पाहिले मी पाचोळ्याला
फांद्याना लटकून रडताना,जगताना
तर कधी फुलण्याआधी
कळी गळून पडताना
ऐन बहरात फुलांचा
रंग उडून जाताना
अन कुठे सुरकुतल्या देहातूनही उरला
गंध ओवळून टाकताना
पाहिले मी डेरेदार वृक्षाखाली
सावली हरवून जाताना
तर कुठे इवल्या रोपाखाली
वारूळ उभे रहाताना
वादळाशी झूंज देत
इतिहास नवा रचताना
तर कुणी अलवार झूळकीसरशी
मुळासकट पडताना
पाहिले मी देवळात दगडावर
अभीषेक दुधाचा होताना
तर कधी भीकार रस्त्यावर पत्थरात
अन्कुर उद्याचा फुटताना
खडकाळ बंजर जमीनीवर
नांगर (प्र)यत्नाचा फिरताना
तर कुठे नर्मदेच्या तीरावर
गोट्यांचे पीक येताना
पाहिले मी हिमालयाला
नतमस्तक धरेसमोर होताना
तर कधी इवल्या शीळेला
मिजास उंचीची मारताना
कुणी उगीच ढगात बोट घालून
देवांशी नाते सांगताना
तर कुठे कुण्या रामाच्या संजीवनीसाठी
भार सारा वीसरताना
पहातोय मी सचेतनात अचेतन
तितकेच भरून आहे
निर्मळ भागीरथीच्या संगे
गटारगंगा दडुन वाहे
असेच सर्व पहता पहता
डोळे क्षणभर मीटून घेतो
गोल खोल गुढ जगाची
खडकाळ रीत समजुन घेतो
-- कौस्तुभ
प्रतिक्रिया
4 Jul 2008 - 12:10 pm | यशोधरा
पहिले कडवे खूप आवडले...
4 Jul 2008 - 4:53 pm | विसोबा खेचर
एक उच्च दर्जाची कविता वाचल्याचा आनंद वाटला...!
अतिशय सुंदर..
धन्यवाद कौस्तुभराव!
तात्या.
5 Jul 2008 - 11:08 am | कौस्तुभ
यशोधरा, विसोबा
प्रतीसादाबद्द्ल आभारी !!
5 Jul 2008 - 11:33 am | सुचेल तसं
कौस्तुभ,
अर्थपुर्ण कविता. लगे रहो........
-ह्रषिकेश
http://sucheltas.blogspot.com
5 Jul 2008 - 8:59 pm | मदनबाण
कविता आवडली..
मदनबाण.....
6 Jul 2008 - 12:04 am | श्रीकृष्ण सामंत
कविता सुंदरच आहे,दोनदोनदा वाचली
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
6 Jul 2008 - 8:52 pm | चतुरंग
अतिशय आशयपूर्ण कविता. पहिलं आणि शेवटचं कडवं तर उच्च झालं आहे.
मनातली अस्वस्थता इतक्या प्रभावी शब्दात मांडणार्या तुझ्या काव्यप्रतिभेला सलाम!
चतुरंग
7 Jul 2008 - 4:14 am | शितल
सु॑दर अर्थपुर्ण काव्य रचना .
7 Jul 2008 - 9:23 am | कौस्तुभ
ह्रषिकेश,मदनबाण,श्रीकृष्ण सामंत,चतुरंग,शितल
सर्वांचे आभार!
7 Jul 2008 - 2:03 pm | सैरंध्री
सुंदर...आशयपूर्ण कविता
सैरंध्री
7 Jul 2008 - 7:38 pm | कौस्तुभ
आभारी सैरंध्री!