परवा हेलोवीन होता. अमेरिकेत तर निसर्ग चेटकीण , भुतांच्या स्वरुपात प्रत्येक अमेरिकावासियांच्या दारावर उभे ठाकले आहे.
जर्मनीत ह्या सणाचे विशेष महात्म्य नाही. पण माझे मन मला माझ्या बालपणीच्या आठवणी मध्ये रमले.
भुतांच्या गोष्टी आजी , आजोबा ह्यांच्या कडून ऐकल्या गेल्या. माझा पिंड
भुतांच्या गोष्टीवर बालपणी पोसल्या गेला.
आमच्या सोसायटी मध्ये गच्चीवर भाड्याने विडीयो आणून ३ सिनेमे सलग पाहण्याची परंपरा कोजागिरीच्या पूर्ण चंद्राच्या साक्षीने सुरु झाली. येथेच मी गुमनाम , बीस साल बाद ( जुना ) आणि वो कौन थी सारखे सिनेमे पहिले.
आजही ते सिनेमे पाहतांना मधूनच एखाद्याला बाथरूम ला जावयाचे असेल तर एकट्याने गच्ची ते घर हे अंतर कापतांना होणारी जीवाची धडधड अजूनही जाणवते.
भारतात वी सी आर घराघरांमध्ये पोहोचले. व व पूर्वी इंग्रजी सिनेमा ही मुठभर उच्चवर्गीय मक्तेदारी मोडत मध्यमवर्गीयांच्या घरी पोहोचला.
व ८० च्या दशकात हॉलीवूड च्या हॉरर जगतातील बेताज बादशहा .
मायकल मायर . जेसन , किंवा फ्रेडी हे भारतात सुद्धा लोकप्रिय झाले.
हॉरर सिनेमांचा थरार भारतीय प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवू लागला.
मात्र बॉलीवूड त्या काळात एकूणच संक्रमणावस्थेतून जात होता.
इंदिरा इज इंडिया च्या धर्तीवर अमिताभ इज बॉलीवूड असा प्रकार होता.
मात्र तो राजकारणात गेल्याने बॉलीवूड मध्ये एक रिक्त पोकळी निर्माण झाली होती.
ती भरून काढण्याचे काम गरिबांचा अमिताभ मिथुन व इतर अभिनय करण्याचा अभिनय करणारे अभिनेते करत होते.
ह्याच वेळी रामसे बंधूंच्या डोक्यात त्यांच्या प्रत्येक सिनेमात कोसळते तशी विजेसारखी एक कल्पना चमकली.
भारतीय प्रेक्षकांना त्यांचा मातीतला त्यांना भावेल असा फ्रेडी , जेसन ह्यांचा भारतीय अवतार जन्माला घालायचा.
आणि सामरी ह्या पहिला वाहिला भारतीय राक्षस , दैत्य , महाभूताचे व्यक्तिचित्र हळूहळू आकारास येऊ लागले.
ह्या आधी भयपट किंवा भूतपट काढण्याचे प्रयत्न ह्या रामसे बंधूंकडून झाले होते,
पण त्यांना यश मिळाले नव्हते कारण मुळात भारतीय साहित्यात आणि सिनेमांच्या मध्ये भय कथांना दुय्यम दर्जाची वागणूक मिळायची.
भारतीय साहित्य व सिनेमा मधील मुख्य प्रवाहातून अश्या सिनेमांची निर्मिती झाली नव्हती व अश्या सिनेमांना हक्काचा प्रेक्षकवर्ग नव्हता. म्हणून सुरवातीला शून्यापासून सुरुवात करणाऱ्या रामसे बंधूंना प्रेक्षकांची नाडी ओळखण्यासाठी १९८4 साल उजाडावे लागले.
ह्या आधी बीस साल बाद ते कोहरा हे परकीय कांदबरी व सिनेमावर आधारीत सिनेमे
भारतात त्यांचा अवीट संगीतामुळे लोकप्रिय झाले होते, पण ते रहस्य गटात मोडायचे. म्हणजे सोफ्टकोर भयपट. मात्र हॉलीवूड सारखे हार्ड कोर भयपट काढण्याची मनीषा ह्या
बंधूनी धरली व त्यातून साकार झाला पुराना मंदीर
१९८4 सालचा सर्वात लोकप्रिय सिनेमा ( खोटे वाटते तर आंजा वर गुगलून पहा.)
रामसे बंधूंनी कुठल्याही परकीय कथानकाचा आधार न घेता भारतातील गावांमध्ये प्रचलित असलेल्या भूता खेतांच्या गोष्टी विशेषतः
उत्तर भारत , राजस्थान व हिमाचल प्रदेश येथील पहाडी भाग येथे चुडेल , हडळ किंवा भुतांच्या गोष्टी त्यांच्याविषयी दंतकथा वर्षोवर्ष प्रचलित आहेत. त्यावरून घेतले आहे.
( आपल्याकडे हा मान कोकणाकडे जातो. त्यातही चकवा लागणे हा प्रकार तर अस्सल मराठी मातीतील आहे.
ह्या सिनेमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे मोहनीश बेहेल ह्याचा हा पहिला सिनेमा
ह्या सिनेमात पुढे प्रसिद्ध पावलेले कलाकार , मोहनीश बेहेल , सदाशिव अमरावपुरकर , सतीश शहा , आशालता , पुनीत इस्सार , प्रदीप कुमार , जगदीश ,
तर संगीतात
आशा भोसले ,महेंद्र कपूर अश्या पहिल्या फळीतील गायक ह्या चित्रपटाला लाभले.
संगीतकार अजित सिंग ह्यांनी जरी पुढे बॉलीवूड मध्ये विशेष कर्तुत्व दाखवले नाही तरी ह्या सिनेमाचे संगीत आणि सिनेमातील प्रमुख गाणे वो बीते दिन जीव तोडून गायले आहे
जे त्याकाळी प्रचंड लोकप्रिय झाले. पुढे त्यांचे रिमिक्स सुद्धा निघाले .
सिनेमाची कथेतील पात्र , घटना ह्या आपण लहानपणी वाचत , ऐकत असलेल्या दंतकथेवर आधारीत आहेत.
थोडक्यात कथा अशी
एका राज घराण्यावर २०० वर्षापासून एका ह्या दैत्याचा शाप असतो.
ह्या घराण्यातील मुलगी तिच्या पहिल्या बाळंत पणात
ह्या शापामुळे मृत्युमुखी पडत असते.
हा शाप नेमका का व कोणामुळे पडला ह्याचे उत्तर सामरी असे असते
सामरी म्हणजे सात फुटी नरभक्षक खुनी दरिंदा , शैतानी व तांत्रिक विद्येचा पुजारी
व ही विद्या मिळवून वाढवण्यासाठी त्याने नव वधुंचा लग्नाच्या वेदीवरून अपहरण करून त्यांचा बलात्कार करून खून करणे , लहान मुलांना मारून त्यांचे रक्त पिणे
व स्मशानातील प्रेते उकरून खाणे अशी दुष्कृत्य केली असतात.
ही भूमिका अजय अग्रवाल ह्या गुणी कलाकाराने एवढी जिवंत केली.
त्याच्या सात फुटी देहाचा व पाशवी वाटणाऱ्या चेहऱ्याचा ह्या व्यक्तिरेखेसाठी चपखल वापर करून घेतला.
व भारतीय जनतेला पहिला वाहिला अस्सल भारतीय भूत , क्रूरकर्मा लाभला.
त्यांच्या दर्शनाने गर्भ गळीत झालेले प्रेक्षक मी स्वतः थेटरात पहिले आहेत.
तर कथा पुढे सरकत असतांना शहरात ह्या घराण्याचा वारस प्रदीप कुमार आपली मुलगी सुमन कथेतील नायिका ( आरती गुप्ता ) सह राहत असतो. ती जेव्हा मोहनीश च्या प्रेमात पडून लग्न करणार असते. ह्या शापामुळे तिच्या वडिलांचा तिच्या लग्नाला विरोध असतो. मात्र सत्य कळल्यावर ही सर्व भाकड कथा मानून तिला चुकीची सिद्ध करण्यासाठी सुमन व मोहनीश त्यांचा मित्र पुनीत इस्सार व त्याच्या बायको सह
बिजा पूर कडे कूच करतात.
तेथे एकेकाळी तिचे पूर्वज राज्य करत असतात. तेथे त्यांच्या सध्या ओसाड पडलेल्या शाही राजेशाही राज हवेलीत ते दाखल होतात.
तेथून ह्या राजहवेली व विजापूरच्या सरहद्दीवरील शिव मंदीर जे आता पुराने झाल्यामुळे
ओसाड पडले असते ह्यांच्यातील संबंध शोधायला लागतात.
हवेलीची रखवाली सदाशिव अमरावपुरकर करत असतो. त्याचा मित्र सतीश शहा त्याच्या डोक्यात शहरातून ही मंडळी खजिना शोधण्यासाठी आले आहेत असा गैर समज करून घेतात.
आणि ह्याच गैरसमजुतीतून पुढे अनर्थ घडतो.त्याबाबत अधिक खुलासा करण्यापेक्षा ते प्रत्यक्ष पडद्यावर पाहणे सोयीस्कर आहे
.
ह्या सिनेमाच्या निमित्ताने रामसे बंधूंनी अनेक प्रयोग केले.
ह्या सिनेमातील पाश्र्व संगीत खूपच गाजले व सिनेमात ते अंगावर येथे. तेच पुढे त्यांच्या पुढील काही सिनेमांमध्ये व नव्याने सुरु झालेल्या झी टीव्ही वरील झी हॉरर शो चा टायटल ट्रेक बनले. ७० च्या दशकात हॉलिवूड मध्ये ओमान मध्ये जेरी गोल्ड स्मिथ ने सिनेमात वापरलेले भयप्रद संगीताने सिनेमात प्रचंड वातावरण निर्मिती केली होती. हाच पैलू रामसे बंधूंनी आपल्या सिनेमात खुबीने वापरला. ह्यामुळे सिनेमात सामरी च्या अस्तित्वाचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रीत्या प्रेक्षकांना दर्शन होत राहिले व त्याने योग्य ती वातावरण निर्मिती साधली गेली. प्रस्तुत संगीत हे ओरीजिनल होते.. हे उचलेगिरी सर्रास करणाऱ्या बॉलिवूड साठी नवीन होते.
८० च्या दशकात भारतीय दर्शक आजच्या इतके सहजतेने हॉलिवूड सिनेमा पाहू शकत नसत, परकीय टीव्ही वाहिन्या अजून सुरु झाल्या नव्हत्या, व्हिडीयो त्या काळात क्वचित प्रसंगी भाड्याने आणून पाहण्याची प्रथा होती. अश्या काळात भय , हिंसा , तणाव ह्यांचा त्रिवेणी संगम भारतीय प्रेक्षकांसाठी नवीन व थरारक अनुभव होता. म्हणून तो आवडल्या गेला
. जगातील कोणत्याही हॉरर सिनेमात आढळणारे अनेक घटक ह्याही सिनेमात होते. बेबंद तरुणाई , समाजातील नियम झुकवून , दुनियेची दुनियेची पर्वा न करता आपले नियम स्वतः बनवणारी बिनधास्त व बेधडक हॉरर सिनेमाचे प्रमुख अंग म्हणजे अंग प्रदर्शन पण त्या काळात सेन्ससोर च्या सोवळे पणाचा मान राखत आजपर्यंत भारतीय प्रेक्षकांनी पडद्यावर न अनुभवलेला स्कीन शो मोठ्या कल्पकतेने कुठेही अश्लील न वाटू देता रामसे बंधूंनी सिनेमात दाखवला. ( निदान पुराना मंदीर मध्ये तरी ह्या पुढील सिनेमात मात्र .....
ह्या सिनेमातील बहुतेक चित्रीकरण जरी मुंबई मधील स्टुडियो मध्ये झाले असले तरी
ह्यातील प्रसिद्ध हवेली म्हणजे कोकणातील मुरुड येथील नवाब महल
एका बाजूला समुद्र व दुसर्या बाजूला ही प्रशस्त हवेली १८८५ साली मुघल आणि गोथिक शैलीत बनलेली डोळ्याचे पारणे फेडते पण सिनेमात महत्वाची भूमिका पार पाडतो. ( मुरुड च्या सिद्दी च्या राजघराण्यातील व्यक्तीचे निवास्थान)
आताच्या जमान्यात ते आपल्या दृष्टीने अगदीच पाणीकम वाटेल. पण वय वर्ष १० ते १५ वर्षात आमच्यासाठी दुधाची तहान ताकावर भागविण्याचा प्रकार होता. सिनेमात दोन ते ३ भयानक प्रसंगातून प्रेक्षकांना माफक हास्य विनोद दाखवून त्याचा ताण दूरू करण्याची अभिनव कल्पना रामसे बंधूनी ह्याच सिनेमातून अंमलात आणली.
जग दीप ला मच्छर सिंग दाखवून शोलेची पेरोडी दाखविण्यात आली जिचा मूळ कथेत चपखल पणे वापर करण्यात आला. व त्यावेळी प्रेक्षकांनी ती डोक्यावर उचलून धरली. आजकालच्या अनेक हास्य , विनोदी रीएलीती शो किंवा स्टेड अप कॉमेडी मध्ये शोले ची किंवा त्यातील व्यक्तिरेखेची पेरोडी होते. पण जगदीप ने साकारलेली ही पेरोडी ज्यात ठाकूर राजेंद्र नाथ व बसंती ललिता पवार ह्यांनी धमाल उडवून दिली होती.
पण भयकथांचा हा फोर्मुला त्यांना गवसल्यामुळे पुढे एक दशक त्यांनी ह्याच धाटणीचे सिनेमे बनविले. ह्यात वीराना ला प्रचंड लोकप्रियता मिळाली ( १९८८) मात्र मग प्रेक्षक तेच तेच पाहून कंटाळले कारण कथा व सिनेमे खूपच प्रेडीक्तटेबल होत गेल्या.
काही मुख्य प्रवाहातील प्रेक्षक त्यांच्या सिनेमांची खिल्ली उडवायला लागले.
मात्र ह्यात नाण्याची दुसरी बाजू समजून घेणे आवश्यक आहे.
हा सिनेमा त्या काळातील एक यशस्वी सिनेमा ठरला तरी त्याने हॉरर सिनेमांचा ट्रेंड आणला नाही.
पहिल्या फळीतील नायक , नायिका व सिने शेत्रातील निर्माते व दिग्दर्शक ह्या प्रकरणापासून चार हात दूरच राहिले.
त्यामुळे अश्या सिनेमांना मर्यादित पण हुकमी प्रेक्षकवर्ग लाभून सुद्धा
त्यांची निर्मिती बॉलीवूड मध्ये इतर कुणी केली नाही.
अपवाद , वो फिर आयेगी ( फराह, राजेश खन्ना, जावेद जाफरी )
ह्यामुळे कमी बजेट मध्ये रामसे बंधू त्यांच्या निवडक कलाकारांना घेऊन पुढील एक तप
अश्या सिनेमांची निर्मिती करत राहिले.
८५ ते ९० काळ मुळात बॉलीवूड साठी सगळ्यात भिकार होता.
गोविंदा , चंकी , मिथुन आणि सरत शेवटी अमिताभ ( गंगा ,जमुना ,सरस्वती , आज का अर्जुन ) भंगार सिनेमातून दर्शन देत होता. अधून मधून धर्मेंद्र , जितेंद्र असे थेरडे सुद्धा शिनेमा शिनेमा खेळत होते. संगीतावर अन्नू ,आणि बप्पी असे अही मही दैत्य राज्य करत होते ( ह्यांच्या पेक्षा आमचा सामरी कैकपटीने कमी भीतिदायक व उपद्रवी होता.) एकूणच सिनेमूल्य कमालीचे खालावले होते. व बॉलीवूड ची सूत्रे
दुबईतून हलवली जात होती. अश्यावेळी आहे त्या परिस्थितीत आपल्या चाहत्यांना रामसे बंधू
लोकांना घाबरवणे हे घरचे कार्य समजून हॉरर सिनेमे काढत होते. आज जर यश चोप्रा ह्यांना किंग्स ऑफ रोमान्स म्हटले जाते तसे किंग्स ऑफ हॉरर
हा मान निखालस पणे रामसे बंधूंकडे जातो. इंग्लंड मध्ये १९३४ पासून १९७५ पर्यंत
हेमर फिल्म प्रोडक्शन ने हॉरर सिनेमांची मुहूर्तमेढ सार्या जगभर रोवली ह्यात जगप्रसिद्ध सिनेमा ड्रायकुला (1958 ) चा समावेश आहे.
शाम रामसे ह्यांनी हा सिनेमा त्यांच्या लहानपणी पहिला व ठरविले की सिनेमा बनवायचा तर हॉरर आणि वडिलांच्या सिने कंपनीत त्यांनी ७० च्या दशकात सिनेमा बनवायला सुरवात केली.
. दुर्दैवी योगायोग म्हणजे ह्याच काळात हेमर कंपनी ने सिनेमे करणे काही कारणास्तव बंद केले. व त्याचे हे हॉरर कार्य पुढे रामसे बंधूंनी चालू ठेवले.
असत्य , अभद्र ,अशुभ ,अमंगल शक्तींच्या विरुद्ध विजय मिळाल्याच्या सन्मानार्थ आपल्या हिंदू धर्मात सण साजरे होतात. अंतिम विजय सत्याचा व दैवी शक्तीचा होतो. हेच रामसे बंधूंच्या हॉरर सिनेमांचे सार असायचे. हॉलिवूड मध्ये जर ड्रॅक्युला क्रॉस ला घाबरत असेल तर रामसे बंधूंनी भारतीय दैत्य हिंदू धर्मातील सर्वात पवित्र प्रतीक ओम , त्रिशूल ह्या चिन्हांचा खुबीने वापर केला आहे.
आजही ३० ते ४० च्या वयोगटातील कोणत्याही व्यक्तीस पुराना मंदीर किंवा रामसे बंधू ही नावे माहीत आहेत. त्यांचा समानार्थी शब्द हॉरर सिनेमा असा होतो.
भारतातील अनेक बुद्धी जीवी ह्या प्रकारच्या सिनेमांना नाक मुरडतात, त्याच्यातील हजारो दोष शोधून काढतात. जेथे हीच कोक ला हॉलीवूड मध्ये कधीही ऑस्कर मिळाले नाही तेथे त्यांना आदर्श मानणाऱ्या बॉलीवूड मध्ये अश्या सिनेमांना भारतात मुख्य प्रवाहात कधीच सामील होता आले नाही. पण आजही सर्व पूर्वग्रह बाजूला सारून यु ट्यूब वरील पुराना मंदीर एकदा पहाच. राझ हा आधुनिक हॉरर सिनेमातील एक टप्पा मानला गेला ( जरी तो हॉलिवूड च्या सिनेमाची नक्कल होता ) तर ह्या युगाची सुरुवात म्हणून अस्सल भारतीय बाजाचा पुराना मंदीर एकदा तरी पहाच . घाबरण्याची सुद्धा काय मजा असते
प्रतिक्रिया
5 Nov 2012 - 5:19 am | निनाद मुक्काम प...
मूळ लेखाच्या शेवटी लिहायचे राहिले की ह्या लेखातील सर्व चित्रे आंजा वरून घेतली आहेत.
ह्या सिनेमाच्या अनुषंगाने सांगावेसे वाटते की साधारण १० वर्षापूर्वी सामना वृत्तपत्रात बातमी वाचली की पुराना मंदीर इन काऊनतर मध्ये मारला गेला.
पूर्ण बातमी अशी होती.
अजय अग्रवाल हा दाउद टोळीत सामील झाला होता व तो नामचीन शार्प शुटर व खंडणी बहादूर म्हणून नावारूपास आला होता. त्याच्या प्रसिद्ध सिनेमा पुराना मंदिर मुळे
अंडरवर्ल्ड मध्ये त्याचे नाव पुराना मंदीर पडले होते.
अजय अग्रवाल चे शेवटचे दर्शन मेला सिनेमात दिसले होते. त्यात खालावलेल्या प्रकृतीचा अजय पाहवलं गेला नाहि. त्याचा अंत पडद्यावर होतांना अनेकदा पहिला होता. मात्र वास्तविक आयुष्यात असा अंत होणे दुर्दैवी होते.
5 Nov 2012 - 6:22 am | निमिष ध.
तो वेगळा अजय अगरवाल असेल. कारण पुराना मंदिर मधला अजून जिवंत आहे. त्यांनी तर श्याम रामसे यांचा २०१० मध्ये चित्रपट केला. त्याचे अजून एक नाव अनिरुद्ध अगरवाल आहे. बहुतेक सगळे जुने कलाकार एकत्र आणून चित्रपट काढायचा प्रयत्न होता
http://www.imdb.com/title/tt1772762/
5 Nov 2012 - 6:32 am | चित्रगुप्त
बर्याच वर्षांपासून रामसे बंधुंचे चित्रपटांबद्दल ऐकून होतो, पण अद्याप एकही बघितला नव्हता. तुम्ही या चित्रपटाची उत्तम ओळख करून दिल्याने हा आता नक्की बघणार आहे. धन्यवाद.
दोनेक वर्षांपूर्वी एक चांगल्यापैकी हिंदी भयपट बघण्यात आला होता, (नाव विसरलो) त्यात एका तरूणीला एक वयस्क माणूस पियानो शिकवत असतो, तो नंतर भूत बनून तिला छळतो, अशी काहीतरी गोष्ट होती. कुणाला या चित्रपटाचे नाव माहित असेल तर कळवावे.
लहानपणी ड्रॉक्युलाचे जेही सिनेमे यायचे, ते सर्व बघितले. भयंकर भिती वाटायची, पण जबरदस्त आकर्षणही वाटायचे.
आणखी कोणते चांगले हिंदी भयपट आहेत?
5 Nov 2012 - 7:33 am | जेनी...
Haunted आहे मूवीचं नाव २०११ मध्ये आला होता बहुतेक .
5 Nov 2012 - 7:37 am | स्पंदना
भुत सिनेमा म्हंटल की माझी अक्षरशः गाळण उडते. अजुनही.
परवाच्या साध्याभुतकथेत ते लक्षात आल असेलच
. मला अजुनही आठवतय ते मी पाहिलेले "सिन्बादचे" सिनेमे. त्यातल भुत अथवा राक्षस पडद्यावर आला, की मी खुर्चीखाली जाउन बसायचे. अगदी कान बंद करुन. मग ते म्युझीक बदलल की खुर्चीवर, अस कंटीन्युअस करत पाह्यलेत मी असले सिनेमे.आर जी वी चा वास्तु तर नुसती जाहिरात पाहुनच कँन्सल केला पहायचा. त्यामुळे तुम्ही म्हणता तसले नंबरवनचे थरार सिनेमे मी कल्पनेत सुद्धा नाही पाहु शकत.
तुम्ही फार छान सविस्तर लिहिलय पिक्चर बद्दल नुसत वाचायला आवडेल. पिक्चर बघायची अजिबात हिम्मत नाही आहे.
6 Nov 2012 - 2:32 am | वीणा३
+१ to aparna akshay. तुमचा लेख आवडला पण सिनेमा बघायची हिम्मत कधीच नाही करणार :(
5 Nov 2012 - 7:59 am | जेनी...
आवडलेला भुतपट ' वास्तुशास्त्र '.
मला फार आवडतात भुताचे पिच्चर पहायला .
उर्मिलाचा भुत एवढा खास नव्हता वाटला . फुंक पण ठिक ठाक .
१९२० मजेशिर तर हाँटेड अगदि " कायपण ! " असं म्हणण्यासारखा .
त्यापेक्षा जुने भुताचे पिच्चर अजुनहि बघायला जाम मजा येते :)
5 Nov 2012 - 7:59 am | निवांत पोपट
<<ह्या सिनेमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे मोहनीश बेहेल ह्याचा हा पहिला सिनेमा>>
एक दुरूस्ती सुचवतो.
मोहनीश बेहेल चा पहिला चित्रपट 'तेरी बाहोंमें' होता. ब्लू लगूनची भ्रष्ट रिमेक..त्यात जॅजी श्रॉफची बायको आयेशा दत्त त्याची नायिका होती. तिचाही तो पहिलाच आणि बहूतेक एकमेव चित्रपट.
बाकी पुराना मंदीरची आठवण आवडली राजेंद्रनाथचा ठाकूर आणि ललिता पवारच्या बसंतीने धमाल आणली होती. त्यातला राजेंद्रनाथचा "प्यारमे हातों का क्या काम?" हा टायमिंग साधून मारलेला डॉयलॉग अजून लक्षात आहे.मायकेल जॅक्सनच्या थ्रीलरवरच्या डान्सची नक्कल पण ह्याच चित्रपटात असावी..
5 Nov 2012 - 8:26 am | ५० फक्त
एका दुर्लक्षित विषयावरच्या न आठवणा-या चित्रपटाची उत्तम ओळख, धन्यवाद.
अवांतर - मिपावरचे गुढ/भुत/भिती कथालेखक / लेखिका यांचे काय झाले ?
5 Nov 2012 - 9:55 am | llपुण्याचे पेशवेll
झक्कास लेख. पुराना मंदीर बघितला पाहीजे. :) एका वेगळ्याच विश्वाची ओळख झाली.
5 Nov 2012 - 10:47 am | मदनबाण
ह्म्म... रामसे बंधु आणि भूताचे चित्रपट असे समिकरणच आहे ! श्याम रामसे,तुलसी रामसे इ.इ.
बंद दरवाजा ,विराना हे माझे आवडते भूतपट ! ;)
जाता जाता:--- भूतपटात हिरोला जास्त काही चान्स / वाव मिळत नाही ! जे काही काम असते ते भूत करते ! सो लकी घोस्ट यू नो ! ;)
5 Nov 2012 - 11:34 am | सुहास..
झक्कास लेख निनाद ...पुरान मंदीर व्हिडो थेटरात पाहिल्याचे आठवले ... राजेद्रनाथ बुटाला खिळे ठोकुन घेत असल्याचे आठवुन हसू ही आले ;)
5 Nov 2012 - 11:52 am | प्रचेतस
मस्त लिहिलयस निनाद.
याच रामसेंनी 'सामरी' नावाचा भयपट काढला होता.
5 Nov 2012 - 1:26 pm | अत्रुप्त आत्मा
ए....ढिंकचिका...ढिंकचिका...ढिंकचिका...ढिंकचिका...ह्हे ह्हे ह्हे हे...ह्हे ह्हे ह्हे हे...
आमच्या वरचे सिनेमे अजुनही अवडतात,,,धन्यवाद लोकहो...असेच आमच्यावर प्रेम करा
5 Nov 2012 - 3:23 pm | बॅटमॅन
रामसे बंधू म्हटले की झी हॉरर शो चे ते ट्रेडमार्क म्युझिक अजूनही आठवते...
"आ ऽ आ....आ ऽ आ....आ आ आ आ आ आ आ आ....आ आ आ आ आ आ आ आ ऽ........"
5 Nov 2012 - 3:36 pm | राही
लेख छानच आहे.
'संगीतावर अनू आणि बप्पी सारखे अहीमही दैत्य राज्य करीत होते'----सहीच.
'ह्यांच्यापेक्षा आमचा सामरी कैक पटीनी कमी भीतिदायक आणि उपद्रवी होता'---प्रचंड सहमत.
जा.जा. विधु विनोद चोपडाचा पहिलाच सिनेमा 'खामोश'(अमोल पालेकर-शबाना आझमी). हा हॉरर कम सस्पेन्स मूवी फार छान होता.
5 Nov 2012 - 4:12 pm | प्रभाकर पेठकर
सदाशिव अमरापूरकर (अमराव नाही) १९८२ ला प्रदर्शित झालेल्या 'अर्धसत्य' ह्या चित्रपटापासून हिन्दी चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध आहेत. तर, 'छिन्न', 'हँड्स अप' सारख्या नाटकातून मराठी प्रेक्षकांना ते नट आणि दिग्दर्शक म्हणून ८२च्या आधीपासून ज्ञात आहेत.
5 Nov 2012 - 4:19 pm | माम्लेदारचा पन्खा
झी हॉरर शोला तोड नाही.......
खूप जणांनी कॉपी करून पहिले भूतपट पण नाही जमले कोणाला..
सध्या फीअर फाईल्स वाले इंच इंचाने तिथेच सरकत आहेत पण नाही जम्या !!
6 Nov 2012 - 2:24 am | निनाद मुक्काम प...
@ निमिष
आता मी imdb च्या नामावलीत शोधले तेव्हा असे कळले.
की पुराना मंदीर चा अजय अग्रवाल ( ज्याबद्दल मी बातमी वाचली होती )
आणि त्यांच्या नंतर अनिरुद्ध अग्रवाल हा रामसे बंधूंचा हुकमी एक्का ठरला.
ज्याने बंध दरवाजा , मेला व झी हॉरर शो मध्ये काम केले.
अर्थात मी अजय व अनिरुद्ध मध्ये गल्लत केली. आणि तू सुद्धा.
ह्या भूतांचे चेहरे नीट बीना मेक अप कधी पहिले नाही म्हणून असा गोंधळ उडाला.
@ पूजा
रामूचा रात हा माझ्या मते सर्वात भीतीदायक व परिपूर्ण सिनेमा आहे.
असा सिनेमा त्याच्या हातातून परत झाला नाही. रेवती चे काम मस्तच
बाकी तू म्हणते त्या प्रमाणे अगदी खरे सांगायचे तर वास्तू शास्त्र मी वयाच्या २४ व्या वर्षी पहिला तो सुद्धा लंडन मध्ये मित्रांसोबत आणि रात्री एकटे झोपायला रूम मध्ये जाम ...............
भूत चांगला आहे ,आवडला. पण वास्तू शास्त्र एवढी भीती नाही वाटली.
तू हॉरर प्रेमी आहेस हे पाहून खूप बरे वाटले. आपल्या नेहमीच्या रटाळ जीवनात काहीतरी अगम्य , अकल्पित , अविश्वसनीय , आक्रित असे काहीच घडत नाही. त्यामुळे
हॉरर सिनेमे , कथा वाचून अळणी आयुष्यात थोडा तडका मारला जातो.
पण जगात देव आहे तर भूत सुद्धा असायला हवे , ह्या धाग्याच्या निमित्ताने आपल्याला आवडलेले हॉरर सिनेमे येथे सांगितले तर आवडतील.
तेवढीच आपली माहितीची देवाण घेवाण.
@ निवांत पोपट
आताच आंजा वर पहिले. पुराना मंदीर हा मोहनीश चा तिसरा सिनेमा होता.
अर्थात पहिला नव्हता, दुरुस्ती साठी धन्यवाद.
@ मदन बाण
माझे सुद्धा हे आवडते सिनेमे आहेत.
माझ्या मते जेव्हा रामसे ह्यांच्या सिनेमांची लाट ओसरत होती. तेव्हा १९९० मध्ये
अनिरुद्ध अग्रवाल ह्याने बंद दरवाजा मध्ये नेवला साकारून हा सिनेमा हिट केला होता.
ह्यात पहिल्यांदा भारतीय वेमापायर दाखवला गेला.
आणि वीरांना बद्दल काय लिहू.
माझ्या मते रामसे चा सर्वात जास्त भितीदायक व हिसंक सिनेमा आहे.
ह्यात पहाडी भागातील चुडेल विषयी दंतकथेचा उत्तम वापर केला आहे.
वीरांना चे अनेक डायलॉग माझे पूर्वी तोंड पाठ होते.
वीरांना च्या निमित्ताने एक आवर्जून सांगावेसे वाटते की बॉलीवूड मध्ये
त्या काळात संमोहन शास्त्र फार फिल्मी व चुकीच्या पद्धतीने दाखवले आहे. ह्याने प्रेक्षकांचे ह्या शास्त्रविषयक गैरसमज वाढीला लागतात
वीरांना मध्ये एक डॉक्टर सिनेमातील नायिकेच्या बालपणी नक्की काय घडले
हे जाणून घेण्यासाठी तिला संमोहित करून तिच्या वयाच्या एक एक वर्ष पाठी नेऊन
शेवटी त्या घटनेची माहिती करून घेतो. हा प्रसंग रामसे बंधूंनी उत्कृष्ट रीत्या
हाताळला आहे.
@ वल्ली
हो सामरी ह्या नावाचा महिमा एवढा झाला की रामसे ह्यांनी ह्याच नावाचा चक्क त्रीडी
सिनेमा काढला.
@ सुहास
व्हिडीयो थेटरात हा सिनेमा अगदी त्याचा रिलीज नंतर ५ वर्षांनी लागला तरी गर्दी खेचायचो.
पण अशी विनोदाची भट्टी पुढे सतीश शहा ह्यांचा वीरांना मधील हीच कोक हे पात्र
वगळता इतर सिनेमात अत्यंत निकृष्ट दर्जाचे होते हे खेदाने नमूद करावेसे वाटते.
हेच संगीताबद्दल झाले.
@बॅटमॅन
म्हणून मी मुद्दामून झी हॉरर शो च्या टायटल ट्रेक ची येथे लिंक दिली आहे.
दर शुक्रवारी झी टीव्ही वर फिलिप्स टोपं टेन्स झाले की ह्या कार्यक्रम व त्याच्या
टायटल ट्रेक ची मी आतुरतेने वाट पाहायचो.
@ पु पे
राजश्री प्रोडक्शन ने रामसे ह्यांचे वीरांना , बंध दरवाजा व हा सिनेमा तू नळीवर सलग
उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे फुकटात त्याचा एका दमात आस्वाद घेता येतो.
जरूर पहा ( शक्यतो रात्री पहा ) आयुष्यात जसे हसले पाहिजे तसेच
रामूच्या भाषेत डरना जरुरी हे.
@ राही
तू खामोश सिनेमाची मस्तच आठवण करून दिली
अव्वल दर्जाची कलाकृती , मातब्बर अभिनेते
हा सिनेमा मी गच्चीवर पहिला होता.
एका मागोमाग एक खून होते आणो खुनी कोण हेच कळत नव्हते.
कोजागिरीचा मसाला दुध पिण्यासाठी मध्यंतर झाला तेव्हा दुधावर ताव मारतांना सोसायटी मधले सर्वच नक्की खुनी कोण ह्यावर आपापले अकलेचे तारे तोडत होते.
शेवट पर्यंत श्वास रोखून धरायला लावणारा हा सिनेमा
खरच बालपणीचे मंतरलेले दिवस
एरवी आम्ही मुले जेव्हा भूतांचे सिनेमे आणायचो तेव्हा मोठी मंडळी पहिले नाव ठेवायची मग अंधारात मिटक्या मारत हेच मोक्याच्या जागा पटकावून बसायचे.
मात्र हा सिनेमा मोठ्यांनी आणला ठेवला आम्ही नाक मुरडली होती. पण मग पैसा वसूल रहस्य होते.
आता डोंबिवलीच्या वेस्ट मध्ये एव्हरेस्ट सोसायटी मध्ये कोजागिरी होत नाही.
म्हातारीच्या केसा सोबत आमचे बालपण व त्यांच्या रम्य आठवणी उडून गेल्या ( इति
वपू )
@ प्रभाकर काका
आर्ट सिनेमा व हॉरर सिनेमा ह्यांच्यात साम्य म्हणजे त्यांचा हुकमी स्वतःचा प्रेक्षक वर्ग होता. मात्र ह्या वर्तुळा बाहेर ह्या कलाकारांना भारताच्या खेडोपाड्यात किंवा छोट्या शहरात एवढी प्रसिद्धी मिळत नव्हती
सदाशिव पुढे मेन स्ट्रीम सिनेमात खलनायकी करू लागले व सामान्य जनतेत लोकप्रिय झाले ह्या अर्थी मी म्हणालो.
आणि ह्यात सडक मधील महाराणी ही सर्वात गाजलेली व्यक्तिरेखा
@ अपर्णा अक्षय
माझी आई सुद्धा ह्या सिनेमांचा जाम घाबरते म्हणूनच केबल हा सिनेमा लागला तर पुढचे ५ आठवडे ती म्हणेन तितका अभ्यास करेल ह्या राजकारणी आश्वासनावर
परवानगी मिळायची.
माझ्या हॉरर प्रेम पाहून एकदा माझी आजी वैतागून म्हणाली
असे विकृत सिनेमे पहायचा तुला छंद असेल तर कोण तुझी बायको होईल.
मात्र लंडन मध्ये जेव्हा केट ला भेटलो. तेव्हा
ती माझ्यापेक्षा जास्त हॉरर प्रेमी निघाली, तिच्या कृपेने हॉलीवूड चे जवळपास सर्व क्लासिक
हॉरर सिनेमे पाहून झाले व आज ही एखादा चांगला हॉरर सिनेमा रिलीज झाला तर आम्ही मोठ्या आनंदाने पाहतो.
सगळ्याच्या प्रतिसादासाठी मनापासून धन्यवाद
@ मामालेदारांचा पंखा
खरय
झी हॉरर शो चे काही भाग तू नळीवर उपलब्ध आहेत.
कधीतरी विरंगुळा म्हणून पाहण्यास काहीच हरकत नाही.
6 Nov 2012 - 3:08 am | जेनी...
येस निनाद ...
मी कशी काय विसरु शकते 'रात 'ला?
मी तो मूवी ..टोट्टल चार वेळा पाहिलाय .
फक्त रेवतीच्या त्या " डोळ्यांसाठी " ...बास्स ..भयानक काम केलय तिने .
सगळ्यात भितिदायक सीन ' ते दोघं जेव्हा बर्थ डे साठी बाहेर जात असताना मध्येच बाईक बिघडते ,
त्यावेळी रेवती जंगलात ,तळ्याच्य काठावर एकटीच बसलेलि असते ,त्यावेळी तिच्या डोळ्यांचा
तो बदललेला भयान रंग ...' ओह्ह माय गॉड ...खरच ..माझा तर एक ठोकाच मिस्स झाला होता .
भयपटातला भयान पट .
पण मला वास्तु शास्त्र आवडण्याचं कारण म्हणजे .
पहिलं ,अगदि सुरुवातीपासुनच मूवित एक सस्पेन्स क्रीएट होतो वास्तु शास्त्रात . नविन घर .
सुनसान जागा .आणि सगळ्यात महत्वाचं , घराच्या समोर चुकिच्या ठिकाणी असलेलं ते ' झाड ' .
दुसरी गोष्ट ,तो 'बॉल ' . घरातल्या नोकराणी चा भयानक म्रुत्यु .त्याजागेवर भेटलेला तो बॉल .
मुलगा खेळत असताना त्या बॉलचं आपोआप स्वताहुन टप्पे घेणं ,रसिका जोशीच्या बोलक्या चेहेर्याने ,डोळ्यानी ते पात्र अक्षरशा जिवंत म्हणन्यापेक्षा भयाण केलय .
मुलाला ट्रक खाली ढकलन्याची भिती दाखवणं ,आणि तो सीन अंगावरचे काटे उभे करतो .
तीसरी गोष्ट ,तो वेडा आपला यादव .आधीच भयानक दिसतो ,त्यात त्याचा भयानक आरडाओरडा .
सुश्मितानेहि वेळोवेळी वाटणारी भिती चेहेर्यावर छान दाखवलिय नॅच्युरल वाटते .
एकंदरीत हा पिच्चर त्यातल्या भुतांमुळे नाहि तर सगळ्या कलाकारांच्या पर्फेक्ट एक्स्प्रेशन्स मुळे जास्त
पोचतो .म्हणुन आवडतो .
कुणी तब्बु चा ' हवा ' पाहिलाय का?
बघा ...आवडला होता तोहि .
निनाद हे अगदि खरय .रोज रोज तेच तेच अळणी लाइफ नको वाटतं .म्हणुन तर हॉर्रर मूवि बघुन
जबरदस्त तडके मिळतात ...मजा येते ..
भुत मी एकटीने पाहिला होता .घरात कुणीहि नसताना .सगळे गावी गेले होते . मला एक्झामची प्रीपरेशन
लीव होती .पण अभ्यास होणार नाहि तिकडे म्हणुन मी नव्हती गेली .त्यावेळी घरी आले होते मी .आणि घरचे गावाला :-/ .
तेव्हा कंटाळा आला अभ्यास करुन करुन :( कारण मी साधारण बुद्धीची प्राणि असल्याने खुप खुप करावा लागायचा :-/
तर दिवसभर अभ्यास करुन रात्री मस्त मॅगी बनवली ,आणि भुत बघत बसली .;)
मज्जा आली होती :D
6 Nov 2012 - 7:50 am | रेवती
छे! हे सिनेमे पाहिल्यावर आजारपण येईल मला. अपर्णाने लिहिलेली भयकथा ही मला मानवलेली पहिली भयकथा असेल. बाकिच्या ज्या काही वाचनात आल्या त्यांच्यामुले गाळण उडाली होती. राम राम राम......
6 Nov 2012 - 2:57 pm | केदार-मिसळपाव
youtube- तू नळी
एकदम मस्त...
6 Nov 2012 - 3:26 pm | इरसाल
youtube = तू नळी = तु नळकांडे
चालुन जावे !!!!
7 Nov 2012 - 8:42 pm | निनाद मुक्काम प...
रेवती आजी
सिनेमा नका पाहू.
पण हा सिनेमा व मिपा वरील भय कथा ह्यांच्यामधील सुवर्ण मध्य म्हणजे
भय , गूढ कथा ऐकणे.
रत्नाकर मतकरी ह्यांच्या गाजलेल्या गूढकथा ऐकणे म्हणजे
अमावस्येला घुबडाला जेवढे प्रफुल्लित वाटते तेवढाच निखळ भीतिदायक अनुभव मिळतो.
निवेदन , व पार्श्वसंगीत जमून आले आहे.
एकदा का कुल टोड चे सदस्यत्व घेतले
की ५ ते १० मिनिटाची कथा डाऊनलोड करून घ्यायची.
7 Nov 2012 - 9:26 pm | गणपा
S O R R E सॉरी निनादराव.
रामसेचच काय पण एकूणच हिंदी चित्रपटातले एकही भूत आजवर घाबरवू शकले नाही.
झी हॉरर शो तर झी कॉमेडी शो म्हणुन फार प्रसिद्ध होता.
रामसेच्या भुतांचा मेकअप पाहुन भिती कमी किळसच जास्त वाटायची.
7 Nov 2012 - 9:49 pm | सोत्रि
गणपाशी फक्त रामसेंच्या चित्रपटापुरते सहमत!
-(रामसेंचे भयपट न आवडणारा) सोकाजी
8 Nov 2012 - 4:28 pm | निनाद मुक्काम प...
रामसे म्हणजे कोणी सत्यजित रे च्या श्रेणीतील सिनेनिर्माते नव्हते. मात्र माझी बालपणीच्या भाव विश्वातील एक कप्पा त्यांनी व्यापला आहे. त्यांनी एक वेगळी भूतांची दुनिया निर्माण केली ह्यातील नियम , सूत्र ही त्याच्या कल्पकतेचा एक भाग होता. त्यांना मुख्य प्रवाहातून मान्यता मिळाली नाही तरी त्यांचा हुकमी प्रेक्षकवर्ग होता. उत्तर भारत व राजस्थान आणि छोट्या गावात किंवा शहरातील सिंगल थेटरात त्यांना चांगला प्रतिसाद मिळायचा. व्हिडीयो केसेट सुद्धा चांगली मागणी असायची. बालपणीचे दिवस गेले व उरल्या फक्त आठवणी
एक एक रुपया वर्गणी जमवून दहा रुपयात व्हिडीयो केसेट आणणे , मग एखाद्याच्या घरी पडदे वगैरे व्यवस्थित करून भर दुपारी खोलीमध्ये काळोख करणे. मग हॉरर सिनेमे पाहणे आणि त्या भीतिदायक दुनियेत हरवून जाणे . त्यातील भीतिदायक क्षणांना घाबरणे ,दचकणे, एखादी गोष्ट पहायची ,अनुभवायची आहे मात्र भीती देखील वाटत आहे. अश्यावेळी
बोटांच्या फटी मधून पाहणे हा सुवर्णमध्य असायचा.
बालपणी अंगवळणी पडलेली ही सवय पौगंडावस्थेत गेल्यावर खूपच कामाला आली.
अनेक गोष्टी पहिल्यांदा करतांना बालमन शहारले तर उमलते तारुण्य मात्र त्या गोष्टी करायला खुणावत होते मग काहीतरी सुवर्ण मध्य काढायचा
म्हणजे दारू प्यायची का नाही ह्या प्रश्नापुढे
बियर काही दारू नसते अशी स्वतःची समजूत घालणे. किंवा त्याकाळातील एक प्रचलित समाज बियर मुळे वजन वाढते.
आणि कितीतरी आठवणी व मयुरपंखी क्षण बालपणीच्या आठवणीमध्ये अजूनही मनाच्या कप्प्यामध्ये जपले आहेत.
लेखाची सुरुवात करतांना बालपणी सिनेमा पाहतांना शेजारचा मित्र जास्तच तल्लीन होऊन सिनेमा पाहत असेल तर त्याला हळूच मागणे हलवणे अश्या बालपणीच्या अनेक आठवणी ह्या निमित्ताने ताज्या झाल्या , बहुदा त्यांनीच मला हा लेख पूर्ण करण्याची स्फूर्ती दिली.
6 Nov 2015 - 6:28 pm | सुमीत भातखंडे
आवडला धागा. एकेकाळी रामसेपट आवडीने पहिले होते.
बर्याच नंतर, नोकरीला लागल्या नंतर, हॉलिवुडच्या भयपटांशी ओळख झाली आणि मग भयपट बघण्याचा सपाटा लावला.
माझे आवडते भयपटः
हिंदी -
१. रात - १९९२ - ऑल टाईम फेवरेट. आत्तापर्यंतचा बेष्ट हिंदी भयपट. हॉलिवुडशी तुलना होऊ शकेल असा
२. भूत - २००३
३. डर्ना मना है - २००३ - काही सेगमेंट्स
इंग्रजी:
१) शायनिंग - १९८३
२) एझॉर्सिस्ट - १९७४
३) हिल्स हॅव आईज - २००६ चा. १९७७ चा ओके ओके वाटला
४) टेक्सस चेनसॉ मॅसेकर - १९७४
५) पॅरानॉर्मल अॅक्टिविटी - २००७
६) द ट्नल - २०११
७) इव्हील डेड - तीन भाग - १९८१, १९८७ आणि १९९२
.
.
.
.
च्यायला बरेच आहेत.
(जुना धागा वर काढल्याबद्दल दिलगिर आहे. परंतु जिव्हाळ्याचा विषय असल्याने...)
7 Nov 2015 - 8:17 am | बोका-ए-आझम
आणि एक्झाॅर्सिस्टला तोड नाही. विशेषतः ती मुलगी जिन्यावरून खेकड्यासारखी चालत येते तो सीन आणि पाझुझू (सैतान) त्या मुलीच्या तोंडून बोलतो - हे सीन्स!
6 Nov 2015 - 7:43 pm | एक सामान्य मानव
मी भाभा अणुसंशोधन केंद्रात काम करतो. एकदा आमच्या कँटीनमधे जेवणासाठी रांगेत उभा असताना सहज मागे पाहीले तर मागे "सामरी" उभा!! दोन मिनटे काही कळेना. नंतर माहीती काढल्यावर समजले की तो कंत्राटदार आहे व सिविल्/मेकॅनिकल कामे घेतो. काही वर्षाआधीपर्यंत तो बरेचदा दिसायचा. पण अलीकडे पाहिले नाही. दाउद टोळी वगैरे अफवा आहेत.
7 Nov 2015 - 2:07 am | किल्लेदार
7 Nov 2015 - 10:01 am | असंका
छोटा चेतन दूरदर्शन वर बघितला होता. उर्मिला मातोंडकर नवती तोवर त्यात. भयंकर उदास करून गेलेला तो पिच्चर.
7 Nov 2015 - 10:01 am | असंका
छोटा चेतन दूरदर्शन वर बघितला होता. उर्मिला मातोंडकर नवती तोवर त्यात. भयंकर उदास करून गेलेला तो पिच्चर.