नारळाचे झाड म्हणजे कल्पतरूच. त्याच्या पात्या, खोड, नारळ, त्याचे साल, करवंटी अगदी सगळ्याचाच वापर करता येतो. नारळ पाणी म्हणजे तर अमृतासारखेच. नारळाची उंच ऐटदार झाडे कोकण किनार पट्टीवर दाटीवाटीने मिरवताना दिसतात त्यामुळे कोकण किनारपट्टीवर बर्याच लोकांचे नारळ व नारळाच्या झाडापासून मिळणार्या इतर उत्पन्नांवर उपजीवीका चालते. नारळाच्या झाडाच्या पात्यांतील काड्यांपासून झाडू तयार होतो. झावळ्यांपासून चटई प्रमाणे झाप तयार करतात, नारळाच्या खोडाचा पुलासाठी उपयोग होतो. ही सगळी माहीती आपण अभ्यासक्रमात शिकतच असतो. पण नारळाच्या झाडापासून अजुन एक उत्पन्न्/पेय निघते ते म्हणजे माडी.
गेल्या मे महिन्यात आम्ही मुरुडला हवापालट करण्यासाठी गेलो होतो. मुरुडच्या समुद्रकिनार्यावर गाडीतून उतरलो. मुरुडच्या किनार्यावर असणार्या सगळ्याच हॉटेल्स्/वस्तीगृहांभोवती अगदी उंच उ ऐटदार नारळाची झाडे तोर्यात मिरवत आहेत. माझी नजर नेहमीच अशा झाडापानांकडे असल्याने मान उंचावल्या उंचावल्या मला नारळाच्या झाडावर बुजगावण्याप्रमाणे मडकी लटकलेली दिसली आणि प्रचंड गंमत वाटली.
माडी काढतात हे माहीत होते पण प्रत्यक्ष पाहण्याचा कधी योग आला नव्हता. माझ्या कॅमेर्याने मला लगेच हिंट दिली आणि आता ह्याची प्रक्रिया जाणूनच घ्यायची हे मनाशी ठरविले. पतीराजांना मनीची इच्छा प्रकट केली कारण त्यांची मदत लागणारच होती. आम्हाला जे हॉटेल मिळाले त्या मालकाला माडी बद्दल विचारले. त्याच्याकडून आनंदाची बातमी मिळाली ती म्हणजे सकाळी ७ ला माडी काढायला माणूस येतो तेंव्हा तुम्हाला प्रत्यक्ष पहायला मिळेल. माझा आनंद द्विगूणीत झाला आणि झोपतानाही मला समुद्र किनारी जाण्यापेक्षा माडी उतरवताना पहायला जायच आहे हा विचार मनात रेंगाळत होता.
सकाळी लवकरच उठून ६.३० वाजताच मिस्टर व माझी श्रावणी मिळून आम्ही बाहेर पडलो. रस्त्यावरचा मस्त गरम चहा आणि बिस्कीट असा किनार्यावर बसुन नाश्ता करत माडी उतरवणार्या माणसाची वाट पाहत बसलो. काही वेळातच हातात कोयता, कमरेला प्लॅस्टीकची कळशी बांधलेला माणूस त्या हॉटेलच्या आवारात आला आणि कुठेही न पाहता झप झप सरळ नारळाच्या झाडावर चढू लागला. माझी कॅमेरा काढण्याची घाई उडाली. कॅमेरा ऑन करे पर्यंत तो झाडाच्या शेंड्यावर चढला.
झाडावर लावलेल मडक काढल, त्यात साठलेल द्रव त्याने कळशीत काढल.
परत ते मडक दुसर्या ठिकाणी काहीतरी कापून वगैरे लावल आणि झपाझप परत खाली आला. मग माझ्या मिस्टरांनी त्याला सांगितले की आम्हाला ह्या माडीची माहीती हवी आहे कशी काढतात ती. मी झपाझप दिसतील ते फोटो काढतच होते. तो खुष झाला. असे पर्यटक कदाचीत त्याला क्वचीतच भेटत असतील. त्याने आमच्यासाठी त्याच्या मोलमजुरीच्या वेळेतला थोडा वेळ दिला आणि माडी तयार करण्याची पुर्ण प्रक्रिया सांगितली.
माडी तयार करण्यासाठी लागणारे काही साहित्य :
कोयता -चांगला धारदार असतो.
मडके - हे वर टांगण्यासाठी मातीचेच असते.
सांबर शिंग किंवा मजबूत काठी - सांबार प्राण्याची शिंग भरपुर टणक असते.
काटेसावरीचा कोंब - काटेसावरीच्या झाडाचा कोवळया फांदीचा सोललेला कोंब. हा खाताही येतो. त्याने मला त्यातील थोडा तुकडा खायलाही दिला. तशी काही विशेष चव नसते. पण ह्याला चिकटपणा असतो.
दोरी - पोय गुंडाळण्यासाठी
कळशी - माडी उतरवण्यासाठी
माड बाजला म्हणजे त्याच्या फुलांचा कोंब यायला लागला की माडी काढायची सुरुवात करता येते. माडीसाठी मडके शक्यतो संध्याकाळी लावतात. फुलोर्याचा जो कोंब असतो त्याला पोय म्हणतात.
ती पोय तयार झाली की पोय उघडू नये म्हणजे फुलू नये म्हणून तिला दोरीने घट्ट बांधण्यात येते. त्याच्या टोकाला कोयत्याने आडवी चिर देऊन टोकाकडचा भाग खालच्या दिशेने निमुळत्या आकारात कापला जातो जेणेकरून द्रव खालच्या बाजूला पाझरेल.
असे कापल्यावर त्या पोयवर सांबर शिंगने ठोकले जाते. त्यानंतर सावरीचा चिकट बोंड कापलेल्या भागावर फिरवतात. त्यामुळे पोयीतून माडीचा फवारा न उडता खालच्या दिशेने गळून मडक्यात पडते.
मग मडक्याचे तोंड पोयच्या टोकाला लाऊन मडके पोयला टांगले जाते. त्यामुळे रात्रभर माडाच्या पोयीतून माडीचा होणारा स्त्राव मडक्यात जमा होत असतो.
सकाळी सुर्योदय झाल्यावर माडी काढणारा व्यक्ती आपल्या कमरेला एक कळशी बांधतो. नारळावर चढून म़डक्यात जमलेली माडी आपल्या कळशीत ओततो. मडके बाजूला कुठेतरी अडकवून पुन्हा त्याच पोयला थोडी टोकाला चिर देतो, सांबर शिंगने ठोकतो, सावरीचे बोंड घासतो व मडके पुन्हा लावून ठेवतो. फक्त पुन्हा बांधण्याची गरज नसते. ही प्रक्रिया पोयीतून माडीचा स्त्राव होईपर्यंत म्हणजे जवळ जवळ एक महीना एका पोगीमार्फत चालू राहते.
ही पोगी संपत आली आहे तरी अजुन प्रक्रिया चालू आहे.
माडी काढणारा लगेच झपाझप नारळाच्या झाडावरून खाली येतो. जवळ जवळ अर्धी कळशी भरलेली माडी बाटल्यांमध्ये किंवा दुसर्या भांड्यामध्ये टाकुन पुन्हा सरसर दुसर्या माडावार तिच प्रक्रिया करण्यासाठी चढतो. ही प्रक्रिया दिवसातून तिन वेळाही करता येते असे म्हणतात.
ही माडी नंतर कोणाची पर्सनल ऑर्डर असेल तर त्यांना दिली जाते नाहीतर माडी विक्री केंद्रावर नेली जाते.
माडीबद्दल असा समज आहे की माडीने नशा चढते. पण ही समज चुकीची आहे. शुद्ध माडीने कधीच नशा चढत नाही उलट ती शित गुणाची असल्याने आरोग्यदायी असते. माडीला काही धंदेवाईक लोक नशा आणतात. त्यात चुना तसेच इतर नशेचे पदार्थ टाकून तिला मादक बनवतात. शुद्ध माडी मात्र गोड, साधारण ताडगोळ्याच्या पाण्यासारखी व आंबूस लागते. जर ही माडी अजुन ४-५ तास ठेवली तर मात्र त्याला गॅस चढायला सुरुवात होते. म्हणून झाडावरून काढल्यावर लगेच प्यावी.
माडाप्रमाणेच ताडाची ताडी, शिंदीची निरा काढली जाते. माडीमुळे कोकण किनारपट्टीच्या रहिवाश्यांना उद्योगाचे साधन मिळाले आहे. मुरुडला जागोजागी परवान्याची माडी विक्री केंद्रे आहेत. माडी काढणारा प्रत्येक माडाचे साधारण २५ रुपये घेतो. त्यालाही उपजीवीकेचे साधन मिळते. शिवाय माडाच्या मालकाला माडी विकून उत्पन्न मिळते. पण माडी काढल्यामुळे नारळाला नारळ मात्र लागत नाहीत. नारळाच्या उत्पादनासाठी वेगळी नारळाची झाडे शिल्लक ठेवावी लागतात.
एकंदर देवाची करणी आणि नारळात पाणी त्याही आधी देवाची करणी आणि पोय मध्ये पाणी म्हणायला हरकत नाही.
प्रतिक्रिया
3 Feb 2012 - 3:58 pm | गवि
मस्त माहिती.. पण माडी नशीली नसते हे गळी उतरले नाही..
माडी म्हणजेच नीरा असेल तर नीरा स्टॉलवर कुठेही सरबतासारखी मिळते आणि माडी विक्री मात्र "लायसेन्स"वाल्या दुकानात हे कसं?
माझ्यामते नीरेवर प्रक्रिया करुन (फर्मेंटेशन/डिस्टिलेशन की फक्त फर्मेंटेशन माहीत नाही ) माडी बनवतात. तू नीरेच्या स्टेजपर्यंतची माहिती दिली आहेस आणि त्याला "माडी" असं नाव दिलं आहेस.
द्राक्षाचा पायाने तुडवून काढलेला रस ग्लासात भरुन त्याला वाईन म्हणावं तसं झालंय..
अर्थात माहिती उत्तमच... आवडली नेहमीप्रमाणे.
3 Feb 2012 - 4:28 pm | पैसा
माडाच्या पोयीची ताजी असते तिला नीरा म्हणतात आणि आंबून अल्कोहोल तयार झालं की ती माडी होते. तशीच काजूच्या बोंडांची ताजी नीरा असते आणि आंबून फेणी तयार होते. आंबल्याशिवाय तिला माडी म्हणत नाहीत. किंबहुना ताडाचीसुद्धा ताजी असते तेव्हा नीरा आणि आंबल्यावर ताडी. 'नीरा' हे नाव 'नीर' म्हणजे पाणी यावरून आलं असावं
21 Apr 2014 - 3:49 pm | संतोष दिवाडकर
माडी बद्दल मीच सांगु शकतो कारण गावी आम्ही काढतो झाडावरुन.
21 Apr 2014 - 3:52 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तपशिलवार लिहा मग....
-दिलीप बिरुटे
3 Feb 2012 - 4:04 pm | जागु
गवि माझ कन्फ्युजन आता अजुन वाढल. आता ह्याचे लिखाण मला वाचावे लागेल. पण कुठे सापडत नाही. निरा म्हणजे शिंदीपासुन बनवलेली असे आमच्याकडॅ प्रचलीत आहे. माडापासुन म्हणजे नारळापासुन माडी आणि ताडापासुन ताडी असे मी ऐकले आहे.
3 Feb 2012 - 4:26 pm | गवि
नीरा ही एक जनरल टर्म आहे. शिंदी, ताड, नारळ आणि इतर "पाम"वर्गातल्या (झावळीवाल्या) झाडांचा खोडातील रस (सॅप) याला नीरा असं एकत्रित नाव आहे.
नंतर माझ्यामते त्यात आंबण्याची क्रिया (फर्मेंटेशन) होऊन त्या रसातल्या साखरेचं सेल्फ जनरेटेड अल्कोहोल तयार होतं.
त्याला अजून स्ट्राँग करण्यासाठी काही ठिकाणी अधिकचे अल्कोहोल घालून ती फोर्टिफाय करतात असं ऐकलं आहे.
3 Feb 2012 - 4:06 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
मस्त लेख आणि फटू.. मजा आली वाचायला.
आवडेश. :)
3 Feb 2012 - 4:07 pm | इरसाल
जागुताई माहिती उत्तम.
पण गवि म्हणत आहेत ते बरोबर आहे.माडावरून काढली कि ती नीरा आणि उन्हं चढू लागली कि फर्मनटेशन होवून त्याची ताडी/माडी होते आणि त्यात आम्बल्यामुळे मादकपणा निर्माण होतो. म्हणून त्याची नशा होते असे म्हणतात.
3 Feb 2012 - 4:14 pm | जागु
काव्यप्रेमी इरसाल धन्यवात. आता मी बदल करते.
3 Feb 2012 - 4:28 pm | विशाखा राऊत
माडी... मस्त माहिती आहे. निरा आंबली की माडी बनते. तिला गोडपणा देण्यासाठी त्यात साखर घातली जाते कधी कधी. पण आंबल्याचा वास अर्थात न पिणार्यांना खुपच डोकेदुखी देतो.
3 Feb 2012 - 5:00 pm | गणेशा
मस्त माहिती ...
आवडली ..
मनोरीच्या एका दिवसाच्या वास्तव्याची आठवण आली :
कोळीवाड्यात गेलो असताना, मित्र कुटंबाने समोर बिंधास्त ताडी दिली प्यायला..
त्या वासानेच आम्ही ती १ च घोट प्यालो.. आमच्या मैत्रीणीने मात्र भरपुर घेतली.
ताडी पेत नाहि म्हणुन जेंव्हा त्यांनी माझ्यासाठी बियर आणली तर हाय
आम्ही दारुच पित नाहि म्हणुन हशा झाला..
आम्ही ज्यांच्याकडे गेलो होतो.. ते बाप .. मुलगा आणि अजुन काहि जन बिंधास्त पित होते...
आम्ही आपुले मासे खाण्यात दंग ...
3 Feb 2012 - 5:17 pm | अन्या दातार
माहिती छानच. पण गवि म्हणतात तसे, झाडावरुन काढलेला रस बहुदा आंबवत असावेत.
3 Feb 2012 - 5:12 pm | सुहास झेले
मस्त माहिती जागुतै.... :) :)
3 Feb 2012 - 5:16 pm | बिपिन कार्यकर्ते
मस्त माहिती!
अवांतर : आता फोटो दिसतील सगळ्यांना!
3 Feb 2012 - 7:29 pm | गणपा
गावाला फेरी मारुन आल्या सारख वाटलं.
:)
आवांतर : ताडी/माडी ताडाच्या, माड (नारळाच्या) आणि खजुराच्या झाडाची ही काढतात.
फोटु जालावरुन साभार.
3 Feb 2012 - 7:58 pm | शुचि
जागु ताई यांनी त्यांच्या रेप्युटेशनप्रमाणे अनवट माहीती देऊन परत - "दिल खुष कर दिया!!" :)
+१ पैसा ताई
नीरा फार मस्त लागते चवीला.
4 Feb 2012 - 12:00 am | रेवती
नीरा मलाही आवडते. पण त्यांचे ग्लासेस स्वच्छ नसतात. आता पुढच्यावेळेस मी घरून ग्लास घेऊन जाणार आहे नीरा प्यायला.
4 Feb 2012 - 8:31 am | पक पक पक
आता पुढच्यावेळेस मी घरून ग्लास घेऊन जाणार
अन हाटिलात ताट वाटी बी............
4 Feb 2012 - 8:55 am | रेवती
याऽबया! हाटिलात ताट वाटी?
आन् ती कशापायी वं?
तित्तं सांगता येतं नव्हं का ये बाऽऽबा, जरा दुसरं ताट आन् वाटी द्ये म्हून.
त्या नीरेच्या शेंटरवर काम कर्नारा असतुया पोरगा, त्याच्यापाशी स्वच्छ आसं काय सुदीक नसतया.;)
6 Feb 2012 - 5:29 pm | वपाडाव
मग निरा प्याला जाताना एखादा स्वच्छ, धुवुन खळ काढलेला सुती कापडाचा तुकडा नेलास तर परवडणार नै का?(परवडणे हे आकारमानासाठी आहे किमतीसाठी नाही...)
अन अजुन एक : पक*३G हे नाव आडौलं बरं...
बाकी, प्रोसेसची म्हैती झ्याक... जागुतै ब्येष्ट बर्का...
3 Feb 2012 - 10:07 pm | पक पक पक
जागुतै ,
हा अनुभव मुरुड्लाच ४ वरषा पुर्वि मि देखिल घेतला आहे ,पाटील खानावळ म्हणुन आहे तेथे त्यांच्याच वाडीत सक्काळी ६.३० ते ७.०० च्या दरम्यान त्यांचे गडि माणस माडी उतरवत असताना पाहीले .ते काय करत आहेत हे विचारले असता ते माडी उतरवत आहेत हे समजले. आणी मग १० रुपयाला एक या प्रमाणे दोन गोल आकारची प्लॅस्टीकच्या हांड्यातुन त्या पेयाचा आस्वाद घेतला.....
3 Feb 2012 - 10:12 pm | पक पक पक
प्रतीसादात चुकुन माडी च्या ठिकाणी ताडी लिहीले आहे , जागरुक मिपाकरांना विनंती आहे कि गैरसमज पसरवु नये. ;)
3 Feb 2012 - 11:58 pm | रेवती
ता चा मा केलाय.
4 Feb 2012 - 8:27 am | पक पक पक
ता चा मा केलाय.
केला नाय हो चुकुन झाला आहे..ताडी न पिता झाला आहे.
4 Feb 2012 - 8:49 am | रेवती
पक*३ जी, मी तो दुरुस्त केलाय असे म्हणायचे आहे.
4 Feb 2012 - 9:21 am | पक पक पक
अरे हो खरच कि.....धन्यवाद रेवती ...
3 Feb 2012 - 10:15 pm | मन१
छानच. पण नीरा ह्या पेयाचा शोध कुणातरी सी व्ही रामन ह्यांच्या शिष्या, महिला शास्त्रज्ञानी लावल्याचं वाचलं होतं.
तुम्ही सांगितलेली प्रोसेस पाहून ते पारंपरिक पेय आहे असं मला जे (अग्नीपंख वाचण्या)पूर्वी वाटायचं, तेच बरोबर होतं असं आता वाटू लागलय.
डोक्याची मंडई झालीय.
3 Feb 2012 - 10:42 pm | अत्रुप्त आत्मा
व्वा...व्वा....आज जागु ताईंमुळे माझ्या लहानपणीच्या हरिहरेश्वरच्या अठवणी जाग्या झाल्या,आणी खरं म्हणजे कम बॅक झाल्या,,,मे महिन्याच्या सुट्टीत मी व माझी सगळी मावस भावंड हरेश्वरला असायचो तेंव्हा अमचा मामा ही फ्रेश नीरा/ताडी सक्काळीच ६वाजता जाऊन अणायचा, एका मोठ्ठ्या काळ्या ब्यारलमधे आणलेली निरा/ताडी आंम्ही मजबूत प्यायचो,,आणी ओटी वरुन माजघरात तिथून पड्वीत एकमेकाला/मधे येइल त्याला मुद्दाम धडका देत नाटकी नशा आणुन चालायचो... ;-) निरेची ती अंबट/गोड/तुरटसर चव तर अवडायचीच पण सगळ्या मोठ्या माणसांसामोर (खरी) माडी प्यायल्याचा आव अणुन केलेली झिंगा-झिंगी अस्सल नशा दिऊन जायची... ती तसली नशा आता काहिही प्यायलं तरी यायची नाही...
हे सगळं आज अठवलं ते जागु तैंच्या या धाग्यामुळे.... त्यामुळे पहिला धन्यवाद जागु तैंना आणी उरलेले सगळे धन्यवाद-माझं अजोळ हरिहरेश्वरला
(जुन्या अठवणी पिऊन पूर्ण त्रुप्त जाहलेला)- अत्रुप्त आत्मा
3 Feb 2012 - 10:48 pm | जाई.
मस्त माहिती जागुतै
नीरा एकदा काँलेजच्या बाजूला असलेल्या नीरा केन्द्रात चाखली होती
3 Feb 2012 - 11:19 pm | किचेन
मस्त माहिती आणि फोटोहि सुंदर.
4 Feb 2012 - 12:16 am | आळश्यांचा राजा
अमिताभ आणि नूतनच्या या सुंदर सिनेमाला याचीच पार्श्वभूमी आहे. (माडाच्या जागी खजूर आहे.)
२:३० मिनिटांनंतर अमिताभ "रस" (नीरा) उतरवताना दिसेल.
(व्हिडीओ दिसत नसल्यास इथे पाहता येईल.)
बाकी माहिती मस्त. आणि ती मिळवण्यासाठी केलेली खटपटही!
ओरीसाच्या आदिवासी भागात याला सल्प/ सल्पी (शलभ/ शलभी - शिंदी) असे म्हणतात, आणि बोंडा तसेच इतर काही आदिवासी जमातींच्या उपजीविकेचे ते एक प्रमुख साधन आहे. ते पिण्यासाठी वाळवून पोकळ केलेल्या दुशी भोपळ्याच्या तुंब्याचा वापर केला जातो. सवड मिळताच त्याचे फोटो टाकीन.
4 Feb 2012 - 1:07 am | चतुरंग
जागुतै, पायरीपायरीने सगळे समजावून दिल्याने मजा आली.
गवि, म्हणतात ते बरोबर आहे. ताड्/माड वर्गीय झाडांची सकाळी ताजी असते ती 'नीरा'.
एकदा का उन्हाने आंबली की त्याची ताडी/माडी व्हायला सुरुवात होते. (म्हणून तर उन्हाळ्यात नीरा बर्फाच्या सान्निध्यात ठेवून आंबण्यापासून वाचवतात.)
माडीचा वास भलताच आंबूस असतो, अगदी मळमळेल इतपत. मी एकदाच एकच घोट जेमतेम घेऊन बघितली आहे ब्येक्कार चव असते :(
त्याउलट नीरा मी एकेका वेळी जवळपास लीटरभर प्यालेलो आहे. थंडगार आणि गोड. मस्त लागते! :)
रंगा
4 Feb 2012 - 8:43 am | मदनबाण
वा... रसाळ धागा ! ;)
मी नीरा बर्याच वेळा प्यायली आहे,मस्त लागते...चव जरासी ताडगोळ्याच्या आत जे पाणी असते त्या सारखी असते. शरीरास उत्तम आणि थंडावा देणारी आहे. :) यात म्हणे चुन्याची निवळी आणि सॅकरिनची मिसळ केली जाते,पण नक्की ठावुक नाही.
बाकी या धाग्यामुळे मला एक मजा आठवली, आमच्या इथे एक माजुरडं कुत्तरडं व्हतं, त्ये काय करायचं ? तर...आमच्या हिथं यक ताडाच झाड व्हतं त्याची पिकलेली फळे गळुन खाली पडतं...अन् हे माजुरडं कुत्तरडं त्या पडलेल्या फळांपैकी एखादं उचलुन लयं वेळ चावत बसायचं....मग काय बर्याच वेळ फळाशी चावा-चावी केल्यावर त्याला चढायची आणि मग अख्या कॉलनीत ते झिंगत फिरायचे ! :)
4 Feb 2012 - 10:57 am | जागु
सगळ्यांचे मजेशीर अनुभव आणि प्रतिसाद वाचताना मलाही मजा येतेय. वरती मला एडीट करायच आहे सगळ.
4 Feb 2012 - 11:21 am | विसोबा खेचर
सुरेख लेख..!
लेख व प्रतिक्रिया वाचून नीरा, ताडी, माडी, हातभट्टी, देशी, विदेशी - सिंगल माल्ट, विदेशी - ब्लेन्डेड -इत्यादी सर्वातला फरक स्पष्ट करून सांगणारा एक लेख लिहायची इच्छा झाली.. परंतु तूर्तास वेळ नाही..
जागूबेनचा लेख व फोटू मात्र मस्तच.. :)
(ताडीमाडी प्रेमी) तात्या.
6 Feb 2012 - 12:58 am | आनंदी गोपाळ
टॉड्डी.
म्हणजे च आपली ताडी.. छान लागते ;) सकाळी विकत घेतली ती चढत नव्हती. मग बाटल्या उन्हात ठेवल्या. १२ च्या सुमारास शँपेनसारखी फसफसली होती अन चढली पण. वास नारळासारखा येतो.
6 Feb 2012 - 5:37 pm | परिकथेतील राजकुमार
बर्याच दिवसांनी मिपा उघडल्याचे सार्थक झाले. :)
शुद्ध-अशुद्ध, नशा-बिनानशा असा भेदभाव न मानणारा ताडी-माडी प्रेमी.