समसचा २० वा वाढदिवस

विकास's picture
विकास in जनातलं, मनातलं
3 Dec 2012 - 10:17 pm

३ डिसेंबर १९९२ ला नील पॅपवर्थ नामक ब्रिटन मधील एका टेलीकम्युनिकेशन मधे काम करत असलेल्या इंजिनियरने मोठ्या संगणकावर Merry Christmas असे टंकले आणि "एंटर" चे बटन दाबताक्षणी ते युकेस्थित व्होडाफोनच्या एका डायरेक्टरच्या हाताच्या पंजापेक्षा मोठ्या असलेल्या मोबाईल फोनवर चमत्कार झाल्याप्रमाणे ते अवतिर्ण झाले आणि जगातला पहीला एस एम एस तयार झाला. अर्थात एका हाडाच्या इंजिनियरच्या दृष्टीने त्याने एक प्रयोग केला आणि तो यशस्वी झाला. यापुढे काही नव्हते. पण कंपनीच्या उद्योजक मनास त्यातूनच एक मोठी धंद्याची संधी दिसली. पुढे बघता बघता एस एम एस चे प्रस्थ वाढत गेले. अर्थातच हा पॅपवर्थ काही एस एम एस कल्पनेचा जनक नव्हता तर त्याचे श्रेय फिनलंडच्या एका माजी सरकारी अधिकार्‍यास, मॅट्टी मॅकोनेनला जाते, ज्याने ही कल्पना सर्वप्रथम १९८४ साली मांडली होती. तरी देखील त्या शोधाचे श्रेय हा मॅट्टी स्वतःकडे घेत नाही, कारण तो अस्तित्वात त्याने स्वतः आणला नाही म्हणून.

या एस एम एस ने अमेरीकेत हवे तितके बस्तान बसवले असे वाटत नाही. अर्थात आत्ताची टीन एजर आणि थोडी त्यावरील पिढी जरी टेक्स्टींग करत असली तरी. पण भारत आणि इतर अनेक राष्ट्रात त्याने चांगलेच मूळ धरले आहे. कालांतराने, एस एम एस बरोबरच एम एम एस पण चालू झाले. स्मार्ट फोन्समुळे हे अधिकच सोयिस्कर होऊ लागले. याचा उपयोग जसा सहज संवादासाठी होऊ लागला तसेच त्याचे महत्व हे आपत्कालीन स्थितीत पण जाणवू लागले.

एस एम एस मुळे दोन ठळकपणे दिसणार्‍या गोष्टी नक्की झाल्या. एक म्हणजे इंग्रजीचा वापर करत पण lol, omg, ttyl वगैरे अनेक शब्दांचे पेव फुटले. कुठेही औपचारीकतेने बैठका घेऊन यातील एकाही शब्दाला प्रातिनिधिक मान्यत न मिळता ही एक आगळी वेगळी लोकभाषा तयार झाली!

दुसरे म्हणजे एस एम एस मधील Character मर्यादा लक्षात घेऊन त्याचा इंटरनेट माध्यमात वापर करत ट्वीटर तयार झाले. इंटरनेट अ‍ॅक्सेस असलेल्या कुठल्याही लहान स्क्रीनच्या फोनवर वाचता येईल असे हे आगळेवेगळे संवादाचे माध्यम तयार झाले आणि त्याने अक्षरशः क्रांतिकारी मदत या जगात केली, त्याच बरोबर भारताच्या बाबतीत म्हणायचे तर अगदी अमिताभ पासून ते दिग्गीराजांपर्यंत अनेक जणांना vent out करायचे एक साधन मिळाले!

आजच्या जगाय तुम्ही टेक्स्टींगवर किती अवलंबून आहात? का फेसबुक्/इमेल कडे गाडी अधिक वळली आहे? एसएमएस संज्ञेतील कुठले शब्द तुम्ही जास्त वापरता असे वाटते? नव्याने तयार झालेले काही शब्द? मराठीत असे शब्द आहेत का? वगैरे वगैरे वगैरे...!

तंत्रमौजमजाप्रश्नोत्तरे

प्रतिक्रिया

समसचा इतिहास माहित नव्हता. लेख आवडला. मी पूर्वी समस थोडे तरी करत असे (व त्यातील मजा घेत असे)पण आता अजिबात नाही. याचे कारण म्हणजे पूर्वीचे साधे सेलफोन मला सोपे वाटत व आत्ताचे टचस्क्रीन फोन तेवढे आवडत नाहीत. फेसबुकवर मी नाही. नवर्याच्या खात्यातून काही मैत्रिणींशी कधीकाळी संभाषण होते तेवढेच. गबोल फारसे वापरत नाही. इमेल्स मात्र भरपूर, त्यातही नातेवाईकांशी संवादाचे साधन म्हणून. क्वचित मित्रमंडळींचे निरोप येतात/ जातात. समस संज्ञेतील शब्द फारसे माहित नाहीत. भावाच समस आल्यावर ओके एवढेच कळवते. काही लोक मात्र त्यांच्या हाताचे एक्सटेंन्शन असावे असे सेलफोन वापरतात. ड्राईव्ह करतानाही समोरची गाडी विचित्र चालायला लागली की आपल्याला कळतेच. ;) पंधरा सतरा वर्षांची मुलेही समस करतच असतात. अर्ध्या तासाने बाहेर भेटणार असले तरी समस चालूच असतात असे एका मुलीच्या आईने बोलताना सांगितले त्यावेळी शेजारी उभी राहिलेली १६ वर्षाची मुलगी तिच्या बॉयफ्रेंडला सतत समस करत होती. यात चांगले वाईट असे काही म्हणत नाहीये.

प्रास's picture

3 Dec 2012 - 11:02 pm | प्रास

टिपिकल आज्जी-टाईप प्रतिक्रिया!

एसेमेसचा इतिहास कळला.

धन्यवाद!

रेवती's picture

4 Dec 2012 - 1:01 am | रेवती

हा हा हा. मलाही आत्ता तो प्रतिसाद तसाच वाटतोय. एवढे टंकूनही मला जे म्हणायचं होतं ते शेवटी सांगता आलं नाहीच.

श्रीरंग's picture

4 Dec 2012 - 1:05 am | श्रीरंग

"समस" व "गबोल" हा भाषांतराचा अतिरेक पाहून थक्क झालो!

हेही मला आधी माहित नव्हतं पण मिपावरच सदस्य एकमेकाला गबोलूया किंवा गबोल्यावर ये असे म्हणत असत. समसही त्यातलाच प्रकार! मला वाटलं की आज्जीची भूमिका गंमत म्हणून करताना खरच आपल्याला हे प्रकार माहित नाहीत. त्यामुळेच आपण अप्रगत नाही हे सिद्ध करण्याचा प्रकार आहे तो. ;)
माझ्या भावाचे कोणतेतरी काम केल्यावर त्याने u r gr8 असा समस केला. न समजल्याने नवर्‍याला फोन करून विचारले तर हा प्रकार समजला.

विकास's picture

4 Dec 2012 - 1:43 am | विकास

मिपावरच सदस्य एकमेकाला गबोलूया किंवा गबोल्यावर

अहो "चॅट" या इंग्रजी शब्दावर मराठी व्याकरणप्रयोग करून, "चॅटतोय (चाटतोय)" म्हणणारे पण पाहीलेत. आणि त्यांच्या चेहर्‍यावर काही विनोदी भाव पण नसतो... म्हणजे खाली बहुगुणींनी म्हणल्याप्रमाणे नुसते इंग्रजीच नाही तर मराठीचे पण हाल. :-)

बहुगुणी's picture

4 Dec 2012 - 2:20 am | बहुगुणी

अत्रुप्त आत्मा's picture

3 Dec 2012 - 11:02 pm | अत्रुप्त आत्मा

माहितीपूर्ण लेखन.... धन्यवाद :-)

बहुगुणी's picture

4 Dec 2012 - 12:17 am | बहुगुणी

पण SMS आणि texting च्या निमित्ताने इंग्रजी शब्दांचं जे भयावह, अनावश्यक लघुरुपांतर केलं जातं ते पाहिलं की कधीकधी चूक वाटतं. पूर्वी जेंव्हा पोस्टाच्या तारेत प्रत्येक शब्दाला पैसे पडायचे तेंव्हा, किंवा Twitter सारख्या माध्यमात १४० कॅरॅक्टरची मर्यादा पाळतांना किंवा SMS/text साठी जेंव्हा data साठी पैसे पडतात तिथे असं लघुरूप वापरणं एकवेळ समजू शकतो, पण जेंव्हा google chat वा इतर तत्सम माध्यमांमध्ये लिहितांना अशा लघुरुपांतराची गरजच नाही तिथेही (बरेचदा कॉलेजतरुणांनी) असा वापर केलेला पाहिला की चीड येते:

काही त्रासदायक उदाहरणं:
Happy days end, I am on the way to work च्या ऐवजी hapi dayz end, on da way bck to wrk
Please send all your phone numbers ASAP च्या ऐवजी Pl snd ur al nos ASAP
Home is great, how are you च्या ऐवजी Homs gr8 Hw ru

या तरुण मुलांमध्ये मला, बरेचदा जन्मजात नसलेली, पण acquired अशी, dyslexy तयार होतांना दिसते, ही मुलं व्याकरणयुक्त, चांगलं इंग्लिश लिहिणं जणू विसरूनच जाताहेत की काय अशी काळजी वाटते.

हारुन शेख's picture

4 Dec 2012 - 3:43 am | हारुन शेख

तुमच्या म्हणण्यात तथ्य आहे खरं. पण काळानुसार हे असे काही बदल होतातच. आजच्या तरुणाईला पटकन व्यक्त होणं आवडतं , भावनेचा सडेतोडपणा रुचतो. म्हणून हे सगळं रुजलंय फोफावलंय. हे होत राहणार. भाषा बदलते. शेक्सपीयर च्या काळात जे इंग्लिश होतं ते तसं आता नाहीच. समस मधली शब्दांची लघुरूपे बर्याच वेळा खूप सर्जनशील वाटतात. आणि विरामचिन्हे न वापरता लिहिता येणे हा लिपीच्या उत्क्रांतीचा पुरावा आहे असे माझा एक मित्र म्हणतो. काहीही असो जोवर संवाद साधण्याची माणसाची प्रेरणा नष्ट होत नाही तोवर भाषा दुय्यम राहणार.

तुषार काळभोर's picture

4 Dec 2012 - 11:29 am | तुषार काळभोर

सर्वच जण वापरतात.
तुम्हीही Please send all your phone numbers ASAP असं वापरलंय As Soon As Possible ऐवजी..
काही जण कमी प्रमाणात वापरतात, तर काही जण (आपल्या पेक्षा जास्त) अतिरेक करतात.

अभ्या..'s picture

4 Dec 2012 - 12:40 am | अभ्या..

काही वर्षांपूर्वी बर्‍याच कला केल्या होत्या (दुसर्‍याशी बोलत बोलत स्क्रीनकडे न बघता टायीप करणे किंवा बाईक चालवत टायीप करणे) सध्या करत नाही. ;)
एसेमेस वापरताना पण त्याचे दुष्परिणाम लगेच कळू लागले होते. how are you चे hw r u? होऊ लागल्याने माझ्या असाईनमेंटस वर r u असेच शॉर्टमध्ये सवयीने टायीप केले जाऊ लागले. तेव्हापासून एसेमेस मध्ये सुध्दा पूर्ण टायीप करायची सवय लाऊन घेतली ती आजतागायत आहे.

नंदन's picture

4 Dec 2012 - 1:16 am | नंदन

आवडला. बहुगुणींच्या प्रतिसादाशीही सहमत.

थोडे अवांतर - काही दिवसांपूर्वी वाचलेली ही बातमी आठवली. याला कदाचित फ्रॉईडियन क्रॅश म्हणता येईल :).

Chance Bothe knows firsthand the dangers of texting and driving. The Texas man typed this message to a friend while driving home from college earlier this year, "I need to quit texting because I could die in a car accident and then how would you feel ..."

A few seconds later, Bothe's pickup veered off a bridge and dropped down a 35-foot-deep ravine.

पिवळा डांबिस's picture

4 Dec 2012 - 1:48 am | पिवळा डांबिस

एसएमएसचा इतिहास महिती नव्हता.
एलए मध्येदेखील एका लोकलगाडीचा असाच अपघात झाला होता दोनेक वर्षांपूर्वी...
ड्रायव्हरने लाल सिग्नलकडे दुर्लक्ष करून पुढल्या गाडीवर गाडी आदळली...
अपघात होतेवेळी तो गाडी चालवतांना टेक्स्टिंग करत होता...
आमच्या शेजारच्या सिमी व्हॅली गावातले अनेक कम्यूटर लोक होते त्या लोकलगाडीत...

हारुन शेख's picture

4 Dec 2012 - 3:48 am | हारुन शेख

काही भाकड पुस्तकांत हे प्रकार 'law of Attraction' म्हणून खपवले जातात .

धनंजय's picture

4 Dec 2012 - 2:44 am | धनंजय

लेख आवडला. खूप नवी माहिती मिळाली.

बहुगुणींच्या प्रतिसादाशी भावनिक दृष्टीने सहमत होतो, पण मग स्वतःकडे थोडे हसून घेऊन आता असहमत आहे. प्ल्झ क्ष्मे (plz xme), हेवेसांनल.

गेल्या दोन वर्षांत मी लघुसंदेश पुष्कळ जास्त वापरू लागलो आहे. प्रतिसंदेशी दर महागात पडून महिन्याचा "अमर्याद" दर स्वस्त पडू लागला, तसे माझे मलाच आश्चर्य वाटले.

स्पंदना's picture

4 Dec 2012 - 7:35 am | स्पंदना

हो काल एस एम एस चा वाढदिवस होता ते एफ एम वर ऐकल होत.

तुअम्ची भाषा घाला चुलीत. या एस एम एस मुळे पक्षी मरताहेत ही फार वाईट परिणामाची गोष्ट वाटते मला. भारतात तर ह्या देवीच्या नावान त्या बाबाच्या नावान, गणपतीच्या नावान, कोट्यावधी मेसेजेस पाठवले जातात. त्याचा दुष्परिणाम म्हणजे पक्ष्यांची घटती संख्या. सिंगापुर तर कंप्लीट खुळावल होत या एस एम एस च्या माग. आम्ही त्यांना अंगठाबहाद्दर म्हणायचो. नुसते अंगठे चालतात यांअचे.
ऑस्ट्रेलियात मोबाईल वापरण अतिशय महाग असल्याने, फार कमी वापरला जातो अन त्यामुळे आत्ता या क्षणी दारातलया दोन फळझाडांवर पोपटांची ही गर्दी अन भांडण चालली आहेत.

किसन शिंदे's picture

4 Dec 2012 - 8:14 am | किसन शिंदे

वर्षा-दोन वर्षापुर्वीपर्यंत एस एम एस ला असणारं महत्व नंतर स्मार्ट फोन्सच्या येण्याने खुप कमी झालंय. सध्या फेसबुक मॅसेंजर, जि टाॅक, वाॅट्स अप यांसारख्या आॅनलाईन मॅसेंजर मुळे एस एमएस चा वापर खुप कमी होताना दिसतो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Dec 2012 - 9:09 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वॉव. लेख आवडला. संदेशाची देवाण-घेवाणीसाठी नील पॅपवर्थ आणि त्याच्या पुढील पिढीनं जे काम केलं त्याला तोड नाही, अशा संशोधकांना संदेशवेड्या माणसाचा सही दिलसे सलाम.

लघुरुप संदेश आणि एका संदेशात इतकी शब्दमर्यादा यामुळे इंग्रजी भाषेतील शब्दांना नवनवे अर्थ प्राप्त झाले. इंग्रजी ही व्याकरण-बिकरणाच्या बाहेर गेली. भाषा ही काळानुरुप बदलत असते. आजच्या पिढीनं अनेक भाषांना हवं तसं वाकवलं. उच्चारानुसार लिहिणे ही लघुरुप संदेशाचं देणं आहे, असं मी मानतो.

कधीतरी चिन्हांच्या भाषेबद्दल बोलल्या गेलं होतं. चिन्हांची भाषा ही लघुरुप संदेशात आपला ठसा उमटवणार आह. विविध भावना व्यक्त करण्यासाठी जशा स्मायल्या [हसरी चिन्ह] वापरल्या जातात तशा काही चिन्हांची लघुरुप संदेशाला गरज पडणार आहे. आणि संदेशाची देवाण-घेवाण अजून घट्ट होणार आहे.

मराठी संदेशाबाबतची कोंडी अजून फूटलेली नाही. मी लिहिलेला मराठी संदेश सर्वांच्याच मोबाईल हँडसेटवर उमटेल ही शाश्वती नसते. चौकोनी चौकोनी डबे उमटल्यामुळे मराठी लघु संदेशाला मर्यादा आल्या आहेत, आणि दुसरे म्हणजे एकशे चाळीस शब्दांची मर्यादा. एक ओळ लिहिली की काना,मात्रे, वेलांटी, यामुळे शब्दमर्यादा येतात. [मनसेनं लक्ष घातलं पाहिजे] मराठी लघुसंदेशात अजून असे शॉर्टकट शब्द दिसले नाहीत. '' Mipa chalu aahe ka ?'' इंग्रजी मराठी मात्र नियमित दिसतं.

मी मात्र लघुसंदेशाचा पुरेपुर उपयोग घेत असतो. माझा लहान भाऊ एका कंपनीत आहे, त्याची बॊस महिला आहे. ती मात्र भरपूर मोबाईलवरुन बोलत असते. मात्र इतरांना फोनवरुन बोलण्यास बंदी आहे. अशावेळी एस्सेमेस 'जीवा'सारखा धाऊन येतो. आणि आमच्या विचारांची देवाण-घेवाण होते. अतिशय रुक्ष रहाटगाड्यात एखाद्या 'सरदारजीवरचा विनोद' [क्षमा करा बंधुनो ]आपला रुटीन तणाव कमी करतो. थँक्स..नील.

-दिलीप बिरुटे

ऋषिकेश's picture

4 Dec 2012 - 9:31 am | ऋषिकेश

उत्तम लेख.. समसला वाढदिवसाच्या शुभेच्छा! :)
जुन्या नोकियाच्या फोन मधील एस एम एस चा "बिप् बिप् बिप्.... बीऽऽप बीऽऽप.. बिप् बिप् बिप्" असा आवाज हा मोर्स संदेश होता. ("डॉट् डॉट् डॉट् डाह् डाह् डॉट् डॉट् डॉट्")

मोर्सबद्द्ल ची अधिक माहिती आजी आजोबांच्या वस्तुंमध्ये इथे मिळेलच (दुवा उपक्रमावर जातो)

विकास साहेब, लेख उत्तम आहे.

२० वर्षांच्या मानाने समस हे बाळ फारच अवाढव्य वाढले आहे...!

इरसाल's picture

4 Dec 2012 - 12:51 pm | इरसाल

ज्याने ही कल्पना सर्वप्रथम १९८४ साली मांडली होती. तरी देखील त्या शोधाचे श्रेय हा मॅट्टी स्वतःकडे घेत नाही,

सम्जा चुकुन हा शोध एखाद्या भारतसदृश्य नाव असणार्‍या माणसाने शोध लावला असता तर
पेपरवाल्यांनी ह्याचे श्रेय भारतीय वंशाला दिले असते. राजकारणी माणसे ह्याचे फ्लेक्स लावुन चढाओढ लागली असती

आदिजोशी's picture

4 Dec 2012 - 2:50 pm | आदिजोशी

हा शोध अ‍ॅपल नी लावला असता तर त्याचे पेटंट घेऊन ते प्रत्येक फोनसोबत अवाढव्य किंमतीला विकले असते.

पण एसेमेस चं समस कसं झालं कोणी सांगू शकेल का? तसे लघुरूपातले बरेच मराठी शब्द मिपावर प्रचलित झाले आहेत की! त्याबद्दल प्रॉब्लेम नाही. फक्त ते मराठी असेल तर लघुसंदेश असं काहीतरी असायला हवं होतं का?

एसेमेस चे आपले फायदे आहेत हे नक्कीच, म्हणजे बिझी माणसाला आवश्यक तो संदेश पाठवता येतो ही फार चांगली गोष्ट आहे. त्याला वेळ मिळेल तेव्हा तो वाचून उत्तर नक्की देईल. लांब अंतरावरून बोलण्यासाठी सोयीची वेळ कोणती असेल हे ठरवणं कठीण आहे. अशा वेळी एसेमेस उत्तम. परंतु एसेमेसचा स्पेशल पॅक जर घेतला नसेल तर एसेमेस आवाजी कॉलपेक्षा महाग पडतो असं वाटतं. म्हणजे अर्ध्या मिनिटात ३० पैशांत जेवढं बोलून होतं तेवढं एसेमेस द्वारे सांगता येत नाही. बाकीची कामे सोडून टाईप करत बसावं लागतं ते वेगळंच. त्यामुळे मी एसेमेसपेक्षा पटकन अर्ध्या मिनिटाचा कॉल करणे हे जास्त सोयिस्कर समजते!

ठीक आहे. मग मला तो अर्ध्या मिंटाचा कॉल करून दाखव.

पैसा's picture

4 Dec 2012 - 9:15 pm | पैसा

नंबर दे.

रेवती's picture

4 Dec 2012 - 9:22 pm | रेवती

;)

विकास's picture

4 Dec 2012 - 9:33 pm | विकास

सर्व वाचक-प्रतिसादकांना धन्यवाद!

माझ्यापुरते सांगायचे झाले तर मी एस एम एस विशेष कधी आधी वापरला नव्हता. कारण अनेकदा येथे लोकं स्वतःच्या फोनवर टेक्स्टींग चालू ठेवत नाहीत. पण गेल्या वर्षभरात जरा जास्तच वापरू लागलो आहे असे वाटते. त्याचे एक कारण असे आहे की स्मार्टफोनवर एस एम एस अधिक नीट दिसते आता सॅमसंग गॅलक्सीवर तर अधिकच सुखकर वाटते. शिवाय माझ्या प्लॅन मधे त्याला अधिक पैसे द्यावे लागत नाहीत.

तरी देखील अजून हे लघुरूपी इंन्ग्लीश तितकेसे भावत नाही. अर्थात इतरांनी ते केवळ तिथेच वापरले तर हरकत नसते, समजू शकतो. पण तेच जेंव्हा इमेल मधे वापरले जाते तेंव्हा जरा वैताग येतो. या निमित्ताने किंचित अवांतर करत सांगावेसे वाटते, की जसे एस एम एस मुळे इंग्रजी लघूरूप झाले तसे इमेल मधे त्रोटक लिहीण्याच्या पद्धतीमुळे अनेकदा संवाद रुक्ष होतो असे वाटते. बर्‍याचदा कामाच्या इमेल मधे जसे मोजके लिहीले जाते तसेच अनेकजण सोशल इमेल मधे पण करू लागतात. मग कधी कधी असे वाटू लागते की त्या व्यक्तीला काय म्हणायचे आहे, हे जरी थोडेफार समजले तरी त्या व्यक्तीचा tone/रोख समजत नाही. अशा वेळेस सरळ फोन करून बोलायला आवडते. त्यामुळे गैरसमज न होता सुसंवाद होऊ शकतो.

मी स्वतः क्वचीतच समस वापरतो /करतो... हल्ली मोबल्यावर WhatsApp Messenger वापरण्याचा ट्रेंड आहे म्हणे.
मला स्वतःला शब्दांचे लुघुरुप वाचायला आवडत नाही.
बाकी एक प्रश्न मला प्रत्येकाला विचारावासा वाटतो... तो म्हणजे आत्ता पर्यंत तुम्ही किती मोबाईल बदलले आहेत ? ;)