ही मी विशाखापटणम येथे कल्याणी या नौदलाच्या रुग्णालयात काम करत असतानाची गोष्ट (१९९८) आहे. आमचा एक पंजाबी lab technician (प्रयोगशाळा तंत्रज्ञ) होता. त्याच्या बायकोने एका मतीमंद मुलाला १९९० मध्ये पंजाबातील गावात जन्म दिला आणि त्यात तिचे दुर्दैवाने देहावसान झाले.त्याचे वय तेंव्हा २४ वर्षे होते त्या तंत्रज्ञाने नंतर या मुलाची देखभाल करण्यासाठी आणि परत पुढील आयुष्यासाठी दुसरे लग्न केले.दुसऱ्या बायकोपासून त्याला दोन मुले झाली. ही दोन्ही मुले व्यवस्थित होती. हे मतीमंद मूल जसे वाढू लागले तसे तसे त्याच्या अविकसित मेंदूचे कार्य अनियमित होऊ लागले.
आणि त्याला अपस्माराचे(fits) झटके येऊ लागले. त्याचा इलाज नौदलाच्या रुग्णालयात मेंदू विकार तज्ञ आणि बाल रोग तज्ञ यांच्या तर्फे चालू होता. दुर्दैवाने त्याच्या मेंदूची जडणघडण इतकी जटिल आणि अपुरी होती की औषधाचा जास्तीत जास्त डोस देऊनही त्याच्या फिटस वर पूर्ण नियन्त्रण होत नव्हते. शेवटी शेवटी तर इतकी वाईट परिस्थिती आली कि त्या मुलाला आठवड्यात दोन वेळा फिट्स येत होत्या. त्या मुलाला मुंबई आणि पुणे येथे वरिष्ठ मेंदूविकार तज्ञ यांना हि दाखवून झाले होते पण त्याचा रोग आटोक्यात येत नव्हता.तो तंत्रज्ञ केवळ रुग्णालयात कामाला असल्याने त्या मुलाकडे इतके लक्ष देणे त्याला शक्य झाले.
अशा परिस्थितीत एकदा तो तंत्रज्ञ कामावर असताना त्या मुलाला फिट्स येऊ लागल्या. रोज मरे तर कोण रडे या न्यायाने त्याने काहीच केले नाही. यावेळेला त्या मुलाच्या फिट्स काही थांबत नव्हत्या शेवटी १५-१६ तासांनी तो त्या मुलाला घेऊन परत रुग्णालयात आला. मी तेंव्हा casualty (आपत्कालीन)duty वर होतो. मी त्या मुलाची अवस्था पाहून त्याला ताबडतोब बाल अतिदक्षता विभागात (paediatric ICU) दाखल केले आणि त्याच्यावर ताबडतोब उपचार सुरु केले. बालरोग तज्ञानी पूर्ण प्रयत्न करूनही तो मुलगा वाचू शकला नाही. १५-१६ तास अपस्मार झाल्याने त्याच्या स्नायूचे विघटन(rhabdomyolysis) होऊन त्याची मूत्रपिंडे नाकाम झाली आणि त्याचा मृत्यू झाला.
आता प्रश्न हा होता कि मृत्यूचे प्रमाणपत्र(death certificate) कोणी द्यायचे? मी त्या मुलाला बघणारा पहिला डॉक्टर होतो आणि मला पूर्ण परिस्थिती माहित होती.
जर पोलिस तपासणी झाली तर त्या मुलाकडे १५-१६ तास फिट्स येत असताना अक्षम्य दुर्लक्ष झाले हे सहज सिद्ध झाले असते.
कायदा असे सांगतो कि एखाद्याचा मृत्यू जर २४ तासाच्या आत झाला तर प्रमाणपत्र देण्याच्या आधी शव विच्छेदन(post mortem) आणि पोलिस तपासणी करणे आवश्यक आहे. पण जर एखादा रोगी रुग्णालयात उपचार घेत असेल आणि रुग्णालयातील डॉक्टर्सना मृत्यू चे कारण माहीत असेल तर ते तसे प्रमाणपत्र देऊ शकतात उदा.एखादा कँसरचा रोगी शेवटच्या टप्प्यात असेल तर आम्ही त्याला घरी पाठवतो कारण घरी मुलाबाळांच्यामध्ये मृत्यू येणे हे रुग्णालयात मृत्यू येण्यापेक्षा सुसह्य असते.
मी जर पोलिसात तक्रार केली असती तर चौकशीत त्याचे अक्षम्य दुर्लक्ष (criminal negligence) सहज सिद्ध झाले असते. त्यावर त्याचे कोर्ट मार्शल होऊन त्याला नोकरीतून काढून टाकले गेले असते आणि कदाचित तुरुंगवास हि झाला असता.असे झाले असते तर त्याचे कुटुंब उघड्यावर पडले असते.
आता हि शृंगापत्ती होती कि त्या मृत बालकाला न्याय द्यावयाचा तर दोन जिवंत बालकांवर अन्याय होत होता पण काही न करणे हे पण मनाला खात होते.एकीकडे तो तंत्रज्ञ त्या मतीमंद मुलासाठी किती कष्ट घेत होता ते मी स्वतः जवळ जवळ ६ महिने पाहत होतो. राजा घेऊन तो मुंबई आणि पुणे येथे जाऊन आला होता.त्या कुटुंबाचे आयुष्य त्या मुलाच्या आजाराभोवती फिरत होते. शेवटी त्या माणसाच्या सहनशक्तीचा अंत झाला असावा आणि त्याने त्या वैफल्यातून किंवा निराशेतून दुर्लक्ष केले असावे.
शेवटी मी त्या तंत्रज्ञा विरुद्ध पोलिसात तक्रार न करण्याचा निर्णय घेतला.त्याला रुग्णालयातून मृत्यूचे प्रमाणपत्र दिले गेले. मूकपणे साश्रू नयनांनी त्या तंत्रज्ञाने माझे आभार मानले.त्याला प्रतिसाद काय द्यावा हे मला कळत नव्हते.
हा निर्णय बरोबर कि चूक हे मला आजतागायत ठरवता आलेले नाही.पण त्या वेळेत मला जे बरोबर वाटले आणि माझ्या सद्सद विवेक बुद्धीला पटले ते मी केले.कारण एका मृत बालकावरील अन्यायाला वाचा फोडून दोन मुले आणि एका स्त्रीला वारया वर सोडावे हे मला पटले नाही.
शेवटी गणीतात २+२ =४ असतील पण आयुष्यात तसे होतेच असे नाही
प्रतिक्रिया
31 Jan 2013 - 11:44 am | सुमीत
वाईट वाटून घेऊ नका, फार कमी जणां मध्ये तुमच्या सारखी निर्णय क्षमता आणि जबाबदारीची जाणीव असते.
31 Jan 2013 - 11:50 am | बॅटमॅन
नंतर टोचणी लागली असली तरी हा निर्णय योग्यच वाटतो. त्या परिस्थितीत तोच निर्णय बेस्ट पॉसिबल होता असे वाटते.
31 Jan 2013 - 11:54 am | मुक्त विहारि
वाईट वाटून घेवू नका..
31 Jan 2013 - 12:03 pm | सचिन कुलकर्णी
तुम्ही योग्य तेच केलेत सर..
31 Jan 2013 - 1:07 pm | अनुराधा१९८०
योग्य तेच केलेत
31 Jan 2013 - 1:27 pm | शुचि
_/\_
जीवन त्यांना कळले हो…
मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो
जळापरी मन निर्मळ ज्यांचे गेले तेथे मिळले हो
चराचराचे होऊनी जीवन स्नेहासम पाजळले हो
सिंधुसम हृदयात जयांच्या रस सगळे आकळले हो
आपत्काली अन दीनांवर घन होऊनी जे वळले हो
दुरित जयांच्या दर्शनमात्रे मोहित होऊनी जळले हो
पुण्य जयांच्या उजवडाने फुलले अन परिमळले हो
सायासावीन ब्रह्म सनातन घरीच ज्या आढळले हो
उरीच ज्या आढळले हो!
- बा. भ. बोरकर
31 Jan 2013 - 3:05 pm | उदय के'सागर
सुबोध जी तुम्ही खरंच वाईट वाटून घेऊ नका. तुम्ही त्या वेळी जो निर्णय घेतला तो खुपच योग्य आणि विचार पूर्वक होता. अश्यावेळेस शक्यतो लोक जो माणुस गेला (वारला) त्याच्या बाजूने सहानुभूती दाखवून फक्त मनाने निर्णय घेतात. पण तुम्ही अश्या कठीण प्रसंगी खुपच 'प्राक्टीकल" राहुन हा निर्णय घेतलात आणि खरेच त्या इतर दोन मुलांवर अन्याय होऊ दिला नाही.
तुमच्या सारखी विचारसरणी असणार्या माणसांचा मला खरंच खूप हेवा वाटतो!
31 Jan 2013 - 7:57 pm | धन्या
खरं आहे !!!
31 Jan 2013 - 8:06 pm | रेवती
अवघड असला तरी योग्य निर्णय.
लेखन आवडले.
31 Jan 2013 - 8:33 pm | अग्निकोल्हा
.
31 Jan 2013 - 9:03 pm | आनन्दिता
सुबोध सर तुम्ही अगदी योग्य केलंत...
1 Feb 2013 - 2:58 am | शिल्पा ब
निर्णय योग्यच होता यात वाद नाही. तुम्ही त्याला त्याच्या चुकीची जाणिव करुन दिली असावी ही अपेक्षा. असो.
पण त्या माणसाने किंवा यापरीस्थितीत असलेल्या कोणीही केवळ मुलाची देखभाल म्हणुन दुसरं लग्न केलं ही चुकच म्हणायची. कोणतीही लग्न झालेली बाई दुसर्याच्या आजारी मुलाची देखभाल करण्यासाठी लग्न करेलसं वाटत नाही...बहुतेकदा तसं नसतंच. त्यामुळे तिच्याकडुन फारशा अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही.
एखादी नर्स किंवा त्याहीपेक्षा मतिमंद मुलांची शाळा हा पर्याय उत्तम ठरला असता. अशा शाळेत मुलाची काळजी घेतली गेली असती. १५-१६ तास फिट्स येत होत्या तरीही दुर्लक्ष केलं हा गुन्हाच झाला आणि अजिबात लक्ष न दिल्याची टोचणी बापाला आयुष्यभर लागणार...तो मतिमंद जन्मला यात त्या मुलाची काय चुक?
अशा परीस्थित जर कोणी असेल तर मतिमंद मुलांची शाळा ही योग्य जागा आहे. भोरमधे अशी एक चांगली शाळा होती. आता आहे का नाही माहीत नाही.
1 Feb 2013 - 12:03 pm | सुबोध खरे
शिल्पा ताई ,
तो मुलगा नौदलाच्या मतीमंद मुलांसाठी चालवलेल्या शाळेतच जात होता परंतु प्रत्यक्ष फिट आल्यावर शाळा तरी काय करील? ते मुलाच्या वडिलांना फोन करून बोलावून घेतील आणि घरी पाठवतील. शेवटी मुल हि आई वडिलांचीच जबाबदारी आहे.
मुलाच्या वडिलांनी लग्न केले तेंव्हा ते मुल तान्हे होते.तेंव्हा त्यांना हि माहित नसावे आणि पुरुष सैन्यात नोकरी करून त्या मुलाला कसा सांभाळणार होता. त्यातून खेड्यातून आलेल्या माणसांची मनोवृत्ती तुम्ही कशी बदलणार. घरच्यांनी भरीस घातल्यावर किंवा असेही कोण पुरुष एका तान्ह्या मुलाला सहज सांभाळू शकेल?
आणि तो मुलगा मतीमंद नसत तरीही त्या तंत्रज्ञाने बहुधा लग्न केलेच असते.
१५-१६ तास दुर्लक्ष झाले हा गुन्हा आहेच म्हणुनतर मला हि दुविधा होत होती.अन्यथा तो त्या मुलाची व्यवस्थित काळजी घेत होता हे आम्हाला माहित होते. प्रश्न हाच होता कि त्या एका चुकीसाठी त्याला गुन्हेगार म्हणून सिद्ध करावे किंवा नाही(लौकिकार्थाने तो गुन्हेगार होताच) प्रश्न फक्त पोलिसात तक्रार करावी कि नाही हा होता.
1 Feb 2013 - 3:57 am | रामपुरी
प्राप्त परिस्थितीत घेतलेला निर्णय हा त्या क्षणी बरोबरच असतो. त्याचे बरोबर/चूक असे विश्लेषण नंतर होऊ शकत नाही. पुढे तो कितीही चुकिचा वाटला तरी त्या क्षणाला तो एकंदर परिस्थितीनुसार बरोबरच म्हणावा लागतो.
1 Feb 2013 - 4:29 am | निल्या१
नुकताच गिफ्टेड हॅन्ड्स नावाचा डॉ. बेन कार्सन यांच्या जीवनावर आधारित चित्रपट बघितला. त्यात सतत फिट्स येणा-या मुलीचे ऑपरेशन करुन मेंदूचा बिघडलेला अर्धा भाग काढून टाकला जातो. तिचे वय कमी असल्याने व मेंदूच्या पेशींनी आपण मोठे झाल्यावर काय व्हायचे हे ठरवलेले नसल्याने उरलेल्या अर्ध्या मेंदूची वाढ कालांतराने होते असे डॉक्टर सांगताना दाखवले आहे. ह्या मुलाची केस थोडी फार तशीच वाटली. भारतात अशा प्रकारचे सर्जन उपलब्ध असते तर असे अनेक जीव वाचले असते असं वाटतं.
बाकी तुमच्या निर्णयाबद्दल तो अगदी योग्यच होता. नंतर विचार करुन त्याची समीक्षा करण्यापरिस त्यावर ठाम राहून घेतलेल्या निर्णयाचा अभिमान बाळगा.
1 Feb 2013 - 11:09 am | मनीषा
परिस्थिती काहीही असली, तरी त्या तंत्रज्ञाने जे केले - ते अक्षम्य आहे असे वाटते.
1 Feb 2013 - 7:26 pm | सुबोध खरे
साहेब
तो तंत्रज्ञ पुण्याला (AFMC) ए एफ एम सी ला गेला होता तेथे मेंदू विकार तज्ञांनी त्याला मेंदूवर मर्यादित शस्त्रक्रिया हा उपाय सांगितला होता. त्याने मुंबई मध्ये जसलोक रुग्णालयात जाऊन दुसरा सल्ला (सेकंड ओपिनियन) सुद्धा घेतले होते. .तरीही कोणत्याही बापाला आपल्या वाढत्या वयाच्या मुलावर शस्त्रक्रिया करून मेंदूचा एक भाग काढून टाकावा असे सहज स्वीकार होणे कठीण आहे. त्याची यावर घालमेल चालू होती. आणि शस्त्रक्रिया करण्यासाठी त्याला मुंबई किंवा पुणे येथे बदली करून घेणे आवश्यक झाले असते. हि प्रक्रिया वाटते तेवढी सोपी नाही.
मेंदूवर वेगवेगळ्या चाचण्या करून मेंदूचा कोणता भाग अधिक उद्दीपित होतो हे प्रथम नक्की करावे लागते.त्यानंतर तो भाग एखाद्या महत्त्वाच्या केंद्राजवळ नाही हे पाहावे लागते. त्यानंतर शस्त्रक्रियेत त्या भागापर्यंत पोहोचणे किती सोपे आणि कठीण आहे हे ठरवावे लागते. कारण मेंदूचा एखादा भाग निकामी झाला तर तो कधीही भरून निघत नाही.तो भाग ज्या शरीराच्या भागावर नियंत्रण ठेवतो तो शरीराचा भाग पूर्णपणे आयुष्यभरासाठी निकामी होतो. यात चूक झाली तरी त्या रुग्णाला त्याचे परिणाम आयुष्यभर भोगावे लागतात.
हे सर्व कळल्यावर कोणता बाप सहजासहजी तयार होईल?
2 Feb 2013 - 8:06 pm | पैसा
त्या वेळची एकूण परिस्थिती पाहून तुम्ही विवेकी निर्णय घेतलात. एकूणच तुमचे लिखाण वाचताना सैन्यातल्या अधिकार्याचा मानवी चेहरा डोळ्यासमोर येतो आहे. धन्यवाद!
2 Feb 2013 - 8:10 pm | अमोल खरे
असेच म्हणतो. खुप कठीण निर्णय होता.