'शुद्ध सात्विक' मोर आणि भगवान रमण महर्षी

मूकवाचक's picture
मूकवाचक in जनातलं, मनातलं
12 Nov 2012 - 10:28 am

भगवान रमण महर्षी - संक्षिप्त परिचयः

"मी कोण आहे?" (तत्वार्थाने - माझे मूळ स्वरूप कसे आहे?) या सनातन प्रश्नाचे उत्तर वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी अचानक मृत्युसमान अनुभव येउन ज्यांना सहज गवसले असे एक लोकविलक्षण, आत्मसाक्षात्कारी आणि ज्ञानी सत्पुरूष अशी श्री. रमण महर्षींची आज जगभर ख्याती आहे. आत्मचिंतनाच्या धारदार तलवारीने सारे लौकिक पाश कापून काढत, त्या दृष्टीने सर्वसंगपरित्याग करून साक्षात शिवस्वरूप मानल्या गेलेल्या दक्षिण भारतातल्या परमपवित्र अरूणाचल पर्वताच्या आश्रयाला ते सोळा वर्षांचे असताना जे आले, ते शेवटच्या श्वासापर्यंत वास्तव्य करण्यासाठीच. अत्यंत साधे, शांत, सहज संयमी आणि अंतर्बाह्य निर्मळ जीवन या जीवन्मुक्त ज्ञान्याने तिथे व्यतित केले.

जगाच्या कानाकोपर्‍यातून साधक, उपासक, तत्वज्ञ वगैरे मंडळींचा एक अखंड प्रवाहच जणू भगवानांच्या हयातीत अरूणाचलाकडे वाहता झाला. बहुधा या अलौकिक सत्पुरूषाविषयीच्या आंतरिक ओढीमुळे, कुतुहलामुळे, प्रापंचिक प्रश्न सुटावेत यासाठी कृपायाचना करण्यासाठी तर क्वचित प्रसंगी त्यांची परीक्षा पाहणे ते त्यांना अपमानित करणे इतके वैविध्यपूर्ण हेतू मनात ठेउन लोक अरूणाचली पोचत असत. १९५० साली भगवानांनी महासमाधी घेतलेली असली, तरी आजतागायत हा जनप्रवाह आटलेला नाही. श्री. रमणाश्रमात परमपवित्र अरूणाचलाच्या कृपाछायेत चार क्षण घालवता यावेत यासाठी भेट देणार्‍या भक्तांची संख्या रोडावलेली नाही. अन्य सत्पुरूषांप्रमाणेच देहत्यागानंतरही श्री. भगवानांच्या तिथे असलेल्या चिरंतन, मौन आणि कृपापूर्ण वास्तव्याची प्रचिती आजही कित्येक भक्तांना प्रकर्षाने अनुभवता येते.

रमण महर्षींच्या जीवनात शब्दांचा भुलभुलैय्या, चमत्कारांचा झगमगाट, सोवळ्या-ओवळ्याचे अवडंबर, अतिरेकी व्रतवैकल्ये या काहीशी प्रचलित असलेल्या गोष्टी आणि अलीकडच्या काळात अद्वैत तत्त्वज्ञानाच्या नावाखाली बोकाळलेल्या मुक्तीच्या वल्गना, तार्किक कोलांट्याउड्या, बेगडी विश्वात्मकतेचा दांभिक देखावा, सवडीशास्त्राकडे झुकलेले गोलमाल तत्वज्ञान यांना कधीच स्थान नव्हते. रमणाश्रमाच्या कार्यात हे स्पष्टपणे दिसते. शिस्तबद्धता जाचक ठरू नयी आणि मोकळीक स्वैर मोकाटपणाकडे झुकू नये असे तिथे सहज घडते. कुठलाही सामाजिक अथवा राजकीय 'अजेंडा' नाममात्रही नसला तरी आजही हे कार्य आजही अव्याहतपणे सुरू आहे.

सफेद मोराची कथा:

सहज समाधीस्थ राहणारे भगवान रमण महर्षी आणि अरूणाचलाच्या परिसरातील पशुपक्षी यांचे एक अनोखे,मनोहारी आणि अत्यंत जिव्हा़ळ्याचे नाते होते. हा एक स्वतंत्र लेखाचाच काय तर लेखमालेचाही विषय होउ शकेल. याविषयी काही लिहीण्याचा मानस होता. अलीकडेच श्री.अ‍ॅलन जेकब्ज यांनी लिहीलेल्या'श्री रमण महर्षी - द सुप्रीम गुरू' या पुस्तकातल्या तिसर्या परिशिष्ठात दिलेली सफेद मोराची कथा वाचली. तिचाच हा स्वैर भावानुवादः

१९४७ साली एप्रिल महिन्यात एके दिवशी भगवानांना बडोद्याच्या राणीसाहेबांनी आदरपूर्वक भेट दिलेल्या सफेद मोराचे रमणाश्रमात आगमन झाले. सुरूवातीला या मोराला परत पाठवणेच श्रेयस्कर ठरेल असे महर्षींचे मत झाले. ते म्हणाले, "इथे जे दहाबारा रंगीत मोर आहेत, ते पुरे नाहीत का? हा त्यांच्यापेक्षा वेगळा दिसत असल्याने ते याच्याशी झगडा करण्याची शक्यता आहेच. याला त्याच्या मूळ गावी परत पाठवणेच बरे."

तरीही त्या सफेद मोराला घेउन आलेल्या व्यक्तीने का कुणास ठाउक, त्याला आश्रमातच सोडले, आणि परतीचा मार्ग धरला. त्याची काळजी वाहण्याची जबाबदारी कृष्णस्वामी या भक्ताने स्वीकारली. एकदा हा मोर कुठेतरी पळून गेला आणि कृष्णस्वामी मोठ्या सायासाने त्याला पकडून परत घेउन आले. तेव्हा मोराला पाहून रमण महर्षींनी आपला एक हात त्याच्या मानेवर ठेवला आणि दुसर्‍या हाताने त्याच्या काळजापर्यंतच्या भागात हळुवारपणे थोपटत त्याला सौम्यपणे ताकीद दिली, "खट्याळ पोरा, असा अचानक कुठे गायब होतोस रे तू? तू असा निघून जायला लागलास, तर तुझी देखभाल करण्याची व्यवस्था आम्ही लावयची तरी कशी? त्यापेक्षा इथेच कायमचा मुक्काम का करत नाहीस?"

त्या प्रसंगानंतर सफेद मोर आश्रमाच्या प्रांगणातच बागडायचा. क्वचितप्रसंगी आश्रमाच्या परिसरातल्या साधकांच्या झोपडीवजा घरातही तो जायचा. एके दिवशी दुपारी आश्रमवासियांनी त्याला एका झोपडीत रेडिओ ऐकत बसलेला पाहिला. ध्यानधारणेत मग्न झाल्यासारखी मुद्रा करत त्याने डोळे मिटून घेतलेले होते. कुणीतरी बोलूनही दाखवले की हा मोर पहा कसा नादब्रह्मात बुडून गेला आहे. महर्षी म्हणाले, "मोरांना उपजतच स्वरांचे आकर्षण असते. त्यातूनही ते स्वर जर बासरीतून उमटत असतील, तर मग विचारायची सोय नाही, इतके ते स्वरमुग्ध होतात!"

इतक्यात कुणीतरी म्हणाले की सफेद असल्याने हा मोर आगळावेगळा आणि उठून दिसत असला, तरी खरे सौंदर्य मात्र रंगीत मोरांमधेच अधिक प्रमाणात दिसते. यावर रमण महर्षी म्हणाले, "त्या मोरांचे रंग सुंदर आहेतच, पण या सफेद मोरात मात्र 'यासम हाच' असे एक वेगळेच सौंदर्य आहे. इतर रंगाचे मिश्रण मुळीच नसलेला याचा शुद्ध सफेद रंग आगळाच आहे. असे पहा, की जणू ते शुद्ध-सत्व आहे. हे विशुद्ध आत्मतत्व आहे ज्यात त्रिगुणांची किंवा उपाधींची सरमिसळ झालेली नाही. वेदांताच्या परिभाषेत या मोराचेही उदाहरण किती समर्पकपणे मांडता येते ते पहा! नुकताच जन्म झालेल्या इतर मोरांमध्येही इतके रंगसंगती नसते. ते एकाच रंगाचे असतात. जसजशी वाढ होते, तसे बाकी रंग प्रकट व्हायला लागतात. शेपटीची वाढ होते आणि शेपटीवर कित्येक 'डोळे' फुटतात. आणि शेवटी पहाल, तर केवढी ती रंगसंगती आणि किती ते डोळे! आपल्या मनाचेही तसेच आहे. जन्मत:च त्यात विकृतींचा लेशही नसतो. कालौघात मात्र कित्येक घडामोडी, संकल्पना आणि वासना त्यात मोराच्या पिसार्‍याप्रमाणेच भलेबुरे रंग भरतात."

भगवान श्री. रमण महर्षींची प्रदीर्घ काळ भक्तीभावाने देखभाल करणार्‍या श्री. माधव स्वामींना एका वर्षापूर्वीच १२ जुलै १९४६ रोजी देवाज्ञा झालेली होती. माधव स्वामीच या सफेद मोराच्या रूपात पुनर्जन्म घेउन परतले आहेत अशी कित्येक भक्तांची धारणा होती. सफेद मोर जेव्हाजेव्हा आश्रमातल्या सभागृहात यायचा, तेव्हा न चुकता तिथल्या लाकडी कप्प्यांमधे व्यवस्थित मांडणी केलेया ग्रंथांच्या रचनेचे जणू परीक्षणच करायचा. हयात असताना हे काम माधव स्वामी पार पाडत असत. माधव स्वामींनी डागडुजी केलेल्या, पुनर्बांधणी केलेल्या ग्रंथांना तो न चुकता चोचीने हळुवार स्पर्श करायचा, इतर पुस्तकांना मात्र तो शिवत नसे. हे काम संपले, की दरवाजाजवळच्या ज्या बाकावर बसून माधव स्वामी विश्रांती घेत, त्याच बाकावर त्याच जागी बसून मोरही विश्रांती घेत असे.

स्वत: रमण महर्षी क्वचितप्रसंगी या सफेद मोराला वात्सल्याने "माधवा" अशीच हाक मारायचे. जी. व्ही. सुब्बरामय्या यांनी त्यांच्या 'श्री. रमण स्मृती' या पुस्तकात नमूद केले आहे, "२० जून १९४७ या शुभदिनी मी सफेद मोरावर 'मयूर वृत्तात' तेलगू भाषेत आठ श्लोकांची काव्यरचना केली. 'ज्युबिली पेंडॉल' आहे त्या ठिकाणी भगवानांना ती रचना दाखवली. भगवान ते काव्य वाचून अत्यंत संतुष्ट झालेले दिसले, आणि श्रीमती ललिता वेंकटरामन यांच्याकडे ती सुपूर्त करत भगवानांनी सुचवले की आपल्या वीणावादनाच्या साथीने त्यांनी ती रचना गाण्याचा प्रयत्न अवश्य करावा. जेमेतेम अर्ध्या तासाच्या अवधीत श्रीमती वेंकटरामन यांनी आपली वीणा तिथे आणली आणि त्या गाण्यासाठी सज्जही झाल्या! सफेद मोर मात्र त्या क्षणी तिथे उपस्थित नव्हता. भगवान म्हणाले, "बाकी सारे तर यथायोग्य जुळून आलेले आहे, पण स्वतः कथानायकही आपली स्तुती गायली जात असताना इथे हजर असायला हवा. माधवा, तू आहेस तरी कुठे? लगेच इकडे ये"

अहो आश्चर्यम्! पुढच्याच क्षणी पेंडॉलच्या छपरावरून सफेद मोर डौलाने खाली झेपावला. ललिता वेंकटरामन यांच्या गायनाला आपला पिसारा पूर्णपणे फुलवून मोठ्या झोकात नृत्य करत त्याने दाद दिली. भगवान स्तब्धपणे बसून होते. मोरावर खिळलेल्या त्यांच्या तेजस्वी डोळ्यातून अविरतपणे झरणार्‍या कृपादृष्टीच्या झोतात मोराच्या 'शुद्ध-सत्व' सफेद रंगावरही त्यांच्या कृपेची एक प्रकारची विलक्षण झळाळी आलेली दिसत होती. गायन संपल्यावर मोर त्याच झोकात पदन्यास करत वीणेपर्यंत पोचला आणि तिला आपल्या चोचीने हळुवार स्पर्श करून तिथेच तिष्ठत राहिला.

हे पाहून भगवान श्रीमती वेंकटरामन यांना म्हणाले, "ही रचना आपण परत एकदा सादर करावी अशी माधवाची इच्छा दिसते आहे." श्रीमती वेंकटरामन यांनी आनंदाने ती रचना परत सादर केली. डौलदार पदन्यास करत मोरानेही त्यांना पुन्हा एकदा भरभरून दाद दिली. अत्यंत दुष्प्राप्य असे ते नितांतसुंदर दृष्य पाहणारे रमणभक्त इंद्रादिकांपेक्षाही भाग्यवान होत हे काय वेगळे सांगायला हवे?

pic1

pic2

धर्मआस्वाद

प्रतिक्रिया

llपुण्याचे पेशवेll's picture

12 Nov 2012 - 10:43 am | llपुण्याचे पेशवेll

वाह! छान वाटले वाचून .

सुंदर, मन प्रसन्न करणारा लेख.

अक्षया's picture

12 Nov 2012 - 11:36 am | अक्षया

शुध्द आणि सात्विक मोर आणि भगवान रमण महर्षीं बद्द्ल छान माहिती :)
धन्यवाद.

शर्वरी नेने's picture

12 Nov 2012 - 8:54 pm | शर्वरी नेने

वाचून प्रसन्न वाटल..

रुपाली १२३४'s picture

12 Nov 2012 - 10:38 pm | रुपाली १२३४

भगवान रमण महर्षीं बद्द्ल छान माहिती दिलीत. त्यांचाबद्दल मराठि पुस्तक आहे का? पॉल ब्रांटन यांचा पुस्तकांत फार थोडी माहिती आहे..........

मूकवाचक's picture

14 Nov 2012 - 9:10 am | मूकवाचक

'श्री. रमण महर्षि - चरित्र आणि तत्वज्ञान'(मूळ लेखक - आर्थर ऑसबोर्न, अनुवाद - डॉ. हरिहर गंगाधर मोघे, प्रकाशक - यशवंत प्रकाशन, पुणे)हे पुस्तक उपयुक्त आहे.

यशोधरा's picture

12 Nov 2012 - 10:58 pm | यशोधरा

आवडले. वाचताना छान वाटले, धन्यवाद.

अर्धवटराव's picture

12 Nov 2012 - 11:21 pm | अर्धवटराव

याला अद्वैताचा सफेद अविश्कार म्हाणायचा का???

एक अवांतर प्रश्नः
रमण महर्षींना "भगवान" का म्हणतात? हि उपाधी त्यांना इहलौकीक कार्य संपल्यावर मिळाली कि पुर्वी?

अर्धवटराव

महर्षींचे जन्मनाव व्यंकटरामन अय्यर होते. १९०७ साली त्यांच्याकडून उपदेश आणि अनुग्रह घेतल्यावर 'काव्यकंठ' गणपती मुनी यांनी 'भगवान श्री. रमण महर्षि' असा त्यांचा उल्लेख केला. पुढे हेच नाव प्रचलित झाले.

संजय क्षीरसागर's picture

14 Nov 2012 - 11:19 am | संजय क्षीरसागर

भगवान श्री. रमण महर्षींची प्रदीर्घ काळ भक्तीभावाने देखभाल करणार्‍या श्री. माधव स्वामींना एका वर्षापूर्वीच १२ जुलै १९४६ रोजी देवाज्ञा झालेली होती. माधव स्वामीच या सफेद मोराच्या रूपात पुनर्जन्म घेउन परतले आहेत अशी कित्येक भक्तांची धारणा होती.

आपण आकार आहोत हा भ्रम म्हणजेच अहंकार आणि त्यापासून मुक्ती मिळवण्याचा मार्ग म्हणजे अध्यात्म. आत्मा (किंवा आपण) स्थिती आहोत, आपण जन्म घेत नाही त्यामुळे पुनर्जन्माचा प्रश्नच नाही.

रमणांची `हू अ‍ॅम आय' ही साधना त्या भ्रामातून मुक्ती देऊ शकते काय? तो भ्रम होण्याचं मूळ कारण `मन' काय चीज आहे यावर लेखक भाष्य करू शकेल काय? त्यानं स्वतः ती साधना केली आहे का? त्या मार्गात काय अडचणी आहेत वगैरेचा परामर्ष इथे घ्यावा म्हणजे त्या साधनेचं (आणि एकूणात) अध्यात्मिक आकलन कितपत आहे ते प्रकट होईल.

आपण आकार आहोत हाच प्रार्थमिक भ्रम असताना, माधव स्वामी `मोर' झालेत या अत्यंत भ्रामक समजूतीवर हा लेख बेतला आहे आणि त्याला मूढ भक्ताच्या निराधार अज्ञानाचा भक्कम आधार आहे त्यामुळे अध्यात्मिक ज्ञानाचा सुंदर पिसारा कसा फुलतो याचं सुरेख उदाहरण म्हणजे हा लेख

.संपादित. कृपया व्यक्तिगत टिपणी टाळावी.

शून्य अध्यात्मिक आकलन असलेले काही सदस्य आपल्या अगाध ज्ञानाच्या पिंका या प्रतिसादावर टाकतीलच. त्यांचाकडून वेगळी अपेक्षा करणं अनुचित ठरेल कारण मूढ बालक आणि `बाल- मॅन' या दोन्हींचा अर्थ एकच आहे.

आबा's picture

14 Nov 2012 - 7:48 pm | आबा

"आपण आकार आहोत हाच प्रार्थमिक भ्रम असताना... "

झक मारली आणि लाल गोळी उचलली :)

(हा प्रतिसाद फक्त गंमतीमध्ये लिहिलेला आहे...)

तर आपणच अध्यात्मिक ज्ञान म्हणजे काय हे सान्गण्याची क्रुपा करावी. व अज्ञान कसे आहे हे सुद्धा सान्गण्याची क्रुपा करावी.

दादा कोंडके's picture

14 Nov 2012 - 7:23 pm | दादा कोंडके

हा लेख वाचून मला छान, सुंदर, प्रसन्न वगैरे न वाटता कै च्या कै लेख आहे असं वाटलं. गेल्या जन्मी काय ब्रम्हपाप घडलं काय माहिती? बहुतेक रानात मुक्त विहार करणार्‍या पांढर्‍या मोराला पकडून लांडोर नसलेल्या आश्रमात सोडून जाणारी ती व्यक्ती मीच तर नव्हे?

५० फक्त's picture

15 Nov 2012 - 7:58 am | ५० फक्त

+१००, मला सुद्धा असाच प्रतिसाद द्यायचा होता पण घाबरत होतो. मोर हा शुद्ध आणि सात्विक कसा असु शकतो हे समजलं नाही, तुम्ही म्हणताय तसं त्याला बंदिवासात ठेवुन त्याच्यावर ब्रम्हचर्य लादलं गेलं आणि मग त्याला शुद्धा आणि सात्विक म्हणायचं का ?

मूकवाचक's picture

15 Nov 2012 - 8:42 am | मूकवाचक

रमण महर्षींनी एकच मोर तेवढा शुद्ध आणि सात्विक असे ठरवलेले नाही. फक्त वेदांतातले एक तत्व स्पष्ट करण्यासाठी त्याच्या रंगाचा रूपकासारखा उपयोग केलेला आहे.

रमणाश्रमात मोरांना बंदीवासात ठेवले जात नाही. मोर आणि लांडोर यात सहवास होणे, त्यातून प्रजनन होणे हे सगळे निसर्गधर्मानुसार घडते. आजही त्या परिसरात मोर आहेत. रमणाश्रम आणि जवळच्या परिसरात त्यांचा मुक्त विहार सुरू असतो. महर्षी हयात असतानाही 'ब्रह्मचर्य लादणे' वगैरे प्रकार झालेले नाहीत.

स्पष्टीकरण पटण्यासारखं आहे, धन्यवाद.

मुळात सत्य ही `कालातीत स्थिती' आहे, तिचा कालात घडणार्‍या घटनांशी संबंध नाही. सत्य आता या क्षणी आणि सदैव, वर्तमानात आहे. त्यामुळे अमुकएक गतजन्मीचा साधक या जन्मी `मोर' झाला हे मानणं केवळ निराधारच नाही तर गहन अध्यात्मिक अज्ञान दर्शवतं.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सत्य अपरिवर्तनीय आहे त्यामुळे ते मोर वगैरे सारख्या स्टोर्‍यात शोधणं हे व्यर्थ वेळ घालवणं आणि सत्यापासून भरकटणं आहे.

अशा स्टोर्‍या एकदा तयार झाल्या की कथेकरी त्यात हवे तसे रंग भरू शकतात आणि निर्बुद्ध भक्त माना डोलवत त्यात रंगून जातात. टाइमपास म्हणून त्या सुरेख आहेत पण त्याचा सत्याशी सुतराम संबंध नाही.

सवडीशास्त्राकडे झुकलेले गोलमाल तत्वज्ञान

असा लेखातला उल्लेख, मूळ स्टोरीच निराधार आणि गोलमाल आहे हे स्पष्ट दर्शवतो.

मूकवाचक,
आपल्या लेखनातून तिरुवन्नमलईच्या आठवणी जागृत झाल्या. रमणाश्रमातील रम्य वातावरणाची व शेजारच्या योगी रामसूरत कुमारांच्या आश्रमाची आठवण झाली.

मदनबाण's picture

15 Nov 2012 - 8:12 am | मदनबाण

लेखन आवडले... :)
मी असे कुठेतरी ( मला वाटत कुठल्यातरी पुस्तकात) की लोकमान्य टिळक मंडालेच्या तुरुंगात असताना, त्यांच्या जवळपास आणि अगदी त्यांच्या अंगा-खांद्यावर चिमण्या येउन बसत. त्यांना जिथे ठेवले होते त्याच्या जवळ एक झाड होते,टिळक येण्या आधी कधीही त्या झाडाला फुले आलेली नव्हती.पण टिळकांच्या वास्तव्याच्या काळातच ते झाड बहरले आणि ते त्या ठिकाणाहुन निघुन गेल्यावर त्या झाडाची स्थिती परत पहिल्या सारखी झाली.

जाता जाता :--- पुनर्जन्मबाबत हिंदुस्थानी साहित्यात / ग्रंथसंपदा इं मधे अनेक व्यक्तींचा उल्लेख आठळतो... अगदी जडभरतापासुन ते शिखंडी पर्यंत.

दादा कोंडके's picture

15 Nov 2012 - 7:54 pm | दादा कोंडके

मी असे कुठेतरी ( मला वाटत कुठल्यातरी पुस्तकात) की लोकमान्य टिळक मंडालेच्या तुरुंगात असताना, त्यांच्या जवळपास आणि अगदी त्यांच्या अंगा-खांद्यावर चिमण्या येउन बसत.

मी ही असे कुठेतरी वाचले होते की,
१. चिमण्यांना माणसाचा स्पर्श झाल्यास इतर चिमण्या त्या चिमणीला चोची मारून ठार करतात.
२. टिळकांना अस्पृष्यतेच्या विरोधात जागृती करण्यासाठी एका महार-मांगांच्या सभेत त्यांना पाचारण करण्यात आलं होतं. आपल्यात गंध लावून, पगडी घातलेला वगैरे एव्हढा राजबिंडा माणूस एव्हड्या अगत्याने आल्यामुळे पब्लीक भारावलं होतं. थोड्यावेळाने त्यांची भिड चेपल्यामुळे अनेक जणांनी त्यांना हात लावून पाहिला. इकडे पुण्यात परत आल्यावर टिळकांना या प्रकाराची इतकी किळस आली की त्यांनी गोमूत्रानी आंघोळ केली.

काय खरं काय खोटं ते त्या श्वेत मयुरेश्वरालाच ठाउक.:)

राघव's picture

15 Nov 2012 - 5:10 pm | राघव

चांगले लिहिलेस. रमणमहर्षींबद्दल वाचन अजिबातच कमी. घेऊन जातो एखादे पुस्तक तुझ्याकडून वाचायला. :)

राघव

पैसा's picture

15 Nov 2012 - 5:13 pm | पैसा

लेखन आवडले.

Dhananjay Borgaonkar's picture

15 Nov 2012 - 5:33 pm | Dhananjay Borgaonkar

छान!!! :)

अवांतर - तुम्ही अध्यात्मिक गाऊन घालुन पोपटपंची करत नाही हे पाहुन खुप बरं वाटलं.

फुकाचा आध्यात्मिक गाऊन घालून व्यर्थ पोपटपंची केली, की न धड श्रद्धाळू न धड बुद्धिवादी, अशी अवस्था होते, उदा."न हिंदुर्न यवनः"|

कुठे आहे? फक्त कि-बोर्ड असला की झालं काम!

मी सुरूवातीलाच लिहिलय

शून्य अध्यात्मिक आकलन असलेले काही सदस्य आपल्या अगाध ज्ञानाच्या पिंका या प्रतिसादावर टाकतीलच. त्यांचाकडून वेगळी अपेक्षा करणं अनुचित ठरेल कारण `मूढ-बालक' आणि `बाल- मॅन' या दोन्हींचा अर्थ एकच आहे.

भक्ताचा मोर होतो की नाही हे माहित नाही, पण नको तिथे ज्ञान पाजळून काही जणांचा पंचरंगी पोपट झाल्याचे आम्ही मिपावरच पाहिले आहे. त्यातून त्यांनी काहीच बोध घेतल्याचे दिसत नाही याचे वाईट वाटते.

बॅटमॅन's picture

15 Nov 2012 - 6:03 pm | बॅटमॅन

+१२३४५६७८९०

त्यावर तर संपूर्ण लेख आहे ! त्यामुळे लेखनाचा विषयही कळला नाही, तरी प्रतिसाद दिल्या वाचून रहावत नाही. छान!

इन्दुसुता's picture

16 Nov 2012 - 8:56 am | इन्दुसुता

रमण महर्षीं बद्दल आणखी एक गोष्टं...( ही त्यांच्या आश्रमात घडलेली नाही)... त्यावेळी ते वयाने बरेच लहान होते. गावाच्या वेशीवरच कुठेतरी एका झोपडीत राहत असत. त्या झोपडीत त्यांची २-३ भांडी आणि काही देव ( देवाच्या धातुच्या प्रतिमा)होते. स्वतः रमण महर्षींचा संपूर्ण वेळ ध्यानात जात असे.
एक दिवस काही कारणानी त्यांची ध्यान साधना मोडली.. समोरच एक चोर त्यांना झोपडीतील भांडी चोरताना दिसला. ते ध्यानातून जागे झाल्यामुळे चोर पळत निघाला... आणि त्याच्यामागे रमण महर्षी .. "अरे अरे, हे देव मागे विसरलास बघ" :)
रमण महर्षींचा विषय निघाला की मला ही गोष्ट नेहमी आठवते आणि त्यायोगे बाबुजींच्या गाण्यातील हे शब्द देखील्..'देव चोरून नेईल अशी कोणाची पुण्याई...

मूकवाचक's picture

16 Nov 2012 - 9:49 am | मूकवाचक

प्रतिसाद देणार्‍या सर्व मिपाकरांचे मन:पूर्वक आभार.

लेखाच्या पहिल्या भागात भगवान रमण महर्षींचा संक्षिप्त परिचय आहे. श्री. अ‍ॅलन जेकब्स किंवा माझ्या अध्यात्मिक योग्यतेविषयी कुठलाही दावा केलेला नाही. त्यामुळे तदनुषंगिक प्रश्न/ टिप्पण्या/ आव्हाने यांची दखल घेतलेली नाही.

लेखाच्या दुसर्‍या भागात एक अनुवादित कथा आहे. पुनर्जन्माची संकल्पना मिपाकरांच्या माथी मारणे, सत्याचा शोध घेणे या हेतूने त्या कथेचा अनुवाद केलेला नाही. रमण महर्षी आणि अरूणाचलाच्या परिसरातील पशुपक्षी यांचे एक अनोखे,मनोहारी आणि अत्यंत जिव्हा़ळ्याचे नाते होते. त्याविषयी काही लिहीण्याचा मानस होता असा लेखनामागील हेतू स्पष्टपणे नमूद केलेला आहे याची कृपया नोंद घ्यावी.

अलीकडच्या काळात अद्वैत तत्त्वज्ञानाच्या नावाखाली बोकाळलेल्या मुक्तीच्या वल्गना, तार्किक कोलांट्याउड्या, बेगडी विश्वात्मकतेचा दांभिक देखावा, सवडीशास्त्राकडे झुकलेले गोलमाल तत्वज्ञान ...

हे लेखात सुरूवातीला म्हटले आहे

आता

श्री. अ‍ॅलन जेकब्स किंवा माझ्या अध्यात्मिक योग्यतेविषयी कुठलाही दावा केलेला नाही.

जर अशी योग्यता नसेल तर पहिले विधान निराधार आहे

लेखाच्या दुसर्‍या भागात एक अनुवादित कथा आहे. पुनर्जन्माची संकल्पना मिपाकरांच्या माथी मारणे, सत्याचा शोध घेणे या हेतूने त्या कथेचा अनुवाद केलेला नाही.

लेखाचा पूर्ण अनुरोध आणि शीर्षक `घटनेतला चमत्कार' दाखवण्याचा आहे

रमण महर्षी आणि अरूणाचलाच्या परिसरातील पशुपक्षी यांचे एक अनोखे,मनोहारी आणि अत्यंत जिव्हा़ळ्याचे नाते होते.त्याविषयी काही लिहीण्याचा मानस होता असा लेखनामागील हेतू स्पष्टपणे नमूद केलेला आहे

आता `मोराची स्टोरी' सपोर्ट होऊ शकत नसल्यानं हा स्टँड घेतला आहे हे उघड आहे कारण लेखाचा प्रकार (फक्त)`धर्म' असा निवडला गेला आहे. सुरूवातीला हेतू स्पष्ट असता तर ओघानंच `भटकंती' किंवा तत्सम असा पर्याय (किमान जोडीला तरी) निवडला गेला असता.

कवितानागेश's picture

16 Nov 2012 - 12:11 pm | कवितानागेश

गोष्ट आवडली. संतांच्या आणि प्राणी-पक्ष्यांबद्दलच्यादेखिल 'सत्यकथा' वाचायला नेहमीच आवडतात.
त्या निरागस असतात. :)

बाकी येथे तयार होणार्‍या पाककृतीचे नाव 'मोराचे काश्मीर' असे होउ शकेल. ;)

असो,

श्री. अ‍ॅलन जेकब्स किंवा माझ्या अध्यात्मिक योग्यतेविषयी कुठलाही दावा केलेला नाही.

या स्वतःच्या अध्यात्मिक योग्यतेविषयी खुलाश्याचं स्मरण ठेवलं जाईल अशी माफक अपेक्षा या लेखाच्या निमित्तानं करतो

Dhananjay Borgaonkar's picture

16 Nov 2012 - 4:06 pm | Dhananjay Borgaonkar

प्रचंड अनुमोदन :)

कवितानागेश's picture

16 Nov 2012 - 5:54 pm | कवितानागेश

१०५२
आणि
१६७०.
:D

सार्थबोध's picture

13 Aug 2013 - 12:38 pm | सार्थबोध

वा छान वाटले वाचून

अनिरुद्ध प's picture

13 Aug 2013 - 5:38 pm | अनिरुद्ध प

काही जण आपल्या यथार्थ ज्ञानाचे टन्कन प्रदर्शन करुदेत तरिसुद्धा आपण आपले एकटे चालावे,एकला चालोरेच्या धर्तिवर.

श्रीगुरुजी's picture

15 Aug 2013 - 11:34 am | श्रीगुरुजी

मी पॉल ब्रँटनच्या पुस्तकात असे वाचले होते की श्री रमण महर्षी कायम मौनातच असत. ते मौनातूनच भक्तांशी व साधकांशी संवाद साधत असत. याविषयी कोणाला माहिती आहे का?

मूकवाचक's picture

15 Aug 2013 - 1:43 pm | मूकवाचक

रमण महर्षी बहुतांशी मौनात असत. हे मौन त्यांचा सहज स्वभाव असल्याने (ते 'व्रत' नसल्याने) त्यांचे वेळोवेळी संवादही झालेले आहेत. रमण महर्षींनी व्यासपीठावरून प्रवचने दिली नाहीत, पण त्यांच्या अनौपचारिक पद्धतीने झालेल्या संवादांचे वेळोवेळी संकलन झालेले आहे. त्यांचा इंग्रजी अनुवाद करून काही पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यापैकी काही पीडीएफ स्वरूपात विनामूल्य उपलब्ध आहेत. जालावर सर्च इंजिन वापरून ती सहज मिळतील.

त्यांच्या सान्निध्यात क्वचितप्रसंगी काही साधक/ उपासकांना 'गुरोस्तु मौनव्याख्यानं शिष्यास्तुच्छिन्नसंशयाः' अशी प्रचिती आल्याचे उल्लेखही महर्षींविषयीच्या साहित्यात आढळतात (ढोबळमानाने या प्रचितीलाच मौन दीक्षा, मौन संवाद किंवा दक्षिणामूर्ती दीक्षा म्हणत असावेत असे वाटते.)