सिधं||
रञो गोतमिपुतस सामिसिरिसातकणिस सवछरे १०[+*]६ गि-
म्हाण पख १ दिवस ५ कालयाणवाठवस नेगमस अण-
दपुतस उसा(पा)सकस अ[रेणुस स[प]रिवारस सहा
कडुबिनिय आनदमातो [जु] वारिणिकाय सहा बालकेन अणदेन
सह च सु[ण्हा] हि अण . . ल. सिपे [च]धामदेविय
सह च . . . वेण अह[वि]अपण मातापितरो(रा) उदिस
पावते कण्हसेले लेणं कोठि च देयधा[मं] चातुदिसे
भिखुसघे पडितापित सावस [ता]णं हितसुघथ |
सिद्धी असो!
राजा गौतमीपुत्र स्वामी श्रीसातकर्णी याच्या राज्यकालाच्या १६व्या संवत्सराच्या ग्रीष्म (ऋतूचा)पक्ष १, दिवस ५ या दिवशी कालयाण (कल्याण) येथे राहणारा व्यापारी, उपासक, आनंदाचा पुत्र अपरेणु याने आपल्या नातलगांसह, आपली पत्नी व आनंदाची माता जुवारिणिका, बालक आनंद व आपल्या सुना ..धामदेवी यांच्यासह आपल्या मातापित्यांच्या पुण्यप्राप्तीच्या उद्देशाने या कृष्णशैलावर सर्व प्राण्यांच्या हितसुखार्थ, चारी दिशांच्या भिक्षुसंघाकरिता हे लेणे व हे सभागृह कोरविले आहे.
कान्हेरीतील क्र. ८१ च्या लेण्यातील व्हरांड्याच्या डाव्या बाजूला कोरलेला ह्या शिलालेखात कान्हेरीच्या प्राचीन नावाचा कृष्णशैल अथवा कृष्णगिरी असा उल्लेख येतो.
आदल्या दिवशी वसईचा किल्ला पाहून आम्ही सकाळी ६ वाजता किसनदेवांकडून निघालो ते ठाणे बस स्थानकात जरा उशिराच पोहोचलो. स्पा व नवमिपावर सौरभ उप्स हे आमची वाटच पाहात होते. ठाणे बोरीवली बस पकडून थेट बोरीवलीच्या राष्ट्रीय उद्यानाच्या प्रवेशद्वारावरच थडकलो. थोड्याच वेळात विलासराव व आत्मशून्य येऊन पोहोचले. उद्यानाच्या प्रवेशद्वारातूनच कान्हेरी लेण्यांकडे जाण्यासाठी मिनीबस तसेच प्रवासी व्हॅन्सची सोय आहे. गाडी पकडून १५ मिनिटातच कान्हेरी लेण्यांपाशी येऊन पोहोचलो.
एकूण १०९ लेण्यांचा हा समुच्चय. एक चैत्यगृह व बाकीचे सर्व विहार अशी यांची सार्वत्रिक आढळणारी रचना. इ.स. पूर्व १०० ते इ.स. ७/८ इतका मोठा काळ यांच्या निर्मितीचा. हीनयान, महायान कालखंडात विभिन्न दात्यांनी खोदलेल्या या लेण्या. सातवाहन, क्षत्रप, चुटु इ. विविध राजवटींनीही यांचा भार वाहिलेला.
कान्हेरी हे शूर्पारक(सोपारा), वस्य(वसई), कालयाण(कल्याण) या बंदरांनजीक वसलेले. साहजिकच सार्थवाहांचे, श्रमणांचे वर्षावासातील विश्रांतीस्थळ, बौद्ध धर्मप्रसारकांचे मोठे ध्यानकेंद्र. साहजिकच इथे प्रचंड संख्येने लेणी घडवल्या गेल्या. इतक्या प्रचंड संख्येने लेणीसमूह असलेला हा भारतातील एकमेव शैलगिरी. जुन्नरलेणी संख्येने सर्वाधिक आहेत (२००+) पण त्या जवळ जवळ असलेल्या वेगवेगळ्या डोंगरांवर.
तिकीट काढून आत प्रवेश करते झालो.
पहिलेच लेणे अपूर्णावस्थेतील एक दुमजली विहार आहे. दोन भव्य स्तंभ, व्हरांडा, आतमध्ये विश्रांतीकक्ष अशी यांची रचना. स्तंभ रचना तशी साधारणच आहे. किंबहुना एकूणच लेणीसौंदर्याच्या दृष्टीने पाहीले जाता कान्हेरीची लेणी तशी कमी प्रतीचीच आहेत. पण इथली महायान कालखंडात खोदली गेलेली शिल्पे अप्रतिमच आहेत.
दुसर्या क्रमांकाच्या लेण्यांत दोन वेगवेगळ्या कक्षांत दोन स्तूप कोरवलेले असून स्तूपांभोवती बुद्धप्रतिमा फेर धरून आहेत. बुद्धाच्या अवलोकितेश्वर या स्वरूपात ह्या प्रतिमा खोदवलेल्या आहेत. बुद्धाभोवती आकाशगामी यक्ष, गंधर्वांच्याही प्रतिमा कोरलेल्या आहेत. हे स्तूप कान्हेरीतील प्रमुख धर्मगुरुंच्या स्मरणार्थ बांधलेले असावेत. हा विहार तसा खुल्या स्वरूपाचा, अंतर्भागात जास्त खोदकाम केलेले नाही.
१. लेणी क्र. १- भव्य दुमजली विहार
२. लेणी क्र. २ मधील पहिला खोदीव स्तूप
३. लेणी क्र, २. दुसरा खोदीव स्तूप व त्याभोवती फेर धरलेल्या बुद्धप्रतिमा
४. बुद्धप्रतिमा थोड्या जवळून
५. अवलोकितेश्वर व त्याच्या भोवतीचे आकाशगामी गंधर्व
तिसर्या क्रमांकाचे लेणे हे येथील एकमेव चैत्यगृह. कार्ले लेण्यातील भव्य चैत्यगृहाची जणू प्रतिकृतीच. किंबहुना कार्ले चैत्यगृह डोळ्यांसमोर ठेवून त्याबरहुकुम केलेली ही रचना. फक्त इथे नेहमीचे पिंपळपानाकृती कमानदार सुघड वातायन मात्र कोरलेले नाही. अगदी साधीच अशी कमानदार रचना आहे.
बाहेरच्या बाजूला द्वारपाल यक्ष, पायर्या चढून जाताच आत प्रांगण. तिथेच दोन भव्य सिंहस्तंभ भिंतींना लगटूनच कोरलेले. अशोककालीन सिंहस्तंभासारखी ही रचना. कार्ले येथे सध्या एकच सिंहस्तंभ असला तरी तेथे पूर्वी दोन सिंहस्तंभ होते याला दुजोरा याच कान्हेरीच्या चैत्यगृहातून मिळतो. दोन स्तंभांपैकी एकावर सिंह तर दुसर्यावर य़क्ष कोरलेले आहेत. प्रांगणाच्या कोपर्यात हे दोन्ही स्तंभ असल्याने ते उठून दिसत नाहीत
६. लेणी क्र. ३ -चैत्यगृहाचे मुखदर्शन व दोन्ही बाजूंना खोदलेले सिंहस्तंभ
७. सिंहस्तंभांच्या तळखड्यात असलेल्या यक्षप्रतिमा
८ व ९. शेजारीच असलेल्या भिंतींवर कोरलेली स्तूपरचना (हे शिल्प आठव्या शतकातले, एकावर एक असे तीन छत्र असलेली अशी शैली त्याकाळात निर्माण झाली)
ओसरीतल्या जवनिकेवर जोडप्यांच्या प्रतिमा खोदलेल्या आहेत. कार्ल्याला आहेत तसेच सालंकृत स्तंभ येथेही आहेत पण कार्ल्याची सर याला नाही. ह्या आतील स्तंभांवरच दोन्ही बाजूंना शिलालेख कोरलेला आहे.
रञो गोतमि [पुतस सामिसियञ ]
सातकणिस [संवछरे .......गि-]
म्हपखे पंचमे [५ दिवसे ........]
वाणिकजेहि उतू ............
णुं उपंनेहि गा ........
खातियेहि भातूहि...............
गजसेनेन गजमि [तेन].......
कपठायि चेतिय..........
आचरियानं निकायस....भदाय
नीयानं परिगहे पतिठापितं......मा-
तापितूनं अभतीतानं.....
पूजाय कुडुबिनीन बालकानं बालि[कानं]
सवतस भागिनेयान निकायस नाति-
वगस च अग पटिअसिय सव्वस्[तानं]
हिसुखाय हेतु| एथ च नव [कमि]
का पवजितो थेरा भदत अचला भादंत
गहला भदंत विजयमिता भदत बोधिको
भदत धमपाला उपासको च नेगमो अनद-
युतो अपरेनुको स्मापिता | आचरियान थेराणं
भदत सेउंलानं सिसेन उपर्खितन भ-
दत बोधिकेन कत सेलवढकिहि [नाय]कमि-
सेहि कढिचकेहि महाकटकेहि खदर-
किना च मीठिकेना |
राजा गौतमीपुत्रस्वामी श्री यज्ञ सातकर्णीच्या संवत्सर ग्रीष्म ऋतूच्या पाचव्या पक्षातील ..णू चे पुत्र खातिय, भाऊ गजसेन आणि गजमित्र यांनी हे कल्पांतापर्यंत टिकणारे चैत्य भदायनीय आचार्यांच्या संघाचे म्हणून, आपल्या निधन पावलेल्या मातापित्यांच्या सन्मानार्थ, तसेच आपली भार्या, पुत्र, कन्या, सावत्र बंधू, सर्व भाचे व ज्ञातिवर्ग यांच्या तसेच सर्व प्राण्यांच्या हितसुखार्थ स्थापन केले. यावर देखरेख ठेवणारे प्रव्रजित स्थविर भदंत अचल, भदंत गहल, भदंत विजयमित्र, बदंत बोधिक, भदंत धर्मपाल्, उपासक व्यापारी आनंदाचा पुत्र अपरेणुक यांनी हे काम पूर्ण केले. या कामावरील अधीक्षक आचार्य स्थविर शैवल यांचा शिष्य भदंत बोधिक याने लेणे खोदणारे पाथरवट(शैलवर्धक), कारागीर आणि उजाळा देणारा स्कंदरकि याच्या साहाय्याने हे काम पूर्ण केले.
१० व ११. ओसरीवर असलेला हा श्री यज्ञ सातकर्णीच्या काळत खोदलेला लेणीनिर्मितीचा शिलालेख
ओसरीवर डाव्या उजव्या बाजूंना समोरासमोर अशा दोन भव्य बुद्धप्रतिमा कोरलेल्या आहेत. जणू ह्या प्रतिमा आरशासमोर उभे राहून आपलेच रूपडे न्याहाळत आहेत इतक्या जिवंत. बुद्धाच्या चेहर्यावरची शांत मुद्रा, मिटलेले नेत्र, आशिर्वाद देण्यासाठी उपडा केलेला तळहात, अंगावरचे उत्तरीय सारेच कसे निगुतीने कोरलेले.
डावीकडेच एक विश्रांतीकक्ष आहे तिथेही दोन सूंदर, अतिशय रेखीव अशा बुद्धमुर्ती कोरलेल्या आहेत.
इथल्या ह्या बुद्धमूर्तीमुळेच इतर लेण्यांमध्ये दिसणारी वर वर चढत जाणारी कमानदार गवाक्षांची रचना इथे कोरलेली नाही. महायानकाळात लेणीनिर्मितीच्या झालेल्या स्थित्यंतराचा हा प्रभाव.
१२. ओसरीवर खोदलेली भव्य बुद्धप्रतिमा
१३. शेजारीच असणार्या अजून काही प्रतिमा
१४. शेजारीच असणार्या अजून काही प्रतिमा
१५. दांपत्याच्या प्रतिमा
१६. चैत्यगृहाच्या प्रवेशपट्टीकेवर कोरलेल्या प्रतिमा
आतील चैत्यही कार्ल्याप्रमाणेच भव्य फक्त त्याहून थोडासाच लहान.
दोन्ही बाजूंना एका एका ओळीत कोरलेले स्तंभ, स्तंभांच्या शेवटाकडे मध्यभागी असलेला चैत्य, त्याभोवती प्रदक्षिणापथ व वरती गजपृष्ठाकार कोरलेले छत अशी याची रचना. आजूबाजूच्या स्तंभांवर हत्ती, वृषभ व त्याआरूढ स्त्रीपुरुषांच्या विविध प्रतिमा कोरलेल्या आहेत. त्यापैकी स्तूपाचे पूजन करणारे दोन्ही बाजूंना असलेले हत्ती व नागमुकुट धारण करणारे स्त्रीपुरुष ही प्रतिमा विशेष उल्लेखनीय. बहुतेक सर्व स्तंभावंर अशाच प्रतिमा आहेत. उजवीकडच्या काही स्तंभांचे काम मात्र अर्धवट राहिलेले दिसते.
मुख्य चैत्य हा गुळगुळीत आहे मौर्यकालीन झिलईच्या कामाचा यावर प्रभाव. तळखडा, वेदिकापट्टी, अण्ड इतकाच भाग सध्या शिल्लक आहे. वरची हर्मिका आणि त्यावरील लाकडी छ्त्र गायब आहे. छतावर असलेल्या लाकडी फासळ्या संपूर्णपणे गायब आहेत. आजमितीला त्या बसवण्यासाठी असलेल्या खाचाच फक्त शिल्लक राहिलेल्या आहेत.
विलक्षण शांतीचा अनुभव ह्या भव्य दिव्य चैत्यगृहात येतो.
१७. कान्हेरी चैत्यगृह व मुख्य स्तूप
१८. चैत्यगृहांतील स्तंभावर असलेल्या प्रतिमा
१९. स्तंभावर असलेले एक देखणे शिल्प (नागमुकुट घातलेले स्त्रीपुरुष)
चैत्यगृहाच्या शेजारच्याच एका छोट्याश्या लेण्यात एक रेखीव स्तूप कोरण्यात आलेला आहे. स्तूपाची हर्मिका व त्यवरील दगडीच असलेले छ्त्र जे छतालाच भिडवलेले आहे. स्तूपाच्या अण्डाभोवती चैत्याकार कमानीत बसलेल्या बुद्धप्रतिमा कोरलेल्या आहेत. याचा बहुधा बराच नंतरचा असावा. ४/५ व्या शतकानंतर स्तूप कोरण्याच्या शैलीमध्ये अशा प्रकारचा बदल झाला.
२०. चैत्यगृहाशेजारचे एक लहानसे लेणे
२१. स्तूप अगदी जवळून
उर्वरीत सफर पुढच्या भागात.
क्रमशः
मिपाकरांसोबत जरी हे लेणीदर्शन असले तरी प्रत्यक्षात मिपाकरांबरोबर घडलेल्या गप्पाटप्पा, झालेल्या गंमतीजमती याचा उल्लेख लेखात फारसा, किंबहुना काहीच आलेला नाही. सहभागी मिपाकर यथाशक्ती भर घालतीलच.
सहभागी मिपाकरः किसन शिंदे, आत्मशून्य, विलासराव, मोदक, स्पा, सौरभ उप्स आणि अस्मादिक
प्रतिक्रिया
12 Mar 2012 - 11:49 am | स्पा
कान्हेरीला जायाच म्हनून एकदम मज्जेन होतोव ना र बाला
सौरभ ला फोन केला, तोही लगेच एका पायावर तयार झाला.
सकाळी बरोबर ६.१५ ला ठाण्याला पोचलो, पण नेमक त्याच दिवशी ठाण्यात भाजपने बंद ची हाक दिली , त्यांची नगरसेविका म्हणे कोणीतरी पळवलेली होती (मागाहून कळल कि बै खुशाल कुठल्यातरी फाय स्टार हाटेलात सुखरूप होत्या, तेजायला त्या बंदच्या ) त्यामुळे किस्ना वल्ली आणि मोदक ला यायला बराच उशीर झाला.. बस च्या चाकांची हवा काढण्याचे पण प्रयत्न झाले, पण सर्व संकटातून सुखरूप बाहेर पडून, आमची येष्टी मार्गी लागली.
पार्काबाहेर इलासराव, आणि आत्मशुन्य आलेलेच होते, तिकडे जरा भाज्यांची जुसं वेग्रे ढोसून आत प्रवेश करते झालो.
मी हि पहिल्यांदाच कान्हेरीला भेट देत होतो, वल्ली सेठ बरोबर असल्याने बराच नालेज मिळणार याची खात्री होतीच. कान्हेरीला स्पेशल पार्कातल्या बशी असतात , पण आम्ही जाताना ओम्नीतून गेलो. तिकडे गेल्यावर माकडांनी स्वागत केलाच.. समोर पसरलेल्या लेणी पाहून एकदम अहाहा वाटल :)
पण चायला वल्ली सेठ नालेज द्याच सोडून फोटू काढत "हरणाच्या चपळाईने" पुढे पळायला लागले, हे पाहून किसन सेठ पक्के वैतागले . मोदक उगाच इकडे तिकडे टवके टाकत फिरत होता..
आशु आणि विलास राव नर्मदेच्या डोहात डुंबत होते.. मी सर्व कडे जाऊन मध्ये मध्ये तोंड घालत होतो ....
नंतर मात्र सगळे एकत्र आले... आणि खरी धमाल सुरु झाली
क्रमश : ;)
12 Mar 2012 - 8:49 am | अन्या दातार
इंडीयाना जोन्स यांचे लेण्यांचे पैलू उलगडून दाखवण्याचे कौशल्य वादातीत आहे!
ब्राह्मी लिपीतील शिलालेख व त्याचे अर्थही दिल्याने एकंदर तेंव्हाची भाषाशैली कशी होती यावरही प्रकाश पडलाय.
एक शंका: चैत्यागृहात स्तूप बनवण्याचे कारण नेमके काय असावे?
12 Mar 2012 - 9:00 am | पैसा
प्रत्यक्ष पाहिल्याचं समाधान मिळालं. त्या शिलालेखाची लिपी ब्राह्मी आहे का?
गोव्यात सातवाहन चुटु इ . राजांची सत्ता होती. आणि अशा कितीतरी मानवनिर्मित गुहा आहेत पण त्या पूर्णपणे अनलंकृत आहेत. शिवाय स्तूप वगैरे तर नाहीतच. त्यांच्याबद्दल काहीच संशोधन झालेलं नाही. कधीतरी गोव्यात ये आणि हे काय आहे ते सांग!
12 Mar 2012 - 9:15 am | प्रचेतस
होय. शिलालेखांची लिपी ब्राह्मी आहे. भाषा प्राकृत. इथे ब्राह्मी संस्कृतामधला पण एक शिलालेख आहे, तसेच जपानी भाषेतही त्रिपीटकांची सूत्रे कोरलेली आहेत.
@अन्या दातारः स्तूप हे बुद्धाच्या स्मरणार्थ खोदले जात. स्तूपात बुद्धाचा एखादा अवशेष ठेवला जात असे. उदा. बुद्धाचा केस, दात इ. त्यामुळे एका लेणीसमूहामध्ये एकच चैत्य असे. दुसरे जे काही स्तूप आहेत ते मुख्य चैत्यगृहाच्या बाहेर असत ते प्रामुख्याने प्रमुख धर्मगुरुंच्या स्मरणार्थ बांधले जात.
अर्थात सह्याद्रीतील शैलगृहे ही खोदीव असल्याने तिथले चैत्यांमध्ये अवशेष ठेवता येत नसत पण बुद्धाचे एक प्रतिक म्हणूनच त्यांचे पूजन होत असे.
12 Mar 2012 - 9:13 am | मोदक
वाचतोय...
सविस्तर प्रतिसाद शेवटच्या भागावर..
12 Mar 2012 - 9:23 am | अन्नू
लेण्यांच्या सैर बद्दल __/\__ :)
12 Mar 2012 - 10:03 am | अत्रुप्त आत्मा
धागा नंतर वाचेन..पण फोटुंच्या बाबतीत इतकच म्हणु शकतो...की ए क्लास.... वरचा सा आणी
बुच्चान मारु नका रे कोणी..!
12 Mar 2012 - 11:35 am | प्यारे१
एकदम मस्त धागा वल्ली... फटु नी वृत्तांत एकदम मस्त!
काय भटजी कसे आहात???? ;)
12 Mar 2012 - 11:44 pm | अत्रुप्त आत्मा
>>> प्यार्या दुष्ट :evil: ..बुच्चान मारु नका म्हणलोवतो... मारली ती मारली..आणी वर इचारतो <> ''@काय भटजी कसे आहात????'' मी नै सांगणार ज्जा...!
12 Mar 2012 - 10:29 am | इरसाल
फार फार वर्षापूर्वी गेलो होतो.
एक शंका : आत्मशून्य तर नर्मदा परीक्रमेवर होते ना ? तुमच्याबरोबर कसे ?
12 Mar 2012 - 10:37 am | मी-सौरभ
नेहमी प्रमाणेच उत्तम लेखन आणी छायाचित्रे :)
12 Mar 2012 - 10:51 am | गवि
वाह..
अरे वल्ली... तू थोर आहेस रे..
नेहमीच्या पाहण्यातली ही लेणी.. पण आज तुझा धागा पाहताना अक्षरशः इनसाईट सापडली.. उगाच सुट्टी आली की हिंडायला कान्हेरीत जायचं इतकंच माहीत असलेल्या मुंबईकरांनाही तू करुन दिलेली ही डीटेलवार ओळख पाहून थक्क व्हायला होईल.
पहिल्या फोटोतल्या त्या दगडी दरवाज्याच्या डावीकडे असलेल्या दगडात खोल आत आत जाणार्या गुंफेत मी पंधराएक वर्षांपूर्वी रेग्युलरली जाऊन अगदी टोकाशी पत्थराच्या भिंतीला टेकून अंधारात बसायचो. जेमतेम एकाच माणसाएवढी जागा, पण क्लॉस्ट्रोफोबिक वाटलं नाही कधी. ध्यान न लावताही त्या थंड कातळात मन असं काही शांत व्हायचं की सांगण्यास शब्द नाहीत.
नंतर काही वर्षांच्या गॅपने गेलो. जुन्या जागेच्या ओढीने आत जाऊन नेहमीच्या भिंतीशी टेकायला गेलो. तिथे कंडोम्स पडलेले दिसले. लगेचच उठलो. पुढच्या भेटींमधे नुसतं डोकावून पाहिलं तरी आत एखादा पोरगापोरगी बिलगलेले दिसायचे. मग त्या गुंफेत जाणं तुटलं. आणि आता तर किमान तीनेक वर्षांत कान्हेरीला गेलोच नाही.
जितके वर चढत जाल तितके आणखी आणखी दगडी खोल्यांचे इमले दिसतात. प्रत्येक दगडी खोलीच्या बाहेर एक पाण्याचं कुंड.. (आता कल्पनेपलीकडे खराब झालेलं आणि प्लॅस्टिक बाटल्यांनी भरलेलं.. पण आजही पाण्याने बारमाही भरलेलं). खोल्यांची रचनाही खास हवेशीर, प्रकाशमान आणि सुंदर दरीचा "व्ह्यू" देणारी. मी कित्येकदा त्यातल्या एखाद्या "कॉटेज"मधे कट्ट्यावर बसून तासनतास बाहेर बघत बसायचो. मला तर तो वरचा भाग "लेण्यां"पेक्षाही जास्त "रेसिडेन्शियल" किंवा तत्कालीन "रो हाऊस स्कीम ( ;) )" वाटतो.
पावसाळ्यात तर त्या घळीतून असला तुफान धबधबा वाहतो की बस्स..
ता.क. सतरा नंबरच्या स्तूपवाल्या दालनात चमत्कार (!) अनेकदा प्रयोग करुन पाहिला. तिथे त्या स्तूपातल्या एखाद्या चौकोनी भोकासमोर तोंड ठेवून "ओम" म्हणून पाहिलं की संपूर्ण दालनात असा काही अफलातून इफेक्ट तयार होतो की नखशिखांत भारूनच जायला होईल. शिवाय या ठिकाणी (पब्लिकने शांतता मिळू दिली तर) कोणत्याही एका कोपर्यात जाऊन हलक्यात हलके आवाजात कुजबुजलात तरी संपूर्ण मंडपात खणखणीत ऐकू येतं.. या दोन्ही गोष्टी म्हणजे "एको" ऊर्फ प्रतिध्वनी नव्हे.. तर आवाजाला अतिशय उच्च क्लॅरिटी आणि अँप्लिफाय करणारा इफेक्ट देणारी अफलातून दगडी रचना आहे.
आणि अशी रचना हेतुपुरस्सर करण्यात आली आहे असं मला कोणीतरी सांगितलं होतं.
12 Mar 2012 - 3:31 pm | स्पा
मी कित्येकदा त्यातल्या एखाद्या "कॉटेज"मधे कट्ट्यावर बसून तासनतास बाहेर बघत बसायचो. मला तर तो वरचा भाग "लेण्यां"पेक्षाही जास्त "रेसिडेन्शियल" किंवा तत्कालीन "रो हाऊस स्कीम ( Wink )" वाटतो.
अगदी आम्ही पण हेच म्हणालो होतो...
फक्त चाळी असा शब्द वापरला होता :)
13 Mar 2012 - 1:10 am | मोदक
चालायचेच.... ज्याची त्याची समज. ;-)
12 Mar 2012 - 11:07 am | मनराव
छान महिती वल्लीशेठ
12 Mar 2012 - 11:45 am | ५० फक्त
आनंद आहे, मुंबईत अश्या ब-याच गोष्टी आहेत, पण मुंबई भारताची आर्थिक राजधानी म्हणुन एवढी प्रसिद्ध करुन टाकली आहे ही अशा गोष्टीबाबत अन्यायच झालेला दिसतो सहसा.
12 Mar 2012 - 12:33 pm | सुहास झेले
मस्त.... पण गवि म्हणतात तसं, पार वाट लावली आहेत लेण्यांची. गुरखे नेमले आहेत, पण काही कामाचे नाहीत साले. पावसात तर बघायला नको, लेण्यांमध्ये चिकन-मटण काय शिजवतात, पोर-पोरी (एकत्रपणे) यथेच्छ धुमाकूळ घालतात....
लेण्यांच्या मागे जंगलात एक पुरातन मंदिर आहे बघा साईबाबांचं. ते खैरनारांनी तोडलंय, बेकायदा बांधकाम होतं आणि त्यासमोरच एक मोठ्ठं तळघर आहे (जे आता बऱ्यापैकी बुजवले आहे), जिथे अवैध धंदे चालायचे. तिथे त्यांनी बुलडोझर घुसवले होते त्यावेळी. :) :)
12 Mar 2012 - 5:54 pm | सागर
मस्त रे वल्ली मित्रा,
कान्हेरीची ही ट्रिप (पुरातत्त्वाची आवड असल्याने) जास्त मोहक वाटते आहे.
शिलालेखाचे विवेचन तर अप्रतिमच.
मला ब्राम्ही वाचायला येत होती. म्हणजे अजूनही येत असावी. पण संपर्क नसल्याने विस्मरण झाले होते ते तुझ्या लेखामुळे परत थोडे थोडे येऊ लागले आहे ;)
भारतात ब्राह्मी लिपीतूनच बहुसंख्य प्राकृत लेख आहेत त्याचेच हे महत्त्वाचे पुरावे :)
वाचतो आहे. पुढचा भाग लवकर टाक मित्रा. सगळी सफर झाल्यावर अधिक सविस्तर प्रतिसाद देईन
(कारण पुढे काय काय वाढून ठेवले आहे ते माहिती नाहीये :D )
12 Mar 2012 - 6:48 pm | यकु
अप्रतिम मांडणी!
गविंची माहिती वाचून तर लगेच तिथं जायचं मन होतंय.
कोण आहे रे ते? ध्यान करायला म्हणतोय मी.
12 Mar 2012 - 9:15 pm | गणेशा
अप्रतिम ...
विषेशता.. ब्राम्ही लिपीतील मजकुराचे भाषांतर करुन दिल्याबद्दल मनापासुन आभार.
बाकी लेखन आणि ट्रीप आवडली.
बर्याच फोटोतुन कार्ल्याची झलक दिसते आहे.
12 Mar 2012 - 10:22 pm | प्रास
वाह् वल्लीभाई! झकास रे!
मस्त माहिती आणि सुंदर फोटो.
पुढल्या भागाच्या प्रतिक्षेत.
13 Mar 2012 - 12:35 am | अत्रुप्त आत्मा
वल्ली...प्रत्यक्ष दर्शन घडवलत हो... तुमच्या डिटेलवारी ला सलाम हाय आपला---^---, त्यामुळे अता जायलाच लागणारे...त्यात गविंनी ते साऊंड इफेक्टचं वर्णन इतकं इफेक्टिव्ह केलय की निम्मे आवाज इथेच ऐकू येताहेत... त्यामुळे अता जाणे आलेच
13 Mar 2012 - 11:57 am | Hrushikesh
सुंदर लेख आहे वल्ली शेठ.
बोरीवली चे राष्ट्रीय उद्यान आणि एस्सेल वर्ल्ड - वॉटर पार्क एवढेच माहीत होते. लेण्यांची माहीती नेहमीप्रमाणे खुपच छान लिहिली आहे.
अजुन काही माहीती दिल्यास जसे:
१. कार्ले लेण्यांचा ऊल्लेख आहे, कार्ले लेणी कधी बनवली गेली याचा कालखंड मिळु शकेल काय
२. तसेच एकुणच लेणी आणि त्यांचा कालखंड, राजवटी याबद्दल एखाद्या लेखमालेद्वारे प्रकाश टाकल्यास ऊत्त्म होईल.
३. वेगवेगळ्या लेण्यांच्या शैली आणि कालखंडानुरुप शैलीतील झालेले बदल
13 Mar 2012 - 5:39 pm | प्रचेतस
इ.स पूर्व १६० ते इ.स. ४००/५०० या काळात कार्ले लेणी कोरली गेली. तिथला चैत्य बराच जुना आहे.
सातवाहन -क्षत्रप कालखंड आणि लेणी शैलीवर एक विस्तृत लेखमाला लिहायचा विचार आहे. पाहू कधी जमते ते.
14 Mar 2012 - 1:08 pm | सौरभ उप्स
फोतोस एकदम झक्कास आलेत, वर्णन पण अगदी मस्त. आपली हि पहिली भेट कान्हेरी च्या निमित्ताने अगदी मस्त झाली, पुढच्या दौऱ्याला लवकरच भेटू.
15 Mar 2012 - 12:15 pm | नि३सोलपुरकर
सुरेख ओळख करुन दिली मित्रा...
धन्स्..वल्ली.
17 Mar 2012 - 8:46 am | लीलाधर
वल्लीदा फोटो आणि वर्णन फारच सुंदर झाले आहे. फारच उद्बोधक लिखाण याउपर काय बोलू? अप्रतिम, सुंदर, सुरेख...
17 Mar 2012 - 2:52 pm | अन्या दातार
उद्बोधक? :o :o
बाळ मधुर, काय बोध झाला राजा तुला?
17 Mar 2012 - 2:54 pm | स्पा
बाळ मधुर
मधुर नाय व्हो दातार काका
माधव..
माधव नाव ह्य त्याचे
19 Mar 2012 - 3:03 pm | प्रभाकर पेठकर
सुंदर वर्णन आणि माहिती.
फार फार वर्षांपूर्वी म्हणजे जवळ जवळ ५० वर्षांपूर्वी प्रथम गेलो होतो कान्हेरीला तेंव्हा काही कळतच नव्हते. पुढे तरूणपणी एकदा सायकलने कान्हेरी भेटीस गेलो होतो तेंव्हा लेण्यांपेक्षा इतर 'निसर्गा'चेच आकर्षण होते. असो.
डाव्या बाजूला कोरलेला ह्या शिलालेखात कान्हेरीच्या प्राचीन नावाचा कृष्णशैल अथवा कृष्णगिरी असा उल्लेख येतो.
राष्ट्रिय उद्यान आणि परिसर हे माझ्या लहानपणी 'कृष्णगिरी उपवन' नांवानेच आम्हाला माहित होते.
19 Mar 2012 - 4:29 pm | स्पा
२ र्या भागाच्या प्रतीक्षेत
20 Mar 2012 - 9:32 pm | मोदक
वल्ली.. दुसरा भाग कधी टाकतो आहेस..?
21 Mar 2012 - 12:14 am | अत्रुप्त आत्मा
+३
21 Mar 2012 - 1:47 pm | सस्नेह
लेख वाचताना सुरेख डॉक्युमेंटरी पाहिल्यासारखे वाटले. सिरि सातकर्णींवर एक कादंबरी वाचली होति. त्यात नाथमाधव टाईप भव्य वास्तु, भुयारे, चोरवाटा आणि स्तूप इ. ची वर्णने होती. फोटो पाहून त्यातून समक्ष फिरून आल्यासारखं वाटलं !
26 Mar 2012 - 5:38 pm | सुहास..
लय म्हणजे लय लय भारी ..!!
वर्णन पण अस्सल ईंडियाना वल्ली स्टाईल, अजुन लिही , दुसर्या भागाची वाट पहातो आहे .
26 Mar 2012 - 6:15 pm | सागर
वल्ली मित्रा,
दुसरा भाग लवकर टाक रे
उत्सुकता एवढे दिवस ताणता येत नाही ;)
26 Mar 2012 - 6:23 pm | स्वाती दिनेश
लेख, चित्रे, माहिती .. सगळेच छान..
पु भा प्र,
स्वाती