सोफिया !
मोझंबीकमधील मापूटो नावाच्या गावात एका इस्पितळासमोर, पंधरा एक वर्षापूर्वी एक छोटी मुलगी एका गंजलेल्या चाकाच्या खुर्चीत हताशपणे बसलेली होती. तिला दोन्ही पाय नव्हते आणि तिचे वय असेल अंदाजे १० एक. माझे लक्ष तिच्याकडे गेले आणि का कोणास ठावूक मला तिच्याशी बोलावेसे वाटले म्हणून मी बोलले. तिच्या अस्फूटशा आवाजात मला तिने तिचे नाव सांगितले तो प्रसंग मला अजून लख्खपणे आठवतोय. ती म्हणाली “सोफिया”
आज अनेक वर्षानंतर आम्ही चांगल्या आणि अत्यंत जवळच्या मैत्रिणी आहोत. माणूस म्हणून जन्माला यायचे म्हणजे काय हे तिच्या एवढे मला कोणीही शिकवलेले नाही तसेच अत्यंत गरीबीत दिवस काढणार्यांमधे परिस्थितीशी झगडायची एवढी ताकद कुठून येते हे तिच्या एवढे चांगले कोणीच सांगू शकत नाही. ज्या घटकाला या समाजाच्या सगळ्यात खालच्या थरावर जगणे भाग पाडले जाते ते आपले जग किती अन्यायी, क्रूर आहे हे या थरातील लोकांच्या वेदनांना, हाल आपेष्टांना बघितल्यावर समजते. पण खरंच या वेदना, ही क्रूरता खरोखरच अनावश्यक आहेत.
हा शेवटचा शब्द फार महत्वाचा आहे. या आपल्या युगात पटायला सगळ्यात कठीण हीच बाब आहे की या हाल आपेष्टा आणि क्रूरता अनावश्यक आहेत. त्याच्या वाचूनही प्रगती शक्य आहे. हे वाक्य लिहितानाच कुठेतरी एक मुल मलेरियाने दगावलेले असेल तसेच या जगातील लाखो बालकांना हे वाचताही येणार नाही कारण त्यांना वाचता येत नाही. त्यांच्यासाठी या कसल्यातरी रहस्यमय खुणाच असतील. जगात आज लक्षावधी मुले लिहायला वाचायला न येता तशीच जगत आहेत याची एक लेखिका म्हणून घ्यायला मला खरोखरच शरम वाटते. दुर्दैवाने त्यांचा हा मुलभूत हक्क डावलला जातोय याची फार कमी जणांना जाणीव आहे. असो. मी काय म्हणत होते बर.... हं सोफी.....
लहानपणी सोफिया आणि तिची लहान बहीण तिच्या गावातील एका छोट्या रस्त्यावरून पळत होत्या. पहाटेची वेळ होती. पहाटेचे धूके खाली उतरले होते आणि समोरच्या डोंगरात सूर्य उगवत होता. सोफियाला रस्ता सोडायचा नाही हे चांगलेच माहीत होते कारण रस्त्याच्या कडेला असतात जमिनीतील सुसरी, ज्या पायाचे लचके तोडतात हे तिच्या आईने तिला अनेक वेळा सांगितलेले असते.
मुली पळत होत्या. मुलांना खेळायचा हक्क आहे आणि ती सांगितलेले विसरूही शकतात. हाही त्यांचा हक्कच आहे.
काय झाले असेल याचा सहज अंदाज बांधता येऊ शकतो.
पळता पळता सोफियाचा उजवा पाय रस्त्याबाहेरच्या मातीत पडला असणार. तो जमिनीत पुरलेल्या भुसुरूंगावर पडला असणार. आता तो भुसुरूंग असा रितीने पेरला होता की त्याच्यावर पाय पडला की तो तर उडेलच पण त्याच्या पुढचाही उडेल. तसेच झाले. सोफियाची बहीण मारीया जागेवरच ठार झाली आणि रक्तात माखलेल्या सोफियाला इस्पितळात आणण्यात आले.
मी नंतर जे डॉक्टर सोफियावर औषधोपचार करत होते त्यांच्याशी बोलले.
ते म्हणाले “ कुठल्याही डॉक्टरने सांगू नये अशी कबूली मी आज तुम्हाला देतो. पण मी हे सांगितले नाही तर त्या मुलीच्या खर्या ताकदीची तुला कल्पना येणार नाही”.
ते म्हणाले “ सोफियाला जेव्हा येथे आणले तेव्हा तिचे दोन्ही पाय तुटलेले होते. शरीरावरच्या मासाचे तुकडे ठिकठिकाणी लोंबत होते. छातीवर फक्त बरगड्याच रहिल्या होत्या. प्रामाणिकपणे सांगतो ती तिच्या बहिणीसारखी मरावी म्हणून आम्ही देवाची प्रार्थना करत होतो”.
पण सोफिया जगली. जगातील सर्व लष्करी उद्योगांपेक्षाही तिची ताकद जास्त होती. असे बलाढ्य उद्योग ज्यांच्या विरूद्ध जगातील गरीब काहिच करू शकत नाहीत. आपल्या उरलेल्या अवयवात आणि मनात सोफियाने आता एकच ध्यास घेतला आणि तो म्हणजे जगातील गरीबांना बाजूने या ताकदींच्या विरुद्ध उभे रहायचे.
या विचाराने तिने उभारी धरली आणि ती बरी झाली.
आज सोफियाला दोन मुले आहेत. तिचे शिवणकाम चांगले आहे आणि मुख्य म्हणजे तिचे शिक्षण चालू आहे. तिला शिक्षिका व्हायचे आहे. पण या पेक्षाही महत्वाचे म्हणजे जगात भुसुरुंगाच्या विरोधात जी काही चळवळ सुरू झाली त्या चळवळीची ती एक प्रेरणा आहे. अनेक तरूणांची ती प्रेरणा आहे.
माझ्या बाबतीतही तेच म्हणता येईल.
माझ्या आयुष्यात अनेक आनंदाचे क्षण येऊन गेले पण जेव्हा मी सोफियाला कृत्रिम पायावर चालताना बघितले तेव्हा माझ्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले आणी त्याच क्षणी आम्ही दोघिंनीही आमच्या आयुष्याचे ध्येय ठरवून टाकले “It is never too late !Everything is still possible” सगळे संपलेले नाही. शक्यता नाकारू नका !”
सोफियाची गाठ जेव्हा त्या जमिनीतील सुसरीशी पडली तेव्हा ती अडाणी होती. आता ती वाचू शकते आणि लिहूही शकते. आता ती स्वत:चे अनुभव लिहिते, तिची स्वप्ने लिहिते व तिला जे तत्वज्ञान समजलेले आहे तेही तिच्या सोप्या भाषेत लिहिते. ती ज्याच्या विरूद्ध उभी ठाकली आहे त्याची कारणेही ती लिहून सगळ्यांना पाठवते.
तिच्या दोन मुलांची ती नीट काळजी घेते आणि त्यांच्या भविष्याबद्दल ती खूपच आशावादी आहे. अर्थात काही वेळा ती जगात जे चाललेले आहे ते बघून उदास होते व तिच्या कुबड्यांचा आधार घेत निघून जाते जणु काही तिला या जगात रहायचेच नाही. अजून काही प्रसंगात ती अशीच निघून जाते ते म्हणजे जेव्हा इतर स्त्रीया नाचत असतात तेव्हा. आपल्याला याचे काही विशेष वाटणार नाही पण नाचता न येणं याच्या वेदना फक्त आफ्रिकन स्त्रीच समजू शकते. पण ती इतरांना वाईट वाटू नये म्हणून तेथून निघून जाते.
एका बाँबने तिच्या चिंधड्या उडवायचा प्रय्त्न केला पण ती जिद्दीने मृत्यूशी भांडली, तिने त्याला भीक घातली नाही. कोणीच तिला हरवू शकले नाही.
सोफियामधे मला जगण्यासाठीची कारणे व आशा दिसतात. तिची परिस्थितीला शरण न जाण्याची व लढत राहण्याची वृत्ती दिसते ती अजूनही तशीच आहे.
जयंत कुलकर्णी
मुळ लेखक : हेनिंग मॅंकेल.
प्रतिक्रिया
16 Apr 2012 - 4:50 pm | मनिष
आवडलं कसं म्हणू? पण डोळे पाणावले - सशक्त, सकस अनुवाद! :(
28 Feb 2019 - 11:28 am | मनिम्याऊ
अगदी अगदी
28 Feb 2019 - 2:37 pm | मनिम्याऊ
अगदी अगदी
16 Apr 2012 - 4:57 pm | प्रास
एका धगधगत्या विषयावरच्या लेखाचा अनुवाद करून आणि तो मिपावर प्रसिद्ध करून आम्हाला काही नव्या संकल्पनांची आणि नतमस्तक करणार्या व्यक्तिमत्त्वांची ओळख करून दिलीत याबद्दल आभारी आहे. असे कसदार लेख हीच मिपाची संपत्ती आहे आणि ही संपत्ती इथे निर्माण करणार्यांपैकी तुम्ही एक शिलेदार आहात असं नम्रपणे नमूद करू इच्छितो.
आणखी एक सूचवतो.
यामध्ये अधोरेखित वाक्याचं भाषांतर इंग्रजाळलेलं वाटलं. ते
असं काहीसं असतं तर योग्य वाटेल.
या लेखातील सोफिया आणि मूळ लेखिका हेनिंग मॅंकेल यांना त्यांच्या कार्याबद्दल शुभेच्छा!
(जयंतरावांचा पंखा)
16 Apr 2012 - 6:43 pm | जयंत कुलकर्णी
मला पण ते जरा चुकलेले वाटतच होते... असो योग्य तो बदल केलेला आहे.
आणि ध्नयवादही स्विकारा.
3 Sep 2014 - 4:52 pm | डॉ सुहास म्हात्रे
एका धगधगत्या विषयावरच्या लेखाचा अनुवाद करून आणि तो मिपावर प्रसिद्ध करून आम्हाला काही नव्या संकल्पनांची आणि नतमस्तक करणार्या व्यक्तिमत्त्वांची ओळख करून दिलीत याबद्दल आभारी आहे. असे कसदार लेख हीच मिपाची संपत्ती आहे आणि ही संपत्ती इथे निर्माण करणार्यांपैकी तुम्ही एक शिलेदार आहात असं नम्रपणे नमूद करू इच्छितो.
+१
जगातील सर्व लष्करी उद्योगांपेक्षाही तिची ताकद जास्त होती. ते उद्योग ज्यांनी गरीबांना, जे काहिच करू शकत नाहीत अशांना वेठीस धरले आहे.
हे खालीलप्रमाणे लिहीलं तर कसं वाटेल?"जगातील सर्व लष्करी उद्योगांपेक्षा तिची ताकद निश्चितच जास्त होती. पण त्या उद्योगांनी अगतिक गरिबांना वेठीस धरले आहे."
16 Apr 2012 - 6:16 pm | तिमा
लेख आवडला. भाषांतर चांगले झाले आहे. फक्त 'त्या वाक्याबाबत' प्रास यांच्याशी सहमत. भूसुरुंग विरोधी चळवळ चालू आहे हे माहित नव्हते. आपल्या येथील नक्षलवादी नेते हे सुशिक्षित आहेत. त्यांना ह्या चळवळीचे महत्व पटले तर किती बरे होईल.
ज्या सैनिकांचा त्यांत बळी जातो त्यांचा बिचार्यांचा काहीच दोष नसतो. जे या देशातल्या गरिबांकडे दुर्लक्ष करत आहेत त्यांना कधी शिक्षा होणार ?
16 Apr 2012 - 6:22 pm | बॅटमॅन
उत्तम कथा. भूसुरुंगावरून आठवलं, निवृत्त मेजर जनरल शशिकांत पित्रे हे आर्मीतील निवृत्त लोकांना जगात जिथे यादवी युद्धे सुरू आहेत, तिथे जाऊन ते भूसुरुंग निकामी करण्यासाठी पाठवतात. त्यांच्या संस्थेचे कार्यालय औन्ध मध्ये परिहार चौकात आहे.
http://www.indianexpress.com/news/exarmymen-clear-landmines-in-lanka-thi...
4 Sep 2014 - 6:41 am | स्पंदना
माहितीबद्दल धन्यवाद बॅटमॅन.
16 Apr 2012 - 6:55 pm | सुहास झेले
अनुवाद आवडला... :) :)
सोफियाला सलाम !!!
16 Apr 2012 - 7:19 pm | स्मिता.
अनुवाद छानच झालाय आणि कथानकही हेलावणारे आहे.
लेख वाचतांना सोफियासोबत झाला तो एक अपघात वाटत होता पण वर बर्याच प्रतिक्रियंमधे 'भूसुरुंग विरोधी चळवळ' असा उल्लेख आहे. यावरून तो काहितरी मोठा प्रश्न आहे हे जाणवते पण मला दुर्दैवाने त्याबद्दल काही माहिती नाही. कोणी जाणकार इथे माहिती देतील का?
16 Apr 2012 - 7:32 pm | जयंत कुलकर्णी
धन्यवाद !
16 Apr 2012 - 7:48 pm | प्रभाकर पेठकर
सोफियाचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. स्वभावातला चिवटपणा, विरुद्ध परिस्थितीत, झगडायची ताकद देतो.
थोड्याथोडक्या संकटांनी निराश होणार्या अनेकांना कथेतील सोफियाच्या उदाहरणातून विधायक ताकद मिळेल अशी आशा आहे.
16 Apr 2012 - 8:10 pm | पैसा
आणि सोफियाची सुरेख ओळख झाली. या मूर्तीमंत जिद्दीला आणि आशेला सलाम!
16 Apr 2012 - 8:14 pm | रेवती
अनुवाद आवडला.
16 Apr 2012 - 8:41 pm | निनाद मुक्काम प...
कुलकर्ण्यांनी सदर अनुवादित लेखातून सोफिया आणी तिची कहाणी आमच्या पर्यंत पोहोचवली ह्याबद्दल त्यांचे आभार.
17 Apr 2012 - 1:30 am | हुप्प्या
इथे ह्या लेखकाविषयी बघा.
http://www.henningmankell.com/
फोटोवरुन तरी पुरुष वाटतो आहे!
ह्याची कर्ट वलँडर ह्या डिटेक्टिव्हची पुस्तके मला खूप आवडतात. कथा संथ वेगाने पुढे जाते पण तरी आवडते.
17 Apr 2012 - 7:17 am | जयंत कुलकर्णी
वाटतो नाही आहे ! :-)
17 Apr 2012 - 7:55 am | ५० फक्त
अनुवाद उत्तम,
पण
'जगातील सर्व लष्करी उद्योगांपेक्षाही तिची ताकद जास्त होती. ते उद्योग ज्यांनी गरीबांना, जे काहिच करू शकत नाहीत अशांना वेठीस धरले आहे.' - खरंतर हे आणि फक्त हेच सत्य आहे, बाकी काही नाही. काळपट्लेल्या लोखंडी चिलखतावर चमकण्यासाठी लावलेल्या चंदेरी चांदण्यांसारख्या या घटना / कथा / कार्य करणा-या व्यक्ती आहेत. अर्थात त्यांनाही ही कल्पना असणारच की या चिलखताला त्या पुर्णपणे व्यापुन टाकु शकत नाहीत, आणि व्यापुन टाकलं तरी त्याचं अस्तित्व मिटवु शकत नाहीत, आणि त्यांना तसं करायचं देखील नाही. कारण त्याच्या अस्तित्वावरच त्यांचं अस्तित्व आहे. एक प्रकारची बांडगुळंच आहेत ही.
सर्वांना सुख लाभो अशी प्रार्थना करण्यापेक्षा दुस-याच्या दुखात आपला परोपकार साधुन घेणं ही यांची प्रवृत्ती आहे,
17 Apr 2012 - 11:31 am | पियुशा
ब्रेव्हो !!!!!
हॅट्स ऑफ टु सोफिया :)
3 Sep 2014 - 4:15 pm | कवितानागेश
एक उत्तम धागा वर काढतेय.
3 Sep 2014 - 5:17 pm | डॉ सुहास म्हात्रे
अत्यंत प्रेरणादायक आणि काळजाला भिडणारी कथा.
आता थोडे रखरखीत कटू सत्य...
भूसुरुंगांमुळे होणारी असैनिकी मनुष्यहानी आणि विषेशतः त्यापेक्षा जास्त प्रमाणात वाचलेल्या माणसांत होणार्या गंभीर अपंगत्व आणाणार्या इजांमुळे संयुक्त राष्ट्रसंघाने ओट्टावा ट्रिअॅटी (Convention on the Prohibition of the Use, Stockpiling, Production and Transfer of Anti-Personnel Mines and on their Destruction) प्रसिद्ध केली आहे.
१ मार्च १९९९ पासून व्यवहारात आलेल्या या करारावर ३ सप्टेंबर १९९७ ला सह्या करण्याची सुरुवात होऊनसुद्धा आजतागायत १९३ सभासद देशांपैकी १३३ देशांनी या तत्वतः मान्यता म्हणून करारावर सही केली आहे पण फक्त ४० देशांनी (२०%) देशांतर्गत कायदेशीर मान्यता घेऊन अंमलबजावणी सुरू केली आहे !
तत्वतःही मान्यता न देणार्यात व सही करण्यास नकार देणार्यांत अमेरिका, रशिया व चीन सामील आहेत.
भूसुरूंगाची मोठ्या प्रमाणात शिकार झालेले नागरिक असलेले देश मुख्यतः आफ्रिका आणि दक्षिणपूर्व आशियात (कंबोडिया, लाओस, व्हिएतनाम) आहेत.
3 Sep 2014 - 6:42 pm | एस
भूसुरूंगांची भारतातील परिस्थिती काय आहे आणि येथील विशेषतः नक्षलवादी-प्रभावित क्षेत्रात सामान्य नागरिकांच्या आयुष्यावर त्याचा काय परिणाम झालाय याबद्दल काही माहिती आहे का कोणाला?
3 Sep 2014 - 9:57 pm | डॉ सुहास म्हात्रे
कर्मधर्म संयोगाने आजच संडे गार्डियनमध्ये आलेल्या It’s time to declare India landmine-free country या बातमीत याबाबतीत बरीच माहिती मिळेल.
3 Sep 2014 - 10:36 pm | एस
याबाबतीत एक सामान्य नागरीक म्हणून काय करता येईल आपल्याला?
8 May 2015 - 1:43 am | श्रीरंग_जोशी
या माहितीबाबत इस्पीकचा एक्का यांचे आभार.
आपले मिपाकर श्री. राजघराणं यांनी काही वर्षांपूर्वी श्रीलंकेमध्ये भूसुरुंग शोधून ते नष्ट करणार्या पथकात काम केले आहे.
माहितीचा स्रोत - त्यांच्या चेपू खात्यावरील जुनी पोस्ट.
(function(d, s, id) { var js, fjs = d.getElementsByTagName(s)[0]; if (d.getElementById(id)) return; js = d.createElement(s); js.id = id; js.src = "//connect.facebook.net/en_US/sdk.js#xfbml=1&version=v2.3"; fjs.parentNode.insertBefore(js, fjs);}(document, 'script', 'facebook-jssdk'));
3 Sep 2014 - 7:19 pm | सूड
सुन्न करणारं आहे. तरीही सुरेख अनुवाद!!
उत्तम धागा वर काढल्याबद्दल आभार.
3 Sep 2014 - 10:00 pm | किसन शिंदे
दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर सोफियाने आपले आयुष्य उभे केलेले पाहायला मिळतेय.
हा धागा वाचलाच नव्हता, वर काढल्याबद्दल आभार.
अनुवाद सुंदर झालाय.
4 Sep 2014 - 5:51 am | इनिगोय
+१
असेच म्हणते. प्रतिसादांतूनही खूप माहिती मिळाली.
3 Sep 2014 - 10:45 pm | मधुरा देशपांडे
सुंदर अनुवाद.
1 Mar 2019 - 3:58 pm | श्वेता२४
खुपच सुंदर अनुवाद. हा धागा वर काढला त्यांचे आभार