आज की ताजा खबर ...ठाण्यात आनंद दिघे साहेब अवतरले ......

यशोधन वर्तक's picture
यशोधन वर्तक in जनातलं, मनातलं
10 Mar 2012 - 1:59 pm

धुळवडीची संध्याकाळ...सर्व जग रंगांत आणि बऱ्याच इतर गोष्टीनी रंगून जावून शांत झालेले . रस्त्या रस्त्या वर तुरळक वाहतूक . संसारिक आणि पेंशनर चेहेरे फक्त रस्त्यावर उरलेले....... अचानक जांभळी नाका तळपली जवळील शिवाजी महाराज्यांच्या पुतळ्याजव आनंद दिघे अवतरले. सुरुवातीला कोणाचच लक्ष त्यांच्याकडे गेले नाही . काही जुने जाणते शिवसैनिक ,असे की आता त्यांना कोणीही विचारात नाही तळ्याजवळ छत्रपतींच्या पुतळ्याची अवस्था पाहायला आले होते .आनंद दिघे साहेबाना पाहून त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. हा हा म्हणता त्यांच्या भोवती गर्दी जमली .
दिघे साहेब नेहमीच्या सवयीने पाई चालत आनंद आश्रमाच्या दिशेने निघाले.. एव्हाना ठाण्याच्या काना कोपऱ्यात आनंद दिघे साहेब आल्याची बातमी पसरली होती . बऱ्याच हुशार आणि आगावू लोकांनी ही बातमी मुंबई , मालवण , पुणे , दिल्ली आणि नाशिक येथे देखील पोहोचवली होती . गिरणगावात ही बातमी पोहोचल्यावर आमदार बाळा नांदगावकर क्षणभर स्तब्ध झाले त्यांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या . ते ताबडतोब ड्रायव्हरची वाट देखील न बघता गाडी घेवून ठाण्याच्या दिशेने रवाना झाले सुद्धा. दादरच्या परिसरात एकाच सन्नाटा पसरला होता . कृष्णकुंज वर ही बातमी पोहोचताच राज साहेब गडबडीने सदरेवर आले. काका साहेबाना फोन करावा की काय असा एक विचार त्यांच्या मनात आला पण लगोलग तो बाजूला सारून त्यांनी फोन फिरवायला सुरुवात केली . दिघे साहेबाना भेटायला राम कदम किंवा इतर लोकांपेक्षा सरपोतदार अधिक योग्य असल्याचे त्यांना वाटून गेले त्या बरोबर त्यांनी स्वतः सरपोतदार यांना गाडी घेवून कृष्णकुंज वर येण्याचे फर्मान सोडले. कोहिनूर मध्ये वेगळाच नूर होता आनंद दिघे अवतरल्याची बातमी कानी आल्या आल्या पंत लगबगीने उठले त्यांनी गुळ खोबर्याचा नेवेद्य ताबडतोब घराच्या देवांसमोर ठेवला. आणि जवीबपुना सांगून सिद्धिविनायकाला मोठ्या प्रसाद आणि अभिषेकाची तयारी करायला सांगितले . मातोश्री वर जरा विचित्र वातावरण होते म्हणजे एक तर आनंद व्यक्त करावा की नाही की नेमकं काय करावे हे नक्की होत नव्हते. मधल्या साहेबांनी तातडीची बैठक बोलावली आणि या बैठकीत जे ठरेल त्या प्रमाणे वागावे असे ठरले . परंतु मुंबई चा महापौर शिवसेनेचा झाल्याच्या आनंदात कोणीच जागेवर नव्हते ..म्हणून सरते शेवटी संजय राउत आणि स्वीय सचिव यांच्या सल्या नुसार सध्या जैसे थे राहण्याचे ठरले . पुण्याला वेगळीच धामधूम चालू होती . काँग्रेस च्या मानकर्यांना मिडिया मधून मिळणारे दणके बघून दादा अगदी खुश झाले होते ..त्या ख़ुशी मध्ये त्यांना नेमका ' आनंद " कोठला लक्षात आला नाही त्या मुळे बातमी देणाऱ्याला त्यांनी " तुमी गप राव्हा हो आम्ही आधीच आनंद ला सेट केला आहे चला ठेवा फोन " असा दम दिला. नाशिक च्या गडा मध्ये महापौराची लगबग चालू होती तिथे ही बातमी पोहोचताच एकाच गडबड उडाली नाशिकचे आर्म स्ट्रोन्ग काका आणि उपद्व्यापी पुतणे एकदम चपापले . काकांनी सांगावा धाडून गडावरचे पहारे जरा जास्त सक्त करण्याच्या सूचना दिल्या ...जुन्या अनुभवातून काका जरा जास्त सावधगिरी बाळगून होते . दिल्ली मध्ये शेतकरी भवनात ही बातमी पोहोचताच मोठे साहेब खुदकन हसले . मोठ्या साहेबाना असे हसताना बऱ्याच दिवसात कोणी पहिले नव्हते . साहेबाना २०१४ च्या विधान सभेच्या निवद्नुकन मध्ये एक वेगळेच गणित जमण्याची स्वप्ने पडू लागली , त्यांनी लगबगी ने दादा ना फोन लावला आणि लगेच ठेवून दिला ...मग पुन्हा खासदार ताई साहेबाना फोन लावला अश्या नाजूक कामांना ताई साहेबांची शैली बरी पडते असे त्यांचा अनुभव सांगतो. मालवण च्या दरबारी ही बातमी पोहोचताच लगेच दादरला फोन गेला आणि "सदानकदा" त्यांना त्रास देणाऱ्या नेत्याला ठाण्याला जाण्याचे आदेश मिळाले. ठाण्यातील स्वाभिमानाल आता शक्तीचे बळ मिळण्याची एक अंधुकशी अशा त्याच्या मनात निर्माण झाली.
हे सगळे होत असताना ठाण्यात वेगळीच गम्मत सुरु होती . साटीस च्या उड्डाण पुलाकडे पाहत दिघे साहेब थोडावेळ विचारात गढले खूप विचार करून देखील या विचित्र बांधकामाचे प्रयोजन काय ते त्यांच्या लक्षात येईना. हे सर्व होत असताना ठाण्यातील तीन आमदार लगबगीत होते . राजन विचारे यांनी गम्भित चेहेर्याने अंगार्याची एक नवीन पुडी खिशात सरकवली .. हातात जप माळ घेवून स्वामी समर्थांचा मनोभावे जप केला ..कानी आलेली वार्ता जर खरी असेल तर राजीनाम्याची तयारी ठेवावी लागेल असे त्यांना राहुन राहुन वाटत होते . महापौराच्या निवडणुकीचा निकाल मनाजोगता लागल्यामुळे झालेला आनंद इतका क्षणभंगुर ठरवा याचे त्यांना फार वाईट वाटत होते. एकनाथ शिंदे लगबगीने आनंद आश्रम वर पोहोचले ...साहेबांच्या पायावर स्वतःला झोकून द्यायचे असे त्यांनी नक्की केले होते , आनंद अनावर झाल्यामुळे ते किकर्तव्य मूढ अवस्थे मध्ये पोहोचले होते. त्यांना इतके शांत बघून कार्यकर्त्यांमध्ये वेगळीच खुज्बुज सुरु झाली . त्यांचा स्वीय सचिव सचिन जोशी हे तर घालीन लोटांगण वंदिन चरण या समाधीत पोहोचले होते . सचिन चव्हाण आपल्या कार्यकर्त्यांसह आनंद आश्रम इथे पोहोचले आपण दिघे साहेबांच्या पार्थिवाला जिथे अग्नी दिला त्या मैदानाचे कसे रक्षण केले आणि त्याचे कसे जतन केले हे साहेबांच्या कानावर घालण्याकरिता ते आतुर झाले होते .पण हे सांगायचे तरी कसे अशी विचित्र परिस्थिती ने गोंधळलेले . तिसरे आमदार प्रताप सरनाईक पाहुण्यात पाहुणे बनून वावरत होते . दिघे साहेबांचे डि.जे. लावून मराठी कलाकारांना घेवून स्वागत करायचा बेत त्याने आखलेला होता . परंतु सकाळी त्याच कालाकर्ण बरोबर रंग पंचमीचा कार्यक्रम खेळल्या मुले त्यांना आता शोधायचा कसे आणि कुठे या विवंचनेत ते पडले होते .त्यांच्या सुविज्ञ पत्नी नगरसेविका परीशा सरनाईक या मोठा हार घेवून गर्दीत सर्वात पुढे उभ्या होत्या . दिघे साहेबाना पहिला हार मीच घालणार असा निर्धार त्यांच्या चेहेऱ्यावर दिसत होता. सर्वत्र असे गोंधळाचे वातावरण दिसत होते . या गर्दीत ठाण्याचे माजी महापौर रमेश वैती हातात हार घेवून प्रफुल्ल मानाने उभे होते ..उज्ज्वल राजकीय भविष्याची स्वप्ने अशी अचानक साध्य होतील असे त्यांना स्वप्नात देखील वाटले नव्हते.
मुंब्र्याचा चिंतन शिबिरात आनंद परांजपे यांना घेवून बसलेले आमदार जितेंद्र आव्हाड एकदम खडबडून उठले ...जुन्या संबंधांचा हवाला देत दिघे साहेबांची भेट घेण्याकरिता ठाण्याचा दिशेने निघाले . शहर प्रमुख नरेश म्हस्के आनंद नगर नाक्यावर आपल्या सैनिकांसह सज्ज उभे होते ...साहेब काही झाला तरी आपल्याला भेटायला येणार याची पक्की खात्री त्यांच्या चेहेऱ्यावर दिसत होती
दिघे साहेब मात्र दृष्टीपथात येत नव्हते . जुने शिव सैनिक बरोबर घेवून दिघे साहेब उखडलेल्या रस्त्या वरून पायपीट करत होते ...जागोजागी खणलेले रस्ते बघून मनातल्या मनात सुस्कारे सोडत होते. गरीब जनता बाया बापड्या पाया पडून त्यांचे भेट घेत होत्या . तरुण पिढी नेहमी अभिनंदनाच्या होर्डिंग वर दिसणारा चेहेरा प्रत्यक्ष पाहून अचंबित होत होते . आणि दिघे साहेब मात्र त्या होर्डिंग कडे संतापाने पाहत होते . आपण स्वप्नं रंगवलेले ठाणे होर्डिंगमय झाल्याचे पाहून त्यांना राग आवरत नव्हता. हळू हळू चालत साहेब महानगर पालिकेचा वस्तूकडे आले . ती सुंदर वस्तू पाहून साहेबांच्या चेहेऱ्यावर स्मित झळकले ...डौलाने फडकणारा भगवा पाहून साहेबांची मान ताठ झाली परंतु जवळच फडकणारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ध्वज पाहुन साहेबांनी एक निश्वास सोडला त्यांच्या डोळ्याचा कडा पाणावल्या होत्या . काळोख दाटू लागला होता ..जमणाऱ्या गर्दीच्या समस्यांची नोंद मनोमनी घेवून दिघे साहेब चिंतेत पडले होते . या वेळी थोडक्यात निभावले परंतु पुढे कसे होणार अशी चिंता त्यांच्या चेहेऱ्यावर दिसत होती . जमलेल्या गर्दीला नमस्कार करून आणि जुन्या शिवसैनिकांना कडकडून भेटून दिघे साहेब अंतर्ध्यान पावले .
आनंद आश्रमातील नवीन कार्यकते आणि नेते यांची गर्दी दिघे साहेबांची वाट पाहुन कंटाळली होती . नेते मंडळीनी ही अफवा पसरवणार्याची जाहीर खरडपट्टी काढायला सुरुवात केली. सर्वत्र संशयाचे आणि अविस्वासाचे वातावरण निर्माण झाले. प्रत्येक जन दुसऱ्यावर दोषारोप करू लागला. या गोंधळा कडे पूर्णपणे पाठ फिरवून ठाण्यातील नागरिक ,रंजले गांजलेले गरीब लोक आणि जुने दुर्लाक्षले गेलेले शिवसैनिक आज जड हृदयाने आणि भरल्या हळव्या मनाने झोपेच्या अधीन झाले . आज इतक्या वर्षाने त्यांचा काळज्या , वेदना होणारे त्रास जाणून घेणारे कुणी आले होते . बाकी इतर दिवशी काय फक्त मते मागणारे येतात आणि बाकी सर्व दिवस फक्त बंद , तोडफोड , अपहरण , गुंडगिरी भ्रष्टाचार हेच भोगायचे असते . पंधरा वीस वर्षांनी असा एखादा दिवस आयुष्यात येतो की कोणी इतक्या लांबून म्हणजे जिथे आपण कोणी पोहोचू शकत नाही इतक्या लांबून फक्त तुमच्या आमच्या करिता येतो.

नोट . : सदर वर्णन एक कल्पना विलास आहे त्याचा प्रतक्ष घडणाऱ्या राजकारणाशी आणि जीवनाशी कुठला बादरायण संबंध जोडू नये . फक्त असा दिवस खरच आयुष्यात यावा अशी प्रार्थना जरूर करावी.

आपला दिवास्वप्नं पाहणारा ठाणेकर मित्र
यशोधन

राजकारणविरंगुळा

प्रतिक्रिया

मजा आली वचताना. नर्म विनोदी शैली व खुमसदार प्रकटन.

चेतनकुलकर्णी_85's picture

10 Mar 2012 - 3:54 pm | चेतनकुलकर्णी_85

लई भारी..!!

याच बरोबर दिघे साहेबांच्या कामच आढावा घेणारा पण लेख येउद्यात..ठाण्यात असताना बरेच ऐकले आहे त्यांच्या बद्दल...

पैसा's picture

10 Mar 2012 - 3:55 pm | पैसा

खुसखुशीत!