'सिंहासन' मी दहावीच्या बोर्डाची परीक्षा चालू असताना पहिल्यांदा पाहिलाय !
विजय तेंडुलकर गेले आणि 'सिंहासन' आठवला. “....तर नव्या मुख्यमंत्र्याला सचिवालयासमोर मी जोड्यानं मारीन !” हे म्हणणारा डिकास्टा आठवला !!
पाठोपाठ आठवायला लागले -- 'तें'च्या क्लासिक्समधले प्रसंग. सामना, सिंहासन, अर्धसत्यमधले प्रसंग !! घाशीराम कोतवालमधले प्रसंग !!!
खरंतर सामना,सिंहासन पहिल्यांदा झळकले तेव्हा मी खूप लहान होतो. 'घाशीराम...' पहिल्यांदा रंगमंचावर आले तेव्हा तर दोनेक वर्षांचाच होतो. आठवी-नववीत असताना ह्या कलाकृतींबद्दल इतकं ऐकलं होतं की कधी एकदा त्या पाहतो असं झालं होतं.
साधारण पंचाऐंशी / शहाऐंशीच्या सुमारास, शुक्रवारी रात्री उशीरा, दूरदर्शनवर अचानक 'सामना' बघायला मिळाला. त्या दिवसापासून “ह्या टोपीखाली दडलंय काय…” आणि "सख्या रे! घायाळ मी हरिणी" ही गाणी मनात जागा करून राहिलीयत. डॉ. श्रीराम लागू आणि निळू फुले ह्यांच्या जुगलबंदीबद्दल काय बोलायचं? आणि काय बोलायचं, “कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे…"बद्दल !!! भास्कर चंदावरकर म्हणजे अप्रतिम संगीत हे समीकरणही मनात तेव्हाच रजिस्टर झालं. (पुढे 'थोडासा रूमानी हो जाऍं' आणि 'घाशीराम कोतवाल' पाहिल्यानंतर ते समीकरण एकदम पक्कं झालं)
त्यामानाने 'घाशीराम कोतवाल' खूप उशीरा पहायला मिळालं. आत्ता चार-पाच वर्षांपूर्वी कधीतरी डीव्हीडी मिळाली. दीपा भारतात गेली होती त्यामुळे घरी एकटाच होतो. एका वीकांतला शांतपणे 'घाशीराम ...' पहायला बसलो. नाटक असं असतं? नाटक असंही असतं?? असू शकतं??? 'घाशीराम...' म्हणजे एक खर्या अर्थाने 'हटके' अनुभव होता. तरी आमची पिढी दुर्दैवी कारण आम्हाला डॉ. मोहन आगाशेंचा नाना फडणवीस बघता आला नाही.
मगाशी म्हणल्याप्रमाणे 'सिंहासन' दहावीची परीक्षा चालू असताना पाहिलाय. मोठा झाल्यावर सिंहासनची व्हिडीयो कॅसेट घेतली पण मी दहावीत असताना आजच्याइतक्या सर्रास डीव्हीडी किंवा व्हिडीयो कॅसेट मिळायच्या नाहीत. रविवारी दुपारी टीव्हीवर 'सिंहासन' होता. अनायसे सोमवारी रंगपंचमीमुळे पेपर नव्हता आणि मंगळवारी हिंदीचा(च) पेपर होता. त्यामुळे बिनधास्तपणे 'सिंहासन' पाहिला. (गणित किंवा जीव-भौतिक-रसायनपैकी एखादा त्रस्त समंध असता तर 'सिंहासन' डळमळलं असतं! तिथे तर हमखास 'ईशान अवस्थी' व्हायचा !! प्रश्न दिसायचे पण समजायचे नाहीत !!!)
'सिंहासन'चा विचार करताना आधी अरूण साधूंचा विचार करावाच लागतो. त्यांच्या 'मुंबई दिनांक' आणि 'सिंहासन' ह्या दोन कादंबऱ्यांततील निवडक प्रसंगांवर आधारित -- सिंहासन ! मराठी सिनेमांत मग 'वजीर', 'सरकारनामा' असे राजकीय पार्श्वभूमीचे चित्रपट आले पण 'सिंहासन'ची सर कुणालाच नव्हती. (जशी हिंदीत 'शोले'ची सर सुभाष घईंच्या 'कर्मा'ला नव्हती !)
सिंहासन, शोले आणि गॉडफादर ह्या सिनेमांत पुन्हा-पुन्हा बघण्यासारखं काय आहे ह्याचं उत्तर देता येत नाही. तुम्ही एकतर ह्या मूव्हीज परत-परत बघता किंवा तो प्रश्न विचारता. ज्या दिवशी तुमचं तुम्हाला सापडतं की परत परत बघण्यासारखं काय आहे, त्यादिवशी तुमचा प्रश्न बंद होतो.
एकतर सिंहासनमधे खूप पात्रं आहेत. त्यात सिनेमा इतका वेगवान आहे की पहिल्यांदा बघताना थोडा त्रयस्थपणे बघताच येत नाही. म्हणजे असं समजा की तुम्ही, एकामागोमाग एक चाली रचून चाललेला, बुद्धिबळाचा डाव बघताय. तुमच्याही नकळत तुम्ही त्यात ओढले जाता. त्रयस्थपणे चाली समजून घेऊन त्यांचं विश्लेषण करणं जमत नाही. सिंहासन बघताना एक्झॅक्टली असंच होतं. तुम्हाला काय वाटतं? …… द्या टाळी !
सिनेमात महत्वाची पात्रं चार – शिंदे, दाभाडे, डिकास्टा आणि दिगू टिपणीस. असं ऐकलं होतं की डिकास्टा हे कॅरॅक्टर त्याकाळचे 'संपसम्राट' जॉर्ज फर्नांडिस ह्यांच्यावर बेतलेलं होतं.
सिनेमाच्या सुरूवातीला मुख्यमंत्री जिवाजीराव शिंदे ह्यांना एक निनावी फोन येतो … त्यांच्याविरूद्ध कट शिजतोय असं सांगणारा !! त्यानंतर डोक्यात ठोके पडल्यागत पार्श्वसंगीत सुरू होतं आणि मग सुरू होतं -- मुख्यमंत्री शिंदे, अर्थमंत्री विश्वासराव दाभाडे, कामगार लीडर डिकास्टा, स्मगलर्स आणि पर्यायाने इतर सगळ्यांचंच…एकमेकांवर कुरघोडी करू पाहणारं राजकारण -- सिंहासन! ह्या सगळ्याचा साक्षीदार म्हणजे पत्रकार दिगू टिपणीस ! जसजसा सिनेमा पुढे सरकतो तसतसे आपणही त्या दिगूसारखेच एका गर्तेत ओढले जातोय असं वाटतं !!
त्यात सुरेश भटांच्या हादरवणार्या ओळी
आम्ही चार किरणांचीही आस का धरावी?
जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी?
कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली !
अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली !!!
ब्लॅक एँड व्हाईट सिनेमाची एक वेगळीच जादू असते. जब्बार पटेलनं दिग्दर्शक म्हणून नुसती धमाल उडवून दिलीय ! त्यात अभिनयाच्या बाजूचे दिग्गज -- निळू फुले (दिगू टिपणीस), अरूण सरनाईक (मुख्यमंत्री जिवाजीराव शिंदे), डॉ. श्रीराम लागू (अर्थमंत्री अप्पासाहेब तथा विश्वासराव दाभाडे), दत्ता भट (शेतकीमंत्री माणिकराव पाटील), सतीष दुभाषी (कामगार पुढारी डिकास्टा), मधुकर तोरडमल (दत्ताजी), श्रीकांत मोघे (आनंदराव), माधव वाटवे (विधानसभेचे सभापती नाना गुप्ते), डॉ. मोहन आगाशे (बुधाजीराव), लालन सारंग (मिसेस. चंद्रापुरे) !!! जोडीला तेव्हाचे नवखे पण नंतरचे दिग्गज नाना पाटेकर (स्मगलर शेठचा हस्तक), रिमा लागू (अर्थमंत्र्यांची सून) !! अगदी न्हाव्याच्या छोट्या भूमिकेत राजा मयेकरांनीही बहार आणलीय !! सिंहासनमधे 'पानिटकर' साकारणार्या जयराम हर्डीकरचा अकाली मृत्यू झाला नसता तर ….!
खरंतर सिंहासन हा समान आवडीचे मित्र / मैत्रिणी जमवून एकत्र बघावा असा प्रकार आहे पण 'दुधाची तहान ताकावर...' म्हणून इथे काही निवडक संवाद दिल्याशिवाय राहवत नाहीये. तुम्हालाही जाणवेल की सत्तरचं दशक संपत असताना सिंहासन आला पण दुर्दैवाने सगळे डायलॉग्स जणू काही आजच्या परिस्थितीसाठी लिहिले आहेत !!!
-------------
रावसाहेब टोपले: (फोनवर बोलताना) शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होतंय …इंडस्ट्रीवल्यांना झुकतं माप मिळतंय…सेझचा प्रश्न आहे…आता काय पाईंट आहे? … स्थैर्य पायजे....
-------------
विश्वासराव दाभाडे: मुख्यमंत्र्यांच्याविषयी तुझं काय मत आहे?
डिकास्टा: डॅंबिस माणूस आहे ... पण माझं तुमच्याबद्दलही तेच मत आहे !
o डावं-उजवं करणं अवघड आहे …तुम्ही दोघंही सारखेच डॅंबिस आहात
o काही मागण्या कागदावर लिहिता येत नाहीत. पण म्हणून जर का त्या पूर्ण झाल्या नाहीत ....तर नव्या मुख्यमंत्र्याला सचिवालयासमोर मी जोड्यानं मारीन.
-------------
(उस्मानच्या घरी जेवताना पार्श्वसंगीतात गझल चालू आहे)
विश्वासराव दाभाडे: (टेपरेकॉर्डरकडे इशारा करून) हे मेहंदी हसन का?
उस्मान: नाही, गुलाम अली.
विश्वासराव दाभाडे: हां .. तेच ते (आवाज आणि नजरेत एक सहज बेफिकिरपणा)
-------------
मुख्यमंत्री जिवाजीराव शिंदे: कुठल्याही परिस्थितीत मला औद्योगिक बाजूला शांतता हवीय. नाईलाजाने मला तुला उचलावं लागेल.
डिकास्टा: आरोप कुठला ठेवणार?
मुख्यमंत्री जिवाजीराव शिंदे: तुझ्या सार्वजनिक जीवनात काहीही सापडेल. माणूस चोवीस तास डोळ्यात तेल घालून जगत नाही.
-------------
पक्षाध्यक्ष: च्यामायला ….. पक्षाध्यक्ष म्हणजे शेरडीच्या शेपटासारखं ! माश्या धड मारता येत नाहीत, अब्रू धड झाकता येत नाही !!
-------------
मुख्यमंत्री जिवाजीराव शिंदे: (कमालीच्या दांभिकपणे) राजकारण हे असं असणार माहिती असतं तर इथवर आलोच नसतो. देवाच्या आळंदीला निघालो आणि पोचलो चोराच्या आळंदीला !
-------------
शेवटी हा लेख पूर्ण करण्याआधी एकच संवाद जो एक चिरंतन सत्य सांगतो.
न्हावी: ह्या वेळी दाभाडे नक्की मुख्यमंत्री होणार.
दिगू टिपणीस: शिंदे आले काय आणि दाभाडे आले काय …तुमच्या आयुष्यात काय फरक पडतो?
------------------------------------
http://www.atakmatak.blogspot.com
------------------------------------
प्रतिक्रिया
20 Jun 2008 - 9:41 am | II राजे II (not verified)
जबरा....
>>शिंदे आले काय आणि दाभाडे आले काय …तुमच्या आयुष्यात काय फरक पडतो?
क्या बात है.... अजून मी हा चित्रपट पाहीला नाही पण आता डीव्हीडी मिळते का पाहतो कोणाकडे ;)
छान माहीती दिलीत ...
धन्यवाद.
राज जैन
माणसाने जगावे कसे .... स्कॉच सारखे .. एकदम आहिस्ता!!! ....एकदम देशी प्रमाणे चढून उतरण्यात काय मजा :?
20 Jun 2008 - 9:48 am | भडकमकर मास्तर
उत्तम परीक्षण...
दोन मोठ्या कादंबर्यांपासून असा स्क्रीनप्ले बनवणे अवघड काम आहे...
अजूनही सिंहासन कादंबरी वाचताना हे जाणवते....
.... मराठीतला पहिला संपूर्ण पोलिटिकल थ्रिलर म्हणतात या सिनेमाला, असे जब्बार पटेल यांनी उद्गार काढले होते ...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
20 Jun 2008 - 9:52 am | ऋचा
सिंहासन!
खरोखर उत्कॄष्ठ कलाकृती.
अप्रतिम संवाद,अभिनय,संगीत...
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
20 Jun 2008 - 9:55 am | सहज
सिंहासन सिनेमा मराठी सिनेमातील टॉप ३ मधील नक्की असावा.
वाईट ह्याचे वाटते की इतकी वर्षे झाली तरी त्या सिनेमात व आजच्या वास्तवात काही फारसा फरक वाटत नाही. :-(
20 Jun 2008 - 10:02 am | भाग्यश्री
मी तु उल्लेखलेला एकही चित्रपट पाहीला नाही.. घाशीराम परवाच डाउनलोड केले, तेंडूलकर गेले तेव्हा.. फार गाजलं म्हणून.. पण अजुन नीट बसून पाहीले नाही.. आता पहावसं वाटतय..
सिंहासन इथे सापडला.. आता अवश्य बघीन!
http://youtube.com/watch?v=TmVlfb0khIQ
20 Jun 2008 - 10:08 am | गिरिजा
मस्तच लिहिलय..
आणि..
सहमत.. :(
--
गिरिजा..
लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग
-----------------------
20 Jun 2008 - 10:10 am | संदीप चित्रे
अरे वा ! लगेच लेख वाचून प्रतिक्रिया देण्यासाठी धन्स :)
20 Jun 2008 - 11:55 am | ऍडीजोशी (not verified)
यु ट्युब वर अख्खा सिनेमा उपलब्ध आहे. मी बघतोय :)
आपला,
ऍडी जोशी
ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/
20 Jun 2008 - 11:58 am | सुमीत भातखंडे
चित्रपट होता.
मराठी नट्य क्षेत्रातील सगळी दिग्गज मंडळी यात होती.
डॉ. लागू, अरूण सरनाईक, सतीश दुभाशी, निळूभाऊ फूले, दत्ता भट सगळेच अफलातून.
अरूण साधून्ची "मुम्बई दिनांक" ही कादंबरीही तितकीच आवडली.
वाईट ह्याचे वाटते की इतकी वर्षे झाली तरी त्या सिनेमात व आजच्या वास्तवात काही फारसा फरक वाटत नाही.
हे मात्र खरं.
20 Jun 2008 - 1:23 pm | नितीनमहाजन
त्यावरून आठवते ते त्याचे पोस्टर. सिंहासनाची प्रतिकत्मक खुर्ची, त्याचा एक पाय मोडलेला, त्याला त्याच मोड्लेल्या पायाने जोड दिलेला. सर्वच अप्रतीम, कथानकाशी एकदम परीणाम साधणारे. मला आठवते त्याप्रमाणे कमल शेडगे यांचे ते अतीशय परिणामकारक होते. एवढे चांगले पोस्टर आजही क्वचितच पहायला मिळते.
20 Jun 2008 - 6:02 pm | संदीप चित्रे
काल चुकून तुम्हाल धन्स सांगायचे राहून गेले .. राग नसावा :)
20 Jun 2008 - 6:07 pm | संदीप चित्रे
नितीन ...
सिंहासनच्या पोस्टरची कॉपी कुठल्या वेबसाईटवर आहे का?
-----
ऍडी --
मीही नुकताच यू ट्युबवर पाहिला आणि जुन्या आठवणी जाग्या होऊन लेख लिहिला :)
------
सुमीत -- अभिनयातले सगळेच खरे दिग्गज होते :)
20 Jun 2008 - 6:41 pm | डॉ.प्रसाद दाढे
अप्रतिम चित्रपट! मला डिकास्टा दत्ता साम॑त वाटायचा.. रीमा किती तरूण (व देखणी) दिसते. तिच्या नवर्याचे कामसुद्धा (बहुतेक शेखर नवरे) मस्त आहे. पोलीस आयुक्त हुजुरबाजारचे छोटेसे काम अरूण जोगळेकरा॑नी परफेक्ट केल॑य. मला फक्त एकच समजल॑ नाही.. ते फोन करून मुख्यम॑त्र्या॑ना सा॑गतात की त्या॑चा मुलगाच स्मगलि॑गमध्ये पकडला गेलाय.. ते पात्र (मुलाच॑) सिनेमात आहे का?कोणी काम केल॑य? (मी मूळ काद॑बरी अजून वाचली नाहिये)
ह्या चित्रपटात मराठीतील बहुतेक सर्व बाप कलाकारा॑नी हाजरी लावली आहे त्यामुळे पुढच्या पिढीला (माझ्याही) जे कलाकार आज हयात नाहीत तेही पाहता येतात उदा. जयराम हर्डीकर, अरूण जोगळेकर, दत्ता भट, सतीश दुभाषी
20 Jun 2008 - 7:06 pm | झकासराव
चांगल लिहिल आहे.
हा चित्रपट पहायचा राहुनच गेलाय. :(
पण मी मुंबई दिनांक वाचली आहे.
डिव्हीडी मिळते का बघतो कारण हा चित्रपट पहायचाच्च्च्च्च्च्च्च्च्च्च आहे.
इथे लिहिलेले सगळेच डायलॉग जब्ब्ब्ब्ब्रदस्त आहेत. :)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
20 Jun 2008 - 8:19 pm | llपुण्याचे पेशवेll
मी सिंहासन आणि मुंबई दिनांक कादंबर्या वाचल्या आहेत तसेच हा सिनेमा देखील पाहीला आहे.
सिनेमामधे काही काही तपशील गाळलेले आहेत पण तरीदेखील चित्रपट उत्तम वाटला. विशेषतः संवाद. वेगवेगळ्या राजकारण्यांच्या लकबी. उत्तम.
माझा आवडते दृश्यः
(रावसाहेब टोपलेंवर हल्ला करून त्यांच्या तोंडाला काळे फासले असा फोन मुख्यमंत्र्याना येतो त्यानंतर)
विधानसभेत मुख्यमंत्री हळूच आनंदरावाना बोलवतात आणि कुजबूजतात.
मुख्यमंत्री: रावसाहेबांवर हल्ला झाला. काही गुंडानी तोंडाला काळे फासून धिंड काढली त्यांची. आंबेडकरांच्या घोषणा देत होते. वाईट झाले. चौकशी बसवायची का?
आनंदरावः नको सापडणार नाहीत ते.(त्यावेळे मोघेसाहेबांचे डोळे उरलेला अर्थ बोलून जातात)
पुण्याचे पेशवे
20 Jun 2008 - 11:05 pm | पिवळा डांबिस
मिठाचा खडा टाकल्याबद्द्ल!
पण "सिंहासन" आम्हाला तितका नाही आवडला....
नाही म्हणजे तो सिनेमा म्हणून ग्रेटच आहे, इथे चूक आमची आहे....
आम्ही "सिंहासन" कादंबरी आधी वाचली होती. त्याने अत्यंत प्रभावित झालो होतो. त्यामुळे मोठ्या आशेने सिनेमा बघायला गेलो, आणि त्यात "मुंबई दिनांक" ची भेसळ पाहून निराश झालो.
खरंतर सिंहासन आणि मुंबई दिनांक यांवर दोन स्वतंत्र सिनेमे काढावेत अशा दर्जाच्या या कादंबर्या आहेत. असे असतांना जब्बार पटेलांना ही भेसळ का कराविशी वाटली देव जाणे.
आजही सिंहासन पुस्तक आणि सिनेमा दोन्ही माझ्याकडे आहेत. आणि आजही सिनेमा बघतांना राहूनराहून असं वाटतं की यात मुंबई दिनांक (स्मगलिंगचं थीम) मिसळलं नसतं तर अधिक चांगलं झालं असतं.
अर्थात हेही खरंच की फक्त सिंहासनवरचा सिनेमा मग तितका चाललाही नसता कदाचित! त्याचा प्रेक्षकवर्ग कदाचित मर्यादित (वर्तमानपत्र वाचणारा, राजकारणात रस असलेला) राहिला असता...
असो, हे आपलं आमचं मत!:)
21 Jun 2008 - 12:02 am | संदीप चित्रे
पिवळा...
प्रत्येकाची आवड-निवड वेगळी असते आणि ती जोपासायलाच हवी :)
त्यामुळे सिंहासन न आवडणे समजू शकतो.
21 Jun 2008 - 1:17 am | चतुरंग
नीटसा आठवतही नाही आता. तेव्हा तो मला तितकासा समजला नव्हता. आता समजेल असं वाटतं
यू ट्यूबवर आहे त्यामुळे आता पुन्हा बघून मग काय वाटते ते तपासावे लागेल.
दोन्ही पुस्तके मात्र वाचायची राहून गेली.
चतुरंग
21 Jun 2008 - 7:00 am | विसोबा खेचर
धन्यवाद चित्रेसाहेब. 'सिंहसन'ची अगदी छान आठवण करून दिलीत.
मलाही हा शिणेमा खूप आवडला होता. आणि मुख्य म्हणजे त्यात अरूण सरनाईक या माझ्या अतिशय आवडत्या कलाकाराची मध्यवर्ती भूमिका होती.
एकंदरीत कधीही पाहावा असा सुंदर चित्रपट. डांबिसाने मांडलेला स्मगलिंगच्या भेसळीचा मुद्दा मात्र मला पटला...
आपला,
(मुख्यमंत्री) तात्या.
21 Jun 2008 - 7:46 am | मुक्तसुनीत
आणि मुख्य म्हणजे त्यात अरूण सरनाईक या माझ्या अतिशय आवडत्या कलाकाराची मध्यवर्ती भूमिका होती.
अहाहा... काय आठवण काढली राव तुम्ही. ऐसा उमदा नट होणे नाही ! हा माणूस गायचा तेव्हा देखील कसला हँडसम दिसायचा !)( तलवारकट मिशा शोभणारे एक रेअर उदाहरण ! )"एक लाजरा न् साजरा मुखडा चंद्रावाणी खुलला ग !" आठवतय् ?
या माणसाने म्हणे गिरीश कर्नाडलिखित "तुघलक्" केला होता ! भारतीय रंगभूमीवरच्या अलिकडच्या काळातल्या सर्वोत्कृष्ट भूमिकांपैकी एक अशी ती म्हणे समजली जाते. रंगभूमी त्याचा तुघलक पाहून लागू म्हणाले होते : हाय ! असा तुघलक मला नसता जमला !
21 Jun 2008 - 9:15 am | संदीप चित्रे
अरूण सरनाईकबद्दल एकदम सहमत !
सिंहासनमधे मुख्यमंत्र्यांच्या रोलचं बेअरिअंग कस्सलं मस्त पकडलंय !!
-------------
काय तात्या आणि .... 'चित्रेसाहेब' वगैरे का बॉ? 'अरे संदीप' एकदम बेष्ट ना !!! :)
21 Jun 2008 - 10:46 am | कौस्तुभ
मला देखिल हा चीत्रपट पहायचा होत, पण सीडी उपलब्ध , पण आता उपअलब्ध आहे.
खूप छान आहे सिनेमा, प्रत्येकाची भूमीका चोख आहे, सर्वच पात्रे भन्नाट कलावंत. अप्रतीम कास्टींग. कुठेही सिनेमा रेंगाळत नाही. डायलोग तर प्रश्णच नाही!
केवळ अप्रतीम!
21 Jun 2008 - 12:37 pm | विजुभाऊ
मध्यंतरी सरकारनामा असा एक मराठी चित्रपट आला होता. सिंहासन ची बरोबरी नसेल पण त्याची आठवण करुन दिली होती त्याने.
व्यवस्थीत कथाबांधणी असलेला कोणताही चित्रपट उत्कृष्ठ्च होतो.
यात मुंबई दिनांक (स्मगलिंगचं थीम) मिसळलं नसतं तर अधिक चांगलं झालं असतं.
...कदाचित चंदा रेलवाणी आणि इला मरकाळे ला सुद्धा उगाच आणलेय त्यात.
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
21 Jun 2008 - 5:23 pm | II राजे II (not verified)
पाहीला युटुब वर पुर्ण चित्रपट पाहीला.... खरोखर जबरदस्त आहे.. !!
खास करुन लागू साहेब.. ह्यांचे काम आवडले!!!
तमाशा व तमासगीरण नसलेला हा जूना चित्रपट पाहवयाचा राहून गेला होता व आज ह्या चर्चे निमित्य व युटूब च्या कृपेने हा चित्रपट पाहीला.. राजकीय खेळी कशी असते... व राजकारण माणसाला किती गलिच्छ बनवू शकतो हे त्या एका चित्रपटामुळे लक्षात येत.. धन्यवाद.
**
डिकोस्टा बरोबर एक स्त्री आहे ती कोण ???
राज जैन
बुध्दीबळाच्या खेळात राजा किती ही मोठा असला तरी तो व प्यादा खेळानंतर एकाच बॉक्स मध्ये बंद होतात...!
21 Jun 2008 - 8:38 pm | संदीप चित्रे
राजे .. एकदम सहमत. लागूसाहेबांनी नुसत्या डोळ्यांनी आणि विचारमग्न मुद्रेने कस्सला मस्त परिणाम साधलाय !
----------
कौस्तुभ - बरं झालं सिंहासन पाहिलात. यू ट्युबवर 'सामना'ही आहे. लागूसाहेबांची आणि निळूभाऊंची जुगलबंदी नुसती बघत राहवी.
----------
विजुभाऊ -- 'सरकारनामा'बद्दल सहमत. त्यातलं यशवंत दत्तांच वाक्य 'ह्यांचा असा सत्कार करा की आजपर्यंत कोनी असा सत्कार केला नसेल' मस्तच !!!
----------
अवांतरः
माझ्या माहितीप्रमाणे मराठी चित्रपटांत एक असा विचित्र योगायोग आहे की ज्या अभिनेत्याने मुख्यमंत्र्याचं काम केलं त्यांच त्यानंतर थोड्या काळातच निधन झालं.
उदा. अरूण सरनाईक, यशवंत दत्त, प्रशांत सुभेदार इ.
(चू-भू-द्या-घ्या)
--------------