आर. डी. मल्हार !

मनोज श्रीनिवास जोशी's picture
मनोज श्रीनिवास जोशी in जनातलं, मनातलं
21 Jul 2012 - 10:07 am

एकंदर संगीताचा विचार केल्यास गाणे गाण्यापेक्षा संगीत रचना करायला अधिक “प्रतिभा” लागते असे मला नेहमी वाटते. गायक हा कवी व संगीतकार यांच्या मधला रसिक श्रोत्यांपर्यंत भावना पोहोचवणारा शेवटचा दुवा आहे. पण अनेक वेळा श्रेय नामावली मध्ये गायकाला विशेष स्थान असते आणि कवी व संगीतकार उपेक्षित राहतात.
कवीला संगीताची ज्ञान असणे सक्तीचे नाही पण संगीतकारला काव्याची जाण असणे अनिवार्य आहे. तसेच गायकाला संगीताचे ज्ञान असणे हे अनिवार्य असले तरी काव्याची समज आवश्यक नाही. म्हणून चांगले गीत / काव्य “चांगले गाणे “ म्हणून रसिकांसमोर आणण्यात संगीतकार हा महत्वाचा दुवा आहे.

तर संगीतकार आ.डी. बर्मन हा माझा अनेक आवडत्या संगीतकारांपैकी एक – अतिशय प्रतिभावान व वैविध्यपूर्ण संगीत रचना करण्यामध्ये श्रेष्ठ ! ख्याल ठुमरी असे शास्त्रीय विशेष करून ऐकणारे सिने संगीताला (सतत) कमी लेखत असतात – तो ज्याच्या त्याच्या आवडीचा भाग आहे. पण घरंदाज श्रोत्याच्यातही आर.डी. च्या रचनांचे चाहते खूप आहेत , मी ही त्या पैकीच एक ! पाश्चात्य संगीत सरळ सरळ उचलणारा अशीही पंचम ची ओळख आहे. अशी उचलेगिरी कोण करत नाही? कोणत्या चीजा-ख्याल कोणत्या संगीतकर्त्याने वापरले आहेत हा एक वेगळा लेख होवू शकतो. पण ते चालते ! पश्चिमेचे संगीत चोरले की लगेच त्यावर चोरीचा आरोप होतो (होत असे). यामानाचा वापर जसा बाबुजींनी केला तसाच तो पंचम ने केला ! पिलू , खमाज , काफी राग तर अती कल्पकतेने वापरले. तबला , गिटार कोर्ड , सतार अश्या विविध विसंगत वाद्यांचा मस्त वापर केला. ( बडा नट खट है क्रिशन कानैय्या ). असा संगम कोणालाही जमला नाही , जमणार नाही.

सध्या मस्त पावसाळा सुरु आहे. हे म्हणजे राग मल्हार गायचे दिवस ! पावसाचे अनेक रंग आणि मल्हार चे अनेक प्रकार !! आर. डी ने मल्हार चा वापर केल्याचे आठवत नाही. तो तसा राग – त्याची वेळ – भावना हया गुंत्यामध्ये फासणारा नव्हे. आपल्या प्रतिभेने रचनांचे सोने करणारा संगीतकार. तर आर. डी ने केलेली दोन पावसाची गाणी पाहूया. मल्हार राग शिवाय त्या गाण्याला – भावनेला कशी मस्त गवसणी घातली आहे पंचमदाने !
बच्चनजी आणि मौसमी चटर्जी वर चित्रित केलेले “रिमझिम गिरे सावन “ हया अप्रतिम गाण्याची नव्याने ओळख करून द्यायला नको. पावसाच्या गाण्यांमधले हे सर्वोत्तम गाणे आहे !

हया आठवडयात राजेश खन्नाचे निधन झाले. त्याच्या चित्रपटाचे मला विशेष अप्रूप नाही पण काकाजीना आर. डी. ने अनेक सुंदर रचना बहाल करून , त्याच्या “सुपर स्टार “ होण्यात थोडा हातभार लावला. राजेश खन्नाच्या अजनबी मध्ये असेच एक सुंदर गाणे आहे. “ऐसा लागता है”.

ही दोनीही गाणी ऐकल्यावर पावसाला उगाच “मल्हार” मध्ये कोंबण्या पेक्षा असा स्वतंत्र न्याय दिलेला चांगला असे मला नेहमी वाटते.

संगीतविचार

प्रतिक्रिया

आरडी उत्तम संगीतकार होते, आणि त्यांनी बरीच छान गाणी आपल्याला दिलीत, याबद्दल शंकाच नाही, परंतु ...."असा संगम कोणालाही जमला नाही , जमणार नाही"...... हे जरा अति झाले.
गंमत म्हणजे हेमंत कुमार, ओपी नय्यर इ. च्या जमान्यातल्या संगीतावर पोषण झालेल्या पिढीचे, 'आरडीचे आगमन झाले, आणि सिनेसंगीताचा कचरा झाला' असे मत झाले होते. (आशाताई ओपींना सोडून आरडींकडे वळल्या, अन सगळा घात झाला...) परवाच एक जुना मित्र भेटला, तेंव्हा जुन्या आठवणी काढताना त्याने हा उल्लेख केला, त्यामुळे आत्ता आठवले.

चौकटराजा's picture

21 Jul 2012 - 7:10 pm | चौकटराजा

<em>एकंदर संगीताचा विचार केल्यास गाणे गाण्यापेक्षा संगीत रचना करायला अधिक “प्रतिभा” लागते असे मला नेहमी वाटते.
हे त्रिवार सत्यच आहे. परंतू शास्त्रीय संगीत गाताना गायक हा संगीतकारही असतो. आपण जे शिकलो त्या पेक्षा आयत्या वेळची " उपज" वेगळी असू शकते. सबब तिथे प्रतिभेचा प्रश्न येतो. नवे सुचणे म्हणजे प्रतिभा व सादर करणे म्हणजे कौशल्य !
तर संगीतकार आ.डी. बर्मन हा माझा अनेक आवडत्या संगीतकारांपैकी एक – अतिशय प्रतिभावान मी आरडी ना प्रतिभावान संगीतकारात गणत नाही. ते शैलीदार संगीतकार
सुरूवातीस होते पण त्यानंतर त्यानी तीही शैली सोडून दिलेली दिसते.( त्या शैलीतले ओ मेरे प्यार आजा , आजा पिया तोहे प्यार दूं ई गीते आठवा ) मग आरडी यांचे संगीतातील स्थान काय ? तर ते सर्वात वरच्या दर्जाचे प्रयोगशील संगीतकार होते. त्यानी किती वाद्ये , किती ताल वापरले याला गणतीच नाही. किती प्रकारच्या लोकसंगीताचा परिचय त्यानी भारतीय लोकाना करून दिला ! ग्रेट. त्यांचे मोठे योगदान
म्हणजे त्यानी " मेलडी" ची व्याख्याच बदलली. उदा. देखिये साहेबो वो कोई और थी - तीसरी मंझील.
आता याचा आर डी मल्हार शी काय संबध.? ते पाहू . तर पावसाचे गाणे म्हणजे ते कोणत्या तरी मल्हार, कोणत्यातरी सारंग रागावर आधारित असले पाहिजे हे कल्पनाच त्यानी झुगारली. ( पुढे एल पी नी मारवा रागात कॅबरे गीत करून या बंडखोरीला हातभारच लावला ) . मी ओपींचा चाहता आहे पण काही बाबतीत आरडीचे स्थान वादातीत आहे हे मान्यच करावयास हवे." आर डी हा उत्तम कॉपीकॅट आहे असे ओपीच एकदा म्हणाले होते.

अर्धवटराव's picture

22 Jul 2012 - 1:53 am | अर्धवटराव

आर डी ला कोणि प्रतिभावान म्हणो कि कचरा म्हणो, नखशिखांत (म्हणजे श्रोत्याला पदन्यासापासुन मानेच्या झटक - मुरडण्यापर्यंत ) संगीत मेजवानी देणारा एकच संगीतकार... आर.डी.

अर्धवटराव

स्पंदना's picture

22 Jul 2012 - 10:13 am | स्पंदना

वर त्यांना एस डीं च्या छायेतुन बाहेर पडुन स्वतःच काही अस व्यक्त व्हायच होत. काय तेच तेच कित्ते गिरवित रहायचे नाही का? मला तर आरडी अन एसडी दोघेही आवडतात.

चौकटराजा's picture

22 Jul 2012 - 6:30 pm | चौकटराजा

असे म्हणतात की " सर जो तेरा टकराये " ( प्यासा) ही चाल पंचमची आहे व त्या चालीच्या जन्माच्या वेळी पंचम होते ११ वर्षाचे. ( मला वाटते ही माहिती अमितकुमारने एका कार्यक्रमात दिली आहे ) .
मी पंचमचा डाय हार्ड फॅन नाही . तरीही सांगतो आर डी एस डी च्या खूप पुढे गेले. माझी तक्रार एवढीच की
आर डी चे अतिउत्तम गाण्याचे प्रमाण एकूण करियर च्या तुलनेत कमी आहे.

पैसा's picture

22 Jul 2012 - 7:03 pm | पैसा

पंचमबद्दल अगदी दोन टोकाची मतं ऐकायला मिळतात. आधी ताल /ठेका घेऊन मग त्याच्यावर आपण सगळी चाल उभी करू शकतो अस त्यांनी एका मुलाखतीत सांगितलेलं आठवतंय. "दम मारो दम" चं त्यांनी यासाठी उदाहरण दिलं होतं.

आर डी चं संगीत राजेश खन्नासाठी वापरलं गेलं तोपर्यंत सुश्राव्य होतं. नंतर अमिताभचा उदय झाला आणि एकूणच संगीताला उतरती कळा लागली. तरीही अमिताभच्या बर्‍याच चित्रपटांना आर डी चंच संगीत सुरुवातीच्या काळात होतं. राजेश खन्नाच्या काळापासून किशोरकुमार हा एक नंबरच्या हीरोचा आवाज झाला आणि किशोरकुमार हा पंचमच्या संगीतातला एक महत्त्वाचा घटक होता हे याचं एक कारण असू शकेल.