कॉमन मॅन, सायंटिस्ट, इंजिनियर आणि एक कोडे

आनंद घारे's picture
आनंद घारे in जनातलं, मनातलं
21 Nov 2012 - 7:56 pm

काही दिवसापूर्वी मिसळपाव या संस्थळावर एक सोपे वाटणारे कोडे दिले गेले होते. ते असे होते, "वीस लिटरच्या एका टाकीला खाली तोटी आहे. पूर्ण भरलेल्या टाकीतून तोटी उघडल्यावर एका मिनिटात २ लिटर पाणी कमी झाले. सर्व टाकी रिकामी होण्यास किती वेळ लागेल?"
सर्वसामान्य माणूस (कॉमन मॅन) असा विचार करेल, "दोन लिटर पाणी निघायला १ मिनिट लागले, या गतीने वीस लिटर पाणी दहा मिनिटात बाहेर पडेल."
हे प्राथमिक शाळेतले साधे त्रैराशिक झाले, यात कोडे कसले आले? टाकीमधील पाण्याची पातळी जसजशी खाली जाईल तसतसा पाण्याचा वेग कमी कमी होत जातो हे आपल्याला दिसतेच, त्यामुळे हे उत्तर बरोबर असणार नाही.

तोटीमधून बाहेर पडणार्‍या पाण्याचा वेग टाकीमधील पाण्याच्या पातळीच्या उंचीच्या वर्गमूळाच्या समप्रमाणात असतो ( उंची चौपट असली तर वेग दुप्पट असेल) आणि टाकीमधील पाण्याच्या उंचीत दर क्षणाला होणारी घट (dh) त्या वेगाच्या समप्रमाणात असते (पाण्याचा वेग दुप्पट झाला तर पातळी दुप्पट वेगाने खाली येते). म्हणजेच ती उंचीच्या वर्गमूळाच्या समप्रमाणात असते. असे त्याचे शास्त्र आहे. जसजशी पाण्याची पातळी खाली जाऊन उंची कमी होत जाईल तसतसा तोटीमधून बाहेर निघणार्‍या पाण्याचा वेगसुध्दा कमी होत जाईल. जेंव्हा त्याची उंची शून्याच्या जवळ जाईल तेंव्हा त्याचा टाकीच्या बाहेर जाण्याचा वेगही शून्याच्या जवळ पोचेल पण शून्याला गाठण्यासाठी अनंत काळ लागेल. असे सायंटिस्ट सांगतील. तत्वतः हे बरोबर आहे. प्रत्यक्षात सुध्दा टाकीच्या तळाशी असलेला पाण्याचा पातळसा थर त्याला चिकटून राहतो. तो गुरुत्वाकर्षणाने कधीच वाहून जात नाही. या परिस्थितीत गुरुत्वाकर्षणाचा जोर अत्यंत क्षीण झालेला असतो आणि पाण्याचे सरफेस टेन्शन, व्हिस्कॉसिटी वगैरेंचा प्रभाव जास्त झाल्यामुळे टाकीच्या तळाशी थोडे पाणी शिल्लक असले तरी तोटीमधून पाणी बाहेर निघणे बंद होते. हे घडण्यासाठी अनंत काळापर्यंत थांबायची गरज नाही. यामुळे हे उत्तरसुध्दा बरोबर नाही.

माझ्यासारखा एक इंजिनियर यातले कोणतेही उत्तर देणार नाही. आळशीपणा करून मी एक सोपे तोंडी गणित केले. पाण्याचा तोटीमधून बाहेर पडण्याचा वेग सुरुवातीला एका मिनिटाला दोन लीटर असा होता आणि अखेरीस तो शून्य होणार, म्हणजे सरासरीने दर मिनिटाला एक लीटर एवढा धरला तर वीस लीटर पाणी वीस मिनिटात बाहेर पडेल. हे उत्तर मी टंकणार होतो, पण त्यापूर्वी आधी आलेली उत्तरे वाचली. त्यात वर दिलेली उत्तरे होतीच, शिवाय मौजमजा म्हणून या प्रश्नाला अनेक फाटे फोडलेले होते. ते पाहून मी आपला बेत बदलला आणि कॉलेजमध्ये असतांना ऐकलेले एक मजेदार असे अशा प्रकारचे उदाहरण दिले.

पण मला असेही जाणवले की काही लोकांना बरोबर उत्तर जाणून घेण्याची इच्छा आहे. मला आलेल्या एका संदेशात असे लिहिले होते, "उंची नसल्यामुळे उत्तर कसे काढणार?? मी Bernoulli principle चा विचार केला पण त्यासाठी उंची लागेलच ना?" त्यामुळे मला या विषयावर थोडे खोलात जाऊन काम करण्याची प्रेरणा मिळाली. कोडे घालतांना पाण्याची उंची दिलेली नाहीच, टाकीचा आकारही दिलेला नाही. ती त्रिकोणी, चौकोनी, गोल अशा कोणत्या आकाराची आहे, ती उभी आहे की पसरट आहे तेही ठाऊक नाही. शिवाय ते पाणी समुद्रातले आहे की नदीतले, त्याचे तपमान किती आहे वगैरे माहितीही नाही. प्लँटचे डिझाईन करतांना अशा अनेक गोष्टींचा उपयोग केला जातो.

Tank

पण पुरेशी माहिती नाही म्हणून इंजिनियर अडून बसत नाही. जेवढी माहिती उपलब्ध असेल तिचा पुरेपूर उपयोग करायचा आणि जी नसेल त्याबद्दल आपल्या अनुभवावरून अंदाज बांधायचा, काही बाबी गृहीत धरायच्या आणि पुढे जायचे असे त्याने करायचे असते. भरलेली टाकी रिकामी होईपर्यंत तिच्यात खारे, गोडे, थंड, गरम वगैरे जे पाणी आहे, ते जसे असेल तसेच राहणार, त्याचे गुणधर्म बदलणार नाहीत असे गृहीत धरायला काहीच हरकत नाही. टाकीचा आकार चित्रात दाखवल्याप्रमाणे कसलाही असणे शक्य असले तरी प्रत्यक्षात बहुतेक ठिकाणी त्या सिलिंडर किंवा चौकोनी आकाराच्याच असतात. या आकारांमध्ये टाकीचे क्षेत्रफळ (क्रॉस सेक्शन एरिया) तळापासून वरपर्यंत सारखेच असते. त्यामुळे गणित मांडणे सोपे होते.

टाकीचे घनफळ २० लिटर आहे आणि पहिल्या एका मिनिटात २ लिटर पाणी तोटीमधून बाहेर पडले एवढी माहिती दिली आहे. याचाच अर्थ पहिल्या एक मिनिटात एक दशांश एवढे पाणी बाहेर पडले आणि त्यामुळे पाण्याची पातळी एक दशांशाने खाली आली असा होतो. मी टाकीची उंची दहा विभागात (झोन्समध्ये) विभागली. प्रत्येक विभागातल्या पाण्याची तळापासूनची उंची वेगळी असल्यामुळे तोटीमधून बाहेर पडण्याचा वेगही त्यानुसार निराळा असणार, पण तो उंचीच्या वर्गमूळाच्या प्रमाणात असणार. दिलेल्या माहितीमधील (पहिल्या मिनिटातील) वेगाशी तुलना करून तो वेग मिळाला की तेवढ्या वेगाने त्या विभागातील सर्व पाणी बाहेर येण्यासाठी किती वेळ लागेल हे गणित करणे अगदी सोपे आहे. असा रीतीने सर्व दहा भागांना लागणारा वेळ काढला आणि त्याची बेरीज करून टाकी रिकामी होण्याला लागणारा वेळ मिळाला.
हे करतांना तीन निरनिराळ्या गोष्टी गृहीत धरल्या.
१. प्रत्येक विभागाच्या वरील टोकाएवढी त्यातील पाण्याची उंची धरून त्यामुळे पाण्याचा जेवढा वेग येईल तेवढ्याच वेगाने त्या विभागातले सर्व पाणी बाहेर आले. (हे पूर्णपणे खरे नाही, पण सोपे आहे.)
२. प्रत्येक विभागाच्या मध्यपातळीएवढी त्यातील पाण्याची उंची धरून त्यामुळे पाण्याचा जेवढा वेग येईल तेवढ्याच वेगाने त्या विभागातले सर्व पाणी बाहेर आले. (हे सत्यपरिस्थितीच्या किंचित अधिक जवळ आहे)
३. प्रत्येक विभागाची मध्य पातळी ठरवतांना त्यांच्या उंचींच्या वर्गमूळांचा (रूट मीन स्क्वेअर्स) विचार करून जी उंची निघते तेवढी त्यातील पाण्याची उंची धरून त्यामुळे पाण्याचा जेवढा वेग येईल तेवढ्याच वेगाने त्या विभागातले सर्व पाणी बाहेर आले. (हे सत्यपरिस्थितीच्या जास्त जवळ आहे)
यांची उत्तरे अनुक्रमे १५.८८ मिनिटे, १९.४९ मिनिटे आणि १७.६३ मिनिटे इतकी आली.
यातील शेवटच्या एक दशांश (सर्वात तळामधील) विभाग रिकामा होण्यास लागणारा वेळ अनुक्रमे ३.१६, ६.१६ आणि ४.३६ मिनिटे इतका आहे. वरचे नऊ विभाग अनुक्रमे १२.७१, १३.३२ आणि १३.२७ मिनिटात संपले. तीन्ही उदाहरणांमध्ये हे आकडे जवळ जवळ सारखे आहेत.

टाकी रिकामी होण्यासाठी किती वेळ लागेल याची माहिती किती अचूक असायला हवी आणि ती काढण्यासाठी किती आटापिटा करावा लागणार आहे या मुद्यांचा सापेक्ष विचार करून योग्य त्या पध्दतीने ते गणित मांडले आणि सोडवले जाते.

यात आणखी सूक्ष्म सुधारणा करायची असल्यास टाकीमधील पाण्याच्या स्तंभांचे (कॉलम्सचे) शंभर, हजार किंवा लाख विभाग करता येतील, प्रत्येक वेळी तळामधील विभाग शून्याच्या अधिकाधिक जवळ जाईल आणि तो रिकामा होण्यास लागणारा वेळ वाढत जाऊन तो अनंताच्या दिशेकडे जाईल. पण त्या परिस्थितीत गुरुत्वाकर्षणाचा जोर अत्यंत क्षीण आणि पाण्याचे सरफेस टेन्शन, व्हिस्कॉसिटी वगैरेंचा प्रभाव जास्त पडत होत असल्यामुळे त्या गोष्टी गणितात आणाव्याच लागतील. अगदी 'बालकी खाल' काढायची झाल्यास टाकीमधील पाण्याची वरची पातळी आणि तोटीची पातळी या ठिकाणी वातावरणातील हवेचा दाब आणि पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण सुध्दा सूक्ष्म विचार करता किंचित वेगळे असते याची दखल घेता येईल, पण हे म्हणजे 'पाय'चे उत्तर तीन पूर्णांकानंतर दिलेल्या दशांश चिन्हापुढे शेकडो, लाखो आकड्यापर्यंत काढण्याइतके निरर्थक आहे.

विज्ञानलेख

प्रतिक्रिया

sagarpdy's picture

21 Nov 2012 - 8:32 pm | sagarpdy

आवडेश :)

लॉरी टांगटूंगकर's picture

21 Nov 2012 - 9:25 pm | लॉरी टांगटूंगकर

धन्यवाद ..

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

21 Nov 2012 - 10:23 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

"फ्लुइड मेकयानिक्स" च्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. माझा आवडता विषय होता एके काळी.
आप्टिटयुड टेस्ट मधे "पाईप्स, स्टर्न्स आणि अजुन एक प्रकार असतो" ते पण आठवल.
माझ्या मनात नेहेमी येणारे तत्कालिक प्रष्ण म्हणजे,
१. आरे टाकित वरुन पाणी सोडुन खालुन पाणी सोडुन द्यायची असेल तर कशाला उगीच वीज वाया घालवताय?
२. असले वेडे धन्दे करणारयाना नोकरी कोण देतो?

आनंद घारे's picture

22 Nov 2012 - 8:43 am | आनंद घारे

फक्त वीस लिटरची (बादलीभराएवढी) टाकी बहुतेक लोक पिण्याचे पाणी भरून ठेवण्यासाठी वापरतात. त्यात एकादे झुरळ पडले तर उगीच विजेचा अपव्यय नको म्हणून त्यातले पाणी तसेच राहू द्यायचे का?

झुरळाचा या गणितावर होनारा परीणाम समजून घेण्यास उत्सुक.

अरुण मनोहर's picture

22 Nov 2012 - 3:14 am | अरुण मनोहर

आनंद घारे ह्यांचे स्पष्टीकरण एकदम बैलाचा डोळा फोडणारे आहे!

५० फक्त's picture

22 Nov 2012 - 7:04 am | ५० फक्त

जबरदस्त विश्लेषण, खुप खुप धन्यवाद. शाळा कॉलेजमध्ये शिकवलेल्या आणि नंतर फारशा उपयोगात न आलेल्या गोष्टी पुन्हा एकदा करुन पाहायची पद्धत आवडली.

रामदास's picture

22 Nov 2012 - 12:09 pm | रामदास

बर्नोली नावाच्या माणसाने परीक्षेत नापास केले होते इतकेच आता आठवते.

चेतन माने's picture

22 Nov 2012 - 1:16 pm | चेतन माने

पण आमची गणिताची समज आणि गणितातली क्लिष्टता व्यस्त प्रमाणात असल्याने , कुठल्यातरी पाण्याच्या टाकीच्या तोटीतून डोक्यावर थंड पाणी ओतून घ्यावेसे वाटते आहे ( कॉमन man )!!!

llपुण्याचे पेशवेll's picture

22 Nov 2012 - 4:07 pm | llपुण्याचे पेशवेll

शेवटी नेमके उत्तर काय आहे? सगळ्यांची उत्तरे अनुक्रमे आहेत त्यामुळे घोळ वाढतो आहे.
(मठ्ठ) पेश्वे

आनंद घारे's picture

22 Nov 2012 - 10:29 pm | आनंद घारे

जीवनातल्या सगळ्याच प्रश्नांची नेमकी उत्तरे मिळतातच असे नाही. बहुतेक वेळा ती मिळत नाहीत. त्यातल्या त्यात जे उत्तर जास्त जवळचे आहे असे वाटते आणि आपल्या आवाक्यात असते ते मिळवण्याचा प्रयत्न आपण करतो. मी केलेल्या प्रयत्नात काय काय गृहीत धरले होते ते नमूद केले आहे. त्यातील तिसरी परिस्थिती प्रत्यक्ष परिस्थितीच्या सर्वात जवळची असल्यामुळे मी काढलेल्या तीन उत्तरांपैकी तिसरे उत्तर त्यातल्या त्यात जास्त बरोबर आहे.

आदिजोशी's picture

22 Nov 2012 - 7:26 pm | आदिजोशी

मजा आली वाचताना. भन्नाटच.

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Nov 2012 - 10:31 pm | डॉ सुहास म्हात्रे

कॉमन मॅनसाठी (शिर्शकातल्या, कोण्या ID साठी नव्हे... ऊगाच गैरसमज नको) खास सोपे पर्याय:

जर फक्त २० लिटर पाण्याचाच प्रश्ण असला तर: (१) तोटी बन्द करा अथवा (२) खूपच कन्टाळा आला असेल आणि पण्याची कमतरता नसेल तर चक्क दुर्लक्ष करा आणि सर्व पाणी वाहुन जावू द्या.

कारण २० लिटर पाण्याच्या अपव्ययापेक्षा गणिती सव्यापसव्यावर होणारा वेळ आणी श्रम यांचा खर्च फार जास्त वाटतो. (Very low Benefit-Cost Ratio)....

(;०; हघ्या.

खटासि खट's picture

23 Nov 2012 - 12:35 pm | खटासि खट

हायड्रॉलिक्स या विषयात जर्मनीमधे एक तज्ञ प्रोफेसर होते. अमेरिकेने जर्मनीतून ब्रेन ड्रेनचा सपाटा लावलेला होता. या गृहस्थांना पैसे वगैरे दुय्यम वाटत होते पण ज्ञानार्जनाच्या कर्तव्यामुळे त्यांनी अमेरिकन विद्यार्थ्यांना शिकवण्याचे कबूल केले पण देश सोडणार नसल्याने जर्मनी ते अमेरिका हा विमानप्रवास अमेरिकेने सोसायचा ही मुख्य अट ठरली. प्रोफेसरसाहेब जर्मनीमधे दॉइश भाषेत शिकवत आणि अमेरिकेत गेल्यावर अमेरिकन इंग्रजीत शिकवत. एकदा मात्र अमेरिकेत शिकवताना त्यांनी चुकून दोन तास दॉइशमधेच लेक्चर दिले. ही चूक त्यांच्या लेक्चर संपल्यावर लक्षात आली पण अकाही अमेरिकन विद्यार्थ्याने त्यांना टोकलं नाही याबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांची मनापासून माफी मागितली आणि विचारलं कि तब्बल दोन तास तुम्ही माझ्या लक्षात का आणून दिले नाही ? आणि जर्मन भाषा समजत नसतानाही तुम्ही दोन तास इतके शांतपणे सहन कसे करू शकलात ?

यावर एक विद्यार्थी नम्रपणे म्हणाला कि " सर ! दॉइश कि इंग्लिश हा प्रश्नच उद्भवत नाही. विषयच असा आहे कि भाषेचा फारसा फरक पडत नाही "