ती त्याच्या वाटेकडे डोळे लावुन होती. वाट बघुन शिणली होती असे म्हणण्याइतका वेळ अजुन गेला नव्हता. मात्र त्याच्या येण्याची वेळ जवळ आली तशी ती सवयीने त्याची वाट बघू लागली. मीलनाची स्वप्ने रंगवू लागली. त्या मधुर स्वप्नांत असतानाही तिला चटके मात्र बसतच होते. रविराजाची नजर चुकवायची आजपर्यंत तिला कधीही हिंमत झाली नाही. वडिलांचा दराराच तसा होता. तापट , कडक आणि शीघ्रकोपी. त्यांच्यामोर कुणाचीच धडगत नसते. अशा वेळी तिला हमखास निशेची आठवण व्हायची. निशा आली की रविराज गायब होतात. किंबहुना रविराज दिसेनासे झाले की मगच निशा येते. निशा मायाळू आहे. ती आली की शांत, शितल वाटते. रविराजाचा मात्र दिवसभर राबता. सकाळी अगदी शांत आणि लोभस वाटणारे ते दिवसभर मात्र आग ओकतात. हेमंत किंवा शिशिर असताना त्यांच्या अस्तित्वाची उब असते. ते तिला जपतात. वसंत आल्यावर तर ती फारच खुश असते आणि रविराजही तिचे लाड करतात. वसंत गेला की मात्र ते तापायला लागतात. उगाच चिडचिड. सारखा भडका. सतत आग ओकणे हा एकमेव कार्यक्रम. तिला रागही येतो त्यांचा आणि दयाही वाटते. निशा तर नेहमीच तिला समजावत असते. तीही प्रयत्न करते त्यांना समजुन घेण्याचा. मात्र तो येणार म्हटल्यावर इतर काहीही तिला सुचत नाही. तिच्या मनाला एकच ओढ "तो कधी येईल ?"
तो आलेलाही वडिलांना आवडत नाही. त्याचे येणे ते टाळू शकत नाहीत. पण हसुन आनंदाने कधी त्याचे स्वागत करीत नाहीत. तो आला की हे कुठेतरी दृष्टीआड होतात. क्वचितच कधी दोघे एकत्र आले असतील. "तो वेळ पाळत नाही. " ही यांची तक्रार तर "हे जरा अतिच वक्तशीर !!" अशी त्याची भुणभुण. दोघांत कुचंबणा मात्र तिचीच. आताही तिने मनाची तयारी केलीय की त्याला उशीर होऊ शकतो. मात्र वाट बघणे काही थांबले नाही.
त्याची सेनाही अजुन दिसेना. रविराजाचा रथ रुबाबात सकाळपासुन संध्याकाळपर्यंत आपल्या मार्गावर दौडत होता. संध्याकाळी एखादा काळा ढग डोकावल्यासारखा येऊन जायचा. दरवेळीप्रमाणे त्याने यावेळी एखादा दुतही पाठविला नाही, इशारा देण्यासाठी. "मी येतोय." म्हणुन. सारे काही शांत होते. ती आता व्याकुळ झाली. तिला खात्री होतीच त्याच्या येण्याची. मात्र लक्षणं ठीक दिसत नव्हती. मिलनाची वेळा जवळ सरकतेय. क्षितिजावर मात्र दळभार दिसत नव्हता. लांबवर धुळ उडत नव्हती की त्याच्या रथचक्रांचा खडखडाटही ऍकू येत नव्हता. मात्र धीर सोडायचा नाही हे तिला चांगलंच माहित होते. ती वाट बघत होती अस्वस्थपणे.
आणि आला ! साय्रा दळभारासह आला ! तो आला ! अगदीच अकस्मात तो हजर झाला. अचानक आलेला हल्ला परतवणे रविराजाच्या आवाक्याबाहेरचेच होते. त्याची तर मतीच गुंग झाली. ना ललकारी ना आव्हान!! सरळ हल्ला आणि पराभव ! आपली किरणे क्षीण होत आहेत अशी जाणीव त्याला झाली आणि हताशपणे तो आपल्या सिंहासनावरून पायउतार झाला. आपण छोटीशी चकमकही मांडू शकलो नाही याचे त्याला अतीव दु:ख झाले आणि तो अज्ञात स्थळी रवाना झाला. अर्थात पुन्हा परतण्यासाठीच.
नवा राजा आला. सिंहासनावर विराजमान होण्यापुर्वीच त्याच्या नावाची द्वाही फिरली. प्रजा आनंदाने नाचू लागली. प्राणी- पक्षी, वृक्ष-वेली सारीच डोलू लागली. जो तो दुसय्राला सांगू लागला, "तो आला ! तो आला !" जणू प्रत्येकाला वाटत होते की मीच काय तो त्याला पाहू शकतो. प्रत्येकाने आपापल्या कुवतीप्रमाणे त्याला पाहिले. त्याला स्पर्शीले. त्याला अनुभवले.
धरतीची सारी लेकरे आनंदाने बेभान झाली. नव्या उत्साहाने, नव्या उन्मादाने सारीच कशी ओतप्रोत भरली. तीही आनंदली. मात्र तिने आपली मर्यादा सोडली नाही. आनंद दर्शवतानाही ती बेभान झाली नाही.त्याच्या येण्याने सुखावली तशीच मोहरलीही. संध्यासमयी तर ती अधिकच लाजली. तिच्या गालावरती रक्तिमा पसरला. कारण आता निशा येऊन तिला छेडणार होती.
त्याचा धसमुसळेपणा तिला माहित होता. येताना आणि आल्यावरही काही काळ तो आडदांडपणा करणार हे ती जाणुन होती. काळ्याकुट्ट गजराजांवर बसलेली त्याची स्वारी तिला मोहवित होती. त्याचे सखेसोबतीही त्याच्यासारखेच मस्तीखोर. कडकडाट करत नाचणारी बिजली आणि दिसेल त्याला उचलुन भिरकावणारा दंगेखोर वाराही त्याच्यासोबत होतेच. ही सारी दांडगाई ती सहन करीत होती कारण आपल्याप्रमाणेच तोही किती आतुर असतो मीलनाला हे ती ओळखुन होती.
प्रतिक्रिया
12 Jun 2008 - 7:03 pm | आनंदयात्री
सुंदर लिहलय काळा पहाड तुम्ही. उपमा खुपच सुंदर वापरल्यात.
12 Jun 2008 - 10:16 pm | पक्या
>>सुंदर लिहलय काळा पहाड तुम्ही. उपमा खुपच सुंदर वापरल्यात.
हेच म्हणतो मीही. फक्त शेवटी जिथे वार्याचा उल्लेख आहे तिथे वार्याचा समानार्थी शब्द वापरायला हवा होता. जसे रविराज , बिजली , निशा हे शब्द वापरले आहेत तसे पवन / अनिल असा वार्यासाठी शब्द हवा होता.
12 Jun 2008 - 10:51 pm | भाग्यश्री
पावसावर आणि एकुणच ऋतुचक्रावर इतका सुंदर लेख कधी वाचला नव्हता!
वेगळ्याच उपमा.. आणि मस्तच जमलाय!! खूप आवडला!!
http://bhagyashreee.blogspot.com/
13 Jun 2008 - 8:46 am | अनिल हटेला
अप्रतीम !!!
दुसरा शब्द च नाही!!!!!!
काय !!!
कधी ह्या द्रुष्टीने विचारच केला नव्हता!!!!
अप्रतीम !!!!!!!
13 Jun 2008 - 9:34 am | ऋचा
अप्रतिम!!!!
मस्त लिहिलय तुम्ही.
>>कधी ह्या द्रुष्टीने विचारच केला नव्हता!!!!
सहमत.
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
13 Jun 2008 - 9:41 am | सहज
छान वर्णन केले आहे.
13 Jun 2008 - 9:57 am | II राजे II (not verified)
पावसावर आणि एकुणच ऋतुचक्रावर इतका सुंदर लेख कधी वाचला नव्हता!
वेगळ्याच उपमा.. आणि मस्तच जमलाय!! खूप आवडला!!
सहमत. हेच म्हणतो !!!
राज जैन
मृगजळाचा पाठलाग नेहमीच जीवघेणा ठरतो... आपली पाण्याची बाटली नेहमी आपल्या जवळ बाळगावी... ;)
13 Jun 2008 - 2:41 pm | काळा_पहाड
आपणा सर्वांचे मन:पुर्वक आभार.
पक्याची सुचना आवडली. धन्यवाद.
अशाच सुचना व प्रोत्साहन मिळत राहावे.
काळा पहाड
14 Jun 2008 - 12:51 am | विसोबा खेचर
काळ्या पहाडा,
सुरेख लेख..!
औरभी लिख्खो..
तात्या.