नवीन नाटक - "गांधी आडवा येतो"

श्रीगुरुजी's picture
श्रीगुरुजी in जनातलं, मनातलं
31 Dec 2012 - 1:06 pm

प्राध्यापक बुद्धीभास्कर एक विद्वान आणि प्रथितयश प्राध्यापक. संध्या (पत्नी), माया (डॉक्टर असलेली मुलगी) व (श्याम) मुलगा असे त्यांचे चौकोनी कुटंब. त्यांचा मुलगा कोणत्याच नोकरीत टिकत नसल्याने प्राध्यापक अस्वस्थ आहेत. महाविद्यालयातल्या आपल्या एका विद्यार्थिनिशी अतिप्रसंग केल्याचा आरोप त्यांच्यावर येऊन त्यांना सध्या निलंबित केले आहे व त्या प्रकरणाची एक समिती चौकशी करत आहे. यामुळे घरात तंग वातावरण आहे.

अचानक मुलगी त्यांच्यावर बॉम्बगोळा टाकते. लाल्या नावाच्या झोपडपट्टीतल्या एका टपोरी गुंडाच्या प्रेमात आपण पडलो असून एक महिन्यापूर्वीच त्याच्याशी गुपचुप लग्न केल्याचे ती सांगताच प्राध्यापकांचा आणि विशेषतः त्यांच्या पत्नीचा संताप अनावर होतो. या धक्क्यातून सावरण्याआधीच, लाल्याची झोपडी पडल्याने नवीन घर मिळेपर्यंत तो इथे येऊन राहणार आहे हे कळल्यावर त्यांना अजून एक जोरदार धक्का त्यांना बसतो. याच्यातून कसा मार्ग काढावा, लाल्याला घरात येऊ द्यावे का नाही आणि तो आल्यास त्याला जाण्यास कसे सांगावे हे ठरविण्याआधीच लाल्या घरात येऊन ठेपतो.

लाल्याचा टपोरी अवतार व त्याच्या तोंडातील रफ भाषा ऐकून दोघे पतिपत्नी हतबुद्ध होतात. अशातच प्राध्यापकांना एक फोन येतो आणि अचानक प्राध्यापक स्वतःहून लाल्याला घरी ठेवून घेण्यास तयार होतात. पत्नीचा विरोध झुगारून ते लाल्याला घरी राहण्यास सांगतात.

इकडे प्रेमभंगामुळे श्याम मनोरूग्ण होण्याच्या अवस्थेत आहे. त्याची मैत्रीण डॉली त्याला सोडून फिरोज नावाच्या एका दुसर्‍याच मुलाबरोबर गेल्यामुळे तो सूडाने पेटलेला आहे आणि त्याचवेळी मानसिक आजारी पडल्याची चिन्हे दिसत आहे. त्याच्या या अवस्थेत सुद्धा डीसीपी ची मुलगी प्रिया त्याच्यावर प्रेम करते व तिला कोणत्याही परिस्थितीत त्याला सुधारून त्याच्याशी लग्न करायचे आहे.

प्राध्यापकांच्याच इमारतीत वरील मजल्यावर राहणारे नाटककार जेऊरकर यांचा प्राध्यापकांना मनापासून मत्सर वाटतो. लायकी नसताना या माणसाचे कौतुक होते असे त्यांना वाटत राहते.

घरात असे तंग वातावरण असताना लाल्या तिथे रहायला येतो आणि काही काळातच मायाला एक वर्षासाठी एका खेड्यात जावे लागते. आता घरात माया नसते, पण इतर सर्वजण असतात आणि लाल्या पण असतो. माया घरात नसताना प्राध्यापक आणि त्यांची पत्नी लाल्याला सुधारायचे ठरवितात आणि त्याला गांधीजींची पुस्तके आणून देतात.

काही काळातच प्राध्यापकांवरील बालंट दूर होते, फिरोज एका आरोपावरून तुरूंगात जातो, श्याम सुधारतो व त्याचा आत्मविश्वास परत येतो. प्राध्यापकांचे निलंबन रद्द होऊन सुद्धा ते नोकरीचा राजीनामा देऊन आपल्याच चुनीलाला नावाच्या एका बिल्डर मित्राच्या मदतीने श्यामला बरोबर घेऊन कन्स्ट्रक्शन चा व्यवसाय सुरू करतात. पण तिथेही लोकांकडून नवीन इमारतीसाठी आगाउ पैसे घेऊनसुद्धा काम सुरू होउ शकत नाही कारण त्या जागेवरची झोपडपट्टी उठत नाही. त्यामुळे लोक पैशासाठी तगादा लावतात.

लाल्या त्याच झोपडपट्टीत रहात होता हे त्यांना समजते. पण झोपडपट्टी कशी उठवावी, पैशाचा तगादा लावणार्‍यांचा बंदोबस्त कसा करावा आणि चुनीलालकडे दिलेले लोकांचे पैसे कसे परत मिळवावे या विचाराने प्राध्यापक हतबुद्ध होतात.

त्याचवेळी नाटककार जेऊरकर एक नवीन नाटक लिहितात त्यात प्राध्यापक व त्यांच्यावर अतिप्रसंगाचे झालेला आरोप हेच कथासूत्र असते. हे नाटक रंगमंचावर आले तर आपली खूप बदनामी होईल हे प्राध्यापकांच्या लक्षात येतो.

इकडे फिरोज तुरूंगात गेल्यावर पुन्हा एकदा डॉली व श्यामचे सूत जमायला लागते व त्यामुळे प्रियाचा संताप होतो. श्याम पुन्हा एकदा आपल्यामागे यावा यासाठी ती प्रयत्न करू लागते.

एकंदरीत प्राध्यापक, श्याम व प्रिया हे आपापल्या समस्यांनी त्रस्त होऊन गेले असतात. प्राध्यापकांना नाटककार जेऊरकर, चुनीलाल, चौकशी समिती इ. चा बंदोबस्त करायचा असतो व त्याचबरोबरीने चुनीलालने ताब्यात घेतलेले लोकांचे पैसे परत मिळवायचे असतात आणि इमारतीसाठी झोपडपट्टी ऊठवायची असते. प्रियाला डॉलीचा ससेमिरा कायमचा चुकवायचा असतो. झोपडपट्टीसाठी आंदोलन करणार्‍या सामाजिक कार्यकर्त्याला श्यामला संपवायचे असते.

आपल्याला लाल्या मदत करेल अशी त्यांची आशा असते, पण लाल्या गांधीजींच्या विचारांनी भारून गेलेला असतो व आपले सर्व काळे धंदे त्याने बंद केलेले असतात.

अचानक सर्वांच्या मनासारखे होते. फिरोज तुरुंगातून सुटतो व डॉलीबरोबर लग्न करून तो शहर सोडून जायचे ठरवितो. श्याम प्रियाकडे प्रेमयाचना करून तिचे प्रेम स्वीकार करतो. चुनीलालने ताब्यात घेतलेले ४० लाख रूपये प्राध्यापकांना परत मिळतात. सामाजिक कार्यकर्ती रेल्वेरूळावर मेलेला आढळतो. नाटककार जेऊरकरांच्या चेहर्‍याला काळे फासले जाते व शेवटी पोलिसांनी लाल्याचे एनकाऊंटर केल्याची बातमी येते.

नक्की काय होते? लाल्या सुधारलेला असताना लाल्याचा एनकाऊंटर का होतो? चुनीलाल घेतलेले पैसे कसे परत देतो? फिरोज का तुरूंगात जातो व नंतर तो कसा सुटतो? तो शहर सोडून जायचे का ठरवितो? जेऊरकरांच्या चेहर्‍याला कोण काळे फासतो? सामाजिक कार्यकर्ता शेट्टी कसा मरण पावतो? . . . या सर्व प्रश्नांसाठी हे नाटक पहायला हवे.

यापूर्वी शफाअत खान यांचे "शोभायात्रा" हे जबरद्स्त नाटक पाहिले होते व ते अतिशय आवडले होते. एक जबरदस्त ब्लॅक कॉमेडी असे "शोभायात्रा"चे स्वरूप होते. सामाजिक दांभिकपणावर अतिशय उपहासगर्भ असलेली टीका त्या नाटकात होती. पण त्या तुलनेत "गांधी आडवा येतो" हे बरेचसे फिके आहे. "शोभायात्रा"च्या तुलनेत या नाटकाने काहीशी निराशा पदरी येते. "शोभायात्राची" उंची या नाटकाने गाठलेली नाही. सामाजिक दांभिकपणावर याही नाटकात कोरडे ओढलेले आहेत, पण ते अगदी हळूवारपणे.

लाल्याचे काम उमेश कामतने चांगले केले आहे. मिलिंद फाटक प्रा. बुद्धीभास्करांच्या भूमिकेत शोभून दिसतो. बाकी इतरांची कामे ठीकठाक. पार्श्वसंगीत व नेपथ्यही बरे आहे.

माझ्या दृष्टीने या नाटकाला ५ पैकी ३ गुण. ("शोभायात्रा"ला मी ५ पैकी ४.५ गुण दिले असते).

नाट्यसमीक्षा

प्रतिक्रिया

ऋषिकेश's picture

31 Dec 2012 - 1:31 pm | ऋषिकेश

आभार! पूर्ण परिक्षण वाचले नसले तरी साधारण अंदाज आल्याने नाटक बघायचे असे ठरवले आहे

शोभायात्राचा प्रभाव फार आहे. त्याच्याशी केवळ तुलना केली आहे म्हणून का होईना, पाहणे आले.

धन्यवाद.

माझीही शॅम्पेन's picture

31 Dec 2012 - 2:01 pm | माझीही शॅम्पेन

आमच्या मातोश्री आणि पिताश्री यांना नाटक आवडलेले आहे , त्यामुळे नक्कीच रेकमन्न्डेश !!!

शीर्षकातले एकेरी संबोधन खटकले.

घाशीराम कोतवाल १.२'s picture

2 Jan 2013 - 9:28 am | घाशीराम कोतवाल १.२

एकेरी संबोधन खटकले.
का खटकले ?
अहो आता लाच देणारे आणि घेणारे एक लाल गांधी दे दोन पिवळे गांधी एक हिरवा गांधी अस बोलतात
बाकी हे रंग नोटाच मुल्य आहे लाल गांधी १००० , पिवळे गांधी ५०० हिरवा गांधी १००

नाटकातली पात्रं बोलूदेत तसं, प्रत्यक्ष व्यवहारात जे काही चालतं ते सगळंच दाखवायचं म्हटलं तर कुणाचीच सुटका नाही मग. अंदाज अपना अपना

तिमा's picture

2 Jan 2013 - 7:15 pm | तिमा

गोष्ट वाचल्यावर नाटकाच्या लेखकाच्या बुद्धीची कींव येते.

अमोल केळकर's picture

3 Jan 2013 - 11:55 am | अमोल केळकर

नाटकाची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद. संधी मिळाली तर नाटक पहाता येईल

अमोल केळकर
मला इथे भेटा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Jan 2013 - 12:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नाटकाची छान ओळख करुन दिली आहे, धन्स.

-दिलीप बिरुटे

शोभायात्रा हे नाटक आता कुठे पहायला मिळेल? त्याची CD उपलब्ध आहे का?