पाऊले चालती पंढरीची वाट

आनंद घारे's picture
आनंद घारे in जनातलं, मनातलं
28 Jun 2008 - 11:46 am

या वर्षीच्या आषाढीच्या वारीची सुरुवात करण्यासाठी भक्तगण देहू व आळंदीला जमा झाले असल्याची बातमी आली आहे. आता त्यांच्या दिंड्यांच्या मार्गक्रमणाचा वृत्तांत 'आँखो देखा हाल'च्या थाटात पुढील पंधरवडाभर सर्व प्रसिध्दीमाध्यमांत येत राहील. महाराष्ट्राच्या कानाकोप-यातूनच नव्हे तर शेजारच्या कर्माटकांतूनसुध्दा लक्षावधी भाविक पायी चालत पंढरपूरपर्यंत जातील. त्यातल्या अनेकांची ही पदयात्रा सुरू झालेलीही असेल. कांही लोक आपापल्या कुवतीनुसार त्यात थोडा काळ सहभाग घेऊन मिळेल तेवढा आनंदानुभव घेतील व पुण्य गांठीला बांधतील. हे सगळे संपूर्णपणे स्वेच्छापूर्वक चालत आले आहे. या सा-यामागे प्रेरणेचा कुठला श्रोत असतो?

पंढरीच्या विठ्ठलाचे गुणगान आणि स्तुती करणारे शेकडो अभंग संतश्रेष्ठांनी लिहिले आहेत आणि भजनाच्या परंपरेतून ते आजही वारक-यांच्या ओठावर आहेत. त्यामधील कांही अभंगांना आघाडीच्या संगीत दिग्दर्शकांनी चाली लावल्या आणि लोकप्रिय गायक गायिकांनी आपल्या गोड गळ्यातून गाऊन ते आपल्या घराघरापर्यंत पोचवले. सार्वजनिक भजनाच्या पारंपरिक पद्धतीमध्ये एक भक्त अभंग 'सांगतो', म्हणजे त्यातील एक एक ओळ टाळ व मृदुंगाच्या भजनी ठेक्यावर गातो आणि बाकीचे सर्व टाळकरी ती ओळ तशाच चालीने समूहाने गातात. यामुळे भजनामधील सर्व अभंग त्यांच्या मुखातून वदले जातात. अशा प्रकारे वारंवार ऐकण्या व गाण्यामुळे हळूहळू त्यांना ते अभंग पाठ होतात. त्याचप्रमाणे त्यातील भावसुद्धा त्यांच्या मनाला जाऊन भिडणारच. संत ज्ञानेश्वरांच्या एका अभंगामध्ये त्यांनी आपल्या मनामधील उत्कट इच्छा व्यक्त केली आहे. खाली दिलेल्या अशा अभंगांतून पांडुरंगाच्या दर्शनाची आस लागल्यामुळे हे सारे वारकरी आपली घरदारे सोडून पंढरपूरला जाणा-या दिंडीत सामील होत असतील कां?

माझे जीवीची आवडी। पंढरपुरा नेईन गुढी ।।
पांडुरंगी मन रंगले। गोविंदाचे गुणी वेधले ।।
जागृत स्वप्न सुषुप्त नाठवे। पाहता रूप आनंद साठवे ।।
बाप रखुमादेवीवरू सगुण निर्गुण, रूप विटेवरी दाविली खूण ।।

या प्रश्नाला होकार आणि नकार अशी दोन्ही उत्तरे देता येतील. आषाढी कार्तिकी एकादशीच्या दिवशी पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी महाप्रचंड रांगा लागतात. त्यात दहा बारा तास उपाशी तापाशी उभे राहून वाट पाहण्याची तपश्चर्या केल्यानंतर विठोबाच्या पायावर क्षणभर डोके टेकवण्याची संधी मिळते. त्या दिवशी पंढरपूरला गेलेल्या लक्षावधी भाविकांच्या मनात ही इच्छा असणार यात शंका नाही. पण त्यांमधील किती वारकरी हे दर्शन घेऊ शकतील हे थोडेसे गणित केले तर लक्षात येईल. अगदी दर सेकंदाला एक एवढ्या भरभर हे वारकरी पुढे सरकत राहिले असे धरले तरी तासाभरामध्ये ३६०० जणांचा नंबर लागेल. पहाटेच्या काकड आरतीपासून रात्रीच्या शेजारतीपर्यंतच्या कालात मधील पूजाअर्चांना लागणारा वेळ सोडून उरलेल्या वेळेत फार फार तर चाळीस ते पन्नास हजार भाविकांना प्रत्यक्ष दर्शनाचे सुख प्राप्त होऊ शकेल. म्हणजे राहिलेले ऐंशी नव्वद टक्के भक्त दर्शन घेऊसुध्दा शकत नाहीत आणि त्यांना ही गोष्ट आधीपासून ठाऊक असते. त्यांच्यामधील बहुतेकजण विठोबाच्या देवालयाच्या शिखराचे किंवा पायरीचे दर्शन घेऊनच माघारी जातात. कांही थोडेच लोक पुढे चार पांच दिवस तिथे मुक्काम वाढवून गर्दी कमी झाल्यानंतर कसेबसे देवदर्शन करून घेतात. मात्र प्रत्येक वारक-याने आपल्यासोबत विठ्ठलाची प्रतिमा आणलेली असते. दिवसातून वेळोवेळी तिचे दर्शन घेऊन ते प्रार्थना करतात.

असे जर असेल तर मग ते तर घरी बसूनसुद्धा करता आले असते. त्यासाठी एवढे कष्ट घेऊन उन्हातान्हातून आणि भर पावसातून पंढरपूरपर्यंत पायी चालत जाण्याची काय गरज आहे असे कोणाला वाटेल. त्यामागे अर्थातच इतर कांही सबळ कारणे असली पाहिजेत. एक तर परंपरेनुसार दरवर्षी वारी करायची हे ठरून गेलेले असते. एकदा गळ्यात तुळशीची माळ घातली की हे 'कमिटमेंट' पाळावे लागते. दुसरे कारण म्हणजे आपण देवासाठी कांही करतो आहोत या भावनेमध्ये एक प्रकारचे समाधान मिळते. महात्माजींनी सांगितल्याप्रमाणे त्यागाविना भक्तीला अर्थ नसतो. आपण देवासाठी कष्ट घेतले तर देव आपली पूर्ण काळजी घेईल अशी श्रद्धा भक्तांच्या मनात असते. मनापासून केलेल्या शारीरिक श्रमाचे त्यांना कांही वाटत नाही. पर्वतांवर ट्रेकवर जाणारे लोक असेच कष्ट करतात ते कशासाठी?

त्यातून त्यांना समाधान मिळते म्हणूनच ना? तिसरे आणि सर्वात महत्वाचे कारण म्हणजे भाविकांच्या दृष्टीने तो एक अविस्मरणीय असा सुखद अनुभव असतो. आजकालच्या वैज्ञानिक प्रगतीमुळे आपण सतत जगाच्या संपर्कात राहतो. पण पूर्वीच्या काळात एकदा दिंडीबरोबर घर सोडले की परत घरी येईपर्यंत रोजच्या सगळ्या विवंचनापासून मुक्त होऊन दिवसरात्र परमेश्वराचे नामस्मरण आणि संतांचा सहवास यात एका वेगळ्या सात्विक वातावरणात राहण्याचा एक आगळा अनुभव त्यांना मिळत असे. त्यामुळे दत्ता पाटील यांनी लिहिलेल्या आणि प्रल्हाद शिंदे यांनी गायिलेल्या खालील गाण्यात वर्णन केल्याप्रमाणे आषाढी कार्तिकीच्या वा-यांचे दिवस आले की वारक-यांची पावले आपोआप पंढरीच्या दिशेने पडू लागतात.

पाऊले चालती पंढरीची वाट । सुखी संसाराची सोडूनीया गाठ।।
गांजूनी भारी दु:ख दारिद्र्याने । करी ताणताण भाकरीचे ताट ।।
घेता प्रसाद श्री विठ्ठलाचा । अशा दारिद्र्याचा होई नायनाट ।।
मनशांत होता पुन्हा लागे ओढ । दत्ता मांडी गोड अंतराचा थाट ।।

याचविषयावरील श्री. मिलिंद ऊाकूर या चित्रकाराने रंगवलेली सुरेख चित्रे इथे पहा
http://www.milindthakur.com/main-1.jpg

पाऊले चालती पंढरीची वाट ।।

समाजलेख

प्रतिक्रिया

अमोल केळकर's picture

28 Jun 2008 - 11:55 am | अमोल केळकर

देहु , आळंदी आणी इतर ठिकाणाहुन येणार्‍या पालख्या, वारकरी ही अस्सल महाराष्ट्राची संस्कॄती, ओळख.
भक्ती संप्रदायाचा एक वेगळा अविष्कार या वारीतुन दिसुन येतो.
पांडुरंगाचरणी साष्टांग दंडवत !!

विसोबा खेचर's picture

28 Jun 2008 - 4:27 pm | विसोबा खेचर

देहु , आळंदी आणी इतर ठिकाणाहुन येणार्‍या पालख्या, वारकरी ही अस्सल महाराष्ट्राची संस्कॄती, ओळख.

अगदी सहमत...!

तात्या.

झकासराव's picture

28 Jun 2008 - 2:21 pm | झकासराव

वारकर्‍याना इतकं सगळं करण्याची ताकद कुठुन येते हे एक कोडच आहे.
ते सोडवायच असेल तर वारीत सहभागी होण्यावाचुन पर्याय नाही.
आमच्या निगडीतुन जाणारी वारी आणि भान हरपुन चाललेले वारकरी पाहुन माझ्या मनात देखील वारीला जावुया, भरपुर फोटो काढुया, भक्तीची ती नशा अनुभवुया असा विचार त्यावेळीपासुनच मनात बसलाय. :)
बघु कधी जमेल ते.
ह्यावर्षी हाती कॅमेरा होता. आणि वारी मुक्कामाला येते आमच्या आकुर्डीच्या विठ्ठल मंदीरात. म्हणुन वारी देहुतुन निघाल्याच्या दिवशी मंदीरात गेलो.
तिथे तयारी सुरु होती. तिथल्या प्रमुख विणेकरी सोमवंशी बुवा याना भेटून वारी सध्या कुठवर आली असेल, इथे रात्री कार्यक्रम असतात अशी सर्व माहिती विचारुन घेतली.
घड्याळात पाहिले तर वेळेच गणित जमवण थोड कठिणच होत तरिहि दुचाकी सोडली देहुरोडकडे. तर माझ नशीबच खराब. तिथे मुख्य पालखी अजुन हायवेला लागलीच नव्हती. आणि तिथुन देहुगावात जाणं दुचाकी घेवुन अथवा चालत हे दोन्ही शक्य नव्हत. पहिल कारण गर्दी आणि दुसर कारण मला हापिसात जायच होत सेकंड शिफ्ट ला :(
मग काय तिथुनच परत आलो. वारीचा छानसा फोटु काढण्याच मनातच राहुन गेल.
वारीचा रात्रीच्या मुक्कामाच्या ठिकाणी असलेल्या किर्तनाचा कार्यक्रम हा रात्री ११ वाजेपर्यंतच असणार होता. आणि मी हापिसातुन सुटणार १२:३० म्हणजे तो हि चान्स गेला. बर सकाळी वारी लवकर निघते ५:३० ला तेव्हा जाव अस ठरवल तर माझ्या कुंभकर्णी झोपेने घात केला. :(
आता काय दुसर्‍यानी काढलेले फोटु पाहुन समाधान मानुन घ्यायच.
नाही म्हणायला हे मी घेवु शकलो अशी काहि प्रकाशचित्रे

आकुर्डीच्या विठ्ठल मंदीरात तयारी सुरु होती.

हे काहि वारकरी जे मुख्य पालखीपासुन बरेच पुढे होते.

जर प्रकाशचित्रे दिसत नसतील तर http://picasaweb.google.co.uk/zakasrao/Wari पहा.

अवांतर : लोकसता मध्ये एका पुस्तकाची ओळख आली होती.
हे देखण पुस्तक लिहिल आहे संदेश भंडारे यानी जे एक उत्तम फोटोग्राफर आहेत.
त्यानी "वारी" अनुभवुन त्याची प्रकाशचित्रे व त्यांचा अनुभव लेखन अस एक पुस्तक लिहिल आहे. त्याचा दुवा सध्या सापडत नाहिये. कोणाला माहीत असल्यास द्या.

ता क: लोकसत्ता मधील लेखाची लिन्क सापडली नाही पण सन्देश भंडारे यांनी काढलील वारीची प्रकाशचित्रे पहायला मिळतील
http://www.sandeshbhandare.com/html/assignments/self/Wari.htm इथे. :)

................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

आनंद घारे's picture

29 Jun 2008 - 7:07 pm | आनंद घारे

झकासरावांनी पाठवलेली चित्रे कांही दिसत नाहीत. मी आपला एक प्रयत्न करून पाहतो आहे.
दिंडी