स्वर सम्राज्ञी चा उद्या वाढ दिवस आहे. मला आठवते तेंव्हा पासून राणी गाते आहे. माझा एक काका “बाईंचा” मोठ्ठा पंखा होता. जाता जाता त्याने मला कोकिळेचा पंखा करून टांगले. रेडिओ मॉस्को वर “हवा में उडता जाये मेरा लाल दुपट्टा मलमल का” हे गाणे ऐकले आणि मी पुरता बिघडलो. पुढे जावून त्यामागच्या काळातील गाणी ऐकली आणि अनुशेष भरून काढला. शिरीष कणेकर वाचता झालो आणि हिरो वर्षीप सुरु झाली. भक्ती इतकी की कोणी मल्लिकेच्या गाण्याविषयी प्रतिकूल बोलले तर तो आयुष्यातून कटाप होत असे. पुढे वय वाढले आणि भक्ती कमी झाली आणि दिव्यत्वाची प्रचीती आली. थोडे संगीत शिकलो आणि काळी चार मधल्या तार सप्तकातला मध्यम अचूक भेदण्याच्या अदाकारी ने अचंबित झालो. पुढे संगीतकार आणि हया गायिका असा “इतिहास-भूगोल” सारखा जोडीने अभ्यास सुरु झाला. मागच्या पिढीचे आवडलेले शंकर-जयकिशन जरा नावाडू लागले. बाईंच्या आवाजावर त्यांचे संगीत थोडे कुरघोडी करते आहे असे उगाचच वाटून गेले. खय्याम वर जीव जडला. जयदेव, सलीलदा , वसंत देसाई हे तुलनेने कमी प्रसिध्द – यशस्वी संगीतकार अधिकाधिक आवडू लागले. अण्णा चितळकर आणि मादाम यांचा समसमा संयोग, नौशाद व मदन मोहन बरोबर कोरलेली लेणी , एस.डी आणि एल पी यांनी पडलेला पाऊस - असा प्रवास सुरु झाला.
आपण “मराठी “ मातीत जन्माला आल्याचा एक मोठा फायदा की आपल्याला मातृभाषेत हे स्वर्गीय गाणे अगदी भरपूर ऐकता आले. पं.हृदयनाथांनी ही घरची कामधेनु संपूर्ण महाराष्ट्रावर ओवाळली. श्रीनिवास खळे , बसंत प्रभू , वसंत पवार हया किमायागारानी त्या दिव्य स्वराचे सोने केले.
आर डी ने मात्र असे का केले हे कोडेच आहे ? एकाच सिनेमामधली काही गाणी मोठीला काही गाणी छोटीला. का ?
उद्या ८३ वा वाढ दिवस आहे. माझा त्या सुरांवर लोभ माझ्या वाढदिवशी वाढत जातो. रिती वर्तमान काळ आहे तो!
हया वर्षी ग्रेस गेले . त्यांनी लिहिले आहे
सूर नोव्हे तीर कंठी लागलेला शाप हा !
त्या शापित गाण्याने माझे शापित जीवन सुसह्य झाले त्या साठी हे स्फुटलेखन!
प्रतिक्रिया
27 Sep 2012 - 9:12 pm | सस्नेह
स्वरसम्राज्ञिस मानवन्दना !
1 Oct 2012 - 2:48 pm | अक्षया
स्वरसम्राज्ञिस प्रणाम आणि शुभेच्छा !!!
27 Sep 2012 - 10:38 pm | पैसा
आणि मनातलं लिहिलंत! माझ्याही सगळ्या शुभेच्छा त्या स्वरलतेला!
28 Sep 2012 - 2:01 pm | चिंतामणी
फारच छान आहे.
>>>आपण “मराठी “ मातीत जन्माला आल्याचा एक मोठा फायदा की आपल्याला मातृभाषेत हे स्वर्गीय गाणे अगदी भरपूर ऐकता आले.
खरे आहे. आपणसुद्धा मराठी भाषीक असल्याने याचा आनंद जास्त घेउ शकतो हे नक्कीच. पण अनेक अमराठी भाषीक्सुद्धा इकडे ओढले गेले आहेत.
एक किस्सा सांगतो. अभंग तुकयाचे प्रसीध्द झाल्यानंतर मेहदी हसन मुंबईत आले होते. लता दिदींची भेट झाल्यावर ते म्हणाले "आपका नया रेकॉर्ड सुना. उसमे एक गाना है "भेटी लागे जीवा" वैसी मेरी हालत हो गई. आपको मिल लिया. अब जिस शक्सने आपसे ये गवाके लिया, उन्हे भी मिलना चाहूंगा". त्या शब्दाचे भाव स्वरातुन मेहदी हसन साहेबांपर्यन्त पोहोचले होते.
अलीकडे लता दिदींनी गाणे गावे की नाही, किंवा त्यांनी गाणे केंव्हा बंद करायला पाहीजे होते इत्यादी चर्चा विविध संस्थळावर होत असतात. त्या वाचल्यावर चर्चा करणा-यांची किव येतो.
रंग दे बसंती हा तसा अलिकडेच आलेला सिनेमा. तो जेंव्हा प्रदर्शीत झाला तेंव्हा माझी मुलगी पहील्याच दिवशी पहील्या शोला तो सिनेमा बघून घरी आली. मी तीला म्हणले की "लुका छुपी बहोत हुई" या गाण्याची सिच्युएशन काय आहे? मुलगा गेला आहे आणि आई भावुक झाली असे काही आहे का? ती माझ्याकडे बघत राहीली थोडावेळ आणि म्हणाली तुम्हाला कसे कळले? मी म्हणालो लताबाईंच्या आवाजुत जो भाव माझ्यापर्यन्त पोचला तो तुला सांगीतला.
अशी अनेक गाणी आहेत. "या चिमण्यांनो" जितक्यावेळी ऐकीन तितक्यावेळा डोळ्यात पाणी येते. नैनो मे बदरा छाये, जाने कैसे सपनो में खो गई अखीया, जिया ले गयो जी मोरा सावरीया ही गाणी आनंद देतात.
लिहू तेव्हडे थोडे आहे.
या गान सरस्वतीला अनेको शुभेच्छा.
29 Sep 2012 - 12:18 am | आशु जोग
आर डी ने आपली सगळी चांगली गाणी लताला दिली
आणि
उरलेली आशाला दिली
असे एका थोर माणसाने म्हटले आहे
29 Sep 2012 - 2:26 am | किसन शिंदे
हम्म!
सुधांशु नुलकरांचा लेख आठवला गेल्या वर्षी आलेला.
त्यांनी गायलेली जवळजवळ सर्वच गाणी आवडतात मग मराठी असोत वा हिंदी. पण दादांच्या 'एकटा जीव' मध्ये त्यांच्याविषयीचं वाचल्यापासून मन थोडं कलुषित झालंय.
29 Sep 2012 - 8:35 am | चौकटराजा
लताबाई म्हणजे नुसता पातळ आवाज नव्हे तर त्यात उच्चार, फिरत ई चा सुरेख संगम आहे. म्हणून अशा स्वरूपाच्या आवाजाची आवश्यकता चित्रपटाच्या नायिकेच्या व्यक्तिरेखेला जो पर्यंत अत्यावश्यक होती तो पर्यंत लताबाईंखेरीज इतराना कमी वाव मिळाला.
लताबाईना सर्वात आव्हानात्मक गीते दिली ती सलीलदानी. त्यांच्या उल्लेखाशिवाय लताचे चित्र पुरे होउन शकत नाही.
आरडीची एकूण दर्जेदार गीते त्यांच्या कारकीर्दीच्या मानाने कमीच आहेत. त्यात लताबाईना काही मस्त गीते मिळाली आहेत उदा.
ओ मेरे प्यार आजा, घर आजा घिर आये,रैना बीती जाये, आजा पिया तोहे प्यार दूं ई.
लताबाईंच्या कारकीर्दीत वसंत पवार यांचा उल्लेख कोणकोणत्या गाण्याच्या संदर्भाने आलाय ? तिथे आशाबाईच जास्त दिसलेल्या आहेत.
लताबाईना रोशन यानीही खूप उत्तम गीते बहाल केली आहेत. उदा, सारी सारी रात तेरी, मुझे मिल गया बहाना तेरी दीदका, जुर्मे उलफत की हमे लोग सजा देते है ई अनेक
26 Oct 2012 - 9:12 pm | शुचि
>> सूर नोव्हे तीर कंठी लागलेला शाप हा !>>
या वेधक ओळी येथे उधृत केल्याबद्दल अनेक धन्यवाद. मी लगेच ती कविता वाचली.फारच सुरेख कविता आहे.
26 Oct 2012 - 11:55 pm | संजय क्षीरसागर
कुठे आहे ती कविता?
26 Oct 2012 - 11:58 pm | शुचि
कविता
27 Oct 2012 - 12:16 am | संजय क्षीरसागर
कविता खानोलकरांची दिसतेय.
लताच्या गाण्यांनी जीवनात रंगत आली हे नक्की.
27 Oct 2012 - 9:22 am | तर्री
ग्रेस यांची आहे !
अर्थवाही गुढ शब्द रचनेमुळे कधी कधी खानोलकर आणि ग्रेस यांच्यात गल्लत होते.
कुलकर्णी मोड : खानोलकर रचनेला विस्कळीत पण अर्थाला पक्के ! तर ग्रेसची रचना पक्की पण अर्थ अती दुर्बोध - आपण दोघांचे बी पंखे !
27 Oct 2012 - 11:19 am | संजय क्षीरसागर
तुम्ही म्हणता ती वेगळी कविता आहे का? असल्यास इथे द्याल का?
ना परंतु सूर कोणा लाविता ये दीपसा
सूर नोहे तीर कंठी लागलेला शापसा...
गीत - आरती प्रभू
28 Oct 2012 - 9:22 am | तर्री
आणि क्षमा ! ती आरती प्रभूची कविता आहे !