मला दादला नलगे बाई !
(1) सत्वर पाव गे मला ! भवानिआई रोडगा वाहिन तुला !
सासरा माझा गांवीं गेला ! तिकडेच खपवी त्याला ! !
सासू माझी जाच करती! लवकर निर्दाळी तिला
जाऊ माझी फडफड बोलती ! बोडकी कर ग तिला !
नणंदेचे पोर किरकिर करिते ! खरूज होऊं दे त्याला !
दादला मारून आहुती देइन ! मोकळी कर ग मला !
एका जनार्दनी सगळेचि जाऊं दे ! एकटीच राहूं दे मला
(2) मोडकेसें घर तुटकेसें छप्पर देवाला देवघर नाही
मला दादला नलगे बाई !
फाटकेच लुगडें तुटकीसी चोळी ! शिवाया दोरा नाही !
जोंधळ्याची भाकर आम्बाड्याची भाजी ! वर तेलाची धार नाही !
मोडका पलंग तुटकीसी नवार ! नरम बिछाना नाही !
सुरतीचे मोती गुळघाव सोने ! राज्यात लेणे नाही !
एकाजनार्दनी समरस झालें ! तो रस येथे नाही !
गुळ्घाव.. पांढरेही नाही, लालही नाही, दोहोंमधला रंग. सुरती मोती ... तजेलदार मोती. लेणे.. दागिना
संत एकनाथांची ही दोन पदे. ग्रामिण जनतेवर एकदम मजबूत पकड बसवायला, (यात पुरुष आले, बायकाही आल्या,) यातली नाट्यमयता उपयोगी पडते. यात मी सांगण्यासारखे काही नाही. पुढील दोन लेखात त्यांचे चरित्र व साहित्य यांची माहिती मी देणार आहे. पण संताचे चरित्र व वाङ्मय यांनी बिचकून जाउ नये म्हणून ही सुरवात.
शरद
( कोण आहे रे तिकडे ? जरा शाहीर साबडेच्या,( उदा. वावटळ सिनेमा ) लिन्का द्याना. धन्यवाद)
शरद
प्रतिक्रिया
8 Dec 2012 - 10:39 am | श्री गावसेना प्रमुख
http://www.youtube.com/watch?v=5cbKjqgeb-4
टायटल असे आहे दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई
लोकगीत छान आहे
8 Dec 2012 - 12:08 pm | ज्ञानराम
सुरुवात उत्तम आहे, आणखी येऊद्या . प्रतिक्षेत...
8 Dec 2012 - 2:18 pm | परिकथेतील राजकुमार
फारच 'कॅची' शिर्षक.
11 Dec 2012 - 8:16 pm | बॅटमॅन
स्त्रीमुक्तीसंदर्भात तर अगदी जाँटी र्होड्ससारखे कॅची शीर्षक.
8 Dec 2012 - 2:31 pm | पैसा
पुढचे भाग लवकर येऊ द्यात!
8 Dec 2012 - 7:58 pm | चिर्कुट
संत वाङ्मयातील साधेपणा आणि ग्रामिण समाजाचे 'पर्फेक्ट' (मराठी?) चित्रण मला खूप भावते. संत एकनाथांबद्दल माहिती असलेल्या १०५ वेळा थुंकणाया माणसाची गोष्ट सोडून इतर माहिती वाचण्यास उत्सुक आहे.
अवांतराबद्द्ल़़ क्षमस्व : या शिर्षकावरुन एक जुनी आठवण ताजी झाली.
शाळेत मराठी शिकवायला आम्हाला श्री नलगे सर होते त्यांनी श्लेष अलंकाराचे उदाहरण देताना नेमके "औषध न लगे मजला" हेच दिले आणि याचे स्पष्टीकरण देताना ओळीत 'न लगे' आणि 'नल गे' असा श्लेष देवयानीने केला होता हे सांगितलं. यावर "यात देवयानीने अजून एक तिसरा श्लेष ('नलगे') लपवलेला आहे" अशी कंडी मी हळूच वर्गात पसरवली होती.. :)
8 Dec 2012 - 8:31 pm | राही
संत एकनाथांवर खूपच लिहिण्यासारखे आहे.त्यांची नाथपंथी भारुडे,बालकृष्णाचे भक्तिरसपूर्ण वेल्हाळ अभंग,एकनाथी भागवत,जोगवा,पुष्कळ काही. ज्ञानेश्वरी,एकनाथी भागवत,दासबोध आणि तुकारामगाथा हे प्राकृत मराठीचे चार वेद मानले जातात.लेखमालेविषयी उत्सुकता आहे.नाथपंथाकडून त्यांचा आणि ज्ञानेश्वरांचा भक्तिपंथाकडे झालेला प्रवास हा सदैव कुतूहलाचा विषय राहिला आहे.
11 Dec 2012 - 7:57 pm | विकास
हे दुसरे पद मला माहीत नव्हते. त्यातून नाथांना नक्की काय म्हणायचे आहे हे किमान प्रथमदर्शनी तरी समजले नाही. :( तेंव्हा अजून लिखाण येउंदेत.
हा धागा बराच खाली गेल्याने आधी लक्ष गेले नव्हते. आणि कालच "बोला!! स्त्री मुक्ती आंदोलन, झिंदाबाद!!!" धागा उघडून बघितला असल्याने, या धाग्याचे शिर्षक वाचून बिचकतच उघडला होता... :-)