शनिवार सकाळ! मुलांच्या क्लासेसची वेळ! मी न्याहरीसाठी बटाटेवडे करायला घेतलेले. त्यामुळे माझी सकाळ सोलणे, तळणे अन घोळण्यात आकंठ बुडालेली. "माझी बॅग"," माझे शुज?"," वॉटर बॉटल", अश्या आरोळ्या क्षणाक्षणाच्या अंतराने इंटेन्स होत होत्या. आम्ही दोघे किल्ला लढवण्यात गुंग. अन बघता बघता हे तिघेही बाहेर पडले. मी अजुनही वडे तळत असल्याने ते बाहेर पडल्याचे समजलेच नाही. पण मग घरातली किलबील ( हो! अस म्हणाव लागत. कितीही कलकलाट अन शब्दाशब्दाला वाद फुटत असला तरी मुल जे काही करतात त्याला किलबील अन किती गोऽऽड! असच म्हणायच असत.) बंद झाल्याच जाणवल. जरा हुश्श्य झाल.
आता मुलांना सोडुन हा परत येइल अन मग आम्ही दोघे निवांत ब्रेकफास्ट करु शकु. अजुन थोडे वडे तळायचे होते, अन अचानक; त्या निरव शांततेत कावळ्यांची "काव! काव!!" घुमली. घुमली म्हणजे अक्षरशः कावळे जीव खाउन ओरडताहेत अस वाटल. मला जरा आश्चर्य वाटल. नाही म्हणजे ऑस्ट्रेलियात अतिशय भांडखोर अन कर्कश्श्य आवाजात ओरडण्याचा मान काकाकुवा या शुभ्र धवल पक्ष्याला जातो. काय झाल असाव? तरीही, तसेच किचन मध्ये काम उरकत राहिले. पण क्षणा दोन क्षणात ती कावंकावं इतकी वाढली की बाहेर डेकवर गेले. घराच्या मागे चाळीस वर्ष जुना निलगीरी उभा आहे. पार मान नव्वद अंशात वर करुन त्याच्या फांद्यांकडे पहाव लागत. त्यावरच जवळ जवळ पाच सहा कावळे मोठमोठ्याने ओरडत बसले होते. ओरडणं कस? तर काऽव अस सुरु करुन मग अक्षरशः रडल्यासारखा तो "व" ते ओढत होते. त्यातच एकजण चक्क निलगीरीच्या फांद्यांची साल कुरतडत होता अन त्याचा काऽऽड काऽऽड असा आवाज ऐकु येत होता. आत गॅसवर अजुन वडे तेलात होते. पटकन आत आले अन वडे काढुन पुन्हा बाहेर गेले. अजुनही कावळे तसेच ओरडत होते. का कुणास ठाउक पण ह्रदय धडधडलं. एकुण मुड खराब झाला.
काय कराव? काय झाल असेल? आता पावेतो कावळ्यांचा आवाज कमी झाला होता. पण मन मात्र अशांत ! तशीच आत बाहेर करत राहीले अन मग फोन उचलला. नवर्याला मिस कॉल दिला. मिनिटभरातच मुलीने फोन केला. " येस आई?" म्हंटल आता काय बोलावं? मग म्हंटल , "ओह! यु आर स्टील ऑन रोड?" "येस" " ओके! आस्क पपा टु कॉल मी वन्स ही रिचेस "
पाच मिनिटात नवर्याचा फोन! अर्थात हा एक सवयीचा भाग. बाहेर पडल की हे आणं ते आणं म्हणुन घरी बसुन फोन करायचा बायकोचा हक्क मी पुरेपुर बजावतं असते. तसच काहीसं असावं अश्या अविर्भावात त्याचा फोन. अर्थात मला जे जाणवलं होत त्याची वासलात कोणत्या शब्दांत होणार, हे मला आता पाठ झालयं. “ तुलाच कस काय जाणवतं? कावळे कधी ओरडतं नाहीत काय? कुठेतरी कावळा मेला असेल . तुझं आपल काहीतरीच! एव्हढी शिकलीस तरी गावची ती गावचीच राह्यलीस. ऑस्ट्रेलीयातले कावळे असलं काही शास्त्र जाणतं नाहीत. " अश्या अनेक वाक्यांची बिनमांगी खैरात घ्यायची तयारी नव्हती.
"हॅलो?"
" हां ! हे बघ! जरा शिस्तीत ड्राइव्ह कर!"
"??????"
" हे बघ जरा शिस्तीत गाडी चालवं अस म्हणतेय मी."
अजुनही पलिकडुन काहीच आवाज नाही. मग मला बटाटेवडे आठवले.
"हे बघ वडे कूठे पळुन नाही जायचे. शिस्तीत ये, मग आपण चहा वडे खाउ काय?" मी आता आवाजात उसना ह्युमर आणायचा प्रयत्न केला.
अजुनही महाशय शांतच. मग मीच विचारल "ठेवु?"
"हां."
फोन ठेवला. अन आता घरी आल्यावर होणार्या चिडचिडीला अन सरबत्तीला कसं तोंड द्यायचं याचा विचार सुरु झाला. या नव्या प्रश्नाने आधीचा कावळेवाला धडधडाट जरा कमी झाला.
जरा किचन आवरायला घेतलं, अन गराजमध्ये धाडदिशी दार लावल्याचा आवाज घुमला. पाठोपाठ दार उघडुन नवरा आत आला. मी किचन मधुन वळुन त्याच्याकडे पाहिल. डायनिंगची एक खुर्ची ओढुन त्यावर बसत बसत त्याने माझ्याकडे रोखुन पाहिलं. मी नुसतीच गप्प. ते म्हणतात ना," बंद मुठ्ठी लाख की ...." तस काहीसं. त्याच्याशी स्वतःहुन बोलण्याऐवजी अन न विचारता अश्या बिनअर्थी फोनकॉलच स्पष्टीकरणं देण्याऐवजी गप्प बसणं शहाणपणाच होतं. मी चहा चढवला. उकळणार्या चहाच्या वासाबरोबर नवर्याचं मौन सुटलं.
घरातुन बाहेर पडलं की दोन मिनिटात 'फर्न ट्री गली' नावाचा रोड लागतो. ८०चा रस्ता. माझ्या अगदी चाकाखालचा. पण नवरा आठवड्यातुन एकदाच जातो. तेथे राईट घ्यावा लागतो आमच्या सबर्ब मधुन. इकडच्या तिन अन पलिकडच्या तिन अश्या सिक्स लेनस. अन मध्ये राईट घेणार्यांसाठीच आयलंड. याने अलिकडचा रस्ता क्रॉस केला अन आयलंडमध्ये एक क्षणबरसुद्धा थांबायची गरज नसलेला पलिकडचा मोकळा रस्ता. फक्त एक बायसिकल (मेलबर्नच्या रस्त्यावर फार म्हणजे फार सायकली असतात. ) पलिकडुन इकडे येणारी अन तिच्यामागे एक कार. याने गाडी हलवली, पण तोवर त्या कारवाल्याने बायसिकलवाल्याला ओव्हरटेक करण्यासाठी गाडी अतिशय वेगाने काढत फटक्यात राईट मोस्ट्ला टाकली. तो माणुस इतक्या वेगात होता की अर्ध्यालेनमध्ये याने करकचुन ब्रेक लावला अन थांबला. ती गाडी सुसाट निघुन गेली, अन समोर बसलेला मुलगा किंचाळला. क्षणसुद्धा जास्त होइल इतकाच वेळ् घडलेला इन्सिडंट!
अजुनही नवर्याची नजर तिक्ष्णच होती. ही वॉज रेडी टु लिसन माय साइड ऑफ स्टोरी. जमेल तितक्या साधेपणे जे घडल ते सांगितल. अर्थात नवर्याने "होय? खर?" अस काहीही रिअॅक्ट केलं नाही. घुम्यासारखा बसुन राहिला. म्हंटल "तूला राग आला का? माझा असा फोन ऐकुन?"
"आता काय! "नवरा नि:श्वासला."तूला कायमच सगळं कळतं. आमच गुपितं अस काही नाहीचं. मी मुलांना तूला हे सांगु नका म्हणुन सांगितलय."
__/\__
अपर्णा
प्रतिक्रिया
26 Feb 2013 - 8:59 am | मिसळलेला काव्यप्रेमी
बायकांना सिक्थ सेंन्स असतो, यावर माझाही हल्ली विश्वास बसायला लागलाय...
मस्त झालाय लेख. आवडला.
26 Feb 2013 - 11:37 am | सस्नेह
काय ती ठसकेबाज लेखनशैली ! मर गये..
26 Feb 2013 - 11:47 am | पैसा
मी पण या सिक्स्थ सेन्सची आठवण करत होते तेवढ्यात मिपा बंद झाले, तोपर्यंत मिकाचा प्रतिसाद आला देखील!
26 Feb 2013 - 11:58 am | मृत्युन्जय
छोटासा प्रसंग. पण फर्मास उतरवलाय लेखणीतुन :)
26 Feb 2013 - 12:17 pm | प्रचेतस
लिखाण आवडले.
26 Feb 2013 - 4:11 pm | अत्रुप्त आत्मा
सहमत :-)
26 Feb 2013 - 1:13 pm | किसन शिंदे
छानच लिहलाय सगळा प्रसंग!
26 Feb 2013 - 1:19 pm | मन१
.
26 Feb 2013 - 1:26 pm | तुमचा अभिषेक
कावळांच्या बाबतीत होते असे खरेच.. अनुभव आलेत..
26 Feb 2013 - 3:47 pm | क्रान्ति
खासच लिहिलंय.
26 Feb 2013 - 4:44 pm | ऋषिकेश
चांगले ललित! :)
26 Feb 2013 - 4:48 pm | गणपा
:)
26 Feb 2013 - 9:25 pm | इनिगोय
होय गं..!
26 Feb 2013 - 9:26 pm | सानिकास्वप्निल
छान लिहिले आहेस अपर्णाताई :)
26 Feb 2013 - 9:26 pm | शुचि
अपर्णा हा लेख नाही पटला गं. ते कावळे कदाचित साप, नाग वा तत्सम प्राणी पाहून ओरडत असतील. तू वडाची साल पिंपळाला जोडलीस असे म्हणेन.
27 Feb 2013 - 3:54 am | स्पंदना
नाही रे बाबा! कावळ्यांऐवजी ढिगभर साळुंक्या ओरडल्या असत्या. तो कलकलाटच वेगळा असतो. साप पाहुन ओरडणार्या साळुंक्या फार वेगळ ओरडतात. कावळे नुसते पहात राहतील. अन मग ते सावध करण्याचा जो हाकारा असतो तो अगदी स्पष्ट! अन अश्या वेळी आजुबाजुचे सगळे पक्षी आपापल्या कुवतीनुसार बोलतात. हो अक्षरशः बोलतात. यु शुड एक्स्पिरिअन्स दॅट वन्स. अर्थात त्याला फार वर्ष जावी लागतात रानचे आवाज समजायला. मी स्वतः साळुंक्या घरासाठी भांडताना, साप आला की अलर्ट होउन ओरडताना, (त्या सापाला अगदी घालवत जातात दुरवर असा सोडत नाहीत. ) अस तरबेज कानान ऐकलयं. पण असे कावळे एकत्र जमा होउन येतात ते जरा वेगळ्च असत.
27 Feb 2013 - 3:57 am | शुचि
असू शकेल :) तसं असेल तर मग, लेख आवडला.
5 Mar 2013 - 12:13 am | कवितानागेश
एकंदरीतच पक्ष्यांना पंचक्रोशीतल्या गोष्टी पटकन कळतात, शिवाय ते आपल्याला रोज बघून (?) पर्सनली ओळखतही असावेत अशी कधीकधी शंका येते. जरी आपल्याला ते वेगवेगळे ओळखता येत नसले तरी. कदाचित कावळ्यांमध्ये काहितरी सिग्नलिन्ग होउन ते तुला सान्गत असतील, 'अहो अहो काकू, तुमचे काका गडबड करतायत बघा... '
माझ्या आईचे २ अनुभव आहेत असेच. २६जुलैच्या पुराच्या वेळेस, पाणी चढायच्या आधी आणि मुंबईत पश्चिम रेल्वेतले बॉम्ब्स्फोट होत असताना, दोन्ही वेळेस घरात छोटे पक्षी दयाळ, शिन्जीर आले होते. खूप अस्वस्थ होउन घिरट्या घालत होते आणि हळू आवाजात घाबरल्याच्या टोनमध्ये काहीतरी बोलत होते.
27 Feb 2013 - 8:40 am | ५० फक्त
छोटासा प्रसंग आवडला, आपल्या दररोजच्या धकाधकीच्या आयुष्यातला एखादा असा तुकडा मांडता येणं छान जमलंय तुम्हाला.
बाकी आमचं आणि कावळ्यांचं नातं फार जुनं आहे, म्हणजे हल्ली तर आमच्या कॉलनीत शिवायला कावळा येत नसेल तर बोलव हर्षदला. लगेच येतात कावळे त्याच्या मागं असं झालंय. पण ते इथं नको उगा तो मुक्तपिठिय लाडुवाला कावळा यायचा.
27 Feb 2013 - 10:52 am | सुमीत भातखंडे
भारीये!
1 Mar 2013 - 3:17 am | उपास
आवडला.. छान मांडलय!
पण शेवटी, इतक्या मेहनतीने केलेल्या, वडयांच काय झाल हा प्रश्न उरतोच! :)
1 Mar 2013 - 4:59 am | आनन्दिता
अपर्णाताई आधी ते बटाटावड्यांबद्दल लिहुन तोंडाला पाणी सुटवलंस आणि परत तुझ्या लेखणीने असा काही धुमाकुळ घातला की तोंडचं पाणी पळवलं... जे ब्बात!!
बाकी तुला कायमच सगळं कळतं!
१००%
1 Mar 2013 - 8:02 am | फिझा
अपर्णा ,,तुमचा लेख छान आहे आहे ......आणि हे अगदी specifically इथे जाणवते कि कावळे फार विचित्र ओरडतात इथले ...मीही australia मधे आहे ...sydney मध्ये ............
2 Mar 2013 - 9:22 am | मनीषा
..पण अनुभव कथन फारच सुंदर.
ऑस्ट्रेलियातील कावळ्यांचे माहिती नाही, पण भारतातील कावळे मात्रं खूपदा वॉन्टेड असतात.
काही कावळे पाहूणे येणार असल्याची वर्दी देतात, तर काही आत्मा मुक्त झाल्याची वार्ता सांगतात :)
आणि हो, मेणाचे घर वितळून गेल्यावर, उन्हाने त्रासलेल्या चिऊताईला आपल्या घरी आश्रय देतात.
आणखीही बरीच कामे भारतीय कावळे करतात.
त्यांच्यासाठी ज्ञानदेवांनी किती सुंदर ओवी लिहिली आहे..
पैल तोगे काऊ कोकताहे
शकुन गे माये सांगताहे |
आणि पु.ल. ना त्यांच्या 'हरितात्या' या व्यक्तीरेखेत आणि कावळ्यात काहीतरी विलक्षण साम्य आहे असे वाटले होते.
तस्मात, कावळा हा काही अगदीच वाईट पक्षी नाही.
4 Mar 2013 - 8:37 am | ५० फक्त
आत्म्याच्या तृप्तीबद्द्ल काही कनेक्शन आहे का हो कावळ्यांचं ? उगा एक जनरल नॉलेज असावं म्हणुन विचारतोय.
4 Mar 2013 - 11:00 am | मनीषा
... पण असावं, असा पूर्वापार समज चालत आला आहे.
बाकी खरं खोटं कावळ्यांना आणि आत्म्यांनाच माहिती.
5 Mar 2013 - 12:24 am | विकास
वेगळाच अनुभव! आवडला. कावळे स्मार्ट असतात याचे जालावरील दोन उदाहरणे. :-)
5 Mar 2013 - 6:47 am | स्पंदना
खरं सांगायच तर हा लेख मुक्तपिठीय व्हायला काही हरकत नव्हती. पण त्यासाठी शब्दयोजना थोडी वेगळी असण्याची गरज होती.
काय असतं, अस काही घडलं की हा अनुभव कुणाला तरी सांगावासा वाटतो. पण ज्याला सांगायचा तो जर इतका पराकोटीचा नास्तिक? की असलं काही नसतच अश्या भावनेचा असेल तर सांगायच कस? म्हणुन मग तुम्हा लोकांच्या खांद्यावर हे चार शब्दांच ओझं !
अश्या अनुभवांची एक खासियत असते. जे काही घडतं त्याला थोडा जास्त भर देउन अद्द्भुत केलं जातं. अन त्यामुळे लोक वैतागतात. दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येकाच्या पिंडाची एक खासियत! संवेदनशीलतेचा कमी जास्त प्रभाव. मला थोड जास्त जाणवतं तर दुसर्या कोणाचं लक्षही नसेल की आपल्याला काही जाणवत, पण इतक्या वर्षांत (आज मी ४०शीची आहे, अन नुकताच चष्मा पण लागलाय, अर्थात त्याने माझी बुद्धी वाढली अस नाही म्हणणार मी पण तरीही निदान अनुभवांनी शिकवलेलं शहाणपण म्हणुया) हे का घडत हे जरी नाही उलगडलं तरी काही तरी वेगळं घडतय हे जाणण्याची क्षमता आपल्यात आहे एव्हढ कळलय हे मात्र खर. ( उगा आता मी कोणी तरी माताजी बनणार आहे असा विचार करु नका. इ हेत चुल्त्स्{आय हेट कल्टस})
सार्या वाचकांचे आभार!
5 Mar 2013 - 8:23 am | नगरीनिरंजन
छान ललित! शंकाकुशंकांनी भरलेलं स्त्रीचं अस्थिर मन आणि नवरा-बायकोच्या नात्याचं छान चित्रण आहे.
बाकी कावळे हुशार असतात हे माहित आहे पण त्यांना भविष्याची चाहूल लागते की नाही त्याची कल्पना नाही.
कावळे हुशार असल्याने कमी बुद्धिच्या लोकांना त्यांचा राग येत असावा कदाचित; त्यामुळेच सिंगापूरमध्ये कावळ्यांना टिपून टिपून मारतात. ;)
5 Mar 2013 - 10:18 am | स्पा
आवडेश :)
7 Mar 2013 - 11:18 am | त्रिवेणी
छान लेख. कावळ्यांनाही अशुभाची चाहूल लागते हे आजच कळले. अशुभ घडणार असेल तर कुत्रे रडतात हे माहीत होते. ज्या प्रकारे आपल्या शुभ अशुभच्या कल्पना असतात तसे काही औस्ट्रेलियातील लोकांच्याही असतात का? भारताव्यतिरिक्त इतर देशातील लोकांचे शुभ अशुभच्या संकल्पना वाचायला खरेच आवडेल.
बटाटेवड्यांचे काय झाले?
18 Mar 2013 - 8:51 pm | मदनबाण
लिखाण आवडले.