जुना पुराणा पिंपळ ...

मनीषा's picture
मनीषा in जे न देखे रवी...
3 Oct 2012 - 9:57 am

जुना पुराणा पिंपळ
उभा नदीच्या तीरी ।
आल्या-गेल्या वाटसरूला
देई मायेची सावली ॥

जुना पुराणा पिंपळ
आटवांचा त्याला पार ।
पक्षांची मिरवी घरटी
अन् किडामुंगीचा वावर ॥

जुना पुराणा पिंपळ
त्याची हिरवी-पिवळी पाने ।
नव्या ऋतुंची पालवी
अन् जुन्या ऋतुंचे जाणे ॥

जुना पुराणा पिंपळ
त्याच्या किती कहाण्या ।
छायेत नाचती सजती
आठवणींच्या भिंगोर्‍या ॥

जुना पुराणा पिंपळ
विस्तारी चहू दिशांना ।
झेपावे उंच आभाळी
रूजवी मातीत मुळांना ॥

जुना पुराणा पिंपळ
सळसळतो पानोपानी
सरत्या किती क्षणांचा
तोच साक्षी मनोमनी ॥

जुना पुराणा पिंपळ
शोधी आसमंती काही ।
ढळता हिरण्यगर्भ तेथे
अन् शुष्क पर्णांच्या राशी॥

जुना पुराणा पिंपळ
खंतावे आज अंतरी ।
पायवाटही दिसेना
चाहूल नाही दूरवरी ॥

हे ठिकाणकविता

प्रतिक्रिया

ज्ञानराम's picture

3 Oct 2012 - 10:09 am | ज्ञानराम

खूपच आवडली... कविता.
छान

श्रावण मोडक's picture

3 Oct 2012 - 11:12 am | श्रावण मोडक

सोपी रचना करता करता एकदम हिरण्यगर्भ असा शब्द वापरावासा का वाटावा बॉ?

"सोपी रचना करता करता एकदम हिरण्यगर्भ असा शब्द वापरावासा का वाटावा बॉ?"

तसं काही विशेष कारण नाही. सूर्याची अनेक नावे आहेत त्यातील "हिरण्यगर्भ" या ओळीत 'फिट बसेल' असे वाटले म्हणून ..

सुधीर's picture

3 Oct 2012 - 12:25 pm | सुधीर

शेवटाच्या कडव्यावरून रॉबर्ट मनीच्या पिंपळाची आठवण झाली.

प्रभाकर पेठकर's picture

3 Oct 2012 - 1:13 pm | प्रभाकर पेठकर

अंगावर काटा आणणारे विदारक वृत्त. सव्वाशे वर्षांचा ज्येष्ठ वृक्ष. मुंबईत वृद्धांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहेच. ह्या वृद्ध वृक्षांकडेही आपुलकीने पाहावे.

काही ठिकाणी अडसर ठरणार्‍या वृक्षांच्या मुळांशी मीठाचे पाणी घालूनही त्यांना 'मारण्यात' येतं. नंतर म्युनिसिपालटीच्या परवानगीने असे वठलेले वृक्ष तोडण्यात येतात.

मनीषा's picture

4 Oct 2012 - 8:46 am | मनीषा

धन्यवाद! लेख वाचला ..
आपल्या स्वार्थामधे अडसर ठरणारे काहीही मग तो जुना वृक्ष असो अथवा एखादी व्यक्ती, बाजूला सारण्यासाठी लोकं कुठल्या थराला जातील काही सांगता येत नाही.

जाई.'s picture

3 Oct 2012 - 9:31 pm | जाई.

कविता आवडली

पिवळा डांबिस's picture

4 Oct 2012 - 8:59 am | पिवळा डांबिस

कवितेचा आशय आवडला....
पण कविता रचनेत (यमकात) गंडली आहे, विशेषतः पहिल्या, चौथ्या आणि सातव्या कडव्यात!
पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

मनीषा's picture

4 Oct 2012 - 9:22 am | मनीषा

आभार !
बघते काही सुधारणा करता येते का ते ?

शैलेन्द्र's picture

4 Oct 2012 - 7:09 pm | शैलेन्द्र

सुंदर आशय.. रचना जरा ठाक्ठीक करता येइलही पण तेवढ्या मेहनतीत, कल्पनाविस्तार करुन कदाचीत अजुन एक कविता रचता येइल. :)

राघव's picture

5 Oct 2012 - 1:34 am | राघव

चांगले आहे. :)

राघव

यशोधरा's picture

5 Oct 2012 - 12:50 pm | यशोधरा

कवितेचा आशय अतिशय आवडला.

सर्वांचे मनःपूर्वक आभार !

जुना पुराणापिम्पळ.कविता खुप आवडली. माहेरचा पिम्पळपार आठवला.