कुसुमाग्रज म्हणाले होते-
सर्वात सुंदर आवाज
कुठेतरी कोणाच्या तरी पायातील बेड्या
खळ्ळकन तुटल्याचा
देव आनंद हा किमान चार पिढ्यांचा लाडका चॉकलेट हीरो. राज व दिलीप ह्या समकालीनांप्रमाणे त्याने कधी अभिनयकौशल्याचा दावा केला नाही. त्या काळातील नायिका जे करीत, किंबहुना कोणत्याही काळातील हिंदी चित्रपटाच्या नायिका जे करतात, ते त्याने नायक म्हणून केले. उदा. –छान छान कपडे घालून स्टाइलिश दिसणे व बागेत, डोंगरदऱ्या त गाणे म्हणत नाचणे. त्याने गंभीर भूमिकांना फारसा हात घातला नाही. त्याला विनोदाचे अंग नव्हते. वीर व करुण हे हिंदी चित्रपटातील महत्त्वाचे रस. पण देवला मारामारी करताना पाहणे म्हणजे डोळ्यांना व डोक्याला शिक्षा. करुणरसाविषयी तर बोलायलाच नको.
देख सकता हूँ मैं कुछ भी होते हुए
नहीं मैं नहीं देख सकता तुझे रोते हुए
(मजबूर, १९७४)
हे गाणे आनंद बक्षींनी बहुधा देव आनंदलाच उद्देशून लिहिले असावे असा संशय घेण्यासारखी परिस्थिती आहे.
असे सारे असूनही देव चालला. अगदी धोधो चालला. त्याचे कारण हिंदी सिनेमांच्या गाभ्यात असणाऱ्या शृंगाररसाच्या आविष्कारावरील त्याची हुकुमत. देव नसता तर धोतर-सदऱ्यातल्या भारतीय पुरुषांना ‘ष्टाइल’मध्ये रहायला,पोरींवर इंप्रेशन मारायला कुणी शिकवले असते अन् भारतीय स्त्रियांनाही लव्हरबॉय ‘दिसतो कसा आननी’ हे कसे कळले असते? देवच्या यशाचे बरेच मोठे श्रेय त्याच्या तमाम मर्यादांसकट त्याला एका नयनरम्य प्रतिमेच्या चौकटीत प्रस्थापित करणाऱ्या विजय आनंदचे व त्या प्रतिमेला अधिक जिवंत, उत्कट बनविणाऱ्या गाण्यांचे आहे. ‘१९८० पूर्वी पडद्यावर दिसला तो खरा देव, त्यानंतर त्याच्या नावाने वावरली ती त्याची सावली’ असे म्हणतात, ते उगाच नव्हे.
देवपटातून विजय आनंद व गाणी बाहेर काढली तर देवचे देवपण कितपत उरते, ह्याचा विचार करून पहा. प्रेमाच्या विविध विभ्रमांचे लोभस चित्रण करणारी ‘देव’गाणी हाच मुळात एका लेखमालेचा किंवा स्वतंत्र ग्रंथाचा विषय होऊ शकेल. सिच्युएशन, शब्द, आशय, सूर, चाल, टेकिंग –ह्या साऱ्या गोष्टी जेव्हा परस्परांत मिसळून जातात, तेव्हा उत्तम गाणे तयार होते. त्याची कितीतरी उदाहरणे देवपटात विखुरलेली दिसतात. ती पडद्यावर साकार करणारा देव मग आपल्याला विविध रूपांत भेटतो.
कधी ‘जॉनी मेरा नाम’ मध्ये तो-
पलभरके लिए कोई हमें प्यार कर लें,
झूठा ही सही ---
असे आर्जव करतो,
तर कधी प्रेयसीला
तेरे घरके सामने एक घर बनाउंगा,
तेरे घरके सामने दुनिया बसाउंगा
असे वचन देतो.
देव आनंदची ही सारी रूपे विलोभनीय आहेत हे खरे, पण ती सारी त्याच्या रोमॅंटिक चौकटीतीलच आहेत. त्याच्या ह्या भावमारू, शैलीबाज प्रतिमेला तडे देणारे मोजकेच चित्रपट आले. त्यातला सर्वात महत्त्वाचा होता ‘गाईड’. १९६५ सालचा हा सिनेमा म्हणजे हिंदी सिनेमातील मैलाचा दगड. इतका हटके, इतका कलात्मक आणि तरीही व्यावसायिक दृष्ट्या यशस्वी चित्रपट क्वचितच निर्माण झाला असेल.
हा चित्रपट काळाच्या किती पुढे असावा? सिनेमातली कॅबेरे डान्सर ‘रोझी’ असायची त्या काळात ह्या सिनेमाच्या ‘नायिके’चे नाव ‘रोझी’ असे होते. तिचे लग्न झालेले. नवरा पुरातत्त्वशास्त्रज्ञ. (त्या काळात पढालिखा, काबिल हीरोदेखील बी. ए. असायचा.) नायिका नवऱ्याशी भांडून, त्याचे घर सोडून गाईडचे काम करणाऱ्या नायकाच्या- राजूच्या घरात येऊन राहते. (पासष्ट साली लिव्ह इन रिलेशनशिप!) तोही तिच्या पाठीशी ठामपणे उभा राहतो. तिच्यासाठी जिवलग मित्राशी मारामारी करतो. मामाशी वाद घालतो, जन्मदात्या आईचे मन दुखवून नायिकेसोबत आपले घर सोडतो. वेगळ्या जातिधर्माच्या, वयाने मोठ्या, विवाहित बाईसाठी तो हे सर्व करतो, अन् तेही त्या दोघांच्या अनामिक नात्यासाठी. घरदार, दुनियादारी नाकारून दोघेही नव्या दुनियेच्या शोधात निघालेत. एका उघड्या ट्रकमधून त्यांचा प्रवास सुरू आहे. बंधने तोडण्यास उत्सुक स्त्री व तिच्या पाठीशी ठामपणे उभा, नात्याने तिचा कोणीही न लागणारा पुरुष. लो वेस्ट जीन्स घालणाऱ्या व त्यासोबतच करवॉ चौथ, वटसावित्री पुजणाऱ्या आजच्या जमान्यातही धाडशी वाटावी अशी ही सिच्युएशन व ती फुलवणारे हे गीत.
रोझी चालत्या ट्रकमध्ये राजूने दिलेले घुंगरू पायात बांधून उघड्या आकाशाखाली मुक्तपणे नाचायला सुरुवात करते. तिचे भावविभोर मन उन्मुक्त आहे, निर्भर आहे. सारी बंधने झुगारून, संकेत, नीतिनियम धाब्यावर बसवून, लोकनिंदेची किंमत मोजून तिने हे स्वातंत्र्य कमावले आहे. तिला आता मुक्त पक्षाप्रमाणे आकाशात विहरायचे आहे. तिचे हे उड्डाण आता कोणी रोखू शकणार नाही. कारण कुणाच्या थांबवण्याने ती आता थांबणार नाही.
काँटों से खिंच के ये आँचल, तोड़ के बंधन बांधी पायल
कोई ना रोको दिल की उड़ान को, दिल वो चला
आज फिर जीने की तमन्ना हैं
आज फिर मरने का इरादा हैं
अपने ही बस में नहीं मैं, दिल हैं कही तो हूँ कही मैं
जाने क्या पा के मेरी जिन्दगी ने, हँस कर कहा
आज फिर ...
मैं हूँ गुबार या तूफ़ान हूँ, कोई बताये मैं कहा हूँ
डर हैं सफ़र में कही खो ना जाऊ मैं, रास्ता नया
आज फिर ...
कल के अंधेरों से निकल के, देखा हैं आँखे मलते मलते
फूल ही फूल जिन्दगी बहार हैं, तय कर लिया
आज फिर ..
काहीशा अशाच वळणाचे आणखी एक गाणे आहे. राजकपूर-नर्गिसच्या ‘चोरी चोरी’ मधले.
पंछी बनूँ उडती फिरूँ मस्त गगन में
आज मैं आजाद हूँ दुनियाके चमन में
(हसरत जयपुरी, १९५६)
ह्या गीतातही उत्फुल्लपणे बागडणारी, स्वातंत्र्याकांक्षी नायिका आहे, पण तिला केवळ तिच्या बापाने अतिमायेपोटी बांधलेल्या बंधनांचा पिंजराच तेवढा तोडायचा आहे. तिचा रोमॅटिसिझम भाबडा आहे.
‘गाईड’मध्ये मात्र स्वातंत्र्य हे रोझीच्या अस्तित्वाचे मर्म आहे. म्हणूनच, आनंदाच्या शिखरावर असतानाच ती व्याकुळ झाली आहे.
जगण्याची आकांक्षा इतकी उत्कट असते तेव्हाच ह्या क्षणी मरण आलं तर ते आपण सहज स्वीकारू अशी उर्मी दाटून येते. एकाच क्षणी ‘जीने की तमन्ना’ आणि ‘मरने का इरादा’ मनात नांदतात, तेव्हा ही व्यक्ती स्वतःला सांगत असते-
“घाबरू नकोस, Live dangerously”
आतापर्यंत आयुष्यात फक्त काळोखी रात्र होती. पण आज नवी प्रभात उगवली आहे. मी डोळे चोळतचोळत समोर बघतेय, तर काय? नजर पोहोचेल तिथवर फुलांचे ताटवेच्या ताटवे बहरलेले दिसतात. आयुष्य आनंदाने ओतप्रोत भरले आहे. मी ठरवलेय् मनाशी – आता मागे वळून बघायचेच नाही. इतके सुंदर आयुष्य समोर वाट बघतेय् माझी.) मी सांगतेय् मनाला – “Live dangerously”
मी एवढी कशी बदलले अन् इतक्या कमी वेळात? मी स्वतः आहे तरी कोण हे मला स्वतःलाच कळेनासे झाले आहे. माझ्या आत मला जाणवतेय ते काय आहे- आयुष्याची खुमारी की जागं होऊ पाहणारं वादळ? मी आहे तरी कुठे? ह्या नवीन वाटेने चालताना मी हरवणार तर नाही ना? फिकीर नाही.मी चालतच राहणार आहे----
भारतात स्त्रीमुक्तीची चळवळ सुरू होण्याच्या एक दशकापूर्वीच स्त्रीच्या मुक्ततेचा अहसास स्पंदित करणारे गीत आपल्या पॉप कल्चरचा भाग बनले होते ही गोष्ट किती हृद्य आहे!
शैलेन्द्रच्या साध्या, अर्थवाही शब्दांचे हे गाणे काळजीपूर्वक ऐका. मनाच्या कानाने ऐका. रोझीच्या पायातील घुंगरासोबत तुम्हाला आणखी एक आवाज ऐकू येईल.कुसुमाग्रज म्हणाले होते-
सर्वात सुंदर आवाज
कुठेतरी कोणाच्या तरी पायातील बेड्या
खळ्ळकन तुटल्याचा.
प्रतिक्रिया
11 Dec 2012 - 10:27 pm | अन्या दातार
अप्रतिम.
छान सुंदर हातोटी आहे तुमच्याकडे. शीर्षक आणि कुसुमाग्रजांच्या ओळी वाचल्यावर पुढे वाचायची गरजच नव्हती, पण लेख वाचल्याशिवाय रहावले नाही. :)
11 Dec 2012 - 11:04 pm | सुनील
छानच लिहिलय.
ग्रेगरी पेकला आदर्श मानणारा देव हा कधीही सुपरस्टार झाला नाही तरीही धो-धो चालला, हे मात्र खरे.
अहं. मी म्हणतो, कृष्ण-धवल चित्रपटातील देव हाच खरा देव. त्यानंतर ...
11 Dec 2012 - 11:16 pm | हारुन शेख
एकदम मस्त लिहिलंय देवसाहबबद्दल. गाण्याचे रसग्रहणही खूप सुरेख. एक गाणे असे हळुवार उलगडायला लागणारं रसिक मन तुमच्याकडे आहे.
11 Dec 2012 - 11:27 pm | गणपा
फारच सुंदर लिहिलंय. वाचत रहावसं वाटलं.
12 Dec 2012 - 8:39 am | प्रचेतस
खूप छान
11 Dec 2012 - 11:34 pm | राही
देवानंदच्या बाबतीत गीत-संगीत अगदी जुळून येई. शब्द-सूर जसे काही त्याच्या ओठांतून बाहेर पडण्यासाठीच जन्मलेत असे वाटे.एकच उदाहरण: रेल्वे डब्याचा सीन, खाली देव आनंद आणि वरच्या बर्थवर वहीदा.आणि हा आपला गातोय अपनी तो हर आह एक तूफाँ है,उपरवाला जानकर अनजान है.
12 Dec 2012 - 12:27 am | बहुगुणी
एका चांगल्या गाण्याचाच नव्हे तर एका कालखंडाचाच थोडक्यात मागोवा घेतलात, लेख संपूच नये असं वाटलं. (असाच, अवीट गोडींच्या गाण्यांनी 'होता-त्यापेक्षा-मोठा' झालेला आणखी एक कलाकार म्हणजे सिल्व्हर-ज्युबिली कुमार राजेंद्र कुमार, निदान मला आपलं असं वाटतं.)
12 Dec 2012 - 12:40 am | विकास
लेख खुप आवडला. देव आनंद बद्दलच्या निरीक्षणाबाबत सहमत नाही असे म्हणणे जमणार नाही. ;) गाईड हा आवडता चित्रपट तसेच तेरे घरके सामने, काला पानी, सी आय डी वगैरे मोजके चित्रपट फिल्मी पण चांगले होते. गाण्यांच्या बाबतीत तो देखील नशिबवानच ठरला.
वहीदा बरोबरचेच "शौखियो मे घोला जाये..." , "रंगीला रे तेरे रंगमे..." आणि "फुलों के रंगसे" ही एस डी बर्मननी स्वरबद्ध केलेली गाणी एकदम आवडायची, आजही आवडतात. पण मी कॉलेजात असताना, असे जुने चित्रपट बघायला मिळणे केवळ दूरदर्शनवर आले आणि मला वेळ असला तरच शक्य असायचे... पण मग व्हिडीओ कॅसेट्सचा जमाना आला. अचानक एका व्हिडीओ लायब्ररीत "प्रेम पुजारी" दिसला. गाणी मस्त म्हणजे चित्रपट पण चांगलाच असणार असे गृहीत धरून ती कॅसेट घेऊन आलो आणि चित्रपट बघितला... मग काय... आरशासमोर उभा राहून स्वतःलाच, परत परत "बघशील परत? बघशील का?" असे म्हणत बसायची वेळ आली. :(
12 Dec 2012 - 1:40 am | आनन्दिता
अगदी अगदी आवडेश .....
खुप अभ्यासपुर्ण लेख "खोया खोया चांद खुला आसमान " म्हणत डोंगरतुन मस्त धावणारा देव आनंद नजरेसमोर आला:)
12 Dec 2012 - 2:46 am | तिरकीट
वा........
या निमित्ताने अनेक गाणी आठवली.
मेरा मन तेरा प्यासा......
दिन ढल जये...
में जिंदगी का साथ निभाता चला गया.....
अच्छा जी मे हारी मधला त्याचा आणि मधुबालाचा अभिनय तर लाजवाबच...
12 Dec 2012 - 7:59 am | ५० फक्त
गाईड बघुन आज देखील स्वप्नं पाहण्याचा मोह आवरत नाही तर त्याकाळातल्या लोकांची अवस्था काय होत असेल, खुप खुप छान लिहिलं आहेत अतिशय धन्यवाद.
12 Dec 2012 - 8:05 am | श्रीरंग_जोशी
सुंदर लेखन. असेच अधिक वाचायला आवडेल.
12 Dec 2012 - 8:31 am | इनिगोय
सुंदर लिहिलं आहेत. देवआनंदच्या हिंदी फिल्म इंडस्ट्रीतल्या स्थानाला 'गाईड' या एका सिनेमाने वेगळं काढलं.
हा सिनेमा त्याने एकाच हिंदी आणि इंग्रजी भाषेत -बॉलिवूड आणि हॉलिवूडसाठी करायला घेतला होता. खूप महत्त्वाकांक्षी असं हे प्रोजेक्ट होतं त्याचं.
पण इंग्रजी सिनेमासाठी आणलेल्या दिग्दर्शकाला त्या कथेचं मर्मच न समजल्याने ते व्हर्जन पार फेल गेलं. विजय आनंदने मात्र आर के लक्ष्मण यांच्या या कथेला 'गोल्डन' टच दिला. एकेका फ्रेमसाठी विचार करत, वाहिदा-देववर मेहनत घेत, अगदी रंगसंगतीचाही प्रचंड बारकाईने विचार करत, प्रसंगी देव आनंदशी वाद घालत पण नितांतसुंदर अशी ही कहाणी त्याने सादर केली. गाईड हा सिनेमाच एका लेखाचा विषय होईल...
गंमत म्हणजे, त्या वर्षी गाईडने एकुणेक मुख्य फिल्मफेअर अवाॅर्डस् खिशात टाकली, पण संगीतदिग्दर्शनाचं अवाॅर्ड काही त्याला मिळालं नाही! एकसेएक अप्रतिम आणि आजही एेकली जाणारी गाणी असूनही त्या वर्षी 'सूरज' (बहारों फूल बरसाओ) ला ते अवाॅर्ड मिळालं! ती एक वेगळीच गोष्ट आहे, पण त्याबद्दल पुन्हा कधीतरी.
12 Dec 2012 - 11:18 am | रामदास
आर.के. नारायण ?
12 Dec 2012 - 11:51 am | इनिगोय
हो, आर. के नारायण.. चुकून मिष्टेक झाली.
12 Dec 2012 - 8:43 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
हिंदी चित्रपटांतल्या माझ्या आवडत्या स्त्री-पात्रांपैकी एक ही रोझी. 'मी मुडक्या बाई संसाराची लाज टाकली' म्हणणारी स्मिता पाटीलही त्या निमित्ताने आठवली.
12 Dec 2012 - 12:07 pm | सस्नेह
माझ्या मते गाण्याच्या अर्थावर विवेचन करण्यापेक्षा त्यातून साधलेल्या परिणामाचे चित्रण केल्यास आवडले असते.
12 Dec 2012 - 12:31 pm | संजय क्षीरसागर
आय अॅग्री!
12 Dec 2012 - 3:27 pm | श्रावण मोडक
वाचतो आहे. मजा घेतो आहे. त्यापलीकडे काही प्रतिक्रिया देत नाही, उगाच!
12 Dec 2012 - 3:52 pm | टुकुल
लेख खुप खुप आवडला.
--टुकुल
12 Dec 2012 - 4:27 pm | स्पंदना
हे गाण या आधी खरच इतक भिडल नाही जितक कुसुमाग्रजांच्या ओळींनी जीवंत केल या गाण्याला! या दोन्हीचा मेळ घालणार्या तुम्हाला सलाम!
देवच एक गाण मला फार आवडत "तू कहॉ? ये बता...इस नशिली रात मे" काय म्हंटलय गाण हे. किती हळुवार अन त्यावर मान थरथरवत रस्त्यान फिरणारा देव!
12 Dec 2012 - 4:31 pm | स्मिता.
गाईड मधली गाणी कळायला लागलं तेव्हापासून ऐकतेय आणि त्यांचा पुनःपुन्हा आस्वाद जरी घेतला असला तरी चित्रपट मात्र मी आताच काही महिन्यांपूर्वी पाहिला.
चित्रपट काळाच्या खरंच खूप पुढचा आहे. तो बघून मी आजच्या काळात अंतर्मुख झाले तर त्या काळच्या लोकांची काय स्थिती झाली असणार. रोझीची व्यक्तिरेखा म्हणजे स्वतंत्र आणि निर्णयक्षम स्त्रीचं प्रतिक! या गाण्याबद्दल म्हणाल तर आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर त्याचा अर्थ अधिकाधीक उलगडत जातोय. तो तुम्ही खूप सुरेख पद्धतीने मांडलाय. आणखी लिहा.
12 Dec 2012 - 7:29 pm | किसन शिंदे
फारच सुंदर लिहिताय सर.
तुमच्या लेखांची आता चटक लागतेय कि काय असे वाटू लागलेय.
12 Dec 2012 - 7:40 pm | मनराव
छान लिहिलय........
12 Dec 2012 - 8:04 pm | पैसा
हे गाणं तर शैलेन्द्रच्या सर्वोत्तम गाण्यांपैकी आहेच. पण लेखाच्या निमित्ताने देवची 'अभी न जाओ छोडकर' 'दिल का भँवर करे पुकार' 'मैं जिंदगी का साथ निभाता चला गया' अशी कित्येक गाणी आठवली. धन्यवाद!
13 Dec 2012 - 1:04 pm | कवितानागेश
आवडता सिनेमा, आवडते गाणं.... :)
14 Dec 2012 - 5:54 pm | प्यारे१
मस्त लेख!
बाकी देव आनंद साहेबांची गाणी ऐकावीत, पहावीत, काळे पांढरे, ज्वेलथीफ, जॉनी मेरा नाम वगैरे पर्यंतचे इतर दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेले सिनेमे थोडी कळ सोसून (हाणामार्या,अभिनय यासाठी) पहावेत. आणखी काय हवं?
14 Dec 2012 - 6:17 pm | नि३सोलपुरकर
रुपन साहेब, खुप सुंदर.
मस्त लेख.
आणी शैलेन्द्रच्या साध्या, अर्थवाही शब्दांपुढे ...नतमस्तक
14 Dec 2012 - 7:16 pm | शुचि
फेसबुक वर शेअर केलं आहे. सासूबाईंना दुवा पाठवला आहे. या दोन्हीतच काय ते उमजा.