असेच काही, अवती- भवती...!

वेणू's picture
वेणू in जनातलं, मनातलं
26 Apr 2012 - 2:29 pm

अपयश झेलायला
काही क्षण पुरतात, तर पेलायला
सबंध आयुष्य!

महत्वाकांक्षांचे अपयश एकवेळ
पचतेही, पण नात्यांनी कच खाल्ली, की
सावरणारे हातच दुबळे पडतात...

तिथे 'आपलं' काही उरत नाही
'तुझं-माझं' नावाचा एक विचित्र प्रवास सुरू होतो!
आणि हळूहळू, वाटाच निर्णय घेऊन टाकतात,
विरुद्ध निघून जाण्याचा!
दोन प्रवासी- वेगळ्या वाटा, हुरहूर मात्र आत जपलेली..

ही खाल्लेली कच, रुतणारा सल
आणि लागलेली हुरहूर, मनात घर करून राहते,
नि त्या घरावर अपयशाचा झेंडा!!

आता स्वतःला समजवण्याचे अनेक नवे मार्ग, नवी कारणे, समर्थनाचे लाखो उपाय!

जोडलेली मनं तुटणं, ती दूर होणं, आयुष्याचे सुंदर- नाराजीचे, तर कधी संमिश्र क्षण ज्यासोबत अनुभवले, स्वत:त उतरवले- अशाला सपशेल विसरून जाणं, खरंच सोपं असतं का?

अशी अनेक तुटलेली नाती दिसली की विव्हळतं मन! 'सोबत' प्रत्येकालाच हवी असते.. कितीही कमावून निवांत आपापलं जगण्यापेक्षा, हे सारं 'कुणासाठी' तरी करतो आहोत ह्याचं समाधन शोधण्यात आणि ते मिळवण्यात आयुष्य गुंतलेलं असतं!

नेहमी, नकळत ह्या ओळी रूंजी घालतात ओठांवर, "कल तड़पना पडे याद में जिनके, रोक लो रूठकर उन को जाने ना दों"
थोडसं नमतं घेतलं, पडतं घेतलं, नि स्वतःपेक्षा जरासं जास्त महत्व नात्याला दिलं, की कोमेजलेली नातीही टवटवीत होतात, तशीच राहू शकतात!
हाच भाव इतका उदात्तपणे मनी रहावा, की सोबतचाही अलवार त्या रंगात उतरावा...!
हा प्रवास मग मात्र कायम आनंदाचा, बहराचा... राग- लोभ- खटके, असणारच- मतभिन्नतेचे ते सुल़क्षण- पण त्याच वेळी, निव्वळ मतांसाठी काडीमोड न होण्याची जबाबदारी दोघांचीही हवी..

खरं तर- इवलंसं आयुष्य, त्यात माणसं जमवतानाच अर्ध आयुष्य सरलेलं, हक्काचं मिळालेलं, मिळवलेलं माणूस सहजासहजी दुरावतं आणि मनातली पोकळी मग मिटत नाही...

अशावेळी वाटून जातं- एकदा हाक मारून बघावी, कोण जाणो पलिकडची व्यक्तीही, त्या हाकेसाठीच खोळंबून असावी!

-बागेश्री

मांडणीविचार

प्रतिक्रिया

अमृत's picture

26 Apr 2012 - 3:06 pm | अमृत

ती हाक मारायला लागणारं धाडस सगळ्यांकडेच नसतं आणि जेव्हा मनाची तयारी होते तेव्हा वेळ झालेला असतो :-(

खरच मस्त लिहिलय. वाचून खूप खूप छान वाटलं

अमृत

बहुगुणी's picture

26 Apr 2012 - 4:57 pm | बहुगुणी

सुंदर लेख, प्रत्येक शब्द मोजका आणि अर्थपूर्ण, आणि नात्यांचं तत्वज्ञान सहज उलगडून दाखवणारा. (वाचनखूण साठवली आहे.)

मेघवेडा's picture

27 Apr 2012 - 3:00 pm | मेघवेडा

तंतोतंत.
आवडलंच. :)

अर्धवटराव's picture

28 Apr 2012 - 1:25 am | अर्धवटराव

मोजक्या शब्दात नेमका संदेश !! अगदी हळुवारपणे... हळवं होऊन.

अर्धवटराव

बहुगुणी's picture

26 Apr 2012 - 5:01 pm | बहुगुणी

दोनदा आल्याने प्रकाटाआ

५० फक्त's picture

26 Apr 2012 - 5:10 pm | ५० फक्त

मस्त लिहिलं आहेस, धन्यवाद.

खरंच खुप छान लिहिलेस.
आवडले.

रेवती's picture

26 Apr 2012 - 10:14 pm | रेवती

लेखन आवडले.

प्रचेतस's picture

26 Apr 2012 - 10:26 pm | प्रचेतस

सुंदर लेखन.
आसरा'- अर्थहीन....... तुझ्याविना!! याचाही पुढचा भाग येऊ द्यात.

मनीमाउ's picture

27 Apr 2012 - 1:27 pm | मनीमाउ

छान लेख..का कोण जाणे हे गाण आठवलं!!!

sneharani's picture

27 Apr 2012 - 2:26 pm | sneharani

सुंदर लिहलयं!मस्तच!!

मस्तच! पण स्वप्नाळूच म्हणावं लागेलसं!

स्मिता.'s picture

27 Apr 2012 - 4:29 pm | स्मिता.

पण लिखाण स्वप्नाळू असलं तरी विचार पटण्याजोगे आहेत. मुक्तक आवडलं.

शुचि's picture

27 Apr 2012 - 6:31 pm | शुचि

सुंदर तरल लेखन.

jaypal's picture

27 Apr 2012 - 10:09 pm | jaypal

सहमत. सुंदर लेख.

प्रतिसादकांची आभारी आहे :)