माझी साक्षात्कारी मधुमेहाची भीती

व्यंकट's picture
व्यंकट in जनातलं, मनातलं
16 Jun 2008 - 12:53 pm

खूप खूप वर्षांपूर्वी डॉक्टर व्हावं असं मला वाटत असलं तरी ते मला जमण्यातल नव्हतं हे माझ्या पक्कं लक्षात आलं आहे. डॉ. अस्थाना म्हणतो तसा पाषाणह्रदयीपणा माझ्याकडे आहे. अत्यंत आवडती जीन्स फाटल्यावर मी तिच्याकडे काही न घडल्याप्रमाणे शांतपणे बघू शकतो. तेंडूलकर आउट झाल्यावर टि.व्ही. बंद केला तरी ऑनलाईन मॅचचा स्कोअर पाहू शकतो. ह्यावरून लक्षात आलं असेलच की, अनलाईक मुन्नाभाई, मी अगदी आरामात हात न थरथरता रोग्यांवर शल्यचिकित्सा केली असती. त्यामुळे प्रश्न हिमतीचा किंवा हुशारीचा नाही. प्रश्न आहे पथ्याचा... एखाद्या व्यक्तीला तू अमुक अमुक पदार्थ खाऊ नकोस असा सल्ला देणं ह्यासारखी पौष्टीक अरसिकता ती काय ? आता माझ्या आयुष्यातून जर सगळं गोडधोड, तिखट, खारट, आंबट आणि कडू काढून घेतलं तर माझ्यात काय उरेल? अवेळी ब्रह्मरूपात विलीन नाही का व्हायचो ? विशेषतः माझ्यातून गोड काढून घेणं म्हणजे एखाद्या शिवसैनिकातून कडवटपणा काढून घेणं किंवा काँग्रेस मधून तुरटपणा काढून घेणं किंवा डाव्यापक्षांतून चावटपणा काढून घेण्यासारखं आहे.

तर झालं अस की एकदा काही मित्रांबरोबर एका छोट्या टेकडीवर भटकंतीला गेलो होतो, तिकडे बरचं चालून झाल्यावर, अमंळ श्वास टाकावा म्हणून आम्ही जरा गवतावर बसलो. मी पायातले बूटमोजे काढले आणि पसरलो. बरोबरीच्या चमूतली एक मुलगी तेव्हढ्यात मला म्हणाली ' यू आर स्विट ' . सुरवातीला मी थक्क झालो, मग जरा लाजल्यासारखा झालो, पण मग जरा सावरून तिच्या डोळ्यात पाहू लागलो, तर तिने माझ्यापायावर चढलेल्या मुग्यांकडे कटाक्ष टाकतं, भुवई उंचावली. बघीतलं तर जवळच्या वारूळातल्या काही मुंग्या माझ्या घामेजलेल्या पायावर चढलेल्या होत्या. ( हात् तिच्या, म्हणजे आम्ही तसे स्विट होतो काय? ) त्यावरून मला एकदा एका ठिकाणी वाचलेली बातमी आठवली की एका व्यक्तीने लघुशंका केल्यानंतर लागलेल्या मुंग्यांवरून त्या व्यक्तीस मधुमेह असल्याचं लक्षात आलेलं. घाम काय आणि लघूशंकोत्पन्न द्रव्य काय दोन्ही बॉडी वेस्टच, म्हणून, मला शुगर आहे की काय ह्या भीतीने माझ्या मनाला घेरायला सुरवात केली. अर्थातच, त्यानंतर मी आपोआप मी किती साखर खातो आहे त्याकडे माझं लक्ष जायला लागलं. रोज दूध, चहा, कॉफी मधे २-३ चमचे साखर, रोजच्या जेवणात ज्यूस नाहीतर कोक वैगेरे, नंतर काहीतरी गोड, रात्री जमल्यास आईस्क्रिम किंवा केक, काही नाहीतर कोल्ड कॉफी, चॉकोलेट्स. थोडक्यात काय तर मी फूल्-टू ऐश करतो आहे हे २-४ दिवसांत जाणवलं. पुढे मी नोकरी बदलली, आधीच्या कंपनी मधे कार पार्क जवळ होतं, नव्या कंपनी मधे जरा दूर आहे, शिवाय ऑफीस इतकं मोठ्ठ आहे की बरच चालायला लागतं, जवळजवळ ५ मजले चढउतार होतो, त्यात लॅपटॉपच ओझं, एकूण काय की दमायला व्हायचं. आता एवढे सगळे सिम्टम्स आणि त्यात माझं खाणंपिणं ह्या भांडवलावर, मित्रमंडळी आणि माझं अंर्तमन, मला टेस्ट करून घे असं कानी कपाळी ओरडायला लागले.

माझ्या बरोबर रहाणार्‍याला मधुमेह आहे, त्यामुळे, त्याच्या कडून मला सगळे टेक्निकल डिटेल्स कळायला लागले. सकाळी उपाशी पोटी किती असायला पाहीजे, जेवणानंतर किती वैगेरे वैगेरे ? त्याला २०० शुगर आहे त्यामुळे तो आकडा जणू माझा शत्रू झालेला. २०० च्या जवळपासचा कुठलाही आकडा ऐकला की मला मधूमेह आठवायला लागायचा. जगणं आणि खरं म्हणजे जेवणं अगदी दुश्वार झालेलं. त्या मित्राकडे शुगर टेस्ट करणारी २ यंत्रे होती. शुगर टेस्ट करणार्‍या यंत्राचे ३ भाग असतात: १) टाचणी - जी रक्त काढते, २ ) एक पट्टी ज्यावर रक्ताचा ठीपका ठेवायचा ३) यंत्र जे त्या रक्ताच्या ठिपक्यावरून शुकर किती ते दाखवतं. आता ह्याच्या कडे असलेल्या २ यंत्रांपैकी १ बिघडलेलं, दुसरं सुरू होतं पण त्याच्या पट्ट्या संपलेल्या. पहिल्याच्या पट्ट्या दुसर्‍याला चालतील असं वाटून मित्राने माझ्या ४-५ बोटातून रक्त काढलं पण सुरू असलेल्या यंत्राला त्याच्याच पट्ट्या हव्या होत्या. माझं रक्त फुकट गेलं आणि भीतीयुक्त उत्सुकता अजून वाढली. आता ह्या पट्ट्या बर्‍याच महाग असतात. कधी कधी असं होतं की इंटरनेटवर तुम्हाला पट्ट्यांपेक्षा यंत्र + पट्ट्या असं स्वस्त (क्वचित फुकट सुद्धा ) मिळतं. दुकानात जाऊन पट्ट्या आणणार होतो, पण मित्राला मेल्-इन्-रिबेट वालं डील मिळालं त्यामुळे यंत्र+पट्ट्या फुकट मिळाल्या. पण यंत्र यायला १५ दिवस लागले, त्यात तो बाहेरगावी गेला. दरम्यानच्या काळात माझ्या मनात एक सुप्त बैचेनी होती की काय होईल.

शेवटी आज तो दिवस उजाडला. आणि सकाळी पहिलं टेस्टींग केलं. उपाशी पोटी ९८ आणि भरल्या पोटी १२६ असं रिडींग आलं. जे अगदी सामान्य आहे. पहिलं रिडींग ९८ आल्यामुळे, मधल्या जेवणात मी भरपूर गोड खाल्लं. खाण्यापिण्याच्या वेळी चेहर्‍यावर असणारी ती बेफिक्री, चटावलेली जीभ, मेनूकार्डावरुन हे खाऊ की ते खाऊ असा विचार करत भिरभिरणारी नजर हे काही महीने मी फार मिस् करत होतो. आता पुन्हा एकदा, जसा एखादा वळू सुटतो, किंवा एखादा ट्रकवाला सगळा रस्ता आपल्याच बा चा आहे असा ट्रक चालवतो, किंवा एखादा हत्ती उसाच्या शेतात घुसतो, तसा मी रेस्टांरट्स, डायनिंग हॉल्स मधे शिरणार........ लक्ष्मणराव म्हणतात त्याप्रमाणे ' द होल वावर इस अवर' .... मायाबाझार ह्या तेलुगू चित्रपटातील हे गीत माझ्या आवडीच आहे आणि खाण्यापिण्याशी संबधीत आहे म्हणून येथे देत आहे...

मायाबझार - विवाहभोजनंबु

जीवनमानअनुभव

प्रतिक्रिया

अभिज्ञ's picture

16 Jun 2008 - 2:05 pm | अभिज्ञ

लेख खुमासदार झालाय खरा परंतु मधुमेहाविषयी आणिक वाचायला आवडले असते.
मधुमेहाची लक्षणे,त्यावर पाळायची पथ्ये ह्या विषयी काहितरि माहितिपुर्ण लिहाल असे वाटले होते.
असो,
मि.पा.वरील माहितगार जनतेने ह्याबाबत जरुर काहितरी लिहावे असे वाटते.

अभिज्ञ.

भडकमकर मास्तर's picture

16 Jun 2008 - 2:12 pm | भडकमकर मास्तर

मधुमेहाची लक्षणे,त्यावर पाळायची पथ्ये ह्या विषयी काहितरि माहितिपुर्ण
हे काय कोणीही लिहील, आणि कुठल्याही वेबसाईटवर सापडेल...
....
व्यंकट :
एखाद्या आजाराची भीती वाटणे आणि तसा नसणे हे शाबित होणे या मधल्या काळात मनाची जी दोलायमान अवस्था होते त्याबाबत झकास लिहिले आहे...
आपल्याला लेख आवडला...
अवांतर : आपण या मधल्या काळात तसा वेळ बराच घालवलात... ( टेन्शनमध्ये इतका वेळ १५ दिवस वगैरे घालवणे फार मुश्किल)...
असो.... आपण कन्फर्मेशनसाठी दुसर्‍या एका पट्टीवर परत तपासणी केलेली बरी, असा आपला न मागता दिलेला सल्ला ... ;)
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

16 Jun 2008 - 5:50 pm | विसोबा खेचर

मधुमेहाची लक्षणे,त्यावर पाळायची पथ्ये ह्या विषयी काहितरि माहितिपुर्ण
हे काय कोणीही लिहील, आणि कुठल्याही वेबसाईटवर सापडेल...

हेच म्हणतो! सदर लेखाकडे मधुमेहाविषयी माहितीपूर्ण लेख म्हणून न पाहता एक ललितलेखन म्हणून पाहावे व त्याचा आस्वाद घ्यावा. मधुमेहाविषयी दुसरी चर्चा सुरू करता येईल. परंतु प्रस्तुत लेखात मात्र ते विषयांतर ठरेल असे वाटते!

तात्या.

ध्रुव's picture

16 Jun 2008 - 3:23 pm | ध्रुव

लेख फक्कड जमलाय. तुमच्या लिहीण्याच्या शैलीमुळे संपूर्ण लेख वाचला.
बाकी ते भोजनंबू गाणं मस्तच आहे. :)
--
ध्रुव

विसोबा खेचर's picture

16 Jun 2008 - 5:54 pm | विसोबा खेचर

व्यंकोबा,

मस्तच लिहिलं आहेस बरं का! मजा आली...

पौष्टीक अरसिकता हा शब्द आवडला! :)

किंवा डाव्यापक्षांतून चावटपणा काढून घेण्यासारखं आहे.

हे मस्त!

असो, थोडक्यात काय तर तुला मधुमिया नाही. तेव्हा काय चाहेल ते हाण बिनधास्त! :)

अजूनही असंच उत्तम लेखन येऊ दे, ही विनंती...

तात्या.

II राजे II's picture

16 Jun 2008 - 5:57 pm | II राजे II (not verified)

"लेख फक्कड जमलाय. तुमच्या लिहीण्याच्या शैलीमुळे संपूर्ण लेख वाचला"
हेच म्हणतो...

बाकी,

असेच लिहीत राहा ;)
छान जमला आहे लेख...
तात्यानूसार ह्या लेखाकडे ललित लेख म्हणूनच पहावे... रोगाची लक्षणे व उपाय ही नवीन चर्चा चालू करा.. ;)

राज जैन
मृगजळाचा पाठलाग नेहमीच जीवघेणा ठरतो... आपली पाण्याची बाटली नेहमी आपल्या जवळ बाळगावी... ;)

व्यंकट's picture

16 Jun 2008 - 8:10 pm | व्यंकट

धन्यवाद मित्रहो !

व्यंकट

यशोधरा's picture

16 Jun 2008 - 10:56 pm | यशोधरा

मस्त लिहिलय!!

चतुरंग's picture

17 Jun 2008 - 12:20 am | चतुरंग

व्यंकटराव, पुढच्या वेळी जरा जास्ती लिहाना म्हणजे आणखीन मजा येईल.

(हे म्हणजे उथळ बुडाच्या बाहेरुन मोठ्या दिसणार्‍या बाऊलमधून श्रीखंड खाल्ल्यासारखं वाटलं! आत्ता होतं म्हणेपर्यंत फक्त बोटं चाटत बसल्यासारखं! ;)

चतुरंग

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Jun 2008 - 10:03 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

झकास जमलाय लेख !!!

अवांतर : मधुमेहाची टेस्ट करावी वाटतेय :(

विश्वजीत's picture

23 Jun 2008 - 7:30 pm | विश्वजीत

रक्तचाचणी केली असता जेवणानंतरची रक्तशर्करा जर १२६ आली असेल तर ताबडतोब लॅबमधे पुन्हा एकदा चाचणी करावी. तसाही १२६ हा आकडा म्हणजे तुम्ही आहारनियंत्रण व नियमित व्यायाम केलाच पाहिजे असे दर्शवतो.

छान लिहिला आहे. विवाह भोजनंबूही भन्नाट आहे.