आपण सगळेजण नेहमी म्हणत असतो की खूप काही करायचं आहे पण वेळ नाही....कधीतरी विस्कटलेला कप्पा आवरायचाय पण वेळ नाही.....खूप दिवस कुणा मित्राला अथवा नातेवाईकाला फोन करायचाय पण वेळ नाही.........जर आपल्याकडे कशालाच वेळ नाही तर मग आपल्या आयुष्यातला वेळ नक्की जातो तरी कुठे? कधीतरी मी या गोष्टीचा विचार करतो....अगदी मनापासून वाटतंय की मला अजूनही याचे उत्तर सापडलेले नाही.......
वेळ नसणे म्हणजे नक्की काय? खरच आपल्याकडे सवड नसते की आपणच एखादी गोष्ट न करण्यासाठी शोधलेली ती एक लंगडी सबब आहे? समजा आपण खरच आपल्याला वेळ नाही असे मानू पण मग आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी करण्यासाठी आपल्याकडे वेळ असतोच ना? म्हणजे वेळ नसणे ह्या प्रकाराला ढाल बनवून आपण आपल्याच आयुष्यापासून लांब जातो आहोत........माझे तर स्पष्ट मत आहे की जशी दळणवळणाची अथवा संभाषणाची साधने वाढली तेव्हढाच माणसामाणसातला संवाद हरवत चाललेला आहे..........ह्याचे प्रमाण अगदी व्यस्त आहे.........तुम्हीच आठवून पहा..........जेव्हा रेडीओ , टीव्ही अथवा टेलिफोन हे शोध घराघरात पोचले नव्हते तेव्हा माणसे अक्षरशः एकमेकांशी संवाद साधायला धडपडायची.......तेच आता पहा.......संवादाची ढीगभर साधने आहेत.....मोबाईल,इंटरनेट असे कितीतरी प्रकार आपल्या रोजच्या वापरात कितीतरी सहजपणे येतात.......पण तरीही आपण मागच्या काळाएवढे तरी माणूसपण जपतो का ?
आवड असली की सवड मिळतेच हे तर आपल्या सगळ्यांना माहित आहे...वाया घालवण्यासाठी आपल्याकडे भरपूर वेळ असतो ..पण ज्या गोष्टी आपल्याला करायच्या नाहीत किंवा टाळायच्या आहेत त्याला आपण "वेळ नाही" चे लेबल चिकटवून मनाच्या अडगळीच्या कोपऱ्यात ढकलून देतो.............कधीतरी गम्मत म्हणून हा कप्पा उघडून पहा........त्यातल्या कितीतरी गोष्टी अशा असतील की ज्या तेव्हा केल्या असत्या तर बरे झाले असते असेहि वाटेल... शक्य असेल तर अजून हि आपण त्यातल्या काही गोष्टी करू शकतो..........फक्त त्यासाठी मनाची तयारी.....कितीतरी जण आजहि असे असतील ज्यांना तुमच्या प्रतिसादाची गरज असेल....अवघड वाटेल सुरुवातीला नव्हे,ते अवघड आहेच पण तरी.... बघा जमतंय का ते?
प्रतिक्रिया
26 Oct 2012 - 5:26 pm | अत्रुप्त आत्मा
सविस्तर प्रतिसाद दिला अस्ता,पण वेळ नाही... ;-)
26 Oct 2012 - 6:48 pm | Pearl
मला याबद्दलची एक कोट खूप आवडते.
Nobody is busy in this world It's all about Priorities.
26 Oct 2012 - 7:17 pm | अनन्न्या
थोडा वेळ काढुन विचार करावा असा लेख आहे. खरच माणसे दुरावतायत एकमेकांपासून.....
26 Oct 2012 - 8:27 pm | पैसा
मिपावर स्वागत! पण वेळ नसल्यामुळे लेख जरा आवरता घेतल्यासारखा वाटतोय! :P
26 Oct 2012 - 8:37 pm | पुण्याचे वटवाघूळ
लेख आवडला. पण आता प्रतिसाद द्यायला वेळ नसल्यामुळे नंतर प्रतिसाद देईन :)
26 Oct 2012 - 8:41 pm | किसन शिंदे
चांगलं लिहलंय.
26 Oct 2012 - 8:53 pm | रेवती
पूर्वी माणसे एकमेकांशी संवाद साधायची या म्हणण्याला ग्रेट पुरावा नाही. दूध, फुलाची पुडी, पेपर बाहेरून आणायला जाताना "काय पैसाताई, बरी आहेस ना?" एवढेच काय ते बोलणे असे. फारतर गृहिणी दुपारी निवडण टिपणाच्यावेळी माझी सासू, तुझी नणंद यावर बोलत असत. आजकाल एकमेकांशी बोलायला अजिबात वेळ नसतो असे माझ्या लहानपणीही आई, शेजारच्या बायका बोलताना ऐकायचे. मग त्यांनी महिलामंडळ सुरु केले होते. त्यात महिन्या पंध्रा दिवसातून सगळ्याजणी तासभर भेटत. आजकाल एक मात्र जाणवते आहे की कामशिवाय फोन करायला कोणाला वेळ नसतो (मीही काही वेगळी नाही). परवा एकाच दिवशी मला ८ फोन आले. सगळ्यांनी सहा आठ महिन्यातून एकदा असेच केले होते. मला नेमका वेळ नव्हता. त्यावेळी "श्या! काय आजच सगळे फोन करतायत!" असा विचार मनात आलाच. आता मी फोन करीन तेंव्हा त्यांनाही असे काहीसे वाटल्यास नवल नाही.
26 Oct 2012 - 9:37 pm | शुचि
संवाद हरवला आहे याच्याशी बाडीस. पण आधुनिक तंत्र / विज्ञानामुळे जीवन सुकरही झाले आहे. तेव्हा थोडी सहमती थोडी असहमती.
27 Oct 2012 - 1:52 pm | माम्लेदारचा पन्खा
जे विचार होते ते उत्स्फुर्तपणे मांडले.अजून लिखाण खरच हवे होते.
पुढच्या वेळी नक्की लक्षात ठेवेन.
सगळ्याच्या प्रतिसादाबद्दल धन्स !
27 Oct 2012 - 3:00 pm | सारथी
मस्त ,,,,,
27 Oct 2012 - 10:52 pm | छोटा डॉन
ह्या लेखात नक्की कशावर भाष्य करायचे आणि नक्की कशासाठी वेळ काढायला हवा अशी कारणमिमांसा ह्या लेखानाद्वारे केली आहे ह्यावर माझा अंमळ गोंधळ झाला आहे किंवा मला ते निटसे समजले नाही.
'आजकाल वेळ नाही' ही बाब गंमतशीर आहे, अगदी हजारो/लाखो वर्षांपासुन माणसाकडे जेवढा वेळ होता तेवढा आजही आहे, मग वेळ मिळत नाही ही तक्रार मला समजत नाही आणि सध्या उपलब्ध असु शकणार्या वेळाच्या कमाल मर्यादेतला वेळ आपल्याला उपलब्ध असताना अजुन वेळ ह्यात कुठुन बरे अॅड करणार ?
बाकी
काही उदाहरणांद्वारे आपण पुर्वी एखादी गोष्ट करत होतो व ती आता करत नाही किंवा एखादी गोष्ट करायची राहुन जाते असे ह्या लेखात मांडलेले आहे. उदा '...कधीतरी विस्कटलेला कप्पा आवरायचाय पण वेळ नाही.....खूप दिवस कुणा मित्राला अथवा नातेवाईकाला फोन करायचाय पण वेळ नाही'. पण समजा मला ह्या बाबीच महत्वाच्या वाटत नसतील तर मी का ह्या गोष्टींसाठी वेळ काढावा ?
वर पर्लने 'Nobody is busy in this world It's all about Priorities.' हे जे लिहले आहे ते अगदी योग्य आहे. सध्याच्या माझ्या प्रायॉरिटिज महत्वाच्या आहेत आणि त्यासाठी मला सध्या पुरेसा वेळ आहे, सध्या जे अनावश्यक आहे ते मला करावेसे वाटत नाही, मी ते करत नाही आणि त्याची मला खंतही वाटत नाही. त्यामुळे अशा सेकंड प्रायॉरिटिजच्या गोष्टींबाबत ती न करण्यात 'वेळ नाही' ही सबब लंगडी आहे. त्या बाबी तुम्ही घ्या बरं प्रायॉरिटीवर, झक्क मारत तुम्ही त्यासाठी वेळ काढाल असे माझे स्पष्ट मत आहे.
बाकी 'दळणवळणाची अथवा संभाषणाची साधने वाढली तेव्हढाच माणसामाणसातला संवाद हरवत चाललेला' हे गृहितक मला समजण्याच्या आणि पटण्याच्या पलीकडचे आहे, कदाचित माझा दृष्टिकोन वेगळा असु शकतो. इनफॅक्ट मी तर असे म्हणेन की ह्या प्रगतीबरोबरच माणसाच्या संवादाच्या कक्षा रुंदावल्या, माणुस आपला परिघ सोडुन त्याबाहेरच जग पाहु लागला, तो एक ठराविक विचारसारणीच्या (मे बी त्यात आपले घर, शेजारी, नातेवाईक, मित्र-गोत्र असा लिमिटेड म्हणावा असाच समाज येतो) बाहेर जाऊन इतरही गोष्टींची चाचपणी करु लागला व त्याचा संवाद अजुन समृद्ध झाला व त्याने माणसाच्या वैचारिक तसेच सर्वांगीण प्रगतीस मोठ्ठा हातभार लागला.
एक सिंपल गोष्ट बघा ना, आपली कशात काय ओळख नसताना आपण एका विषयावर इथे मत-मतांतरे मांडतो आहोत ना. इन अदर केस आख्ख्या आयुष्यात आपल्यात औषधापुरताही संदाव व्हायची गरज नव्हती आणि बहुदा झालाही नसता. मग ह्याला संवाद कमी झाली म्हणायचे की वाढला ?
बाकी दुसरा मुद्दा असा की पुर्वी जसे आपण मित्र-नातेवाईकांबरोबर तासनतास वेळ घालवायचो ते आता काही ठराविक वेळापुरतेच आणि काही प्रसंगांपुरतेच मर्यादित झाले आहे, हे बरोबर आहे. पण आमच्या सुप्रसिद्ध 'Law of Conservation of Time' ह्या सिद्धांतात आम्ही भाष्य केल्याप्रमाणे 'Time required for any perticular activity can not be created nor be destroyed. It just can be trasferred from or to some other activity. But total time in human life always remains constant' तुम्हाला कुठेना कुठे तडजोड करावीच लागते. ;)
- छोटा डॉन
28 Oct 2012 - 7:34 am | गवि
आहाहा.. अलभ्यलाभ..
29 Oct 2012 - 10:27 pm | सोत्रि
डोन्राव इस बॅक विथ हिज मेगाबाइटी प्रतिसाद्स! :)
- (डॉन्राव भारतात परत यायची आतूरतेने वाट बघणारा) सोकाजी
30 Oct 2012 - 4:55 pm | इरसाल
कोण बोलतय ते ?
28 Oct 2012 - 12:24 am | संजय क्षीरसागर
तुम्ही आता करत असलेल्या कृतीपेक्षा वेगळं काही तरी करायचा विचार मनात आहे त्यामुळे तसं वाटतय. किंवा आता काहीही न करता तुम्ही नुसते वेगवेगळे विचार करताय त्यामुळे तसं वाटतय.
28 Oct 2012 - 6:49 pm | अनिता ठाकूर
मला वाटत की, मनाचा जो निवान्तपणा लागतो तो आता मिळत नाही.त्यालाच आपण वेळ नाही असे म्हणतो.
28 Oct 2012 - 8:16 pm | संजय क्षीरसागर
मनाचा निवांतपणा नसणं म्हणजे एकाच वेळी अनेक विचार मनात येणं. अशा स्थितीत हे करू का ते, करतोय एक आणि विचार दुसरे, अनेक विकल्पातून योग्य पर्याय निवडता न येणं असं होतं. याला मानसिक अस्वास्थ्य म्हटलय.
वेळ नाही असा प्रश्न नाहीये. काय करायचय ते नक्की नाही किंवा जे करतोय त्यावर पूर्ण लक्ष नाही हा प्रश्न आहे.
29 Oct 2012 - 10:25 pm | सोत्रि
शॉल्लीट! दंडवत स्विकार करा. _/\_
- (वेळात वेळ काढणारा) सोकाजी
29 Oct 2012 - 8:13 am | ५० फक्त
खरंच असं झालंय खरं, पण काय करावं यातुन बाहेर पडण्यासाठि याचा विचार करण्याएवढा तरी वेळ आहे का याचा विचार करतो आहे.
29 Oct 2012 - 10:48 am | संजय क्षीरसागर
व्य. नि. पाठवलाय
30 Oct 2012 - 4:13 pm | चौकटराजा
काल सकाळी फिरायला बाहेर पडलो. पूर्वी आमच्या जवळ रहाणारा पण आता जरा लांब रहाणारा दुरून येताना दिसला. बरेच दिवस गाठ नसल्याने विचारपूस करता झालो व म्हटले एकदा चक्कर मारतो. मग बोलूच " मला वाटले माझ्या या शब्दांनी त्याला बरे वाटेल .पण कसचे काय . तो त्वरेने म्हणाला " अहो भेटायला व बोलायला वेळ कुणाला आहे ? बरे तुम्ही आता काय करता ?"
मी लोकाना सध्या एकच सांगत असतो. सुखी माणसाचा सदरा हवा असेल तर माझ्याकडे भरपूर वेळ व सदरे आहेत ! " मी बोलता झालो.
30 Oct 2012 - 4:44 pm | जमीर इब्राहीम 'आझाद'
आवडले.... खुपच छान लिहिले आहे... आणि अन्तर्मुख होउन विचार करायला लावणारे....!!!
30 Oct 2012 - 5:18 pm | तिमा
कित्येक गोष्टी या, वेळ असला तरी मूड नसल्यामुळे टाळल्या जातात. उदा.- घरी सीडीज, डीव्हीडीज, कॅसेटस यांचा खच पडला आहे. पण एकट्यानेच गाणे ऐकायला मजा येत नाही, म्हणून दिवसेंदिवस काहीच ऐकले जात नाही. कोणी चांगले पुस्तक भेट म्हणून दिलेले असते. पण 'निवांत' असा वेळ नसल्यामुळे वाचलेच जात नाही.
शेवटी वेळ नसणे हे मनाच्या स्थितीवर सुद्धा अवलंबून आहे असे वाटते.