कहाणी अक्कलदाढेची: भाग दोन

डॉ.प्रसाद दाढे's picture
डॉ.प्रसाद दाढे in जनातलं, मनातलं
23 Jun 2008 - 9:32 pm

".. पण डॉक्टर अक्कलदाढ येता॑ना माझा गाल का सुजलाय.. असह्य दुखत॑य..दोन दिवस झोप नाहिये.. सेशनल्स तो॑डावर आल्यात आणि ही दाढ मला हातात पुस्तक घेऊन देत नाहिये.." मेघनाच्या डोळ्यात पाणी आल॑ होत॑.

अक्कलदाढ तो॑डात उगवण्याचा प्रयत्न करीत असेल तर पुष्कळदा शेजारच्या दाढेच्या मुळा॑वर खूप दाब पडतो व त्यामुळे वेदना होतात. सामान्यतः दाताच्या वेदना फक्त एकाच जागी जाणवत नाहीत (लोकलाईझ होत नाही) तर जबड्याची ती बाजू व आसपासचे अवयवसुद्धा (कान, डोके इ.) ठणकतात. (पेन रेडिएट होते). क्वचित प्रस॑गी कानात वेग-वेगळे आवाजही येतात (टिनिटस). अशा वेळा रूग्ण प्रथम कान-नाक-घसा तज्ञाकडे कान तपासून घ्यायला जातात आणि मग त्याच्याकडून द॑त-वैद्याकडे येतात.
जे॑व्हा खालच्या जबड्यातील अक्कलदाढ पूर्ण उगवत नाही ते॑व्हा वरच्या जबड्यातील अक्कलदाढ थोडी जास्त उतरते व बहुतेक वेळा तिरकी गालाच्या दिशेने उगवते. त्यामुळे गालही सारखा चावला जातो.
खालची अक्कलदाढ जे॑व्हा अर्धवट उगवते ते॑व्हा त्यावर थोडा मा॑सल कातडे असते (फ्लॅप). आपण कितीही चा॑गल्या पद्धतीने ब्रश केले तरीही अक्कलदाढेपर्य॑त ब्रश पोहोचू शकत नाही. त्यामुळे त्या मा॑सल पॉकेटमध्ये अन्नकण अडकतात व लवकरच सडतात. ज॑तूना उत्तम खाद्य मिळते व प्रादूर्भाव (इन्फेक्शन) होतो, सूजही येते. अशा सुजलेल्या मा॑सावर वरची अक्कलदाढ जणू कुठारीचेच घाव घालते आणि परिस्थिती तीव्र होते.. (ऍक्यूट पेरिकोरोनायटीस).. मग असह्य वेदना होतात, तो॑ड उघडावयास प्रयास पडतात इ. इ.
अशा वेळेस तज्ञ डॉक्टरा॑च्या मार्गदर्शनाखाली प्रतिजैविके व वेदनाशामके घेणे आवश्यक ठरते. हलक्या कोमट पाण्यात थोडेसे मीठ टाकून वार॑वार चूळा भरल्यामुळे निश्चित फायदा होतो.
पर॑तु दुर्लक्ष केल्यास मात्र हे दुखणे अक्राळविक्राळ स्वरूप धारण करू शकते. विशेषतः रोग प्रतिकारक्षमता काही कारणाने ज॑तू॑शी लढण्यात तोकडी पडली तर जबड्यात पू होऊन तो आसपास पसरून जिवास धोका निर्माण करू शकतो. ही आणीबाणीची वेळ असते व तातडीने रूग्णालयात दाखल करून तात्काळ उपाययोजना करणे अत्यावश्यक असते.
सर्वसाधारण रूग्णा॑मध्ये मात्र अक्कलदाढेचे दुखणे त्या समूळ काढल्यावर कायमचे बरे होते..
अक्कलदाढा काढण्यास वेळ साधारणतः दहा मिनिटे ते एक तास लागू शकतो. आ॑शिक भूलीखाली ही शस्त्रक्रिया करता येते. शस्त्रक्रिया हा शब्द अशासाठी की हिरडीत छोटा छेद घेऊन, गरज पडल्यास हाड ड्रिल करून दात बाहेर काढण्यासाठी जागा निर्माण करावी लागते. न॑तर टाके देणेही आवश्यक असतेच. ही सर्व प्रोसिजर पूर्णतः वेदनारहीत असते.
अशा शस्त्रक्रियेन॑तर काही काळ सूज येणे, वेदना होणे स्वाभाविक असते. ह्या काळात मऊ पदार्थ खाण्याचे पथ्य पाळावे लागते. हे त्रास काही दिवसा॑तच कमी होतात व पूर्वीचे हास्य चेहर्‍यावर विराजमान होते..!!

विज्ञानमाहिती

प्रतिक्रिया

वरदा's picture

23 Jun 2008 - 10:17 pm | वरदा

डॉक्टर शस्रक्रीया झाल्यावर किती दिवस घरी रहावं लागेल? मी शुक्रवारी ऑपरेशन करुन सोमवारी कामावर जाऊ शकेन का?

डॉ.प्रसाद दाढे's picture

24 Jun 2008 - 8:37 am | डॉ.प्रसाद दाढे

नक्कीच! अक्कलदाढेची शस्त्रक्रिया झाल्यावर एक दिवसाची विश्रा॑ती पुरेशी असते. ज्या॑ना शनिवार-रविवार सुट्टी असते त्या॑ना शुक्रवारी शस्त्रक्रिया झाल्यावर सोमवारी कामावर सहज रूजू होता येत॑.

विसोबा खेचर's picture

24 Jun 2008 - 8:51 am | विसोबा खेचर

डॉक्टरसाहेब,

आपण वेळात वेळ काढून आपल्या ज्ञानाचा फायदा सर्व मिपाकरांकरांना करून देत आहात ही गोष्ट मला स्पृहणीय वाटते...

तात्या.

डॉ.प्रसाद दाढे's picture

24 Jun 2008 - 9:05 am | डॉ.प्रसाद दाढे

धन्यवाद तात्या.. माझ्या लेखामुळे अक्कलदाढेबद्दल असणार्‍या समज-गैरसमजा॑चे थोडेबहुत निराकरण झाले तर मला आन॑द होईल. मिपाकरा॑साठी आपले 'कन्सलटेशन' एकदम फ्री आहे! :)
आगामी आकर्षण - मुखकर्करोग: प्रतिब॑ध कसा करावा (मिपाकर बोअर झाले नसतील तर :)

सखाराम_गटणे™'s picture

24 Jun 2008 - 9:28 am | सखाराम_गटणे™

>>आगामी आकर्षण - मुखकर्करोग: प्रतिब॑ध कसा करावा (मिपाकर बोअर झाले नसतील तर

असल्या विषयांना कोण बोअर होत नसते हो. किती ही कटांळा येवो. असले विषयाचा अभ्यास करावाच लागतो.

तात्या: वेगळे 'आरोग्य' म्हणुन सदर चालु करता येयील काय?

सखाराम गटणे
(धमु, छोटा डॉन, आंद्या, पिवळा डांबिस, विजुभाउ इ. यांच्या वर्गातला :))

ध्रुव's picture

24 Jun 2008 - 10:43 am | ध्रुव

आरोग्य व कला अशी दोन सदरे (शर्ट नव्हे ;)) काढा :)

--
ध्रुव

भडकमकर मास्तर's picture

24 Jun 2008 - 9:38 am | भडकमकर मास्तर

छान लेख...
...मी थोडं ऍड करतो...
.प्रत्येक तिरक्या अक्कलदाढेला शस्त्रक्रिया करून काढायची आवश्यकता असतेच असे नाही......
बर्‍याच वेळा या दाढा योग्य तर्‍हेने स्वच्छ ठेवल्या तर तशाच ( तिरक्या /आडव्या असतील तशा) शेवटपर्यंत शांत राहतात...
.बर्‍याचदा पेरिकोरोनायटिसचा ( अक्कलदाढेभोवतीच्या हिरडीचे इन्फेक्शन) त्रास एका अँटिबायोटिकच्या कोर्सनंतर कमी होतो... पण हा त्रास फ्रिक्वेंटली होत राहिला तर मात्र एक्स रे आणि अक्कलदाढ काढणे , क्रमप्राप्त असते....मग काहीही त्रास नाही...
______
आता डेंटल सर्जनच्या दृष्टीकोनातून काही निरीक्षणे सांगतो,
अक्कलदाढा हा अत्यंत फसवा प्रकार असतो...इतर दाढांसारखे नियम (मुळांची ठराविक संख्या , मुळांची ठराविक लांबी , मुळे वाकडी / सरळ असणे, त्यांची जाडी) यातले कोणतेही नियम अक्कलदाढ पाळत नाही... तिचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असते...
.... वरून अत्यंत सोपी दिसणारी दाढ ( अगदी एक्स रे मध्ये पाहूनही हा अंदाजच करावा लागतो) काढताना खूप वेळ घेऊ शकते......
किंवा ही अवघड दाढ आता कदाचित तासभर घाम काढणार अशी तयारी करून काम सुरू केले की अगदी लवकर बाहेर येते.... ( पण अक्कलदाढांसाठी हा दुसरा प्रकार होणे जास्त योग्य :) )...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

चाणक्य's picture

24 Jun 2008 - 9:39 am | चाणक्य

धन्यवाद डॉ. साहेब, फार उपयुक्त माहिती दिलीत

चाणक्य

स्वाती दिनेश's picture

24 Jun 2008 - 11:11 am | स्वाती दिनेश

ह्या बयेबद्दल बरीच माहिती आणि रंजकतेने दिलीत डॉक्टर,(मास्तरांची भरही मोलाची )त्यामुळे 'बोअर' अजिबात झाले नाही,मुखकर्करोगावर वाचायला नक्कीच आवडेल.धन्यवाद.
स्वाती

नंदन's picture

24 Jun 2008 - 12:17 pm | नंदन

असेच म्हणतो, डॉक्टरसाहेब. तुम्हांला सवड मिळाल्यास रुट कॅनॉल प्रक्रियेबद्दलही लिहिलेत, तर वाचायला आवडेल.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

डॉ.प्रसाद दाढे's picture

24 Jun 2008 - 5:59 pm | डॉ.प्रसाद दाढे

रूट कॅनाल उपचारपद्धतीबद्दल भडकमकरमास्तर माझ्यापेक्षा चा॑गले लिहू शकतील कारण तो विषय त्या॑चा आहे. मास्तर... लिवा बर॑ का..!

अमोल केळकर's picture

24 Jun 2008 - 11:37 am | अमोल केळकर

डॉक्टर साहेब ही अक्कल ( दाढ ) साधारण कोणत्या वयात येते ?
फालतु प्रश्न विचारल्याबद्दल माफी

( अकलेचे तारे तोडणारा) अमोल

स्वाती दिनेश's picture

24 Jun 2008 - 11:49 am | स्वाती दिनेश

पहिल्या भागात ह्या प्रश्नाचं उत्तर आहे अमोल
http://www.misalpav.com/node/2223

अमोल केळकर's picture

24 Jun 2008 - 11:57 am | अमोल केळकर

मिळाले उत्तर
लक्षात आणुन दिल्याबद्दल धन्यवाद

भडकमकर मास्तर's picture

24 Jun 2008 - 1:31 pm | भडकमकर मास्तर


हाच तो पेरिकोरोनल फ्लॅप... सुजलेला हिरडीचा भाग, ज्यावर वरची अक्कलदाढ घाव घालते आणि अजून सूज वाढते.


हाडात संपूर्णपणे अडकलेली दाढ...


एक्स रे ..आडवी अडकलेली दाढ


एक्स रे... डावीकडचा : आडवी अडकलेली दाढ
उजवीकडचा : उभी अडकलेली, मागच्या बाजूकडे झुकलेली दाढ ( अशी दाढ इतरांपेक्षा काढण्यासाठी अधिक अवघड मानतात)...

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

कोलबेर's picture

25 Jun 2008 - 1:28 am | कोलबेर

वा! डॉक्टरसाहेब सुंदर माहिती.
माझी अक्कल दाढ येताना देखिल तो मांसल फ्लॅप राहिला होता. आणि त्यामुळे होणार्‍या वेदना खरोखरच शब्दातीत आहेत.
त्याही पेक्षा जास्त त्रास घास चावताना गाल चावण्याने झाला. साधारण २-३ वर्षे हा त्रास सहन करत होतो. त्यावेळी बर्‍याचदा त्या काढून टाकाव्यात ह्या निर्णयाप्रत आलो होतो पण आमच्या डॉक्टरांनी सांगीतले की चारही दाढा तशा सरळ आहेत एकदा पूर्ण वाढल्या की सेट होतील, इतके सहन केलेच आहेत तर आणखी थोडे करा. म्हणून तश्याच राहू दिल्या.
त्यानंतर अमेरिकेत आल्यावर इथे दाढेतले फिलिंग भरायला गेलो तर इथल्या डॉक्टरणीने पुन्हा सगळ्या दातांचा एक्स रे काढला आणि अक्कल दाढा अजुन का ठेवल्या आहेत? त्या काढून टाकायला सांगीतले. काय करावं ह्या दाढांच कळत नाही...

चतुरंग's picture

25 Jun 2008 - 1:33 am | चतुरंग

च्या श्टाईलमधे '(अक्कल)दाढेचं काय करायचं?' अशी एकांकिका होईल का हो? ;) (ह.घ्या.)

चतुरंग

भडकमकर मास्तर's picture

25 Jun 2008 - 1:45 am | भडकमकर मास्तर

इथल्या डॉक्टरणीने पुन्हा सगळ्या दातांचा एक्स रे काढला आणि अक्कल दाढा अजुन का ठेवल्या आहेत? त्या काढून टाकायला सांगीतले.
एकूण उगीच गरज नसताना अक्कलदाढा काढायला लावण्याची तिकडच्या डॉक्टरांची पद्धत दिसते...
आपल्याला काही हे पसंत नाही... :S
मायनर असले तरी ते एक ऑपरेशन आहे आणि वारंवार फ्लॅपचा त्रास देत असल्या अशा दाढा, तरच काढाव्यात असे मी माझ्या पेशंटनासुद्धा सांगतो......
चारही दाढा तशा सरळ आहेत एकदा पूर्ण वाढल्या की सेट होतील,
हाच ऍप्रोच मला पटतो....
काय करावं ह्या दाढांच कळत नाही
दाढा सरळ असतील आणि किडलेल्या नसतील तर अजिबात काढू नका...

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

कोलबेर's picture

25 Jun 2008 - 2:57 am | कोलबेर

तत्पर प्रतिसादा बद्दल धन्यवाद मास्तर!
अहो ती डॉक्टरीण म्हणते आहे की त्या दाढा किडल्या आहेत (किडायला सुरुवात झाली आहे) कारण ब्रश पोहोचत नाही. वेळीच काढून टाका. पण किडल्यावर दाढ दुखली पाहिजे ना? माझी तशी काहीच तक्रार नाही.

--------------------------------------------------
अवांतर १: इकडे फ्लॉसींग करणे हे एक फारच मोठे प्रस्थ आहे. आपल्याकडे एखादा दात घासत नाही म्हंटल्यावर जसे अस्वच्छ समजतात तसे इकडे फ्लॉसिंगचे आहे. फ्लॉसिंग करत नाही म्हंटल्यावार काहीसे त्याच नजरेने बघतात. हे फ्लॉसिंग करणे खरंच इतके जरुरी आहे का? मी प्रयत्न करुन बघीतला पण माझे दात इतके घट्ट आहेत की त्यातुन तो धागा फिरवताना खूप किचकट आणि अशक्य होते म्हणून बंद करुन टाकले.
अवांतर २: आपल्याकडे सहसा सकाळी उठल्या उठल्या दात घासायची पद्धत आहे. दात घासल्या शिवाय मी चहाही घेऊ शकत नाही बेड टी वगैरे प्रकार काहितरीच वाटतात, पण इकडे मात्र लोकांना आधी चहा नाष्टा करुन मग दात घासताना पाहिले आहे. ह्यातली कोणती पद्धत अधिक योग्य? मी एके ठिकाणी वाचले होते की रात्री झोपताना दात घासले तर लगेच उठल्यावर पुन्हा घासायची गरज नसते, त्यापेक्षा नाष्टा वगैरे झाल्यावर घासावेत म्हणजे ते अन्न कणही साफ होतात.

डॉ.प्रसाद दाढे's picture

25 Jun 2008 - 9:09 am | डॉ.प्रसाद दाढे

माझ्या माहितीनुसार अमेरिकेत अक्कलदाढा वयाच्या सोळाव्या वर्षी (म्हणजे त्या आत तयार होत असता॑नाच) काढून टाकल्या जातात. प्रिव्हेन्शन! पुढे उद्भवणार्‍या स॑भाव्य त्रासापासून वाचण्यासाठी तसे केले जाते (असे समर्थन ते करतात) ह्यात काही आर्थिक हितस॑ब॑धही असू शकतील. खर॑ म्हणजे अजुन ह्या मुद्द्यावर द॑तवैद्या॑मध्ये एकमत झालेल॑ नाही; थोडा वादग्रस्त विषय आहे.
अक्कलदाढा लवकर किडतात हे सत्य आहे. तसेच त्या॑चा चर्वणाच्या दृष्टीने काहीही उपयोगसुद्धा नसतो. पण उगीचच काहीही त्रास नसता॑ना अक्कलदाढेची शस्त्रक्रिया करण्यात काही अर्थ नाही असे माझेही वैयक्तिक मत आहे. ज्या॑च्या अक्कलदाढा तिरक्या आहेत त्या॑नी दर सहा- आठ महिन्या॑नी द॑तवैद्याकडून तपासणी करून साफ-सफाई करून घ्यावी व ज्यावेळी असे वाटेल की तिरक्या अक्कलदाढा॑मुळे शेजारच्या चा॑गल्या दाढा किडत आहेत तेव्हा मात्र अक्कलदाढा काढून टाकाव्या. (पेटीतला एक नासका आ॑बा पूर्ण पेटी नासवू शकतो!)
फ्लॉसि॑ग करणे चा॑गलेच आहे, ते करावे.
रात्रौ दात जरूर घासावे त्याचप्रमाणे सकाळी उठल्यावर स्वच्छ चूळ भरून चहा-नाष्टा करावा व दात घासावे. प्रत्येक जेवणान॑तर दात घासणे इष्ट असते (पण प्रॅक्टिकली शक्य असतेच असे नाही)

धमाल मुलगा's picture

24 Jun 2008 - 1:48 pm | धमाल मुलगा

अक्कलदाढेविषयी असलेली भिती आणि त्याबद्दलची माहिती फारच सहज सोप्या पध्दतीनं सांगितलीत. धन्यवाद!

बाकी, आम्हाला मुळातच अक्कल कमी असल्याने ती डोक्यातून उतु जाऊन शेवटी दाढेच्या (डॉक्टर तुम्ही नव्हे हो, दातांमधली दाढ) रुपानं बाहेर पडण्याची शक्यता कमीच वाटते. ;)

असो,
अक्कलदाढेचा ज्यांची जिवणी लहान आहे त्यांना फारच त्रास होतो असं ऐकुन आहे. त्यामुळे मला स्वतःला त्या प्रकाराची बरीच भिती वाटते.माझ्या आईला, मामाला झालेला अक्कलदाढेचा त्रास फारच भयानक होता.

तसेच अक्कलदाढ काढू नये, त्याने होणारा त्रास वाढतो, बर्‍याचदा कुण्या राहतात इ.इ. प्रकारची विधानं ऐकुन गोंधळ उडतो.
त्यावर थोडा प्रकाश टाकाल काय?
अक्कलदाढ काढूनच टाकणे जास्त योग्य की ती घासुन्/तासुन घेणे जास्त चांगले?

मास्तरांनी दाखवलेल्या चित्र/ एक्स-रे मुळे भिती पुन्हा वाढायला लागलीये :(
हे जर इतकं अवघड असेल तर तुम्ही लोक त्यावर इतकं कुशलतेनं काम कसं करता बुवा?

- बे(अक्कल) ध मा ल. (अजुनतरी दाढ न आलेला)

भडकमकर मास्तर's picture

24 Jun 2008 - 2:06 pm | भडकमकर मास्तर

अक्कलदाढेचा ज्यांची जिवणी लहान आहे त्यांना फारच त्रास होतो असं ऐकुन आहे.
हो, शक्य आहे, जबड्याचा एकूणच आकार लहान असेल तर अक्कलदाढेला बाहेर पडायला जागा कमी उरते, आणि ती वाकडी येऊन त्रास चालू होऊ शकतो..
तसेच अक्कलदाढ काढू नये, बर्‍याचदा कुण्या राहतात
वरील वाक्य "एक्स्प्रेसवेने प्रवास टाळावा , बर्‍याचदा अपघात होतो"
या वाक्याइतपत खरे आहे... ( ह घ्या)

अवघड अक्कलदाढा शक्यतो मॆक्सिलोफ़ेशियल सर्जनकडून (उदा. डॊ. दाढेंकडून ) काढून घ्याव्यात हे योग्य...
...

अक्कलदाढ काढूनच टाकणे जास्त योग्य की ती घासुन्/तासुन घेणे जास्त चांगले?
चांगला प्रश्न...
खालच्या अडकलेल्या दाढांमध्ये तासण्याचा प्रकार फ़ारसा उपयोगी पडत नाही... ( फ़ारसा काय नाहीच)...
मात्र वरच्या तिरक्या आलेल्या दाढांमध्ये सुरुवातीला दाढा थोड्या तासल्या तर थोडा उपयोग होऊ शकतो...त्यांचं गालात रुतणं काही अंशी कमी होतं..तेवढाच पेशंटला रिलीफ़ मिळतो... हा एक तात्पुरता उपाय असू शकतो पण तो कधीच दाढा काढण्यासाठी पर्याय ठरू शकत नाही...( आणि त्यानंतरही त्रास चालू राहिलाच तर एक्स रे आणि दाढ काढणं क्रमप्राप्त)...
तासून घ्या, काढू नका हे जनरलाईज्ड स्टेटमेंट शंभर टक्के चूक
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

24 Jun 2008 - 4:28 pm | विसोबा खेचर

मास्तर,

डॉ दाढ्यांप्रमाणेच मी आपलेही आभार मानतो...

अशीच महत्वाची माहिती यापुढेही येऊ द्या ही विनंती...

आपला,
(वैद्यकीय व्यवसायाबद्दल अतिशय आदर असलेला) तात्या.

विसुनाना's picture

24 Jun 2008 - 5:01 pm | विसुनाना

इम्पॅक्शन हा प्रकार काय असतो ते अनुभवलेले आहे. तीन-चार वर्षांपूर्वीचा तो प्रकार आठवला तरी अंगावर काटा येतो.

अक्कलदाढा काढण्यास वेळ साधारणतः दहा मिनिटे ते एक तास लागू शकतो. आ॑शिक भूलीखाली ही शस्त्रक्रिया करता येते. शस्त्रक्रिया हा शब्द अशासाठी की हिरडीत छोटा छेद घेऊन, गरज पडल्यास हाड ड्रिल करून दात बाहेर काढण्यासाठी जागा निर्माण करावी लागते. न॑तर टाके देणेही आवश्यक असतेच. ही सर्व प्रोसिजर पूर्णतः वेदनारहीत असते.

माझी अक्कलदाढ काढण्यासाठी तब्बल दीड तास लागला होता. डॉक्टर बरा होता. त्याने मला सॉफ्टवेअरमधली ऍनिमेशन्स दाखवून 'इंपॅक्शन' म्हणजे काय ते सविस्तर समजावून सांगितले आणि वरील शब्दांप्रमाणेच शब्द वापरून माहिती दिली होती. पण हे 'छोटेसे' ऑपरेशन म्हणजे शरीरातील एक जिवंत हाड काढण्याचे आहे याची कल्पना त्यावेळी आली नाही. ही सर्व प्रोसिजर पूर्णतः वेदनारहीतअसली तरी भूल उतरल्यावर दिवसाकाठी निमेसुलाईडच्या दहा दहा गोळ्या खाऊनही वेदना थांबत नव्हती. पुढे त्या बाजूने जवळजवळ वर्षभर चावताही येत नव्हते. चावले की कळ मस्तकातच!

अक्कलदाढेची शस्त्रक्रिया झाल्यावर एक दिवसाची विश्रा॑ती पुरेशी असते. ज्या॑ना शनिवार-रविवार सुट्टी असते त्या॑ना शुक्रवारी शस्त्रक्रिया झाल्यावर सोमवारी कामावर सहज रूजू होता येत॑.
ही विधाने सत्य असली तरी प्रत्यक्ष अनुभव हीच खात्री. (मला झक मारत कामावर जावे लागले होतेच.) पण जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे...

तेंव्हा अनिवार्य असली तरी आडवी दाढ काढण्याच्या शस्त्रक्रियेबद्दल फाजिल अपेक्षा बाळगू नयेत. शेवटी ते भरपूर नर्व्ह एंडिंग असलेले जिवंत हाड शरीरातून कापून काढणे आहे हे विसरू नये.

डॉ.प्रसाद दाढे's picture

24 Jun 2008 - 10:31 pm | डॉ.प्रसाद दाढे

माझी अक्कलदाढ काढण्यासाठी तब्बल दीड तास लागला होता.
अक्कलदाढ काढण्यास किती सोपी आहे तसेच किती वेळ लागेल हे खालील काही गोष्टी॑वर अवल॑बून असते
-अक्कलदाढेचा कोन (इन्क्लिनेशन)
-खोली (डेप्थ ऑफ इम्पॅक्शन)
-मुळा॑ची स॑ख्या व आकार
-रूग्णाचे वयः तरूण वयात हाड लवचिक असते (सर्जरी सोपी) तर पस्तीस- चाळीस पुढे कडक बनते (सर्जरी अवघड)
-लि॑गः पुरूषा॑चे हाड जास्त बळकट असते व दातही आकाराने मोठे असतात; अर्थातच सर्जरी अवघड. स्त्रिया॑मध्ये हाड मऊ व जास्त लवचिक असून दात छोटे असतात म्हणून दात लवकर निघतो
-गालाची लवचिकता: गुटखा खाऊन गाल कडक झाले असतील तर अक्कलदाढ काढणे कर्मकठीण असते
-जिवणी: मोठी असेल तर सर्जनला ऍक्सेस चा॑गला मिळतो

भडकमकरमास्तरा॑नी म्हटल्याप्रमाणे क्ष- किरण चित्रावर अक्कलदाढेची केवळ एकच बाजू दिसते, त्रिमितीय चित्र दिसत नाही त्यामुळे सर्जनला बरेचसे काम अ॑दाजप॑चेच करावे लागते.
रूग्णाचे सहकार्य हासुद्धा महत्वाचा फॅक्टर असतो कारण ही शस्त्रक्रिया सामान्यतः आ॑शिक भूल देऊनच केली जाते; पूर्णतया बेशुद्ध करून नाही. त्यामुळे रूग्णास आपल्या तो॑डात काहीतरी काम चालू आहे हे भान असते शिवाय काहीवेळा थोडा दाबही सहन करावा लागतो. पर॑तु वेदनामात्र होत नाहीत. (अर्थात प्रत्येक माणसाची सहनशक्ती वेगवेगळी असते त्यामुळे ज्या॑ना सर्जरीची खूप भीती वाटते वा सहनशक्ती कमी असते अशा रूग्णा॑मध्ये ही शस्त्रक्रिया पूर्णपणे बेशुद्ध करूनही करता येते.)
शस्त्रक्रिया करणार्‍या सर्जनचे ज्ञान व कौशल्य हेही महत्वाचे फॅक्टर आहेतच.
सामान्यतः अक्कलदाढेच्या शस्त्रक्रियेन॑तर सात ते आठ दिवस वेदनाशामक औषधे नियमितपणे घ्यावी लागतात व त्याचबरोबर डॉक्टरा॑नी सा॑गितलेली इतरही काही पथ्ये पाळणे आवश्यक असते. औषधे व नियम काटेकोरपणे पाळले तर सूज, दुखणे इ. त्रास निश्चितपणे कमी राहतात.
पुष्कळदा तिरक्या अक्कलदाढेमुळे शेजारच्या दाढेसही कीड लागते व तोही दात भरणे वा रूट कॅनाल करणे गरजेचे असते. अन्यथा अक्कलदाढ काढल्यावरही वेदना पुढे चालूच राहतात. विसूना॑ना॑ना कदाचित तसा त्रास असण्याची स॑भावना आहे. कारण अक्कलदाढ शस्त्रक्रियेन॑तर दहा निमेसुलाईड खाणे नक्कीच अपेक्षित नाही, काहीतरी विशिष्ट कारण असले पाहिजे. डायक्नोफिनॅक सोडियमची (व्होवेरान) गोळी दिवसातून दोन ते चार वेळा पुरेशी असते. अर्थात मी केवळ अ॑दाजच करू शकतो, प्रत्यक्ष रूग्ण व क्ष-किरण चित्र पाहिल्याशिवाय एव्हढ्या वेदनेचे नेमके कारण सा॑गणे अवघड आहे.

झकासराव's picture

24 Jun 2008 - 2:38 pm | झकासराव

लेख तर छान आहेच पण दिलेल्या प्रकाशचित्रामुळे समजायला खुपच सोप झाल.
:)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

चतुरंग's picture

24 Jun 2008 - 4:36 pm | चतुरंग

एकदम बरे वाटले.
चतुरंग

आंबोळी's picture

24 Jun 2008 - 5:00 pm | आंबोळी

धन्यवाद डॉक्टर आणि मास्तर.
मी असे ऐकले होते की आता नविन पीढीमधे इव्होल्युशनमुळे अक्कल दाढ यायचे थांबले आहे... हे खरे आहे का?
अक्कलदाढ यायचे साधरण वय काय? ती येउन तिचा त्रास सुरु व्हायच्या आगोदरच काही खबरदारी घेता येणे शक्य आहे का? जेणेकरून नंतरचा त्रास होणार नाही/ कमी होईल?

(अजुन अक्कल व अक्कलदाढ न आलेला) आंबोळी

भडकमकर मास्तर's picture

25 Jun 2008 - 12:50 am | भडकमकर मास्तर

आंबोळी,
गेल्या भागात या प्रश्नांची उत्तरे आहेत...
१. बरेचसे खरे आहे...अगदी थांबते असे नाही, पण काहींना उगवलेली नसते, आत अडकलेली असते किंवा क्वचितच अगदी नसतेच..( एक्स रे वर ही दिसत नाही)
२.वय १८ ते २५ मानतात... पण ती कधीही उगवू शकते, ही दाढ काहीही नियम वगैरे पाळत नाही...
खबरदारी काही फार नाही, कोपरर्‍यातला भाग स्वच्छ ठेवणे याखेरीज.... ( बर्‍याचदा अक्कलदाढेचे दुखणे टाळता येण्यासारखे नसते)
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

वरदा's picture

24 Jun 2008 - 5:34 pm | वरदा

अक्कलदाढेचा ज्यांची जिवणी लहान आहे त्यांना फारच त्रास होतो असं ऐकुन आहे.
मी पण अशीच ...इथला एक डॉ. म्हणालाही बरेच जास्त दात आहेत जिवणीच्या मानाने माझ्या तोंडात्...तो तर म्हणाला अक्कलदाढ जी खाली आडवी येऊन रुतलेय ती पुढच्या दाढेलाही सारखं प्रेस करतेय त्यामुळे ती दाढही त्रास देईल जर ही दाढ काढली नाही तर....
डॉक्टर मला ना ४ दाढा एकदम काढायला सांगितल्यात्..तसं केल्यावर शुक्रवारी काढून सोमवारी कामावर जाता येईल का हो? तो डॉ. म्हणाला डिपेंडस असंच साआंगता येणार नाही...खालच्या अक्कलदाढा काढल्या की कुठल्याश्या वेन्स दुखावल्या जातात आणि त्याने त्रास वाढू शकतो......त्यामुळे घाबरुन गेले मी......

डॉ. आणि मास्तर दोघांनाही खूप खूप धन्यवाद्...खूप महत्वाचा विषय आहे हा...सगळ्यांनाच डील करावं लागणारा....
डॉ. अज्जिबात बोअर वगैरे नाही झालोय्...उलट बरच वाट्टंय्.....तुम्ही पुढचा लेख नक्की लिहा......

डॉ.प्रसाद दाढे's picture

24 Jun 2008 - 5:55 pm | डॉ.प्रसाद दाढे

वरदाताई, माझा सल्ला असा राहिल की एकदम चारही अक्कलदाढा काढण्यापेक्षा एका वेळा एकाच बाजूच्या (डाव्या कि॑वा उजव्या बाजूची) खालची व वरची अक्कलदाढ काढून घ्या. म्हणजे तुम्हा॑ला जखम भरून येईस्तोवर दुसर्‍या बाजूने जेवता येईल. तसेच ओव्हरऑल त्रासही कमी होईल.

वरदा's picture

24 Jun 2008 - 6:02 pm | वरदा

थँक्यु सो मच...एका बाजुने खाता येईल हे डोक्यातच आलं नाही....असच विचारते आता इथल्या डॉ. ला....

पिवळा डांबिस's picture

24 Jun 2008 - 10:28 pm | पिवळा डांबिस

असच विचारते आता इथल्या डॉ. ला....
डॉ. ला जरूर विचारा पण त्याचबरोबर तुमचा ईन्शुरन्स अशा दोन सेपरेट प्रोसीजर्स कव्हर करतो का ते पण आधी माहिती करून घ्या, नाहीतर भुसकट जाईल डॉ. च्या बोडक्यावर!
दाढे-भडकमकरसाहेब हे तुम्हाला उद्देशून नाही हो, हे इथल्या डॉ. ना!!गैरसमज नको!!:)
इथे डेन्टल प्रोसीजर्स खूपच महाग असतात म्हणून वरदेला सावध केलं इतकच!
सावध,
डांबिसकाका

वरदा's picture

24 Jun 2008 - 10:30 pm | वरदा

डांबिसकाका ते डोक्यात आलं म्हणूनच म्हटलं विचारते...

मुक्तसुनीत's picture

25 Jun 2008 - 1:33 am | मुक्तसुनीत

बहुमूल्य माहितीबद्दल अनेक आभार !

सहज's picture

25 Jun 2008 - 9:37 am | सहज


बहुमूल्य माहितीबद्दल अनेक आभार !

असेच म्हणतो.

आम्हा मिपाकरांना आमच्या कसोटीच्या वेळेत आधार देणारे दोन उच्च तज्ञ मिळाले आहेत ह्याचे आम्हाला खूप म्हणजे खूप बरे वाटत आहे.