कान्हेरीचे विशाल चैत्यगृह पाहून पुढील लेणी पाहावयास निघालो.
इथून पुढच्या सर्व लेण्या डोंगराच्या वेगवेगळ्या पातळीत खोदलेल्या आहेत. सर्वच विहार आहेत. वेगवेगळ्या विहारांत जाण्यासाठी अंगच्याच कातळामध्ये जिने खोदलेले आहेत.
चैत्यगृहाच्या पुढेच लेणी क. ५ च्या पाण्याच्या टाक्याच्या वरच्या बाजूला कोनाड्यात सातवाहनांचा एक अतिशय महत्वाचा काहीसा खंडित शिलालेख कोरलेला आहे.
.........वासिष्ठीपुत्रस्य श्रीसात[कर्णि]स्य देव्या: कार्दमक-राजवंशप्र[भ]वाया महाक्षत्र[प] रूद्र...पुत्र्या:......
.......[स्या:]....[वि]श्वस्यस्य अमात्यस्य शतेरकस्य पानीयभोजनं देयधर्म्मः
.....वासिष्ठिपुत्र श्रीसातकर्णीची राणी....जी कार्दमक राजवंशात जन्मली आहे आणि महाक्षत्रप रूद्र (रूद्रदामन) याची कन्या आहे तिच्या शतेरक नामक विश्वासु अमात्याचा हे पाण्याचे धर्मदाय आहे.
हा शिलालेख प्राचीन ब्राह्मी लिपीत असून भाषा किंचित अशुद्ध संस्कृत आहे. हा रूद्रदामन माळवा-काठेवाडचा शक महाक्षत्रप. याचे बरेचसे शिलालेख शुद्ध संस्कृतात आहेत. गौतमीपुत्र सातकर्णीने केलेल्या नहपान क्षत्रपाच्या समूळ उच्चाटनानंतर रूद्रदामनाने आपली कन्या त्याच्या पुत्राला वासिष्ठिपुत्राला दिली होती. गौतमीपुत्राच्या निधनानंतर सातवाहन-क्षत्रप संघर्षात रूद्रदामनाने वासिष्ठिपुत्राचा दोन वेळा पराभव करूनही जामात असल्याच्या कारणाने त्याला जीवंत सोडून दिले होते. हा सगळा उल्लेख रूद्रदामनाच्या जुनागडच्या शिलालेखात येतो.
रूद्रदामनाच्या वंशाचे 'कार्दमक' हे नाव कान्हेरीच्या ह्या शिलालेखात येते तसेच क्षत्रपांचा संस्कृतवरील प्रभावही या लेखावरून दिसून येतो.
कातळातीलच जिना चढून वरच्या पातळीत गेलो, मंद उतार असलेला सपाटसा कातळ असल्याने कातळाच्या अंतर्भागात खोदत जाऊन कृत्रिमपणे उभा कडा निर्माण करून इथल्या विहारांची रचना केलेली आहे. त्यामुळे उंचीने इथले विहार तसे थोटकेच आहेत. जवळपास प्रत्येक विहारात पाण्याची टाकी खोदलेली आहेत. विहारांची रचनाही जवळपास सारखीच आहे. ओसरी, सभामंडप आणि आतमध्ये कक्ष अशी यांची रचना. बहुतेक विहारांत महायानकाळात खोदलेल्या विविध बुद्धप्रतिमा आढळून येतात.
१. कातळामध्ये कोरलेले जिना
२. विहारांची सर्वसाधारण रचना
३. विहार
४. विहार
लेणी क्र, ६७ चा विहार अत्यंत महत्वाचा. ओसरीच्या बाहेरच्या बाजूस कोरलेले खांब, ओसरी आतमध्ये सभामंडप आणि त्याच्या आत मध्ये मध्ये कोरलेले विश्रांतीकक्ष अशी याची रचना. हा विहार बोधिसत्वाच्या प्रतिमांनी अक्षरशः भारून गेला आहे. जिकडे बघावे तिकडे अतिशय सुंदर प्रतिमाच कोरलेल्या दिसतात.
बुद्ध कधी सिंहासनावर बसलेला आहे, कधी चौरंगावर बसलेला आहे तर कधी पद्मासन घालून आसनस्थ बसलेला आहे. कधी अवलोकितेश्वराच्या प्रतिमेत तो उभा राहून आशीर्वाद देतो आहे तर कधी कमळावरच पद्मपाणी बोधिसत्वाच्या रूपात ध्यानस्थ बसलेला आहे. नंद आणि उपनंद हे दोन नागशिष्य त्या कमळाच्या देठाला आधार देत आहेत. अतिशय सुंदर असा हा विहार आहे.
५. लेणी क्र. ६७ च्या ओसरीतील कोनाड्यांवर कोरलेल्या बुद्धप्रतिमा
६. विहाराचा अंतर्भाग
७. ध्यानस्थ बुद्ध
८. विविध बुद्धप्रतिमा
९. नंद आणि उपनंदाने आधार दिलेल्या कमळावर पद्मपाणी बोधीसत्व
इथून पुढच्या बहुतांश विहारांत कमी अधिक उठावदार अशा कोरीव बुद्धप्रतिमा नजरेस पडतात. बर्याच ठिकाणी ब्राह्मी लिपीतले कोरीव शिलालेखही दिसत जातात. बहुतेक शिलालेख त्या त्या विहारांच्या दातृत्वाचे आहेत. इथले ८९/९० क्रमांकाचे विहारही वैशिष्ट्यपूर्ण. इथल्या ओसरीतील स्तंभांवर थोडीशी कलाकुसर केलेली आढळते. ओसरीतील कोनाड्यात तसेच आतल्या विहारातही कोरीव बुद्धप्रतिमा स्तूप आदी प्रतिकांसह कोरलेल्या आहेत.
१०. लेण्यांतील काही सुघड प्रतिमा
११. शिल्पसौंदर्य
१२. लेण्यांतील काही सुघड प्रतिमा
१३ व १४. बुद्धप्रतिमेभोवती असलेले आकाशगामी गंधर्व
१५. अद्भूत शिल्पकला
आता आम्ही डोंगराच्या वरच्या पातळीतील सर्व विहार बघून पलीकडच्या बाजूच्या कातळातील जिन्याने खाली उतरायला लागलो. इथेही मध्ये मध्ये विहार आहेतच. काही विहारांत गाभारासदृश रचना दिसते. आतमध्ये भलीमोठी बैठी बुद्धप्रतिमा कोरलेली दिसते. सहाव्या सातव्या शतकातल्या लेणीतून मंदिरांकडे होत असलेल्या स्थित्यंतराचा हा प्रभाव.
१६. विविध पातळ्यांत खोदलेले विहार
१७. विविध पातळ्यांत खोदलेले विहार
आता लेणी क्र. ३४ पाशी आलो. या विहारात एक आश्चर्य दडलेले आहे. इथेही ओसरीत नेहमीप्रमाणेच बुद्धप्रतिमा कोरलेल्या आहेत. इथे अंतर्भागातील छतावर लक्षपूर्वक पाहा. उत्तर अजिंठा शैलीतील बोधिसत्वाचे एक अपूर्ण चित्र इथे रंगवलेले आहे. ध्यानस्थ बसलेला बुद्ध-चेहरा अपूर्णावस्थेत, त्याच्या आजूबाजूला नक्षीदार स्तंभ, बाजूला सेवक, वेलबुट्टीची ऩक्षी आणि बुद्धाचा अजून एक चेहरा असे सुरेखसे चित्र येथे चितारले आहे. जवळजवळ १६००/१७०० वर्ष होऊनही हे चित्र आजही बर्यापैकी सुस्थितीत आहे. छताला आधी शेणामातीचा,काथ्याचा गिलावा द्यायचा आणि नंतर त्यावर जैविक रंगात चित्र रंगवायचे अशी याची पद्धत. इथल्या काही लेण्यांत असे गिलाव्याचे थर बरेच दिसतात. यावरून अजूनही बरीच चित्रे येथे असली पाहीजेत असे अनुमान सहजी काढता येते.
१८. लेणी क्र. ३४ च्या छतावरील अपूर्ण असलेले रंगीत चित्र.
१९. बुद्धाचा चेहरा
२०. सेवक व नक्षीदार वेलबुट्टी
२१. चित्राचा अवशिष्ट भाग.
इथेच लेणी क्र. ३६ च्या व्हरांड्याच्या भिंतीवर सात ओळीचा एक शिलालेख कोरलेला दिसतो.
सिधं [|] रञो माडरिपुतस स्वामिसक्सेनस
सवछरे ८ गि प ५ दिवसे दिव १० एताय पुवाय क -
लियणकस नेकमस वेण्हुनंदिस पूतस नेग-
मस गहपतिस ...तिस लेण पतिठापि-
त सहा आय्य्केन.. सेन सहा पितुणा वेण्हुन-
दिना सहा मातुय बोधिसमाय सहा भा -
[तुना..]हथिना सहा [स]वेन [निकाययेनेति] [|*]
सिद्धी असो. राजा माढरीपुत्र स्वामी शकसेनाच्या राज्यकालाच्या संवत्सर ८, ग्रीष्म पक्ष ५, दिवस १० या पूर्वोक्त तिथीस कल्याणचा रहिवासी आणि व्यापारी विष्णुनंदी याचा पुत्र, व्यापारी आणि गृहपती....याने हे लेणे कोरविले. त्याच्याबरोबर आर्यक(पूज्य)...त्याचा पिता विष्णुनंदी, त्याची माता बोधिसमा, याचा भाऊ हस्ती आणि सर्व व्यापारी वर्ग सहभागी आहेत.
हा माढरीपुत्र सातवाहनवंशीय असावा. श्री यज्ञ सातकर्णीनंतर हा या प्रदेशाचा स्वामी असावा. याची काही नाणी आंध्रप्रदेशातही सापडलेली आहेत.
२२ व २३. काही शिलालेख
इथून पुढची लेणी एका अरुंद दरीने विभागली गेली आहेत. बर्याचश्या लेण्यांच्या खांबांची पडझड झाली आहे. इथला धुव्वाधार पाऊस, उतरता कातळ, बराचसा सच्छिद्र असलेला बेसाल्ट खडक आणि पुरातत्व खात्याचे अक्षम्य दुर्लक्ष या सर्व कारणांच्या एकत्रित परिणामी इथली लेणी ही मोडकळीस आलेली आहेत. सध्या त्यांचे दुरुस्तीचे काम चालू असलेले दिसले खरे.
२४. भग्न होत असलेले विहार
२५ जीर्ण स्तंभ
लेण्यांच्या कडेनेच असलेल्या अरूंद वाटेने एकेक लेणी बघत परत आधीच्या बाजूला आलो. इथे एक प्रचंड विहार खोदलेला आहे. बाहेरच्या बाजूला कलाकुसरीचे खांब आहेत. चौकोनी उतरता पट्ट्यांचा तळखडा, त्यावर चौकोनी आकाराचाच स्तंभ आणि वर घंटाकार आमलक अशी याची रचना. ओसरीवरच शिलालेख आणि कोनाड्यात बुद्धप्रतिमा कोरलेल्या आहेत. हे बघतच आतमध्ये प्रवेश केला. इथे प्रचंड संख्येने येणार्या बौद्ध भिक्खूंसाठी एक भोजनालयच खोदवलेले आहे. ताटे ठेवण्यासाठी समांतर रांगेमध्ये उंचवट्याच्या दोन सपाट लाद्याच कोरलेल्या आहेत. आतल्या बाजूला बहुधा शिधा ठेवण्याचे कक्ष आहेत. तिथेही बुद्धप्रतिमा कोरलेल्या आहेतच.
२६. भोजनविहार
२७. तिथल्या ओसरीवरील कलाकुसर केलेले स्तंभ
२८. ताटे मांडण्यासाठी केलेली सपाट लाद्यांची रचना
२९. भोजनभाऊ मिपाकर
तिथून बाहेर आलो. उरलेले विहार बघतच परत चैत्यगृहापाशी आलो. उन्हामुळे कावलेल्या मिपाकरांनी आता ओसरीवरच मस्तपैकी ताणून दिली. विलासरावांचे तैवान, पट्टायाचे रमणीय अनुभवकथन, आशूचे परिक्रमेतील विविध अनुभव सांगणे सुरुच होते. थोडावेळ तिथेच विश्रांती घेऊन परतीच्या वाटेवर लागलो.
३०. उन्हातान्हात कावलेले मिपाकर
३१. एका पेटत्या दुपारी
३२ निवांपणे हास्यविनोदात दंग
नॅशनल पार्कच्या प्रवेशद्वारावर जाणारी बस उभीच होती. बोरीवलीला जेवण करून पुढे बाकीचे आपापल्या वाटांनी घरी गेले. मी, मोदक, विलासराव आणि आशूने मात्र फोर्ट एरियात एक मस्त फेरफटका मारून काही पुस्तकांची खरेदी केली. आम्हाला सीएसटीवर सोडून दोघे गिरगावात गेले आणि दख्खनची राणी पकडून पुणे गाठले ते लवकरच घारापुरीला यायचा संकल्प करूनच.
समाप्त
मिपाकरांसोबत जरी हे लेणीदर्शन असले तरी प्रत्यक्षात मिपाकरांबरोबर घडलेल्या गप्पाटप्पा, झालेल्या गंमतीजमती याचा उल्लेख लेखात फारसा, किंबहुना काहीच आलेला नाही. सहभागी मिपाकर यथाशक्ती भर घालतीलच.
सहभागी मिपाकरः किसन शिंदे, आत्मशून्य, विलासराव, मोदक, स्पा, सौरभ उप्स आणि अस्मादिक
प्रतिक्रिया
28 Mar 2012 - 11:35 pm | पैसा
नेहमीप्रमाणे वल्ली स्टाईल.
८ नंबरच्या फोटोत मूर्ती कोरून काढल्यानंतर शिल्लक राहिलेला दगड दिसतोय का तो?
29 Mar 2012 - 12:19 am | प्रचेतस
हो सर्व काही एकाच अखंड कातळात कोरलेले आहे.
ते बसण्यासाठी कोरलेले ओटे आहेत.
29 Mar 2012 - 10:43 pm | रामपुरी
बसण्याच्या जागेवर बुद्धप्रतिमा उलट्या कोरलेल्या आहेत काय? समजलं नाही...
प्रतिमा कोरून उरलेला दगड वाटत नाही. एवढ्या प्रतिमा दगडातून कोरून उरलेला दगड असा एक सलग बाजूला काढणं शक्य वाटत नाही.
29 Mar 2012 - 10:49 pm | प्रचेतस
नाही हो.
बुद्धप्रतिमा सरळच आहेत. आधी ओटे कोरून मग त्यावरच्या भिंतीवर बुद्ध प्रतिमा कोरलेल्या आहेत.
29 Mar 2012 - 12:08 am | यकु
व्वॉव्व !
ही फक्त पोच. चर्चा आणि सहभागींच्या प्रतिसादांच्या प्रतिक्षेत.
अवांतर@ आत्मशून्यः ओंकारेश्वर ते नर्मदेचे खोरे, बुद्धविहार असलेली कान्हेरीची लेणी ते गोराईचे विपश्यना केंद्र असा तुझा प्रवास खूप काही सांगतो आहे ! फक्त मिपावरचे मित्र आहेत म्हणून तु या सर्व ठिकाणी गेलास एवढाच त्याचा अर्थ होत नाही हे दिसते आहे. माऊ सांगते तसं, देअर आर अॅन्जेल्स विथ यू. Are you watching closely?
29 Mar 2012 - 1:06 am | आत्मशून्य
खरोखर मन रमण्यासारखं ठीकाण आहे, जवळपास १०७ गुहा आहेत इथे. तसच हा सगळा जंगलाचा परीसर असल्याने जंगल सफारीही इथें उपलब्ध असते. वाघ वगैरे दाखवतात म्हणे.
29 Mar 2012 - 12:44 am | तर्री
खूपच छान.
29 Mar 2012 - 12:59 am | आत्मशून्य
मुळातच मुंबैला इतकं निवांतपणे जाणं पहील्यांदाच झालं त्यातही हिकडेतिकडे फिरताना जागेपणीचे तास मोजले तर लोकलमधे जास्त वेळ आणी एखाद्या ठीकाणी कमी असच वेळापत्रक झालं होतं. अगदी लोकलमधे नसेन तर चुकल्या चुकल्या सारखं वाटु लागायचं ;) त्याची कसर या कान्हेरी लेण्यांच्या भेटीने अगदी भरुन निघाली. आणी मनसोक्त साइट सीइंग झालं. पुन्हा एकदा या ठीकाणाला भेट अवश्य दिल्या जाइल.
29 Mar 2012 - 1:01 am | जेनी...
सागर फोटो फारच बोलके टिपले आहेत.
फार आवडले....
29 Mar 2012 - 8:03 am | ५० फक्त
उत्तम माहिती आणि फोटो,
बाकी लेणी बरीचशी सग़ळीकडे सारखी असतात असं वाटतं, मात्र ते रंगविलेले चित्र पाहण्यास मात्र नक्की जाईन.
दगडात कोरुन काढलेल्या शिल्पांपासुन रंगकाम करुन बुद्धप्रतिमा रंगवणे, हा प्रवास शिल्पकारांच्या कमतरतेमुळे झाला असावा की रंगकामातल्या प्रगतीमुळे असे वाटते, यावर काही सांगु शकाल काय ?
29 Mar 2012 - 9:22 am | प्रचेतस
लेण्यांमध्ये रंगकाम बर्याच आधीपासून चालू होतेच. मावळातल्या बेडसे, भाजे, जुन्नर मधील मानमोडीच्या लेण्या इथे रंगांचे पुसटसे अवशेष दिसतात. शिवनेरी कड्यातल्या एका चैत्यगृहात आजही रंगांनी काढलेली नक्षी दिसून येते.
पण त्याकाळी रंगांद्वारे फक्त नक्षी काढली जात असे आणि शक्यतो चैत्यगृहातच हे काम केले जाई.
महायानकाळानंतर बौद्धप्रतिमा रंगवण्याची प्रथा सुरु झाली. अजिंठा लेण्यात तिचा सर्वोच्च अविष्कार गाठला गेला. शिल्पकार आणि रंगकर्मी हे वेगळे असत.
29 Mar 2012 - 9:29 am | अन्या दातार
उत्तम वृत्तांत. आता कान्हेरीस जाणे केलेच पाहिजे.
29 Mar 2012 - 9:56 am | स्पा
जबरजस्त फोटू , आणि माहितीपूर्ण वर्णन
सविस्तर प्रतिक्रिया लवकरच
29 Mar 2012 - 10:02 am | प्रास
उत्तम वृत्तांत वल्लीशेठ! :-)
आणखी काही ग्राफिटी वगैरेंचं आणि डोंगर नि समुद्र एकाच वेळी दिसू शकणारी विहारातली ध्यानाची जागा वगैरेंचं फोटोत्मक वर्णन आलं असतं तर बहार आली असती. पुढल्यावेळीसाठी काही राखून ठेवलं आहे अशी आशा....
आमच्या मुंबईमहानगरामधल्या एकमेव नॅशनल पार्कात जाऊनही आमच्या इथलं प्राणीसौंदर्य न पाहिल्याबद्दल तिथे गेलेल्या मिपाकरांचा (थोडा का होईना पण) निषेध!
29 Mar 2012 - 10:36 am | मी-सौरभ
अजून एक ट्रिप मिस झाली याच दु:ख आहेच पण जाउ द्या..
29 Mar 2012 - 10:41 am | गवि
ओहो.. काय अफलातून सफर केली आहेत तुम्ही.. ही इतकी पुढची लेणी /विहार तर मी पाहिलेही नव्हते. धबधब्यापर्यंत जाऊन परत यायचो इतकेच.
खूप डीटेल धांडोळा घेतला आहेस तू.. आता हे सर्व पाहण्यासाठी आवर्जून परत एकदा कान्हेरीला जाईन..
घरापासून वीसपंचवीस मिनिटांवरचं हे ठिकाण नव्या दृष्टीने दाखवून थक्क केलं आहेस...
अनेक धन्यवाद... एलेफंटा जरुर बघ.. कान्हेरीइतका विस्तार नसला तरी भव्य आहे जास्त.
29 Mar 2012 - 2:08 pm | अत्रुप्त आत्मा
सगळे फोटो अतिशय योजकतेने काढलेले आहेत... :-) बारिकसारिक माहितीपण छान दिली आहे...
अता फोटोंविषयी...
क्रमांक-१,३,६,७,१३,१४,१५,१६,२५,२८,२९ ;-) आणी ३२ विशेष अवडले....
फोटू क्रमांक-२९ >>>
इतरांचे हात ताटात जेवण्याची अॅक्शन घेतलेले वाटातायत,
पण स्पांडू<<>>मन्या मात्र चोच मारल्या सारखा अॅक्शन करतोय (हातानी ;-) ) असं वाटतयं... ;-)
फोटू क्रमांक-३२ >>>
इलासरावांची ध्यानस्थ मुद्रा पाहुन,किसनद्येव काहि दिक्षा देतायत की काय असा अंमळ संशय येतोय ;-)
29 Mar 2012 - 1:48 pm | स्पा
डोंगराच्या विविध पातळ्यांवर असलेले विहार.. खूपच सुंदर दिसत होते.
मन एकदम त्या काळात गेल.. कधी काळी तिथे भिक्कुंचा राबता असेल.. भोजन गृह तर बापरे.. अतिशय प्रचंड होत
आता मात्र त्या विहारात भकास शांतता होती.. रात्री तर सर्व विहार अंधारात गुडूप होत असतील ..
एखाद्या दिवाळीत प्रत्येक विहारात आणि समोरच्या जागेत छान पणत्यांची आरास करण्याची कल्पना डोस्क्यात येऊन गेली.. काय दृश असेल ते.. झकास
वल्ली अर्थात फोटो साठी पळापळ करत होता.. मोदकाला विलास राव आणि आत्मशुन्य ने कोपच्यात घेतलेलं होत.. मला तर वाटल जाता जाता तो CST वरून ट्रेन पकडून डायरेक्ट ओंकारेश्वर गाठेल :)
मधल्या एक टाक्यातल्या गारेगार पाण्याने तोंड धुतलं.... आहाहाहा मजा आ गया :)
खाली पार्कची बस उभी होतीच .. ती सुटेपर्यंत मोदक.. मस्त काजूची फळ घेऊन आला ..
ती आंबट- तुरट चव असलेली फळ खायला मजा आली . तिथून निघून सरळ बोरीवली गाठलं. मस्त जेवलो. लोकल ने आम्ही दादर ला उतरलो
घरी यायला जवळ जवळ ५ वाजलेले होते
आठवड्याचे धुवायचे कपडे तसेच वाशिंग मशीन वर "आ वासून" पडलेले होते .. मातोश्रीच्या चेहऱ्यावरचा संताप जाणवत होता .. त्याकडे सरळ दुर्लक्ष करून झकास चहा ची ऑर्डर सोडली आणि कपड्याच बोचकं उचलल :)
30 Mar 2012 - 2:32 am | मोदक
झकास झाली ट्रीप.... भरपूर मजा केली..
किस्नाच्या घरातून निघाल्यावर एकही रिक्षावाला थांबेना आणि एकही बस दिसेना तशी शंका आली आणि नंतर कळाले.. कोणी नगरसेवक बाई बेपत्ता आहेत म्हणून ठाणे (जबरदस्तीने) बंद आहे..
बरेच अंतर चालल्यानंतर शेवटी किस्नाने कुठूनतरी एक रिक्षा आणली आणी आम्ही ठाणे स्टेशनवर बरेच उशीराने पोहोचलो..
बसमध्ये बसतो आहोतच इतक्यात नगरसेवक बाईंचे पित्तू, "बस जावू देणार नाही", "घरी जावा, सगळे बंद आहे" वगैरे प्रेमाचे डोस पब्लीक आणि बसच्या वाहक चालकांना देवून गेले.. बसचे वाहक व चालक मात्र बस जाणारच या ठाम निश्चयाने सगळ्यांना "बसा बसा" करत होते आणि खरेच एका मिनीटात बस मार्गस्थ झाली... (अॅप्रेजलचे दिवस पाहता "डेडीकेशन & कमीट्मेंट", "टीम वर्क", "Performing Extra mile" या नावांखाली एखादा प्वाईंट सर केला असावा त्या दोघांनी मिळून.. :-))
बोरीवलीला बस मधून उतरल्यावर मन्या आणि सौरभ 'कोणत्या हाटीलात दुपारी जेवायचे नाही' हे टेस्ट करून (आणि ठरवूनही ) आले. बाजूचे पौष्टीक स्टॉल बघून आशू कोरफडीचे ज्यूस की आवळ्याचे सरबत या विचारत दंग झाला होता.
आत गेल्या गेल्या एका हार्ले डेव्हीडसन टाईप सुझुकीने लक्ष वेधून घेतले. आणि त्या मॉन्स्टरकडे अधाशीपणे बघण्यात थोडा वेळ गेला. त्याच्यावरचा खलीटाईप माणूस मॉन्स्टरसारख्या अॅटीट्यूड बाळगून होता.. पार्कचे गेट ते लेणी असा प्रवास एका मारुती ओमनीने झाला.. "बरे झाले इतकेच लोक आहोत.. आणखी एखादा जरी आला असता तर त्याला टपावर बसावे लागले असते" असेही पीजे झाले.
लेण्यांच्या तिकीट खिडकीजवळ जाताच माझ्याकडे सुट्टे नाहीत असे लक्षात आले, विलासराव तिकिटे काढत असतानाच मी खिडकीच्या आतल्या काकांना सुट्ट्या पैशाची विचारणा केली...
काका एकदम कडक आवाजात - "दोन मिनिटे थांबा!"
आवाजाच्या टोन वरून काकांनी कोणत्या गावाचे पाणी जास्त पिले असावे असा विचार चालू झाला.. तितक्यात काकांनी पुन्हा आवाज दिला.. आणि.. ५०० ची एक नोट घेवून १०० च्या ४, ५० ची १, २० ची १ आणि १० च्या ३ नोटा दिल्या.
काकांचे सौजन्य बघता ५, २ आणि १ च्या नोटा (आणि नाणी) निघातात का अशीही शंका आली. :-)
लेणी बघणे आनंददायी अनुभव होता..
परत येताना काही मावश्या काजूफळे, तोरणे आणि बोरे विकत बसल्या होत्या... पिवळ्याधमक काजूफळांवर हल्लाबोल झाला.. झकास चव होती.
दुपारचे जेवण करून सगळेजण आपापल्या मार्गाला गेले.. विलासराव, आशू, वल्ली आणि मी फोर्ट मध्ये पुस्तकांच्या दुकानात शिरलो.. CST कडे निघताना कपीलदेव चे एक आत्मचरित्र माझ्या ब्यागेत जमा झालेले होते...
वल्ली बाबा आदल्या रात्रीच्या कर्व्यांकडच्या बासुंदीची चव जिभेवरून हालू द्यायला तयार नव्हते.. रात्रीच्या जेवणानंतर फक्त लिक्वीड डायेट वर दुसरा दिवसभर होते.
दख्खनची राणी आमची वाट पहात उभी होती.. (वल्लीचे आयत्या वेळचे तिकीट माझ्या बोगीच्या बरेच दूर आले होते.)
ट्रेन मध्ये समोर बसलेल्या व्यक्तीने थोड्याच वेळात त्याच्याजवळची कागदे फाडून ओरिगामी सुरू केली.. मीही मग त्याची विचारपूस करून माझी तिकीटे आणि जवळच्या टाकावू कागदांच्या सहाय्याने मला थोडीशी येणारी ओरिगामी सुरू केली.. बर्याच वर्षांनी कागदाला आकार देण्यासाठी हात लावला...
फायटर प्लेन (त्याच्यावरच्या मिसाईल सकट), डबल होडी, चार सीटर होडी तयार करताना मजा आली.. सराव नसतानाही घड्या विसरल्या नाहीत याचा वेगळाच आनंद झाला. :-)
लोणावळ्याला उतरून मी आणि वल्लीने मगनलाल ला भेट दिली आणि चिंचवड मुक्कामी आलो..
दोन दिवसात बरेच भटकणे झाले.. वल्ली, किसन, मन्या, विमे, विलासराव, आशू, सौरभ, सूड (१ दिवस) यांच्याबरोबर धमाल केली.. बसमध्ये मिळेल त्या ठिकाणी शक्य तितकी झोप काढली :-).. मामलेदार, कर्व्यांकडची बासुंदी, जिरासोडा, आणि काजूफळे हे खादाडीचे हायलाईट...
आता पुढची ट्रीप फक्त गप्पा हाणण्यासाठी ठरत आहे.. बघु कसे जमते ते..
29 Mar 2012 - 2:43 pm | सौरभ उप्स
मस्तच वर्णन आहे वल्लीशेठ, वाक्यरचना अप्रतीम....... पुढल्या ट्रिप साठी सज्ज आहोत..........
29 Mar 2012 - 7:11 pm | सुहास..
लय मस्त रे वल्ली,
पावसाळ्यात फिक्स !!
29 Mar 2012 - 7:55 pm | किसन शिंदे
कान्हेरी येथील बौध्दकालीन लेणी पाहण्याचा अनुभव खुपच चांगला होता. तसे बाकिचे मिपाकर होतेच, पण वल्लीचं या विषयातलं ज्ञान पाहता(जे ज्ञान त्याक्षणी त्याने खुप कमी शेअर केलं हि गोष्ट वेगळी:P) हा अनुभव अविस्मरणीय असाच होता. :)
आता पुढच्या वेळी अंजिठा-वेरूळ....