बोंबलेवाडीत चिअरगर्ल्स

आपला अभिजित's picture
आपला अभिजित in जनातलं, मनातलं
25 Jun 2008 - 9:18 pm

नाव बोंबलेवाडी असलं, तरी तिथं फारसं काही घडत नसे. विहिरीवरच्या भांडणांखेरीज बाकी शांतताच. म्हणायला गाव आधुनिक होतं, पण ते फक्त सरपंच हणमंतराव वाघमोडेंच्या लेखीच. जी काय आधुनिकता म्हणून होती, ती फक्त हणमंतरावांच्या घरीच. आता ती तिथं असायलाच हवी होती. हणमंतरावांच्या गेल्या तीन-चार पिढ्या राजकारणात होत्या. पणजोबा-आजोबा यांनी तर इंग्रजांच्या काळातही राजकारण गाजवलेले. हणमंतरावांच्या सांगण्यावर विश्वास ठेवला, तर त्यांचे आजोबाच नेहरूंऐवजी पहिले पंतप्रधान व्हायचे खरे. पण "नव्या रक्ताला' वाव देण्यासाठी त्यांनी स्वतःचं रक्त गरम न होऊ देता ते पद सोडलं.

रक्तातच राजकारण असल्यानं तो हणमंतरावांचा अगदी आवडीचा विषय. आणखी एक अत्यंत प्रिय विषय म्हणजे क्रिकेट. त्यांच्या बापजाद्यांपैकी कुणाला क्रिकेटचा गंधही नव्हता, पण हणमंतरावांना क्रिकेटचा भलताच नाद. क्रिकेटच्या विरोधात कुणी बोलायला लागलं, की हणमंतरावांचं टाळकंच सटकायचं. त्यावरून तिसरं महायुद्ध झालंच तर पाण्यावरून नव्हे, तर क्रिकेटवरूनच होईल, असं कुणालाही वाटावं.

कुस्ती हाही एक आवडता छंद होता. गावात कुस्तीचे दोन-तीन आखाडे होते. तसं ते पाच-सहाशे उंबऱ्यांचं गाव. पण खेळाच्या बाबतीत पुढे होतं. कुस्ती हा गावातला पारंपरिक आवडीचा खेळ. सरपंचपदावर पंधरा-वीस वर्षं असलेल्या हणमंतरावांच्या हट्टामुळे काही मुलं आपली क्रिकेट खेळायची, एवढंच.

अख्ख्या गावात फक्त हणमंतरावांकडेच टीव्ही. सध्याच्या "आयपीएल' स्पर्धेतल्या "चिअरगर्ल्स'नि त्यांना वेड लावलं होतं. कुठलीही नवी कल्पना आली की ती आपल्या गावात राबवायची, ही तर हणमंतरावांची खासीयत. आसपासच्या पंचक्रोशीत कुणाला क्रिकेटचा गंधही नव्हता. हणमंतरावांचे चमचेच तेवढे त्यांच्या घरी टीव्हीवर मॅच चालू असताना बघायला यायचे तेवढेच. त्यामुळं "चिअरगर्ल्स' वगैरे प्रकरण गावाला नवीनच होतं. हणमंतरावांच्या मनानं घेतलं, की यंदाच्या जत्रेत गावातल्या कुस्त्यांच्या आखाड्यात या चिअरगर्ल्स उतरवायच्या. कुस्ती लढायला नव्हे, तर मल्लांना प्रोत्साहन द्यायला. लगेच हणमंतरावांनी कल्पना ग्रामपंचायतीसमोर मांडली. गावातली कुठली तरी विकास योजनाच आहे, असं वाटून सदस्यांनीही माना डोलावल्या. बाकी, हणमंतरावांचा शब्द म्हणजे तिथं काळ्या दगडावरची रेघ होती. हणमंतरावांच्या कधी अन् काय मनात येईल, याचा नेम नव्हता. गावात कुणी सार्वजनिक ठिकाणी घाण करू नये, म्हणून जागोजागी देवाबिवांचे फोटो आणि टाइल्स लावण्याची मोहीम त्यांनी काढली. त्या खर्चात स्वच्छतागृहंच बांधून झाली असती, असं लक्षात आलं. तेव्हा हणमंतरावांनी गावात शेकडो स्वच्छतागृहं उभारली. घरांच्या संख्येपेक्षा स्वच्छतागृहंच जास्त, अशी परिस्थिती झाली होती. काही लोक तर राहती घरं सोडून स्वच्छतागृहांतच राहायला गेले.

"चिअरगर्ल्स' म्हणजे नेमकं काय? कुणाला वाटलं, कुस्तीच्या आखाड्याची डागडुजी वगैरे करायला या बाया आणणार आहेत. वाशी-पनवेल करून आलेला कुणी "या डान्स बारमधल्या मुली आहेत आणि सगळ्यांना दारू वाटणार, ' अशी अक्कल पाजळून गेला. कुणाला वाटलं, मल्लांना मालिशबिलिश करायला या बाया आहेत.

चिअरगर्ल्स गावात येण्याचा दिवस उजाडला. हणमंतरावांनी सगळं गावच सजवून टाकलं होतं. दोन बैलगाड्यांतून मिरवणूक काढायचं ठरलं होतं. हणमंतरावांनी खिल्लारी बैलांच्या जोड्या मागवल्या होत्या. ते उंच, धिप्पाड बैल पाहून आधी त्या चिअरगर्ल्सच बुजल्या. मग त्यांचे कपडे बघून ते बैल बुजले. त्यांना आवरल्यानंतर पुन्हा जमवाजमव झाली.

कुस्त्यांचं मैदान चांगलंच सजलं होतं. नेहमीच्या मल्लांबरोबर आज चिअरगर्ल्सचंही आकर्षण होतं ना! गावकऱ्यांची जागा मिळवण्यासाठी एकमेकांशी लठ्ठालठ्ठी सुरू होती. मिरवणूक मैदानापर्यंत आल्यानंतर सगळ्यांनी एकच गलका केला. सगळ्या चिअर गर्ल्स खाली उतरल्या. सुवासिनींनी त्यांना ओवाळलं. हणमंतरावांनी मोजल्या - एक दोन.... नऊ!

""आँ? दहा बाया बोलावल्या होत्या. नऊच कशा काय? ''

मग शोधाशोध सुरू झाली. तेवढ्यात मिरवणुकीच्या मागून एक कुणीतरी बाई धडपडत, पाय ओढत येताना दिसली. अंगाला सगळा चिखल, शेण लागलं होतं. ती गावातली दिसत नव्हती. कुणाला ओळखेना. मग कुणाची तरी ट्यूब पेटली - अरे, हीच ती एक हरवलेली चिअरगर्ल! बैल उधळले, तेव्हा ती गाडीतून खाली पडली होती आणि कुणाच्याच लक्षात आलं नव्हतं. औषधपाण्यासाठी तिची रवानगी करून मंडळी पुढे मैदानाकडे मार्गस्थ झाली.

कुस्त्यांच्या मैदानात जोश भरला होता. पहिलीच कुस्ती चुरशीची होती. बोंबलेवाडीचा परशा लोखंडे आणि खानपाटोळीचा दगडू आडदांड झुंजणार होते. चिअरगर्ल्सनी "पोझिशन' घेतली. हातातल्या झिरमाळ्या फडकावत त्या नाचू लागल्या. गावकरी मल्लांकडे बघण्याऐवजी त्यांच्याकडेच बघायला लागले. कुठल्याही मल्लानं एखादा डाव टाकला, की चिअरगर्ल्स नाचायला लागायच्या. अधेमध्ये त्यांच्या हातातल्या झिरमाळ्या कुणाच्या डोळ्यात जाऊ लागल्या. त्या नाचत असल्यानं पलीकडचे मल्ल दिसेना झाले. मध्येच वैतागवाडीच्या शिरप्यानं चिअरगर्ल्सवर पैसेच फेकले. त्यानं कुठंतरी डान्सबारमध्ये हे बघितलं होतं. नाचामुळं उडालेली धूळही लोकांच्या डोळ्यांत जाऊ लागली.

मध्येच एकीचा पाय चुकून दुसरीच्या पायावर पडला. ती किंचाळली. इंग्रजीत काहीतरी कचकचीत शिवीच हासडली तिनं. मग पहिलीचंही अवसान गळालं. तिनं झिरमाळ्या खेळवाव्यात तशा तिच्या झिंज्या उपटल्या. दोघी एकमेकींच्या उरावर बसल्या. गावात आणलेल्या या दहा चिअरगर्ल्स दोन वेगवेगळ्या गटांतल्या आहेत, हे कुणालाच माहीत नव्हतं. या दोघी भांडताना बघून त्यांच्या सख्याही एकेकीची बाजू घ्यायला धावल्या. मग त्यांच्यात लठ्ठालठ्ठी सुरू झाली. कुणी कुणाची तंगडी ओढतेय, कुणी केस उपटतेय, कुणी हात धरून ओढतेय, असला प्रकार सुरू झाला.

मूळची कुस्ती थांबली आणि ही नवीच कुस्ती सुरू झाली. बरं, बायामाणसंच असल्यानं कुणी त्यांना अडवायलाही पुढे येईना. लोकांना मूळ कुस्तीपेक्षा ही नवी अनपेक्षित कुस्तीच जास्त रंगतदार वाटू लागली. अगदी मूळ क्रिकेटपेक्षा "आयपीएल'सारखी करमणूक मजेदार वाटावी ना, तशीच!

पार धुळीत लोळून एकमेकींना जेरीस आणेपर्यंत ही कुस्ती रंगली. सगळे लोकही त्यांना आणखी चेव चढवत होते. शेवटी दोघीतिघींचे दात पडल्यावर आणि हातपाय मुरगळल्यावरची ही अघोषित कुस्ती थांबली. एव्हाना मघाशी गाडीतून पडलेली ती दहावी चिअरगर्ल आखाड्यात आली होती. तिच्यापेक्षा वाईट अवस्था आता या नऊ जणींची झाली होती. तिलाही त्या ओळखू येईनात. कसंबसं तिनं सगळ्यांना आवरलं. या झटापटीत तिचं अंग पुन्हा धुळीनं माखलंच.

""कुठायंत ते हणमंतराव? खेटरानंच पूजा करायला हवीय त्यांची! '' कुणीतरी कडाडलं.
मग सगळ्यांनी हणमंतरावांचा शोध घेतला. तर स्टेजच्या बाजूला हणमंतराव कलंडलेले दिसले. या अनोख्या आणि अनपेक्षित कुस्तीचा धसका घेऊन त्यांना फीट आली होती.

""कुणीतही कांदा नाहीतर चप्पल आणा रे! '' गर्दीतून एक जण ओरडला.
----------

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

सखाराम_गटणे™'s picture

25 Jun 2008 - 10:54 pm | सखाराम_गटणे™

चांगले लिहीले आहे.

अजुन ऐउ दे.

सखाराम गटणे
(धमु, छोटा डॉन, आंद्या, पिवळा डांबिस, विजुभाउ इ. यांच्या वर्गातला :))

बेसनलाडू's picture

25 Jun 2008 - 11:21 pm | बेसनलाडू

ते उंच, धिप्पाड बैल पाहून आधी त्या चिअरगर्ल्सच बुजल्या. मग त्यांचे कपडे बघून ते बैल बुजले.
हाहाहा!!!
कुणीतरी त्यांच्यावर पैसे उडवले,क्रिकेटवरून तिसरे महायुद्ध वगैरे पण मनोरंजक. एकंदर लेख आवडला;पण कल्पनाविलास आणखी रंगवता आला असता,असे वाटले.
(हसरा)बेसनलाडू
द.मा.मिरासदार शैलीची,त्यांच्या पात्रांची व प्रसंगांची का कोण जाणे आठवण होऊन गेली. .
(स्मरणशील)बेसनलाडू

अभय's picture

26 Jun 2008 - 6:11 am | अभय

मध्येच एकीचा पाय चुकून दुसरीच्या पायावर पडला. ती किंचाळली. इंग्रजीत काहीतरी कचकचीत शिवीच हासडली तिनं. मग पहिलीचंही अवसान गळालं. तिनं झिरमाळ्या खेळवाव्यात तशा तिच्या झिंज्या उपटल्या. दोघी एकमेकींच्या उरावर बसल्या.

हसुन हसुन पोट दुखले !! आजुबाजुचे लोक माझ्याकडे आ वासुन पाहात आहेत!!
फारच छान !! अजुन येऊदे!
:))
अभय

भडकमकर मास्तर's picture

26 Jun 2008 - 2:10 pm | भडकमकर मास्तर

हाहाहा..
मस्तय मजा आली... :)
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

धमाल मुलगा's picture

26 Jun 2008 - 2:30 pm | धमाल मुलगा

गावात कुणी सार्वजनिक ठिकाणी घाण करू नये, म्हणून जागोजागी देवाबिवांचे फोटो आणि टाइल्स लावण्याची मोहीम त्यांनी काढली. त्या खर्चात स्वच्छतागृहंच बांधून झाली असती, असं लक्षात आलं. तेव्हा हणमंतरावांनी गावात शेकडो स्वच्छतागृहं उभारली. घरांच्या संख्येपेक्षा स्वच्छतागृहंच जास्त, अशी परिस्थिती झाली होती. काही लोक तर राहती घरं सोडून स्वच्छतागृहांतच राहायला गेले.

=))

ते उंच, धिप्पाड बैल पाहून आधी त्या चिअरगर्ल्सच बुजल्या. मग त्यांचे कपडे बघून ते बैल बुजले. त्यांना आवरल्यानंतर पुन्हा जमवाजमव झाली.

भारीच :)

या अनोख्या आणि अनपेक्षित कुस्तीचा धसका घेऊन त्यांना फीट आली होती.
""कुणीतही कांदा नाहीतर चप्पल आणा रे! '' गर्दीतून एक जण ओरडला.

हा हा हा.....

मजा आली.

अवांतरः हा 'आपला अभिजीत' गेले बरेच दिवस कुठे भुमिगत झाला होता बरे?
(बघ बघ, गेल्या वेळी म्हणालास कोणी विचारले नाही, ह्या वेळी मी विचारले की नाही?)

आपला अभिजित's picture

26 Jun 2008 - 10:09 pm | आपला अभिजित

धन्यवाद.

गावाबाहेर होतो. ब्लॉग वाच. साद्यंत व्रुत्तांत आहे तिथे.

झकासराव's picture

26 Jun 2008 - 7:17 pm | झकासराव

ते उंच, धिप्पाड बैल पाहून आधी त्या चिअरगर्ल्सच बुजल्या. मग त्यांचे कपडे बघून ते बैल बुजले. त्यांना आवरल्यानंतर पुन्हा जमवाजमव झाली.>>>>>>>>>
=))
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

आपला अभिजित's picture

26 Jun 2008 - 10:03 pm | आपला अभिजित

हसून हसून पोट दुखणं ही अतिशयोक्ती वाटली. मला तरी हे लिखाण (लिहिताना) एवढं हास्यकारक वाटलं नव्हतं.