सकाळी घराला कुलुप लावून गाडीत शिरलो. दार लावून घेता-घेता सेल फोन नेहेमीप्रमाणे कप होल्डर मध्ये ठेवत इग्निशनची किल्ली फिरवली आणि सवयीने उजव्या हाताने डावीकडून सीट बेल्ट ओढून लावला. लावताना हाताला शेजारी ठेवलेला एम पी ३ प्लेयर लागला. तो पॉवर-ऑन केला तर किशोर कुमारच्या फोल्डर मधलं कालचं अर्धवट राहिलेलं कुठलसं गाणं दिसलं, हल्ली चष्म्याशिवाय काही ढेकूळ दिसत नाही! आणि गाडी चालवतांना चष्मा लागत नसल्याने मी तो लांब बॅगेत ठेवलेला असतो तो ऑफिसमध्ये पोहोचेपर्यंत काढत नाही. त्यामुळे, 'जे काय असेल गाणं ते लागू देत..' असा विचार करून 'प्ले'चं बटन दाबणार इतक्यात फोन वाजला.
कॉल रिसीव्ह करण्याआधी नाव पाहिलं: भुवनेश - मुलाचा मित्र. म्हंटलं याने आज सकाळी का बरं फोन केला असावा? बहुतेक, माझा मुलगा भारतात गेलाय तो व्यवस्थित पोहोचला का हे विचारायला केला असणार.
'अंकल....'
'हाय भुवनेश, कैसे हो?'
'अंकल...' एकदम त्याचा आवाज कापरा झाला.
'क्या हुवा भुवनेश, सब ठीक तो है घरमें?' त्याचं बाळ चार महिन्यांचं आहे, म्हंटलं काही बरं वगैरे नसेल.
'अंकल, मैं शिकागो जा रहा हूं...सुबह इंडियासे फोन आया था...ममी...'
'क्या हुवा?'
'अंकल, कल शामको उनके पेटमे काफी दर्द हो रहा था, गॅस ट्रबल लग रहा था बोली, तो पडोसवाले उन्हें हॉस्पिटल ले गये, लेकिन रास्तेमेंही तबियत बिगड गयी, हॉस्पिटल पहूंचते ही....' आता तो चक्क रडायला लागला होता, ' I lost her, Uncle, मेरी ममी नही रही!'
'Oh, shit! What the hell! तुम कहां हो अभी, भुवनेश?' ....महिन्यापूर्वीच तो त्याच्या आईंना, सासू-सासर्यांना, मेहुणीला आणि पत्नी-मुलाला घेऊन चार दिवस घरी राहिला होता, तेंव्हाच्या त्याच्या आई डोळ्यापुढे आल्या. साठीच्या अलिकडचंच वय, काही खास त्रासही नव्हता प्रकृतीचा.
'अंकल, मैं एअरपोर्ट पर हूं अटलँटा मे, दो बजे की देल्हीकी फ्लाईट मिली है शिकागो से| पहूंच जाऊंगा|'
'This is really shocking, भुवनेश, I wish I could be there with you right now! नेहा और भौमिक कैसे हैं? उन्हे साथ ले जा रहे हो?'
'नही अंकल, ये सब लोग अभी तो इंडिया वापस गये थे, तो हमने सोचा भौमिक का पासपोर्ट आरामसे बनायेंगे, अब उसका पासपोर्ट नही है तो वो दोनों नही आ सकते, मैं अकेला ही जा रहा हूं|'
सहाच महिन्यांपूर्वी माझे वडील गेले, तेंव्हाचा असाच असह्य, एकाकी विमानप्रवास आठवला मला. गळ्यात शब्द अडकले, गाडी बंद केली आणि उतरून घरात शिरलो बोलत बोलत..
'अंकल, नानीजीने बोला था ममी को ज्यादा दिन अकेले मत छोडो, या तो यहीं ला रक्खो या तुम चले जाओ...' नानी जी म्हणजे माझ्या सासूबाई, 'मैने सुनना चाहिये था, उन्हे जाने ही नही देना चाहिये था|' आईला खानदानी हिंदीत 'आप-आप' करणारा अत्यंत आदबशीर भुवनेश, राजस्थानच्या राजपूतांपैकी, त्याच्या आई देखील तसंच खांद्यातून वाकून 'प्रणाम, जी' म्हणायच्या ते आठवलं.
'भुवनेश, प्रग्याको...'
'हां अंकल, प्रग्या और चेतन को भी फोन आया था, वो दोनों भी लॉस एंजेलिससे निकल रहे हैं...हम साथ ही पहूचेंगे देल्हीमें, फिर झांसी जायेंगे|'
आई झाशीला असते त्याची.....असायची.
'भुवनेश, मैं अभी आंटी को फोन करता हूं, उन सबके लिये काफी बडा़ शॉक होगा ये, मगर तुम सम्हालो खु़दको, अकेले जा रहे हो...और प्लीज ये समझ लो, के अब तुम बडे़ हो घरमें, प्रग्या को तुम्हे ही सम्हालना होगा|'
'सब समझता हूं अंकल, लेकिन आपने जो कहा था वो याद आ रहा है जब दादाजी चल बसें थें...किसे चाहिये था ये बडप्पन, अंकल? मुझे तो अब भी ममी की बहोत ज़रुरत थी ना अंकल?'
'भुवनेश, नेहा की चिंता मत करो, कल वीकेंड है, मैं जाकर उन दोनों को घर ले आऊंगा|'
'थॅंक यू, अंकल, मगर नेहा ठीक रहेगी, वैसे भी वो फ्लाय नही कर सकती क्योंकी भौमिक का पासपोर्ट ...'
'अरे, कोई बात नही, मैं ड्राईव्ह कर लुंगा|'
'नही अंकल, आप इतनी सारी तकलीफ ना कीजिये, मैने वैसे अनीश वगैरे को मेसेज छोडा है, वो लोग हैं पास ही में|'
मिनिटभर आणखी बोललो असू दोघे, नेहाचे आई वडिल ग्वाल्हेर मधून निघालेत म्हणून कळलं. तेवढ्यात अनाऊन्समेंट ऐकू आली मला फोन मधून, त्याच्या शिकागोच्या फ्लाईटचं बोर्डींग सुरू झाल्याची.
'चलता हूं, अंकल, देल्ही पहुंचकर फोन करता हूं आंटीको....' माझ्या मुलापेक्षा ५-६ वर्षांनी मोठा असणार्या भुवनेशचा आवाज थरकापला..'आंटी होती तो अभी सहेला देती थी अंकल, रो भी तो नही ना सकता खुलके|'
'भुवनेश, धीरज रक्खो, जो नही होना चाहिये था वो हो चुका अब,' मी बोलून गेलो, 'तुम्हारे रोने से कुछ बदलनेवाला नही है, है ना?' एकदम मलाच माझ्या वाक्यातलं क्रौर्य जाणवलं, 'I am really sorry, बेटा, but you need to pull yourself together. Will you, please? For me?'
'हां, अंकल, निकलता हूं|'
त्याचा फोन संपवून मी घरात सोफ्यावर बसलो, बूट काढले, आतल्या खोलीत जाऊन फोन उचलला आणि घरी फोन लावला.
अर्ध्याच तासापूर्वी मी फोन केला होता, आणि मला 'नीट ब्रेकफास्ट घेतल्याशिवाय निघू नकोस' असं सांगून बायकोने फोन ठेवला होता, तेंव्हा परत घरच्याच नंबरवरून फोन आलेला पाहून म्हणाली, 'काय रे, अजून घरीच?'
'हो गं, भुवनेशचा फोन आला होता...'
'भुवनेशचा? काय झालं? ठीक आहे ना भौमिक वगैरे?'
'हो, पण वाईट बातमी आहे, त्याच्या आई गेल्या काल रात्री. बहुधा हार्ट अॅटॅक ने.'
'आई गं!! कसली बातमी दिलीस रे!'
बॅकग्राऊंडवर सासूबाईंचा लांबून प्रश्न ऐकू आला....'काय गं झालं?'
बायको चटकन सावरली, 'थांब हं जरा आई, काही तरी सांगतो आहे तो, ऐकू दे मला नीट अजून, मग सांगते.'
'आईंना एकदम गेल्या वगैरे सांगू नकोस, हॉस्पिटल मध्ये अॅडमिट होत्या म्हणावं' थोडंसंच, पण सत्य विधान होतं.
'बघते मी आता कसं सांगायचं ते' ती हळू आवाजात म्हणाली.
मी म्हंटलं, 'तो तुमच्याकडे उद्या रात्री पोहोचेल, तोपर्यंत डायरीत त्यांच्या झाशीच्या घरचा फोन नंबर असेल, तो शोधून फोन कर तू, बघ काही मदत हवीय का.'
'कुणाला करणार फोन?'
खरंच होतं, होतंच कोण तिथे? एके काळी दिल्लीच्या प्रख्यात नॅशनल फिजिक्स लॅबोरेटरीत शास्त्रज्ञ असलेले त्याचे वडील दहा वर्षांपूर्वी गेले, आणि बहीण-भाऊ इथे अमेरिकेत, आता घरी जे नातेवाईक होते त्यांचा आणि आमचा परिचय नाही, नेहाचे आई वडिल ग्वाल्हेर मधून निघालेत ते कधी पोहोचतील आणि कुठे उतरतील ते माहीत नाही, तरीही त्यांचा नंबर शोधून बघते म्हणाली.
'पिलू कुठेय?'
'झोपलाय, त्याचा जेट लॅग चालू आहे अजून, पण त्याला सांगावंच लागणार.'
'हो, उठव आणि सांग त्याला. आणि तो जातो म्हणाला तर जाऊ देत झाशीला...'
'तो जाईलच, जायलाच हवं...काय रे हे? कसलं आयुष्य आहे हे परदेशातलं....'
'मी ठेवू आता? मला निघायला हवं, मीटींग होती महत्वाची, आता उशीरा का होईना जायला हवं.'
'ठीक आहे नीघ तू.'
'बाय...'
....
'बाय नाही म्हणालीस? ठेऊ? मला खरंच निघायला हवंय. OK? Bye now.'
'तू खाल्लंस सकाळी?'
'हो गं.'
'खरं सांग.'
'खरंच खाल्लं, आता निघतो मी.'
'नीघ तू, पण नकोस एकटा राहू रे, ये तूही इकडे आताच महिनाभर, हे असलं काही ऐकलं की मला अगदी गिल्टी वाटतं तुला तिथे एकट्याला राहू द्यायला, आणि तू स्वतःची काळजीही घेत नाहीस नीट!'
'मी व्यवस्थित राहतोय, काही काळजी करू नकोस. चल ठेवतो मी आता. पिलूला सांग. रात्री फोन करीन.'
....................
मग मी विचार बदलला, रस्त्यात वेळ घालवण्यापेक्षा मी पुढचे दोन तास घरीच थांबलो, डायल-इन केलं आणी मिटींग्जमध्ये भाग घेतला. मग पोटात पुन्हा एकदा सिरीयल ढकललं आणि बाहेर पडलो.
गाडीत आलो, गाडी चालू करून रस्त्यावर वळलो. माझ्या नकळत एम पी ३ प्लेयर आणि थांबलेलं गाणं चालू झालं.
माझं लक्ष नव्हतं, डोळ्यापुढे भुवनेशच्या आई येत होत्या, बुटक्याशाच, त्यामुळे स्थूल वाटेल असं शरीर. त्या राजस्थानच्या कुठल्याश्या राजघराण्याशी संबंध असलेल्या कुळातल्या, जुन्या चालीरीतींचा ओढा होता. तरीही एका अत्यंत कुशाग्र बुद्धीमत्तेच्या पण स्वाभिमानी शास्त्रज्ञाशी लग्न झाल्याचा अभिमान वाक्या-वाक्यातून दिसायचा.
'इन्होंने कभी गव्हर्मेंटसे फूटी कौडी नही ली थी जो उन्हे अपने पसीने से ना मिलनी हो| लॅब के काम के सिवा, अंग्रेजी किताबें पढने का शौक छोडकर बस अच्छे अच्छे सूट पहेनना उन्हें बहुत अच्छा लगता था| बच्चोंको हमें 'ममी-पापा' कहेना भी उन्हींने सिखाया| दोनों बच्चोंको बस यही सिखाया, "कभी गलत काम नही करना"|
मग संध्याकाळी त्यांना सर्वांना समुद्रावर नेलं तेंव्हा भुवनेश, मी आणि त्या असे तिघे एका कठड्यावर बसलो होतो, म्हणाल्या, 'आपको पता है, इनके पापा का जब हार्ट अॅटॅक हुआ था, मैं झांसी मे थी अपने बहेन और जीजाजी की घरमें, और इनके पापा देल्ही में...' मी हे सगळं आधी ऐकलं होतं भुवनेश कडून. आधी लॉस एंजेलिसला शिकायला आणि लगेचच लग्न होऊन बहीण आलेली, आणि दिल्लीत ५ वर्षं नोकरी करून अखेर वडिलांच्या हट्टाखातर एम एस करायला भुवनेश अमेरिकेत आला. तो आला, आणि महिन्याभरातच वडील गेले.
'यकीन मानिये, मेरे सपनें मे आये थे, बोले, "मुझे कुछ हो रहा है, तुम होती तो बच जाता|' मैने तुरंत उठकर हडबडाकर फोन लगाया, इन्होंने उठाया नही....कुछ घंटों बाद पता चला, लॅबमेंही चल बसें थे.....'
'ममी, आप छोडिये ना वो सब अभी, अंकल को पता है सारा...जो होना था, हुवा, अब क्या कर सकते हैं?'
'नही, लेकिन मैं ये कह रही हूं की कोई शक्ति है जो मुझे उनके पास ले जाना चाह रही थी...और मैं गयी नही|'
'हां, अब जो हुआ सो हुआ| आगे की सोचना चाहिये ना?'
माझ्याकडे पहात त्या म्हणाल्या, 'आगे की क्या सोचूं मैं? कैसे सोचूं? ज़िदगीभर का साथ होना था...बस ऐसे अकेली को छोड कर चले गये!'
मी म्हंटलं 'अकेली कहां हैं आप, दोनो अच्छे बच्चे हैं, दोनोंकी शादीयां हुई हैं, आप के अब तो एक पोता भी है, अकेली कहां हैं आप?'
'वो तो सब इश्वर की दयासे इनका अच्छा चलता रहेगा, मेरा उसमें क्या काम? मैं तो बस बीच बीच में इनके पापासे बात कर सकती हूं तब ही अच्छा लगता है| अब जब उनसे मिलूंगी, तभी सुकून मिलेगा|'
'ममी, आप भी ना....' माझ्याकडे पहात कसंनुसं हसत भुवनेश म्हणाला, 'अंकल, ममी का कुछ प्लॅंचेट वगैरे पर विश्वास है और उनको लगता है की पापा उनसे बात करते हैं'
'आप का नही है?' त्यांनी मला विचारलं.
सुदैवाने मी तोंड उघडायच्या आत भुवनेशनेच उत्तर दिलं, 'ममी, अंकल बिल्कुल पापा जैसे ही हैं, उनका भी कहां विश्वास था ऐसी बातोंपर? आप बस उस बातको छोड ही दीजिये, और जरा बीच का मज़ा लिजिये, चलिये हम थोडा घूमकर आते है जबतक अंकल यहां आराम करेंगे|'
........................
लाल सिग्नल लागला आणि मध्येच विचारांची तंद्री तुटली. किशोरकुमारच्या गाण्यातले शब्द मध्येच out of context ऐकू आले, मी त्यांना subconsciously भुवनेशच्या घटनेत गोवत गेलो:
तुम्हारे खयालोंमें खो जायें
ये जी चाहता है, के सो जायें....
आयला या गाण्याच्या, नको तेंव्हा नको ते...
........................................
'अंकल, शिकागो पहूंच गया मैं, नेहा से बात हुई, उसने बताया की आपका फोन आया था, थँक्स अंकल|'
'नो प्रॉब्लेम, मेरी अनीश से भी बात हुई, हम लोग देख लेंगे, तुम चिंता मत करो|'
'अंकल,...'
'येस? बोलो..'
'सुना है ममी कह रही थी पडोसवाली आंटीको, के दर्द लेफ्ट साईडसे नीचे की तरफ जा रहा था, हार्ट अॅटॅक का पेन तो शोल्डरमें होता है ना? जैसे आप के घर हम आये थे तब हुआ था उनको?'
'भुवनेश, अब ये सारी बातें मत सोचो| और जानकर भी क्या करोगे?'
'फिर भी, मैं होता तो पूछता तो ना अंकल, की कहां दर्द है? May be, कुछ कर सकता था!'
.....
........
.................
रात्री घरी पोहोचेपर्यंत उशीर झाला होता, बाहेरूनच जेवून आलो असल्याने थोडा वेळ बातम्या पाहिल्या, आणि झोपी गेलो.
सकाळी आवरून कॉफी घेतली, म्हंटलं निघायच्या आधी एकदा नेहाला फोन करावा आणि भुवनेश पोहोचला का विचारावं.
'अंकल, वो तो पहूंच गये देल्ही में और झांसी की तरफ निकले हैं अभी, चार घंटोंमें घर पहूंच जायेंगे| मगर थोडासा प्रॉब्लेम हो गया है बोल रहे थे|'
'क्या हुआ?'
'प्रग्या की पहली फ्लाईट लेट होनेसे कनेक्टिंग फ्लाईट मिस हो गयी है, तो वें दोनों लंदन मे वेट कर रहे हैं और कल शाम को लेट पहूंचेंगे| उन्होंने कहा है जब तक हम नही आते, कुछ ना करो, काफी रो रही हैं प्रग्या| अब पहले से चौबीस घंटे तो हो ही गये हैं, तो मालूम नही और कितना रोक सकेंगे, सब बिरादरी वाले बोल रहे हैं की ज्यादा देर रुकना अच्छा नही| और भुवनेश बोल रहे थे की व्हिसा के बारे में कुछ पूछना था, आपको नंबर दूं उनके कझिन का जो लेने आये थे और साथ मे हैं?'
तिच्याकडून नंबर घेऊन भुवनेशला फोन लावला. वाटेतच पण घराजवळ आला होता.
'अंकल, मुझे एच वन स्टँप करवानेके लिये कॉन्सुलेट जाना पडेगा, एअरपोर्ट पर इंटरनेट मिला तो अपॉईंट्मेंट के लिये ट्राय किया, लेकिन ३० तारीख से पहले की डेट नही दिखा रहे हैं, इतनी तो छुट्टी नही मिलेगी मुझे, और करूंगा भी क्या यहां?......... ममी भी तो नही रही अब......सोच रहा हूं बंबईमे देखूं| आप के जो ट्रॅव्हेल एजंट हैं उनसे हो सकता है काम?'
मी त्याला एजंटचा नंबर आणि नाव दिले आणि म्हंटलं मीही फोन करीन, होईल काम तर बरं.
'अब कैसे हो, भुवनेश?'
'ठीक हूं, अंकल,' बर्याच शांत आवाजात म्हणाला, 'पूरे बीस घंटे बस यही सोच रहा था, अब जो हुआ सो हुआ, ममी तो पापाके बिना रहना ही नही चाहती थी, तो फिर उनके पास चली गयी हैं| अब बस हमें कोई समझाने वाला नही रहा, ऐसे ही सम्हल जाऊंगा, सम्हलना ही पडेगा ना?'
त्याची समजूत काढली, एकटा नाहीयेस म्हंटलं, नेहा आणि भौमिक आहेत, प्रग्या-चेतन आहेत, तुझे मित्र आहेत, आम्ही आहोत...आणि फोन ठेवला.
थोड्यावेळ इकडे तिकडे केलं, इंटरनेटवर बातम्या वाचल्या. इतके दिवस वाट पाहिलेलं सचिनच्या शतकांचं शतक झाल्याचाही आनंद पोचला नाही आतपर्यंत. निघालो, गाडी सुरू केली. रस्त्याला लागलो.
रस्ता सुरू झाला, किशोरकुमारही सुरू झाला, थांबलेल्या ओळींपासून पुढे:
................
तेरे बिना ज़िंदगीसे कोई शिकवा नही
तेरे बिना जिंदगी भी लेकिन, ज़िंदगी तो नही....
प्रतिक्रिया
17 Mar 2012 - 4:20 am | यकु
क्लास !
एक क्षणभरही थांबू शकलो नाही वाचताना.
शेवटच्या ओळी तर अंधारातून झगमगत भूईनळा पेटावा तशा समोरुन वर गेल्या.
17 Mar 2012 - 4:23 am | रेवती
हम्म्म....
कसंसच होतं असं काही वाचताना.
तुमची लेखनशैली आवडते.
17 Mar 2012 - 5:45 am | स्पंदना
पाणि भरल डोळ्यात वाचताना. मोठ व्हायचा किती सायास करतो आपण , पण मग अस पदरात पडलेल मोठेपण नकोस होत. साराच गुंता, एका पत्निचा पति विना, एका लेकराचा आई विना..आवडल म्हणाव की 'टच्ड' म्हणाव?
17 Mar 2012 - 7:39 am | ५० फक्त
भावना आणि व्यवहारांचं मिश्रण उत्तम जमलंय,
आणि गाडीत बसुन गाणी ऐकताना त्यावर विचार करु नये किंवा चर्चा करु नये याचा अनुभव घेतलाय, एका मिपाकराबरोबर.
17 Mar 2012 - 12:35 pm | गणपा
बहुगुणीकाका लेखनशैली एकदम ओघवती आहे तुमची. एकदा वाचायला सुरवात केली की थांबवत नाही.
सहमत.
याचा बरेच वेळा अनुभव घेतलाय. गाण्याच्या/विचारांच्या तंद्रित यांत्रिकपणे मुक्कामी कसा पोहोचलोय ते तिथे पोहोचल्यावर आठवतही नाही. :( (सुदैवाने अजुन काही वाईट अनुभव नाही. पण हे डेंजरस आहे खर.)
20 Mar 2012 - 5:03 pm | स्पंदना
सहमत ! एकदा कव्वाली ऐकत होते, काय चालवतेय अन कुठे जातेय तेच कळेना असा ठेका...बापरे! पहिला ऑफ केली सिस्टिम अन बाजुला काढली गाडी. डोक ठिकाणावर आल्यावर, मग परत रस्त्याला लागले.
17 Mar 2012 - 8:20 am | धन्या
घर पानावर नाव वाचूनच धागा उघडायचा नाही असं ठरवलं होतं . पण नविन लेखन मध्ये धाग्याच्या नावाबरोबर तुमचं नाव वाचलं आणि लगेच धागा वाचायला उघडला.
वाचता वाचता डोळे भरुन आले.
17 Mar 2012 - 9:42 am | शोधा म्हन्जे सापडेल
वाचताना डोळ्यात पाणी कधी भरलं तेच कळलं नाही. कथेच्या पात्राचे आणि माझे नाव एकच असल्याने आणि मलाही वडिल नसल्याने, पुढे वाचायला नको वाटत होते. पण वाचली. फारच छान..!
कधीच मोठं न व्हावंसं वाटणारा ..... भुवनेश
17 Mar 2012 - 10:35 am | इरसाल
छान, आवडले ओघवते आणि काळजाला भिडणारे लेखन.
17 Mar 2012 - 11:37 am | निश
बहुगुणी साहेब, अप्रतिम मनाचा ठाव घेणारा लेख.
17 Mar 2012 - 1:17 pm | सानिकास्वप्निल
लेख वाचून एकदम भरून आले....
17 Mar 2012 - 1:23 pm | अन्या दातार
काळजात चर्र झाले वाचताना. लेखन आवडले तरी पुलेशु म्हणवत नाही :(
17 Mar 2012 - 1:30 pm | मन१
अनुभव मनला भावला.
17 Mar 2012 - 4:53 pm | पैसा
काय बोलू?
17 Mar 2012 - 5:59 pm | सहज
.
17 Mar 2012 - 7:18 pm | शैलेन्द्र
सुंदर ... कुठेही कमी जास्त नाही..
17 Mar 2012 - 8:00 pm | प्रभाकर पेठकर
अगदी हृदयस्पर्शी झाले आहे लेखन. गेली अनेक वर्षे परदेशात राहत असल्याने अशा प्रसंगी जाणवणारी एकटेपणाची भावना फार प्रकर्षाने जाणवली.
शब्दसंख्या कमी करता आली असती तर अधिक प्रभावशाली झाली असती.
17 Mar 2012 - 10:31 pm | जाई.
निव्वळ अप्रतिम
18 Mar 2012 - 6:33 am | गवि
फार सुंदर... टचिंग..
18 Mar 2012 - 8:41 am | चौकटराजा
लेखक भौ, मला असे कधीतरी लिहिता येईल का हो ? शैलीदार , भावस्पर्शी लेखन, नेहमीपेक्षा वेगळा कॅन्व्हास . यात ५० फक्त व प्रभाकर पंत
यांचा प्रतिसादही अभ्यासण्यासारखा !
किशोरकुमारचे हे ही गाणे पहा
ये जीवन है , इस जीवनका यही है ,यही है , यही है रंग रूप !
20 Mar 2012 - 11:22 pm | स्मिता.
काय बोलणार हे असं वाचल्यावर? एरवी हवा असणारा पैसा अश्या हळव्या वेळी नको वाटतो. कितीही प्रॅक्टिकल विचार करायला बसलं तरी माणसं महत्त्वाची की पैसा याचं उत्तर मिळत नाही.
21 Mar 2012 - 2:11 am | प्राजु
____/\_____