शासनसंस्था, विद्यापीठे,कुटुंबसंस्था आणि ह्या सगळ्यातून उद्भवलेली एक राक्षसी महत्त्वाकांक्षा ह्यांनी प्रयत्नपूर्वक आपल्या प्रत्येकात दडलेल्या रॅंछोला पार पाताळात दडपून टाकले आहे. त्याला आपण कधी शोधणार?
साऱ्या आयुष्याचा घोळ झाला आहे. कशाचाच अर्थ लागत नाही. चांगली कचकचून भूक लागलेली असावी. समोर वाफाळलेल्या नूडल्सची प्लेट यावी अन् कुणी आपल्याला सांगावे की तुला ते खाता येतील, पण एका शर्तीवर. ह्यातील एकेक नूडल वेगळी करून, काट्याभोवती लपेटून किंवा काड्यांनी वेचून खायची. नूडलचे एक टोक आपल्यासमोर, दुसरे कुठे आहे कळतच नाही. वेळ वाया जातो आहे, काय करावे सुचतच नाही. कुठून सुरुवात करावी, त्यानंतर काय करावे, काही काही कळत नाही. ह्यापेक्षा उपासमार होणे बरे. इथे तुमच्यासमोर दहा डिशेस आणून ठेवल्या आहेत. साऱ्यांमध्ये वेगवेगळे नूडल्स. तुम्हाला नूडल्स आवडतात की नाही, त्या खाण्याची पद्धत तुम्हाला ठाऊक आहे की नाही, हे कोणी विचारीत नाही. आपल्याला विचारू देत नाही. उलट म्हणतात, “मजा आहे तुमची. किती किती चॉइस आहे तुम्हाला. नाहीतर आमच्या वेळी.....”
“कन्फ्युजनही कन्फ्युजन है
सोल्युशन कुछ पता नहीं
सोल्युशन जो मिला तो साला
क्वेश्चन क्या था पता नहीं”
काय करायचे ह्या ढीगभर चॉइसचे? “तुझा खिमा करायचा की सीख कबाब?” असे कुणी बकऱ्याला विचारते? अंडे फ्राय करून खायचे की त्यातून जन्मलेले चिकन तव्यावर परतायचे? अरे, तुम्हाला वाटेल ते करा. त्या बकऱ्याला किंवा कोंबडीला पर्याय विचारून काय फायदा? त्यांना जिवंत राहण्याचा पर्याय तुम्ही देणार आहात काय? दारू पिऊन किंवा देवाला भजूनही प्रश्न सुटत नाही की दुःख व कन्फ्युजन कमी होत नाही.
“स्कॉलरशिप की पी गया दारू
गम तो फिर भी मिटा नहीं
अगरबत्तियॉं राख हो गयी,
गॉड तो फिर भी दिखा नहीं”
सर्वंकष नकाराचा पर्याय ज्या पिढीसाठी उपलब्धच नाही, तिने करावे तरी काय?
--आपल्या इडियट मनाला समजावून, फूस लावून वळवावे.
“होठ घुमा, सीटी बजा,
सीटी बजाके बोल, भैया-
आल इज वेल”
दप्तराच्या ओझाने वाकलेले अवघे आयुष्य, लाच देऊन काम करून घेण्याचे मिळालेले बाळकडू (हेच मूल्यशिक्षण). खेळणे, बागडणे टीव्हीच्या पडद्यावर सामावलेले. शिकण्याच्या आनंदाचा घोकंपट्टीने केलेला बट्ट्याबोळ.
“लिखलिखके पडा हाथमें अल्फा, बीटा, गॅमाका छाला
कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 ने पूरा बचपन जला डाला
बचपन तो गया, जवानीभी गयी
इक पल तो हमें जीने दो, जीने दो... ”
द्या मला थोडा लखलखता सूर्यप्रकाश
द्या मला थोड्या ओल्या श्रावणसरी
द्या मला एक अवसर जगण्याचा
आयुष्य ओठाला लावून घटाघटा पिण्याचा..
‘बेजबाबदार, निष्काळजी, खुशालचेंडू, सुखासीन’ ही सारी विशेषणे ज्या पिढीवर तीन्हीत्रिकाळ उधळली जातात, त्या पिढीची ही व्यथा आहे? ह्या कूल गाइज् व गाल्सच्या मनात इतका तेजाब आहे? अन् इतके सारे असूनही धमाल करायची, मस्तीची जिजीविषाही?
आपल्याला हे सारे कळायला २००९ साल उजाडावे लागले. विधु विनोद चोप्रा, राजकुमार हिरानी, अभिजात जोशी ह्या त्रिकुटाने ‘थ्री इडियट्स्’ ची कहाणी काळजीपूर्वक बांधली. आमिर, शर्मन जोशी व आर् माधवन् ह्या त्रिकुटाने रॅंछो, राजू व फरहान ह्या इडियट्स् ना जिवंत केले. करीना, ओमी वैद्य व बोम्मन इराणी ह्यानी त्यात रंग भरले आणि मग नवा इतिहास रचला गेला. मुन्नाभाईची परंपरा अधिकच उंचावणारा, प्रखर सामाजिक भान, कलात्मकता व व्यावसायिकतेची सांग़ड घालणारा, बॉक्स ऑफिसची गणिते पार उलटीपालटी करून टाकणारा सिनेमा जन्माला आला. यशाला पुजणाऱ्या, उगवत्या सूर्याला दंडवत घालणाऱ्या सिनेसृष्टीने (व तिचे अनुकरण करणाऱ्या भारतीय सिनेमाने) ह्या यशाच्या शिल्पकारांचे वारेमाप कौतुक केले. यशाचे माप भरभरून त्यांच्या पदरात टाकले. पण यश मिळूनही तुलनेने दुर्लक्षित राहिलेले थ्री इडियट्स् –स्वानंद किरकिरे, शंतनू मोइत्रा व शान. गीतकार, संगीतकार व गायक. ह्या तिघांना, विशेषतः स्वानंदच्या कर्तृत्वाला सलाम करणे हाच ह्या लेखाचा उद्देश आहे.
‘आल इज वेल’ आणि ‘गिव्ह मी सम सनशाइन’ ह्या दोन लेखांबद्दल वर लिहिले आहे. ‘झुबी-डुबी’ हे स्वप्नगीत आहे. “जैसा फिल्मोंमे होता है, हो रहा है हू-ब-हू”. म्हणजे हे सिनेमातील सिनेमाचे गाणे. त्याचे शब्द साधे असले तरी चित्रीकरण कल्पक व गमतीदार आहे. “जाने नहीं देंगे तुझे” चा स्वर करुण-गंभीर आहे. स्वानंद-शंतनूच्या जोडीने एकापाठोपाठ एक आशयघन व लोकप्रिय गाणी देऊन आपले नाणे खणखणीत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. “बहती हवा सा था वो” हे ह्या सिनेमातील सर्वोत्तम गीत. ह्या गाण्याने स्वानंदला आयफासोबत राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला. हा त्याचा दुसरा राष्ट्रीय पुरस्कार.
‘गागर में सागर भरना’ हे खरे गीतकाराचे काम. आपण ह्या घागरीच्या आकाराला दाद देतो, सागराच्या भव्यतेची तारीफ करतो, पण घागरीत सागर सामावून घेण्याच्या गीतकाराच्या कौशल्याकडे खूपदा आपले दुर्लक्ष होते.
स्वानंदनेही गुलजारसारखा रोमॅंटिसिजम जपला असला तरी त्याचा पिंड मुळात कवीचा नाही, तर गीतकाराचा आहे. सोपी, अर्थपूर्ण शब्दरचना, सिच्युएशनमध्ये विरघळून जाणारे गाण्याचे तरल पोत ही त्याची खास वैशिष्ट्ये ह्या चित्रपटात प्रकर्षाने जाणवतात. हा चित्रपट तरुणाईविषयक आहे. त्याच्या सर्व रचनेत खूपच मोकळेपणा आहे. म्हणून स्वानंदच्या तोंडची भाषाही तरुणांच्या तोंडची आहे. त्यातल्या प्रतिमा (उदा. बकरा, सीख कबाब, खिमा) त्यांच्या रोजच्या आयुष्यातल्या आहेत. अगदी गंभीर आशय मांडतानाही त्यावर बिनधास्त, काहीशा निष्काळजी वृत्तीचे आवरण आहे.
चित्रपटाची कथा सर्वांच्या परिचयाची आहे. त्याच्या शेवटच्या टप्प्यात आपल्याला हे गाणे भेटते. फरहान व राजू रॅंछोचा शोध घेत आहेत.पियाला, तिला नकोशा असलेल्या लग्नापासून परावृत्त करून ते आपल्यात सामील करून घेतात. आतापर्यंत रॅंछोने त्यांना चांगलाच चकमा दिलेला आहे. आपापल्या आयुष्याचा अर्थ शोधण्यास त्यांना भाग पाडणारा रॅंछो, कोणताच मागमूस न ठेवता, पार गायब झाला आहे. त्याच्या सहवासातला प्रत्येक क्षण, त्यातील अनोखेपण, जिंदादिली त्यांना आठवते आहे....
कसा बरे होता तो? काय म्हणावे त्याला आपण?
वाऱ्याची झुळूक, आकाशात डौलाने विहरणारा पतंग? मुक्त, स्वतंत्र, स्वच्छंद, कोणत्याही बंधनात बांधला न जाणारा तो मनमौजी. कुठे गेला तो? शोधा ना त्याला---
तो आमच्यातलाच एक होता, पण तरीही किती वेगळा होता तो आमच्याहून! आम्ही आखून दिलेल्या रस्त्यावरून मुकाटपणे, बिनबोभाट चालणारे बापडे. चालणेही एकदम नाकासमोर. लाल दिवा लागला की थांबा. हिरवा लागेल तेव्हा पुढे चला. रस्ता कुठे जातो जातो की तिथल्या तिथे प्रदक्षिणा घालतो हे प्रश्न विचारायचे नाहीत. तो मात्र स्वतःची वाट स्वतःच निर्मिणारा आहे. कुणीही न तुडविलेली, त्याच्या पावलांनी घडविलेली ही त्याची वाट. त्या वाटेने जाताना तो कितीदा तरी ठेचकाळला, धडपडला, पडला, पुन्हा उठला, आपल्या मस्तीत चालू लागला. कुठे पोहोचायचे ते त्याला अचूक माहीत होते का, दिशांचे अचूक ज्ञान होते का, कुणास ठाऊक. आम्हाला तर नव्हते बुवा....पण बहुधा असे काही नसावे. कारण त्याच्या लेखी महत्त्व गंतव्य स्थानाला नसून वाटचालीलाच होते---
आम्ही सदैव ‘उद्या’च्या काळजीत बुडालेलो. तो मात्र ‘आज’ मध्ये, ह्या क्षणामध्ये मश्गुल. त्याच्यासाठी, प्रत्येक दिवस हा सण आणि प्रत्येक क्षण हा उत्सव. आयुष्याला कडकडून भेटणारा, असा आमचा अनोखा, जिवलग दोस्त. तो आला कोठून आणि आमच्या हृदयाच्या तारा छेडून, आमच्या जीवनातील निद्रिस्त संगीत जागवून तो कुठे बरे गेला? शोधा ना त्याला, प्लीज---
अंगाची काहिली करणारा उन्हाळा आम्ही पार करू शकलो, कारण थंडगार सावली बनून तो आमच्या आयुष्यात आला. आमच्या आयुष्यातील भकासपणा आमच्या अंगावर आला तेव्हा रखरखीत वाळवंटातील हिरव्याकंच झाडीत लपलेल्या टुमदार गावासारखा तो आम्हाला सामोरा आला. ह्या बेदर्द दुनियेने आमच्या काळजावर ओरखडे काढले तेव्हा त्यावर मलमपट्टी करायला तोच पुढे सरसावला....
एका छोट्याशा विहिरीत घाबरत घाबरत जगणारे आम्ही बेडूक. विहिरीबाहेरील विराट दुनिया आमच्या परिचयाची नव्हती. तिच्या नुसत्या विचारानेच आमच्या काळजात धडकी भरत असे. तो मात्र मजेत नदीच्या विशाल पात्रात पोहत रहायचा. त्याला बुडण्याची भीती नव्हती की थकण्याची पर्वा. प्रवाहाविरुद्ध पोहण्याची हिम्मत करणारा तो पठ्ठ्या. आवारा ढगासारखा उन्मुक्त. तो आहेच लाखात एक, विलक्षण, आगळावेगळा. पण अखेरीस तो आमचा जिवलग आहे. कुठे गेला तो? शोधा ना त्याला--
असे स्वयंप्रज्ञ, स्वतःच्या मस्तीत, स्वतःच्या शर्तीवर जगणारे रॅंछो प्रत्येक पिढीत असतात. आपल्यामध्ये, आपल्या आसपास असतात, पण ते आपल्या नजरेला पडत नाहीत. कधी त्याचे नाव अरविंद गुप्ता असते. आयआयटीमधून पदवी घेतल्यानंतर अमेरिकेत जाण्याऐवजी खेड्यातल्या मुलांना हसतखेळत विज्ञान शिकवण्यात, ‘कबाड से जुगाड’ करण्यात तो आपले आयुष्य घालवितो, तर कधी सचिनदेव बर्मन बनून गावोगाव फिरून फकीर बैराग्यांकडून लोकसंगीताच्या चिजा जमविण्यात त्याला आयुष्याचे सार्थक वाटते. नव्या पिढीतला तो कदाचित सायकलवर जगभ्रमण करीत असेल किंवा पौर्वात्य-पाश्चात्य संगीताचे फ्युजन. पण तो जिथे कुठे असेल, तिथे जाऊन त्याला शोधायला हवा.
हे जग उपयुक्ततावादी वीरू सहस्रबुद्धेंचे होऊ द्यायचे नसेल, दहावी-बारावीच्या निकालानंतर नेमाने घडणाऱ्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर रॅंछोला शोधायलाच हवे.
शासनसंस्था, विद्यापीठे,कुटुंबसंस्था आणि ह्या सगळ्यातून उद्भवलेली एक राक्षसी महत्त्वाकांक्षा ह्यांनी प्रयत्नपूर्वक आपल्या प्रत्येकात दडलेल्या रॅंछोला पार पाताळात दडपून टाकले आहे. त्याला आपण कधी शोधणार?
प्रतिक्रिया
8 Jan 2013 - 10:13 pm | चिर्कुट
आजच पुन्हा एकदा वाचलेला भडकमकर मास्तरांचा नाट्यसमीक्षक व्हा ... हा लेख आठवला :)
8 Jan 2013 - 11:47 pm | अर्धवटराव
रँछो ला पुरेपूर न्याय देणारी समीक्षा आवडली.
दोस्त को मनाए, या उसकी रोती हुई मां को... उस्से बेटर मटरपनीर पे कॉन्सन्ट्रेट करो ना यार :)
अर्धवटराव