कोटेश्वर येथील दगडुमहाराज अखन्ड रामधुन आश्रम आपल्या धुळे जिल्ह्यातील चापळगावचे सन्तश्री दगडुमहाराज प्रेरीत आहे. सन्त गाडगे महाराजान्प्रमाणेच या महाराजान्चे कार्य आहे.त्यानी नर्मदा परिक्रमा केल्या होत्या. नर्मदाकिनारी त्यानी बरेच आश्रम बान्धले असुन तेथे अन्नछत्र,व्रुद्धाश्रम चालवले जातात.आदिवासी मुलिन्च्या शिक्षणासाठी मदत केली जाते.
पहाटे पाच वाजता उठलो स्नान पुजा आरती करुन आश्रमाचे व्यवस्थापक श्री.लालजीबाबा यान्चा निरोप घेउन दगडुमहाराज,नर्मदामाता,कोटेश्वरमहादेव याना प्रणाम करुन विनोबा एक्स्प्रेस निघाली. साडेसात वाजता नीसरपुरला पोहोचलो.चहा-नास्ता करुन साडेआठच्या बसने मनावरला निघालो. दहा वाजता मनावरला पोहोचलो,लगेच कालीबावडी साठी बस मिळाली. वाटेत लुन्हेरा बुजुर्ग येथे तेथील युवा कॉन्ग्रेसचे अध्यक्ष श्री. सुनील शर्मा यानी आम्हाला त्यान्च्या घरी नेउन सामोसे लाडू दिले,चहा दिला. आमचे होईपर्यन्त बस थाम्बुन राहिली होती,पुढार्याचा प्रभाव.
साडेबारा वाजता कालीबावडी येथे श्रीराम मन्दिरात पोहोचलो. मन्दीर सुन्दर आहे,मुर्ती मनोहर आहेत. पण मन्दीर बन्द होते तिथे काहीच सोय नाही.पण मन्दिरासमोरच गोस्वामी किराणा आणि मेडिकल स्टोअर आहे.तेथील माताजी सर्व परिक्रमावासीना सदाव्रत देतात.त्यानी खिचडीचे सदाव्रत दिले. ते घेऊन कालीबावडीचे सरपन्च श्री. हन्सराज चौहान यान्च्या घरी गेलो.भागवत गेल्यावर्षी त्यान्च्या कडेच गेले होते. सरपन्च घरी नव्हते पण त्यान्च्या बहिणीने खिचडी करुन दिली.भोजन प्रसाद घेउन पुढे निघालो.सरपन्चान्च्या घरी श्री. रामेश्वर चौहान भेटले.
दुपारचे दोन वाजले होते.उन मी मी म्हणत होते,पाय ओढत चालत होतो. थोड्याच वेळात तीन मोटर सायकल मिळाल्या विद्याताई,लिलाताई आणि गोसावी गेले.आणखी एक मोटारसायकल मिळाली तिच्यावरुन भागवत बडीछितरी पर्यन्त गेले.आम्ही दोघे,माढेकरकाका चालत होतो. बियाबानी दर्गा नन्तर बडीछितरी आले. दाट चिन्चेची झाडे गार सावली देत होती.भागवत तिथे आमची वाट बघत होते. नन्तर आणखी तीनएक कि.मि. चालुन मतलबपुरा येथे श्री.दिनेश सोळन्की या शिक्षकाकडे उतरलो.
मतलबपुरा गाव मान्डवगडाच्या पायथ्याशी आहे.इकडील गावान्मध्ये एक आजार पसरलेला आहे.येथील पाण्यात फ्लोराईडचे प्रमाण खुपच जास्त आहे,ते पाणी बरीच वर्षे प्यायल्यामुळे येथील माणसाना ऑस्टिओपोरोसिस सारखा आजार जडला आहे. त्यान्चे दात पिवळे ,वाकडेतिकडे,किडलेले झाले आहेत,सन्धिवाताने हाडे ठिसूळ झाली आहेत. आता सरकार तर्फे उपाय योजना चालु आहेत.सुनील चौहान हा मुलगा तिथे आरोग्यसेवकाचे काम करतो.सेवाभावी गरीब मुलगा आहे. दिनेश सोळन्की सुद्धा फार सज्जन आहेत. आधी चहा नन्तर रात्री पोळी-भाजीचे भोजन मिळाले.आता विश्रान्ती.उद्या मान्डू.
सकाळी साडेआठच्या बसने मान्डूसाठी निघालो. वाटेत हनुमानमन्दिरात दर्शन घेतले.मान्डूचा रस्ता नुसता दगडधोन्ड्यान्चा होता.एवढे मोठे आन्तरराष्ट्रीय किर्तीचे पर्यटन स्थळ आहे पण रस्ता असा.पन्धरा मिनिटान्च्या प्रवासाला एक तास लागला. हाडे खिळखिळी होणे म्हणजे काय ते पुरेपुर समजले.दहा वाजता मान्डूला पोहोचलो. नास्ता करुन श्रीराम मन्दिराच्या भक्तनिवासात आलो. खोली घेतली. भागवत आणि मन्डळी मान्डूला मुक्काम करणार नव्हती ,रेवा कुन्डाला उजवी घालुन ते आजच महेश्वरला जाणार होते त्यामुळे त्यानी कॉमन हॉलमध्येच आसन लावले.इथुन पुढे परत आम्ही दोघेच.
मान्डू म्हणजेच मान्डवगड.राणी रुपमती आणि बाजबहाद्दुर यान्ची प्रेम कहाणी येथेच घडली असे सान्गतात. राणी रुपमती नर्मदामैय्याची भक्त होती,फक्त नर्मदाजलानेच स्नान करत असे तिच्या भक्तीनेच मैय्या येथे कुन्डात प्रकट झाली,तेच रेवाकुन्ड.परिक्रमेत नर्मदेचा छोटासा प्रवाहही ओलान्डायचा नसतो म्हणून परिक्रमाकरताना मान्डूला यावे लागते.
मान्डूमध्ये बर्याच अॅतिहासिक इमारती आहेत. बाजबहाद्दूरचा महाल,हिन्दोला महाल,जहाज महाल,होशन्गशहाचा मकबरा वगैरे. येथील दुरसन्चार यन्त्रणा फारच छान आहे,एको पॉइन्टवर काही वाक्य उच्चारले की त्याचा शेवटचा शब्द काही कि.मि. दुर असलेल्या मनोर्यात घुमतो,तिथे त्या पुढचे वाक्य उच्चारले की तिथुन पुढच्या मनोर्यात.या प्रमाणे सन्देश वहन होत असे. नीलकन्ठ मन्दिरातील बान्धकाम काश्मीर-श्रीनगर येथील चष्मेशाही उद्याना प्रमाणे आहे. येथे अकबर बादशहा राहिले होते असे म्हणतात. मान्डूमध्ये गोरख चिन्चेची खुप झाडे आहेत.प्रचन्ड आकाराची ही झाडे आहेत.या झाडाला ७० वर्षानन्तर फळे येतात.पपईच्या एवढे हे फळ असते,यातील गर वाळवुन ठेवतात, हा खाल्यावर बराचवेळ तहान लागत नाही.
मान्डूतील सर्वात महत्त्वाचे स्थळ आहे श्रीराम मन्दीर.याची आख्यायिका अशी आहे.साधारणपणे तीनशे-साडेतीनशे वर्षान्पुर्वी पुण्याच्या रघुनाथस्वामी नावाच्या सन्त महात्माना स्वप्नात द्रुष्टान्त झाला आणि मान्डवगडावर तळघरात आम्ही बन्द असुन लोकहितार्थ प्रकट होणे आहे असे श्रीरामानी सान्गितले.रघुनाथ स्वामी मान्डवगडावर आले,पण त्यावेळी तिथे दाट जन्गल माजलेले होते,एकट्याने शोध घेणे शक्य नव्हते,म्हणुन स्वामी धारच्या राणीसाहेब सकुबाई पवार याना जाउन भेटले आणि त्याना स्वप्नाची गोष्ट सान्गितली.राणीसाहेब त्यान्च्याबरोबर आवश्यक सामान आणि माणसे घेउन गडावर आल्या. जन्गल साफ करणे खोदकाम करुन मुर्तीन्चा शोध सुरु झाला,पण मुर्ती सापडत नव्हत्या. पुन्हा स्वामीना द्रुष्टान्त झाला गडाच्या इशान्य कोपर्यात एक टेकडी आहे तिच्यावर एक वडाचे झाड आहे आणि भैरवाचे ठाणे आहे.तिथे खोदकाम करावे,पायर्या दिसतील आणि तेवत असलेल्या दिव्याचा प्रकाशही दिसेल.उतरुन खाली जा,तिथेच आम्ही आहोत.द्रुष्टान्ता प्रमाणे खोदकाम केले,तळघरात एका चौथर्यावर चतुर्भुज श्रीराम,लक्ष्मण,सीता,गरुड,सुर्य,जैनान्चे भगवान आदिनाथ अशा मुर्तीन्चे दर्शन झाले,दीपकही शान्त प्रकाश देत तेवत होता.भगवन्ताचा किती मोठा चमत्कार.
सन्गमरवरी पाषाणाच्या साधारण चार फुट उन्चीच्या सुन्दर मुर्ती आहेत.चतुर्भुज श्रीराम कुठे बघायला मिळत नाहीत,हे एकच स्थान आहे. मुर्तीन्च्या पायाजवळ शके९०१ असे लिहिलेले आहे. म्हणजे या मुर्ती अकराशे वर्षापुर्वीच्या आहेत. भारतावर मुसल्मानी आक्रमण झाल्यावर अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणापासुन वाचवण्यासाठी मुर्ती तळघरात लपवल्या असाव्या. नन्तर राजवटी बदलत गेल्या ,वसाहती उठल्या,जन्गल वाढले आणि सर्वच विस्मरणात गेले असावे. पण आपले सर्वान्चे मोठे भाग्य म्हणुन तीनशे-साडेतीनशे वर्षान्पुर्वी स्वामीना द्रुष्टान्त देउन भगवन्त प्रकट झाले.
धारच्या राणीसाहेबानी भव्य मन्दीर बान्धले आहे.आदिनाथ भगवानही जैन मन्दिरात स्थानापन्न आहेत.भागवत आणि मन्डळीन्बरोबर लगेच पुढे गेलो असतो तर हे काहीच बघता आले नसते.मन्दिराच्या आवारात ते तळघरही बघता येते.उद्या पुढे.क्रमशः
प्रतिक्रिया
15 Jul 2012 - 6:07 pm | मुक्त विहारि
छान लिहित आहात.
16 Jul 2012 - 12:59 pm | पप्पुपेजर
वाचतो आहे
19 Jul 2012 - 7:30 pm | सुजित पवार
नविन भाग आला नाहि आजुन? वाट पाह्तोय :)
19 Jul 2012 - 7:37 pm | पैसा
खरंच की. ४//५ दिवस झाले. पुढे?
20 Jul 2012 - 9:21 am | मूकवाचक
+१