माझ लग्न झाल आणि मी दुबईला येऊन राहिले. पावसाळा तर अनुभवता आलाच नाही आणि त्यामुळे श्रावण ही नाही अन श्रावणातले सण ही नाही. मला वाटू लागलेलं गणपती पण असेच जाणार. काहिही न कळता. कोरडे. माझ मन खट्टू होऊन बसलं होत. तसा तर इथे आमचा एक मस्त मराठी ग्रुप आहे आणि एका घरी आमचे गणपतीबाप्पा पण विराजमान होतात. पण ह्या वेगळ्याच देशात आपले गणपती कितपत उत्साहात साजरे होतील याबद्दल मनात शंकाच होती. मूर्ती, पूजेच साहित्य, आरत्या, प्रसाद सगळ नीट शक्य होईल अस वाटतच नव्हत.
गणपती बसायच्या दोन आठवडे आधीच श्रींची मूर्ती ठरवायला हवी अस कळल. कारण नंतर सुबक मूर्ती मिळेल ह्याची शाश्वती नसते म्हणे. मग काय एका शुक्रवारी, आमच्या सुट्टीच्या दिवशी, आम्ही मंदिराकडे मोर्चा वळविला. मूर्ती ठरवायला मंदिराच्या भागात गेलो तर तो सगळा परिसर किंवा तिथल्या त्या अरुंद गल्ल्या म्हणा वाटल्यास, सगळ्या माणसांनी फुलून गेल्या होत्या. जिकडे तिकडे बाप्पांच्या येण्याची तयारी सुरु आहे अस जाणवत होत. आणि मला अचानक स्वप्नातून जाग व्हावं तस जाणवलं, हो खरच बाप्पा येत आहेत. आम्ही घरापासून लांब आहोत म्हणुन काय झाल? बाप्पा इथे पण आपला आशीर्वाद द्यायला येत आहेत. मग मी पण सगळ्यांसोबत आधीपेक्षा जास्त उत्साहाने मूर्ती पाहत सगळी दुकान पालथी घालायला सुरु केल. पण मनासारखी मूर्ती दिसेना. ज्या आवडल्या त्या आधीच कुणीतरी ठरवून गेलेलं होत.वाटल एवढ्या लवकर येऊन पण मूर्ती मिळत नाही की काय. पण मग पुढच्याच दुकानात एक सुंदर, सुबक गणपती बाप्पा दिसले. त्यांना पाहून वाटल जणू बाप्पा त्यांच्या आवडत्या शिष्याला काही तरी शिकवत आहेत. आणि त्याने काहीतरी वेड्या सारखीच शंका विचारली आहे अन ते मिष्किलपणे हसत त्याच उत्तर देत आहेत. मग हीच मूर्ती सर्वानुमते ठरवली गेली. गणपती बाप्पांसाठी लाल जास्वंदी हवी म्हणुन तेव्हाच जास्वंदीच झाड खरेदी केल. त्याला एक छोटीशी कळी पण होती. खर ती कधी उमलणार होती कुणास ठाऊक. अशी आमची खऱ्या अर्थाने गणपतींच्या स्वागताची तयारी सुरु झाली.
आम्ही गणपतीबाप्पांसाठी ह्यावेळी मस्त आरास करायची अस ठरवलं होत. म्हणजे माझ्या नवऱ्याने परस्पर तस त्यांच्या मित्राला सांगून टाकल होत. आणि त्या दोघांनी (मित्राने अन वहिनींनी) त्या नुसार समान आणायला पण सुरवात केली होती. पण ह्या सगळ्या कलेच्या बाबतीत मी किती "ढ" आहे हे अजूनतरी फक्त मलाच माहित होत. त्यामुळे त्यांना माझी काय मदत होणार होती बाप्पाच जाणोत. झालीच तर माझ्यामुळे काम वाढली असती ह्याची मला पक्की जाणीव होती. आणि ही सगळी आरास कधी करायची हे पण प्रश्नचिन्हच. गणपतीबाप्पा येत होते बुधवारी आणि इकडे साहजिकच सुट्टी नव्हती. एक तर माझी नव्याने सुरु झालेली नोकरी. रजा मिळणार की नाही इथपासून सुरवात होती. जर सुट्टी मिळाली नाही तर? काय आपल नशीब, आपल्या आवडत्या सणाला पण सुट्टी नाही म्हणजे किती अवघड. उगाच आले भारत सोडून. असे कितीतरी विचार मानत येऊन गेले. पण हे सगळे कल्पनाविलासातच राहिले. कारण सण आहे आणि म्हणुन सुट्टी हवी आहे अस सांगितल्यावर लगेच रजा मंजूर झाली. आणि दाही दिवस मनाप्रमाणे पार पाडणार आहेत ह्याची ग्वाही मिळाली. बाप्पा यायच्या आदल्यादिवशी आम्ही वाहिनीच्या घरी हजर झालो. थोडीफार मखराच्या सामानाची जमवा जमव त्यांनी केली होती अन थोडी आम्ही केली. वहिनींनी मखराची ब्लूप्रिंट काढून ठेवली होती. त्या नुसार आम्हाला थर्माकोल कापून जोडायचं होत. त्यावर कोरीव काम करायचं होत. पण तो जाड थर्माकोल कापण्यापासून सगळी सुरवात होती. सगळ्यांनी जशी जमतील तशी काम वाटून घेतली. मी पण जरा मदत म्हणुन कापलेल्या थर्माकोलला गुळगुळीत करण्याच काम सुरु केल. अन झाल माझ्या अपेक्षेनुसार.. मी काम वाढवली. बोट कापून घेतलं. रक्त काही थांबेना. शेवटी त्याला बँडेज बांधून परत काम सुरु केल. परत मी दुसऱ्या हाताचं दुसर बोट कापून घेतलं. मग काय आमच्या कडून कापाकापीची काम काढून घेण्यात आली.मग फक्त अंतर मोजून योग्य रेषा आखण हे काम हाती आल. बाह्य आराखड्यानुसार खांब, शिखराची रचना कापून झाली. त्यावर कोरीव काम करण्यात आल. पण हे सगळ करेपर्यंतच रात्रीचे ३.३० होऊन गेले होते. आता थांबण आवश्यक होत. उरलेलं काम आता बाप्पांना बसवल्यावरच शक्य होत. मग थोड्या वेळासाठी झोपून परत सकाळी पुजेची आणि प्रसादाची तयारी सुरु झाली. ११ वाजेच्या सुमारास आम्ही सगळे गणपती आणायला मंदिरात गेलो.
ग्रुपमधले सगळेच त्यांच्या रोजच्या व्यस्त जीवनातून वेळ काढून बाप्पांना न्यायला आले होत.पारंपारिक वेशभूषेतल्या आमच्याकडे सगळेजणच कुतूहलाने पाहत होते. अन टाळाच्या साथीने, बाप्पांच्या जयघोषात आम्ही बाप्पांना नेत होतो.
बाप्पा आमच्या घरी विराजमान झाले होते.आरत्या झाल्या, अथर्वशीर्षाचे पठण झाले. उकडीच्या मोदकांचा नैव्यद्य दाखवला गेला.जास्वंदीच्या झाडाला बरोबर आजच फुल आल होत. ते वाहील. बाप्पांची साग्रसंगीत पूजा पार पडली. आमचे मखर मात्र अजूनही बसवायचे बाकी होते. एका दिवसाची सक्तीची विश्रांती घेऊन परत शुक्रवारी आम्ही मखर बनवायला घेतला. त्यावर रंग आणि इतर नक्षीकामास सुरवात झाली. त्या दिवशी बाप्पाच आम्हाला जणू बुद्धी देत होते कस करत जावा ह्याची. आणि बघता बघता एक सुंदर मखर तयार झाले. बाप्पाच्या कृपेने माझे पण त्यात महत्वाचे योगदान होते :) पूर्ण झालेलं मखर पाहून तर विश्वास बसत नव्हता की, हे मखर आम्हीच तयार केल आहे. बाप्पा आणि मखर दोघांनी त्या हॉलला वेगळच सौंदर्य प्राप्त करून दिल होत.
पुढचे दहा दिवस खूप धामधुमीचे गेले. रोज नवीन नवीन प्रसाद केले गेले. कधी पंचखाद्य, कधी लाडू, कधी पुरणपोळी तर कधी मोदक अशी बाप्पांबरोबर आमचीपण चंगळ होती. धूप, उद आणि कापूराचा दरवळणारा सुवास वातावरण अजूनच प्रसन्न करून टाकत होता. सतत वाजणारी भजन,गाणी नी स्तोत्र मनात सात्विक भाव निर्माण करत होते. जसे दिवस वाढत जातात तसे बाप्पांच्या डोळ्यातलं तेज वाढत जात असा नेहमी येणारा अनुभव (काहींसाठी भास) ह्यावेळी ही जाणवला. खरतर हे दहा दिवस वर्णन करायचे नसतातच,अनुभवायचे असतात. त्या दहा दिवसात अजुन नवीन नवीन मराठी आणि इतर भारतीय मित्रमंडळी भेटली. नव्या ओळखी झाल्या. लहानपणच्या गणपतीच्या आठवणी निघाल्या. आम्हाला खूष करून बाप्पा दहाव्या दिवशी त्यांच्या घरी निघालेपण.
परत जयघोष करत आम्ही विसर्जनासाठी निघालो.लहानपणी गणपती चालले की रडू येई. आता ती सोय नव्हती. विसर्जनाच्यावेळी आम्हाला अजुन काही मराठी मंडळी भेटली. त्यांनी पण गणपती बसवले होते. आम्ही सर्वांनीच बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या अशी आळवणी करत शेवटची आरती म्हटली अन बाप्पांना निरोप दिला. इथे विसर्जन करायला परवानगी आहे की नाही माहिती नाही. :) पण अनेकजण निर्जन समुद्र किनारा शोधून गणपती विसर्जन करतात.हे अस लपवा-लपवीच विसर्जन सोडलं तर बाकी गणेशोस्तव एकदम मनाप्रमाणे पार पडला. अगदी उत्साहात अन दरवर्षी सारखाच. :)
प्रतिक्रिया
1 Oct 2012 - 6:30 pm | रेवती
लेखन आवडले हरिप्रिया.
आमचेही गणपती विसर्जन झाले. मी केलेल्या सजावटीचे भिंतीवर चिकटवलेले काही अवशेष दिसतात. येणारे जाणारे हे काय असे विचारतात. तुमच्या इथल्या हिंदू टेंपलात विसर्जनाची काही सोय आहे का हे पाहता येईल. आमच्या इथे तशी आहे.
2 Oct 2012 - 12:14 am | कोमल
खुपच छान वर्णन..
भाजी कापतांना जरा सांभाळून बरं का... :)
;)
2 Oct 2012 - 1:57 am | प्रभाकर पेठकर
सर्वात पहिला (बिन मखराचा) आणि मखरात विराजमान गणपत्तीबाप्पा अत्तिशय सुरेख वाटतो आहे. मखराचा भपका नाही त्यामुळे मुर्तीला साजेशी सात्विकता उठून दिसते आहे. अभिनंदन.
मोदकांमध्ये दोन मोदक जरा 'सावळे' का वाटताहेत? गणपती समोरील मोदकांमध्ये वर्णभेद नाही ही त्यातल्यात्यात समाधानाची गोष्ट.
>>>>अनेकजण निर्जन समुद्र किनारा शोधून गणपती विसर्जन करतात.हे अस लपवा-लपवीच विसर्जन सोडलं
लपवा-छपवी वगैरे काही नसते. हिन्दूंचे सण साजरे करायला परवानगी नसती तर गणपतीच्या आयातीवरच बंधने आली असती. पोलीसांकडे सर्व धर्मियांच्या सणवारांची माहिती आणि वेळापत्रक असते. त्याचा त्यांनी 'अभ्यास'ही केलेला असतो. सामाजिक शांतता, सुरक्षा आणि वाहतुक नियंत्रण ह्या गोष्टींसाठी ही माहिती त्यांच्यासाठी 'अत्यंत' महत्त्वाची असते.
फक्त त्यांची बंधनं असतात ती बडेजावाला. ध्वनी प्रदुषण, सांस्कृतिक आक्रमण इ. होता कामा नये ह्याबद्दल ते दक्ष असतात.
मी गेली ३१ वर्षे मस्कतमध्ये राहतो आहे. सार्वजनिक गणपती, दिवाळी, नवरात्र (गरबा) इ.इ. चा आनंद दरवर्षी उपभोगतो आहे. पूर्वीच्या काळी (१९८३ पर्यंत) ४०-५० गाड्या गणेश विसर्जनाला जायच्या. जाताना सर्वगाड्या हॉर्न वाजवत जायच्या. (का कोण जाणे) वेळ रात्री साडेबारा एकची असायची. हे पोलीसांच्या नजरेत आले. (की कोणी तक्रार केली माहित नाही) तेंव्हा पासून मोजक्या ३-४ गाड्या शांतपणे समुद्रकिनारी जातात. तिथे वैयक्तिक गणपतीही आलेले असतात. तिथे आरती होते (टाळ्या आणि झांजांसह) आणि विसर्जन होते.
नवरात्रीचा गरबा होतो. जो पूर्वी २ वाजेपर्यंत चालायचा त्याला आता १२ पर्यंत परवानगी आहे. तिथेही भारतातील कलाकार (फाल्गुनी पाठक वगैरे) प्रमुखपाहुणे, गायक कलाकार म्हणून येतात अगदी ध्वनी वर्धक लावून गरबा होतो पण गोंगाट नसतो.
दिवाळीला फटाके वाजवायला बंदी आहे. ती सुद्धा आग लागू नये म्हणून. इथल्या उष्ण वातावरणामुळे (उच्चतम तापमान ५५ डिग्री) सर्वत्र धोकादायक कोरडेपणा असतो आणि बारीकशी ठिणगीही मोठ्या आगीस कारणीभूत होऊ शकते. अरबांच्या मनातील ही धास्ती जरा अनावश्यकरित्या जास्त आहे असे वाटते. पण, हा नियम फक्त हिन्दूंसाठी किंवा भारतियांसाठी नाही. हाच नियम अरबांसाठी ईदच्या उत्सवातही समान आहे. वर्षातून एकदा, राष्ट्रियदिना निमित्त, सरकार स्वतः रोषणाई आणि आतिषबाजी करते (समुद्रकिनारी) आणि समुद्रापासून लांब असेल तर अग्निशमन बंबांची फौज तैनात असते. असो.
ही मस्कतची परिस्थिती आहे. दुबई सरकारचे वेगळे नियम असतील तर कल्पना नाही पण मला शक्यता कमी वाटते.
2 Oct 2012 - 2:58 pm | हरिप्रिया_
पेठेकर काका तुम्ही म्हणता तशी परवानगी असेल ही.. पण मला कल्पना नाही. मंदिरातच विचारून पहायला हव..
आणि ते मोदक कदाचित आजूबाजूच्या लाईटिंगमुळे सावळे दिसत असावे :)
2 Oct 2012 - 4:43 am | स्पंदना
काल फोटो दिसत नव्हते म्हणुन प्रतिसाद नाही दिला. आज मात्र मस्त वाटल मखर. गणपतीबाप्पापण अगदी तू वर्णिल्याप्रमाणेच आहेत.
चला मजा आली ना?
2 Oct 2012 - 4:34 pm | कुंदन
बाप्पा तर एकदम मस्त च.
2 Oct 2012 - 4:43 pm | यशोधरा
फरच लोभस आहेत बाप्पा :)
3 Oct 2012 - 9:56 am | ज्ञानराम
फरच लोभस आहेत बाप्पा ,... >>> खरच . आणी मखरही साजेल असेच आहे. खू प छान वर्णन...
3 Oct 2012 - 12:36 pm | सविता००१
मस्त मखर आणि अप्रतिम बाप्पा. छानच दिसताहेत बाप्पा. :)