गेल्या काही वर्षांपासून भारताचा चेहरामोहराच पार बदलत चाललाय. श्रीमंतीचे बेफाट वारे वाहायला लागलेत. (आता हे वारे कुठून कुठे, आणि कुठल्या भागात कसे वाहतायत हे मी "वेगळं" सांगायला नकोच.) तरी याच श्रीमंतीच्या विश्वातला मैलाचा दगड सध्या मुंबईच्या वरळी भागात उभा राहतोय. त्याचं नाव "पॅलेस रॉयल".
सध्या एका प्रोजेक्टसाठी कान्साई नेरोलॅक च्या हेड ऑफिसला लोअर परेल ला जावं लागतंय. तिकडेच पहिल्यांदा गेल्यावर या पॅलेस महाशयांचं दर्शन झालं. लोअर परेल वरून वरळी नाक्याकडे जाणार्या गणपतराव कदम मार्गावर श्री राम मिलच्या जागेवर सध्या ही वास्तू आकार घेत आहे. पहिल्या दिवशी पाहताक्षणीच या इमारतीची भव्यता डोळ्यांचं पारणं फेडून गेली. तिची उंची पाहताच ही काही तिथल्या इतर चार चौघींसारखी २५-३० माळ्यांची साधीसुधी इमारत नाही याचा अंदाज आला. आणि म्हणून एके दिवशी काम आटपून हापिसातून बाहेर आल्यानंतर मुद्दाम वेळ काढून इमारतीसमोरील फूटपाथवर बराच वेळ घालवून तिच्याकडे याचि देहि, याचि डोळा बघून घेतलं. आणि अस्सल आम आदमीप्रमाणे तिचे मजले मोजायचा कार्यक्रम सुरू केला. पण मोजमाप क्षेत्रातला माझा वावर फारच सामान्य असल्यामुळे अर्थातच पहिल्यांदा त्यात अपयश आलं. पण अपयश ही यशाची पहिली पायरी असते या वाक्यावर नितांत विश्वास ठेऊन मी तो कार्यक्रम सुरूच ठेवला, आणि अखेरीस तिसर्या की चौथ्या खेपेस यश आलंच, आणि सध्या बांधकाम सुरू असलेला मजला हा ७४ वा आहे हे कळलं.
मग हळूहळू नेरोलॅक मधले काही साथीदार आणि विकीपेडियाकडून तिची बाकी माहिती कळली. श्री राम अर्बन ईन्फ्रास्ट्रक्चर्स लि. यांनी या इमारतीचं बांधकाम २००५ साली सुरू केलंय, आणि २०१३ मध्ये ते पूर्णत्वाला जाणं अपेक्षित होतं. (पण सध्या फक्त मजले बांधून झालेत असं दिसतंय.) या इमारतीची उंची ३२० मीटर च्या आसपास असेल असा अंदाज आहे, आणि ते खरं असेल तर पॅलेस रॉयल ही भारतातली पहिली,आणि जगातली १४ वी सर्वात उंच इमारत असेल.
इमारतीमध्ये सुविधा अर्थातच सगळ्या प्रचंड उच्चभ्रू प्रतिच्या असणार आहेत. प्रत्येक मजल्यावर स्वतंत्र पार्किंग, अॅम्फिथिएटर, स्पा, प्रत्येक फ्लॅटधारकाला स्वतंत्र जॅकुझी, एकूण ६ तरणतलाव, मिनी क्रिकेट स्टेडियम, आणि फूटबॉल स्टेडियमसुद्धा असणार आहे. आणि ते पण चक्क ५०व्या मजल्यावर !!
घरांच्या किंमती अर्थात आपण स्व्प्नात पाहणार्या स्वप्नातल्या स्वप्नातसुद्धा परवडणार नाहीत अशा असणार आहेत. (किमान ५५ करोड ते कमाल २५० करोड).
असो, पॅलेस रॉयलमध्ये घर घेणं जरी आपल्याला शक्य नसलं, तरी उंच इमारतींच्या यादीत आता आपल्या भारताचंसुद्धा नाव खूप वरच्या क्रमांकावर येईल याचा अभिमान वाटण्यास काय हरकत आहे?
पॅलेस रॉयल, मुंबई.
फूटपाथवरून काढलेला फोटु.
महालक्ष्मी रेसकोर्सकडून दिसणारा पॅलेस रॉयल.
प्रतिक्रिया
31 Jan 2013 - 10:05 pm | तर्री
रोचक माहिती. लेखन आवडले.
दुसऱ्या फोतोमाधला भगवा जरा केविलवाणा दिसला आणि निराळाच अर्थ सुचवून गेला.
31 Jan 2013 - 10:17 pm | अत्रुप्त आत्मा
31 Jan 2013 - 10:29 pm | रेवती
अरे बापरे! खरच उंच आहे बिल्डींग!
31 Jan 2013 - 10:53 pm | आदूबाळ
काही दिवसांपूर्वी "नागू सयाजीची वाडी" मधून या अवाढव्य प्रकाराचे दर्शन घडले. गिरणगाव एका मोठ्या आर्थिक, सामाजिक स्थित्यंतरातून जात आहे. येत्या ५ वर्षांत आताच अस्तंगत होत असणारे गिरणगाव आणि गिरणगावी मराठी माणूस तिथून नामशेष होईल. कोणी जाणकार मिपाकर गिरणगावात राहिला असेल/रहात असेल तर यावर "पूर्वीचे आणि आताचे" या पद्धतीचा लेख लिहू शकेल का?
अवांतरः
उपरोल्लेखित नागू सयाजीची वाडीमध्ये रहाणार्या मित्राने नवगिरणगावी नवश्रीमंतांच्या दांभिकपणाचा एक किस्सा सांगितला. "आपण कुठे रहाता?" या प्रश्नाला नवगिरणगावी लोक "अप्पर वरळी" असं उत्तर देतात! कारण लालबाग, परळ असल्या नावांना 'लो क्लास' वास येतो म्हणे!
1 Feb 2013 - 12:35 pm | अनुराधा१९८०
उपरोल्लेखित नागू सयाजीची वाडीमध्ये रहाणार्या मित्राने नवगिरणगावी नवश्रीमंतांच्या दांभिकपणाचा एक किस्सा सांगितला. "आपण कुठे रहाता?" या प्रश्नाला नवगिरणगावी लोक "अप्पर वरळी" असं उत्तर देतात! कारण लालबाग, परळ असल्या नावांना 'लो क्लास' वास येतो म्हणे!>> ह्यात दांभीकपणा तो काय? हल्ली एकजात श्रीमंतांना नावे ठेवायची सवय लागली आहे मध्यमवर्गीयांना. पण ह्या सगळ्यांना स्वता: मध्यमवर्ग सोडुन कधी श्रीमंत होतोय याचे वेध लागले असतात.
1 Feb 2013 - 12:51 pm | सूड
>>ह्यात दांभीकपणा तो काय? हल्ली एकजात श्रीमंतांना नावे ठेवायची सवय लागली आहे मध्यमवर्गीयांना. पण ह्या सगळ्यांना स्वता: मध्यमवर्ग सोडुन कधी श्रीमंत होतोय याचे वेध लागले असतात.
श्रीमंतांना नावं ठेवायची नाहीत हो!! नंतर मग हेच सो कॉल्ड श्रीमंत लोक मराठी नावं हद्दपार झाली म्हणून गळे काढत फिरत असतात.
1 Feb 2013 - 7:46 pm | आदूबाळ
अनुराधाताई, काहीतरी गडबड होते आहे का?
विरोध श्रीमंतांना नाही. दांभिकपणाला आहे.
1 Feb 2013 - 9:47 pm | अनुराधा१९८०
दांभिकपणा कुठे आहे असेच मी विचारले होते?
सेनापती बापट रोडला ( वडारवाडीच्या शेजारी ) किंवा डायस प्लॉट झोपडपट्टी शेजारी सोसायट्यांमधे रहाणारे मध्यमवर्गीय त्यांचा पत्ता सांगताना वडारवाडी किंवा डायस प्लॉट सांगत नाहीत.
९०% मार्क मिळालेला मुलगा, result काय लागला असे विचारल्यावर "पास झाले" असे उत्तर देत नाही.
तसेच त्या श्रिमंत लोकांनी अप्पर वरळी सांगीतले त्यात काही विषेश नाही, they just want to differenciate themselves.
1 Feb 2013 - 10:19 pm | आदूबाळ
दांभिकपणाचा मला कळलेला अर्थ "pretentiousness". जे नाही ते आहे असं भासवणे. तुम्ही म्हणताय त्या 'differentiate'लाच लपवाछपवी चिकटली की दांभिकपणा म्हणतात. वडारवाडी आणि डायस प्लॉटजवळ रहाणारे ते मध्यमवर्गीयही दांभिकच.
९०% मार्क मिळालेल्या मुलाला लपवाछपवीची गरज नसते. त्यातून त्याने "पास झालो" असं सांगितलं तर तो विनयशील आहे असं म्हणता येईल.
आणि अप्पर वरळी असा भागच मुळात अस्तित्त्वात नाही. तो बनवलेला आहे. मग बनवायचाच असेल तर "लोअर प्रभादेवी" का नको? कारण त्याला (मराठी) मध्यमवर्गीयतेचा वास येतो. वरळी कसं कॉस्मो वाटतं. साराभाई व्हर्सेस साराभाई मधली माया साराभाई या प्रकाराचा उत्कृष्ट नमुना!
31 Jan 2013 - 10:54 pm | मन१
श्रीमंतीबद्दल माझाही तुमच्या लेखनातून डोकावणारा उपरोधिक स्वर असतो.
पण थोड्याच वेळात मी त्याच्या पाsssर १८० अंशाच्या विरुद्ध दिशेला जातो नि एकूणातच जगाचे भले व्हायचे असेल तर ज्याने त्याने आळस झटकावा नि अधिकाधिक संपत्ती निर्मिण्याचा ध्यास घ्यावा असे वाटते.
त्यानिमित्ताने जो तो कामात गुंतलेला राहील, दारिद्र्यनिर्मूलनस मदत होइल. नाहिच झाले जगाचे भले तरी स्वतःचे तरी होइलच.
31 Jan 2013 - 10:55 pm | मदनबाण
अरे वा... अंबांनींच्या (थोरले बंधु) टॉवर नंतर या इमारतीची महती तुमच्याकडुन आज कळली.:)
(चित्र जालावरुन घेण्यात आलेले आहे.)
अंबांनींच्या या टॉवरचे नाव Antilia आहे,जे एका mythical island वरुन ठेवल्याचे समजले जाते.हा टॉवर २७ माळ्याचा असुन या इमारतीत हेल्थ क्लब्,जिम आणि ३ हेलिपॅडस देखील आहेत.या शिवाय ५० जण बसु शकतील असे छोटेखानी थेटर देखील या टॉवर मधे आहे.या घराची किंमत १ ते २ बिलियन डॉलर असल्याचे बोलले जाते.
*
*
*
पुणे सुद्धा या बाबतीत मागे नसुन हिल्टन हॉटेल्स अॅन्ड रिसॉर्टस यांनी मावळ तालुक्यातील पवना नगर येथे ३५०० एकरावर सगळ्यात मोठा स्पा बांधला आहे.नुसता स्पाचा आकारच ७० एकराचा आहे ! ;) एका रात्रीचा राहण्याचा खर्च ३३ हजार इतका आहे असे समजते.
(चित्र जालावरुन घेण्यात आलेले आहे.)
अधिक इथे :- http://alturl.com/bphii
31 Jan 2013 - 11:24 pm | रेवती
अँटीलियाच्या प्रकाशयोजनेसाठी फिलिप्स कंपनीतील मनुष्य हामेरिकेतून मुंबईत गेला आणि त्याचे किस्से कानावर आले होते. रिलायन्समध्ये चालणार्या राजकारणाला कंटाळून त्याने शेवटी हात टेकले व यापुढे कोणत्याही परवानगीसाठी फक्त उच्च अंबानींना भेटेल असे जाहीर करवून घेतले. असो, फार डिट्टेलवार सांगत बसत नाही.
1 Feb 2013 - 3:20 pm | इनिगोय
अँटिलियामध्ये पावसाळ्यात गळण्याचे, आणि अंबानींच्या कारची चावी हरवल्याचे किस्सेही कानावर आले आहेत.. ;)
31 Jan 2013 - 11:17 pm | दादा कोंडके
अगदी सामान्य माणसाच्या दृष्टीनं लिखाण केल्यामुळे लेख आवडला.
पण मला असल्या बिल्डींग बघून भिती वाटते. त्यात रहाणारी लोकं, तिथल्या सुविधा कुठं आणि अगदी त्याच्याच समोरच्या रस्त्यावर रहाणार्या लोकांचा नुसता जगण्यासाठी झगडा बघितलं की मन विषण्ण होतं. हे बांधकाम सर्व सुरक्षीततेचे नियम धाब्यावर बसून केलं जातं. इंन्स्पेक्टर आला की मुकादम सगळ्यांना पिवळ्या टोप्या घालायला लावतो, झालं. एके दिवशी ही विषमता असह्य होइल आणि असल्या बिल्डीग मधून रस्त्यावर पाउल ठेवायला लोक धजावणार नाहीत.
ही विषमता चेन्नै मध्ये अशक्य आहे. मागे पेरंबूर जवळ एका चकचकीत निळ्या काचेच्या बिल्डींगवर शेजारच्या गल्लीतली लोकं रात्री दगडं मारून काचा फोडत.
31 Jan 2013 - 11:35 pm | श्रिया
+१, सहमत.
1 Feb 2013 - 3:59 pm | ५० फक्त
एके दिवशी ही विषमता असह्य होइल आणि असल्या बिल्डीग मधून रस्त्यावर पाउल ठेवायला लोक धजावणार नाहीत. - लई भारी बोललात, मी ह्याचीच वाट बघतोय.
बाकी, या क्षेत्रातच असल्यानं सध्याच्या कंपनीच्या परवानगी मिळाल्यानंतर ' घर पहावं बांधताना' असं काही लिहायचा विचार आहे.
1 Feb 2013 - 7:09 pm | दादा कोंडके
नक्कीच.
असल्या महाकाय प्रकल्पात (आयटीपीएल) सेफ्टी इंजिनीअर म्हणून काम करणारा एक नातेवाईकाबरोबर तिथलं काम बघण्याची संधी मिळाली होती. अगदी मुकादमा पासून शेठ लोकं गवंडी काम करणार्या जरा बर्या दिसणार्या बायकांचं शोषण करतात असं त्यानं सांगितलं होतं.
1 Feb 2013 - 7:10 pm | ५० फक्त
आयटिपिएल बेंगलोर का ?
1 Feb 2013 - 9:08 pm | दादा कोंडके
असल्या अनेक उचभ्रू घरसंकूलात आणि इंडस्ट्रीयल इस्टेटची पाणी, वीज वगैरेची स्वतःची व्यवस्था असते अगदी आजुबाजूच्या बकाल भागात एक वेगळं संस्थान केल्यासारखं करतात. एका हुचभ्रू बिल्डींगात रहाणारा बॉस मेनटेनन्स म्हणून महिन्याला वीस हजार देतो. :|
2 Feb 2013 - 11:17 am | ५० फक्त
आटिपिएल बेंगल्रोरचे बरेच किस्से आहेत, कधी भेटलो तर बोलता येतील, पार अगदी एकीकडच्या पार्ट्यांनी दुस्-या बिल्डिंगचे आख्खे स्लॅब बिघडलेले आहेत.
1 Feb 2013 - 9:05 pm | निम
एके दिवशी ही विषमता असह्य होइल आणि असल्या बिल्डीग मधून रस्त्यावर पाउल ठेवायला लोक धजावणार नाहीत.
_ इतकी महागडी घरं परवडणारी लोक जमिनीवर पाय ठेवणारी नसतील कदाचित!
1 Feb 2013 - 10:45 pm | रेवती
हेच मनात आले. चूक की बरोबर यापेक्षा अश्या श्रीमंतांवर हल्ले होण्यास सुरुवात झाली तर हातात सत्ता असलेले बरे गप्प बसतील. त्यांचेही नातेवाईक बाहेर फिरायचे आहेत. ते एका मर्यादेपलिकडे स्वत:वर बंधने घालण्यापेक्षा समोरच्या गरिबाची आणखी गळचेपी करतील, वेळप्रसंगी जीव घेतील, त्यांना काय अवघड? असा असंतोष मात्र नक्की आहे याबद्दल दुमत नाही. त्याचे परिणाम तसेही कमी प्रमाणात का होईना आपण अनुभवत असतो. आता एखाद्या झोपडीत राहणार्या मनुष्याने रागाने उच्च मध्यमवर्गीयास त्रास देण्यासारखे आहे हे! कमी प्रमाणात हा विचार आपण आपल्यासाठी करू शकू का?
1 Feb 2013 - 11:28 pm | नाना चेंगट
एके दिवशी ही विषमता असह्य होइल आणि असल्या बिल्डीग मधून रस्त्यावर पाउल ठेवायला लोक धजावणार नाहीत.
कर्ल मार्क्स आठवला. निवाडा नक्की होणार.. :) जगातील कामगारांनो एक व्हा !!
१०० वर्षांहून अधिक होऊन गेली .. काय झाले?
कामगार संघटना आणि संघर्ष मृतप्राय.. अंतिम घटका मोजत.
का? सरळ आहे भांडवलशाहीने कामगार आंदोलन संपवले नवोदारमतवादी भांडवलशाहीच्या रुपाने.
असो.
4 Feb 2013 - 12:21 am | निनाद मुक्काम प...
हि विषमता कधीच असह्य होणार नाही ,
अनेक शतकांची आपली हि परंपरा आहे ,
उच्च वर्गाची संस्थानिक आता खादीधारी संस्थानिक अशी नावे बदलली आहे.
प्रस्थापितांकडून होणारे शोषण हे सामान्य भारतीयांच्या भाग्यात आहे,
आता प्रस्थापितांच्या नावात गोरा साहेब व काळा साहेब एवढाच नावात बदल झाला आहे ,
4 Feb 2013 - 1:43 am | रेवती
हो. आपल्याकडे शिमीट कांक्रीटच्या बिल्डींगी हुब्या र्हायल्यावरही सिमेंटची जंगले आली म्हणत आपण ती स्विकारली आणि आनंदाने सोसायट्या बनवून रहायलाही गेलो, वास्तूशांती केल्या, कौतुके केली. त्यावेळी ज्यांच्याकडे हे नव्हते त्यांनी नावे ठेवली. शेजारचा माणूस मेला की जगला हेही माहित नसलेली आयुष्ये म्हणून हिणवले. ते काही प्रमाणात खरेही होते. हेही तसेच.
10 Feb 2013 - 6:53 am | शुचि
एखादा रस्त्यावरचा भिकारी मला प्रस्थापित समजतो व स्वत:ला शोषीत.
मी दुसर्याला प्रस्थापित समजते व स्वत:ला शोषीत समजते.
नक्की कोण ठरवणार कोण शोषीत व कोण प्रस्थापित?
1 Feb 2013 - 4:01 pm | ५० फक्त
बाकी प्रत्येक मजल्यावर स्पा असं चित्र मा.मिस्पाजी किंवा सौरभ किंवा अभ्या यांनी करुन इथं लावावे ही विनंती.
1 Feb 2013 - 11:23 pm | अभ्या..
स्पा यांचा एक फोटो पाठवा नुस्ता. प्रत्येक मजल्यावर उभा करतो त्याला. ;)
बिल्डिंगखाली, पार्कींगात पण स्पा. सगळीकडे कसे प्रसन्न वाटेल.
1 Feb 2013 - 7:23 pm | अग्निकोल्हा
गुड!
1 Feb 2013 - 9:52 pm | मदनबाण
अजुन एक भर...
नवी मुंबईत खारघर इथे ३७ कोटी खर्च करुन १०३ एकरात गोल्फ कोर्स बनवण्यात आला आहे.
संदर्भ :- http://cidcogolfkharghar.golfgaga.com/
Navi Mumbai golf course to be opened today
(चित्र जालावरुन घेण्यात आले आहे.)
अशीच एक गोल्फ सिटी सुद्धा बनत आहे,मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे जवळ असलेल्या खालापुर इथे ही सिटी बनत आहे.
=>
संदर्भ:- http://realestate.indiabulls.com/GolfCity/overview.aspx
2 Feb 2013 - 11:15 am | ५० फक्त
अरे आमच्या लाडक्या लवासाला कसे विसरलात, हा समस्त मुळशीमुठावरसगाव या भागावर अन्याय आहे याची योग्य ती दखल घेतली जावी ही नम्र विनंती.
10 Feb 2013 - 6:31 am | शुचि
मुंबईत आमच्या कॉलनीशेजारील झोपडपट्टीवर अचानक एका रात्रीत "एस्टॅब्लिशड फ्रॉम १९७६" का काहीशी पाटी लागल्याचे आठवले.
तृतीयपंथीं लोकांनी वाजत गाजत यल्लम्मादेवीची मिरवणूक काढून देऊळ स्थापल्याची आठवण आली.
शेवटी पालिकेने लहानसे एक उद्यान निर्माण केले व त्यावर चालण्याचा ट्रॅक होता. एके दिवशी त्यावर चालायला म्हणून चालले होते तो एका सायकलवाल्याने जाता-जाता शिवी हासडलेली आठवली. खुन्नस!! "त्यांच्या" जागेवर आपण जाऊन व्यायाम करतो त्याची खुन्नस.
जेव्हा आपण कोणाला तरी इमारतीतून पाय खाली ठेवायला प्रतिबंध करु अशी परीस्थिती येईल तेव्हा आपल्याला घरातून निघणे मुष्कील करणारे माथेफिरुही असतीलच की.