कविता व भावगीत

शरद's picture
शरद in जनातलं, मनातलं
15 Jul 2012 - 9:33 am

मागील एका लेखात विषय आला होता " कविता व भावगीत यात फरक करता येतो का ? आणि तसा फरक असेलच तर तो कशामुळे उद्भवतो ? आता हे शक्य आहे की चांगला कवी सुरेख भावगीत लिहू शकेल आणि श्रेष्ठ भावगीतकार सुरेख कविताही लिहून जाईल. दोन उदाहरणे म्हणजे मंगेश पाडगावकर आणि शांताबाई शेळके. उलटे उदाहरण म्हणजे आरती प्रभूंचे. त्यांच्या अनेक सुन्दर कविता रसिकांच्या मनात घर करून असतात पण भावगीत ? लक्षात आले का मला काय म्हणावयाचे आहे ? पण हा फरक अधोरेखित करावयास आज एक छान उदाहरण देतो.

काळ साधारणत : साठ एक वर्षांपूर्वीचा. त्यावेळी स्त्रीच्या आयुष्यातील तीन महत्त्वाच्या घटना म्हणजे विवाह, पहिल्या मुलाचा जन्म व मुलाचे लग्न." शाळेत प्रवेश, कॉलेजात आडमिशन, पहिला नोकरीचा इन्टरव्ह्यु, " असल्या गोष्टींना आजच्या इतके महत्त्व त्याकाळी नव्हतेच. आणि मुलाचे लग्न म्हणजे घरात सून येणार. आजच्या सारखे सासू व सून यांचा त्याकाळी फार परिचय होण्याची वेळ येत नसे. लग्नात तर सर्व घाई गडबडीत पार पडावयाचे. तेव्हा खरी भेट ही वधूच्या गृहप्रवेशाच्या वेळीच. तर या वेळेच्या सासूच्या अंतःकरणातील घालमेलीचे वर्णन करणारी एक कविता व एक भावगीत आज बघू.

चन्द्रकोर

मेंदी-रेखली पाउलें
उगा येती डोळ्यांपुढे
किणकिणती कानांत
नाजुकसे हिरवे चुडे.

सारखीच लगबग
जोडव्यांव्या तालावर,
इथे तिथे झगमगे
सोनसळीची किनार.

उगीचच पानोपानीं
जाई दारची लाजते,
दाराआडून कुणाचें
मुख लाजरें साजतें ?

कळी कुठे तें कळेना,
गंधे कोंदाटते मन :
आगमनाचे तिचिया
मोजितें मी क्षणक्षण.

ये ग माझ्या, चंद्रकोरी
उजळाया माझें घर :
माहेराच्या ममतेने
उभें स्वागता सासर !

पद्मा (आभाळवेडी)

लिंबळोण उतरतां

लिंबलोण उतरतां अशी कां
झालिस ग बावरी
मुली तूं, आलिस अपुल्या घरीं !!धृ.!!

हळदीचें तव पाउल पडतां
घरची लक्ष्मी हरकुन आतां
सोन्याहुन ग झाली पिवळी
मांडवाला कवळून चढली,
चैत्रवेल ही वरी !!१!!

भयसंकित कां अजुनी डोळे ?
नको लाजवूं सारें कळले
लेकीची मी आहे आई
सासुरवाशिण होउन मीही
आले याच घरीं !!२!!

याच घरावरि छाया धरुनी
लोभ दाविती माय पक्षिणी
हसतें घर हें तुझ्या दर्शनी
सुखव मलाही आई म्हणुनी
बिलगुनी माझ्या उरीं !!३!!

पी. सावळाराम

"चन्द्रकोर" तुम्ही बर्‍याच जणांनी वाचलेली नसेल पण लताने गायलेले" लिंबलोण उतरता" तुम्ही नक्कीच ऐकलेले असणार. वसंत प्रभूंची चाल अप्रतिम आहे. आता कवितेत आणि भावगीतात समान काय आहे ? निवेदिका सासू आहे. ती प्रेमळ व वत्सल आहे. ती येणार्‍या सूनेत आपली नवीन मुलगीच पहात आहे. तीने आपल्याला आईच म्हणावे अशी तीची अपेक्षा आहे. आपणच नव्हे तर हे घरच हरपून गेले आहे हे सूनेला आवर्जून सांगावयाचे आहे. गृहप्रवेश हीच वेळ आहे. आणि यावेळीच ती नववधूला आश्वासित करत आहे. हे सर्व समानच आहे. दोनही रचनेत लालित्य आहे.( कविता व भावगीत दोन्ही १८-२० ओळी म्हणजे जवळजवळ सारख्या ओळींच्या आहेत!) मग फरक कुठे दिसतो ?
सावळारामांनी काय केले ? त्यांनी लिंबलोण उतरतांना थेट सूनेशी संवाद साधला. ती बावरली आहे हे ओळखून तिला प्रथमच संगितले की तू तुझ्याच घरी आली आहेस ! तूच घराची "लक्ष्मी" आहेस याची ग्वाही दिली व मीही तुझ्यासारखीच सासूरवाशिण म्हणून आले असे सांगून समानतेचे नाते जोडले. मग मला उराशी बिलगून आई म्हणून सुखव अशी मागणी केली. यात प्रेम आहे, वत्सलता आहे पण जे सांगावयाचे ते थेट रोकठोक सांगितले आहे. कुठेही सूचकता नाही. नाट्यमयता आहे.पण जे काय सांगावयाचे ते सरळपणे सांगावयाचे. काय आहे, तीन मिनिटांच्या ध्वनीमुद्रिकेत तुम्ही ऐकता ते चटकन भिडले पाहिजे. शांतपणे समजवून घ्यावयास वेळ नाही. मर्यादित वेळ हे एक लोढणेच भावगीताच्या गळ्यात असते. माहेर-सासर एकच आहे हे सांगण्यासाठी "तू मला आई म्हण" हा short-cut झाला. "हसते घर हे तुझ्या दर्शनी" यात काव्य नाही. कविता ही शांतपणे, रसिकतेने, आपलिशी करावयाची असते. प्रेयसीच्या प्रथम भेटीसारखे. वेळ नसेल तर कविता वाचावयास घेऊच नये.

पद्मा यांनी निराळा मार्ग निवडला. त्यांनी सूनेशी बोलावयाच्या आधी आपली (व घराचीही) ओढ प्रथम मांडली.तीची पाउले, मेंदी-रेखली पावले त्यांच्या डोळ्या समोर येतात. काव्य "उगा" म्हणण्यात आहे, आपैसे, सहजपणे, ओढून ताणून नाही. नाजुक चुड्यांची किणकिण कानात भरली आहे .ती मुद्दाम ऐकावयाची नाही. घर झगमगते किनारीने, दागिन्यांनी नाही. इथे धनाची मातब्बरी नाही हे सुचवले. दारची जाई, पण तीही पानोपानी लाजते आहे. दाराआडचा लाजरा साजरा मुखडा मोहवित आहे. कळी कुठे ते कळत तर नाही पण गंध मात्र "कोंदटला" आहे, ओसंडून वहात आहे. जाईने सूनेशी एकरूपता जोडली जशी घराने तिच्या पातळाच्या किनारीने झगमगून. ही समरसता झाल्यावरच आगमनाची ओढ ही क्षणाक्षणात मोजली तर पटण्यासारखी होते. " ये ग माझ्या, चंद्रकोरी " मध्ये "ग"ने दाखवलेली जवळिक व "चंद्रकोरी"ने केलेला नवतीच्या नाजूकतेचा गौरव व शीतलतेचा उल्लेख पुढील ओळीतील "उजळाया माझें घर"चा सांधा जोडून घेते. माझे घर यातील "माझे " हे आता "तुझे" ही आहे हे सांगण्यास माहेर-सासर ममता-स्वागत यांनी एकजीव केले आहे. सर्व कडव्यांत एक जैविक जोड आहे.

म्हटले तर ही कविता एक स्वप्नच आहे. व स्वप्नात असावी अशी तरलता हा कवितेचा गाभा आहे. भावकविता ही भावगीतापासून अलग होते ती अशी. पद्मा गोळे यांच्या जन्मशताब्दीच्या वर्षी ही आपणास भेट.
(सुचकता-तरलता हा एक मुद्दा येथे घेतला. पुढच्या उदाहरणात बाकीचेही काही घेऊ.)

शरद

वाङ्मयसमीक्षा

प्रतिक्रिया

चौकटराजा's picture

15 Jul 2012 - 9:46 am | चौकटराजा

लेख मस्त . कविता , भावगीत सीमारेषा फार धूसर ! साधारण पणे ज्याला कडव्यांची बंधने असतात जे " सिचूएशनल " असते ते गीत. जी विचार मांडते ती कविता. गीताचा उपप्रकार म्हणजे भावगीत. त्यात इतर
कशापेक्षाही भाव प्रदर्शनाला प्राधान्य.
कुशलव रामायण गाती - गीत
शुक्रतारा मंदवारा- भावगीत
सलाम - कविता

नितिन थत्ते's picture

15 Jul 2012 - 10:03 am | नितिन थत्ते

मस्त.

शरद यांचे कविता आणि गीतांचे रसग्रहण हे आमच्या सारख्या औरंगजेबांनासुद्धा आनंद देऊन जाते.

मनोज श्रीनिवास जोशी's picture

15 Jul 2012 - 1:07 pm | मनोज श्रीनिवास जोशी

कविता आणि भावगीता मधला फरक व साम्य छान मांडले आहे. पद्मताईंची ही कविता मला ९ मध्ये होती . आणि आमच्या बाईनी ती खूप छान गाऊन शिकवली होती. आज परत वाचताना मजा आली .
आरती प्रभू हे कवी आणि त्यांची कविता ही कविताच पं.हृदयनाथानी त्यांच्या कवितेत काहे बदल करूनच त्याची गीते केली आहेत. उदा : कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे
बोरकरांच्या कविता जय आहेत आणि त्या त्यांना चालीमाध्येच सुचायच्या , आणि म्हणून पंडित अभिषेकीनी काव्या मध्ये बदल न करता त्यांना चाली लावल्या ( कशी तुज समजावू सांग )

मला वाटते की जर कवितेवर संगीताचे संस्कार होणार आहेत हे कवीला आधीच माहित असेल तर ते भावगीत होते.

अवांतर : प्रतिसाद कमी आहेत म्हणून ना उमेद न होता पुढचा भाग लिहा. प्रतिसादांचा दर्जा महत्वाचा संख्या नाही ! ( हे मी स्वतःलाही समजावत असतो )