...तू कुठे आहेस गालिब?...

चाणक्य's picture
चाणक्य in जनातलं, मनातलं
8 May 2012 - 5:52 pm

मध्यंतरी 'सकाळ' मध्ये सौमित्र ची 'तू कुठे आहेस गालिब?' ही कविता वाचली होती. खूपच आवडली होती. पण कात्रणं वगैरे करून ठेवायचा आळस आणि रद्दी टाकायची घाई या नादात ती पुरवणी गेली कुठेतरी. पुरवणी तर गेली पण कविता मनात घर करून बसली होती. युट्युब वर सौमित्र चे कविता वाचनाचे व्हिडिओ वगैरे धुंडाळले पण नाही सापडली. आणि परवा नकळत पणे हातात आली. झालं असं की घराजवळंच पुस्तक प्रदर्शन लागलं होतं, तिथे पुस्तकं बघता बघता सौमित्रचंच एक पुस्तक हाती आलं. अधाश्यासारखी झडप घातली आणि त्यात ही कविता कुठे आहे आहे का ते शोधायला लागलो. आणि काय सांगू महाराजा...चक्कं सापडली. पैसे दिले, बाईक वर टांग मारली आणि घरी येऊन पुस्तक उघडलं. एकदा वाचली, दोनदा वाचली, तीनदा वाचली परत परत वाचली ; मग दोनचार ईकडच्या तिकडच्या कविता वाचून परत वाचविशी वाटली म्हणून परत वाचली...काही काही शब्द, वाक्य थेट भिडले आणि मग 'मला समजलेली तू कुठे आहेस गालिब' लिहायचा मोह अनावर झाला.........

हि कविता पहिल्यांदा वाचली तेव्हाही आणि आताही जितक्या वेळेला वाचतो तितक्या वेळेला पहिल्या दोन ओळीतच मनाचा ताबा घेते -

गालिब!
मला काहितरी झालंय...

यातल्या 'गालिब' या संबोधना मुळे पुढ्चं 'मला काहितरी झालंय' मधली व्याकुळता अधिक परिणामकारकपणे पोहोचते, असं मला वाटतं. हे 'काहितरी' झालंय म्हणजे काय झालंय तर -

समुद्र पाहून काहितरी व्हायचं माझ्या छातीत...
शहरातल्या गर्दीत उगाच फिरतानाही
दिशाहीन वाटायचं मला...
संध्याकाळी सैरभैर व्हायचं तळं मनाचं...
पण आता,
साधे तरंगही उठत नाहीत त्यावर.

इथे कळू लागते कि कवीला नक्की काय झालंय. व्यवहारी जगात राहताना, त्याच्या मूळच्या संवेदना पूर्वी ईतक्या तीव्र राहिलेल्या नाहीत. किंबहूना त्या आता बोथट होत चालल्या आहेत. कवी पुढे म्हणतो -

ऋतू बदलताना उदास हलायचं माझ्यातलं झाड...
आता,
झाडावरल्या पक्षांनाही कळत नाही झाडाचं हालणं...
रात्री बेरात्री ऊर ऊगाच भरून यायचा...
आता,
नीरव शांतता पांघरून
डोळ्यांच्या बाहुल्या टक्क जाग्या असतात,
अंधार पुसत राहतात,
ईकडून तिकडे
तिकडून ईकडे.

वरकरणी जरी गालिब ला संबोधून हि कविता लिहिली असली तरी मला वाटतं की हे एक स्वगत आहे. अश्या एका माणासाचं ज्याला पूर्वी काही गोष्टी पाहून, अनुभवून जे काही उत्कट वगैरे वाटायचं, ते आता वाटत नाहीये. ते परत तसं वाटावं म्हणून त्याची अयशस्वी धडपड चालू आहे. आणि आता काहीच जमत नाहीये म्हणल्यावर तो 'गालिब' पाशी मन मोकळं करतोय. पूर्वी च्या या unadultrated, divine pure संवेदना कश्या होत्या हे पुढच्या ओळीत फार सुंदर मांडलंय -

एवढंच काय गालिब
कविता लिहून झाल्यावर
साधा कागद जरी पाहिला
कि चक्कं दिसायचं कि रे झुळ्झुळताना पाणी...

क्या बात. हि वरची ओळ वाचून तर माझ्या डोळ्यासमोर दृश्य उभं राहिलं की, एक उन्हातान्हातून वणवण करून आलेला, फिकट रंगाचा बुशशर्ट आणि पँट घातलेला एक तरूण जमिनीवर बसलाय आणि सांगतोय हे सगळं गालिबला. पूर्वी कवितेतलं झुळझुळ पाणी पाहणारा हा माणूस त्याची आत्ताची अवस्था सांगताना म्हणतोय की-

आता,
कोरड्या पात्रातून पोहोचतो मी
समोरच्यापर्यंत.

म्हणजे असं की, पूर्वी कवितेतल्या कागदावरही पाणी पाहाणारा मी, पण आज नात्यांतला ओलावाही धरून ठेवू शकत नाहीये. नदीचं कोरडं पात्र चालत पार केल्यावर कसं, नदी तर पार होते पण नदीला पाणीच नसल्यामुळे 'नदी पार केल्या' चं समाधान नाही मिळत. तसं कर्तव्यभावनेला जर मायेचा ओलावा नसेल, तर मग ती भावना नाही उरत, नुसतच कर्तव्य राहतं. आणि मग रेल्वेच्या रुळासारखं समांतर अयुष्य जगणं चालू राहतं...अखंड! नात्यांतली गंमतही अशी की हा 'ओलावा' बर्‍याच वेळा समोरच्याला नाही जाणावत पण रूक्षपणा मात्र लगेच जाणवतो. बघा आठवून- कित्येकदा असं होतं की आपण मनापासून समोरच्याला काहितरी सांगत असतो पण त्याच्या / तिच्या पर्यंत ते पोचतच नसतं. आपण चिंब भिजलेलो असतो आणि हे 'चिंबपण' आपल्याला समोरच्यानेही अनुभवावं असं आपल्याला वाटत असतं पण....पण त्याला हा पाऊस दिसतंच नसतो.....मग थोड्या वेळाने आपलाही पाऊस थांबतो आणि.... होतो कोरडे आपणही. म्हणजे आपला ओलावा तर नाही पोचत आपल्या जोडीदारा पर्यंत पण त्याचं कोरडेपण मात्र आपल्याला लगेच कळतं. हे असंच कधी तरी जोडीदाराचं ही होत असणार आपल्या बाबतीत. तर हे रेल्वेच्या रुळासारखं जगणं पुढच्या ओळी फार अप्रतिमपणे मांडतात -

एकमेकांची तहान पाहात कसं जगायचं असतं
हे एकदा तरी सांग गालिब!

जबरदस्त! एकमेकांची तहान पाहत जगायचं म्हणजे काय पराकोटीची अपरिहार्यता आहे. आपली तहान समोरचा भागवू शकाणार नाही आणि आपण त्याची तहान भागवू शकणार नाही हे दोघांनाही ठाऊक असुनही एकत्र रहायचं, रेल्वेच्या रूळांसारखं चालत रहायचं. या परकोटीच्या अपरिहार्यतेपायी मग कवि म्हणतो -

आता मला तुझ्या वेदनांवर
माझ्या जखमांची मेणबत्ती पेटवू दे...

म्हणजे माझं दु:ख तुझ्या वेदनांपेक्षा फार मोठं आहे (किंवा कविला निदान असं वाटतंय) आणि मला ते तुला सांगू दे.

माझं बोट धरून
घेऊन चल मला कवितेच्या जंगलात पडणारा
पाऊस पहायला...
तुझ्या गझलांची हरणं
माझ्या डोळ्यातून मनापर्यंत
ऊधाण खेळायला सोड...
मधली कोरडी जमिन
शिंगांनी ऊकरून काढायला सांग त्यांना मात्र...

म्हणजे आता माझी पुर्वीची रसिकता तूच परत आण बाबा. माझ्याच्याने तर काही जमत नाहीये आता. आणि हे करताना माझ्या मनाची मशागत ही तूच कर, म्हणजे परत परत ही वेळ येणार नाही. मनाचा गेलेला पोत सुधारणं हे सर्वस्वी तुझ्याच हातात आहे, आणि मी तुझ्यावर विसंबून आहे यासाठी. मला काय हवय हे सांगताना कवि पुढे म्हणतो -

गालिब !
मला दु:खाएवढं मोठं व्हायचंय...
भोवतालच्या अंधाराला वणवा नाही लागला तरी चालेल
माझ्या शब्दांचे दिवे तरंगताहेत त्यावर
एवढंच मला पहायचंय...
माझ्या जीवावर पडता चाललेल्या
आत्महत्त्यांच्या गाठी पार करत करत...
मला मरेपर्यंत जगायचंय
तुझ्यासारखंच...
मी तुला कधीचा शोधतो आहे
तू कुठे आहेस गालिब?

सुख जेवढं आपलं मन व्यापत नाही त्यापेक्षा कैक पटींनी दु:ख व्यापतं. सुखात असताना एकवेळ दु:खाचा विचार मनात येऊ शकेल पणा दु:खात असताना सुखाचा विचार मनाला शिवणं केवळ अशक्य. एखाद्या ऊंची अत्तराचा सुवास जसा खोलीचा कोपरान् कोपरा व्यापतो तसं दु:ख मनच काय तर आख्खं शरीरही व्यापून टाकते. तर असं दु:खा सारखं व्यापक व्हायचंय मला. आणि मला माझ्या मर्यादाही ठाऊक आहेत. मी काही प्रत्येकाच्या आयुष्यात बदल घडवू शकणार नाही. पण भोवतालच्या काहिजणांना जरी मी, माझे शब्द, माझे विचार आवडले तरी मला चालेल. किंबहूना माझ्या मनात जे सतत निरशाजनक विचार येतात ते झटकून टाकायला ते पुरेसं आहे. जेव्हा कवि गालिबला म्हणतो की मला तुझ्यासारखं मरेपर्यंत जगायचंय तेव्हा यात गालिबच्या वैयक्तिक आयुष्याचे काही संदर्भ असतील कदाचित्...जे मला माहिती नाहित. स्वतःतला हा गलिब शोधताना कवि सैरभैर ही होतो. आणि मग मनाच्या या सैरभैर अवस्थेत ही शोधाशोध दिशाहीन होते. ईतकी दिशाहीन कि कवि मग तपासून बघायला लागतो कि हा 'गालिब' आपल्या आसपासंच तर नाहीये ना...किंबहूना आपल्या स्वतःतच तर नाहीये ना -

नव्या शरीरातून
तू कदाचित ऐकत असशील तुझंच गाणं...
तुझ्याच दु:खाची
तुला कदाचित ओळख नसेल राहिली...
'खुदा ऐसे एहसास का नाम है
रहे सामने और दिखाई न दे...'
तसा तू मला भेटतही असशील रोज...
कदाचित मी बार मध्ये दारू पिताना
प्रत्येकवेळी माझ्यासमोर झिंगून बसलेला
तूच असशील कदाचित...
कदाचित तू स्वतःच
दारू होऊन रोज पोटात जात असशील माझ्या...

मी स्वतः मनाची ही अवस्था ब-याच वेळा अनुभवली आहे. काहितरी हरवल्याची जाणीव आणि त्याच वेळी ते 'हरवलेलं' आपल्याच आत कुठेतरी दडून बसलं असण्याची शक्यता. दोन्ही भावना एकाच वेळी....एकाच मनात. आणि मग मनाची ही अशी अवस्था ब-याच वेळ राहिली की मग ते 'हरवलेलं' आपल्याला सापडलंच नाही तर ही भिती -

गालिब !
कुणीतरी तुझा शेर ऐकवला
आणि माझ्या तोंडून 'व्वा' निघालीच नाही...
मी ईतका कोरडा होण्याआधी भेट...

कवितेतल्या या मला सगळ्यात आवडलेल्या ओळी. माझ्यातली रसिकता, काव्यमन, संवेदना ई. नामशेष होऊ पाहतायत आणि मला ते तसं नामशेष होऊ द्यायचं नाहिये. एके काळी मी हे सर्वं 'असणं' आणि त्यायोगे माझं भावविश्व समृद्ध होणं अनुभवलंय. आणि ती समृद्धता मला परत हवीये. माझ्या एकट्याच्याने ते परत मिळवता येत नाहीये. मला 'गालिब' साक्षात तुझीच मदत हवीये. कारण कुणा येड्यागबाळ्याचं काम नाहिये ते. तिथे divine intervention च हवं. कवितेचा शेवट करताना कवी म्हणतो -

मी ईतका कोरडा होण्याआधी भेट
अन् भेटल्यावर
नेहमीप्रमाणे माझ्याकडे ऊधार माग
मी तुला काहिच देऊ शकणार नाही
म्हणजे मी किती कोरडा झालोय
याची तुला कल्पना येईल...
आता
तू माझा आधार व्हायचंस
मी तुझा नाही...
आणखी कितीतरी शतकं पुरेल
एवढा झंझावात तू ठेवून गेलायस या जगात...
त्यातली फक्त एक झुळूक पुरेल मला
हे संपूर्ण आयुष्य जगायला...
मी तुला कधीचा शोधतोय
तू कुठे आहेस गालिब?

मला ब-याच वेळा ही कविता वाचल्यावर असंही जाणावलं की ही कविता म्हणजे मनाच्या अवस्थांची स्थित्यंतरे आहेत. एखादी गोष्ट हरवल्याची जाणीव, मग ती शोधण्याचा प्रयत्न, प्रयत्न करुनही सापडत नाही म्हणल्यावर येणारी अगतिकता, मग उगाच मनाला उभारी देऊन शोधण्याचा परत प्रयत्न आणि शेवटी ती न सापडणारी गोष्ट आपल्याला कायमची तर दुरावली नाही ना हि भिती. मग कुणीतरी ती गोष्ट आपल्याला परत मिळवून देईल (किंवा द्यावी) हि आशा अन् त्यापायी त्याला केलेली आर्जवं. हि मनाची स्थित्यंतरं नाहित तर काय आहेत?

धन्यवाद सौमित्र, ईतकी छान कविता दिल्याबद्दल...

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

तू कुठे आहेस गालिब?

गालिब!
मला काहितरी झालंय...
समुद्र पाहून काहितरी व्हायचं माझ्या छातीत...
शहरातल्या गर्दीत ऊगाच फिरतानाही
दिशाहीन वाटायचं मला...
संध्याकाळी सैरभैर व्हायचं तळं मनाचं...
पण आता,
साधे तरंगही उठत नाहीत त्यावर.
ऋतू बदलताना ऊदास हलायचं माझ्यातलं झाड...
आता,
झाडावरल्या पक्षांनाही कळत नाही झाडाचं हालणं...
रात्री बेरात्री ऊर ऊगाच भरून यायचा...
आता,
नीरव शांतता पांघरून
डोळ्यांच्या बाहुल्या टक्क जाग्या असतात,
अंधार पुसत राहतात,
ईकडून तिकडे
तिकडून ईकडे.
एवढंच काय गालिब
कविता लिहून झाल्यावर
साधा कागद जरी पाहिला
कि चक्कं दिसायचं कि रे झुळ्झुळताना पाणी...
आता,
कोरड्या पात्रातून पोहोचतो मी
समोरच्यापर्यंत.
एकमेकांची तहान पहात कसं जगायचं असतं
हे एकदा तरी सांग गालिब!
आता मला तुझ्या वेदनांवर
माझ्या जखमांची मेणबत्ती पेटवू दे...
माझं बोट धरून
घेऊन चल मला कवितेच्या जंगलात पडणारा
पाऊस पाहायला...

तुझ्या गझलांची हरणं
माझ्या डोळ्यातून मनापर्यंत
ऊधाण खेळायला सोड...
मधली कोरडी जमिन
शिंगांनी ऊकरून काढायला सांग त्यांना मात्र...
गालिब !
मला दु:खाएवढं मोठं व्हायचंय...
भोवतालच्या अंधाराला वणवा नाही लागला तरी चालेल
माझ्या शब्दांचे दिवे तरंगताहेत त्यावर
एवढंच मला पहायचंय...
माझ्या जीवावर पडता चाललेल्या
आत्महत्त्यांच्या गाठी पार करत करत...
मला मरेपर्यंत जगायचंय...
तुझ्यासारखंच...!
मी तुला कधीचा शोधतो आहे
तू कुठे आहेस गालिब?

नव्या शरीरातून
तू कदाचित ऐकत असशील तुझंच गाणं...
तुझ्याच दु:खाची
तुला कदाचित ओळख नसेल राहिली...
'खुदा ऐसे एहसास का नाम है
रहे सामने और दिखाई न दे...'
तसा तू मला भेटतही असशील रोज...
कदाचित,
मी बार मध्ये दारू पिताना
प्रत्येकवेळी माझ्यासमोर झिंगून बसलेला
तूच असशील कदाचित...
कदाचित तू स्वतःच
दारू होऊन रोज पोटात जात असशील माझ्या...

गालिब !
कुणीतरी तुझा शेर ऐकवला
आणि माझ्या तोंडून 'व्वा' निघालीच नाही...
मी ईतका कोरडा होण्याआधी भेट...
अन् भेटल्यावर
नेहमीप्रमाणे माझ्याकडे ऊधार माग...
मी तुला काहिच देऊ शकणार नाही
म्हणजे मी किती कोरडा झालोय
याची तुला कल्पना येईल...
आता
तू माझा आधार व्हायचंस
मी तुझा नाही...
आणखी कितीतरी शतकं पुरेल
एवढा झंझावात तू ठेवून गेलायस या जगात...
त्यातली फक्त एक झुळूक पुरेल मला
हे संपूर्ण आयुष्य जगायला...

मी तुला कधीचा शोधतोय
तू कुठे आहेस गालिब?

- सौमित्र

मुक्तकआस्वाद

प्रतिक्रिया

सुरेख. कविता तर शब्ददेखणी आहेच, रसग्रहणही आवडले.

JAGOMOHANPYARE's picture

8 May 2012 - 6:28 pm | JAGOMOHANPYARE

छान.

अर्धवटराव's picture

8 May 2012 - 8:54 pm | अर्धवटराव

हि कविता तुम्ही म्हणता तसं मनाच्या स्थित्यंतराची तर आहेच, पण जगण्यावरच्या प्रेमाची तळमळ देखील सही सही पोचतेय या कवितेतुन. कवि गालीबची करुणा भाकतोय, पण यात दीनवाणी लाचारी नाहि, तर प्रेमाने, विश्वासाने, बुडत्याला वाचवणार्‍याचा हाथ नक्की मिळेल हा दुर्दम्य आशावाद दिसतो त्यात. एका अतृप्त समाधानाने एका पूर्ण समाधानाला केलेले आवाहन...
हे सगळं मला मूळ कवितेतुन नाहि सुचलं.. तर तुमच्या रसग्रहणातुन आढळुन आलं.
आणखी अनेक पदर असावे या कवितेचे... नीट पारायणं करावे लागतील.

अर्धवटराव

मदनबाण's picture

8 May 2012 - 9:50 pm | मदनबाण

सुरेख कविता आणि रसग्रहण ! :)

वाचता वाचता हरवलो ...

हा मिका कुठे खपलाय अश्या वेळी ;)

मृगनयना's picture

9 May 2012 - 2:47 pm | मृगनयना

छान !! खूपच छान !!!