'गाणं' या गोष्टीशी सर्वांचाच आयुष्यात कधी ना कधी संबध आलेला असतो. पण ‘गायन’ करण्याचा प्रसंग मात्र सर्वांवरच आलेला नसावा. म्हणजे शाळकरी वय किंवा कॉलेजचं ग्यादरिंग वगैरे सोडून. तरीसुद्धा, ‘गायनी गळा’ असो अथवा नसो, ‘गायनी कळा’ मात्र सर्वांनाच आयष्यात केव्हा ना केव्हा हमखास येऊन गेलेल्या असतात. आणि प्रत्येक घराच्या बाथरूमच्या भिंतींना, घरातल्या सर्वांच्या या ‘गायनी कळा’ चांगल्याच परिचित असतात. (आणि काही घरांच्या टॉयलेटच्या भिंतींनासुद्धा ! )
या गायनी कळांनी आणलेल्या गमतीदार प्रसंगांचे काही किस्से.
मंगल कार्याला पार्श्वभूमीवर गाणी वाजत ठेवण्याची पद्धत आहे. एक आपला स्पीकरवाला पकडायचा अन गाण्याचं कंत्राट त्याच्या हवाली करायचे. पण कोणत्या प्रसंगी काय वाजवावे याचे भान त्या वाजवणाऱ्याला क़्वचितच असते. माझ्या एका दूरच्या काकांच्या मुलीच्या लग्नाच्या वरातीत या गायनवाल्यांनी ‘हम आज अपनी मौतका सामान ले चले’ हे गाणे वाजवून अवघड प्रसंग आणला होता. तसेच एका वधू-वर मेळाव्याला ‘मै का करू राम मुझे बुढ्ढा मिल गया..’ हे गाणे लावलेले आठवते.
आम्ही शाळेत असताना पीटीचे गायकवाड सर नवीन आलेले. ते होते संगीतप्रेमी. पहिल्याच दिवशी पीटीसाठी मैदानात गेल्यावर त्यांनी सांगितले.
‘मुलानो आणि मुलींनो, पीटी करताना संगीताच्या तालावर केली तर स्टेप्स चुकणार नाहीत अन पीटीचे श्रमसुद्धा जाणवणार नाहीत. चला __ मी पेटी वाजवतो. ड्रम कोण वाजवणार ?’
मग ड्रम चांगला वाजवू शकणाऱ्या पक्याला त्यांनी ड्रमची जिम्मेदारी सोपवली. अन आम्हाला स्टेप्स सांगून गायकवाड सरांनी पेटीवर ‘पीटी’ गीत सुरु केले,
‘गोरो गोरी पान, फुलासारखी छान
दादा मला एक वहिनी आण..’
अन आम्ही ‘वहिणी’च्या तालावर हातपाय घुमवू लागलो.
*******
कॉलेजात गेल्यावर ‘ग्यादरिंग’ नामक प्रकारात ‘गायनी कळे’ ची हौस भागवायला भरपूर संधी मिळे.
एकदा गायन स्पर्धेत आमच्या दिनेश नावाच्या बऱ्यापैकी सुसह्य गळा असणाऱ्या मित्राने भाग घेतला होता. स्पर्धकांची संख्या जास्त असल्याने प्रत्येकाला गाणे म्हणायला चार मिनिटेच वेळ दिला गेला होता. स्टेजवर गायकाच्या समोर एक दिवा टांगला होता. वेळ संपल्यावर, बेल वाजून गाण्याचा रसभंग होऊ नये पण गायकाला तर वेळ संपल्याचे समजावे म्हणून बेलऐवजी तो दिवा लावण्याची आयडीया होती.
दिनेशने गाणे मोठे छान भावूक निवडले होते. ‘तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे..’
गाणे अगदी रंगात आले. शेवटच्या कडव्याची पहिली ओळ तो म्हणू लागला,
‘एक एक नक्षत्राचा दिवा लागताना..’
आणि त्याच क्षणी चार मिनिटे संपल्यामुळे त्याच्या समोरचा दिवा प्रकाशू लागला !
मग काय, पोरांनी टाळ्या अन शिट्ट्यांचा हैदोस घातला !
******
कुणाच्यातरी लग्नाला गेले होते.
भटजीबुवांची अंतरपाट धरून ‘मुलाच्या मामानी मुलाला घेऊन यावे, मुलीच्या मामानी मुलीला आणावे..’ इ. कॉमेंट्री सुरु होती. चीफ भटजीबुवा साठीच्या आसपासचे, दाढीचे पांढरे खुंट गालावर धारण केलेले. अॅरसिस्टंट भटजी तरुण होता. दोघे सोवळे नेसून स्टेजवर उभे होते.
मुलगा मुलगी आले. मंगलाक्षता सुरु झाल्या. आधी रेकोर्ड केलेल्या मंगलाक्षता झाल्या. त्या संपल्यावर ‘ताराबलं चंद्रबलं...’ म्हणण्यासाठी चीफ भटजीबुवा तोंड उघडणार इतक्यात त्यांचा मोबाईल सोवळ्याच्या गाठीतून वाजू लागला.
भटजीबुवा ज्येष्ठ नागरिकमध्ये मोडणारे. रिंगटोनमधून अगदी अथर्वशीर्ष नाही, तरी गेलाबाजार ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा..’ ऐकायला येईल अशी किमानपक्षी आमच्या कानांची अपेक्षा. पण प्रत्यक्षात कानावर पडले, ‘कजरारे कजरारे...तेरे कारे कारे...’
*****
माझी एक मावसबहीण प्रोफेसर आहे. तिच्या मुलाचं बारसं होतं. बाळाला छानपैकी नटवून पाळण्यात ठेवल्यावर जमलेल्या साळकाया-माळकायांनी ठेवणीतला ‘आतला’ काढून अंगाईगीते म्हणायला सुरुवात केली. पण प्रत्येक अंगाईबरोबर उत्सवमूर्तीच्या रडण्याचा सूर चढतच चालला. अखेर बाळाचं रडणं विकोपाला गेल्यावर त्याच्या आईला पाचारण केलं. तिनं अगोदर सगळी अंगाईगीतं बंद करायला लावली. मग बाळाला मांडीवर घेऊन आपली पेश्शल अंगाई सुरु केली,
‘एवढा मोठ्ठा भोपळा..
आकाराने वाटोळा...
त्यात बसली म्हातारी...’
आणि काय आश्चर्य ! लेकीचे ‘घट्ट’ झालेले लाडू खाऊन भोपळ्यातली म्हातारी लठ्ठ व्हायच्या आत बाळराजे गुडूप झोपले की हो !
थक्क होऊन बायकांनी याचं इंगित विचारल्यावर ती विदुषी माता सांगती झाली,
‘अगं, PHd चा अभ्यास करता करता अंगाई पाठ करायला सवड कुठली व्हायला मला ? मग मी आपली याला झोपवताना ‘एवढा मोठ्ठा भोपळा..’ म्हणत असे. तेवढं एकच बालगीत येतं बाई मला..!’
*******
आणखी एका आतेभावाच्या मुलाची वेगळीच कथा. सहा वर्षाच्या या बाळाला म्हणे टॉयलेट मध्ये गेल्यावर गाणं म्हटल्याशिवाय ‘शी’च होत नाही. मी एकदा आतेभावाच्या घरी गेले असताना हे चिरंजीव टॉयलेटच्या मोहिमेवर चालले होते. त्याची आई त्याला म्हणाली,
‘आज राहूदे रे गाणं म्हणायचं !’
आज्ञाधारक चिरंजीवाने गाण्याशिवाय भरपूर प्रयत्न केला. पण काही जमेना.
तो रडवेल्या सुरात ओरडला, ‘ए आई, होत नाहीये गं...’
‘.....म्हण बाबा म्हण ! पण जरा हळू..’ इति माता.
लगेच चिरंजीवांनी ठेका धरला, ‘जन गण मन अधिनायक जय हे...’
मी ठारच झाले. ‘अगं, म्हणेना गाणं, पण हे गाणं....?? ..टॉयलेटमध्ये ???’
‘अहो ताई, त्याला दुसरं कुठलंच गाणं पूर्ण पाठ नाही ना म्हणून तो पहिल्यापासून हेच म्हणतो !’ राष्ट्रमाता बाणेदारपणे वदली.
*******
हा मात्र चक्षुर्वैसत्यम नाही, तर ऐकीव किस्सा.
आठ वर्षीय बालिका माझ्या मैत्रिणीच्या मैत्रिणीची मुलगी. मैत्रिणीची मैत्रीण आहे शास्त्रीय संगीताची फॅन. मुलीला कुठे ठेवायची सोय नसल्यामुळे संगीताच्या कार्यक्रमांना मुलीला घेऊन जायची. मुलगीपण भारी शहाणी ! शांत बसून सगळं ऐकायची. एकदा मात्र रागदारी ऐन भरात आली असताना हिने ‘आई मला शू करायच्चीये...’ असे तारसप्तकात जाहीर करून सभेला गार केले.
मग मैत्रिणीने तिला समजावून सांगितले, ‘किनई पिंकी बेटा, शू आल्यावर हळूच मला म्हणायचं, आई मला गाणं म्हणायचंय.’
पिंकी खरोखरंच शहाणी . मग प्रत्येक वेळी ती ‘गाणं’ आल्यावर आईला सांकेतिक भाषेत बरोब्बर सांगे.
एकदा पिंकी बाबांच्या बरोबर सेमिनारला गेली. आणि तिथे सेमिनार सुरु झाल्यावर तिला ‘गाणे’ आले. ती बाबांना म्हणाली, ‘बाबा, मला किनई, गाणं म्हणायचंय.’
बाबा दचकलेच. ‘आत्ता..? आत्ता नाही म्हणायचं बेटा, घरी गेल्यावर म्हण हं..’
गाण्याची भानगड बाबांना काहीच माहिती नव्हती.
थोडावेळ गेल्यावर पुन्हा पिंकी ‘बाबा, मला जोरात गाणं म्हणायचंय..’
ती ऐकत नाहीसं बघून अखेर बाबा म्हणाले, ‘बरं, बरं, हळूच माझ्या कानात म्हण हं...’
*******
अशा या विलक्षण गायनी कळा ! त्यांचे असेच आणखी काही मजेदार किस्से माहिती असल्यास इथे अवश्य टंकावे....!
प्रतिक्रिया
6 Nov 2012 - 10:32 am | श्री गावसेना प्रमुख
म्हण बाबा म्हण ! पण जरा हळू..’ इति माता.
लगेच चिरंजीवांनी ठेका धरला, ‘जन गण मन अधिनायक जय हे...’
मी ठारच झाले. ‘अगं, म्हणेना गाणं, पण हे गाणं....?? ..टॉयलेटमध्ये ???’
अभंग म्हणायचे ना....वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरी चे
6 Nov 2012 - 10:38 am | श्री गावसेना प्रमुख
थोडावेळ गेल्यावर पुन्हा पिंकी ‘बाबा, मला जोरात गाणं म्हणायचंय..’

ती ऐकत नाहीसं बघून अखेर बाबा म्हणाले, ‘बरं, बरं, हळूच माझ्या कानात म्हण हं...’हा हा हा
6 Nov 2012 - 10:57 am | प्रचेतस
वाईट्ट हसतोय.
6 Nov 2012 - 11:41 am | जेनी...
बेक्कार हसतेय !!
सगळ्यात बेस्ट.... स्नेहा सगळेच किस्से तु खुपच जिवंत करुन समोर मांडलेत
प्रेझेन्टेशन निव्वळ अप्रतिम .
कीप इट अप डीअर :)
6 Nov 2012 - 1:16 pm | कलश
ह.ह.पूवा झाली आहे...
6 Nov 2012 - 3:42 pm | श्री गावसेना प्रमुख
मग आता हात जोडुन झोपलेय का
6 Nov 2012 - 1:32 pm | ह भ प
एकदा असंच एका मित्रानं विचारलं..
टॉयलेट मधुन बाहेर आल्यानंतर म्हणायचं गाणं कोणतं..?
बराच वेळ विचार करुन उत्तर सापडेना म्हटल्यावर त्यानं सांगितलं:
'जुदा हो के भी, तू मुझमे कही बाकी है..'
6 Nov 2012 - 3:28 pm | इरसाल
आणी टॉयलेट मधे असणार्याने.......
"आधा है चंद्रमा रात आधी"
6 Nov 2012 - 8:39 pm | सूड
आमचा एक मित्र टॉयलेटला जाताना 'लग्नाला जातो मी द्वारकापुरा' म्हणायचा ते आठवलं !! ;)
7 Nov 2012 - 10:29 pm | प्रास
.....जो याद आती है मगर आती नही
सामने है पर नजर आती नही....
टॉयलेटातला - हायली कॉन्स्टिपेटेड
मूळ चित्रपट - प्रेम
मूळ सादरकर्ता - संजय कपूर
6 Nov 2012 - 1:56 pm | अत्रुप्त आत्मा
6 Nov 2012 - 2:00 pm | झकासराव
जबरी :)
लोळुन लोळुन हसतोय अशी स्मायली आहे का? तीच दिलीये अशी समजा. :)
6 Nov 2012 - 3:26 pm | ज्ञानोबाचे पैजार
भयानक जबरदस्त किस्से आहेत. बेक्कार हसतोय.
6 Nov 2012 - 3:51 pm | गणपा
हा हा हा
एकसे एक भारी किस्से.
शेवटचा तर एकदम 'कळस' आहे. =))
6 Nov 2012 - 4:31 pm | प्रभाकर पेठकर
पूर्वी आमच्या आसपास चाळी होत्या. संडास कॉमन, चाळीपासून १५-२० पाऊले दूर.
आमच्या ऑफिसमधली एक सेक्रेटरी त्यातल्या एका चाळीत राहात होती. एकदा सकाळी ती हातात टमरेल घेऊन ती 'तिथे' जात असताना, आमच्याच ऑफिसातला जोश्या रस्त्याने जात होता, त्याने पाहिलं. झालं. लगेच ह्याने गाणं सुरु केलं....
'अकेले अकेल कहाँ जा रहे हो, हमे साथ लेलो ज॑हाँ जा रहे हो...'
जोशाच्या पाठीत, सणसणीत, दगड बसला.
6 Nov 2012 - 6:27 pm | मीनल
हसून हसून दमछाक झाली.
"कजरारे...तेरे कारे कारे...’ मात्र अफलातून
6 Nov 2012 - 8:29 pm | Mrunalini
हा हा हा..... सॉलिड्ड होत हे.... कसुन कसुन वाट लागलीये. :D
6 Nov 2012 - 8:30 pm | Mrunalini
हा हा हा... बघ... हसताना लिहल्यामुळे अशा चुका होतात. तिथे वरती हसुन हसुन असे वाचावे. ;)
6 Nov 2012 - 8:35 pm | जेनी...
ऑ ??
तरी मी विचार करतेय ..कसुन कसुन कसं कसायचं ?? :(
आय मीन कसं हसायचं ????? =))
6 Nov 2012 - 8:38 pm | Mrunalini
माझी पण हिच अवस्था झालीये. म्हणुनच कसुन कसुन हसले. ;)
6 Nov 2012 - 9:06 pm | कवितानागेश
:D
7 Nov 2012 - 10:30 pm | प्रास
किस्से धमालेत..... :-)
7 Nov 2012 - 10:39 pm | ५० फक्त
जाम हसलो, ब-याच दिवसांनी.धन्यवाद.
8 Nov 2012 - 12:50 am | वीणा३
धमाल किस्से एकदम :D
8 Nov 2012 - 1:24 am | रेवती
हा भारी लेख माझ्याकडून वाचायचा कसा राहिला हे कोडे आहे.;)
सगळे किस्से वाचून हसू आले. सांगण्याची पद्धतही साधी आणि मस्त!
माझी मैत्रिण विमानात तिच्या (प्रिस्कूलर) मुलीसमोर पाण्याचा जवळजवळ रिकामा पेला धरून उभी राहून "अगं पी ना, पी" असं म्हणत होती आणि मागे बसलेले अमेरिकन लोक डोळे मोठ्ठे करून पहात होते. काही सेकंदाने हिच्या लक्षात आले आणि गप्प बसली. ;)
8 Nov 2012 - 1:36 am | जेनी...
=))
8 Nov 2012 - 8:15 am | स्पंदना
पी ना पी ना
अग आई ग्ग! लिहिता सुद्धा येइइना बघ रेवती.
8 Nov 2012 - 10:33 am | जेनी...
म्हणुनच मला राग येतो कुणी माझ्या आणि माझ्या आडनावाच्या आद्य अक्षराना एकत्र करुन हाक मारली कि :(
पण ह्या यड्याना कै समजतच नै :-/
8 Nov 2012 - 3:55 pm | बॅटमॅन
<विकट हास्याची स्माईली> ही हा हा हा हा!!!!!!!
8 Nov 2012 - 2:10 am | खेडूत
मस्त !! छान शैली ! :)
>>> मुलीच्या लग्नाच्या वरातीत या गायनवाल्यांनी ‘हम आज अपनी मौतका सामान ले चले’ हे गाणे वाजवून अवघड प्रसंग आणला होता.
मधे ब्यांडवाले लग्नात 'दिल के अरमां आसूओ में बहें गये' किंवा 'खेळ कुणाला दैवाचा कळला' पण वाजवायचे !
8 Nov 2012 - 8:01 am | ५० फक्त
'मुलीच्या लग्नाच्या वरातीत या गायनवाल्यांनी ‘हम आज अपनी मौतका सामान ले चले’ हे गाणे वाजवून अवघड प्रसंग आणला होता.'
- ही गोष्ट स्व. राजकपुर यांनी केली होती असं ऐकुन आहे.
8 Nov 2012 - 2:53 am | अभ्या..
तीर्थक्षेत्रातली म्युझिक सेंटर मधली गाणी हा तर एक लै भारी प्रकार.
शब्द नीट ऐकावेत. लिहिणार्याची प्रतिभा बघूनच थक्क होतं
"अंबाबाईचा आलाय मिसकॉल मला गं, मंगळवारी जायचं तुळजापूरा गं"
हे लेटेस्ट या नवरात्रातलं (ऐकणार्या सर्व भाविकांची न श्रध्दाळूंची क्षमा मागून)
8 Nov 2012 - 10:50 am | सस्नेह
अंबाबाई वाघावर बसून मोबाईल वर मिसकॉल देते आहे असं चित्र डोळ्यासमोर आलं अन ह्हपुवा झाली.
10 Nov 2012 - 1:52 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
"अंबाबाईचा आलाय मिसकॉल मला गं, मंगळवारी जायचं तुळजापूरा गं"
लैच भारी.
8 Nov 2012 - 6:28 am | रमेश आठवले
सई परांपे यांनी दिग्दर्शित केलेल्या एका सिनेमात, चाळीत रहणारा नायक ( नसिरुद्दीन शाह ?), हातात टमरेल घेऊन common संडासांकडे धावत असल्याचे दृश्य आहे. तो तसे करीत असताना, पार्श्वसंगीत म्हणून सयीतायींनी भीमसेन जोशी यांनी गायलेला -आता कोठे धावे मन - हा अभंग वाजविलेला आहे.
9 Nov 2012 - 2:24 am | आदूबाळ
चित्रपट आहे "कथा". सुंदर सिनेमा!
8 Nov 2012 - 8:18 am | स्पंदना
हसुन हसुन वाईट अवस्था झालीय ग बये.
वैसे माझी कन्या टॉयलेट मध्ये बसुन मोथ्यामोठ्याने "ओम भु भुवस्वहः" म्हणायची ते आठवल.
8 Nov 2012 - 8:22 am | रेवती
एकदा रेडीओवर दिवाळीची गाणी लावताना त्यांनी लाखों तारे आसमान में, एक मगर ढुंढे न मिला, देखके दुनिया की दिवाली दिल मेरा चुपचाप जला हे गाणं लावलं होतं. ;)
8 Nov 2012 - 10:41 am | मूकवाचक
हहपुवा ...
8 Nov 2012 - 10:43 am | सुर
माझ्या लग्नाच्या सीडी मध्ये शेवटी ग्रुप फोटोच्या वेळी '' हम रहेना रहे कल, याद आयेंगे ये पल'' हे गाणं टाकलं आहे.आणी फोटो साठी ऊभी राहीलेली मंडळी म्हणजे माझी चुलत, मावस भावंड वय ५ ते १८ ह्या मधली.
8 Nov 2012 - 5:50 pm | चौकटराजा
नौशाद यांचे लग्न होते .वरातीत त्यानीच स्वरबद्ध केलेली रतन मधील गाणी वाजविली जात होती. नौशाद बसलेल्या घोड्याशेजारून मुलीचे वडील चालत होते. नौशाद त्याना म्हणाले " बघा मी केलेली गाणी बँडवाले वाजवताहेत. " यडा का काय " अशा नज्ररेने नौशाद कडे पहात हे म्ह्णणाले " काय च्या काय सांगता ! अहो तो सिनेमातील नौशाद कुठे व कोठे तुम्ही? संदर्भ दास्ताने नौशाद लेखक नौशाद अली.
काल्पनिक किस्सा नौशाद यांच्याच गाण्याचा-
एक लग्नातली वरात नवरा मुलगा सजून थाटामाटात विवाहोत्तर वरातील चालला आहे .वॅडवर गाणे चालू आहे....
दिलमे छुपाके प्यारका तुफान ले चले हम आज अपनी मौतका सामान ले चले
9 Nov 2012 - 4:34 pm | निश
स्नेहांकिता जी, अतिशय मस्त लेख.
हा लेख वाचताना हास्याची सुरवात गालातल्या गालात होते पण शेवट होता होता त्या हास्याचा कधी धबधबा होतो ते खरच कळत नाही. फारच अप्रतिम लेख
10 Nov 2012 - 1:50 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मस्त. कहनेकी ष्टाईल बडी अच्छी है. :)
धन्य ते गायनी कळा..! शीर्षक वाचून लेखाला क्लिकच करत नव्हतो. यमन-बिमन, मल्हार-बिल्हार, असा काही रागदारी प्रकार कोणी आळवत असेल आणि काही जागा बिगा दाखवल्या असतील आणि दर्दी लोक दाद देतील असं वाटत होतं. पण, प्रतिसादांची संख्या वाढतच चालली त्यामुळ चाललं काय आहे, म्हणुन क्लिकवलं आणि काय आनंद झाला म्हणून सांगू :)
-दिलीप बिरुटे