दुःख ही न थांबणारी क्रिया आहे.

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
19 Jun 2008 - 10:32 pm

"ते त्या आईचं मुल,एका खोल दरीत पडतं.ती आई त्या दरीच्या उंचवट्यावरून आपलेच कपडे फेकून देते.ते कपडे हवेत तरंगू देते.त्या कपड्यांची सुंदर फुलपाखरं होवून ती जणू भुर्कन उडून जातात"

आज प्रो.देसाई तिच्या भाचीला घेवून तळ्यावर आले होते.माझी ओळख करून देताना मला म्हणाले,
"ही वृंदा करंदीकर.ही कॉलेजात फिलॉसॉफीची प्राध्यापिका आहे."
तिचा विषय़ लक्षात घेवून मी तिला म्हणालो,
"वृंदा, मला एक तू सांग त्या दिवशी माझं आणि प्रो.देसायांच "दुःखात सुद्धा आनंदाची छटा असूं शकते" ह्या विषयावर चर्चा झाली होती.त्यावर प्रो.देसाई मला म्हणाले की,
" वृंदाने मला एक कल्पित गोष्ट उदाहरण म्हणून सांगितली होती.ती मला जशास तशी आता आठवत नाही.पण पुढल्या आठवड्यात ती आमच्या घरी येणार आहे तिलाच तुम्ही ह्या विषयावर बोलायला सांगा.ती तुम्हाला ती गोष्टही सांगिल आणि ह्या विषयावर आनंदाने आणि विस्ताराने बोलेल."

त्याचा संदर्भ देवून मी वृंदाला म्हणालो,
"तुम्ही दोघेही प्रोफेसर असल्याने तुमची विचार करण्याची पातळी थोडी वरची आहे तेव्हा मला जरा विस्तारानेच सांग"
हे ऐकून वृंदा म्हणाली,
"दुःखाला उंची माहित नसते ना खोली.ती एक प्रकारची अंतरातली योग्य भावना आहे.योग्य हा शब्द त्या शब्दाच्या अर्थाच्या अनुषंगाने घेतला गेला पाहिजे.
कदाचित कुणी म्हणेल की,
"दुःखाची भावना असणं योग्य आहे असं म्हणणं म्हणजे शुद्ध मानसिक हतबलता असावी."
पण ज्या काहीना दुःखाचा अनुभव आला आहे त्यानाच त्या भावनेच्या योग्य-अयोग्यतेचं महत्व समजणार. जवळचं माणूस गेल्याने नाजूक मनस्थिती असताना धक्का बसवू देणारं दुःख, हे योग्य दुःख आहे असं म्हटलं पाहिजे.
वृंदा पुढे म्हणते,
अलीकडेच एक विख्यात व्यक्ति जे म्हणाली ते ऐकल्यावर माझ्या म्हणण्याला थोडी पुष्टी येते.ते त्या व्यक्तिचं म्हणणं खोलवर जावून विचारात घ्यायला हवं.
ती व्यक्ती म्हणते,
" मी आता आपल्या मनाला कसं वाटून घ्यायचं ते शिकलो.जे काही वाटत असेल तसंच वाटून घ्यायचं. मग त्याच्या मागे कसल्याही भावना असल्यातरी. एव्हडंच की त्याला विरोध करायचा नाही. जे लोक सांगतात की ज्याना भावना वशच करीत नाही ते असं सांगून स्वतःशीच प्रामाणिक राहून बोलत नाहीत."

भावनेशी जागृत असणं,म्हणजेच त्या वेळी वाटणाऱ्या भावनेशी जीवंत असणं,आणि ती भावना समजावून घेणं. दुःख,मानसिक धक्का किंवा दुःखावेग हे पण भावनेचेच प्रकार आहेत. ते प्रकार मनात आहेत असा भास होत असतो,ते मनात राहतात आणि मनातून निघूनही जातात.
एका विशीष्ट प्रकारे मनाला लावून घेणं- केवळ तसं लावून घेणं हे इतराना बरं वाटावं म्हणून जर असेल- तर अशा प्रकारच्या वागण्याने माझ्या मनावर खूप मोठा पगडा येतो. म्हणून मला जसं वाटतं तसंच वाटून घेण्याचा माझा प्रयत्न असतो.त्यामुळे माझ्या आणि इतरांच्या विचार-स्वातंत्र्याचा परिणाम माणसाच्या भावनेविषयी विचार केल्यावर तो परिणाम कसा असू शकतो ह्याच नीट आकलन व्हायला मदत होते.
असं एकदा का असल्या पगड्या पासून निराळं राहण्याचं स्वातंत्र्य घेतलं की आपल्या मनाला एक प्रकारचा आनंद मिळतो, आणि दुःख होत असताना त्या दुःखाचीच ही दुसरी बाजू असावी असं वाटतं. हे गणीत असंच काहिसं जुळतं."
हे त्या व्यक्तिचं म्हणणं सांगून झाल्यावर वृंदा पुढे म्हणाली,
अशीच आणखीन एक दुसरी व्यक्ति, तिच्यावर आलेल्या प्रसंगाची चर्चा करीत असताना त्या प्रसंगामुळे झालेल्या दुःखावर पडदा टाकण्याचा सल्ला मिळाल्यावर म्हणते,
"दुःखावर पडदा टाकण्याचा सल्ला असुंच शकत नाही.कारण दुःख ही न थांबणारी क्रिया आहे. ज्या व्यक्तिवर आपण प्रेम करतो ती व्यक्ति निर्वतल्याने, झालेल्या दुःखाला खंड आणूच शकत नाही कारण त्या व्यक्तिवर आपण सतत प्रेम करीत असतो-त्या व्यक्तिवर प्रेम करण्याची आपली क्रिया-सतत चालूच असते."
हे सांगून झाल्यावर वृंदा म्हणते,
" ह्या ही व्यक्तीचं म्हणणं ऐकून माझ्याच म्हणण्याला परत दुजोरा मिळाल्या सारखं वाटतं.
आपल्या भावना सहन करताना त्या कितीही क्लेशदायी अथवा आनंददायी असल्या तरी त्या भावनां जागृत ठेवून आपल्यावर आणि इतरांवर विश्वास ठेवून राहण्याचं स्वातंत्र्य घेता आलं पाहिजे.
तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल आणि वाईटही वाटेल की माझ्या मुलाच्या आकस्मिक निधनाने मी पुर्ण एकाकी पडले.मानसिक उपाय करणाऱ्याना मला
उपाय द्यायचे होते,आणि माझ्या मित्रमंडळीना मी ती घटना निमूट स्विकारून आगे बढो असा सल्ला द्यायचा होता.
माझ्या बॉसला तर मी रोजच्या कामाच्याच दृष्टीने दुषपरिणाम न होता काम करीत रहावं असं अपेक्षीत होतं.खरं तर मी पुर्ण वेडी झाली होते.मी मनाने पुर्ण खचली होते.

अशा परिस्थितीत माझ्या एका मैत्रिणीने मला एका मानसिक उपचार करणाऱ्या आश्रमात नेलं.खरं म्हणजे मला त्या मैत्रिणीने आमंत्रण दिलं नव्हतं.मीच तिची मदत मागितली होती.त्या आश्रमातल्या विद्वान व्यक्तिने
मला खूपच चांगला सल्ला दिला.
तो मला म्हणाला,
"ज्यांच्यावर तुम्ही प्रेम करता,त्यांचा सन्मान करणं जरूरीचं आहे.त्यांच स्मरण करणं जरूरीचं आहे.त्यांच्याशी संवादात राहणं जरूरी आहे.त्याने तुमच्याशी जवळीक करणं जरूरीचं आहे."
ह्या शब्दानी माझ्या उभ्या आयुष्याला कलाटणी मिळाली.माझं आयुष्य वाचवलं गेलं.मी पुढचा मार्ग काटू शकले.मी माझ्या मुलाला स्मरणात आणू शकले.त्या स्मरणाचा सन्मान करू शकले.
सखोल विचार करण्याचा,अर्थपुर्ण विचार करण्याचा,
भासवून घेण्याचा,मार्ग मला मिळाला.मी खूपच उपकृत झाले.
प्रेम आणि आनंदाबरोबर दुःख सुद्धा आपल्याला जवळ आणतं. न भिता, धरसोडपणा न करता, भावनेशी जागृत राहणं म्हणजेच आपलं आपण होणं.आपल्या अंगातून ह्या योग्य भावना वाहू देणं म्हणजेच ह्या क्षणाला आपण आपलं अस्थित्व जाणणं. ह्या अस्थित्वाच्या सत्याशी प्रातारणा न केल्याने माझी मी म्हणून जगू शकले.
माझ्या मनात विचार येवू लागला आहे की ह्या एकवीसाव्या शतकातलं दुःखाचं आणि अघटीत घटनेचं सांवट जे सर्वांवर आलं आहे ते एखाद्या बाटलीत लोकांच्या भावना जबरदस्तीने इतकी वर्ष दाबून कोंबून ठेवलेल्याचा परिणाम असावा.
मला एका प्रख्यात लेखकाच्या काल्पनीक गोष्टीची आठवण येते.
ते त्या आईचं मुल,एका खोल दरीत पडतं.ती आई त्या दरीच्या उंचवट्यावरून आपलेच कपडे फेकून देते.ते कपडे हवेत तरंगू देते.त्या कपड्यांची सुंदर फुलपाखरं होवून ती जणू भुर्कन उडून जातात.दुःखातही तिला आनंद मिळतो,असा ह्या गोष्टीतला आशय आहे.

समाधानाची गोष्ट अशी की जेव्हा आपण दुःखी मनस्थितीत असतो,त्यावेळी सुंदरता आणि आनंदही आपल्या बरोबर असतो तसंच दुःख आणि पिडा ह्यांचही अस्थित्व आपल्या बरोबर असतं. असं समजून राहिल्याने, अशा गोष्टी मनात जागृत ठेवल्यामुळे अंतिम शांतीकडे जावून पोहचण्याचं हे एक पाऊल होणार आहे असं वाटूं लागतं.
हा जागृतीचा मार्ग कधीच संपणारा नसतो.खरोखरीचं दुःख आणि पिडा होते त्याचं खरेपण प्रामाणिकपणे सांभाळून ठेवल्यास,त्या पासून मनाला झालेली जखम लवकर बरी व्ह्यायला पुर्णपणे मनाच्या स्वाधिन व्हायची जरूरी असते आणि तसं केल्याने खरा अर्थ समजण्यासाठी आपलं मन आपल्याला वरच्या पातळीवर आणून ठेवतं."
हे सर्व एकून मी वृंदाला म्हणालो,
"वृंदा खरंच तू ग्रेट आहेस.तुझं हे चिंतन ऐकून मला पण ह्या वयात काही तरी शिकल्या सारखं वाटलं. प्रो.देसाई ज्या अर्थी मला तुझा विचार ऐकायला शिफारस करतात त्याच वेळी मी समजून गेलो होतो,इथे काही तरी"ग्यानबाची मेख आहे"
"कसचं कसचं"
म्हणत वृंदा गालातल्या गालात हंसली,आणि आम्ही घरी जाययला निघालो.

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

राहणीविचार