एका चोरीची चित्तरकथा

सस्नेह's picture
सस्नेह in जनातलं, मनातलं
27 Mar 2012 - 10:30 am

मे महिन्याचे दिवस. उकाडा जबरदस्त वाढलेला. आणि गावात चोऱ्यांचे प्रमाणही वाढलेले. दर ४-५ दिवसांनी एक एक नवीन चोरी होऊ लागलेली. भुरटे, सराईत आणि हुमदांडगे असे सगळेच चोर मोकाट सुटलेत की काय असे वाटण्या इतके चित्रविचित्र , सुरस आणि चमत्कारिक चोऱ्यांचे प्रकार ऐकायला मिळू लागलेले. एक एक किस्से ऐकून लोक थक्क होत.
होता होता एक दिवशी चक्क आमच्या कॉलनीतच चोरी झाली. तोही प्रकार इतका चमत्कारिक की पहाटेच्या वेळी कटावणीने दार उघडू पाहणाऱ्या चोरांना घरातील आजोबांनी (चष्मा घातला नसल्यामुळे) मालकाचे मित्र समजून स्वत:च कडी वगैरे काढून आत घेतले ! मग घरमालकाने आरडाओरडा केल्यावर शेजारचे लोक धावून आले अन चौर्यप्रसंग टळला.
आमची छोटी बंगली कॉलनीच्या एका टोकाला आहे. मागे एक अपार्टमेंट, पुढे रस्ता, डावीकडे रिकामा प्लॉट अन उजवीकडे पडीक जागा. तीत दलदल अन गवत माजलेले. चारी बाजूंना कंपाऊंड. गेट उघडताना होणाऱ्या कर्कश्श आवाजामुळे आमच्या घरी कुणी आले की ४ घरांपलीकडच्या पाटील मावशीनासुद्धा समजे. शिवाय मुख्य दाराला लोखंडी सरकता दरवाजा बसवलेला. त्याला डबल कुलूप. म्हणून आम्ही काहीसे निर्धास्त. अन तरीही एके दिवशी आमच्याच घरात चोर शिरला की ! म्हणजे त्याचे असे झाले...

तर त्या रात्री सुमारे १२ वाजत आलेले. माझ्या डोळ्यावर झोपेचा अंमल चढू लागलेला. एकाएकी मला झोपेतच भास झाला की कुणीतरी आपल्याकडे टक लावून पाहत आहे. पुष्कळदा बसमध्ये आपल्या पाठीमागचा किंवा कडेचा माणूस विनाकारण आपल्याकडे एकटक पाहू लागला की एक विचित्र संवेदना होते. तसंच काहीसं वाटू लागलं. डोळे उघडून कुस वळवली. तर रातदिव्याच्या मंद प्रकाशात समोर कॉटशेजारी एका उंच काठी उभी असून तिच्यावर एक कपडा टाकलेला आहे व ती माझ्याकडे टक लावून पाहते आहे असे मला आढळून आले. आपण पाहतो आहे हे स्वप्न की सत्य हे समजून घेण्यासाठी मी डोळे चोळून पुन्हा पाहिलं, तर काठी नाही अन काही नाही.
दुसरी कूस घेतली अन डोळे मिटणार इतक्यात कॉटखाली एक गाठोडं पडलेलं दिसलं. माझा कल टापटीप राखण्याकडे असल्यामुळे कॉटखाली मी कधी काही सामान ठेवत नाही. कदाचित चिरंजीव लोळत लोळत कॉटखाली पडला की काय म्हणून पुन्हा कॉटवर नजर टाकली. तिथे चिरंजीव मस्त साखरझोपेत गुंग होता. पुन्हा कॉटखाली पहिले तर गाठोडे आता हळूहळू हलत असलेले. मग मात्र झोप खाडकन उडाली ! मेंदूने काही विचारप्रक्रिया करण्यापूर्वी स्वरयंत्राला दिलेल्या प्रतिक्षिप्त आज्ञेमुळे माझ्या तोंडून एक कर्णभेदक किंकाळी बेडरुमचा आसमंत फोडून बाहेर पडली.
त्या किंकाळीचा परिणाम एवढा जबरदस्त झाला की ते कॉट खालचे गाठोडे ताडकन उडाले अन बेडरुमबाहेर पडले. एका मिनिटात शेजारच्या अपार्टमेंट मधले सगळे दिवे एकसाथ लागले आणि सगळ्या खिडक्यांमधून झोपाळू /त्रासिक चेहेरे बाहेर डोकावू लागले. त्यानंतरच्या ५ मिनिटात ज्या गोष्टी घडल्या त्यांची क्रमवारी लावणे अवघड आहे पण साधारणपणे अशा होत्या.
तोंडावर शर्ट पांघरलेल्या चोराने बेडरूमच्या दाराची कडी बाहेरून बंद करण्याचा प्रयत्न चालवला. उद्देश हा की पळताना कुणी पाठलाग करू नये. सुदैवाने ती नादुरुस्त होती. ('गेला महिनाभर तुमच्या कानीकपाळी ओरडते आहे...कधी आणणार आहात सुताराला बोलावून कडी दुरुस्त करायला ?' हा माझा डायलॉग त्यानंतर पुढे महिनाभर बंद झाला. ) .
मुलगा जागा होऊन 'आई, आई, ..काय झाले ?..’ असे ओरडू लागला. मी बेडरुमचे दार आतून खेचले. त्याबरोबर चोर बाहेरील दाराकडे पळत सुटला आणि देवघरात झोपलेल्या व किंकाळी ऐकून जागे होऊन चष्म्याची तुटकी काडी सावरत, अंधारात चाचपडत बाहेर येणाऱ्या आजीबाईंना धडकला. या आजीबाई मी नोकरीला गेल्यावर आमच्या मुलाला सांभाळीत व आमच्या घरीच रहात.
बहुधा त्यांच्या चष्म्याची तुटकी काडी चोराच्या डोळ्यात गेली असावी. कारण तो ठो ठो करत ग्यालरीच्या दाराकडे पळाला. त्याचवेळी उकाड्यामुळे बाहेर ग्यालरीत झोपलेले मिस्टर किंकाळी ऐकून जागे होऊन ग्यालरीच्या दाराचे बाहेरून लावलेले कुलूप काढून आत येत होते. त्यांच्या पायात पाय अडकून चोर अन ते दोघेही भुई सपाट झाले.
या सगळ्यामध्ये माझ्या किंकाळ्या, मुलाचे 'आई, आई', आजींचे 'ताई, ताई’, मिस्टरांचे 'कोण आहे, कोण आहे ?' आणि खिडक्यामधल्या शेजाऱ्यांचा आरडा ओरडा यांचे पार्श्वसंगीत नॉन स्टॉप सुरु होते.
आता कुठे मिस्टरांच्या डोक्यात प्रकाश पडला की चोरी होत आहे. त्यांनी ताबडतोब खाली पडलेल्या चोराची गच्ची पकडून एक भडकावून दिली. त्याबरोबर चोराने उठून पळत जाऊन मागच्या दारातून बाहेर पलायन केले. तर त्याला समोर कंपाऊंडच्या भिंतीवरून डोकावणारी व काठ्या इ. शस्त्रांनी सज्ज असलेली शेजाऱ्यांची फौज दिसली. लगेच त्याने घुम जाव करून अंधारातच संपूर्ण इमारतीला एक प्रदक्षिणा घातली अन अखेर बागेच्या कठड्यावर एक पाउल ठेवून गेटच्या वरून थेट रस्त्यावर हनुमान-उड्डाण केले अन पाहता पाहता पसार झाला.
घरातले दिवे फटाफट लागले. मी सोडून सगळे विचारू लागले, ‘काय झालं, काय झालं ?’
'अहो, चोर, चोर...' मी.
शेजारी चोराला शोधू लागले. तो पसार झाल्याचे निष्पन्न होताच चौकशांचा पाउस घरच्यांवर पडला.
'काय गेले पहा हो...' अनाहूतांचा सल्ला. पाहिले. माझ्या उशाशी ठेवलेला मोबाईल त्याच्या कपाटात ठेवलेल्या त्याच्या पालकासह ( चार्जर ) गायब झाला होता ! मिस्टरांच्या, भिंतीवर अडकवलेल्या पॅन्टच्या खिशातील २००० रु. ही गायब झाले होते.
'तरी नशीब हो, कुणाला मारले बिरले नाही..' शेजाऱ्यांचे सांत्वन.
'पोलिसाना कळवायच्या भानगडीत पडू नका बरं...नाहीतर भीक नको, कुत्रा आवर अशी गत व्हायची...’ आणखी एक अनाहूत व्यवहारी सल्ला.
'पण चोर आत शिरला तरी कसा ?' कुणीतरी विचारले.
मग माझी बत्ती पेटली की रात्री मागचे दार नुसतेच लोटलेले होते व झोपताना त्याला आतून कडी लावायची राहून गेली होती ! पाळत ठेऊन असलेल्या त्या भुरट्याने ही संधी बरोबर साधली.
या चोरीचा किस्सा कॉलनीतल्या लोकांना व घरी ( सांत्वनाला ?) आल्यागेल्यांना पुढे २ महिने पुरून उरला !

मांडणीविरंगुळा

प्रतिक्रिया

रणजित चितळे's picture

27 Mar 2012 - 10:34 am | रणजित चितळे

छान चितारली आहे कथा

मनीषा's picture

27 Mar 2012 - 12:33 pm | मनीषा

योगायोग म्हणतात तो हाच..
नेमके त्या रात्री तुम्ही मागच्या दाराची कडी घालायला विसरलात आणि चोर आले..

चौकटराजा's picture

27 Mar 2012 - 1:03 pm | चौकटराजा

आम्हीच फक्त " योगायोगाच्या " गोष्टी करतो असे नाही हां !

सस्नेह's picture

28 Mar 2012 - 1:26 pm | सस्नेह

छान चौकटभाऊ, बरोबर खिंडीत गाठलत की आम्हाला ! योगायोगाचा योग बरोब्बर जमला !

तुम्ही मागच्या दरवाज्याची कडी लावली नाही, हे बहुधा चेपुला अपडेटवले असावे.

मन१'s picture

27 Mar 2012 - 1:06 pm | मन१

चोरीच्या किश्श्यावरून "चोरी झालीच नाही" ही क्रमिक पुस्तकातील विनोदी कथा आठवली.

परिकथेतील राजकुमार's picture

27 Mar 2012 - 1:10 pm | परिकथेतील राजकुमार

चित्र नसल्याने चित्तरकथा आवडली नाही.

वेळात वेळ काढून चार्जर शोधून तो देखील पळवणार्‍या चोराच्या बुद्धीमत्तेचे कौतुक वाटले. मध्ये आमच्या डान्रावांची क्रेडिट कार्डस लंपास झाल्याचा किस्सा पुन्हा आठवणीत जागा झाला.

बाकी तुमच्या रुपाने मिपाला एक सशक्त* लेखीका मिळाली आहे हे आम्ही आधीच जाहिर केले आहे.

*लेखणीत ताकद असलेली ह्या अर्थाने.

उगा कशाला सशक्त... वगैरे श्या देता पराभौ. नाही आवडलं, सोडून द्यावं ! आपल्याला थोडेच शतकी प्रतिसाद वगैरे करायचेत ?
ता. क. पुढच्या टायमाला चोरमहाशय आले की वाईच 'स्माईल प्लीज' म्हणून एक फटू घेऊन ठेवते. म्हणजे 'चित्तर'बी टाकता येईल !

परिकथेतील राजकुमार's picture

28 Mar 2012 - 11:33 am | परिकथेतील राजकुमार

आवडले नसते तर मग मी तोंडभरुन कौतुक केले असते. ;)

आणि फटू नव्हता तर आमच्या डान्याच्या नाय तर नायल्याचा फटू टाकायचा. खपून गेला असता.

मी सिंहगड रोडला राहते.मुख्य रस्ता जरी गजबजलेला असला तरी तरी आमच्या इमारतीपर्यंत त्याचा आवाज आजिबातच येत नाही.आमच्या इमारतीत तळ मजल्यापासुनच फ्लात आहेत,दुकाने नाहीत.त्यामुळे शांतता असते.तळ मजल्यावरील एकाच्या घरी दर तीन/चार महिन्याने चोरी होतच असते.चोर लक्ष ठेऊन घरात कोणी नाही,गावी गेलेत अशा वेळी कधी कचरेवाला तर कधी भाजीवाला बनून इमारतीजवळ आला.तो कटावणीने कुलूप वगैरे तोडतो पण कधी पैसे कि वागीने चोरीला गेले नाहीत, चोरीला गेले ते कपडे ,बेडशीट अशा शुल्लक गोष्टी.मागच्या आठवड्यात त्यांच्याचकडे पहाटे पाचचा सुमारास चोरी झाली.त्यांच्या घराला दोन दरवाजे आहेत.चोराने कटावणीने मागचा दरवाजा तोडला, पण गावी गेलेल्या काकू अचानक पुढच्या बाजूने आल्या.चोराने त्यांच्यावर गरातली भांडी फेकली, आणि त्यांनाच धक्का देऊन बाहेर पळत गेला.बाहेर गाडी पार्क करत असलेला नवरा काय झालाय हे बघायला घाईत आला ते गाडीला चावी तशीच ठेवून.चोर त्याच गाडीने पसार झाला.

परिकथेतील राजकुमार's picture

27 Mar 2012 - 5:51 pm | परिकथेतील राजकुमार

मी सिंहगड रोडला राहते.

कसबा गणपती सिंहगड रोडला आहे ?
काल तर तुम्ही म्हणत होतात की तुम्ही कसबा गणपती जवळ राहता म्हणून .

कसबा पेथेत माझ माहेर आहे.

प्यारे१'s picture

29 Mar 2012 - 9:21 am | प्यारे१

हे विश्वची माझे घर ....
ही ओवी माऊलींनी या माऊली कडे (ही पदवी आहे नाम नाही सो लीमा, टेक अ चिल पिल) पाहूनच लिहीली असेल नै?

पैसा's picture

27 Mar 2012 - 3:16 pm | पैसा

लोकांचा त्रास चुकवायला "माझी पहिली चोरी" मधला उपाय नाही ना केलात नंतर? ;)

रेवती's picture

27 Mar 2012 - 5:27 pm | रेवती

भारी किस्सा.

क्रिश्नना's picture

27 Mar 2012 - 10:57 pm | क्रिश्नना

very nice

स्वातीविशु's picture

28 Mar 2012 - 12:37 pm | स्वातीविशु

किस्सा छानच लिहिला आहे.

आमच्याकडे आम्ही सुटीसाठी गावी गेल्यावर झालेली चोरी आठवली. भुरट्यांनी पितळेची भांडी त्यातले सामान खाली ओतून, ब्लँकेटस वगैरे चोरले होते. देव्हार्‍यात ड्रावरमधला पगार मात्र लाइट गेल्याने वाचला.

कोण जाणे तो चोरही मिपावर येत असला तर.......... ;)

स्पंदना's picture

29 Mar 2012 - 4:58 am | स्पंदना

अरे चोरा!

स्पंदना's picture

29 Mar 2012 - 5:02 am | स्पंदना

आम्च्या पण घरी झाली होती हो चोरी. पण चोर वैतागुन माझ्या चेक्बुक वर ०००लिहुन गेला. माझ्या खर्‍याखोट्या एकत्र ठेवलेल्या दागिन्यात बिचार्‍याला फरक करता आला नाही त्यामुळे ड्रेसिंग टेबल वरचा कानातल्या टॉप्सचा डबा तस्साच उघडा पडला होता. सो चोर तो आया था पर टाईम नही आया था चोरी का ।