"जग म्हणजे तुमचा शिंपला आहे! प्रयत्न कराल तर तुम्हाला हवे तसे मोती तुम्ही त्यातून काढू शकाल."
शाळेच्या दीक्षान्त समारंभाच्या वेळी आमच्या मुख्याध्यापिका हे वाक्य म्हणाल्या, असं की जणू काही हे शेक्सपियरचं नव्हे, त्यांचं स्वत:चं वाक्य होतं. तिथे बसून ते ऐकतांना मला त्यांची कीव वाटली.
पण आजकाल मला त्यांची कीव नाही येत, माझी स्वत:ची येते, माझं जग माझा शिंपला नाही झालं. आयुष्य खेकड्यासारखं झालंय, थोडं चुकीच्या दिशेने पकडलं की चावतंय, आणि मग खूप ठणकून दुखतं.
ते दीक्षान्त समारंभाचं भाषण वर्षापूर्वी झालं. म्हणूनच मला आज त्याची आठवण आली असावी, आपण आहोत तिथेच अडकलो आहोत, या भावनेने निराश व्हायला झालं. म्हणजे असं बघा, मी गेल्या वर्षी मी कॉलेजमध्ये जायचा खरं तर, आणि मिळालाही प्रवेश मला एका बर्यापैकी इंजिनीअरींग कॉलेजात. पण त्या शिंपलेवाल्या समुद्राच्या, जागतिक संधीच्या शोधात असलेला मी, मला ते एव्हढंसं कॉलेज हवी तशी संधी मिळवून देईल याची खात्री नव्हती. आणि जे आवडत नाही तेच करत राहण्याची मनाची तयारी नव्हती. म्हणूनच कदाचित, मी जुलैमध्ये प्रवेशाच्या दिवशी पोहोचलो तेंव्हा मला आधी पार्किंग मिळेना, मिळालं तेंव्हा योग्य तो वर्ग सापडेना आणि जी धडपणे मार्गदर्शन करेल अशी एकही हसरी व्यक्ती दिसेना, तेंव्हा मी त्याला दैवी कौल समजलो आणि आधिक प्रयत्न न करता सरळ घरी आलो. 'कॉलेज माझ्यासाठी नाही', असं आईला सांगितलं.
'अरे कॉलेजला तर जायलाच हवं तुला,' आई म्हणाली, 'डिग्री नसली तर नोकरी कुठून मिळणार तुला?'
'मिळवीन डिग्री नंतर कधीतरी, हा काही कायमचा निर्णय नाहीये माझा, पण आज तरी मला शिकायचं नाहीये पुढे' , मी म्हणालो .
वडील काही बोलले नाही, जे आधिक धोकादायक होतं, त्यांनी फक्त मान हलवली, हळूहळू, इकडून तिकडे. मग त्यांनी त्यांच्या मित्राला, स्टॅन नावाच्या मित्राला फोन केला, 'जरा मदत हवी आहे, भेटायला येऊ का?' म्हणून विचारलं.
पुढच्या शनिवारी आम्ही दोघे स्टॅनला भेटायला जेवणाच्या वेळी पोहोचलो , त्याने लांबूनच आम्हाला बार्बेक्यू पिट पाशी बोलावलं. त्या दिशेने चालत असतांना हळू आवाजात वडील मला म्हणाले, 'तू नोकरी करणार नसशील तर घरात रहायचं नाही, समजलं?'
संपूर्ण जेवणभर वडील आणि स्टॅन आळशी लोकांमुळे जग कसं झपाट्याने खड्ड्यात चाललंय याची चर्चा करीत होते. त्याची शेवटची नळी चोखून झाल्यावर स्टॅनने मला त्याचं बिझिनेस कार्ड दिलं, किलर व्हेलचं चित्र आणि मायामी अॅक्वेरियमचं नाव असलेलं, आणि म्हणाला, 'तुला घेतलंय नोकरीवर, सोमवारी सकाळी ये आठ वाजता, मुख्य प्रवेशद्वारापाशी.'
.......................
आता मी मायामी अॅक्वेरियमच्या प्रवेशद्वाराशी येणार्या व्यक्तींची तिकीटं तपासून पाहतो , हातातल्या दांडक्याने बार कोड ओळखला, की त्याचे दिवे लागतात, आणि डॉल्फिन ओरडल्यासारखा कर्कश्श आवाज येतो.
कॉलेज परवडलं असतं इतकं हे कंटाळवाणं आहे. कुणी तिकीट घेऊन आलेलं नसतं तेंव्हा मी एका जाळीदार पिंजरेवजा खुराड्यात बसतो, तुरुंगात असल्यासारखं वाटतं.
त्यातल्या त्यात किंचित दिलासा इतकाच की मधल्या सुटीत मला एखादा शो पाहायला मिळतो काही मिनिटे. एक प्रचंड देवमासा आहे, नाचणारा. नाहीतर डॉल्फिन्सचा एक थवा, जो पाण्यातून हवेत उड्या मारत बॉल पकडत असतो. विषारी शेपूट छाटलेले स्टिंग रे मासे, त्यांना हात लावून पाहता येतं. आणि मग अर्थातच तो सी लायन्स चा मोठा शो, तोही पहातो कधी वेळ मिळाला तर. हे सारे समुद्री प्राणी पाहणं चकित करतं मला, तेवढाच विरंगुळा.
------------------------
पण केवळ ते वर्षापूर्वीचं मुख्याध्यापिका बाईंचं "जग म्हणजे तुमचा शिंपला आहे..." विधान आठवलं म्हणून मी नाराज नव्हतो आज, मला निराशा यायला कारणीभूत होती महिन्याभरापूर्वीची घटना -
एक दिवशी अचानक प्रवेशद्वाराशी प्राणीमित्र आंदोलकांचा एक घोळका येऊन घोषणा द्यायला लागला, "फर्डिनांडला मुक्त करा!" ...फर्डिनांड आमच्या अॅक्वेरियमचं खास आकर्षण असलेला सी लायन. त्यांच्या हातातल्या फलकांवरही चित्रं होती साखळदंडांनी बांधलेल्या डॉल्फिन माश्यांची आणि बाथ टब मधल्या किलर देवमाश्यांची. मी माझा पिंजरा सोडून बाहेर आलो त्यांना पाहायला, टी व्ही स्टेशन्सची लोकंही आली होती केंमेरे घेऊन.
'गुलाम प्राण्यांच्या मालका, तळं मोकळं कर!!" एक आंदोलक त्वेषाने ओरडली, मला एकदम माझी मुख्याध्यापिका आठवली तिला पाहून.
"अहो मी मालक वगैरे नाहीये हो!" मी गडबडून म्हणालो, "मी तर फक्त तिकिटं तपासतो."
"मग तू त्यांचाच साथीदार, सोड नोकरी, दूर हो या पापातून!"
पण मग अशाच थोडा वेळ घोषणा दिल्यावर मायामीच्या कडक उन्हात ती मंडळी कंटाळली, बाहेरगावची असावी, हळूहळू त्यांचा जोश थंडावला, आणि एक एक करून सर्वांनी पाय काढता घेतला. पण त्या घटनेने मला विचार करायला प्रवृत्त केलं, ते बरोबरच होते, हे बंदिस्त प्राणी नक्कीच तिरस्कार करीत असणार त्यांच्या इथल्या अस्तित्वाचा. इथले सगळे कर्मचारी तर नक्कीच इथल्या कामाचा तिरस्कार करीत असणार, आणि प्राणी तर त्याहून कितीतरी आधिक काम करत असत, पोटासाठी. मला खरोखर संताप यायला लागला इथल्या आयुष्याचा.
-----------------
मग एक दिवशी सकाळी माझ्या कामाला जाण्याच्या की बिस्केनच्या समुद्रावरच्या पुलावर मी माझी गाडी बाजूला घेऊन पार्क केली. उन्हाने सकाळच्या झळा तापत आलेल्या होत्या, त्यांत मायामी शहर समुद्रातून बाहेर आलेल्या पौराणिक अॅटलांटिक नगरीसारखं दिसत होतं.
आणि इमारतींकडे पाहतांना अचानक मला एक काळा त्रिकोण दिसला समुद्रात, डॉल्फिनची शेपटी! लगेचच दुसरा डॉल्फिन, तिसरा, मग मला त्यांचा थवाच दिसला, वेगाने पाण्यात विहार करतांना, मी आश्चर्यचकित होऊन पाहताच राहिलो. या डॉल्फिन्सच्या तुकतुकीत त्वचेचा रंग काळा कुळकुळीत होता, आमच्या संग्रहालयातल्या तळ्यातल्या डॉल्फिन्स सारखा मातकट नव्हता. ते झुंडीने पोहत होते, खेळत होते, चीत्कार करीत होते, किती आनंदी दिसत होते ते, आणि मला एकदम लक्षात आलं, त्यांना कुणी माश्यांचे तुकडे फेकत नव्हतं, तरीही ते उड्या मारीत होते. मी खूप वेळ ते दृश्य पहात राहिलो, इतका उशीर झाला कामावर पोहोचायला की बॉस काही बोलला नाही तरी संतापून पाहत होता माझ्याकडे, पण त्याचं ते कुत्सित पणे पाहणं परवडलं इतका आनंद मला ते मुक्त डॉल्फिन्स पाहून झाला होता.
------------------
मग मी त्या नंतरच्या दिवशी, आणि पुढच्या प्रत्येक दिवशी तिथे गाडी पार्क करून थांबत असे, डॉल्फिन्सना शोधत. काही दिवस ते मला नियमाने दिसले, मग आठवडाभर त्यांचं दर्शन झालं नाही. त्यांची वाट पाहता पाहता मला कामाला पोहोचायला अधिकाधिक उशीर होऊ लागला. आणि मग मला वाटतं एके दिवशी स्टॅनने वडिलांना फोन केला असावा, कारण त्यादिवशी मी असाच वाटेत पुलावर गाडीत नुकताच थांबलो असतांना गाडीच्या काचेवर टकटक झाली, वळून पाहतो तर वडील, माझी हवा टाईट! त्यांनी माझ्या मागावर राहून इथे गाठलं असणार मला.
त्यांनी नुसती हनुवटी हलवून मला गाडीबाहेर येण्याची खूण केली, आणि समुद्राच्या दिशेने चालू लागले. मी गाडीतून उतरून त्यांच्यामागे गेलो. समुद्राच्या कडेला कोरड्या सामुद्री शेवाळ्यावर पाय ठेवून आम्ही उभे राहिलो.
थोड्या वेळ कुणीच काही बोललं नाही. क्षणाक्षणाने, कणाकणाने उन वाढत गेलं, धुकं वितळत गेलं, तशी दूरवरची क्षितीजाची किनार रेखीव, स्पष्ट होत गेली.
"कशासाठी थांबलायस तू इथे?" वडील दूर वर पहात म्हणाले.
"डॉल्फिन्स ची वाट पहात होतो."
त्यांनी माझ्याकडे पाहिलं.
मग मी त्यांना सांगितलं, जग माझा शिंपला कसं नाहीये त्याविषयी, समुद्रात मोकळे डॉल्फिन्स दिसण्याविषयी, आणि मग ते दिसेनासे होण्याविषयी. आणि त्यांच्या दिसेनासे होण्याने मला होणार्या मनस्तापाविषयी.
वडील शांतपणे ऐकत होते.
मी त्यांना म्हणालो, "ते डॉल्फिन्स तिथेच आहेत हे जरी खात्रीने कळलं असतं ना, तरी मी सहनशीलपणे त्यांची वाट पहिली असती. ते दिसेपर्यंत. पण ते नाहीयेत तिथे. ते सोडून गेलेयत मला, याचं फार वाईट वाटतं."
पुन्हा समुद्राकडे पहात वडिलांनी विचारलं, "तुला जेंव्हा ते दिसत नाहीत, तेंव्हा ते कुठे असतात माहीतेय?"
काय उत्तर द्यावं ते ना कळून मी डोळे तिरके करून त्यांच्याकडे पाहिलं.
हनुवटी क्षितिजाकडे रोखून ते म्हणाले, "ते त्या तिकडे आहेत. दूरवर. मुक्त....."
आम्ही काही वेळ तसेच उभे राहिलो, पाण्याकडे पहात. काही मिनिटांनी वळून त्यांनी दोन्ही हातांनी माझे खांदे दाबले, किंचितसेच, पण आश्वस्त सामर्थ्याने. " तू त्यांची काळजी करावीस याची त्यांना गरज नाहीये. तू स्वत:ची काळजी घे."
ते मागे वळून आपल्या गाडीकडे गेले आणि घराच्या दिशेने रवाना झाले. मला एकदम माझ्या मनावरचं ओझं उतरल्यासारखं वाटलं. मिनिटाभरातच मीही गाडी काढून निघालो आणि माझ्या कामाच्या ठिकाणी पोहोचलो.
...............
हे दोन आठवड्यांपूर्वी घडलं, आणि मी त्यानंतर एकदाही कामावर उशीरा पोहोचलो नाहीये. हल्ली मी बराच आधी निघतो घरून, समुद्रावरच्या पुलावर थांबावंसं वाटलंच तर वेळ असावा म्हणून.
आताशा मला जर कधी डॉल्फिन्स दिसलेच तर मला आनंद होतो. नाही दिसले तर आधिक आनंद होतो, कारण त्याचा अर्थ ते समुद्र किनार्यापासून खूप खोलवर आत असणार, एखाद्या मोठ्या बाथटब पासून लांब, आणि शीतपेटीत साठवून ठेवलेल्या माश्यांच्या तुकड्यांपासून लांब. नुसतं हे जाणूनच मला माझ्या जाळीदार पिंजर्यात बसणं सुसह्य होतं. मी कामाची गरज असेल तेंव्हा माझा बारकोड ओळखणारा दिवेवाला दांडका वापरतो.
आणि इतर वेळी योजना करीत राहतो, माझ्या सुटकेची.
*************
*************
मूळ लेखक: जेरेमी ग्लेझर
Jeremy Glazer is a Miami native who lives and writes on Miami Beach. “The world is your oyster” is a story where he writes about that weird space between high school graduation and supposed adulthood. It’s set against the backdrop of Key Biscayne.
प्रतिक्रिया
8 Jun 2012 - 8:28 am | हर्षद खुस्पे
खुप्च्चखुप्च्चखप्च्चक
8 Jun 2012 - 8:44 am | प्रचेतस
उत्कृष्ठ भावानुवाद.
8 Jun 2012 - 9:51 am | अविनाशकुलकर्णी
आवडले.
8 Jun 2012 - 10:05 am | ५० फक्त
मस्त आहे खुप, धन्यवाद.
8 Jun 2012 - 10:44 am | अमितसांगली
अप्रतिम....
8 Jun 2012 - 12:29 pm | Maharani
खुपच छान!आवडले...
8 Jun 2012 - 12:40 pm | नितिन थत्ते
आवडले.
8 Jun 2012 - 1:14 pm | स्पंदना
मला या कथेतले वडिल आवडले. बराच संयम आणि जो दाखवायचा तो कडकपणा दोन्हीही अगदी जिथल्या तिथे . फोर्स कर्न ना त्यांनी मुलाला कॉल्जात ढकलल, अन ना ही बसुन फुकटच खायला घातल.
धन्स बहुगुणी.
8 Jun 2012 - 7:32 pm | पैसा
सगळीकडे तापलेल्या वातावरणात वार्याची झुळूक यावी तसा हा भावानुवाद! खूप आवडला!
8 Jun 2012 - 7:52 pm | इनिगोय
:( +१११
8 Jun 2012 - 7:51 pm | रेवती
अनुवाद आवडला.
8 Jun 2012 - 10:18 pm | jaypal
खुप आवडल. अजुन काही असच द्या ना वाचायला. खरोखरीच आवडेल मला.
8 Jun 2012 - 10:22 pm | जाई.
छान अनुवाद
9 Jun 2012 - 10:01 am | मदनबाण
अनुवाद भावला ! :)
9 Jun 2012 - 10:07 am | कवितानागेश
आवडले. :)
9 Jun 2012 - 11:52 am | अर्धवटराव
पण कथा काहि व्यवस्थीत कळाली नाहि :(
अर्धवटराव
9 Jun 2012 - 5:28 pm | दादा कोंडके
अनुवाद आवडला.
12 Jun 2012 - 1:44 am | जानकी
हृदयस्पर्शी लिखाण. असे वाचनीय धागे भाऊगर्दीत हरवून जातात...:-(