शालूला तीन बहिणी आणि दोन भाऊ. मला आठवतं गाडीअड्ड्याचे पलिकडे शालू राहायची.त्यांच्या घरी दोन गाई होत्या.त्यांचे दूध विकून शालूची आई आपल्या चिल्लापिल्लांचा संभाळ करायची.
शालूच्या वडीलांत काही अर्थच नव्हता.ह्या गृहस्थाने स्वतःच्या चंगळी शिवाय कांही केलंच नाही.सकाळी उठून घरा बाहेर पडल्यावर दुपारच्या पोटातल्या भूकाग्नीला शमवायला घरी यायचे."घडता घडता घडेल ते घडेल" अशा समजूतीत राहून दिवस काढायचे.शालूची आई तर त्यांना पुरी कंटाळून गेली होती.पण करणार काय? "रांदा,वाढा आणि उष्टी काढा"हा त्यावेळचा स्त्रीयांचा आयुष्यक्रम. परंतु,शालुचे आईकडचे आजोळ तसं श्रीमंत होतं म्हणून दोन गाई तिला देवून तिच्या उदरनिर्वाहाचा पश्न त्यांच्याकडून सोडवला होता.
लहानपणी आम्ही जास्त दुध लागलं तर शालूच्या घरी जावून आणायचो,हीच माझी शालूशी ओळख.त्यानंतर शालूला आजीआजोबांनी मुंबईला कॉलेजपर्यंतचं शिक्षण देवून स्वतःच्या पायावर उभे राहण्याची क्षमता येवू दिली होती.
अलिकडे शालू मला एका कॉमन मित्राच्या लग्नात भेटली.ईकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर मी तिच्या वडीलांविषयी विचारलं.
मला म्हणाली
"मी लहान असतानाच आमचे वडिल आम्हाला सोडून घरातून निघून गेले.योगायोगाने अगदी अलिकडेच मला त्यांच एक पत्र आलं. माझा वाढदिवस ऑक्टोबरमधे झाला पण ह्या फेब्रुवारी मला त्यानी शुभेच्छाचं पत्र पाठवलं.
माझा जन्मदिवस त्यांच्या कधीच लक्षात नसायचा.
माझ्या आईशी त्यांच केव्हांच पटलं नाही.तिच्याशी शेवटचा झालेला एपीसोड हा खरा लकी ठरला.ती त्यांच्या पासून वेगळी झाली. तिच्याकडूनच मी दुसऱ्याला क्षमा करण्यात सुद्धा किती शक्ति असते हे तिच्याच वागण्याकडे पाहून त्या शक्तिवर विश्वास ठेवू लागले."
"तिने त्यांच्या विषयी कधीच तक्रार केली नाही.कधी काळी जर ते घरी आले तर त्यांच्याशी आदराने वागायला मला ती निक्षून सांगायची.
ती म्हणायची
"त्यांनी मला दुःख दिलंय,तुला नाही"
शालू म्हणाली
"नक्कीच मला सुद्धा त्यानी कधी कधी त्रास दिला आहे.माझ्या कॉलेजमधे येवून मझ्याजवळ पैसे मागायचे.
आईला दुषणे द्दयायचे,माझ्या डिग्री समारंभाला मी त्याना बोलावलं नाही म्हणून त्याना राग पण आला होता.असं असलं तरी ते माझे वडिलच होते.ते आजारी झाले की मी त्यांची चौकशी करायची."
मी म्हणालो
"असले विचार फक्त मुलीच करू शकतात.मला वाटतं परमेश्वरानें स्त्रीजातीला हा मोठा गुणच दिला आहे."
त्यावर शालू म्हणाली
"मी त्यांची कधीच अवहेलना केली नाही.कारण कदाचित मी त्यांच्यावर कधीच प्रेम कलं नसेल. बहूदा माझं ज्यावेळी प्रेम करायचं वंय होतं त्यावेळी ते कधीच माझ्या जवळ नव्ह्ते. परंतु,वडिलांची उपेक्षा मी कधीच केली नाही. कदाचित माझे आजीआजोबा माझ्याजवळ होते म्हणून असेल.त्यानी मला लहान मुलांचे खेळ शिकवले.
कुणी म्हणतं, हे सर्व वडलांकडून होणं चांगलं.पण मी म्हणते माझं आयुष्य आनंदात आणि आजीआजोबांच्या प्रेमात गेलं हे ही काही कमी नव्हतं."
मी म्हणालो
"पण तू जास्त करून तुझ्या वडिलांसारखीच दिसतेस."
शालूला हे ऐकून खूप बरं वाटलं.
ती म्हणाली
" हो! बऱ्याच दृष्टीने मी वडिलांचीच मुलगी आहे.माझी उंची,माझे डोळे, आणि माझे अकालनीय केस पिकणे.
तसंच त्यांचा अनाकारण हट्टीपणा,आणि क्वचित वेळां चिडखोरपणा. पण मला त्यांची महत्वाकांशा आणि व्यवहारीपणा पण आला आहे."
"मी वकिल असून सुद्धा त्यांना जरुरीच्यावेळी मदत करू शकले नाही म्हणून माझा त्यांनी थोडे दिवस संबंधपण सोडला होता. मी त्यांच्या भावना ओळखू शकते.पण मी त्यांना बळी गेले नाही.आता ते माझ्याशी पुन्हा संबंध जोडू मागतात.मी पण तयार आहे.
माझ्या सबंध आयुष्यात माझ्या वडिलानी माझ्या जवळ खूप गोष्टी मागितल्या पण क्षमा कधीही मागतली नाही.
मी ती त्यांना ती न मागताच दिली आहे, कारण मी तसं करण्यात विश्वास ठेवते,आणि माझ्या डोक्यावरचा भार पण हलका होतो."
शालूची ही सर्व हकिकत ऐकून माझा तिच्या बद्दल वाटणारा आदर द्विगुणीत झाला.
मी तिचा हात माझ्या हातात घेत तिला म्हटलं
"शालू,आपण कधी कधी म्हणतो ’नांवात काय आहे’ पण खरं सांगू,तुला जरी शालू म्हणतात तरी तुझ्या आईने तुझं मूळ नांव शालिनी ठवलेलं आहे.नांवाप्रमाणे खरंच तुझ्या अंगात शालिनता आहे."
शालू खूप जोराजोरात हंसली.
श्रीकृष्ण सामंत
प्रतिक्रिया
25 Jun 2008 - 10:05 am | विसोबा खेचर
शालूची कथा ठीक वाटली...
तात्या.
4 Nov 2008 - 12:24 am | श्रीकृष्ण सामंत
तात्याराव,
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com