रात्र चांदणी

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
8 Dec 2012 - 6:30 am

रात्र चांदणी

ही रात्र चांदणी वाटे कधी संपूच नाही
कोडे मिठीतले वाटे कधी सुटूच नाही

शब्द तुझे ऐकण्यास अधीर कान झाले
बोलण्याचे शब्द मात्र मुके कसे झाले?
मुक्या शब्दांचे गीत कधी झाले
ऐकतांना कळले नाही

आकाशी चंद्र असूनी चांदण्याही आहे
सागरास भेटण्या सरीता अतूर वाहे
वेगळी नव्हेत दोघे एकरूप झाली
कुठे ते कळले नाही

प्रीतीच्या फुलांनी आसमंत धूंद झाला
वार्‍यासही आवडूनी तो वाहवत गेला
तुझ्या असण्यात माझी मी तूझी झाले
कधी कळले नाही

- पाषाणभेद

शृंगारकविता

प्रतिक्रिया

चित्रगुप्त's picture

8 Dec 2012 - 7:03 am | चित्रगुप्त

moon

अत्रुप्त आत्मा's picture

8 Dec 2012 - 7:05 am | अत्रुप्त आत्मा

@शब्द तुझे ऐकण्यास अधीर कान झाले
बोलण्याचे शब्द मात्र मुके कसे झाले?>>> अतिशय सहजभावनिक ...

हारुन शेख's picture

8 Dec 2012 - 8:36 am | हारुन शेख

शेवटच्या कडव्यात शृंगाराचे सूचक वर्णन सोज्वळ आणि कलात्मक वाटले. मीलनाची पावती देतांना चित्रपटात जसे फुलाला टेकणारे फूल , किंवा विझत जाणारा दिवा दाखवतात तसे. छान भावमग्न कविता. लिहित राहा.

प्रचेतस's picture

8 Dec 2012 - 9:03 am | प्रचेतस

खूप छान.

सस्नेह's picture

8 Dec 2012 - 11:32 am | सस्नेह

आवडली.

ज्ञानराम's picture

8 Dec 2012 - 12:10 pm | ज्ञानराम

छान,,

पैसा's picture

8 Dec 2012 - 2:35 pm | पैसा

पाभे, और आन्दो!

चौकटराजा's picture

9 Dec 2012 - 5:52 pm | चौकटराजा

या कवितेतील शेवटच्या तुझ्या असण्यात माझी मी तूझी झाले या ओळीमुळे ही कविता प्रथम पुरूष एकवचनी निवेदन अशी असावी असे वाटते. असे जर असेल तर वेगळी नव्हेत दोघे एकरूप झाली ही ओळ मात्र थर्ड पार्टी नॅरेटर ची वाटते. इथे गोची आहे. ती ओळ फारतर वेगळी नव्हेत दोघे एकरूप झाली च्या ऐवजी " झालो" असे म्हणता आले असते. चांदण्या रात्रीतले ते स्वपन तू विसरून जा हे गीत ऐकून पहावे त्यात प्रथम पासून शेवट पर्यंत प्रथमपुरूषी एकवचनी निवेदन कविने कसे अचूक साधले आहे ते कळेल.

पाषाणभेद's picture

10 Dec 2012 - 7:30 am | पाषाणभेद

सर्वप्रथम वाचकांचे अन प्रतिसादकांचे धन्यवाद.
(माझे इतरांसाठीचे प्रतिसाद कामामुळे रोडावले तरीही आपण हक्काने प्रतिसाद देत आहात हे स्तूत व अभिनंदनीय आहे.)

आता चौकटराजा यांच्या प्रतिसादासाठी:

ही कविता "प्रथम पुरूषीच" आहे (अन शेवटच्या कडव्या ती कविता एक स्त्री म्हणते आहे). :-)

आपण दुसर्‍या कडव्याचे नाते तिसर्‍या कडव्याशी जोडत आहात त्यामुळे तसे वाटणे स्वाभाविक आहे. परंतु माझ्या कल्पनेत तसे काही नव्हते.

"आकाशी चंद्र असूनी चांदण्याही आहे
सागरास भेटण्या सरीता अतूर वाहे
वेगळी नव्हेत दोघे एकरूप झाली
कुठे ते कळले नाही"

यात पहिली व दुसरी ओळ सहजसाध्य आहे. तिसर्‍या ओळीत (वेगळी नव्हेत...) मात्र आपण समजता तसा समज होवू शकतो त्याच प्रमाणे सागरास सरीता जेथे मिळते तेथे त्या दोहोंतील भेद लक्षात येत नाही. त्या अर्थाने ती दोघे (की ते दोघे?) एकरूप होत असतात.

आणखी एक. "वेगळी नव्हेत दोघे एकरूप झाली" याची अनुभूती "वेगळी नव्हेत; दोघे एकरूप झाली" (किंवा "वेगळी नव्हेत दोघे; एकरूप झाली") असेही होवू शकते.

याच ओळीची अधीक परिष्कृत आवृत्ती करायचीच ठरली तर "वेगळी नव्हेत दोघे; ती एकरूप झाली" किंवा "वेगळी नव्हेत दोघे, ती त्यात मिळाली" अशी होवू शकते.

असा वरील अर्थ घेतला तर शेवटल्या कडव्याच्या बाबतीत आपण म्हणता तसा दुसरा अर्थ किंवा कवितेतली दुसर्‍या कडव्याच्या संदर्भाने येणारी उणीव जाणवाणार नाही.

अधिक अवांतरः मी बर्‍याचदा बोललो होतो की "कविता अन मुल होईपर्यंत खाजगी गोष्ट असते. एकदा (ती व ते) झाल्यानंतर सार्वजनिक होते. त्यानंतर त्यावर कविचा अन आईवडीलांचा त्यावर हक्क राहत नाही."
त्याच अन्व्ययाने वरील कविता ही तुमची आहे. त्याचा अर्थ लावणे तुम्हासारख्या जाणीवेच्या वाचकांच्या हातात आहे व तो हक्क मी तुमच्या हाती सोपवतो.

पुनश्च धन्यवाद.

पाषाणभेद's picture

10 Dec 2012 - 7:47 am | पाषाणभेद

प्रतिसाद संपादन न करता आल्याने खालील दुरूस्तीचे ताक अन पानपुरक वाचावे.

ही कविता "प्रथम पुरूषीच" आहे (अन शेवटच्या कडव्यात ती कविता एक स्त्री म्हणते आहे हे जाणवते).

त्याचप्रमाणे "वेगळी नव्हेत दोघे एकरूप झाली" यात कविता म्हणणारी नायिका व तिचा नायक हे दोघेही एकरूप झाली असाही भिन्न अर्थ निघू शकतो.

(बाकी अशा भिन्न अर्थ असणार्‍या ओळीचे आता परिष्करण करावे काय असे मला आता वाटू लागले आहे.)

पैसा's picture

10 Dec 2012 - 9:47 pm | पैसा

ती ओळ सरिता आणि सागर यांच्याबद्दल आहे असं मला प्रथम वाचताना वाटलं. त्यामुळे कुठेही रसभंग झाला असं वाटलं नाही. आहे ते तसंच राहू द्या!

जेनी...'s picture

10 Dec 2012 - 7:52 am | जेनी...

नाइस . :)

मदनबाण's picture

10 Dec 2012 - 8:47 pm | मदनबाण

दफोराव लगे रहो ! :)

निरन्जन वहालेकर's picture

10 Dec 2012 - 9:09 pm | निरन्जन वहालेकर

"शब्द तुझे ऐकण्यास अधीर कान झाले
बोलण्याचे शब्द मात्र मुके कसे झाले? "

सुन्दर ! ! !

अनिल तापकीर's picture

13 Dec 2012 - 10:11 am | अनिल तापकीर

खुप सुंदर