कुणी तरी म्हटलंय.
" एखाद्दयाला समजून घेण्यातच वेळ घातला तर त्याच्यावर प्रेम करायची वेळच निघून जाणार. "
काल मी प्रो.देसायांच्या घरी गेलो होतो.गेले दोन तिन दिवस भाऊसाहेब तळ्यावर येत नव्हते.म्हटलं आपण स्वतः जावून त्यांची चौकशी करावी.त्यांच्या घरी पाहुण्यांची गडबड दिसत होती.जरा जपून जपून आत गेलो.मला पाहून कुणीतरी दार उघडलं.मला पण ती मुलगी जरा अनोळखी वाटली.तिने "भाऊसाहेबाना सांगते" म्हणून सांगून मला आत बसायला सांगितलं.
मला पाहून भाऊसाहेब म्हणाले,
"तुमचीच आठवण काढली होती.आम्ही सर्व तळ्यावर जात होतो.वाटलं तुम्ही आम्हाला भेटणारच.मी तुमची माहिती माझी पुतणी आली आहे तिला सांगत होतो."
तिला हांक मारीत,
"अगं भावना जरा बाहेर ये.ह्यांच्याच बद्दल मी तुला सांगत होतो.चला आता आपण सगळेच मिळून तळ्यावर जावू या."
असं म्हणत आम्ही लागलीच बाहेर पडून तळ्यावर जायला निघालो.भावनाच्या अंगावर एक छोट्टशी मुलगी झोपली होती.तिला तसंच थोपटंत थोपटंत ती आमच्या बरोबर यायला निघाली.बोलत बोलत आम्ही सर्व तळ्यावर येवून पोहचलो.एका लांब रूंद बाकावर आम्ही सर्व बसलो.भावनाने त्या मुलीला आपल्या मांडीवर घेवून ती बाकावर बसली.त्या झोपलेल्या मुलीला पाहून मी तिला म्हणालो.
"किती निष्पाप चेहऱ्याची ही मुलगी आहे.तिचे हे कुरळे केस,तरतरीत नाक अणि एव्हडीशी जीवणी पाहून खरंच कौतुक करावसं वाटतं" असं मी सहजच भावनाला म्हणालो.
माझं ते कौतुक ऐकून भावना अशी काय हंसली की तिचं हंसणं काहीतरी बरचसं सांगून गेल्याचं मला भासलं.
मी जरा तिला भित भितच विचारलं,
"काय गं! माझं काय चुकलं काय?"
मला म्हणाली,
"काका,व्यक्ति तशा प्रकृति"
मी तिला विचारलं,
"म्हणजे गं काय?"
प्रो.देसायांकडे पाहून जणू त्यानीच तिला मला काहीतरी सांगावसं असं अगोदरच सांगून ठेवलं आहे आणि ती आता त्यांची संमती घेत आहे असं भासवून सांगू लागली.
"माझ्या मुलीकडे बघून एका बॅंकेतला कारकूनाने एकदा मला विचारलं,
"ही तुमचीच मुलगी का?"ते मला आठवलं.
असा प्रश्न ऐकून घेण्याची माझी ही काही पहिलीच वेळ नव्हती.असल्या खोचक प्रश्नाला खोचक उत्तर देण्याची माझ्या मनात कधीही तयारी असायची. पण त्या ऐवजी माझ्या मुलीसाठी तिच्या जीवनात येऊ घातलेल्या प्रश्नावर मी माझ्या एकाग्रतेत जास्त लक्ष घालीत असे.
खोचकपणे विचारलेल्या प्रश्नाला मी जराशी घुसमटली जायची आणि त्या कारकूनाला मी म्हणाले,
"ती सुंदर आहे,हुशार आहे,आणि शिस्तीत वागणारी आहे."
माझ्याकडे तो कारकून जरासा विस्मयीत होवून म्हणाला,
"असं,असं"
जणू त्याच्या तो प्रश्नच मला समजला नाही असं त्याला वाटलं.
मी मनात हसले,मला त्याचा प्रश्न त्याचवेळी कळला होता,आणि त्याला खरं उत्तर द्दयायला सुचू लागलं होतं.
श्वेताला मी त्या अनाथाश्रमात पहिल्यांदा पाहिलं होतं.अगदी नाजूक प्रकृतीची,कानाने ऐकू न येणारी काहीशी सावळ्या वर्णाची ती त्यावेळी दोन वर्षाची होती.मी त्यामानाने जास्तच गौर वर्णाची असल्याने लोकांच्या नजरेत हा विरोधाभास यायचा.
श्वेताचे डोक्यावरचे ते काळेभोर कुरळे कुरळे केस,नाजूक चेहरा,तिच्या गालावर एक छोटासा काळा ठिपका,तुकतुकीत कान्ती आणि काळेभोर टुकटुकीत डोळे पाहून कुणाचेही लक्ष जाईल असं तिचं लक्षण होतं.तिला पाहून एकच नाव ठेवायचा विचार येईल "संपुर्णा"
आपल्या अंतरात नेहमीच कुत्सित विनोदाची चाड ठेवून रहाणारे बरेच लोक असतात. डोळ्याला घोड्याचा चष्मा लावून फक्त समोरच्याच नजरेने पहाण्याची त्यांना संवय असते.
त्यामुळेच अगदी पहिल्यांदाच अशाच एका अनोळखी व्यक्तिने माझ्या आणि श्वेताच्या नात्यासंबंधी प्रश्न विचारला होता.आम्हीच दोघं जणू सारखे दिसत नाही हे विसरूनच गेलो होतो.दुसऱ्यावेळी असाच काहिसा प्रश्न विचारल्यावर मी अगदी अदबीने कल्पना दिली की मी आई आणि ती माझी मुलगी आहे,पण तिची जात काही मला माहित नाही.
विसाव्या वेळी असाच प्रश्न विचारल्यावर मी त्या व्यक्तिचा प्रश्न कसा असंदर्भीत आहे हे त्याला समजावून सांगितलं.चाळिसाव्या वेळी असाच प्रश्न विचारल्यावर मी प्रश्न ऐकला नाही ऐकला असंच दाखवलं.
आता बराच काळ लोटून गेल्यावर त्या प्रश्नामागचा आशय माझ्या जीवनाचा मोठ्यात मोठा धडा झाला तो असा.
नातं,हे असा दुवा आहे,की त्याची गहिरता जन्मावर,रंगावर,जातीवर असण्या पेक्षाही खोल आहे.आपल्या पैकी ज्याना खऱ्या प्रेमाचा अर्थ समजला आहे त्यांना ते त्यांच्या अंतरातूनच कळतं.आणि त्याची जाणीव असणं ही एक खास देणगी समजली पाहिजे.
ज्यावेळी एखाद्दयाचं मन मोकळं असतं,आणि नवीन नातं जुळवून घेण्याची तयारी असते, त्यावेळी एकमेकात साम्यच जास्त दिसू लागतं.कधी कधी मनात नवी नाती जुळवण्याची इच्छा येते,कुणी तरी अगदी जीवाभावाचं वाटतं,कधी कधी जवळीक असून सुद्धा मनात कायमचं नातं जुळत नाही.पण सभोवतालच्या माणसांबद्दल आस्था रहाते.एकदा एखाद्दया बद्दल चांगला समज झाल्यावर, वरवरच्या तर्कावरून समजूत करून घेण्याची गरज भासत नाही.
म्हणूनच मघाशी तुम्ही श्वेताचं कौतुक केलंत ना,ते ऐकूनच मी म्हणाले होते,
"व्यक्ति तशा प्रकृती"
आता तुमच्या सर्व लक्षात आलं असेल ना?
कुणी तरी म्हटलंय.
"एखाद्दयाला समजून घेण्यातच वेळ घातला तर त्याच्यावर प्रेम करायची वेळच निघून जाणार. "
खरंच भावनाकडून हे सर्व ऐकून असं मला वाटलं.प्रो.देसायानी आज मला भावनाच्या तोंडून सुंदर लेक्चरच दिलं.
श्रीकृष्ण सामंत
प्रतिक्रिया
30 Jun 2008 - 1:31 am | शितल
लेखचा आशय मनाला भिडुन जातो,
छान लिहिले आहे.
30 Jun 2008 - 4:13 am | श्रीकृष्ण सामंत
आपल्या प्रशंसे बद्दल आभार
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
30 Jun 2008 - 11:42 am | पक्या
>>लेखचा आशय मनाला भिडुन जातो,
हेच म्हणतो मी.
30 Jun 2008 - 7:55 pm | श्रीकृष्ण सामंत
प्रशंसे बद्दल आभार
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com