एका दिशेचा शोध....(पुस्तक परिचय)

चाणक्य's picture
चाणक्य in जनातलं, मनातलं
10 Feb 2013 - 5:33 pm

संदीप वासलेकर यांचे 'एका दिशेचा शोध' म्हणजे प्रत्येक भारतीयाने आवर्जून वाचावे असे पुस्तक आहे. भारत उद्याची महासत्ता आहे हा समज असणा-यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालून त्यांना वास्तवाची जाणीव हे पुस्तक करुन देते. पण महत्त्वाची बाब म्हणजे लेखक नुसते प्रश्न मांडून थांबत नाही तर त्यांची उत्तरे ही शोधण्याचा प्रयत्न करतो. एका सम्रुद्ध आणि आनंदी समाजाची निर्मिती करण्यासाठी सामान्य नागरीकांपासून ते राजकारण्यांपर्यंत प्रत्येकाने काय करायला पाहिजे याचे व्यवस्थित विवेचन करतो.

सर्वप्रथम संदीप वासलेकरांचा थोडक्यात परिचय करून देतो. डोंबिवलीतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेला आणि मराठी माध्यमातून शिक्षण झालेला हा माणूस आज गेली ३३ वर्षे जागतिक राजकारणात सक्रिय सहभागी आहे. तब्बल ५० देशांचे राष्ट्र्प्रमुख वासलेकरांना त्यांच्या देशाची महत्वाची धोरणे बनविताना सल्लामसलतीसाठी आमंत्रण देतात ही एकच गोष्ट त्यांची credibility establish करायला पुरेशी आहे. ईतकेच नव्हे तर जगाची, पर्यायाने मानवाची भविष्यातली वाटचाल कशी असली पाहिजे आणि त्यासाठी कोणती पावले उचलली पाहिजेत हे ज्या महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये ठरत असते, त्या परिषदांमध्ये वासलेकरांचा सक्रिय सहभाग असतो. Think Tank ही आपल्या भारतामध्ये तितकीशी रुळलेली संकल्पना नाही. वासलेकर मुम्बईत Strategic Foresight Group नावाचा Think Tank चालवतात. या संस्थेद्वारे ते भारतासह ईतर अनेक देशांना त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी मदत करतात. तर अश्या या, जागतिक राजकारणात अनेक वर्षे सक्रिय सहभाग असलेल्या आणि म्हणूनच दहशतवाद, शिक्षण, कायदा व सुव्यवस्था, राजकारण, अर्थकारण, पर्यावरण, दारिद्र्य निर्मूलन, या आणि अश्या विषयांचा सखोल अभ्यास असणा-या वासलेकरांचे हे पुस्तक आपल्याला विचार करयला उद्युक्त करते.

पुस्तक वाचताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे, राजकीय ईच्छशक्ती असेल आणि नागरीकांचा सहभाग असेल तर सबंध देशाचा अत्यंत कमी कालावधीत कायापालट होऊ शकतो. ऊदाहरण म्हणून वासलेकर सिंगापूर, मलेशिया या देशांचे दाखले देतात. ४० वर्षांपूर्वी हे देश अत्यंत गरीब होते. त्यावेळच्या भारताहूनही त्यांची परिस्थिती खालावलेली होती. पण समर्थ नेतृत्व लाभले की देशाचा कसा कायापालट होतो हे त्यांच्या आजच्या परिस्थितीवरून सहज लक्षात येऊ शकते. मलेशियाला तर हा बदल करायला जेमेतेम १० वर्षाचा कालावधी लागला. पुस्तकातील एका प्रकरणात वासलेकरांनी लिहिलं आहे की ज्या देशाचे नेते मोठे असतात, तो देश लहानच राहतो आणि दुर्दैवाने आपल्या भारताची ही परिस्थिती आहे. वेगाने वाढत जाणारी श्रीमंत-गरीब ही दरी हे याचेच लक्षण आहे. दहशतवाद, नक्षलवाद यांसारख्या समस्या या दरीतूनच निर्माण होतात. फिलिपाईन्समध्येही एकेकाळी दहशतवादाने थैमान घातले होते. परंतू फिडेल रामोस अध्यक्ष झाल्यावर त्यांनी काही ठोस पावलं उचलली ज्याने या दहशतवादाचे प्रमाण लक्षणीय प्रमाणात कमी झाले. वासलेकारांनी रामोस यांच्याशी झालेल्या एका भेटीत या यशाचे रहस्य विचारले. त्यांनी सांगितल्यानुसार विकास, न्याय, अस्मिता आणि शिस्त या चार मार्गांनी रामोस यांनी काही कार्यक्रम राबवले ज्याची परिणिती दहशतवाद कमी होण्यात झाली. काश्मीर मधल्या एका दहशतवादी गटाबरोबर चर्चा करताना, एका दहशतावाद्याने वासलेकरांना सांगितले, "आम्ही स्वीकारलेला मार्ग चुकीचा आहे ही आम्हाला समजते. आमच्यापैकी बरेच जण दिशाहीन आहेत. पण तुमची दिशा कोणती आहे? तुम्ही जर भारत म्हणजे न्याय, भारत म्हणजे तत्त्वावर आधारित राजकारण, भारत म्हणजे भ्रष्टाचारास जागा नसलेला समाज, भारत म्हणजे आशावाद- अशी समीकरणे असलेला भारत निर्माण करू शकलात तर आमचा पराभव अटळ आहे. आमच्यातले पुष्कळ तरूण पाकिस्तानला पाठ दाखवतील व हिंसाचार सोडून देतील. पण तुमची दिशा काय आहे?"

सर्वसमावेशक प्रगती ही एका निकोप समाजाच्या निर्मीतीसाठी अत्यंत आवश्यक बाब आहे. भारतात राजकारणी पक्ष याबाबत बोलतात पण सर्वसमावेशक प्रगतीसाठी पोषक समाजरचना करण्यात अयशस्वी ठरतात किंबहूना फार कमी नेते तसे प्रयत्न करतात. शिक्षण या अत्यंत मुलभूत घटकाकडे आपल्याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. शिक्षणावरील एका प्रकरणात वासलेकरांनी काही आकडे दिले आहेत, ते वाचून वास्तव किती भयाण आहे ही जाणीव झाल्यावाचून रहात नाही. २०२५ सालापर्यंत भारतात सुमारे ६० कोटी लोक हे स्वतःचा उदरनिर्वाह करायच्या वयाचे असतील. परंतू सध्याच्या वेगाने आपण जात राहिलो तर यातले फक्त ५ कोटी युवक हे पदवीधर असतील. उरलेल्या ५५ कोटींपैकी १५ कोटी शालांत परिक्षा उत्तीर्ण झालेले युवक असतील. ४० कोटी कामगार हे शिक्षण अपूर्ण राहिलेले असतील. आपल्या देशाची प्रगती कुठल्या दिशेने चालू आहे हा अत्यंत गंभीर सवाल आहे. भारतातल्या ६.५ लाख खेड्यांमध्ये जवळ जवळ सगळीकडे पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण देणा-या शाळा आहेत. पण आठवीपर्यंत शिक्षण देणा-या फक्त सव्वादोन लाख, तर मॅट्रीक पर्यंत शिक्षण देणा-या दीड लाखांहूनही कमी शाळा आहेत. ही सरकारी आकडेवाडी जरी खरी मानली तरी, ६.५ लाखांपैकी ४.५ लाख खेड्यांमध्ये १० वी पर्यंत शिक्षणाची सोयच नाही. लोकहो उद्याची पिढी ही अशी घडते आहे. ही पिढी उद्याचा भारत घडवणार आहे. ही जर अशिक्षीत किंवा अर्धशिक्षीत राहीली तर एका महासत्तेची निर्मिती कशी काय करु शकणार? निर्मिती सोडा, महासत्ता ही संकल्पना तरी त्यांना समजणार आहे काय? मग आपण या फुकाच्या वल्गना कशाच्या जोरावर करतो आहोत? फक्त काही महत्त्वाच्या शहरांमध्ये दिसणा-या प्रगतीच्या जोरावर. मलेशिया मध्ये मध्ये १९९५ साली पंतप्रधान डॉ. महाथीर मोहम्मद यांनी २०२० साली मलेशिया प्रगत देशांच्या यादीत असेल हा विचार लोकांच्या मनात रुजवला, त्यादृष्टीने कार्यक्रम राबविले. म्हणजे जवळपास २५ वर्षांची व्हीजन! मलेशिया आणि भारत यांनी एकाच वेळेस म्हणजे १९९० च्या सुमारास खुली अर्थव्यवस्था स्वीकारली. मलेशिया हा पण भारताप्रमाणे विविधतेने नटलेला देश आहे. १९९० साली भारत आणि मलेशिया दोन्ही देशात समान परिस्थिती होती. पण आज मलेशिया ने केलेली प्रगती पाहून आपल्याला थक्क व्हायला होते. आरोग्य सेवा, शिक्षण, उद्योग, पायाभूत सुविधा यांबाबत मलेशिया २००५ मध्येच युरोपच्या पातळीवर येऊन पोचला.

'प्रगत देश आणि गरीब देश यांच्यात आढळणारा मुलभूत फरक म्हणजे-', वासलेकर लिहितात, 'सिंहासन'! सिंगापूरच्या प्रगतीचे शिल्पकार ली कुआन यू यांना एका परिषदेत एका अफ्रिकन नेत्याने प्रश्न विचारला, "आमचे देश खूप मगासलेले आहेत. पण अशीच अवस्था २०-२५ वर्षांपूर्वी सिंगापूरची पण होती, हे आजची परिस्थिती पाहून खरे वाटणार नाही. सिंगापूर ने ही प्रगती कशी केली? आम्ही तुमच्याकडून काय शिकू शकतो? यावर ली म्हणाले, "राष्ट्र छोटे असो वा मोठे, एकवंशीय असो वा विविधधर्मी, सागरकिनारी असो वा पर्वताच्या कुशीत- जगातल्या सर्व राष्ट्रांची प्रगती व तेथील लोकांचे भवितव्य एका गोष्टीवर अवलंबून असते, ती म्हणजे सिंहासन! सिंहासनावर बसणा-यावर तुमचा अंकुश आहे का? सिंहासनाला पाय-या आहेत का? आमच्या ईथे उच्च्पदावरील नियुक्ती किंवा निवड होण्यासाठी क्षमता, पात्रता ठरवणारे अनेक निकष आहेत. केवळ लोकप्रियतेच्या आधारावर तुम्ही पंतप्रधान होऊ शकत नाही. त्यासाठी तुमची योग्यता हवी. केंद्रीय मंत्रिमंडळात येण्यासाठी पुरेसा अनुभव व क्षमता असायला हवी." पण आज भारतात काय चित्र दिसते हे वेगळे सांगायची गरज नाही. काही आठवड्यांपूर्वी श्रीरामपुर येथे बंटी नावाच्या एका गुन्हेगाराला अटक केली गेली. या बंटीवर पकिस्तानला ईतर गुन्ह्यांबरोबरच काही महत्त्वाची कागदपत्रं पुरविल्याचा आरोप होता. पण मला पेपर मध्ये हे वाचून आश्चर्य वाटले की या बंटीची आई तिथली राष्ट्रवादी च्या तिकिटावर निवडून आली होती. तीच गोष्ट पिंपरी-चिंचवड, भोसरी परिसरात मागच्या काही महिन्यात झालेल्या गुन्हेगारी हल्ल्यांची. कुठल्यातरी पक्षाच्या नगरसेवकावर खुनी हल्ला होतो म्हणून बातमी येते. पण ज्याच्यावर हल्ला झाला त्याच्यावरही खून, खुनाचा प्रयत्न, संघटीत गुन्हेगारी यासारखे गंभीर गुन्हे दाखल असतात. आणि हे लोक आपल्यावर राज्य करत आहेत. कसा होणार सर्वसमावेशक विकास? कोण राबवणार योजना? आणि याला माझ्यासारखे लोकही जबाबदार आहेतच की. मला यांना जाब विचारता येऊ शकतो. पण मी काहिच करत नाही. वासलेकर नेमके समाजाच्या याच नाकर्तेपणावर बोट ठेवतात. पाण्याचा बर्फ होताना आधी एक रेणू घन होतो, मग त्याच्या शेजारचा आणि असं करत करत सगळ्या पाण्याच बर्फ होतो. सुरुवात एका नागरीका पासून व्हायला हवी. आपण लोकप्रतिनिधींना वॉर्डात केलील्या किंवा न केलेल्या कामांबाबत जाब विचारायला हवा. आणि ते निश्चितच अवघड नाही. देशाची प्रगती होण्यासाठी देशाच्या नागरीकांमध्ये 'हा देश माझा आहे' ही भावना फार खोलवर रुजायला हवी. नुसते क्रिकेट आणि संगीत या बाबतीत नव्हे तर एकंदर राष्ट्राच्या जडणघडणी बाबत.

मिपाकरांनो, ज्यांनी हे पुस्तक अजुन वाचले नसेल त्यांनी जरूर वाचा. पुस्तकाची यथार्थ ओळख करून देण्यासाठी माझ्या लिखाणाची मर्यादा आहे. पण जर तुम्हाला जागतिक राजकारण कसे चालते, एका समृध्द समाजाची निर्मिती होण्यासाठी काय आवश्यक असते, भारतापुढे सध्या कोणत्या समस्या आ वासून ऊभ्या आहेत, ईतर काही देशांनी या समस्यांचा यशस्वीपणे मुकाबला कसा केला आणि आपली एक भारतीय नागरीक म्हणून या देशाच्या विकासप्रक्रियेत काय भूमिका हवी हे जाणून घ्यायची ईच्छा असेल तर हे पुस्तक चुकवू नका.

पुस्तकाचे नावः एका दिशेचा शोध
लेखकः संदीप वासलेकर
प्रकाशनः राजहंस प्रकाशन

साहित्यिकमाहिती

प्रतिक्रिया

स्पंदना's picture

10 Feb 2013 - 6:44 pm | स्पंदना

सुरेख ओळख! पुस्तकाची अन एका व्यक्तीमत्वाचीही.

धन्यवाद चाणक्य!

मुक्त विहारि's picture

10 Feb 2013 - 6:49 pm | मुक्त विहारि

जरूर वाचा..

आणि

लेखक पण तसाच मस्त माणूस आहे. निगर्वी आणि पाय जमिनीवर असणारा..

नक्की घेईन हे पुस्तक. पुस्तक ओळखीबद्दल धन्यवाद.

सुजित पवार's picture

11 Feb 2013 - 12:17 am | सुजित पवार

मागच्या वर्शिच वाचलेल...खुपच मस्त पुस्तक आहे

फारएन्ड's picture

11 Feb 2013 - 6:42 am | फारएन्ड

वाचायला हवे पुस्तक. चांगली ओळख आहे.

खरे सांगायचे तर गेल्या एक-दीड वर्षांत संदीप वासलेकर हे नाव अचानक ऐकू येउ लागले आणि मला ते सुरूवातीला त्या पूर्वी ऐकलेल्या दिनूच्या विनोदासारखे वाटले (ज्यात तो दिनू क्लेम करतो की जगातील सर्व महत्त्वाचे लोक त्याला ओळखतात - आणि त्याच्या मित्रांचा सुरूवातीला विश्वास बसत नाही, पण शेवटी अगदी पी व्ही नरसिंहराव, क्लिंटन व पोप सगळेच त्याला ओळखत असतात असे निष्पन्न होते) व अचानक कोणीतरी या व्यक्तीचे मार्केटिंग चालू केले आहे असे वाटले होते. पण जशी आणखी माहिती मिळते आहे तसे हे ऑथेंटिक आहे असे जाणवत गेले. आता आणखी माहिती करून घ्यायची उत्सुकता आहे.

लाल टोपी's picture

11 Feb 2013 - 11:39 am | लाल टोपी

मलेशिया बाबतचे विचार पटले. प्रत्यक्ष तीन वर्षांहून अधिक काळ तेथे राहण्याची संधी मिळाली खरोखरच आपल्या नंतर १० वर्षांनी स्वातंत्र्य मिळालेला हा देश कितीतरी प्रगत झाला आहे तो त्यांच्या दुरदर्शी नेत्यांमुळेच!

धन्या's picture

11 Feb 2013 - 3:46 pm | धन्या

संदिप वासलेकरांचा प्रवासही थक्क करणारा आहे.

पण अशीच कुठेतरी वाचलेली आणि मला पटणारी थियरी टाईपतो:

बाजारात ढीगाने उपलब्ध असणारी करोडपती/अब्जाधीश कसे व्हावे, एकवीस दिंवसात जग कसे बदलावे अशा नावांची पुस्तके किंवा आपापल्या क्षेत्रात विविध अडचणींवर मात करुन नांव कमावलेली थोरामोठयांची चरीत्रे वाचून तसंच यश आपल्यालाही मिळवता येईल, तसेच बदल आपल्यालालाही घडवता येतील हा मात्र भाबडा आशावाद झाला.

कारण यशासाठी धडपडत असताना किंवा एखादा जग ढवळून काढणारा बदल घडवताना, प्रत्येकाला सामोरं जावी लागणारी परिस्थिती वेगवेगळी असते, प्रत्येकाचा पिंड वेगळा असतो, समस्यांना सामोरं जाण्याची प्रत्येकाची क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे बरेच वेळा अशी पुस्तकं वाचून "आपणही काहीतरी केलं पाहिजे" अशी "हाय" फील करणारी भावना नक्कीच प्रत्येकाच्या मनात येते. परंतू प्रत्यक्षात कितीजण ती भावना कृतीत उतरवत असतील हा संशोधनाचा विषय ठरेल.

बरेचसे लेखक पुस्तकाच्या प्रस्तावनेत "माझं पुस्तक वाचून एकातरी वाचकाला अमुक तमुक करावंसं वाटलं... " अशा टाईपची वाक्ये टाकतात ते याचमुळे. त्यांनाही जाणीव असतेच की आपलं लेखन वाचक केवळ बौद्धिक खाज भागवण्यासाठी वाचतात. ते प्रत्यक्ष कृतीत आणणारा विरळाच.

यसवायजी's picture

11 Feb 2013 - 3:55 pm | यसवायजी

अशा पुस्तकांमधुन प्रेरणा घेउन १% लोकांना जरी फायदा झाला, तरी ते ही नसे थोडके.

धन्या's picture

11 Feb 2013 - 4:36 pm | धन्या

तरीही हा विषय "जर - तर " प्रकारात येतो. अशी पुस्तकापासून (स्वयं मदत - सेल्फ हेल्प बुक्स वगळता) प्रेरणा घेऊन काहीतरी केलेलं उदाहरण माझ्यातरी वाचनात नाही.

अच्युत गोडबोलेंनी आपल्या "मनात" या आत्मचरीत्रात चक्क त्यांच्या "बोर्डरुम" पुस्तकापासून प्रेरणा घेऊन दोन तीन जणांनी बेकार असतानाही स्वत:चे युनिटस सुरु केले असं म्हटलं आहे. अर्थात हे ईतकंच. गोडबोले सरांनी डीटेल्स गुलदस्त्यात ठेवलेत.

सस्नेह's picture

11 Feb 2013 - 4:30 pm | सस्नेह

संदीप वासलेकर यांचा परिचय थक्क करणारा आहे. त्यांच्याबद्दल आणखी जाणून घ्यायला आवडेल.

सध्याच्या वेगाने आपण जात राहिलो तर यातले फक्त ५ कोटी युवक हे पदवीधर असतील. उरलेल्या ५५ कोटींपैकी १५ कोटी शालांत परिक्षा उत्तीर्ण झालेले युवक असतील. ४० कोटी कामगार हे शिक्षण अपूर्ण राहिलेले असतील.

हे मात्र काहीसे संदिग्ध वाटते. या आकडेवारीला काही आधार आहे का ? कारण आज निदान महाराष्ट्रात तरी पदवीधरांचे कारखाने मोठ्या प्रमाणावर सुरु आहे, हे सध्याच्या वाढत्या व्यावसायिक संधीच्या गरजेवरून दिसून येते.

@ धन्या

सेल्फ-हेल्प बद्दल तुमचं म्हणणं कदाचित खरं असेलही. पण हे पुस्तक सेल्फ-हेल्प प्रकारातलं नाही. वासलेकरांचं चरित्रं किंवा त्यांच्या वाटचालीबद्दलही नाही. पुस्तक वाचायचं की नाही, वाचून बौद्धिक खाज भागवायची कि काही सकारत्मक करायचं हे सगळे व्यक्तिगत प्रश्न आहेत. तुम्ही पुस्तक वाचलेलं दिसतंय. वासलेकरांनी अमुक एकच करा असं काही म्हटलं नाहिये पुस्तकात. त्यांच्या कामामुळे त्यांना जागतिक स्तरावरील विविध नेत्यांना, नुसत्या नेत्यांना नाही तर त्यांच्या त्यांच्या देशांत लक्षणीय बदल घडविणा-या नेत्यांना भेटण्याची संधी मिळाली, त्यांच्या कडून काही गोष्टी शिकायला मिळाल्या, त्यांच्या देशांतील समाजरचना, राजकारणातील बेस्ट प्रॅक्टीसेस जवळून बघता आल्या. या सर्व गोष्टी त्यांनी भारताच्या संदर्भात मांडल्या आहेत. त्यांनी रेडिमेड म्हणता येतील अशी उत्तरं दिली नाहियेत आणि तशी मला वाटतं आपण अपेक्षाही करू नये. त्यामुळे एका विचारवंताची मतं म्हणूनही हे पुस्तक वाचायला हरकत नसावी. अर्थात हे माझं वैयक्तिक मत झालं.

@ स्नेहांकिता
आकडेवारीला पुस्तकात तरी काही आधार दिलेला नाहिये. पण शिक्षण खाते ही माहिती प्रकाशित करत असणार. महाराष्ट्रात पदवीधरांचे कारखाने चालू आहेत पण प्राथमिक शाळेतून होणा-या गळतीचे प्रमाणही लक्षणीय आहे. मला काही माहिती मिळाली तर मी जरूर सांगेन.

बाकी प्रतिसादाबद्दल तुम्हा दोघांचे आणि ईतरांचेही आभार

दादा कोंडके's picture

11 Feb 2013 - 5:52 pm | दादा कोंडके

मी हे पुस्तक 'टू रीड' च्या यादीत टाकलय. मला वाटत आधी तुम्हीच कुठेतरी याचं परिक्षण टाकलं होतं.

ता.क.: पुस्तकाची किंमत काय आहे हो?

मी मि.पा. शिवाय कुठल्याही संस्थळावर नाहिये. आणि ईथेही पहिल्यांदाच लिहिलंय या पुस्तकाबद्दल. तुम्ही दुस-या कुणीतरी लिहिलेलं परिक्षण वाचलं असेल.