संवाद-३ [कुठलाही वाचा, ही मालिका नाही]

चाणक्य's picture
चाणक्य in जनातलं, मनातलं
7 Jul 2008 - 9:54 am

संवाद-१
संवाद-२
---------------------------------------------------------------------------------------

संवाद-३

"पण म्हणून मी का त्यांच्यासाठी काही करावं?" तो तावातावाने मला विचारत होता.
"कारण तुझी तेवढी क्षमता आहे" मी त्याला समजवण्याचा प्रयत्न करत होतो.
"क्षमता? महिना २० हजाराला तू क्षमता म्हणतोस?"
"of course, निदान माझ्यापेक्षातरी नक्कीच जास्त आहे. मी जर १२ हजारातही त्या झोपडपट्टीतल्या मुलांसाठी काही करु शकतोय तर तू का नाही?"
"कारण मलाच माझे वीस हजार पुरत नाहीत"
"कारण तु तुझ्या गरजा वाढवुन ठेवल्या आहेस"
"हे तु कोण ठरवणार? मी कसं जगायचं हे मी ठरवणार. मला जर २ हजाराच्या चपला घालाव्याश्या वाटल्या तर मी घालणार, १५ हजाराचा मोबाईल आवडतोय तर तो घेणार, घरी ए.सी. असावा असं वाटतंय तर बसवणार. यात चूक ती काय? आणि मी माझ्या पैशांनी हे करतोय, चोरी किंवा उधारी तर करत नाही ना?"
"हे बघ, तू जरा शांतपणे विचार केलास तर तुझं तुलाच पटेल की वर्षाकाठी ४-५ हजार ते सुद्धा एका विधायक कार्यासाठी खर्च करण तुला सहज शक्य आहे."
"अरे पण मला करायचंच नाहीये ना ते."
"पण का? आपल्या आजुबाजुला लोक हालाखी च्या परिस्थितीत जगत असताना तू ऐषोआरामात कसा काय जगु शकतोस? ईतक्या कश्या तुझ्या जाणिवा बोथट झाल्या आहेत? त्या झोपडपट्टीतल्या त्या माणसांना रोजचं जगण म्हणजे लढाई झाली आहे. समाजाच्या तळागाळातली ही लोकं तिथे खितपत पडलीयेत, त्यांना त्या परिस्थितीतून वर येण्यासाठी मदत करणं तुझं कर्तव्य नाही बनत?"
"पहिली गोष्ट म्हणजे मी ऐषोआरामात वगैरे काही जगत नाहीये, आणि तुझ्या त्या तळागाळातल्या लोकांना कुणी मनाई नाही केली कष्ट करून वर यायला. पण आयतं खायची सवयच लागलीये यांना.तुम्ही मारे त्यांना मदत करत आहात पण उपयोग होणार आहे का त्याचा? दिवसाखेरीस दारु ढोसून हे परत आपापल्या बायकापोरांना मारझोड करणार, पोरांची शिक्षणं बंद करून त्यांना कुठंतरी कामाला लावणार, लहान मुलं बापाचं हे वागणं बघून मोठेपणी तसच वागणार. हे एक दुष्टचक्र आहे रे, असंच चालू राहणरं. परिस्थिती नाही म्हणुन काही करता येत नाही, आणि काही करत नाही म्हणुन परिस्थिती बदलत नाही"
"हो ना, मग त्यांची परिस्थिती बदलायला आपण त्यांना मदत का करू नये"
"काही फरक पडणार नाहीये"
"प्रयत्न न करताच हे बोलतो आहेस? आणि हे बघ, सगळेच तु म्हणतोस तसे ऐतखाऊ नसतात. त्यांच्यातही काही लोक असे असतात की ज्यांची कष्ट करायची तयारी असते. त्यांना गरज असते फक्त थोड्या मदतीची. अरे शून्यातुन सगळं उभ करायच म्हणजे काही सोपं नसतं. तुझ्या माझ्या सारख्याला नशिबाने सगळ मिळालंय म्हणून त्याची धग जाणवत नाही. आणि मी तुला या कामासाठी वाहुन वगैरे घे असं थोडी म्हणतोय. त्यासाठी समाजात ईतर लोक आधीपासुनच कार्यरत आहेत. सामाजिक संस्था आहेत, सरकारी प्रकल्प आहेत. सुरुवात कोणीतरी केलेली आहेच रे; आपण फक्त हातभार लावायचाय.आणि राग नको मानूस पण तू कितीही कारणं द्यायचा प्रयत्न केलास तरी तुझ्यासारख्याला वर्षाकाठी ४-५ हजार बाजुला काढणं काहीच अशक्य नाही."
"अरे पण हे ५ हजार मी माझ्या कुटुंबाच्या आनंदासाठी का खर्च करू नयेत? त्यांच्या वाटचा आनंद काढुन दुसर्‍याला देणं का कुठला न्याय? आणि काही सामाजिक जाणीवा वगैरे बोथट झालेल्या नाहीत. च्यायला वर्षाकाठी ईमानेइतबारे सरकारला टॅक्स भरतोय, सगळे नियम वगैरे पाळतो, अगदी ट्रॅफिकचे सुध्दा, कुणालाही त्रास देत नाही. आता तू म्हणशील यात काय मोठसं पण मला सांग सरळमार्गी आयुष्य जगणं याला काहीच किंमत नाही का? आणि आपण शहरात राहतो म्हणजे काय आपल्याला प्रॉब्लेम्स नसतातच का? की प्रॉब्लेम्स फक्त खेडेगावच्या लोकांना आणि गोरगरीबांनाच ? त्यांच्यापेक्षा जास्त पैसे मिळतात म्हणून आपण श्रीमंत?हां अगदी बेसिक नीड्स साठी आपल्याला धडपड नाही करायला लागत पण म्हणून यापेक्षा पुढे जायचंच नाही का? समाधान जसं मानण्यावर असतं तस न मानण्यावरही असलं पाहीजे ना? जे आहे त्यात नेहमीच समाधान का मानायचं? तू कदाचित मानत असशीलही, पण मी नाही. हे बघ मला असं वाटतं की हा शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तूला सामाजिक कार्य वगैरे करावसं वाटत, मला नाही वाटत. पण म्हणून काय मी माणुसकी सोडली आहे अस नाही. मला फक्त सध्याच्या परिस्थितीत दुसर्‍याच्या अपलिफ्ट्मेंट पेक्षा स्वतःची अपलिफ्ट्मेंट आवश्यक वाटते. आणि मी म्हणतो मजबूत कष्ट करून भरपूर पैसे मिळवण्यात काय गैर आहे? 'अपवर्डली मोबाईल' असण म्हणजे हावरट किंवा लोभी असण नाही. किंवा मी त्यांच्या विकासाच्या आडही येत नाही. पण त्यांच्या विकासासाठी हातभार लाव म्हणत म्हणशील तर ते सद्द्यस्थितीत तरी मला शक्य नाही. दिवसभर कष्ट करून मिळवलेले पैसे मी माझ्या किंवा माझ्या कुटुंबीयांच्या आनंदासाठी खर्च केले तर त्यात काय चूक आहे? "
मला त्याला कसं समजवावं तेच कळे ना. निदान त्यावेळी तरी माझ्याकडे त्याच्या प्रश्नांची उत्तरं नव्हती.

मांडणीविचार

प्रतिक्रिया

मनिष's picture

7 Jul 2008 - 10:03 am | मनिष

पण, एक महत्वाची गोष्ट म्हणजे - अशा विधायक कार्यासाठी मदत स्वतःहून, मनापासून आली तर उत्तम; ती अशी 'समजावून' देऊ नये. जेव्हा आतून वाटेल तेव्हा ती व्यक्ती यथाशक्ती, किंबहुना त्यपेक्षाही अधिक करेल.

ऍडीजोशी's picture

7 Jul 2008 - 6:02 pm | ऍडीजोशी (not verified)

अनोळखी गरिबांना मदत करायच्या फंदात मी आता पडत नाही. आणून दिलेले कपडे नी वह्या पुस्तकं विकायचे प्रकार घडले आहेत. मदत सत्कारणी आणि योग्य माणसाला होणार असेल तर हरकत नाही.

आपला,

ऍडी जोशी
ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

धनंजय's picture

7 Jul 2008 - 11:58 pm | धनंजय

वैचारिक आहे.

(शेवटचे दोन डायलॉग मात्र लांब असल्यामुळे सुरुवातीचा नैसर्गिक ओघ हरवला आहे. हेच मुद्दे सुरुवातीसारखेच सवाल-जबाब-प्रतिजबाब अशा तर्‍हेने लिहिणे शक्य आहे का?)

संवाद वाचून इस्लामातील "ज़कात" किंवा ख्रिस्ती लोकांचा "टाइथ" हा प्रकार मनात येतो. मिळकतीचा साधारण १/१० भाग दानधर्मासाठी वापरावा, असे काही धार्मिक कर्तव्य असते. हिंदू धर्मात असा कुठला आकडा सांगितलेला नाही, पण जितके अधिक दान करावे तितके चांगले, अशी कल्पना रूढ आहे.

खरे म्हणजे संवादातला महत्त्वाचा संघर्ष हा नव्हे की किती पैसे द्यायची क्षमता आहे की नाही. दोघांनी तत्त्वतः "द्यावे" असे मान्य केले, तरच "किती द्यावे"/"क्षमता किती" हे प्रश्न सयुक्तिक होतात. संघर्ष हा की पैसे द्यावेत की देऊ नयेत.

मी स्वतः पैसे देणे हे धर्मकर्तव्य मानत नाही. परंतु काही बाबतीत स्वतःऐवजी सामाजिक कार्यांत पैसे खर्च करण्यात मलाच दूरगामी फायदा आहे असे मला वाटते. तो नेमका फायदा काय याचे बुद्धिबळातल्यासारखे खेळींसारखे गणित करता येत नाही. त्यामुळे हा स्वार्थी विचार पाताळयंत्री नाही, असे मला वाटते. या स्वार्थासाठी मी काही थोडे पैसे लोकांवर खर्च करतो.

पैसे मागणार्‍या भिकार्‍यांना सहसा भीक देत नाही. पण बेघर लोकांना रात्रीच्या आसर्‍यासाठी शहरात संस्था आहे, तिला थोडे पैसे देतो. रात्री भिकार्‍यांनी माझ्या घरासमोर बसून कुडकुडू नये, त्यांच्या कुडकुडण्याच्या दर्शनाने माझ्या हृदयात कालवाकालव होऊन घराबाहेर मित्रांशी मस्तपैकी गप्पा मारताना विरस होऊ नये, हा स्वार्थ इथे अगदी उघड आहे. अशा प्रकारे आणखी काही संस्थांना पैसे देतो, पण स्वार्थ नेहमीच इतका स्पष्ट नाही.

वह्या पेन्सिली देण्यातली गंमत मला मागच्याच वर्षी कळली. (मला हा अनुभव घृष्णेश्वराच्या देवळाबाहेरच्या बाजारात आला). ही भीक मागण्याची कल्पक युक्ती बघून मला त्या मुलाचे कौतूक वाटले. म्हणून मी त्याला पेन विकत घेऊन दिले - भीक म्हणून नव्हे तर त्याच्या कल्पकतेने माझे मनोरंजन केल्याचे शुल्क म्हणून. बहुधा हे बिझिनेस मॉडेल त्या मुलाच्या सुपीक डोक्यातले नव्हते - पण माझ्यासाठी नवीन होते. आता पुन्हा त्याच युक्तीने माझे मनोरंजन होणार नाही, आणि मी पेन किंवा वही विकत घेऊन देणारही नाही.

भडकमकर मास्तर's picture

8 Jul 2008 - 12:09 am | भडकमकर मास्तर

मनीष म्हणतो तशा दोन्ही बाजू पटतात...
:)...
सुरुवातीला तर संवाद एकदम खटकेबाज आणि उत्तम...
शेवटी जरा लांबल्यामुळे मजा कमी झालीय...पण एकूण छान चाललंय ..
लिहित राहा...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

यशोधरा's picture

8 Jul 2008 - 8:06 am | यशोधरा

दोन्ही बाजू पटतात...

मलाही, पण केलेल्या मदतीचा गैरफायदा घेतलेलाही २-३ दा पाहिलेले आहे, लक्षात आले आहे, म्हणून आता मदत करताना दहावेळा विचार तरी नक्कीच करावासा वाटतो...

चाणक्य's picture

8 Jul 2008 - 9:26 am | चाणक्य

खरे म्हणजे संवादातला महत्त्वाचा संघर्ष हा नव्हे की किती पैसे द्यायची क्षमता आहे की नाही. दोघांनी तत्त्वतः "द्यावे" असे मान्य केले, तरच "किती द्यावे"/"क्षमता किती" हे प्रश्न सयुक्तिक होतात. संघर्ष हा की पैसे द्यावेत की देऊ नयेत.

बरोबर आहे, परंतू आर्थिक मदत मिळवण्यासाठी नेहेमीच 'तुम्हाला फक्त अमुक ईतकेच पैसे भरावे लागतील / किंवा ईतका खर्च करणं तुम्हाला कसं सहज शक्य आहे' हे पटवून देण्याचा प्रयत्न असतो. विक्री (सेल्स) मध्ये एक मुलभूत सिद्धांत आहे, ग्राहकाला वस्तूच्या किमती पेक्षा त्या वस्तूमुळे होणारा फायदा समजवून द्यावा. परंतू फार थोड्या लोकांना हे माहीती असते. किंबहूना माहिती असलं तरी अमलात फार थोडी लोकं आणतात.

एडी, यशोधरा, मनिष तुमच्यासारखाच माझाही अनुभव आहे. खर म्हणजे हा संवाद माझ्याच मनातला संघर्ष आहे. कधी एक बाजु पटते तर कधी दुसरी.

धनंजयने चांगला सुवर्णमध्य साधला आहे.पण तरीही एडी म्हणतात तसं मदत सत्कारणी आणि योग्य माणसाला व्हावी असं वाटत. शेवटी कुठेही गेला तरी चालेल असं म्हणायला आपला पैसा काही काळा पैसा नाही. कष्ट करून मिळवलेला पैसा आहे. तो योग्य ठिकाणीच खर्च व्हायला हवा.

(शेवटचे दोन डायलॉग मात्र लांब असल्यामुळे सुरुवातीचा नैसर्गिक ओघ हरवला आहे. हेच मुद्दे सुरुवातीसारखेच सवाल-जबाब-प्रतिजबाब अशा तर्‍हेने लिहिणे शक्य आहे का?)

पुढच्या वेळी जरूर विचार करीन.

झकासराव's picture

8 Jul 2008 - 11:07 am | झकासराव

सवांद आवडला.
दोन्ही बाजु पटतात. पण अगदीच ४-५ हजार नसले तरी हजार बाराशे रुपये देखील एका गरजु मुलाच्या शिक्षणाचा खर्च भागवु शकतात की.
त्या दृश्टीने पटवुन देणे सोपे जाइल.

................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

चाणक्य's picture

8 Jul 2008 - 3:01 pm | चाणक्य

अगदीच ४-५ हजार नसले तरी हजार बाराशे रुपये देखील एका गरजु मुलाच्या शिक्षणाचा खर्च भागवु शकतात की.

प्रश्न पैश्यांचा नसून धनंजय म्हणाले तसा, पैसे द्यावेत की न द्यावेत हा आहे. मला पैश्यांची गरज असताना मी दुसर्‍या कुणाला पैसे का द्यावेत असे त्या संवादातल्या पात्राचे म्हणणे आहे. आणि हे म्हणतानाच 'माझी गरज मीच ठरवणार' असंही तो म्हणतो.

विसोबा खेचर's picture

9 Jul 2008 - 9:19 am | विसोबा खेचर

संवाद आवडले, धन्याशेठचा प्रतिसादही आवडला...

चाणक्यराव, येऊ द्या अजूनही. चांगलं लिहिताय!

तात्या.