तू घे विसावा जरा........!

रसप's picture
रसप in जे न देखे रवी...
1 Apr 2012 - 11:43 am

होते रोज सुरू पहाटसमयी गर्दी इथे धावती
सारे शांतपणे कसे समजुनी वेगास त्या पाळती ?
कंटाळा करती कधी न बसती काट्यासवे चालती
पाहूनी तुज वाटले गजब ना ही मुंबईची गती ?

जागेला धरण्यास लोकलमधे घेती उड्या धावुनी
हॉटेलात कधी पहा बसुनिया खाती भुका मारुनी
जो-तो येउन हो अधीर बनुनी होतो उभा मागुनी
घाई ही कसली असे? कळ नसे, थांबावया जाणुनी

घेणे श्वास जरा नसेच जमणे ह्या धावणाऱ्या जगा
नाही मंजुरही कुणास दमणे, रेंगाळणेही उगा
विश्रांती नच लाभते क्षणभरी आकाशवेड्या ढगा
त्याला ठाउक एक फक्त असे होणे जळाचा फुगा !

तूही आजच जुंपलास झटण्या गाड्यास ऐसा खरा
झाला थोर जरी 'मनी*' कमवुनी, तू घे विसावा जरा........!

....रसप....
१ एप्रिल २०१२
शार्दूलविक्रीडीत - गागागा ललगा लगा लललगा गागा लगागालगा
मनी* = Money, पैसा
"मराठी कविता समूहा"च्या "लिहा ओळीवरून कविता - भाग ८९ मध्ये माझा सहभाग.. (एक
हलकं फुलकं 'सुनीत' लिहिण्याचा प्रयत्न आहे..)
http://www.ranjeetparadkar.com/2012/04/blog-post.html

हास्यकविता

प्रतिक्रिया

जेनी...'s picture

1 Apr 2012 - 11:47 am | जेनी...

खूप खूप शुभेच्छा ..

मुम्बैच्या गर्दिचि आठ्वन करुन दिल्याबद्द्ल धन्यवाद ..

अमितसांगली's picture

1 Apr 2012 - 12:03 pm | अमितसांगली

छान केलंय वर्णन...........

त्याला ठाउक एक फक्त असे होणे जळाचा फुगा !

ह्या ओळीत व्रुत्तभंग झाला...

इथे असे वाचावे -

"त्याला ठाउक एक केवळ असे होणे जळाचा फुगा !"

अत्रुप्त आत्मा's picture

1 Apr 2012 - 12:40 pm | अत्रुप्त आत्मा

मुंबई दाखवलीस गड्या ,येक नंबर जमलीये भट्टी :-)

चौकटराजा's picture

1 Apr 2012 - 1:21 pm | चौकटराजा

शार्दूलविक्रिडित या वृत्ताला मंगलाष्टका खेरीज २०१२ मधे कोणीतरी आठवतंय याचा मनस्वी विस्मय !
हे वृत्त तसे खाष्टच आहे असे माझे आपले मत.' फक्त 'चे 'केवळ' लगेच करावे लागले की नाही ? पण आपल्या जागी शब्दकळा नांदत असल्याने
ते आपल्याच लगेचच लक्षांत आले हे विशेष !
बाकी मुंबईची धावपळ ही माझ्यासारख्या पुणेकराचा कुतुहलाचा वा काहीसा आदराचाच विषय आहे." मुंबय नगरी बडी बाका " किंवा इन्सांका
नही कही नामोनिशां असेही या शहराचे वर्णन वाचावयास मिळते. पण रेल्वेमधे " पुढे ए मधे जा तिथे एक सीट आहे" असे ओरडून ग्रूप वाल्याची
सोय करण्याची लगबग , काय रे आज पहिली चुकली का ? असे संवाद ऐकले आपुलकीचा ओलावा त्या भर उन्हातही दिसतो त्यावेळी माणूस हा खरेच अजब प्राणी आहे हे पटते.
आपला प्रयत्न दाद देण्यासारखा !

धन्यवाद !

एक गोष्ट मान्य करतो, 'ती' चूक माझी मलाच लक्षात आली नव्हती. थोबाडपुस्तकावरील एका मित्राने वाचल्याक्षणी मला सांगितले की, "ह्या ओळीत मात्रा परत एकदा तपास..!"
बदल माझा मीच केला, पण चूक माझी मला लक्षात आली नव्हती.

पण 'नाठाळ' व्रुत्तांच्या कुटुंबातील हे एक व्रुत्त निश्चितच आहे..!

निवेदिता-ताई's picture

1 Apr 2012 - 3:08 pm | निवेदिता-ताई

छान लिहिलय....

पैसा's picture

1 Apr 2012 - 4:49 pm | पैसा

मुंबयची गर्दी आणि धावपळ आवडत नाही, पण कविता आवडली!

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

2 Apr 2012 - 3:17 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

मस्त रचना.