रणरणती दुपार. जेवण अंगावर आलेले. बारीक स्वरात एफ एमची निवेदिका कानाशी माशी गुणगुणल्याप्रमाणे गुणगुणत होती. त्याचा अर्थ काही मनात शिरत नव्हता. थोडा वेळ गुणगुणून झाल्यावर थकून की काय टी एकदम गप्पा झाली अन एक ग्याप. मग एकदम पियानोच्या सुरेल सुरावटीतून एक परिचित सूर गीतलकेरीच्या रुपात कानात आणि कानातून मनात घुसला..
तुम्हे याद होगा कभी हम मिले थे
मुहब्बतकी राहोमे मिलके चले थे..
मागोमाग सुरेल किनऱ्या व्याकुळ स्वरातील शब्द..
भुला दो मुहब्बतमे हम तुम मिले थे
सपनाही समझो के मिलके चले थे..
१९५९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सट्टा बाजार’ या चित्रपटातील हे गीत कळत्या वयापासून जीवाला एक हुरहूर लावून गेलं आहे. हेमंत कुमार यांचा खर्जातला अनुनासिक भरीव पण मधुर स्वर अन लतादीदींचा कमलतंतूसारखा कोमल अन बारीक स्वर कल्याणजी आनंदजींच्या शीतल संगीतलहरींवर झुळझुळत या गीतामधून कानात शिरला की, भरून आलेल्या संध्याकाळी, झाडांच्या शेंड्यांना टेकणाऱ्या, आकाशातल्या ढगावर बसून झुलत असल्यासारखं वाटतं.
पहिल्यांदा हे गीत ऐकलं ते टीनएजमध्ये होस्टेलवर एका सरत्या संध्याकाळी. आम्ही मैत्रिणी दमून भागून पाय पसरून बसलो असताना, रेडिओची खुंटी पिरगाळल्यावर विविध भारतीवर अचानक या गाण्याचे स्वर घुमू लागले. तेव्हाच त्या स्वरामधली आर्तता अन शब्दामधला दर्द हृदयात कायमचा रुतून बसला. कुठून कुठून शोधून हे दुर्मिळ गाणे रेकॉर्ड करून घेतले अन त्यामागच्या कलाकारांचा तपास लावण्याचा प्रयत्न केला. आंतरजालाची सुविधा तेव्हा नसल्यामुळे चित्रपट ‘सट्टा बाजार’, कलाकार मीना कुमारी, बलराज सहानी , गायक हेमंत कुमार, लता मंगेशकर अन संगीतकार कल्याणजी आनंदजी यापेक्षा जास्त माहिती मिळाली नाही. कल्पनेनंच, पडद्यावर बलराज सहानी त्या प्रसिद्ध इस्त्रीबाज चेहेऱ्याने ‘तुम्हे याद होगा ‘ असं पुकारताहेत अन विशाल काळ्याभोर सजल नयनांनी मीनाकुमारी ‘भुला दो मुहाब्बतमे’ असं सादवतेय, हे चित्र डोळ्यापुढे आणत गीत पुन्हा पुन्हा ऐकायचो.
परवा आंतरजालावर शोधले तेव्हा पत्ता लागला की पडद्यावर हे गीत मीना कुमारी, बलराज सहानी यांच्यावर चित्रित झाले नसून असित सेन (तेच ते जाड्या ढमाल्या पोटवाले) अन कुणा विजया चौधरी यांच्या तोंडी गायले गेले आहे. बघितल्यानंतर असे मत झाले की बघण्यापेक्षा डोळे मिटून फक्त कानानी ऐकलेलेच चांगले.
पण काय ते शब्द अन काय त्या हेमन्तजी अन लतादीदींच्या, एकामागून एक उलगडणाऱ्या रेशमासारख्या स्वरांच्या लडी ! आहा ! त्या जुगलबंदीने कान तृप्त होऊन गेले !
परिस्थितीमुळे जुदा झालेल्या एका प्रेमी युगुलाचे दर्दभरे हालात गीतामधून प्रकट झाले आहेत. शब्द आहेत..
तुम्हे याद होगा कभी हम मिले थे
मुहब्बतकी राहोमे मिलके चले थे..
याला उत्तर मजबूर दु:खी प्रियतमेचे,
भुला दो मुहब्बतमे हम तुम मिले थे
सपनाही समझो के मिलके चले थे..
काळीज चिरत जाणारे त्याचे शब्द..
डूबा हुं गमकी गहराईयोंमे
सहारा है यादोंका तनहाईयोंमे
मग तिची आर्त सूचना ..
कहीं और दिलकी दुनिया बसालो
कसम है तुम्हे वो कसम तोड डालो
यावर त्याचा मुंह तोड जवाब..
नयी दिलकी दुनिया बसा ना सकुंगा
जो भुले हो तुम वो भुला ना सकुंगा
मग तिचा एक प्रयत्न अगतिकता दर्शवण्याचा..
अगर जिंदगी हो अपनेही बसमे
तुम्हारी कसम हम न भूलें वो कसमें...
बस ! बस ! मार डाला ! अभीभी याद है.. ’तुम्हे याद होगा’ ...!
हे गीत तुनळीवर इथे पाहता व ऐकता येईल.
प्रतिक्रिया
16 Apr 2012 - 7:29 pm | शुचि
फार आर्त गाणं आहे. छान आठवण करून दिलीत. आज ऐकेन घरी गेल्यावर.
16 Apr 2012 - 7:34 pm | चौकटराजा
शंकर जय मधे जय ज्यावेळी वारले त्यावेळी कल्याणजीनी त्याना आदरांजली वहाताना म्हटले होते" जय तू गेलास आता आम्ही कॉपी कुणाची करायची ? . कल्याणजी विरजी या नावाखाली ही त्यानी मस्त मस्त गाणी केली उदा . कैदमे है बुलबुल सय्याज मुस्कुराये हे लताबांईचे गीत.
नैना है जादू भरे हे मुकेश जी चे गीत. फारच म्हणजे मस्त कॉम्बी होता मुकेश- कल्याणजीचा .' जबसे तुझे जान गयी हे 'लताबाईंचे अरबी सुरावटीवरचे गीत बहारदार. हेमंतकुमार यांचे कल्याणजी हे सहायकही होते. नागिन ची बीन हे कल्याणजीनी वाजविलेले क्ले वायलीन आहे हे
सर्वश्रुतच आहे. काही गीतांमधे हेम़तदाचा आवाज हसमुख राय कल्याणजीनी वापरला. त्यातील एक भन्नाट गीत म्हणजे तुम्हे याद होगा-
टडं टण, टण डण डण , टण डण टणंट टण्डंट ट्ण अशी ती पियानोची इंट्रो.
16 Apr 2012 - 7:46 pm | पैसा
गाणं सुरेख आहेच. फक्त २ गोष्टी पटल्या नाहीत. एक म्हणजे लताच्या आवाजाला "किनरा"हे विशेषण आणि बलराज साहनीना "इस्त्रीबाज" चेहरा हे विशेषण.
17 Apr 2012 - 11:35 am | सस्नेह
अरे हो, चूक झाली पैसाताई !
एक डाव माफी असावी ! खरंच लताजींच्या आवाजाला किनरा हे विशेषण लागू पडत नाही.
16 Apr 2012 - 9:02 pm | मराठी_माणूस
एका छान गाण्याची आठवण
अशोक भंडारींनी हार्मोनिका वर अप्रतिम रितीने सादर केलेले हेच गीत ऐका
http://www.youtube.com/watch?v=PYsU9Gco97o
17 Apr 2012 - 11:37 am | सस्नेह
माफ करा, 'दुवा' द्यायचा प्रयत्न फसला.
http://www.youtube.com/watch?v=vTMvE4SZom8
हा दुवा जोडायला कुणी मदत करेल का ?
17 Apr 2012 - 12:19 pm | अमृत
http://www.misalpav.com/node/18708
बाकी गाणं व आठवण आवडली.
अमृत