताहेत ?
कुणाचं तरी निकट सान्निध्य जाणवतंय ...अगदी अणुरेणूंनासुद्धा परिचित आहे तो .., पण स्मृतीच्या कडेकडेवरून डोकावूनसुद्धा ते नाव काही आठवणीत येत नाही आत्ता ! फार फार पूर्वी लहानपणी, स्मृती पोचते तिथपासून, अगदी श्वाससुद्धा घेता येत नव्हता तेव्हापासून माझा प्रेमानं सांभाळ करणारं कुणीतरी...तोच का तू ?
अणुरेणूंच्या अंतरंगात सामावलेला..प्रत्येक इच्छा अन आकांक्षा यांचा केद्रबिंदू असणारा..खोल अंतर्मनाच्या तळाशी वसणारा , निद्रेच्या माध्यमातून क्रयशक्ती अन उर्जा प्रदान करणारा, चिन्मय प्रेम अन अक्षय आनंद यांचे अधिष्ठान असा तो तूच का ? अन इथे कसा अवचित समोर आलास ?
...ओह आता मी तुला ओळखले आहे..तू तो अंती असणारा आहेस..सगळं काही अखेर ज्याच्याकडेच जातं तो..
..नाही, नाही, पण तू तर सुरुवातीला पण होतास..! ..जेव्हा मी एक बिंदूसुद्धा नसेन, तेव्हापासून तूच तर सोबत होतास..! म्हणजे तू अंती नव्हे तर आदि...!
अन त्याच्या आधी ? आणि याच्यानंतर ? तू नव्हतास ..नसशील ? छे ! शक्य वाटत नाही..
हसू नको..मी ओळखलंय तुला. तूच तो ! तू..माझ्या अंतर्यामी राहून दिशा देणारा, माझे चलन वलन, वहन-भरण करणारा ...योगक्षेम चालवणारा आत्मन ! माझेच शुद्ध केवल स्वरूप..!
या निरुंद बोगद्याच्या अखेरीस लपला आहेस, की मीच बोगद्यात स्वत:ला गाडून घेतले आहे ? स्वत:भोवती बंधनाच्या भिंती उभ्या केल्या आहेत ? ..आणि तुझ्यासाठी का त्या अभेद्य आहेत ?
पण मग मागे कधी कधी जीवनप्रवाहात भोवरा बनून आलेल्या एखाद्या निराश क्षणी मला उराशी धरून नवी आशा, उर्जा फुंकलीस ती कशी ?..जीवनाशी झुंजायची शक्ती संपली असलेल्या वेळी पुन्हा पंचप्राण नवनवोन्मेषशाली विजीगीषेने भरून टाकलेस ते कसे ?
..जनधिक्काराच्या अंधारात चाचपडताना थेंबाथेंबाने मी गलितगात्र होताना, मति तर्क अन मार्ग सारे खुंटले होते तेव्हा विजेसारख्या अवतरणाऱ्या अंत:स्फूर्तीच्या रुपाने तूच ना नवा मार्ग सुचवलास ? प्रतिकूलतेच्या झंजावातात, ओहोटीबरोबर कणाकणाने खचणाऱ्या वाळूसारख्या माझ्या धैर्याला नवीन आशेच्या भरतीने व्यापून टाकणारा अर्णव तूच होतास ना ?
..होय. आता माझ्या थोडं थोडं लक्षात येऊ लागलंय...मागे वळून पाहताना काही काही उमज पडू लागला आहे.
...पुष्कळदा मला वाटत होतं मला निर्णय घ्यायचा आहे..
..कधी निर्णयस्वातंत्र्याच्या अभिमानानं माझं आभाळ झालं तर कधी निर्णयप्रसंगाच्या अगतिक अपरिहार्यतेनं मी पाताळ गाठलं...
पण आता उमगतंय, ..निर्णय घेतले ते ‘मी’ नाही, तर माझ्या पूर्वकर्मांनी, ... त्या कर्मांच्या वेळोवेळी समोर ठाकलेल्या परिणामस्वरूप परिस्थितीने...
निर्णयाचे योग्य पर्याय अर्थात होते..पण अज्ञानाच्या धुक्यामुळे मी ते जाणले नाहीत. ...केवळ घेतले म्हणून काही निर्णय अंमलात आणले...कधी स्वत;च्या कधी इतरांच्या मतानं कर्म पार पाडले.
होय.. तुझ्यासाठीच केली सर्व कर्मे..कधी भली कधी बुरी..कृष्ण अन धवल..सुचेल तसं केलं.
आल्या क्षणाला साजरं केलं त्या कर्माच्या आहुतीनं
कधी तू समोर असायचास, कधी वळणापलीकडे ! तुझे इशारे कधी कधी समजलेच नाहीत. कधी समजूनसुद्धा दुर्लक्ष केलं मी ! पण परिणाम भोगायला अन उपभोगायला लागले मात्र आपणा दोघांना ! एकत्रित..
..नजरेसमोर नसलास तरी तुझी साथ कधी सुटली नव्हती. पण कधी कधी खुणावणाऱ्या प्रलोभनांना ओढाळपणे भुलून तुझी साथ दुर्लक्षून अनोळखी रस्ते पकडले. ..भलत्या उर्मीने व्यापले अन अवती भवती वावरणाऱ्या तुझ्याच अविष्कारांना नाकारले..
या काळोख्या बोगद्यातला प्रवेश ही त्याचीच तर परिणीती नव्हे ?
..यावेळी तुझे हास्य मघासारखे मुक्त नाही...!
...समजलं ! कधीतरी काहीतरी चुकलंय. नाही समजत, नक्की कधी अन कुठं...पण चुकलंय खरं !
पश्चात्ताप.. ? हं..चूक समजेल तर ना पश्चात्ताप ?
पण खोल तळाशी एक खात्री आहे रे..
रस्ते चुकले असतील पण इरादे नक्कीच चुकीचे नव्हते. जन्म घेणं हातात नव्हतं पण जन्म घेतल्यावर जमेल तितके हातपाय हलवले, काही दिशा ठरवून मार्ग शोधण्याचा प्रयत्न तरी प्रामाणिकपणे केला रे !
आणि हे सर्व तुझ्यासाठीच रे आत्मन, तुझ्यासाठी ! ना त्या आईवडिलांसाठी, ना बायको-मुलांसाठी, ना सख्या-जिवलगांसाठी. सगळं काही स्वत:साठीच बरं..
आज या अंधाऱ्या बोगद्याच्या अंतर्गृहात जणू माझी प्रज्ञा शुद्ध व्हावी तसे सर्व काही स्वच्छ दिसते आहे मला ! आता या ज्ञानाच्या क्षणी मला निवळलेल्या मानससरोवराचा तळ अगदी स्पष्ट दिसतो आहे.
अन हेही समजतंय की ही अनुभूती या ज्ञानासाठीच ! तुझीच योजना ही ! तुझ्या-माझ्यातले अंतर शून्य करण्यासाठी ! जिवा-शिवाची भेट घडवण्यासाठी ! द्वैताला अद्वैत करण्यासाठी !
अन मग आता वेळ का लावतो आहेस जिवलगा ?
पुरे झालं आता ! नको अंत पाहूस ! नको दुरून दुरून ते विलक्षण मोहक हास्य फेकूस !
शरण आहे तुला ..ये असा जवळ ये...
भरून जाऊदे तुझ्या प्रकाशमय चैतन्याने माझा रिकामा गाभारा !
उजळून जाऊदे हे तमोमय कृष्णविवर तुझ्या दैदिप्यमान सान्निध्याने !
जळोत ती कुशंकांची जळमटे ...झडो मतिचा लुळेपणा...!
माझ्या मृतप्राय झालेल्या आशेला फिरून संजीवनी दे ये...!
ये माझ्या अणुरेणूमध्ये फिरून तीच दीप्तिमान जीवनज्योत जागृत करण्यासाठी...
पुन्हा एकदा माझे रोम रोम जीवनलालसेच्या अमृताने उचंबळून येऊदे !
.....या अज्ञान-बोगद्याचा अंत करणारे हे पाउल, मी शिल्लक राहिलेले सर्व बळ एकवटून हे पहा उचलले !

************************************************************************************************
(चित्र आंजावरुन साभार)
************************************************************************************************

मांडणीविचार

प्रतिक्रिया

स्पंदना's picture

16 Mar 2013 - 3:40 pm | स्पंदना

:-)

प्यारे१'s picture

16 Mar 2013 - 7:19 pm | प्यारे१

असतो मा सतगमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योSर्मामृतं गमय.... ॐ शांति: शांति: शांति:

मूकवाचक's picture

18 Mar 2013 - 8:59 am | मूकवाचक

+१

यशोधरा's picture

16 Mar 2013 - 7:21 pm | यशोधरा

कलंक मतीचा झडो...
सुरेख..

लेखन आवडलं. शहारा आला वाचताना.

आतिवास's picture

16 Mar 2013 - 8:30 pm | आतिवास

मुक्तचिंतन आवडलं.

डिस्क्लेमर शेवटी टाकलात तर परिणामकारकता आणखी वाढेल लेखाची.
आधी तिथंपासून सुरुवात करताना 'मग काय बरं असेल?' असा विचार मनात येऊन वेगळ्या अपेक्षा निर्माण झाल्या आणि मग लेख नेमकं 'जे नाही' म्हणून सांगितलंत तुम्ही; त्याच्या जातकुळीतला वाटला मला. :-)

बापरे ! गुदमरल्यासारखं झालं .

यकुच्या ब्लॉगवरचं वाचतेय असं वाटलं क्षणभर ....

त्याचे बरेच लेख मी अर्ध्यातनं वाचायचे थांबवले ... यु नो ?? त्याचं लिखान इतकं
परिणाम करणारं होतं कि वाचता वाचताच आपला मेंदु आता आपला नाहिच असा भास होतो

काहि गोष्टींच्या मर्यादा असाव्यात आयुष्याला , त्यापलिकडे जाऊन विचारच करु नये असं वाटतं ..
नाहितर आपण स्वताहाला विसरुन जाऊ कि काय असं वाटायला लागतं ...

शब्द रचना छान उतरलिय .... एवढच म्हणेन ...

मन१'s picture

17 Mar 2013 - 9:14 pm | मन१

माझ्याही मनात यकुचा विचार डोकावून गेला.
तो लिहायचा ते कंटेंट चूक बरोबर असं मोजणं थोडावेळ सोडून द्या. पण ते intense होतं, प्रखर, प्रभावी होतं.
त्याच्या टाळक्यात अस्वस्थता असली की वाचणार्‍याच्या टाळक्यात घुसायचीच. त्याला जे मांडायचय ते सादर करणं , express करणं तो अचूक करायचा. अस्वस्थता अगदि तश्शीच इतर अनेकांनाही असेलच, मलाही होतीच. पण इतक चपखल मांडता नाही आलं कधी.
असो.RIP.

सस्नेह's picture

19 Mar 2013 - 11:28 am | सस्नेह

यकुचे लेखन मीही वाचले आहे. सुरुवातीचेही अन शेवटचेही. त्याच्या शब्दसामर्थ्याबद्दल आदर आहे. तथापि त्या लेखनात ठोस दिशा व धोरण तसेच आशावादित्व यांचा कमकुवतपणा जाणवला असे म्हणू इच्छिते. त्या लेखनाचा उगम अध्यात्मवादात होता, असे वाटते. आपल्या अनुभूती प्रभावीपणे मांडण्यात तो यशस्वी झाला होता, हे मात्र नक्की.
मी मांडलेली अभिव्यक्ती सामान्य जीवनातीलच एखाद्या क्षणी जाणवणाऱ्या स्वसंवादाच्या प्रसंगाशी निगडीत आहे. एखाद्या वळणावर मागे वळून पाहताना काही काही सत्ये प्रखरपणे दृग्गोचर होतात, मुलभूत जाणीव जागृत होतात अन नव्या आशेचे स्त्रोत सापडतात. या जाणीवांवर माझा लेख आधारित आहे. याचे अध्यात्माशी काहीना साध्यर्म आढळले तर तो छेदबिंदू मानायला हरकत नाही.

पैसा's picture

16 Mar 2013 - 10:02 pm | पैसा

:)

कवितानागेश's picture

16 Mar 2013 - 10:42 pm | कवितानागेश

आहा! सुंदर. :)

श्रिया's picture

16 Mar 2013 - 11:13 pm | श्रिया

छान लिहीलंय.

इनिगोय's picture

16 Mar 2013 - 11:44 pm | इनिगोय

सुरेख! हेही अ-क्षर बंध.. बंधनं सोडवणारे.

मन१'s picture

17 Mar 2013 - 9:10 pm | मन१

प्रभावी. उत्तम.

अभ्या..'s picture

17 Mar 2013 - 11:08 pm | अभ्या..

चिंतन आवडलं.
चिंतनाची शब्दरचना सुध्दा. :)

अत्रुप्त आत्मा's picture

17 Mar 2013 - 11:26 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.mimarathi.net/smile/congrats.gif

साऊ's picture

18 Mar 2013 - 7:13 am | साऊ

मला समजल नाही.

सस्नेह's picture

18 Mar 2013 - 2:05 pm | सस्नेह

स्वत:ला ओळखा...! अ

माझ्या सारख्या अज्ञानात सुख मानणा-याला समजण्याच्या पलीकडचं आहे,

अवांतर आणि एकदा खंबाटकी बोगद्याच्या तोंडाशी गाढवपणा करुन समोरचा ट्रक अंगावर ओढवुन घेतला असल्यानं हल्ली बोगद्यांची भितीच वाटते.

ज्ञानोबाचे पैजार's picture

18 Mar 2013 - 12:22 pm | ज्ञानोबाचे पैजार

"जीथे मार्गीचा कापडी महेश अझुनी",असे असताना देखील या वाटेवरुन चालायचा मोह प्रत्येकाला होतो.

शेवट मात्र फार आशावादी वाटला. तुम्ही म्हणता तसा शेवट झालाच कदाचीत तरी सुध्दा "मग पुढे काय?" हा प्रश्र्ण शिल्लक राहीलच.

इन्दुसुता's picture

19 Mar 2013 - 5:19 am | इन्दुसुता

उत्कॄष्ट लेखन. खूप आवडले.
"अरे अरे ज्ञाना झालासी पावन" ची आठवण झाली.

माझ्यासारख्या देव माननार्याला तरी हे अध्यात्मिक वाटते .....जरी हेतू नसला ह्यात.
तू देव मी भक्त करी...
संसाराच्या रगाड्यात "माझी" खरी भूक तशीच रहाते आणि विसर पडतो जन्मकार्याचा

काहीसा वेगळा वर्ग असलेल्या या लेखनाची थीम समजून घेऊन दाद देणार्‍या सर्व प्रतिसादकांचे व वाचकांचे आभार .