भेटण्याची काय पण ही रीत आहे?
टाळुनी म्हणतेस वरती प्रीत आहे
गांजलेल्या माणसांच्या स्वागताला
झोपडी माझी उभ्या वस्तीत आहे
राहिल्या आता न चिंता कोणत्याही
मी दिवाळे काढुनी नि:श्चिंत आहे
आठवण गेली तुझी देऊन झोका
मी पुन्हा आता गडे मस्तीत आहे
ये भविष्याचे पुन्हा चल स्वप्न पाहू
कालचा इतिहास त्या रद्दीत आहे
----धोंडोपंत आपटे
प्रतिक्रिया
3 Jul 2008 - 11:23 am | प्रमोद देव
वा धोंडोपंत! गजल मस्त आहे.
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
3 Jul 2008 - 11:39 am | विजुभाऊ
धोंडोपन्तजी......खरे सांगायचे तर
कविता बरी आहे....पण वृत्तात जरा फसले आहे.
एकेक कडवे स्वतंत्र बरे वाटते. पण सलग कविता म्हणुन कोणत्याच कडव्याच्या दुसर्या कडव्याशी सम्बन्ध आहे.
अवांतरः या कवितेची प्रेरणा वर्जेशपासुन घेतली काय? :)
:::::::::::वर्जेश स्टाईल कविता वाचुन कंटाळलेला विजुभाऊ
3 Jul 2008 - 11:49 am | धोंडोपंत
विजुभाऊ,
ही कविता नाही. ही गझल आहे. गझलेचा प्रत्येक शेर सुटा असतो. गझलेला कवितेसारखी थीम नसते. कृपया गझलेची बाराखडी वाचावी. तिचा अभ्यास करावा. आणि मग त्यावर भाष्य करावे. अनेकांना गझल आणि कविता यामधला फरक माहित नसतो.
त्यासंबंधी अभ्यास करावा ही विनंती.
दुसरी गोष्ट म्हणजे वृत्त कोठे चुकले आहे ते कळवावे. अर्ध्या मात्रेची जरी चूक असेल तरी आम्ही ती सुधारु. कारण निर्दोष वृत्तात गझल लिहिणे हे दादांकडून आम्हाला मिळालेले बाळकडू आहे. ( दादा= सुरेश भट)
आम्ही स्वत:च्या प्रेरणेने लिहितो. उसन्या प्रेरणा घेऊन आम्ही लिहित नाही. तसे जर नसते तर गेली तीन वर्षे काहीही लेखन न करता गप्प बसलो नसतो.
वृत्तातील चूक ताबडतोब कळवावी. दुरुस्ती करण्यासाठी आम्ही वाट पहातोय.
धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
3 Jul 2008 - 11:31 am | वेदश्री
अग्गदी मनातले बोललास ! आर्थिक दिवाळे काढून खरंच खूप निश्चिंत वाटतेय आता. :) गजलही मस्तच.
3 Jul 2008 - 11:42 am | बेसनलाडू
गझल लाजवाब पंत! बरेच दिवसांनी लिहिलेत,पण दिल खुश!!
राहिल्या आता न चिंता कोणत्याही
मी दिवाळे काढुनी नि:श्चिंत आहे
ये भविष्याचे पुन्हा चल स्वप्न पाहू
कालचा इतिहास त्या रद्दीत आहे
वावावा!
(निश्चिंत)बेसनलाडू
अवांतर - विजुभाऊ,वृत्त फसलेले वाटले नाही.
(वृत्तज्ञ)बेसनलाडू
3 Jul 2008 - 12:00 pm | विजुभाऊ
गझल असो /मुक्तक असो/किंवा आर्या धवळे साकी दिंडी असो.....प्रत्येक काव्यप्रकाराचा एक उद्देश असतो.
काही भावना........काही प्रसंग ठळक पणे काही पार्श्वभूमीला असतात पण ते सगळे एकत्रीतपणे मिळुन एक विषय मांडतात
वरिल कवितेत गांजलेली माणसे /तुझी प्रीत / तुझे टाळणे / दिवाळे काढणे / तुझी आठवण या कशाचाही मिळुन एकुणात असा अर्थ लागत नाही.
प्रत्येक द्वीपदी स्वतन्त्र असावी पण एकुणात सर्व मिळुन मांडताना एक निश्चित अर्थ लागावा असाही गझल मांडणीमागचा एक मुख्य विचार असतो.
वृत्त बित्त नन्तर प्रथम मुख्य अर्थ हा गझलेचा जीव असतो. अन्यथा "मै एक डिस्को तू एक डिस्को दुनिया है एक डिस्को..." हे सुद्धा वृत्तात बसतेच की
अवांतर : या ओळीतुनही कोणाला गहन अर्थ सापडु शकतो.त्याला आमचा ईर्षाद अर्थात नाईलाज"
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
3 Jul 2008 - 12:09 pm | धोंडोपंत
कृपया मिसळपाव वरील गझलेच्या जाणकारांनी वरील गैरसमज दूर करावेत.
आम्ही त्यांना गझलेचा अभ्यास करण्याचे सुचविले पण तसे न करता ते गझलेवर मत देत आहेत. त्यांना जाणकारांच्या सल्ल्याची निश्चित गरज आहे. बेसनलाडू, केशवसुमार, अविनाशपंत ओगले यांना विनंती की गझलेचा आकृतीबंध कसा असतो ते या विजुभाऊंना समजावून सांगावे.
"वृत्त बित्त नंतर" असे तुम्ही म्हणताय ते अत्यंत गैर आहे. तुम्ही म्हणताय आमचे वृत्त फसले आहे ते आधी दाखवा की.
"वृत्त बित्त नंतर" या विधानावरून तुमचा आणि गझलेचा किती संबंध आहे ते स्पष्ट होते.
"साफ शब्दों में जतादो उनको "नज़र"
"जो वज़न में न लिखें वो शायर नहीं"
वृत्त हा गझलेचा आत्मा आहे. एक मात्रेची जरी चूक झाली तरी ती मोठी ऐब समजली जाते. (ऐब म्हणजे दोष) तेव्हा कृपया वृत्तामधील चूक कळवून आम्हाला उपकृत करावे ही विनंती.
बाकी गझलेबद्दल मिसळपाव वरील जाणकार लिहितीलच.
धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
3 Jul 2008 - 12:23 pm | वेदश्री
गजल आस्वादायला लिहिली आहे का काथ्याकुटायला?
3 Jul 2008 - 12:39 pm | धोंडोपंत
वेदूबाळ,
गझल आस्वादासाठीच दिली आहे. पण तिच्याबद्दल असलेले गैरसमज दूर व्हावेत असाही उद्देश आहे. तरच खर्या अर्थाने ती लोकांपर्यंत पोहोचेल.
गझलेची स्वत:ची काही खासियत आहे. तिची स्वत:ची बंधने आहेत. तसेच तिला विषयांचे वावडे नाही. प्रत्येक शेर ही स्वयंपूर्ण कविता असणे ही तिची गरज आहे. पण दोन शेर एकमेकांशी संबंधीत असले पाहिजेत हा कवितेतल्या कडव्यांचा अट्टाहास तिला मान्य नाही. प्रत्येक शेराचा वेगळा विषय असू शकतो नव्हे तो असावा. विविध विषयांचा आस्वाद एकच गझल देते हा तिचा मोठेपणा आहे. दादांच्या गझलेतले हे शेर पहा.
नाव माझे फुलांनी विचारू नये
नाव सांगेन तेव्हा शहारू नये
ही कुण्या एकट्याची लढाई नसे
एकट्यानेच झेंडा उभारू नये
ना कुणाचीच स्वप्नांवरी मालकी
डोळियांनी कुणाच्या फुशारू नये
सोबतीला बरे लोक साधेसुधे
तारकांनी मला हाक मारू नये
मी तुझा चेहरा...मी तुझे बोलणे
आरशाला गडे दूर सारू नये
जो तयांना हवा तो नसे प्रश्न हा
हा असा प्रश्न कोणी विचारू नये
हा पहा लागला अर्थ बोलायला
शब्द येतील त्यांना पुकारे नये
आले लक्षात किती विविध विषय या गझलेत घेतलेत? हीच तिची खासियत. हेच आमचे सांगणे.
आपला,
(गझलदिवाणा) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
3 Jul 2008 - 1:03 pm | मनिष
मी जाणकार असा नाही, पण गझल मनापासून आवडते.
गझलेत दोन प्रकार असतात - गझल मुसलसिल आणि गझल गैर-मुसलसिल
गझल गैर-मुसलसिल - मधे आधीच्या द्विपदींचा पुढच्या द्विपदींशी संबंध असेलच असे नाही. त्या फक्त त्या काफिया-रदीफ मधे बसतात.
उदा. गालिबची स्वत:ची ’हजारो ख्वाईशे ऐसी..."
हे पहा -
हजारो ख्वाईशे ऐसी, की हर ख्वाईश पे दम निकलें,
बहोत निकले मेरे अरमान, लेकिन फिर भी कम निकले।
त्यातलीच ही द्विपदी
कहा मयखाने का दरवाजा और कहा वाईज,
पर इतना जानते है, के कल वो निकला जब हम निकले।
काय संबंध आहे???
या उलट गझल मुसलसिल मधे, पुर्ण गझल ही एकच कल्पना पुढे नेते. अर्थात त्यातही काफिया-रदीफ सांभाळुन. उदा. "चुपके, चुपके रात दिन...".
पण ह्या दोन्हीही तांत्रिकदृष्ट्या गझलच! मलाही "गझल मुसलसिल" जास्त आवडते, पण म्हणून दुसरी गझल नाहीच असे नाही. :)
- (गझलप्रेमी) मनिष
3 Jul 2008 - 12:39 pm | विजुभाऊ
वृत्त हा गझलेचा आत्मा आहे
हे पटत नाही......तंत्र हेच जर लेखनाचा आत्मा असेल तर छापखान्यातले अक्षरांचे खिळे ठेवलेले बॉक्स हे उत्तम अग्रलेख होऊ शकतील. किंवा ज्याची छपाई उत्तम ते वृत्तपत्र उत्तम असेच मानावे लागेल.
भावना लोकांपर्यन्त पोहोचविणे हाच कोणत्याही लेखनाचा आत्मा आहे. वर्जेशच्या कवितेत ही गोष्ट जोमदार होती.
"केवळ व्याकरण आले किंवा शुद्ध लिहिले की तेच चांगले" असे नसते हे इथे सगळेच जण मानतात ना.
जो वज़न में न लिखें वो शायर नहीं
असू शकेल्.. आमच्यासारख्या सामान्य वाचकाला अर्थ महत्वाचा वाटतो.
आपल्या लेखनाला दिलेल्या प्रतिसादात व्याकरणाची / शुद्धाशुद्धतेचीकाही चूक असेल तर ती एका अज्ञ मानवाने केलेले लिखाण आहे असे मानुन घ्यावे
अवांतरः:: सौंदर्याची पारख करताना वर्णाचा निकष लावु नये
अति अवांतर: कृपया हे वैयक्तिक रित्या घेउ नये. चर्चा विषयावर व्हावी...व्यक्तींवर होऊ नये ही विनन्ती
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
3 Jul 2008 - 12:52 pm | धोंडोपंत
विजुभाऊ,
अर्थ महत्वाचा आहेच. त्याबद्दल कुणाचेच दुमत असू शकत नाही. पण केवळ अर्थपूर्ण असलेली सैल रचना म्हणजे गझल नव्हे. ती कविता असू शकेल किंवा मुक्तछंद. हा मुद्दा आहे.
वृत्ताला महत्व आहे म्हणजे अर्थाला नाही हा युक्तिवाद संयुक्तिक नाही. अर्थ चपखलपणे वृत्तात मांडणे हे कौशल्य गझललेखनात अपेक्षित आहे.
त्यामुळे एका मात्रेची जरी चूक झाली तरी त्याला शायरच समजत नाहीत.
त्यासाठी आम्ही तुम्हाला वारंवार सांगत होतो की वृत्त फसलेय असे तुम्ही म्हणालात ते कुठे ते दाखवा. म्हणजे ते दुरूस्त करून गझल निर्दोष करता येईल. कारण गझलेतील वृत्ताची चूक कधीही खपवून घेतली जात नाही. तशी आपल्या गझलेत चूक राहू नये अशी प्रत्येक शायराची अपेक्षा असते.
असो. आम्ही इथे थांबतो. यापुढे या विषयावर जाणकार लिहितील. वैयक्तिक काहीही नाही. जे काही आहे ते गझलेवरील प्रेमामुळे हे समजून घ्यावे ही विनंती.
धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
3 Jul 2008 - 1:08 pm | बेसनलाडू
वृत्त,गझलेवर चर्चा चालली आहे आणि पंत उत्तरे देतच आहेत;पण गझल आणि केवळ गझल या एकाच कारणासाठी येथे तोंड (की नाक) खुपसतो आहे. चू भू द्या घ्या
हे पटत नाही......तंत्र हेच जर लेखनाचा आत्मा असेल तर छापखान्यातले अक्षरांचे खिळे ठेवलेले बॉक्स हे उत्तम अग्रलेख होऊ शकतील. किंवा ज्याची छपाई उत्तम ते वृत्तपत्र उत्तम असेच मानावे लागेल.भावना लोकांपर्यन्त पोहोचविणे हाच कोणत्याही लेखनाचा आत्मा आहे. वर्जेशच्या कवितेत ही गोष्ट जोमदार होती.
पंतांनी वृत्त हे गझलेचा आत्मा असे जे म्हटले आहे ते तसे म्हणताना अर्थ आत्मा नाही असे म्हटलेले नाही,हे सर्वप्रथम लक्षात घ्या. गझलेतल्या शेरांमधून प्रतीत होणारा अर्थ सहज,सुस्पष्ट असणे हे त्या शेराचे यशच असते. हीच प्रासादिकता किंवा लहजा होय.ती महत्त्वाची आहेच,यात वाद नाही.अर्थाच्या दृष्टीने संदिग्धता आली,की शेर फसलाच (असे निदान मी तरी मानतो) येथे मुद्दा आहे तो तंत्राच्या पायावर अर्थाचा कळस चढवायचा. साधी गोष्ट आहे.एकच अर्थ तुम्हाला गझलेच्या शेरातून पोचवता येईल,गीताच्या कडाव्यांमधून,मुक्तकाच्या किंवा चारोळीच्या चार ओळींतून,पानभर लेखातून किंवा छंदमुक्त कवितेतून.पण या प्रत्येक प्रकाराचे स्वतःचे तंत्र आहे/असते.कोणी कोणते तंत्र अनुसरावे हा वैयक्तिक निवडीचा भाग आहे.मात्र 'गझल' म्हटली की 'वृत्त' पाहिजेच! नको असल्यास तिला कविता म्हणा,गझल नको :)
मुक्तछंदाच्या नावाखाली काही वेळा गद्याच्या/निबंधाच्या ओळी मध्येच तोडून एकाखाली एक लिहून त्याला कविता म्हणण्याचे निराशाजनक प्रकार पहावयास मिळतात,पण -
मी बसलोय इथे
माझं काळीज पिसून
भल्याभल्यांच्या हाती
नाही डाव आता
आणि
बसलो पिसून माझे काळीज मी येथे
भल्याभल्यांच्या हाती नाही डाव आता
आणि
येथे पिसून माझे काळीज बैसलो मी
आता भल्याभल्यांच्या हातात डाव नाही
या तीन तुकड्यांपैकी चारोळी/दोनोळी/कविता कशाला म्हणावे,द्विपदी/शेर कशाला म्हणावे,कसे ठरवावे? तर तंत्रावरून,शेराच्या/मुक्तकाच्या/चारोळीच्या व्याख्येवरून. अर्थ कितीही सुस्पष्ट असला,भिडणारा असला तरी प्रत्येक ओळीत आठपेक्षा जास्त अक्षरे असल्यास तिला अष्टाक्षरी म्हणावे काय?
उर्दू गझलेच्या इतिहासात (ऐकीव/वाचलेल्या माहितीनुसार) भंग पावलेले वृत्त हा अक्षम्य गुन्हा मानला जाई आणि त्या गझलेला(?) गझल मानत नसत.अशी बंधने कालौघात मराठी गझलेच्या संदर्भांमध्ये काहीशी शिथिल झालेली पाहण्यात आहेत. उदा. उर्दू गझलेला मान्य असलेले स्वरकाफिये मराठी गझलेत रुळलेले नाहीत;मात्र याचा अर्थ स्वरकाफियांना वाळीत टाकलेले नाही. त्यांच्या वापराबाबत एकमत नाही,हे खरे. अक्षरगणवृत्तात लिहिणे विरुद्ध मात्रावृत्तात लिहिणे,हा असाच एक रंजक वाद/चर्चाविषय. सांगायचा मुद्दा हा की कितीही थेट भिडणारा,अपील होणारा,सहज व सुस्पष्ट शेर/द्विपदी असला/ली तरी ती वृत्तात नसल्यास केवळ मूलभूत व्याख्येच्या पायाभूत मुद्द्यावर ती शेर/द्विपदी म्हणून आणि संबंधित रचना गझल म्हणून खारीज ठरते/ठरेल.
अर्थाला,सुस्पष्टतेला,कल्पनासौंदर्याला ना नाही;पण तो कसा पोचवावा - चार ओळींत,आठ अक्षरांच्या ओळींत,वृत्तात -अक्षरगणांत की मात्रांत,पानभर निबंधामधून नि हजार रूपकांमधून इ. नुसार त्या त्या साहित्यप्रकाराची व्याख्या बदलत असते. गझलही याला अपवाद नाही.
दादांची गझलेची बाराखडी जरूर वाचावी.
असू शकेल्.. आमच्यासारख्या सामान्य वाचकाला अर्थ महत्वाचा वाटतो.
मग असे असेल,तर तो वृत्तातून पोचवलाय की वृत्त भंग करून वगैरेचा विचार का? आणि मग हा विचार करायचाच असेल,तर तंत्र आणि व्याख्या यांचे काटेकोर पालन आलेच.
वैयक्तिक काहीही नाही. जे काही आहे ते गझलेवरील प्रेमामुळे हे समजून घ्यावे ही विनंती.
(गझलदिवाणा)बेसनलाडू
3 Jul 2008 - 1:17 pm | मनिष
प्रतिसाद आवडला.
3 Jul 2008 - 1:28 pm | विजुभाऊ
प्रतिसाद आवडला
हेच म्हणतो..छान उदाहरणे आहेत
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
3 Jul 2008 - 7:17 pm | चतुरंग
चतुरंग
3 Jul 2008 - 12:54 pm | केशवसुमार
धोंडोपंत,
सकाळी सकाळी एकदम सुरेख गझल सादर करून दिल खूष कर दिया.. धन्यवाद!!
सगळेच शेर सुंदर.. त्यात पण
राहिल्या आता न चिंता कोणत्याही
मी दिवाळे काढुनी नि:श्चिंत आहे
हा शेर विशेष आवडला..
नेहमी प्रमाणे आमचा दुसरा प्रतिसाद इथे वाचा
(आपला चाहता) केशवसुमार
3 Jul 2008 - 1:44 pm | विसोबा खेचर
पंत,
आज बर्याच दिवसांनी आपली अतिशय सुरेख गझल वाचायला मिळाली आणि खूप आनंद वाटला..
आपल्यकडून अशीच उत्तमोत्तम निर्मिती नेहमी व्हावी हीच सदिच्छा....
राहिल्या आता न चिंता कोणत्याही
मी दिवाळे काढुनी नि:श्चिंत आहे
या ओळी अतिशय आवडल्या!
तात्या.
3 Jul 2008 - 2:02 pm | ईश्वरी
छान गझल आहे. आवडली.
प्रत्येक शेरातील दुसर्या ओळीतील शेवटून दुसर्या शब्दाचे छान यमक जुळले आहे...प्रीत, वस्तीत, निश्चित, मस्तीत, रद्दीत
>>कविता बरी आहे....पण वृत्तात जरा फसले आहे.
विजूभाऊंनी अजून सांगितले नाही ...वृत्तात कुठे जरा फसले आहे ते. जाणून घेण्यास उत्सुक.
ईश्वरी
3 Jul 2008 - 3:17 pm | पद्मश्री चित्रे
खुप आवडली गझल.
पण धोडोंपंत, हे वृत्त कुठले आहे? ओळखता आले नाही.' व्योमगंगा' का?
3 Jul 2008 - 3:58 pm | चित्तरंजन भट
राहिल्या आता न चिंता कोणत्याही
मी दिवाळे काढुनी नि:श्चिंत आहे
वा धोंडोपत. ही द्विपदी विशेष आवडली. बर्याच दिवसांनी गझल लिहिलीत. आता लिहिणे थांबवू नका.
3 Jul 2008 - 4:36 pm | सुवर्णमयी
राहिल्या आता न चिंता कोणत्याही
मी दिवाळे काढुनी नि:श्चिंत आहे
ये भविष्याचे पुन्हा चल स्वप्न पाहू
कालचा इतिहास त्या रद्दीत आहे
वा! हे दोन्ही शेर विशेष आवडले. सुरेखच आहेत.
3 Jul 2008 - 4:38 pm | लिखाळ
वा.. सुंदर गजल.
राहिल्या आता न चिंता कोणत्याही
मी दिवाळे काढुनी नि:श्चिंत आहे
ही द्विपदी खूप आवडली.
पुलेशु.
--लिखाळ.
3 Jul 2008 - 7:15 pm | लडदू
स्वप्न छान आहे.
रीत, प्रीत, वस्तीत, रद्दीत च्या गर्दीत 'निश्चिंत' जरा वेगळे वाटले. चालतही असावे.
असो.
================================
खरंतर लिहायचा कंटाळा आलाय तरी पण लिहिले. लडदू आहे ना मी!
3 Jul 2008 - 7:17 pm | चतुरंग
चतुरंग
3 Jul 2008 - 7:20 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पंत,
ब-याच दिवसानंतर सुंदर गझल वाचायला मिळाली, आवडली.
अजून येऊ द्या, एकापेक्षा एक सुंदर गझला !!!
3 Jul 2008 - 9:07 pm | अविनाश ओगले
सर्व शेर आवडले...
वादात पडण्याची इच्छा नाही.
गजलेचा आनंद मोलाचा...
22 Jul 2017 - 1:55 am | सत्यजित...
अतिशय सुंदर गझल! एकसे बढकर एक शेर!
>>>आठवण गेली तुझी देऊन झोका
मी पुन्हा आता गडे मस्तीत आहे>>>अहाहा...
>>>ये भविष्याचे पुन्हा चल स्वप्न पाहू
कालचा इतिहास त्या रद्दीत आहे>>>अप्रतिम!
आज अजून काही वाचणे नाही अता!