अक्षय कविता

यशोधरा's picture
यशोधरा in जनातलं, मनातलं
8 Feb 2013 - 8:40 pm

तुला कसे कळत नाही?
फुलत्या वेलीस वय नाही!
क्षितिज ज्याचे थांबले नाही,
त्याला कसलेच भय नाही,
त्याला कसलाच क्षय नाही....

असाच काहीसा अक्षय जिवंतपणाचा स्पर्श लाभलेली बोरकरांची लख्ख आरस्पानी कविता. लयीत उलगडणारी आणि शब्दचित्रांचा उत्कट अनुभव वाचकांसमोर अलगद आणून ठेवणारी, अशी. कवितेची जातकुळीच अर्थगर्भित. चित्रवाही शब्दकळेचे लेणे ल्यालेली. आयुष्यातल्या प्रत्येक अनुभवाला तितक्याच समरसतेने आपलंसं करुन, अनुभवून आपल्या अवधूती मस्तीत धुंद होताना, त्या अनुभवांचा मुक्त उद्घोष करणारी, शुद्ध अभिजात अशी ही कविता. आत्मनिष्ठ. बोरकरांनीच म्हटल्याप्रमाणे, त्यांनी कधी कविता केल्या नाहीत, बोरकरांना कविता झाल्या. त्यांचे शब्दही शब्दवतीचा साज धारण करुन आलेले आणि चराचराच्या रंगागंधांमध्ये न्हाऊन निघालेले. भोवतालच्या सृष्टीला हाक घालणारे, पण ती कशी? नुसतीच नव्हे, तर नादवेडात रंगून आणि गंधाटून!

मी रंगवतीचा भुलवा
मी गंधवतीचा फुलवा
मी शब्दवतीचा झुलवा
तुज बाहतसे....

असं म्हणत. रंगांची भुलावणी शब्दांच्या फुलोर्‍यात पेरुन, त्यांचे झुलवे गात मारलेली हाक. कवींचा मूळ पिंडच सौंदर्योपासकाचा. हिरवळ आणिक पाणी, तेथे स्फुरती मजला गाणी अशी भाववेडी अवस्था. इतर कोणत्याही ओळखीपेक्षा, पोएट बोरकर हीच त्यांची स्वतःशीही असलेली खरी ओळख. मनातून आणि शब्दांतून ओसंडत असलेले कवीवृत्तीचे इमान. "मी प्रतिभावंत आहेच, पण प्रज्ञावंतही आहे" हे सांगण्याची आणि ओळखण्याची शक्ती. जोपासलेला निगर्वी अभिमान. स्वतः सरस्वतीपुत्र असल्याची सतत जागती जाणीव. कवितांविषयी बोरकरांची धारणा मुळातूनच वाचण्यासारखी आहे. बोरकरांच्या मते काव्य ही आध्यात्मिक साधना.

"लौकिक जीवनात राहणार्‍या कवीला जेव्हा अलौकिकाची जाणीव प्राप्त होते, तेह्वा तो केवळ कवी रहात नाही, पण संतही होतो. आपल्या देशात तरी वारंवार असे घडत आले आहे. कवी जगात इतर ठिकाणीही झाले आहेत, पण त्यातले संत झाले, असे फारच थोडे. असे का व्हावे? मला वाटते, हा फरक काव्याकडे पाहण्याच्या दृष्टीमुळे पडतो. काव्य ही एक अध्यात्मिक साधना आहे. आत्मविद्येचा हा एक आगळा आणि लोभसवाणा अविष्कार आहे. लय, योगाची ही एक हृदयंगम कला आहे, असे ज्यांनी मनापासून मानले आणि या साधनेची वाट जे शोधीत, चोखाळीत राहिले, ते संत झाले आणि ज्यांनी काव्य, कला हा एक शौक किंवा छंद मानला ते कवीच राहिले किंवा कवी म्हणून देखील फार लवकर संपले, असे आढळून येईल..."

कवितेची चाहूल घेता घेता लौकिकातून अलौकिकाच्या जगात मुशाफिरी करणारं कवीमन, आणि अशा ह्या कवीची आयुष्याकडे पाहताना, ते अनुभवताना आणि चराचराला न्याहाळताना, सहजरीत्या त्यातल्या सौंदर्यठश्यांचा वेध घेत, त्यांचे सौंदर्यसुभग तराणे बनवत, नाद, सूर, लय आणि शब्द ह्यांना सांगाती घेऊन जन्माला आलेली, चिरंतनाचे गाणे बनून गेलेली अशी कविता.

छंद माझा दिवाणा,
नकळत मन्मुखी सुंदरतेचा तरळे तरल तराणा..
स्वसुखास्तव जरी गुणगुणतो मी
हर्ष कणकणी उधळी स्वामी
प्रकाश पाहूनी अंतर्यामी
सोडवी गहन उखाणा....

ह्या कवितेला आतूनच जीवनाची ओढ आहे. सुख, दु:ख, एखादा निरव नि:स्तब्धतेचा वा सुखावणारा समाधानाचा क्षण, ह्या सार्‍याला ही कविता शब्दाशब्दांने आपलं म्हणते, आतल्या खुणा उकलू पाहते आणि ज्ञानियाच्या अमृत ओवींच्या संगतीने मनातलं द्वैत उजळत, स्नेहभावाने सामोरी येते.

गोव्याच्या भूमीचं सौंदर्य आणि हिरवा निसर्ग, तिथल्या मातीचा गंध, समुद्राची गाज, पोफळी, माडांच्या झावळ्यांची सळसळ... गोव्याच्या भूमीचं सारं सारं ताजेपण बोरकरांच्या कवितेतून उमलून येतं आणि मग तिथल्या नारळाची चव मधाची होते आणि दर्‍यां कपार्‍यांतून नाचत, खळाळत उतरणारं पाणीही दुधासारखं भासतं. जगाला आपल्या सौम्य रुपाने आल्हाद देणार्‍या चांदण्याला माहेरी आल्याचं समाधान इथेच मिळतं, आणि अबोल, शालीन अशा चाफ्याच्या साक्षीने निळ्या नभाशी समुद्र गळाभेठी इथेच करतो. गोव्याच्या निसर्गाची घडोघडी दिसणारी वेगवेगळी रुपं, बोरकरांच्या कवितेत वेगवेगळ्या भावनांना चित्ररुप देतात... ही कविता, मराठी सारस्वताचे, लावण्यमयी लेणे आहे. संतवाङमयासारखी प्रासादिकता, संस्कारक्षम मनाची शुचिता त्या कवितेत आहे हे खरेच. पण, म्हणून त्या कवितेला विमुक्त मनाच्या रसरंगाचे वावडे नाही, उलट, तिला तर सौंदर्याची, जीवननिष्ठेची अनादि, अनंत अशी धुंद भुरळ पडलेली!

मनाच्या गाभ्यात उत्कट आनंदाचा आणि चैतन्याचा लामणदिवा सतत तेवता! गाढ सुखांनी भरुन येणारी आणि मुक्तपणे आपल्या भावना व्यक्त करणारी ही कविता. ती प्रीती व्यक्त करताना तरी संकोच का बाळगेल? आणि प्रीतीतून उमलणार्‍या रतीचे आदिम आकर्षण नाकारण्याचा करंटेपणा तरी का करेल? प्रीती आणि रती तितक्याच ताकदीने, तरलतेने आणि संवेदनक्षमतेने उलगडत नेणारी, आणि इंद्रियानुभवांमध्ये समरसणारी ही कविता. तिने अनुभवलेल्या इंद्रदिनांचा प्रभाव तिच्या मनपटलावरुन पुसून जायलाच तयार नाही!

इंद्रदिनांचा असर सरेना
विसरु म्हटल्या विसरेना
चंद्रमदिर जरी सरल्या घडी त्या
स्वप्नांची लय उतरेना...

जीवनाबद्दलची आसक्ती, ऐहिकाबद्दलचे प्रेम व्यक्त करताना संकोच कसला? ह्या कवितेला रतीभावना प्रिय आहे आणि प्रीतीभावना हा तर तिचा प्राण आहे... आणि तरीही, ह्या रती प्रीतीत गुरफटून जात असतानाही, जीवनाच्या क्षणभंगुरतेची जाणीवही सुटलेली नाही. तेही शाश्वत बनवायचे आहे, तेही ह्या रती प्रीतीच्या साक्षीनेच!

क्षणभंगूर जरी जीवन सखे
सुखसुंदर करु आपण
सखे गऽ शाश्वत करु आपण....

शरीराची असक्ती, शृंगार नि:संकोचरीत्या व्यक्त करताना ही कविता धुंद शब्दकळेने नटते, पण तरीही तिचा कुठे तोल सुटत नाही की कुठे शब्द वाकुडा जात नाही. मनापासून, हृदयातून उमटलेल्या शब्दांमधे नावालादेखील हीण सापडत नाही...

तुझे वीजेचे चांदपाखरु दीपराग गात
रचीत होते शयनमहाली निळी चांदरात..

किंवा,

केळीचे पान पहा उजळ किती, नितळ किती
वाळ्याने भिजलेले उर्वशीचे वस्त्र उडे,पौषातील उन गडे....

हृदयातून उमाळत, उसासत येणार्‍या उत्कट भावना आणि इंद्रियाधिष्ठित संवेदना शब्दांतून अलगद जिवंत करणारी ही प्रत्ययकारी कविता.

हृदय मदाचे मोहळ झाले जडावली दृष्टी
पोहू लागले तुझ्या रेशमी अलकातील मासे
हवा जाहली जड पार्‍यासम अंगातील वासें
आणि तरंगत डुलू लागली नौकेपरी शेज
तो कांतीतूनी तुझ्या झळकले फेनाचे तेज
नखें लाखिया, दांत मोतिया, वैदूर्यी नेत्र
अवयव गमले चपल चिवट की मयवनीचे वेत्र
कात सोडिल्या नागिणीचे ते नवयौवन होतें
विलख्याविळख्यातुनी आलापित ज्वालांची गीतें
गरळ तनूतील गोठूनी झाले अंतरांत गोड
कळले का मज जडते देवां नरकाची ओढ

आणि तरीही केवळ शृंगार भोगात आणि इंद्रियाधिष्ठित अनुभवांच्या आसक्तीत गुंतून राहणारी ही कविता नव्हे. तिची अनुरक्ती केवळ भोगविलासापुरती मर्यादित नाही. त्यापलिकडे जाणार्‍या चिरंतन सहजीवनाची आणि स्निग्ध, समंजस अशा समर्पित नात्याची तिला जाणीव आहे. भान आहे, मोह आणि आकर्षणदेखील आहे.

तुला मला उमगला जिव्हाळा जन्माचा पट फिटला गं,
अन् शब्दांचा प्रपंच सगळा कमळासम हा मिटला गं...

तिच्या अंतरंगात प्रीतीचा अमृतझरा सतत झुळझुळत वाहता आहे..

प्रीत वहावी संथ ध्वनीविण या तटिनीसारखी
नकळत बहरावी या हिरव्या तृणसटिनीसारखी
स्पर्शकुशल झुळुकेसम असूनी कधी न दिसावी कुणा
तिल असावा या घंटेचा सूचक शीतलपणा
तिने फिरावे या खारीसम सहजपणे सावध
ऊनसावलीमधून चुकवीत डोळ्यांची पारध...

तिने अंतरंगातली माया, प्रेम जाणले आहे. शरीराच्या तृष्णेवीण रस कुठला प्रीतीला हे सांगणारी ही कविता, आयुष्याच्या शेवटीही आपले चिरतारुण्य जपते, आपल्या सखीच्या लावण्याला ती चिरवश आहे.. सखीच्याच हाताची सोबत घेऊन ह्या कवितेला गतायुष्याच्या आठवणींत रमायचे आहे. तिच्याबद्दलची कृतज्ञता आणि मनातून ओसंडून जाणारे प्रेम व्यक्त करायचे आहे...

शरदातील ओढ्यासम निर्मल
तुझा नि माझा ओढा
चार तपांनंतरही तू मज
सोळाचीच नवोढा...

सखीचा हात कधी मधेच सोडून द्यावा लागेल की काय किंवा सुटला तर ह्या भावनेने ती हुरहुरते तर खरीच, पण कधीतरी निसर्गनियमाप्रमाणे ताटातूट होणार हे सत्यदेखील ही कविता जाणते. असं असलं तरीसुद्धा आता सखीच्या अस्तित्वाने तिचे भावविश्व अष्टौप्रहर, अंतर्बाह्य असे काही व्यापले गेले आहे, की आता ताटातूट तरी होईलच कशी?

तशी आठवण येत नाही... भेटीचीही काय जरुर?
सूर वाहे ऊर भरुन, घरातदेखील चांदणे टिपूर
इतके दिवस हसतरुसत वाटले सृष्टीत नटली आहेस
आता कळले खोल खोल माझ्याच दृष्टीत मिटली आहेस
अंध होऊन हुलकावण्यांनी अवतीभवती राहिलीस खेळत
आता माझ्यात श्वास होऊन वहात असतेस सहज नकळत
कधी कामात, कधी गाण्यात फुलता फळता भानात नसतो
तुला विसरुन अष्टौप्रहर.... अष्टौप्रहर तुझ्यात असतो...

आणि तरीही, रसरंगात आणि प्रीतीत गुरफटून जाणार्‍या ह्या कवितेने मनात एक गोसावीपणही जपले आहे. अर्थात, जगाला विटून, संसाराचा उद्वेग, उबग येऊन, वैतागून आलेले हे वैराग्य नव्हे. नाही म्हणायला जगाचे अनुभव, बर्‍या वाईटाचे संचितही आता गाठीशी भरपूर जमा झालेत. तिला कधीचे बरेच काही उमजले आहे.. जरी सगळ्यांत अजून ती रमते आहे, तरीही त्यातून दूरही होते आहे.

कळत जाते तसे कशी जवळचीही होतात दूर?
जुने शब्द सुने होउन वाजतात कसे बद्द निसूर?
कळत जाते तसे कशा मूर्ती सार्‍या झिजून जातात
पापण्यांमधले स्नेह थिजून ज्योती कशा विझून जातात?
कळत जाते तसे कशा दूरच्या घंटा ऐकू येतात
दूरचे रंग दूरचे गंध प्राण कसा वेधून घेतात?
कळत जाते तसे का रे एकटा एकटा होतो जीव
राग रोष सरून कशी आपलीच आपणा येते कीव?

हळूहळू सगळ्यांत असूनही नसण्याची मजा तिला उमगली आहे, सगळ्यांत नसूनही असता येते हेही लक्षात आलेय. तिला उमजलेय की आज जे असेल ते उद्या असेलच असे नाही, आयुष्याचं कोडं उलगडेलच असंही नाही. काही अक्षत टिकेल असंही नाही. स्वतःच्याच मनाचा भरवसा देता येत नाही, मग दुसर्‍यांचा कोणी द्यावा?

मन वाहत्या पाण्याचे, पालापाचोळा ठरेना
घोर घावाचीही रेघ चार पळेही टिकेना....

ज्ञात अज्ञाताचा पाठशिवणीचा खेळ आता तिच्या नजरेच्या टप्प्यात आलेला आहे, त्या अफाट पसार्‍याची कळत नकळत पुसटशी जाणीव झालीये आणि आपल्या अट्टाहासांच्या मर्यादाही जाणवल्यात. आपण फक्त मार्गक्रमणाचे अधिकारी हे जाणवून सारं कसं लख्ख समोर आलं आहे...

शीड फिटे वाट मिटे, का धरु सुकाणू
वल्हवाया का उगीच बळ बळेच आणू?
जायचे जिथे तिथेच नेईल नेणारा
ओसरली भरती, ये परतीचा वारा...

तिची काही तक्रार नाही, आता काही मागणी नाही, इच्छा नाही. जे काही आयुष्य पुढ्यात आले, जसे काही दान पदरात पडले त्यात सर्वांतच लावण्याची जत्रा शोधणारी ही कविता. आता तिला अलौकिकाची कळा चढली आहे. ती शेवटचे ऋण व्यक्त करते आहे. अंतर्बाह्य शब्दसौंदर्याने सजून झाल्यावर आता उरले तरी काय?

जे जे भेटे ते ते दर्पणीचे बिंब
तुझे प्रतिबिंब लाडेगोडे
उमलल्या शब्दी नवीन पहाट
पावलांत वाट माहेराची.
अंतर्बाह्य आता आनंदकल्लोळ
श्वासी परिमळ कस्तुरीचा
सुखोत्सवी अशा जीव अनावर
पिंजर्‍याचे दार उघडावे....

कवितालेख

प्रतिक्रिया

शुचि's picture

8 Feb 2013 - 8:50 pm | शुचि

काय अप्रतिम लिहीले आहेस यशोधरा. एकेक शब्द वेचून, पारखून ओवला आहेस.

आणि तरीही केवळ शृंगार भोगात आणि इंद्रियाधिष्ठित अनुभवांच्या आसक्तीत गुंतून राहणारी ही कविता नव्हे. तिची अनुरक्ती केवळ भोगविलासापुरती मर्यादित नाही. त्यापलिकडे जाणार्‍या चिरंतन सहजीवनाची आणि स्निग्ध, समंजस अशा समर्पित नात्याची तिला जाणीव आहे. भान आहे

निव्वळ सुरेख!!

मनाच्या गाभ्यात उत्कट आनंदाचा आणि चैतन्याचा लामणदिवा सतत तेवता! गाढ सुखांनी भरुन येणारी आणि मुक्तपणे आपल्या भावना व्यक्त करणारी ही कविता.

हे वाक्य फोटोफ्रेमच्या महीरपीत लावून ठेवावेसे वाटले. अतिशय उत्कट रसपान.

वा वा! लावण्याची जत्रा काय, चैतन्याचा लामणदिवा काय - कसं सुचतं हे सारं?

शरदातील ओढ्यासम निर्मल
तुझा नि माझा ओढा
चार तपांनंतरही तू मज
सोळाचीच नवोढा...

वाह!!

श्रावण मोडक's picture

8 Feb 2013 - 8:57 pm | श्रावण मोडक

सहमत. लेख इतक्यातच का संपला, असं वाटायला लावणारं लेखन.
वेचेही निखळ देखणे, सौंदर्यानं ओतप्रोत... पण वेच्यांनाच ही विशेषणे काय लावणार म्हणा. बोरकरांची कविता ती. ती उत्तमच आहे, असं म्हणणंही चांगल्या अर्थाने धार्ष्ट्याचं.

रेवती's picture

8 Feb 2013 - 8:55 pm | रेवती

सुरेख लेखन आहे यशो. बोरकरांच्या कविता वाचल्यावरच गप्प बसावे अशी वेळ येते. त्यापुढे जाऊन त्याचे रसग्रहण करतेस म्हणजे मानलच तुला! सुरुवातीस तारूण्यात विहरणार्‍या कवितेला शेवटी समाधानी विरक्ती आलेली दिसली.

सुखोत्सवी अशा जीव अनावर
पिंजर्‍याचे दार उघडावे....

रसग्रहणाची योग्य सांगता.

रसग्रहण वगैरे असे नाही रेवती. तो खूप मोठा शब्द झाला. बोरकरांच्या कवितांचे रसग्रहण काय करावे? रसग्रहण करायला तेवढे उमगायला तर हवे! पण मला त्यांच्या कवितांची भुरळ आहे. काही कवितांची अधिक. :) कविता वाचता, वाचता मनात जे वेळोवेळी उमटत राहिले, ते लिहिले आहे, इतकेच.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

8 Feb 2013 - 9:24 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

दंडवत तुम्हाला, आणि बोरकरांना सांष्टांग!

मन वाहत्या पाण्याचे, पालापाचोळा ठरेना
घोर घावाचीही रेघ चार पळेही टिकेना....

__/\__

उपास's picture

8 Feb 2013 - 10:12 pm | उपास

मस्त लिहिलयस यशोधरा..
बोरकरांच्या कवितांवर सुनिताबाई, पु.लं जो कार्यक्रम करीत त्याची आठवण झाली बघ.. जियो!
बोरकरांच्या कवितेला उलगडण सोप्प काम नाही.. कधी अवखळ, कधी अल्लड, कथी गंभीर, कधी लडीवाळ.. बाजच वेगळा तिचा..

बोरकरांच्या कवितेला उलगडण सोप्प काम नाही >> खरंच. खूपशा कविता सुटूनही गेल्या लिहिताना. बोरकरांच्या कविता हे खंड १ आणि २ माझ्याकडे आहेत आणि कितीदा वाचलं तरीही पुन्हा पुन्हा नवीन वाटणारी अशी त्यांची कविता आहे. दरवेळी एखादी वाक्यरचा, एखादे कडवे, शब्द वाचताना वाटते की अरे! मागच्या वेळी हे नाही सापडले आपल्याला..

पैसा's picture

8 Feb 2013 - 10:29 pm | पैसा

काय लिहिलंस ग सुरेख! बाकीबाब शब्दप्रभू आणि आम्ही त्यांचे भक्त. हे सारे लिहिताना बाब्कीबाबच्या लेखणीचा परीस स्पर्श तुझ्या लेखणीला झाला हे नक्की!

बाकीबाबचं आयुष्य आणि लिखाण म्हणजे

नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी
जिणे गंगौघाचे पाणी

.......

दिव्यत्वाची जेथ प्रचिती
तेथे कर माझे जुळती

या बाकीबाबच्या शब्दात त्यांना दंडवत आणि हे सारं लिहिणार्‍या तुला धन्यवाद!

किसन शिंदे's picture

8 Feb 2013 - 10:39 pm | किसन शिंदे

निव्वळ अप्रतिम!!

_/\_

अतिशयोक्ती म्हणाल कदाचित याला पण बोरकरांच्या अफाट कवितांचं तेवढ्याच ताकदीने केलेलं रसग्रहण आहे हे.

वाचनखूण साठवल्या गेली आहे.

क्रान्ति's picture

8 Feb 2013 - 10:47 pm | क्रान्ति

काव्याचं तितकंच उत्कट विवेचन! गुंतून जावं, गुंगून जावं असं लिहिलं आहे अगदी!

अग्निकोल्हा's picture

8 Feb 2013 - 11:01 pm | अग्निकोल्हा

नोवर्ड्स!

अत्रुप्त आत्मा's picture

9 Feb 2013 - 7:42 am | अत्रुप्त आत्मा

सलाम __/\__

सलाम __/\__

सलाम __/\__

श्रिया's picture

9 Feb 2013 - 8:52 am | श्रिया

वाह! अप्रतिम लिहिले आहे तुम्ही.

अक्षया's picture

9 Feb 2013 - 9:38 am | अक्षया

अप्रतिम लेखन!!

कवितेचे शब्द,अर्थ,लेखन याचा त्रिवेणी संगम..

सर्वांचे मनापासून धन्यवाद.

नाना चेंगट's picture

9 Feb 2013 - 1:15 pm | नाना चेंगट

मस्त आवडले लेखन.

अभ्या..'s picture

9 Feb 2013 - 1:21 pm | अभ्या..

अत्यंत सुरेख रसग्रहण यशोतै.
खूप आवडले.

पुष्करिणी's picture

9 Feb 2013 - 2:37 pm | पुष्करिणी

अतिशय सुंदर यशो, फार आवडलं

यशोधरा's picture

9 Feb 2013 - 2:42 pm | यशोधरा

तू आहेस कुठे गं?

तुझ्याकडे कवितांचा अक्षय्य खजिनाच आहे..
लिहित रहा .
सुंदर लेख

मितान's picture

10 Feb 2013 - 10:33 pm | मितान

किती गं सुंदर !
एवढे दिवस वाचनमात्र होते. तू या लेखनाने लॉगइन व्हायला भाग पाडलेस :)

अजून लिही.

खूपच दिवसांनी पाहिले तुला मितान :)

jaypal's picture

10 Feb 2013 - 10:39 pm | jaypal

तु असच लिहित रहाव आणि आम्ही असच वाचत............एकदम आवडेश

महाबळ's picture

11 Feb 2013 - 2:56 am | महाबळ

खुपंच छान लिहीलय. तुम्ही हे नुकतंच लिहीलय का? पुर्वी कुठेतरी वाचल्यासारखं वाटतंय.

अर्धवट लिहिले होते आधी, इथे पूर्ण करुन प्रकाशित केले आहे.

कवितानागेश's picture

12 Feb 2013 - 8:16 am | कवितानागेश

आहा! :)

स्वाती दिनेश's picture

24 Mar 2013 - 5:09 pm | स्वाती दिनेश

किती तरलतेने लिहिले आहेस ग,
हे कसे काय माझ्या नजरेतून सुटले?
स्वाती

इन्दुसुता's picture

24 Mar 2013 - 9:07 pm | इन्दुसुता

अहाहा !!
हे या आधी कसं काय सुटलं बुवा नजरेतून ?
मनापासून आवडलं लेखन.. खरी मनापासून दाद द्यावीशी वाटावी असं लेखन्...परत परत वाचून आस्वाद घेण्यासारखं !

यशोधरा's picture

25 Mar 2013 - 12:22 pm | यशोधरा

सर्वांचे मनापासून आभार.

वैशाली हसमनीस's picture

25 Mar 2013 - 12:59 pm | वैशाली हसमनीस

आभार आम्ही तुमचे मानले पाहिजेत इतके सुन्दर रसग्रहण केल्याबदल. महाविद्यालयीन दिवस आठ्वले.

राही's picture

25 Mar 2013 - 5:49 pm | राही

बोरकरांची कविता म्हणजे मर्मबंधातली ठेव. आपले 'कवीपण'त्यांनी अभिमानाने मिरवले. हे 'बाकीबाब किंवा बा.भ. बोरकर' अशी त्यांची ओळख करून दिलेली त्यांना रुचत नसे. 'पोएट बोरकर' अशी आणखी एक ओळख ते स्वतः करून देत.
जपानी रमलातील रात्र ऐकवताना डोले किलकिले झालेले, पण नजर कुठेतरी अनंतात स्थिर झालेली अशी त्यांची प्रतिमा अजूनही डोळ्यांसमोर आहे.सरीवर सरी म्हणताना त्यांचे पंजे आणि बोटे थरथरू लागत आणि प्रत्यक्ष सरी कोसळताहेत असे वाटे. त्यांच्या कवितेतला शृंगार हा नर्म किंवा सूचक-संदिग्ध असा नाही,पण तरीही तो उत्तान वाटत नाही. एकीकडे तनमनाने तो भोगताना ते ती उत्कटता पिऊन घेताहेत पण त्याच वेळी अभोगी वृत्तीने,दूरस्थपणाने त्याचे अवलोकनही करताहेत अशी दृश्य-द्रष्टा-दृष्टी एकच झाल्याची त्रिपुटी अवस्था त्यांच्या कवितेतून जाणवते. 'तेन त्यक्तेन भुञ्जीथा:' हे ईशावास्यातील वाक्य ते जणू प्रत्यक्ष जगले, भरभरून जगण्यातल्या आनंदाच्या मस्तीत ते सदैव राहिले. झिणि झिणी बाजे बीन ही आणखी एक माझी आवडती कविता. येणारच नेणारा जाणारच होडी, भरतीला जोर भरे वेळ उरे थोडी ही त्यांची कविता प्रथम एका दिवाळी अंकात(बहुधा मौज किंवा दीपावली) वाचली होती पण नंतर कवितासंग्रहात आलेली दिसली नाही. ओसरली भरती, ये परतीचा वारा ही कविता या कवितेशी खूपच साम्य दाखवते.
एक किस्सा सांगितल्याशिवाय रहावत नाही. एकदा एका ग्रूहस्थांचा फोन आला. 'काठोकाठ भरू द्या प्याला, फेस भराभर उसळू द्या' ही कविता बोरकरांचीच अशी पैज त्यांनी मित्राबरोबर लावली होती आणि रेडी रेफरन्स म्हणून फोन केला होता. मी म्हटले, अहो, ही कविता तुम्हाला बोरकरांची वाटलीच कशी? तर म्हणे,काठोकाठ भरलेला प्याला,उसळता फेस हे वर्णन गोव्याबिव्यातल्या 'तसल्या' माणसाशिवाय दुसर्‍या कोणाला सुचणार!
रसग्रहण आवडले हे वेगळे सांगायला नकोच.

हे वर्णन गोव्याबिव्यातल्या 'तसल्या' माणसाशिवाय दुसर्‍या कोणाला सुचणार!

'तसला' माणूस? म्हणजे कसला?
बोरकरांसारखा 'तसला' असायला भाग्य लागतं. ते तुमच्या ओळखीच्यांना समजलं नाही म्हणून त्यांची आणि तुम्ही सांगू शकला नाहीत म्हणून तुमचीही कीव वाटली. हा शेवटचा किस्सा मुद्दाम खोडसाळपणा म्हणून लिहिला असेल तर आ व रा कृपया.

राही's picture

25 Mar 2013 - 6:40 pm | राही

फोनवरचे पुढले सगळे स्पष्टीकरण आणि संभाषण इथे लिहायची गरज वाटली नाही. उद्गारचिह्नामुळे उपरोध पुरेसा स्पष्ट होतोय असे वाटले. त्यांनी असली मुक्ताफळे उधळली म्हणून ते उद्गारचिह्न होते. माझी कीव करण्याचे काय कारण? उल्ट माझा प्रतिसाद बहुधा आपल्याला समजला नसावा असे वाटून आता आपलीच कीव येते. अरेरे!

फोनवरचे पुढले सगळे स्पष्टीकरण आणि संभाषण इथे लिहायची गरज वाटली नाही. >> :) असो. यापुढे एकूणातच तुमच्याकडे दुर्ल़क्ष करेन.

आजानुकर्ण's picture

25 Mar 2013 - 6:50 pm | आजानुकर्ण

dilbert

ह्ये यास फ्यास हुश्शारगिरी जमत न्हाई वो मस्नी. माफीच करा, काय?

आजानुकर्ण's picture

25 Mar 2013 - 6:45 pm | आजानुकर्ण

माझी कीव करण्याचे काय कारण

:) कीव करणे हा इथला वाक्प्रचार जास्त गांभीर्याने घेऊ नये. हौ आर यू प्रमाणे इथे 'तुमची कीव करतो' असे इथे म्हटले जाते असे वाटते. आपल्याविषयी कीव करणारे इतके लोक इथे आहेत हे पाहून मला कधीकधी भरून येते.

हे म्हणजे मान न मान झाले की! :)
अर्थात, त्यानिमित्ताने आपल्यासारखे जुने महारथी ह्या धाग्यावर बोटधूळ झाडू आले, हे काय कमी! सहसा मी कोणालाच कीव आली वगैरे म्हणत नाही, पण बाभंसारख्या व्यक्तीसंदर्भात असे लिहिलेले फारसे रुचले नाही, त्यासाठी गांभीर्यानेच म्हटले आहे.

आजानुकर्ण's picture

25 Mar 2013 - 7:03 pm | आजानुकर्ण

हो पण इथे 'असे' काही लिहिलेच नव्हते. त्यामुळे जर मतप्रदर्शन फार तीव्र असल्यास काय लिहिले आहे हे समजूनच ते करावे असे वाटते. 'माझ्या गोव्याच्या भूमीत' वगळता बोरकर यांचे फारसे काव्य (नंबर ऑफ लाईन्स) मी वाचलेले नाही. याउलट राही यांचे लेखन मी बरेच जास्त (नंबर ऑफ लाईन्स) वाचले आहे त्यावरुन त्या अशी 'पिंक' मारणार नाहीत असे वाटते. त्यामुळे राही यांसारख्या व्यक्तीसंदर्भात 'कीव करणे वगैरे' लिहिलेले मला फारसे रुचले नाही त्यामुळे असा प्रतिसाद द्यावासा वाटला. तुम्ही सहसा कोणाची कीव करत नसलात तरी इथे अनेक सदस्य एकमेकांची कीव करताना दिसले आहेत. माझीही कीव अनेकांनी केली आहे त्याला मी फारसे महत्व दिलेले नाही.

बॅटमॅन's picture

25 Mar 2013 - 7:08 pm | बॅटमॅन

आजानुकर्णांशी सहमत.

तरी इथे अनेक सदस्य एकमेकांची कीव करताना दिसले आहेत. माझीही कीव अनेकांनी केली आहे त्याला मी फारसे महत्व दिलेले नाही >> एक तर तुम्ही हे जे काय इथे लिहिले आहेत त्याचा माझ्या धाग्याशी काहीही संबंध नाही, तेह्वा वड्याच्या निमित्ताने वांग्यावर तेल ओतू नये, हे तुम्हाला सांगावे लागावे, हे दुर्दैवी पण आश्चर्यजनक नक्कीच नव्हे. तुमची कीव जर अनेकांनी केली असेल तर जरासे अंतर्मुख व्हायला हवे का ह्याचा जरुर विचार करावा.

मी राही ह्यांचे फारसे लिखाण वाचले नाहीये पण बाभ ह्यांच्या कविता मला प्राणप्रिय आहेत त्यामुळे त्यांची अर्धवट, सोयीस्कर आठवण मला फारशीच काय पण अजिबात रुचली नाही, त्यामुळे असा प्रतिसाद द्यावासा वाटला.

आजानुकर्ण's picture

25 Mar 2013 - 7:20 pm | आजानुकर्ण

तुम्हाला जसे बाभ यांचे लिखाण प्राणप्रिय वाटते तसे इतरांना राही यांचे लेखन आवडू शकते. त्यामुळे बाभ यांच्या न केलेल्या अपमानावरुन इतके चिडून तुम्हाला एखाद्या सदस्याची कीव करावीशी वाटत असल्यास, माझ्या काही दिवसांतील अनुभवावरुन एकमेकांची कीव करणे ती या संकेतस्थळाची प्रवृत्ती किंवा नवीन वावराची पद्धत बनत चालली आहे का या शंकेतून मी उपस्थित केलेला मुद्दा नक्कीच धाग्याशी संबंधित आहे.

मिसळपाववरील अनेक सदस्य माझी कीव करतात म्हणून मी त्यांनी कीव करु नये या पद्दधतीचा वागण्यात किंवा लिखाणात बदल करण्यासाठी अंतर्मुख व्हावे हा मुद्दा रोचक आहे.

पैसा's picture

25 Mar 2013 - 7:15 pm | पैसा

गोव्यातल्या लोकांबद्दल कोणी घाऊक "तसले" वगैरे म्हटले तर मलाही राग येतो. पण राही यांनाही गोव्याबद्दल आणि कोंकणीबद्दल आपुलकी आहे असे कधी कधी वाटले आहे. त्यावरून राही यांनी मित्राला योग्य ते समजावले असेल असे मी समजते. राही यांच्या खुलाशानंतर दोघांनीही वाद विसरून जावा अशी दोघांनाही विनंती करते.

इतक्या सुंदर लेखावर राही यांनी आणखी काही माहित नसलेल्या कवितांचे संदर्भ दिल्याबद्दल राही यांनाही धन्यवाद!

यशोधरा's picture

25 Mar 2013 - 7:19 pm | यशोधरा

माझा वैयक्तिक वाद काहीच नाहीये गं पैसाताई.
@ प्यारे १ - एकदम शांतपणेच लिहिले होते. ;)

आजानुकर्ण's picture

25 Mar 2013 - 7:24 pm | आजानुकर्ण

मला मुद्दा समजलेला नाहीये असे वाटते. गोव्यातील लोकांना 'तसले' म्हणजे कसले म्हटले आहे? फेस भराभर उसळू द्या या ओळीचा दूरान्वयेही बोरकरांशी संबंध लावला तर गोव्यातील लोक व त्या अनुषंगाने बोरकर मद्यप्रिय आहेत इतपतच मला अर्थबोध झाला. मद्यप्रियता हा अगदी टॅबू समजावा या स्वरुपाचे बोरकरांनी व्यसनमुक्तीसाठी विशेष प्रयत्न केले होते काय?

पैसा's picture

25 Mar 2013 - 7:45 pm | पैसा

मद्यप्रियता हा अगदी टॅबू समजावा या स्वरुपाचे बोरकरांनी व्यसनमुक्तीसाठी विशेष प्रयत्न केले होते काय?

हे लिहायचे कारण काय आहे? गोव्यातले यच्चयावत सगळे लोक दारुडे आहेत अशी तुमची काही माहिती आहे का? गोव्यात दारू इतर भारतापेक्षा स्वस्त मिळते आणि सहज मिळते. पण त्यातली किती दारू गोव्यातले लोक पितात आणि किती टुरिस्ट पितात याबद्दल काही माहिती तुमच्याकडे असेल तर वाचायला आवडेल. एवढ्या वर्षात मी तरी एकाही गोवेकराला दारू पिऊन रस्त्यात, गटारात लोळताना पाहिलेले नाही. ते कर्म बहुतांश टुरिस्टच करतात. (यावरून गोव्यातला एकही माणूस दारू पीत नाही असा माझ्या म्हणण्याचा अर्थ कृपया काढू नये. गोव्यातही तुमच्यासारखी माणसेच राहतात. सगळेच "असले" नसतात आणि "तसले"ही नसतात.)

आम्हाला चित्रवीणा लिहिणारे आणि "नाही पुण्याची मोजणी" लिहिणारे बोरकर भावतात तसे "फेस भराभर उसळू द्या" म्हणणारे केशवसुत पण तेवढेच आवडतात. या कवितेवरून जर कोणी केशवसुत दारुडे होते असे म्हटले तर आम्ही त्याच्याशीही तेवढ्याच हिरिरीने वाद घालू. पण एवढ्या सुंदर लेखाची चव बिघडवायची नाही म्हणून इथेच थांबते. गोवेकरांना शिव्या देण्यासाठी दुसरा धागा काढलात तरी चालेल.

बाकी चालू द्या.

राही's picture

25 Mar 2013 - 7:45 pm | राही

यशोधराताईंच्या मला काहीश्या आक्रमक वाटलेल्या प्रतिसादामागचे कारण शोधण्याचा प्रयत्न करताना असे जाणवले की त्या माणसाने तोडलेले अकलेचे तारे मला अनाकलनीय, अगदीच बाळबोध आणि सवंग वाटले हे माझ्या प्रतिसादातून (सर्वांना कळेल अशा पद्धतीने) पुरेसे स्पष्ट झालेले नसावे. म्हणून इथे जाहीर करीत आहे की त्या माणसाची मी चांगलीच कानउघाडणी केली आणि बोरकरांविषयी चांगले प्रबोधन केले (आणि पुढे गोव्याविषयी,गोवन लोकांविषयी मला असलेली माहितीही पुरवली)
आता हा प्रतिसाद ठीक जमला असावा अशी आशा आहे. असो.
ता.क. तरीही एक खंत राहिलीच. संपूर्ण प्रतिसादाच्या तीन चतुर्थांश भागात बोरकरांची भरभरून स्तुती केली असतानासुद्धा अशी आक्रमकता का यावी?
धन्यवाद, बॅटमॅन आणि आजानुकर्ण आणि इतरांनाही, ज्यांनी ही भूमिका समजून घेतली असेल.

तुमच्याशी माझा काहीच वैयक्तिक वाद नाही, इतकेच काय तुम्ही कोण हेही मला ठाऊक नाही.

तरीही तुमची स्तुती करण्याची पद्धत मला पाचर मारल्यासारखी वाटली, तेह्वा मी माझे मत सांगितले. एखाद्याचे लिखाण खूप आवडत असले के असे होत असावे. तुमचे लिखाण ज्यांना आवडते, त्यांचेही लगेच प्रतिसाद आले ना? मग तुम्हांला हे समजेलच.

बाकी चालूद्या.

अनन्न्या's picture

26 Mar 2013 - 5:41 pm | अनन्न्या

दोन-तीन वेळा वाचले, त्यामुळे प्रतिसाद द्यायचा राहूनच गेला. यशोधरा अभिनंदन!! होळीच्या शुभेच्छा!!

सत्यजित...'s picture

3 May 2017 - 1:32 am | सत्यजित...

कधी मुक्त फुलांची उधळण तर कधी प्राजक्ताचा धीर-गंभीर शांत तरीही मोहक वाटणारा सडा वाटावा,असे हे रसग्रहण अतिशय आवडून गेले!